ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १७

Submitted by बेफ़िकीर on 12 October, 2010 - 09:07

खंडुजी उमरे या माणसाला गो. नी. दाण्डेकरांनी खरच 'माचीवरचा बुधा' असे विशेषण लावले असेल का असा निरागस प्रश्न दिल्या सोडून सगळ्यांच्या मनात सततच येत होता.

झालं काय! की आत्म्याने बिंदिया नैन आणि तिच्या आठ मैत्रिणी, होस्टेलवरची किमान सोळा मुले आणि सापत्नीकर सर या सर्वांदेखत सांगीतले..

"मी सिगारेटी ओढायला तिथे जायचो, अचानक प्रकाशझोत पडल्यामुळे घाबरून पळालो, बाकी काही नाही"

आणि त्या प्रकरणावर कसबासा पडद पडणार तेवढ्यात शांभवी नावाची एक मुलगी पचकली!

"याच्या तोंडाला दारूचाही वास येतोय सर!"

त्यावरून निराळा हल्लकल्लोळ झाला ज्यात दिल्या, अशोक, वनदास आणि आत्मा चौघेही अडकले. पण नेमकी सुरेखा धावून आली. या सुरेखा नावाच्या मुलीचे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड एकदम क्लीन असताना आणि प्रकृती वगैरे व्यवस्थित असताना हिने अचानक तीन पेपर्स कोरे का दिले असावेत हे काही सापत्नीकरांना समजायचे नाही. पण त्यामुळे त्यांना एकंदरीत त्य मुलीबद्दल आपुलकी वाटू लागली होती.

सुरेखाने सगळ्यांदेखत सांगीतले.

"तुम्ही चौघेही रूममधे दारू पिता हे सगळ्या कॉलेजला माहीत आहे. खरे तर एखादवेळेस अ‍ॅक्शन घेतली गेली तर सगळेच रस्टिकेट व्हाल! पण आजच्या आज आम्ही मुली हे प्रकरण इथेच संपवायला तयार आहोत. पण आम्हाला एक वचन हवे आहे. हे वचन तुम्ही चौघांनीही सापत्नीकर सरांना सर्वांसमोर द्यायचे आहेत. यापुढे तुम्ही दारूला स्पर्शही करणार नाही"

आणि चौघांनी खरच शपथा घेतल्या. इतर मुले हसत होती. मुली रागारागाने या चौघांकडे बघत होत्या. आणि सापत्नीकर सर स्वभावाने शांत असल्यामुळे त्यांनी ती शपथ स्वीकारली होती व ते प्रकरण तिथेच संपवायची तयारी दाखवली होती.

आणि चौघांनीही रूमवर येऊन पुन्हा पिऊन उरलेली बाटली संपवली होती. अजब ग्रूप होता तो!

मात्र यापुढे रूमच्या बाहेरच जाऊन प्यायची हे नक्की झालं होतं! त्यानंतर आत्म्याला तिघांकडून मोजून प्रत्येकी दहा दहा फटके बसले होते. तीस फटके बसल्यामुळे हुळहुळलेली पाठ घेऊन आणि झिंगलेला मेंदू घेऊन आत्मा रडत होता. त्याचा अपराध हा होता की तो सिगारेट प्यायला नेमका लेडिज होस्टेलच्या मागे जायचा. रूममध्ये सिगारेट ओढता येत नाही का हा प्रश्न विचारून त्यला पुन्हा धुतला होता पंधरा मिनिटांनी! मात्र आत्म्याला मारायच्या आधी चौघांनीही शिस्तीत असलेली दारू संपवलेली होती. त्यावेळेस मात्र आत्म्याला दारू दिलेली होती. काय मैत्री म्हणायची ही! पिताना वाटण्या बिटण्या एकदम समान! पिऊन झाली की मग शांतपणे भांडणे करायची अन अपराध्याला शिक्षा द्यायची!

नंतर बराच वेळ वनदास आत्म्याला पिळत बसला होता. शिव्याही देत होता. कारण वनदासला एक नक्की माहीत होतं, की आत्मा काही सिगारेट ओढणार नाही. बरं! दारू तर आपल्याच समोर पितो! मग हा गेला कशाला होता तिकडे??

आणि हळूहळू त्या प्रकरणावर पडदा पडला आणि आठवड्यातून दोन वेळा चौघे आंगनला जायला लागले. आत्म्याची अजूनही स्वतःच्या गादीत क्वार्टर लपवण्याची सवय तशीच होती. त्यामुळे त्याची आठवड्यातील इतर पाच दिवस काहीच कुचंबणा व्हायची नाही.

आणि नोव्हेंबर महिन्याची कडाक्याची थंडी पडली तेव्हा अचानक कॉलेजमधे एक सूचना लागली.

'एन्फ्लुएन्झाची जोरदार साथ आल्यामुळे ७, ८ व ९ तारखेला कॉलेज बंद राहील.'

काय कॉलेज आहे! फ्लुला घाबरतंय!

पण पोरे खुष! जोडूनच शनिवार रविवार आले असते तर काय बहार आली असती. पण तरीही तीन दिवस आपापल्या घरी जाता येणार हा आनंद काही कमी नव्हता.

आणि रूम नंबर २१४ मध्ये तिसरेच ठरले!

कुणीही घरी जायचे नाही. आणि कुणीही.... रूमवरही जायचे नाही.

ट्रेक!

स्पॉट???? ..... हं.... ..

... राजमाची!

काही माहिती वगैरे आहे का??

होय, एक जण पाच वर्षापुर्वी गेला होता...

आहे काय पण तिथे??

तिथे?? नुसता आनंद, शांतता, सुख!

म्हणजे???

म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे... या आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा... आणि जगा लेको?? जगा....

पण .... चालायला किती लागेल??

हेच आपलं.... लोणावळ्यापासून १४ किलोमीटर...

अगंगंगं!

त्यात काय अगगग?? आयुष्यात एकदा तरी एवढे चालून बघा???

पण... म्हणजे... फक्त रूमवरचे की.... आणखीन कोणी??

आणखीन कोण बे पायजेल तुम्हाला???

का??? नेऊ की..... पो.... पो....

काय पो... पो....????

री....... ... री री....

पोरी???????

हा....

कुठल्या??????

आपल्यावर ज्या भाळतील त्या....

नवीन खंबा ऑर्डर झाला त्या दिवशी आंगनमध्ये! म्हणजे एक हाफ संपलेली होती. चिकन समोर आलेले होते. रात्रीचे अकरा वाजलेले होते. पण चिकन परत पाठवले. म्हणे तासाभराने गरम करून आणा, आणि आत्ता एक खंबा द्या... नंबर वन व्हिस्कीचा!

आणि घनघोर चर्चा, शेकडो शिव्यांची बरसात, तुफानी दारू, टाळ्या, हशे, कंबरेखालचे विनोद आणि आणखीन बरेच काय काय असलेली ती पार्टी संपली तेव्हा सगळ्यांचे ठरलेले होते....

दिलीप उर्फ धनंजय राऊत आपल्या नियोजीत वधूला, सुरेखाला घेऊन येतील....

आजवर नुसतीच अक्षयमधे लाजत लाजत कॉफी पिणारी दीपा वनदासबरोबर बिनधास बनून येईल..

अत्यंत कडक वातावरणात राहिलेली, या सगळ्यांपेक्षा मोठी असलेली रशिदा अशोकबरोबर येईल...

.... आणि आत्मानंद ठोंबरे.... अलका देव 'यांना' विनंतीपुर्वक विचारतील... 'येता का हो???"

पोरीही भारीच असतात! नाकाच्या शेंड्यावर राग! ओठ मुरडून नापसंती दर्शवणे! नजर चोरून पुन्हा हवे तेच बघणे! हृदयात धडधड! आणि 'तुला जिवंत ठेवल्याचे उपकार केले मी' असा चेहरा करून ट्रीपला यायला तयार होणे!

पुण्याच्या कडक गुलाबी थंडीत त्या दिवशी पहाटे पाच वाजता शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर तीन प्रेमी युगुले आणि एक निष्कारण हपापलेला जीव लोणावळा लोकलची वाट पाहात होते. 'फक्त मुली मुली आहेत' या सदराखाली प्रत्येक मुलगी आपापल्या घरून परवानगी मिळवून आली होती.

आणि नाही म्हंटले तरी आत्ताच्या त्या मोहक वातावरणात, अजून उजाडलेही नसताना... सगळ्यांची मने केव्हाच स्वप्नांत पोहोचली होती. ............राजमाची!

लोणावळा हे अतिरम्य ठिकाण अक्षरशः झक मारेल असं आहे राजमाची गाव! लोणावळ्यात जो राजमाची पॉईंट आहे तेथे उभे राहिले की खूप लांबवर, म्हणजे मधली एक प्रचंड मोठी दरी पाहून पलीकडे पाहिले की हे गाव दिसते! गाव म्हणजे काय? चाळीस घरे! मुलगा सहा वर्षाचा होईपर्यंत 'वस्त्र' या वस्तूची त्याला काहीही गरज नसते हे जिथे गरीबी शिकवते ते गाव! जिथे प्रसुतीसाठी लोणावळ्याला जाणे आवश्यक वाटत नाही.शेणाने सारवलेल्याच सगळ्या झोपड्या असल्यामुळे आसमंतात शेणाचा गंध दरवळत असतो! तुम्ही तिथे गेलात तर जणू रॉजर मूरच आला असे लोक तुमच्याकडे बघतात.

ही कथा ज्या काळातील आहे त्या काळात तिथे दिवेही नव्हते. आता आहेत.

पावसाळ्यात परातभर खेकडे आणतात आणि शिजवतात. एरवी भात, भाकरी, आमटी आणि बटाट्याचा रस्सा हे जेवण! घरात आपल्याला अंधारामुळे आधी काही दिसतच नाही. कुठल्यातरी कोपर्‍यात असलेल्या चुलीपाशी बसलेली अनेक बायकांपैकी एक बाई फक्त दिसते. किमान दोन लहान बाळे अत्यंत मन लावून किरकिरत असतात. त्यांचे किरकिरणे हा तिथे ठेका असतो. त्या मुलांना शांत करावे हे तिथल्या कित्येक पिढ्यांना वाटलेले नाही. आणि मुख्य म्हणजे, बरे झाले हे चौघे थंडीत गेले ते! पावसाळ्यात गेले असते तर....

.... परतच आले नसते. पारणे फिटणे नावाचा वाक्प्रचार लिटरली अनुभवता येणे असा पावसाळा इथला!

लोणावळा लोकलमधून सव्वा तास प्रवास करून खिडकीतून इकडे तिकडे टूकूटुकू बघणार्‍या पोरींच्या मादक डोळ्यांकडे बघत बघत सगळ्यांचा प्रवास पार पडला आणि ... वाटचाल सुरू झाली.

सकाळचे जेमतेम साडे सहा वाजलेले! अशोक जाड! आत्मा कधीच कष्ट न केलेला! पण अशोककडे 'रशिदाला आपण शूर वाटलो पाहिजेत' म्हणून चालण्याची उर्मी असणे हे टॉनिक तरी होते. आत्म्याने काय करायचे? डांबरी सडक मागे पडली अन मुंबईच्या गर्भश्रीमंताची फार्महाऊसेसही!

आणि मग झाली की सुरू पायवाट! एरवी ट्रेकला असतात तश्या ढोरवाटा नाहीत इथे! इथे चांगली दहा फुट रुंद वाट आहे मळलेली!

आणि मग दीपा बोरगेने करून आणलेले झणझणीत पण गार झालेले पोहे पाहून अक्षरशः तुटून पडले सारे! केवळ सातव्या मिनिटाला एवढा मोठा डबा रिकामा झालेला पाहून पोरी आपापसात पाहून हळूच हासल्या.

दिल्या - पोहे मस्त हां?? एकदम!
दीपा - आईने केले...
दिल्या - त्यांनाच सांगतोय निरोप द्यायला... तुला कुठले जमणार पोहे??
दीपा - इतकी काही मी ही नाहीये बर का??...
दिल्या - नाहीयेस?? तरीही वन्याशी मैत्री जमली म्हणजे दुर्दैवच म्हणायचं....
दीपा - असुदेत असुदेत
सुरेखा - तू का रे तिल पिडतोयस..??
आत्मा - सुरेखा वहिनी... आपण यांना विवाहानंतर 'अहो' म्हणणार आहात ना??

आत्मानंदचे शुद्ध मराठी इतक्या जवळून पोरींनी आजच ऐकले होते असे नाही. पण या वातावरणात मात्र त्याच्या या वाक्यामुळे पुढील दिड दिवसांचा बकरा तोच होणार हे ठरले आपोआप!

सुरेखा - म्हणेन हो भावजी... आता 'ए' म्हणूदेत...

चालायला सुरुवात झाली तशी पोरे चेकाळून एकमेकांना काही ना काही विनोद सांगायला लागली. पंधराव्या मिनिटाला 'जरा अ‍ॅडल्ट आहे हां' वगैरे परवानग्या मागत जरा किंचितच चावट जोक ऐकू यायला लागला. तश्या पोरीही ओढणी तोंडावर धरून खुसखुसू लागल्या. अर्थात, ते जोक्स प्रेम या विषयावरचे होते व प्रेमवीरांनी प्रेमिकेला सोडण्यासाठी काय काय कारणे शोधली वगैरे स्वरुपाचे होते. म्हणजे प्रेमिका किंवा बायको जाड असणे वगैरे!

सामान प्रत्येकाच्याच हातात होते. पण आत्मानंद सर्वात अशक्त मुलगा होता.

आत्मा - बरेच चाललो नाही आपण? जरा विश्राम करावासा वाटत आहे...
रशिदा - इतनेमे थक गये हो?? और तो बहुत है आगे रास्ता...
आत्मा - आपला उत्साह पाहून मलाही उत्साह आला आहे... चला...
सुरेखा - तुम्हे मराठी नही आती??
रशिदा - आती है ना? .. आदत पडगयी है हिंदीकी...
दीपा - ए... ते बघ ना किती सुंदर दिसतंय...

लांबवर नुकतीच ताजी ताजी सुर्यकिरणे पडलेली शिखरे दिसत होती. काही वेळ सगळेच भारावल्यासारखे पाहात होते.

वनदास - योगिता बालीच्या गालावर किरणे पडली की ती अशीच दिसते...

हे वाक्य स्फोटक होतं खरे तर! कारण योगिता बाली हे सुवर्णा मॅडमचे नाव होते. पण ते स्त्रीवर्गाला माहीतच नव्हते.

रशिदा खूप हासली या विधानावर!

दीपा - योगिता बालीचाच फोटो बघत बस मग...काय बोलेल...
सुरेखा - आवडतात एकेकाला एकेक..
दीपा - न आवडायला काय झालं??? सगळ्याच आवडतील...
आत्मा - तुम्हा दोघांत विवाहाआधीच बिकट परिस्थिती निर्माण होत आहे...
वनदास - आत्म्या... अरे राजमाचीला तरी भाषा बदल की राव...

एक तास चालल्यानंतर 'निरपणीचा धोत' लागला.

नुसतीऑ धमाल! एकीकडून प्रचंड धबधबा पडतोय, त्याच्यामुळे दुसर्‍या बाजूला तळे झाले आहे आणि मधून रस्ता!

सगळेच तिथे थांबले. निसर्गातील असे पाणी चक्क शुद्ध असते हा शोध सगळ्यांनाच लागला. तहान भागली तरीही भरपूर पाणी प्यायले अन मग मात्र कुणाला उठवेचना! कारण आता विश्रांतिचा मोह होऊ लागला होता.

आत्मा - दीपाताई... मगाशी आपला गैरसमज झाला बहुधा....
दीपा - ए तू मला ताई बिई म्हणू नकोस ना...
आत्मा - तुमच्यात आणि माझ्यात तेच नाते आहे...
दीपा - असुदेत... कसला गैरसमज??
आत्मा - हे ज्या योगिता बालीबद्दल बोलत होते...

वनदासने घातलेला धपाटा जोरदार असल्यामुळे आत्मा दचकून बोलायचा थांबला...

दीपा - बोल बोल.. त्याला घाबरू नकोस...
दिल्या - ल्येका वन्या... आत्ताच तुला घाबरत नाहीये....
आत्मा - त्या योगिता बाली म्हणजे चित्रपट अभिनेत्री योगिता बाली नव्हेत...
दीपा - ....... मग?????
आत्मा - सुवर्णा मॅडमचे नाव आहे ते...
दीपा - ई.... शी....
आत्मा - आणि... यांना त्यांच्याहीबद्दल काही प्रमाणात आकर्षण आहे...

आता मात्र वन्याने ठोकलाच आत्म्याला! पोरी हासत होत्या. दिल्या आणि अश्क्याने वन्याला आवरले. पोरी असल्यामुळे शिव्या बिव्या देत येत नव्हत्या.

दिल्या - चला... उठा...
आत्मा - उठतच नाहीये...

'क्काय???' करून एकदम तिघांनी आत्म्याकडे पाहिले.

आत्मा - उठवतच नाहीये...
वन्या - अजून एक लाथ घालू का कंबरेत??
आत्मा - नको... त्याहून चालणे बरे!
अशोक - मी... एक..... एक जोक सांगू का??
सुरेखा - घाणेरडा नको हां....
अशोक - छे छे.... एकदम पवित्र... या रामप्रहरी तसला जोक कोण सांगेल..
रशिदा - आहाहाहाहा!
आत्मा - तुम्ही 'आहाहाहाहा' म्हणताना सुंदर दिसता...
अशोक - आत्म्या... आमच्याच बायकांकडे पाहिलंस तर त्या मगाचच्या धबधब्यातून खाली टाकेन...
आत्मा - जे सुंदर आहे त्याची मनसोक्त स्तुती करावी... कारण ती ईश्वरी निर्मीती असते...
रशिदा - आपके साथ नही आया कोई???
वनदास - येणार होत्या... पण पुण्यात नव्हत्या...
दीपा - कोण???
वनदास - नाटेकर काकू...

दिल्या आणि अशोक का हसतायत हे पोरीना समजत नव्हते.

आत्मा - तुम्ही निदान वयाची तरी बाळगायला हवीत...
वनदास - तुम्ही बाळगलीत की आम्हीही बाळगू!
दिल्या - तू जोक सांग रे अश्क्या...
रशिदा - लेकिन हिंदीमे बताईये हां...
अशोक - तर ऐका.. म्हणजे 'सुना'....मुलगा आईला विचारतो...
आत्मा - अहो... हिंदी....
अशोक - बच्चा मां से पुछता है... मां.... आप पैसे ब्लाऊजमे क्यों रखती हो??

अशोकच्या जोकची इथेच पोरींना कल्पना आली. पण आत्ता सगळ्यांनाच असला जोक ऐकायची इच्छा होत होती. त्यामुळे रशिदा सुरेखाच्या खांद्यावर मान टेकून हासली आणि दीपा डोळे मिचकावून!

आत्मा - ... मग??
अशोक - तो मां ने कहां... तुम्हारे पिताजीसे पैसे बचाने के लिये....
आत्मा - यात विनोद काय??
अशोक - गप रे...
वनदास - हां बोल बोल...
अशोक - तो बच्चा कहता है.. ओह.. बेचारे पापा..कामवालीके पैसेपे दिन गुजारने पडते है उन्हे

दोन तासात पायाचे अक्षरशः तुकडे पदायची वेळ आली होती सगळ्यांची!

पण चालण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. मात्र आत्मा पावला पावलाला थांबत होता.

आत्मा - आपण जरा बसायचं का?
अशोक - अजून रात्र झालेली नाहीये..
आत्मा - तसलं बसणं नाही हो... खरखुरं बसायचं का?
रशिदा - तसलं बसणं क्या होता है??
सुरेखा - आप नही जानती?? एक से एक पियक्कड है सारे...

रशिदाने सामान बाजूला ठेवून दोन्ही हात तोंडावर ठेवून डोळे विस्फारून आश्चर्योद्गार काढला.

आत्मा - यांना काय झाले??
अशोक - आप क्यूं परेशान होती हो?? शादी के बाद किसको पीनी है??
रशिदा - लेकिन ये उमरमे पीते है आप??
आत्मा - अहो... पीते है काय पीते है?? एकटेच अर्धी बाटली गिळतात...
दिल्या - या आत्म्याला आणायला नको होतं.. हे बदनाम करतंय सगळ्यांना..
सुरेखा - दिलीप.. तू नाही ना पीत आताशा...??
दिल्या - छ्या!
आत्मा - काय हो?? पीत नाही तुम्ही?
दिल्या - आत्म्या... खोटनाटं बोललास तर इथेच रुतवीन या वाटेत...
आत्मा - सुरेखावहिनी... हे पीत नाहीत....
सुरेखा - खर्र सांगायचं...
आत्मा - हे पीत नाहीत हे खोटं आहे हे खरं आहे असं म्हणणारे खोटे आहेत की खरे आहेत इतकाच निर्णय लागायचा आहे असे ज्यांचे मत आहे तेच नेमके खोटे आहेत हे खरे असावे असे वाटते.

सुरेखा - दिलीप .. पितोस ना तू??
दिलीप - नाही गं बाई..
आत्मा - अगदीच म्हणजे... फार झालं तरंच...

दिलीपने आत्म्याला धरून बुकलला. त्याचा ओरडा कमी झाल्यावर त्याला सुरेखाने अत्यंत आत्मीयतेने पाणी प्यायला दिले.

सुरेखा - मारामार्‍या कसल्या करता सारखे?? काय रे आत्मानंद.. पितो का हा??
आत्मा - सगळे पितो आम्ही... सगळेच्या सगळे...
सुरेखा - दिलीप?????

दिलीप आता मात्र भडकलेला होता. आता अशोक मध्ये पडला. त्याने किमान दहा मिनिटे अत्यंत प्रभावी वक्तृत्वाची छाप पाडल्यावर कुठे सगळ्या पोरींना समजले. अगदीच आनंदाची बाब असली, तीही त्याच तिघींच्या बाबतीत, म्हणजे आज दीपा कॉफी प्यायला आली, आज सुरेखाने आवडीचा ड्रेस घातला वगैरे असली, तरच पितात!

ही असली कारणे रोज निघतात हे मात्र त्या भोळ्या पोरींना वाटू शकत नव्हते.

आणि वाटायला लागले. कारण साडे चार तास अत्यंत बेकार पायपीट करून ते ज्या गावात पोचले ते गावच नाही आहे हे त्यांच्या लक्षात आले. साधे बाथरूमला जायचे तरी पार कुठल्याकुठे जावे लागणार होते. लाईट नाहीत काही नाही! कुत्री उगाचच लांबून भुंकत होती. नागडीउघडी पोरे अत्यंत कुतुहलाने पाहात होती. आणि या सगळ्याचा आणि मगाचच्या भयानक चालण्याचा परिणाम अतिशय दमण्यात झाल्यावर खंडुजी उमरे या नव्वद वर्षाच्या माणसाच्या घरात त्याच्या नातसुनांनी केलेला चहा वगैरे घेऊन सगळे जण अक्षरशः निद्रिस्त झाले. अन सर्वात शेवटी, म्हणजे चक्क संध्याकाळी सात वाजताच उठलेल्या सुरेखाने पाहिले तर चौघांचीही चर्चा दारू याच विषयावर चाललेली होती.

सुरेखा - ए... प्यायची नाहीये हां...
दिल्या - सुरेखा.. ऐकून घे... आज किती चाललोयत...
अशोक - वहिनी... आईशप्पथ सांगतो.. आजच्या दिवस घेऊदेत.. फार म्हणजे फार अंग दुखतंय..
सुरेखा - आमचं नाही का दुखत??
अशोक - अहो पण मुली घेत नाहीतच ना??
वनदास - अश्क्या... माझं काय म्हणणं आहे....
अशोक - काय...
वनदास - काय गं दीपा??... टेस्ट करणार का आज??
दीपा - शी:! काय विचारतात...
दिल्या - खरंय पण.. इथे कोण बघणार आहे तुम्हाला...
सुरेखा - बघायचा काय प्रश्नंय.. आम्ही तुम्हालाच नाही म्हणतोय तर...

वितंडवाद झाल्यानंतर दीपा आणि सुरेखा फक्त एकेक घोट टेस्ट म्हणून घ्यायला तयार झाल्या. पोरांनी मात्र बरोबर आणलेल्या दोन पैकी एक तरी बाटली आज संपवायचीच याची तयारी सुरू केली.

आणि खंडुजी उमरे येऊन बसला. नव्वद वर्षाचा, ताठ कण्याचा म्हातारा! प्यायलाही वस्तादच होत लेकाचा! एकदाच कधीतरी गो नी दांडेकर आले होते राजमाचीला तेव्हा त्यांच्याबरोबर फिरला होता. त्याला गो नींनी 'माचीवरचा बुधा' असे नाव दिले होते आणि एका पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला होता. तेव्हापासून ट्रेकला राजमाचीला जाणारे सगळेच लोक खंडुजी उमरेकडेच उतरायचे! कारण त्याचं घर म्हणजे तीन मोठाल्या खोल्या, एक गोठा आणि एक ओसरी! गोठ्यात एक बैल! एकच! कुत्री, मांजरी, कोंबड्या सगळे कुठेही गुण्यागोविंदाने वावरणारे!

आणि कुटुंबात चवदा जण त्याच्या! बायको मात्र नसावी! पण तीन तरुण पुरुष, त्यांच्या बायका, दोन पंधरा वगैरे वर्षाची मुले, दोन तेवढ्याच मुली, तीन सतत किरकिरणारी तान्ही बाळे आणि स्वतः खंडुजी!

हा म्हातारा स्वतःच येऊन बसल्यामुळे 'आजोबा, तुम्ही घेता का' हा प्रश्न विचारणे भागच पडले. त्यावर 'चालतंय की' म्हणत लेकाच्याने लार्ज पेग पाणी वगैरे घालून एकदम एका घोटातच मारला आणि बघत बसला. हे बरं आहे की? म्हणजे तुमची लवकर संपली म्हणून तुम्ही पुढचा पेग भरणार आणि चढत नाही चढत नाही म्हणत खंबा संपवणार! त्यने दुसराही पेग तसाच लावल्यावर मात्र त्याच्याबरोबरच्या सगळ्या गप्प थांबवून दिल्याने खंबा स्वतःच्या मागे ठेवला व 'जेवण झाले का तयार' म्हणून विचारले.

चौघांचेही तीन तीन पेग झाले आणि दीपा आणि सुरेखाला ती टेस्ट अजिबात आवडलेली नव्हती. मात्र आता गप्पा भरपूर सुरू झाल्या. खंडूजी आत निघून गेला होता. आतून कसलातरी खमंग वास येत होता.

रशिदाला कुणीतरी तिचा इतिहास विचारला. मन मोकळे करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ, चांगला ग्रूप आणि चांगली जागा नसणारच होती. क्षणात रशिदा भूतकाळात गेली. मात्र आठवणींची कथ सुरू करण्यापुर्वी तिने आत्मानंदचे मात्र आभार मानले. सगळ्यांचेच मानले, पण आत्म्याचे अधिक! कारण अशोकने तिला सांगीतले होते. आत्मानंदने बरेच काही सांगीतल्याचा परिणाम म्हणून बाबा आणि दादा द्रवले असे!

आणि सगळेच रशिदाकडे बघत तिचे बोलणे ऐकायला सुरुवात करणार तेव्हा... पहिल्यांदाच आत्म्याला ते जाणवले... लाईटच नसल्यामुळे आत्तापर्यंत ते समजलेच नव्हते... पण आता कुणीतरी तिथे एक चिमणी आणून ठेवली अन ती अशी ठेवली की आत्म्यालाच फक्त ते दिसू शकत होते...

रशिदाची ओढणी घसरल्यामुळे आत्म्याल शकिलाच्या फोटोची आठवण येत होती.

अडीच पेग झालेल्या आत्म्याच्या मनावर भूत बसले. त्याला आता फक्त तेवढेच दिसत होते. त्याच्या भावना अचानक प्रज्वलीत होऊ लागल्या होत्य. सुदैवाने आतून हाक ऐकू आली.. जेवण तयार आहे..त्यामुळे सगळेच उठले.

मात्र जेवतानाही आत्म्याची नजर रशिदाकडेच जात होती. पण शेवटी ते शेजारी बसलेल्या वन्याला जाणवल्यावर वन्याने त्याला हळूच मांडीला स्लाईट धक्का देत 'पुढे बघून जेव' अशा अर्थाची नेत्रपल्लवी केली. त्यामुळे भानावर आला खरा तो! पण... आत्मा मुळीच सुधारलेला नव्हता. आणि आत्ताही वन्याला तेच आठवले. नक्कीच हा मुलींनाच पाहायला मागच्या टेकडीवर गेलेला असणार! सिगारेट ओढायला कसला जातोय??

रात्री कितीतरी उशीरापर्यंत शेजारी झोपलेल्या आत्म्यावर वन्याचे लक्ष होते. आत्म्यामध्ये गेल्या दिड पावणे दोन वर्षात झालेले प्रचंड बदल वन्याला अस्वस्थ करत होते. मूळ हेतूपासूनच आत्मा डिस्प्लेस झाल्यासारखा वागत होता हल्ली. हे दिल्या आणि अशोकशी लवकरात लवकर बोलायलाच हवे असे ठरवून झोपलेल्या वन्याच्या अगदी झोपता झोपता मनात तो विचार आला...

आत्मानंदमधे झालेल्या या प्रचंड नकारात्मक बदलांना... आपण तिघे तर कारणीभूत नसू??????

नेमके त्याच वेळेस सुरेखा, रशिदा, दिल्या आणि अशोक यांच्या मनात येत होते...

.... आत्मानंद नसता तर... आपल्या नशिबात ही ट्रीप आलीही असती... पण आवडत्या माणसाबरोबर निश्चीतच आली नसती.....

ओल्ड मंक लार्ज... ऑन द रॉक्स.. या कथेचा नायक आत्मानंद ठोंबरे... इतरांना बर्‍यापैकी चांगल्या वाटेवर आणून.. स्वतः मात्र झिंग आणणार्‍या वाटेवर आता अशा ठिकाणी पोचला होता.. जिथून मागे फिरणे अजिबातच... शक्य नव्हते...
==============================================

श्रीवर्धन आणि मनोरंजन असे दोन गड या गावात आहेत. गावात आहेत म्हणजे या दोन गडांच्या बेचक्यात हे गाव आहे. श्रीवर्धन सहज चढण्यासारखा, तर मनोरंजन प्रचंड उंच! दोन्ही गडांवरून खूप लांब, दरीच्या पलीकडे पाहिल्यानंतर पुणे-मुंबई-पुणे धावणारी डेक्कन क्वीन आणि इतर अनेक ट्रेन्स अगदी सहज दिसायच्या!

श्रीवर्धनवर जाऊन सकाळी दहालाच खाली आलेल्या ग्रूपने मग मनोरंजनवर चढाई केली.

आपोआपच, जोड्याजोड्यांचे हात गुंफले गेले... आत्मा मात्र एकटाच... दमत दमत चढत होता...

आणि वर गेल्यावर... डोळ्यांचे पारणे फिटण्याच्या पलीकडील अवस्था निर्माण झाली...

काय तो निसर्ग! कुणीच कुणाशी काहीच न बोलताही बरोब्बर अशोक आणि रशिदा खूप लांबवर चालत गेले आणि एका झाडापाशी बसले.. दिसेनासे झाले.. मग हळूच.. जणू तसले काही मनात नाहीच आहे असा चेहरा करून दीपाही वन्याबरोबर चालत तिसर्‍याच दिशेला गेली... दिल्या आणि सुरेखा कशाला थांबणार आहेत मग??

मनोरंजन गडावर आज तीन स्पॉट्सना तीन वेगळी जोडपी एकमेकांच्या हातात हात गुंफून त्या विराट पण मोहक निसर्गाच्या साक्षीने आपली स्वप्ने रंगवत होती.

कुणालाच वाटले नाही की आत्मानंदबरोबर थांबावे!

आणि... खरे तर... आत्म्यालाही वाटले नाही... बारा वाजलेले होते... इकडे तिकडे बघत हळूच एका झादामागे जात आत्म्याने खिशातून एका छोट्याश्या बाटलीत सकाळीच भरलेला एक पेग काढला... कडवट तोंड करत दोन घोट मारले..

आपण पहिल्यांदाच दिवसा प्यालो... वैषम्य... पश्चात्ताप आणि पेग संपल्यावर आलेली तरलता...

आत्मा बेभानपणे गड उतरू लागला... नाहीतरी आपण कुठे आहोत आणि काय करतो आहोत याच्याशी कुणाला देणेघेणे नाहीच आहे... मग निदान.. जे कालपासून आपल्या मनात आहे.. ते तरी करू...

केवळ पंचवीस मिनिटात आत्मा पुन्हा खंडुजी उमरेच्या घरात आला.. तो आल्याचे कुणालाच आश्चर्य वाटले नाही. आलेल्या ग्रूपपैकी दमलेला कोणी ना कोणी असाच आधी पोचतो हे त्यांना माहीत होते...

"चहा मिळेल का??"

"हा... करत्ये की.."

खंडुजीच्या त्या सुनेने आत्म्यासाठी चहा टाकला आणि तिच्या हालचाली आणि तिचे काटक पण आकर्षक शरीर निरखत आत्मा तिथेच बसून राहिला..

मग चहा वगैरे घेऊन पटकन मागच्या खोलीत आला..

... तो ग्रूपपैकीच असल्यामुळे तो नेमकी कोणती हॅन्डबॅग उघडत आहे याकडे लक्ष देण्याचे घरात कुणाला कारणच नव्हते.

हळूच त्याने वन्याची बॅग उघडली. खूप आतवर, दीपाला अजिबात दिसू नये अशा रीतीने.. वन्याने एक ब्रिस्टॉलचे पाकीट ठेवले होते. त्यातील एक सिगारेट काढून आत्म्याने ती बाहेर जाऊन पेटवली...

'ह्या... काय आहे यात??? काय आहे काय यात?? कशाला फुंकायची ही सिगारेट?? काहीच होत नाही... म्हणे असा आत घ्यायचा असतो धूर... घेतला की?? आता काय?? सोडायचाच ना?? एक आपलं 'सिगारेट ओढणारा म्हणजे मोठाच माणूस असणार' असं समाधान सोडलं तर... आहे काय याच्यात??'

आत्म्याचे विचार धुराबरोबर वर वर जात होते.

आणि... केवळ सहाव्वा झुरका घेत असतानाच त्याच्या डोक्यात .... सण्णकन प्रकाश पडला....

केवढा मोठा शोध तो.. धड उभेही राहता येत नव्हते... अक्षरशः जमीनीवरच बसला आत्मा...

.... दारूपेक्षा... कितीतरी पटीने ... सिगारेट चढते.... वन्या म्हणतो ते बरोबर आहे....

हातातली उरलेली सिगारेट त्याला अक्षरशः फेकून द्यावी लागली.. पर्यायच नव्हता... कारण समोरचे दृष्य आहे त्या पेक्षा तिप्पट अंतरावर असल्यासारखी झिंग आली होती... किक बसली होती किक..आधीच ती ब्रिस्टॉल.. त्यात पहिल्यांदाच ओढलेली आयुष्यात...

आत्मानंद ठोंबरे यांना आज अत्यंत नवे, सोपे व स्वस्त नशेचे दालन उघडे झालेले होते.. स्मोकिंग!

आणि दहा, बारा मिनिटांनी वन्याची माचिस वन्याच्या बॅगमधे ठेवताना... त्याची नजर... रशिदाच्या बॅगकडे गेली... त्याला काय वाटले कुणास ठाऊक....

त्याने ती बॅग उघडली... कुणाचे लक्ष नाही असे पाहून..... काल खांद्यावरुन घसरलेली रशिदाची ती ओढणी खूप वेळ नाकावर धरली....

जणू रशिदाच आपल्या मिठीत आहे असे त्याला वाटत होते...

...... दुपारी चार वाजता चालत चालत राजमाचीला टाटा करून निघालेले असताना.... आत्मानंदच्या तुपट भाषेला खदखदून हासणार्‍या रशिदाला हे माहीतच नव्हते की...

....आज सकाळी तिने चेंज केलेले तिचे इनर्स या क्षणी आत्म्याच्या पिशवीत होते....

एक विकृत माणूस राजमाचीहून पुण्याला परत चालला होता...आपल्या मित्रांबरोबर....

गुलमोहर: 

सर्वांचे नम्रपणे आभार मानतो. मी औरंगाबादहून पुण्याला परत निघालो आहे. त्यामुळे पुढील भाग मला उद्याच लिहीता येणार आहे. अर्थात, त्या भागाला अधिकाधिक बरे स्वरूप देण्याचा मनापासून प्रयत्न करेन!

आपल्या प्रेमासाठी व प्रोत्साहनासाठी आपले सर्वांचे पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

@हमुदे : http://www.maayboli.com/taxonomy/term/227
येथे क्लिक करा. सर्व कादंबऱ्या मिळतील. थोडस मागे मागे गेलात की साऱ्या लिंक मिळतील.
@बेफिकीर: आता आम्हाला फिकीर व्हायला लागलीय. टाका कि पुढचा भाग लौकर.

काय हे बेफिकिर जी......
कालपासुन नंबर लावुन बसलोय....
पण काम महत्त्वाच त्यामुळे सवडीने लिहा, तरिही वाट पाहतोयच अजुन तुमच "कल करे सो आज....." अस होतय का...... पु. ले शु.

सावरी, परेश आता हलकेच घ्या उद्यापर्यंत....... बरोबर ना कैलास जी.....(मजेचा भाग आहे soo take it easy)

श्वे

अरेरे डायरेक्ट ऊद्या............ Sad
पण हरकत नाहि.

त्या भागाला अधिकाधिक बरे स्वरूप देण्याचा मनापासून प्रयत्न करेन >>> मला नाहि वाटत तुम्हि एस्ट्रा(extra) एर्फट (effort) घ्यावेत.

बेफिकिरजी तुम्हि तुमच्या स्टाईल ने लिहा.

अरे, कालपासून नंबर लाऊनसुद्धा नंबर लागला नाही का? आता काय करु? माझ्या तर पोटात खूप कळ येतेय. माझा मूडच गेलाय. मला पुढे घुसू द्याल का?

सावरी,

माझा पण यार....
आणि हो अर्थ नाही माहीत पण मला तुमच नाव खुप आवडल.....ऐकायला खुप छान वाटत...

श्वे.

अरेरे डायरेक्ट ऊद्या............
.....काय मित्रा...आता उद्यापर्यन्त वाट पहावी लागणार आहे......

सावरी

तुम्हि पोकर खेळला आहे का कधि? आपल्या कडे स्ट्रेट हॅन्ड असतो, म्हणून आपण खुप सारे अगदि असतिल नसतिल तेवधे पेसे लावतो, आपलि जित नक्कि असते, आणि पहतो तर काय कोणाकडे रॉयल फ्लश निघतो, आणि आपण ढुस्स्स्स्स्स्स्स.
तेव्हा कस फिलिग्स असतात ना अगदि तस वाटतय आज आत्ता मला. Sad

Thnx.....
मला माहीत आहे याचा अर्थ...
तुला नक्की सान्गेन...आनि तुझ ही नाव छान आहे......

सावरी

तुम्हि पोकर खेळला आहे का कधि? आपल्या कडे स्ट्रेट हॅन्ड असतो, म्हणून आपण खुप सारे अगदि असतिल नसतिल तेवधे पेसे लावतो, आपलि जित नक्कि असते, आणि पहतो तर काय कोणाकडे रॉयल फ्लश निघतो, आणि आपण ढुस्स्स्स्स्स्स्स.
तेव्हा कस फिलिग्स असतात ना अगदि तस वाटतय आज आत्ता मला
. ..........मला काही एक कळल नाही.....

सावरी

अग माझ पुर्ण नाव 'श्वेतांबरी' आहे...... ती सिरियल आलि होति ना 'श्वेतांबरा' त्यावरुन इन्स्पिरेशन मिळाल काकांना.... मला आपल श्वे बर वाटत.....

Pages

Back to top