गॅदरिंगचा परिणाम केव्हाच पुसला गेलेला होता. गॅदरिंगला आता सहा महिने होत आले होते. वन्याची सुमार कविता कुणी नीट ऐकलीही नव्हती! रूम नंबर २१४ वरचे उरलेले तिघे आणि दीपा बोरगे सोडून! आणि आत्मानंदला तर नावही नोंदवता आले नव्हते. त्याच्या दृष्टीने खूप विनोदी असलेली त्याची आचारसंहिता 'हे चालणार नाही कॉलेजमधे' या कारणास्तव केव्हाच नाकारण्यात आली होती संयोजन समीतीकडून! आणि त्यानंतर सहा महिन्यांनी कॉलेजमधील वातावरण खूप खूप वेगळे झालेले होते.
मे महिन्याची टळटळीत दुपार! सर्व विद्यार्थी कशीबशी सबमिशन्स उरकत होते. कॅन्टीनमधील उपस्थिती खालावलेली! प्रत्येक पिरियड फुल्ल चाललेला! वर्धिनी हा विषय केव्हाच मागे पडलेला! प्रोफेसर्स उडाणटप्पू विद्यार्थ्यांची सबमिशन्स करून घेताना सगळे सूड उगवून घेत असलेले! सर्वत्र एक रखरखीत उदासी! आंगन ढाब्याचा बिझिनेस अर्ध्यापेक्षा कमी झालेला! रात्र रात्र भर होस्टेलमधील प्रत्येक रूमचे लाईट्स चालू! लायब्ररीत ही गर्दी उसळूनही शांतता! वर्कशॉपमधे घामाच्या धारा लागलेल्या असतानाही लेथ, प्लेनिंग आणि शेपिंग मशीनवर तासनतास उभे असलेले विद्यार्थी!
एक्झॅम टाईम बॉस! दुसरा कसला विचारच सुचू शकत नाही. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा! १२ जून रोजी लेखी परीक्षा संपणार! १६ जून रोजी ओरल संपणार! आणि मग पुढचे वर्ष चालू होणार एकदम १ ऑगस्टला! तब्बल दिड महिना पूर्ण सुट्टी! भर पावसाळ्यात धमाल करण्यासाठी!
रूम नंबर २१४ अपवाद नव्हतीच! दारू या विषयाचा चार चार दिवस उल्लेखही होत नव्हता. वर्धिनी आणि दारूची जाहिरात करणार्या मदनिकांची चित्रे केव्हाच गुंडाळलेली होती. त्या ऐवजी आता तिथे होते वेगवेगळे फॉर्म्युले! वेगवेगळे सिद्धांत! एक मात्र होत होतं! दिल्या, अशोक आणि वनदास यांनी स्वतःचा अभ्यास एक्झॅक्टली आत्माच्या अभ्यासाबरोबर ठेवलेला होता. कारण तो सर्व विषयाच्या वह्या रोज वाचायचा आणि तेही मोठ्याने! त्यामुळे अख्खी सेमिस्टरच पाठ झाल्यासारखी होत होती त्याची! आणि त्याच्याच बरोबर इतरांची! दिल्याला नवल याचे वाटत होते की तो स्वतः अभ्यासात रस घेतोय कसा? पण आत्मानंदची अभ्यासाची शैली औरच होती. हातात वही घ्यायची अन सरळ मोठ्याने वाचायला सुरुवात करायची. रोज एकच वही वाचली तर ती पाठ व्हायची वेळ येणारच ना? रामरक्षा पाठ असावी तसं सिलॅबस पाठ व्हायचं त्याचं! आणि हे प्रत्येक विषयाचंच! मॅथ्स असो नाहीतर अॅप मेक! विषय पाठ!
ते एक प्रकारच गुणगुणणंच होऊ लागलं होतं रूममध्ये! आत्म्या मोठ्याने वाचत असताना इतर तिघे गुणगुणल्यासारख, ताल धरल्यासारख, समेवर आल्यासारखं करायचे! स्तोत्र म्हणताना हालते तशी मान वगैरे हालवून पुटपुटत बसायचे!
कॉलेज अक्षरशः चढलं होतं पब्लिकला! ओल्ड मंकसारखं! मात्र एक रहस्य कुणालाच माहीत नव्हतं!
दुसर्या सेमिस्टरमधे इतर विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या सबमिशनच्या ऑर्डर्सचे पैसे नेमके किती होते हे आत्म्याने लपवून ठेवले होते. कारण त्याला स्पष्ट दिसत होते. दिल्या ऑलरेडी दारूपासून झपाट्याने दूर झालेला आहे. अशोक लांबच आहे तब्येतीमुळे! पितो तसा, पण एकतर कमी पितो अन कमी वारंवारतेने पितो! वन्या अजूनही भरपूर पितो, पण या दोघांमुळे अन वडिलांच्या टेन्शनमुळे तोही सुधारायला लागलाय! मग आपलं काय? मुळात आपलं काय हा प्रश्नच आपल्याला पडायला नको! पण प्यावीशी तर वाटते. मस्त झोप येते रात्री! एकदा अभ्यास झाला की हळूच स्टीलच्या ग्लासमधे एक पेग टाकून पाणी घालायचं अन पटकन पिऊन कुणाशीही न बोलता झोपून जायचं!
हा प्रोग्रॅम खूप अवघड होता. कारण प्रत्येकाचं लक्ष असताना हे करायचं कसं? पण होस्टेलवर आल्याच्या पहिल्या दिवशी वन्याने स्वतःचा पलंग आत्म्याला दिला होता त्याचा आता फायदा मिळत होता. एक संपूर्ण भिंतच आत्म्याला मिळाली होती. तेथ तो पलंगात खोचून एक क्वार्टर हळूच ठेवायचा. रात्री झोपताना पाणी लागलं तर उठावं लागू नये म्हणून एक स्टीलचा ग्लास आणि एक तांब्या जवळच ठेवायचा. अंधार झाला अन सगळे झोपून अर्धा तास वगैरे झाला की आवाज न करता हळूच अंदाजाने एक पेग भरायचा. आणि पटकन त्यात पाणी घालून पिऊन टाकायचा. हे चक्क गेले वीस दिवस चाललेले होते. कुणाला वास यायचा प्रश्न नाही अन काहीच नाही.
आत्मानंद ठोंबरे! बुवा ठोंबरेंचा हा मुलगा या एकाच वर्षात दारूमुळे येणार्या आकर्षणाच्या आहारी गेला होता.
स्वतःजवळचे पैसे तो जपून ठेवून दारूचे बजेट करायला लागला होता. पुढचे पैसे येईपर्यंत आपल्याला जी दारू लागेल त्यासाठी लागणारे पैसे आत्ताच वेगळे काढून ठेवायला लागला होता. ते पैसे तो कुणासाठीच अन कशासाठीच खर्च करत नव्हता. त्याला दारू पिताना कंपनीची, गप्पांची किंवा चकण्याची गरज नव्हती. कारण हा सगळा छुपा मामला होता.
त्यातच आता मनात विविध फॅन्टसीज यायला लागल्या होत्या. अलका देव ही मुलगी आवडत असली तरीही आपल्या बावळट व्यक्तिमत्वाकडे पाहून तिला मात्र आपण आवडत नसणार हा अंदाज त्याला गेल्या काही दिवसांपासून येऊ लागला होता. आता अलका देव उगीचच बोलायला येतच नव्हती. आधी हा दिसला की हॉस्पीटलच्या वेळेसची याने केलेली मदत आठवून ती स्वतःहून बोलायला यायची! पण आत्मानंदचे रोखून बघणे, काहीतरी इतर अपेक्षा असल्याप्रमाणे तिच्या बोलण्याची वाट बघणे, हसताना दिसणारे पिवळे दात, बटबटीत डोळे आणि बारीकशी अंगकाठी यामुळे अलकाच्या मनात हल्ली आत्मानंदला भेटण्याची इच्छा होत नव्हती. अर्थात, नाही म्हंटले तरी निसर्ग कार्यरत असतोच! एखाद्याचे व्यक्तीमत्व कितीही निसर्गाने दिलेले आहे असे समजले तरी पडायचे ते इंप्रेशन मनावर पडतेच व अलकाच्या त्या वयात तसे होणे यात तर काहीच गैरही नव्हते. पण प्रश्न फक्त तोच नव्हता अलकासमोर! हल्ली आत्मानंदचे बोलणे किंवा बोलण्याची इच्छा दाखवून देणे यात तिला काहीतरी वेगळेपण जाणवत होते. त्याचा हेतू केवळ मैत्री असा नाही आहे हे तिला जाणवू लागले होते. त्याच्याकडून त्याची मॅथ्सची वही घेऊन ती चार दिवसांनी परत देताना आत्मा तसा वागत नव्हता. मात्र गेल्या काही दिवसात त्याच्या बघण्यात फरक पडला होता. मान वळवून वळवून तो तिच्याकडे बघत होता.
याचा परिणाम म्हणून अलकाने झटकन आपले वागणे बदलले होते. आता आत्मा समोर आला आणि बोलू वगैरे लागला तर ती घाईघाईत 'प्रॅक्टिकल आहे माझे, जाते मी' वगैरे स्वरुपाची कारणे सांगून जायला लागली होती. आणि हे जेव्हा सलग चार वेळा घडले तेव्हा कुठे आज आत्म्याच्या डोक्यात प्रकाश पडला.
'ही आपल्याला टाळत आहे'!
अलका आपल्याला टाळते ही कल्पनाच आधी त्याला सहन झाली नाही. आज रूममधे कुणीच नसताना त्याने एका छोट्याश्या आरश्यात स्वतःचा चेहरा बघितला! थोडीफार दाढी उगवलेली! आजवर त्याने एकदाही दाढी केलेली नव्हती. दिल्या एक दिवसाआड करायचा! अशोक आणि वनदास दोन तीन दिवसांमधून करायचे! आत्मानंदला अजून तेवढी दाढी आलेलीच नव्हती. आपला चेहरा नेमका कसा आहे हेही पाहायची त्याला खरे तर आजवर गरज भासली नव्हती. पण आज त्याने खूप वेळ तो निरखून पाहिला!
काय आहे आपल्या चेहर्यात? की लक्षात राहावे, कुणी हा चेहरा आठवावा! असे काय आहे? हे मिसरुड फुटलेलं! तेही धड पूर्ण पुरुषासारखं नाही. उगाच आपली लव थोडीशी! तीही भुर्या रंगाची! दिलीप यांच्या मिशा कशा आहेत! एकदम काळ्या काळ्या कुळकुळीत आणि भरपूर! एखाद्याने त्या मिशांवरच फिदा व्हावं अशा! अशोक जाड आहेत. पण आपण मध्यम अंगकाठीचेही नाही आहोत. आपल्या या बरगड्या आरश्यात दिसत नसल्या तरीही हाताला लागतात की? काय हा चष्मा! या वयात? तो काढला तर आपल्याला नीट दिसत नाही अन आपण कसे दिसतो याबाबत मत समजू शकत नाही. पण काढणार कसा चष्मा? हे दात काय आपले? आपण इतके घाणेरडे कसे? आयुष्यात पान खाल्ले नाही, सिगारेट ओढलेली नाही, मग दात असे कसे आपले? रोज दोन वेळा आपण ब्रश करतो. हे गाल खप्पड! दाढीही नाही आपल्याला नीटशी! की बाबा एखाद्याला वाटावे जरा गंभीरपणे घेण्यासारखी व्यक्ती आहे ही! गालांवर पुरळही आले आहे थोडे! आपण..... आपण अत्यंत सामान्य व्यक्तीमत्वाचे आहोत. आपल्यात काहीही आकर्षक नाही. व्यायाम करावा का? व्यायाम केल्यामुळे निदान स्नायू बळकट होऊन आपली आकृती तरी जरा रुबाबदार वाटू शकेल. पण... ते सगळं व्हायला दोन वर्षं लागतील! आत्मानंद ठोंबरे.. तुम्ही अलका देवसारख्या मुलीच्या बाबतीत अशा अपेक्षा ठेवणे अत्यंत चुकीचे आहे.
हे काय हे? आपण काहीच नाही आहोत? एखाद्याने आपल्याकडे बघून जरा तरी काहीतरी मानावे इतकेही आपल्यात काही नाही? मन... मन कसं आहे आपलं?? दारू प्यायला आवडते. मोठ्यांदी अभ्यास केल्यामुळे इतरांचा आपोआप फायदा होतो तेवढाच! एरवी आपण काय करतो स्वतःहून दुसर्यासाठी! अरे? खरच की? अलकाच्या वडिलांच्या तब्येतीबाबत आपण किती दक्ष राहिलो होतो. ते सगळं... विसरली ती??
अलका देव हा अध्याय आपल्याकडून आपण संपवला पाहिजे! या पुढे तिचे नांव डोक्यात आणायचे नाही.
आणि या गोष्टीला चार दिवस झाले त्या चार दिवसात अलकालाही समजले. हल्ली हा पुर्वीसारखा आपल्याशी बोलायला फारसा उत्सुक नसतो. लांबून दिसला तर नुसता हात करून दुर्लक्ष करतो. बरं झालं बाई! परस्पर प्रकरण संपलं ते!
आणि याचा परिणाम आणखीनच वेगळा झाला. आत्माच्या डोक्यातून अलका देव हा विषय पूर्णपणे गेलेला नसला तरीही तो विचार आता आत्मा प्रयत्नपुर्वक दूर सारत होता. त्यामुळे चोरून एक पेग लावून झोप लागायच्या आधी त्याच्या मनात निरनिराळ्या फॅन्टसीज जाग्या व्हायच्या! कधी इलेक्ट्रिकलला असलेल्या वर्धिनी मॅडम उगाचच प्रॉडक्शनला येऊन शिकवत असताना मुद्दाम पदर पाडायच्या आणि वर्गात एकट्या असलेल्या आत्मानंदला पाहून हसायच्या! कधी सुवर्णा मॅडम लॅबमधे वाकून लॅब पेपरवर सही करत असताना आत्मानंदला त्यांच्यात आणि टॉवेल गुंडाळून हसणार्या शकिलात सुवर्णा मॅडम अधिक भारी आहेत असे वाटायचे. कधी हेमांगी गुप्ता ही गॅदरिंगमधे सोलो डान्स करणारी होस्टेलवरची मुलगी रूम नंबर २१४ मधे आत्मा एकटा असताना त्याच ड्रेसमधे येऊन त्याच्या निकट बसायची! बरेच काही!
यातले काहीच सत्य नाही आहे हे माहीत असूनही आत्मा हल्ली मुद्दाम वर्धिनी मॅडमना बघण्यासाठी कॉलेजमधे फिरायचा! हे त्याचे गुपीत त्यने कुणालाच सांगीतले नव्हते. त्या दिसल्या की त्या दिसेनाश्या होईपर्यंत तो लांब उभा राहून टक लावून पाहात राहायचा. गेल्या काही दिवसात सतत असे पाहिल्यामुळे या मॅडम उद्या कोणती साडी नेसतील याचाही त्याला अंदाज येऊ लागला होता. आणि तो अंदाज परफेक्ट निघाला की त्याला आपण एक मोठे व प्रेम करण्याच्या पात्रतेचे पुरुष झालेलो आहोत असा आनंद उगीचच वाटायचा!
एरवी तो नेहमीसारखाच बोलत वागत असल्यामुळे इतर तिघांना त्याच्यात झालेले सूक्ष्म बदल जाणवत नव्हते. अलका देवचा विषय आता तो काढत नव्हता हे जाणवलेले असूनही त्यात काही विशेष झाले असेल असे त्यांना वाटत नव्हते.
तिकडे धनराज गुणे सापासारखा डूख धरून होता. दिल्या आणि तो एकमेकांच्या समोरही यायचे नाहीत. पण एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल असलेला प्रचंड राग मात्र तसाच होता. धनराज गुणे खरोखरच सापाच्याच प्रवृत्तीचा होता व ते दिल्याला माहीतही होते. त्यामुळे दिल्या सांभाळून होता. दिल्या आणि सुरेखा आता सर्रास कॅन्टीनमधे एकमेकांशी बोलत बसायचे. सुरेखाच्या डोळ्यात स्वप्ने दिसायची सगळ्या कॉलेजला! आणि तीही ती स्वप्ने लपवायची नाही. सगळ्यांना माहीतच आहे तर काय लपवायचंय? तिचा तर चक्क तो भाऊही एकदा येऊन मुद्दाम दिल्याला भेटून गेला होता. दिल्याशी त्याने मैत्री केली होती.
==================================
आज १६ जून! शेवटची तोंडी परिक्षा संपवून रूम नंबर २१४ मधे सगळे जमा झाले. अर्थातच कुणाचाच मूड नव्हता. पण निदान आज कित्येक दिवसांनी एक सळसळीत पार्टी होणार होती. धनराज गुणेच्या गॅन्गपासून धोका नको म्हणून रूममधेच! अशोकने संध्याकाळीच जाऊन आंगनवरून चिकन आणले होते. दिल्याच्या सांगण्यावरून मेसवाला तेवढे गरम करून द्यायला तयार झाला होता.
पेपर तर चक्क दिल्यालाही बरे गेले होते. अर्थातच तो पास होणार याबद्दल सगळ्यांची खात्री पटलेली होती. दिल्या आई येऊन गेल्यापासून तिच्याशी फोनवर बोलायचा खरा! पण एकदाही घरी गेलेला नव्हता. उद्या तोही घरी जाणार होता. चौघांच्याही घरी त्यांचे घरचे आतुरतेने वाट पाहात होते आपला मुलगा येण्याची!
अजून प्यायला सुरुवात झालेली नव्हती. पण आत्मानंद बेचैन होत चाललेला होता. आता गप्पा सुरू झाल्या.
अशोक - एक महिनाभर काय करायचं रे?
आत्मा - अगदी हाच प्रश्न माझ्याही मनात आला..
अशोक - तुम्ही काय करणार आहात?
आत्मा - मी .... व्यायाम..
अशोक - का?
आत्मा - व्यायाम आवश्यक असतो..
अशोक - ते माहितीय... पण मधेच व्यायाम का?
आत्मा - वाटू लागलंय तसं...
दिल्या - सुरेखा कोल्हापूरला येणार आहे.. भावाबरोबर..
अशोक - च्यायला दिल्या लग्नाआधीच तुमच्या किती भेटी रे?
दिल्या - घर बघायला येणार आहे.. आईला भेटायला... आता.. कॉलेज संपलं ना तिचं...
एकदम मूडच पालटला. खरंच की? सुरेखाचं लग्न दिल्याशी होणारच आहे हे नक्की असलं तरीही... कॉलेज संपलंच की तिचं! हे दिवस पुन्हा थोडीच येणार आहेत?
काय दिवस होते. आह! तीन वर्षे! तब्बल तीन वर्षे दिल्या ती खिडकी फक्त कॉलेजच्या पहिल्या दिवशी उघडायचा! त्यानंतर नाही! आणि सुरेखा दर वर्षी पास व्हायची. दिल्या दर वर्षी नापास! तिचे हे शेवटचे वर्ष सुरू झाले त्याच वर्षी नेमका आत्मानंद या कॉलेजला आणि याच रूममधे आला. त्याच्या घोकमपट्टीमुळे दिल्याही पास झाला पहिल्या सेमिस्टरला! आणि यावेळेस तर दिल्या म्हणत होता की तो निश्चीतच पास होणार! इन फॅक्ट बरेच मार्क्सही मिळवू शकेल! म्हणजे... दिल्याचा सहवास पुढच्या वर्षी आहे हे नक्की.. पण...
.... हा पण फार मोठा होता... आता ती खिडकी उघडली काय अन नाही उघडली काय... त्यातून कधीच सुरेखाचं दर्शन होणार नव्हतं!
सुरेखा! आता या कॉलेजमधे कधीच येणार नाही. गेले हे दिवस! आयुष्यातील सर्वात गुलाबी, सुंदर असा कालखंड संपला! आता तिच्याबरोबर आयुष्य काढायचे आहे हे माहीत असूनही.. तिचे ते अक्षयमधे येणे, नीताने घोळ घालणे, तिच्या भावाचे फटके सहन करूनही दिल्याने शांत राहणे, त्यानंतर आक्रमक होणे, तिच्या प्रेमाखातर एकदाही ती खिडकी न उघडणे, त्यांचे पुन्हा जुळणे, मग दिल्याने दारू जवळपास सोडणे, लग्न जमणे, रोजच्या कॅन्टीनमधल्या त्या तासातासाच्या भेटी, तो चहा गार झाला तरीही लक्षात न येणे, ते तिचे मत्रिणींबरोबर असताना अचानक दिल्या समोर आला तर मैत्रिणींनी थट्टा केल्यामुळे लाजून हासणे, या कॉलेजमधील प्रत्येक कोपर्या कोपर्यावर तिला पाहिलेले असणे!
संपले सगळे! कॉलेज ते कॉलेज! शेवटी कॉलेज ते कॉलेजच! पुन्हा अशी मजा येणे नाही. आपण काय? चौघे भरपूर धमाल करू अजून! दारू पिऊ, पोरींबद्दल बोलू, भटकू, ट्रिपा काढू... पण... सुरेखा नसेल तेव्हा! ती थांबलेली असेल लग्नाची तारीख कधी ठरते हे बघत! स्वतःच्या घरात! रोज सकाळी कॉलेजमधले तिचे ते ताजेतवाने दर्शन आता यापुढे नाही होणार!
दिल्यासारखा माणूसही भावनिक झालेला पाहून एकदम खिन्नताच पसरली रूममधे! अशोकने दिल्यापाशी जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. दिल्याने पटकन अशोकला मिठी मारली. काय आश्चर्य आहे नाही? जी आपलीच होणार आहे व ते माहीतही आहे ती फक्त काही दिवस रोजच्यासारखी, रोजच्या ठिकाणी दिसनार नाही म्हणूनही माणसाला वाइट वाटू शकते?? दिल्याचे हे रूप कुणिच पाहिलेले नव्हते. त्याच्या डोळ्यात एक थेंबही नव्हता. पण अशोकला त्याने मारलेली मिठी किती घट्ट आहे हे वनदास आणि आत्म्यालाही समजत होते.
मग वनदास आणि आत्म्यानेही दिल्याच्या पाठीवर थोपटले.
आत्मा - मी काय म्हणतो... आज तुमचा दोघांचा शेवटचा दिवस आहे कॉलेजचा...
दिल्या - .... ???
आत्मा - तर.. तुम्ही दोघेच का जात नाही फिरायला??
या ढगळ आत्म्याचे डोके इतके सुपीक असेल ही कल्पनाच नव्हती तिघांना!
अशोक - खरंय राव... दिल्या... विचार तिला...
दिल्या - आता कसं विचारणार?? आता लेडिज होस्टेलवर आपल्याला कोण उभे करणार??
वनदास - सकाळीच विचारायला हवे होतेस...
अशोक - ती काही म्हणालीनाही का रे पण??? कॉलेजचा सहवास संपणार म्हणून..
दिल्या - काल कॅन्टीनमधे म्हणत होती.... हा आपला इथला शेवटचाच चहा....
सगळे आपापल्या जागी बसले. दारूचा दिड खंबा रूमवर असूनही तो उघडायचीही कुणाला इच्छा होत नव्हत. आत्म्यालाही!
वनदास - दिल्या... अरे आता काय... लग्नच करायचंय रे...
दिल्या - ... नाही रे... पण... हे असे दिवस... पुन्हा नाही येत वन्या...
अशोक - खरंय... मी... जाऊन बघू का त्या गेटवरच्या वॉचमनशी बोलून..??
दिल्या - अंहं... सातची गाडी असेल तिची.. पावणे सात झालेत.. गेली असेल ती..
अशोक - तू तेही पाहिलं नाहीस??
दिल्या - टक लावून उभा आहे इथे... दिसलीच नाही.. तिला अन मला ते सोसलंच नसतं...
वनदासने एक ब्रिस्टॉल पेटवली. स्वतःच्या पलंगावर पसरला. अशोक जमीनीवरच बसून बोटांनी रेघोट्या ओढल्यासारखे करत होता. आत्मा स्वतःच्या पलंगावर बसून 'कुणाला या दु:खाचे निवारण करण्यासाठी दारूची आठवण येतीय का' हे तपासत होता.
एकंदरीत हाही एक विरहच म्हणायचा! पण..
.... पण...!!!!
====================================
लेडिज होस्टेलच्या गेटपाशी असलेल्या वॉचमनशी फार फार तर तुम्ही बोलू शकता व कॉलेजने छापलेल्या अधिकृत अशा फॉर्मवर ज्या मुलीला निरोप द्यायचा आहे तो लिहू शकता. या फॉर्मची एक कॉपी अॅडमिनकडे जायची. त्यामुळे मुलींशी काही बोलायचे असेल तर ते सर्वांदेखत कॉलेजमध्येच, हा दंडकच होता जवळजवळ!
लेडिज होस्टेलमधे मुलगा जाऊ शकत नाही हे ठीक आहे....
.... पण जेन्ट्स होस्टेलमधे मुलगी आली तर??
त्याचा काय नियम?? म्हणजे म्हणायला नियम वगैरे होते. पण एकदम मुलगी??
पळापळच झाली पोरांची! कुणी नुसताच टॉवेलवर, कुणी दाढी करतोय, कुणी विडी फुंकतोय! सगळं बंद!
सुरेखा आली होती. आणि इकडे तिकडे कुठेही न बघता सरळ आत आली अन वॉचमनला म्हणाली...
'दिलीप राऊत.... भेटायचंय"
आधीच दिल्या आमदाराचा भाचा! त्यात त्याची आई सगळ्यांनी पाहिलेली! त्याचं घराणंही भारी! तो पासही झाला होता पहिल्यांदाच! आणि मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टी सगळ्या कॉलेजमधे माह्त असलेल्या!
वॉचमनही भारीच लेकाचा पांडोबा! म्हणे रूम नंबर २१४!
सुरेखा - ते माहितीय... त्यांना बोलवा..
आता तरी गप्प बोलवायचं की नाही? नाही... म्हणे आहेत तिथे बसलेले... जा आत!
बावळटाने कॉलेजचे सगळे नियम 'नुसती एक मुलगी आली या आश्चर्यानेच' धुडकावले. अन सुरेखा त्याच्या वरताण! गेली की सरळ आत कॉरिडॉरमधे!
ते अभुतपुर्व दृष्य बघावे की पळ काढावा हेच 'वाट्टेल त्या' स्थितीत कॉरिडॉरमधे असलेल्या पोरांना समजेना! अन हिचं कुणाकडे लक्षच नाही. कारण तिला स्वतःच्या खिडकीतून दिल्याची खिडकी रोजच दिसायची. त्यामुळे ती रूम कुठे असेल ते लोकेशन तिला बरोबर माहीत होतं!
त्यात ही दिल्याची होणारी वधू आहे हे माहीत असल्याने 'उगाच पंगा नको' असा विचार करून पोरेही चूपचाप! नुसतीच पळापळ झाली.
दिल्याची खोली फारच आतमध्ये अन गेटपासून न दिसणार्या ठिकाणि असती तर सुरेखा गेलीच नसती. पण गेटपासून ही अशी दिसत होती ती खोली!
मात्र ती खोलीत गेली नाही. बाहेर एक बावळट दिसणारा एफ्.ई. चा मुलगा 'अचानक इथे मुलगी दिसल्याच्या' धक्यात आणखीनच बावळटासारखा तिच्याकडे नुसताच पाहात होता.
सुरेखा - दिलीप इथेच राहतात ना??
त्याने आणखीनच बावळटासारखी मान हालवली होकारार्थी! प्रत्येक रूमच्या दाराला किमान दोन दोन मुंडकी लटकलेली होती. कॉरिडॉर निर्मनुष्य झालेला!
सुरेखा - हाक मार त्यांना! बाहेर या म्हणावं!
हा मुलगा अर्थातच सुरेखापेक्षा खूपच लहान होता. ती त्याला कशाला अहो जाहो करणार??
त्या मुलाने पटकन येऊन दिल्याच्या रूमचे दार उघडले अन सांगीतले...
"कुणीतरी आलंय तुम्हाला भेटायला"
बारकी बारकी पोरं दिल्याला अहोच म्हणायची!
आता कोण ब्याद म्हणून दिल्या उठून बाहेर आला तर..... सुरेखा?????
मागून आलेले अशोक, आत्म्या अन वनदास तर बर्फ झाले होते बर्फ!
दिल्या हादरून क्षण दोन क्षण पाहात म्हणाला...
दिल्या - काय गं??
सुरेखाने इकडे तिकडे पाहिले. कुणीच ऐकणारं जवळपास नाही आहे हे समजल्यावर म्हणाली.
सुरेखा - कॉलेज संपलं माझं... अक्षयची कॉफी राहिलीच की??? याल का कॉफी प्यायला?? आणि आता काही विशेष बोलायचंच नाहीये.. तुमच्या मित्रांनाही बोलवा... माझ्यातर्फे कॉफी!
एक मुलगी जेन्ट्स होस्टेलमधे आहे हे प्रकरण अधिक लांबू नये म्हणून दिल्या 'थांब आलोच' म्हणत रूममधे आला आणि अगदी पावडर बिवडर लावून त्याने शर्ट पँट घातली तर हे लेकाचे तिघेही तयार!
दिल्या - काय रे?? तुम्ही कुठे निघालात??
अशोक - अक्षय... कॉफी प्यायला..
दिल्या - कंबरेत अशा लाथा घालीन ना... की सुट्टीत घरी जाऊ शकायचा नाहीत..
अशोक - वहिनींचे आमंत्रण आहे... धुडकावता येत नाही... माफ करा सरकार...
दिल्या - एकेकाचं दाताड पाडीन...
आत्मा - आम्हाला त्यांनी स्वतःहून बोलवलंय...
दिल्या - तू तर थोबाडच उघडू नको.. मी निघालोय... मागनं येऊ नका तिथे..
वनदास - दिल्या... आम्ही पण निघालोयत...
दिल्या - आईशप्पथ कोचा करीन कोचा...
दम भरून दिल्या रूममधून बाहेर आला आणि तिला घेऊन त्वरेने निघाला. तरी हे गेलेच तिघे शेअर रिक्षा करून!
अक्षयच्या फॅमिली रूममधे जेमतेम दिल्या वेटरला 'दो कॉफी' म्हणतोय तोवर लटांबर प्रवेशले! आता सुरेखासमोर ती भाषा चालणार नव्हती. दिल्या एखाद्या वात काढलेल्या स्फोटकासारखा सगळ्यांकडे बघत होता. कोणत्याही क्षणी भडकेल असा! ते आपले सरळ शेजारच्या टेबलवर येऊन बसले की?
सुरेखा - हॅलो... येत का नव्हतात?? हे म्हणाले तुम्ही यायला तयार नाही आहात म्हणे??
अशोक - नंतर विचार केला आम्ही... एवढे हा बोलवतोय... आणि आपण कंटाळा करायचा??
सुरेखा - आपली तशी ओळख आहेच.. पण तू अशोक ना
अशोक - हो... अशोक पवार... मीच याच्या आईंना तुमच्याबद्दल सांगीतलं...
सुरेखा - हो का??...
सुरेखाने लाजून मान दुसरीकडे फिरवली. तिचे ते भन्नाट लाजणे पाहून तिघे गारच झाले.
सुरेखा - आणि मी बोलवलंय बर का आज तुम्हाला? यांनी नाही...
आत्मा - नाही नाही.. हेही म्हणाले ना... तुम्ही यायलाच पाहिजेत म्हणून
सुरेखाचे दिल्याबद्दलचे मत आणखीन बरे व्हावे यासाठी आत्म्याने टाकलेले हे वाक्य आज रात्री त्याच्या कंबरेत दणदणीत लाथ बसायला कारणीभूत ठरणार होते हे त्याला आत्ता माहीत नव्हते.
तेवढ्यात तीन टगे एकदम फॅमिलीमधे गेलेले पाहून वेटर आत आला. ते यांच्याचबरोबरचे आहेत म्हंटल्यावर मग मेन्यू कार्ड अन पाणी घेऊन आला. काय गंमत आहे नाही? चार पुरुषांबरोबर एक बाई असली तरी फॅमिलीमधे बसणार! आणि एरवी गर्दीत कुठेही बसले तरी चालते.
दिल्या - या तिघांमधे दोन कटिंग आण.. अन फास्ट बिलही आण साथमे...
दिल्याने त्यांची तीन मिनिटात बोळवण करायचा प्लॅन्न बनवून स्वतःच वेटरला ऑर्डर दिली.
सुरेखा - अय्या तुम्हाला कॉफी नाही आवडत??
वनदास स्वतःचे दोन ओठ विलग करून शब्द उच्चारायच्या आधी दिल्याने प्रचंड आवाज काढत सांगीतले.
दिल्या - छे छे... हे कसले कॉफी पितायत... पित्त होतं तिघांना...
सुरेखा - होSSSSS???
पहिल्यांदाच इतक्या जवळून तिचे ते माना वेळावून वेळावून बोलणे बघताना सगळ्यांनाच लवकरात लवकर आपलेही लग्न व्हावे असे वाटू लागले होते.
सुरेखा - पण तुम्हाला एवढी घाई कसलीय??
हा प्रश्न तिने वन्याकडे पाहून विचारला होता.
वन्या - घाई कु...
'कुठे' आहे' हे दोन शब्द पूर्ण व्हायच्या आधीच दिल्याने स्वतःसमोरचा स्टीलचा ग्लास आपटत वेटरला ओरडून व चिडून हाक मारल्यासारखे दाखवत म्हणाला...
" ए पाणी आण रे..... यांना ... डॉक्टरकडे जावं लागणार आहे.."
सुरेखा - का SSSSSSS???
दिल्या - या आत्म्याला मुतखडा झालाय, अश्क्याला हार्ट ट्रबल आहे आणि हा तापलाय कालपासून..
दिल्याला यापेक्षा सज्जन व साधेसुधे रोग सुचू शकत नव्हते सुरेखा समोर असूनही!
तेवढ्यात तीन चहा आले. 'कॉफी तय्यार है, लाऊ क्या' वर दिल्याने 'रुक जरा... अभी आये है हम लोग' असा दम भरला वेटरला.
तर हे तिघे लेकाचे चहाचे कप समोर ठेवून निवांत यांच्याचकडे बघतायत.
दिल्या अशोककडे पाहात म्हणाला.
दिल्या - .... काय???
अशोक - कुठे काय???
दिल्या - मग??... आला की चहा??
अशोक - मग आलाय की??? कोण नाही म्हणतंय??
'मग ढोस की भडव्या' हे चार, अत्यंत नैसर्गीकपणे तोंडात येऊ घातलेले शब्द कसेबसे मागे ढकलत दिल्या म्हणाला...
दिल्या - नाही.. घेत नाही आहात म्हणून म्हंटलं....
अशोक - गरम आहे...
या 'गरम आहे' वर रात्री आपली पाठ गरम होणार आहे याचा पूर्ण अंदाज असूनही अशोक टिच्चून बसला होता. मात्र वनदासला रात्री येऊ घातलेल्या भीषण प्रसंगाची जाणीव झाली तशी फिल्डिंग लावण्यासाठी तो म्हणाला...
वनदास - दिलीप एकदम बदललां हं पण तुमच्यामुळे...
सुरेखा - कॉहीही....
सुरेखाचे एकंदर नखरे भलतेच लाडीक होते. आत्मानंद तिच्या शब्दा-शब्दाला गार पडत होता. त्याची बोलतीच बंद झाली होती. 'दिलीप यांना' 'या' का आवडल्या असतील हे त्याला आता समजत होते.
वनदास - अहो गेल्या सहा महिन्यात एक शिवी दिली नाही त्याने...
सुरेखा - शी: ! शिवी द्यायचीच कशाला पण??
वनदास - नाही नाही... सांगतोय... आधी कसला मारायचा आम्हाला...
सुरेखा - तुम्हालाSSSSSS??????
दिल्या - वन्या....
वन्या - ..... क ....काय???
दिल्या - .... नाही... चहा घे म्हंटलं....
वन्या - आणि अभ्यास किती करतो अहो...
सुरेखा - ते काय माझ्यामुळे नाही हंSSS???
अशोक - अहो रूमवर नुसता तुमच्या नावाचा जप चाललेला असतो... तुमच्यामुळे नाही काय??
सुरेखा - हं! एरवी बोलत पण नाहीत कॅन्टीनमधे...
अशोक - अहो.. तो येऊन सांगतो आम्हाला..
सुरेखा - ... काय??
अशोक - ती समोर आली.... की माझी बोलतीच बंद होते....
सुरेखाचे ते अमृत शिंपडल्यासारखे सुगंधी हासणे पाहून आत्मा आणखीनच चक्रावला.
वेटर कॉफी घेऊन आला तरी चहा तसाच्या तसाच होता. आता चहा प्यायला तरी लागणार होता किंवा ठेवायला तरी! तरीही अशोकने वेटरला विचारले...
अशोक - ये .. चाय जरा गरम करके दो ना??
"चहा गरम होत नाही बे पुन्हा पुन्हा"
वेटरचे काम परस्पर दिल्याने केल्यामुळे वेटर निघून गेला.
सुरेखा - तुम्ही सगळे कुठे राहता??
आत्मा - त्याच .. कक्षात... २१४!
आत्माच्या तोंडातून बाहेर पडलेले हे पहिले तीन शब्द! त्यात त्याने रूमला कक्ष म्हंटलेले समजायला सुरेखाला काही क्षण लागले.
सुरेखा - नाही नाही.. म्हणजे कोणत्या गावांना...
आत्मा - मी जालना....
वनदास - मी नगर जिल्हा... तालुका कर्जत...
अशोक - मी कराड...
दिल्याने एकदा सगळ्यांकडे बघत भुवई उडवून 'निघा आता' अशी खुण केली.
आता मात्र ऐकायलाच हवं होतं! बिचारे कॉलेजचा शेवटचा दिवस म्हणून आज भेटत होते. किती छळायचं??
तिघेही उठले. जाताना अर्थातच वक्तृत्वाची जबाबदारी अशोकवर असल्याने अशोकने तिघांची भूमिका कथन केली.
"सुरेखा... तुम्हाला आत्ता वहिनी म्हणणं शोभून दिसणार नाही... आज तुम्ही... आज तुमचा कॉलेजचा शेवटचा दिवस आहे... हे दिवस परत कधी येत नाहीत... दिलीप आणि तुम्ही सगळं आयुष्य एकत्रं घालवणार आहातच.... पण... तुमच्या लग्नानंतरही आमच्या तिघांची मैत्री तुमच्या दोघांशी तशीच राहील... आज मात्र आपला या कॉलेजमधून आम्ही तिघे निरोप घेतो... लग्नाला बोलवाल ना??"
हा डायलॉग मात्र दिल्यालाही हालवून गेला.
सुरेखाने चक्क तिघांना दोन मिनिटे परत बसायला सांगीतले. आणि मग दिल्याकडे वळून म्हणाली..
सुरेखा - कॉलेजमधून बाहेर पडून मला काय नोकरी करायची थोडीच आहे??
अशोक - .. ते..... तेही खरंय..
सुरेखा - यांच एवढं मोठं घराणं... मला काही करायची गरजच नाही...
अशोक - होय....
सुरेखा - त्यामुळे मी.... गंमतच केलीय एक....
श्वास होते तिथेच अडकले सगळ्यांचे! काय गंमत केली आता या बयेने?? सासूला फोन बिन करून सांगीतले की काय मी आत्तापासूनच राहते म्हणून तुमच्याकडे??? शक्यंय! जी मुलगी एकटी जेन्ट्स होस्टेलमधे घुसते ती ही असली किरकोळ कामं तर सहजंच करेल!
दिल्या - क्...काय केलंस तू???
"ऑपरेशन रीसर्च, हीट ट्रान्स्फर आणि मशीन डिझाईन.. या तीन सब्जेक्ट्सचे पेपर्स कोरे दिले... त्यामुळे पुढच्याही वर्षी एटीकेटी न मिळाल्यामुळे मी कॉलेजलाच......"
आज मी पहीली...
आज मी पहीली...
अय्या काय मुलगि आहे जबरि
अय्या काय मुलगि आहे जबरि मज्जाआहे आनखिन एक वर्श मज्जा
नंबर३
नंबर३
मजा आली
मजा आली
सुरेखाने शॉकच दिला......
सुरेखाने शॉकच दिला...... अर्थात तो भूषणरावांनीच दिला...
डॉ. कैलास यांना अनुमोदन..
डॉ. कैलास यांना अनुमोदन..
बिनधास्त मुलगी आहे..
बिनधास्त मुलगी आहे, आता
बिनधास्त मुलगी आहे, आता मज्जाच मज्जा
धम्माल
धम्माल
मस्त..
मस्त..
वा!!! हा भाग वाचुन मजा आली
वा!!! हा भाग वाचुन मजा आली ...जोर का झटका हाय जोरोसे लगा..
सुरेखाची गंमत वाचून तर खुपच मजा आली. ह्याला म्हणतात खरं प्रेम. बेफिकिरजी असंच लिखाण करत रहा आणि आम्हाला हसवत रहा....
व्वा..मस्तच!!! आता अजुन मजा
व्वा..मस्तच!!! आता अजुन मजा येईल..येऊदे पुढचा भाग
आत्तापर्यंतच्या सर्व
आत्तापर्यंतच्या सर्व भागांच्या लिन्क्स काही सदस्यांना हव्या होत्या म्हणून येथे देत आहे.
सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनासाठी सर्वांचे मनःपुर्वक आभार!
-'बेफिकीर'!
http://www.maayboli.com/node/19866 part one
http://www.maayboli.com/node/19874 part two
http://www.maayboli.com/node/19960 part three
http://www.maayboli.com/node/19975 part four
http://www.maayboli.com/node/19984 part five
http://www.maayboli.com/node/20058 part six
http://www.maayboli.com/node/20065 part seven
http://www.maayboli.com/node/20080 part eight
http://www.maayboli.com/node/20092 part nine
http://www.maayboli.com/node/20123 part ten
http://www.maayboli.com/node/20199 part eleven
http://www.maayboli.com/node/20208 part twelve
http://www.maayboli.com/node/20227 part thirteen
अशोक भावा, काय पिडलाय दिल्या
अशोक भावा, काय पिडलाय दिल्या ला, सहिच. नंतर काय व्हायचय ते होऊ देत आता घावलाय ना घ्या धुवुन, १ च नंम्बर.
आत्म्याच व्याख्यान आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया तसेच वन्याचि कविता वाचायला आवडलि असति रादर तो प्रसंग खुप खुप हसवुन गेला असता, पण असो.....
बेफिकिर जी, वन्या च्या कवितांना कात्रि लावु नका हो, मस्त हलक हलक वाटत, खुप खुप हसायला येत. दिवस भरुन पावतो(माझा तरी).
छान !!!!!!!!!!
छान !!!!!!!!!!
प्रत्येक भागाचा शेवट दणदणीत
प्रत्येक भागाचा शेवट दणदणीत असतो तुमचा भूषण..... आवडलं....
मस्तच.......
मस्तच.......
भुषण लिंक्स दिल्याबद्दल आभारी
भुषण लिंक्स दिल्याबद्दल आभारी आहे
वाचतोय बरेच दिवस . फारसं
वाचतोय बरेच दिवस . फारसं भुषणावह लिखाण वाटलं नाहि काहिही. गझलभुषणा, तु तरी हुरळुन जाणार नाहिस असं वाटल होत. स्पष्टोक्तिबद्दल राग नसावा.
अच्छा तर आपलं नाव भुषण का? आज
अच्छा तर आपलं नाव भुषण का?
आज हसायची इच्छा अपुर्ण राहिली.
असो ती तर काय उद्या पुर्ण करालच की तुम्ही. तेवढी आशा ठेवायचा हक्क आहेच आमचा.
मस्त चालु आहे.........
मस्त चालु आहे.........
आत्माराम सारखे सुरेखा कडे नजर
आत्माराम सारखे सुरेखा कडे नजर ठेवून आहे - दाल मे कुछ काला हॅ.....!
सर्व नवीन प्रतिसाद
सर्व नवीन प्रतिसाद देणार्यांचेही प्रेमळ प्रोत्साहनासाठी व मित्रत्वाने केलेल्या स्पष्ट मतप्रदर्शनासाठी मनःपुर्वक आभार!
-'बेफिकीर'!
(माझे नांव भूषण आहे 'एक पाकळी', मात्र 'गझलभूषण' कुणीतरी दुसरा असावा, तो मी नव्हेच!)
खुपच सुंदर लिहले आहे
खुपच सुंदर लिहले आहे बेफिकिरजी
मस्तच सुरेखाचा निर्णय सुखद
मस्तच सुरेखाचा निर्णय सुखद आहे... मित्रांनी मिळून दिल्याला जे चिडवलं... तो प्रसंग खुप मस्त रंगवलात