झाकीर हुसेन हा नुस्ता ’जिव्हा’ळ्याचा विषय नाही तर तो खरच जिव्हाळ्याचा विषय. झाकीरला अहो-बिहो म्हटलं की, त्याचे-माझे त्याला माहीत नसलेले धागे कुठेतरी अकारण ताणले जातात असं मला (अजूनही) वाटतं
झाकीर हे माझ्या उमलत्या वयातलं पहिलं आणि शेवटचं "वेड".... ज्याला क्रश म्हणत असावेत. एकमेव एव्हढयासाठी म्हणायचं कारण की, ते वेड होतं तोवर इतर काही दिसलंच नाही आणि ते संपलं तेव्हा मी मोठी झाले होत्ये.
तबला रीतसर शिकायला सुरूवात करायच्याही आधी हा आयुष्यात आला. कार्यक्रमांत, झाकीर साथीला असेल तर तिथे झाडलोटीची कामं करूनसुद्धा कार्यक्रम बघण्याची तयारी असायची. कधी कधी एकाचवेळी दोन कार्यक्रम असतील तर साथीला कोणय ह्यावर ठरायचं, ह्या कार्यक्रमाला जायचं की त्या.
’अगं, त्या ह्याचं ऐकून तर बघ.....’ ह्या सूचनेचा जेव्हा राग यायला लागला, तेव्हाच कधीतरी झाकीर माझ्यासाठी एक निव्वळ तबला वादक न रहाता, अजून काहीतरी बनायच्या गतीत होता. व्यक्तीपूजा ही न कळत्या वयात होतेच होते..... अन ती व्हावीही.
माझ्याकडे फोटो लावून पूजा नव्हती इतकच काय ते. पण फोटो होताच. म्हणजे, होते. माझ्या एका सख्य्ख्या मित्राला फोर्टमध्ये हिंडताना झाकीरवर फ़ीचर केलेलं एक पुस्तक सापडलं होतं. त्यानं मला एका वाढदिवसाला भेट दिलं. तेव्हढ्याचसाठी त्याचे लाख अपराध माफ आहेत त्याला...... अजून.
दयानिता सिंग नावाच्या एका बयेनं त्याचे कृष्णं-धवल फोटो काढून ते पुस्तक केलं होतं. अनेक मोठ्या कलाकारांचे झाकीरविषयक मनोगतं, झाकीरचे स्वत:चे काही ’बोल’, त्याच्या कुटुंबाचे, बछड्यांचे फोटो असं ते पुस्तक. साहजीकच काही विशिष्टं पानांवर मी (जरा) जास्तं खोळंबत असे
ते फोटो फीचर हाती येण्याच्या कितीतरी पूर्वीच हा वेगळा कलाकार ध्यानी येऊ लागला होता. त्याचं कलाकारांच्या सभेत इतर लहान-मोठ्या सगळ्याच कलाकारांना मान देणं, स्वत:चे तबले स्वत: उचलून स्टेजवर येणं, पाय समोर जुळवून, आपली वाद्यं हातात घेतलेल्या अवस्थेत, कमरेत पूर्ण वाकून समोरच्या श्रोतृवर्गाला नम्र अभिवादन करणं, त्याच्या विषयी न ऐकलेल्या व्यसनाच्या गोष्टी, वारंवार फोटो काढून कलाकारांच्या समाधीत व्यत्यय आणणार्या फोटोग्राफर्सना त्यानं तंबी देणं, संगीताच्या दरबारात बुजुर्ग कलाकाराला योग्य तो मान देण्याची जबाबदारी श्रोतृवर्गाचीही आहे हे त्याच्या एंट्रीला पडणार्या जादा टाळ्यांसाठी त्याचं प्रेक्षकांना समजावणं, एकदा साऊंड चेक केल्यावर कोणत्याच बारिक-सारिक सेटिंग्जना साऊंड टेक्निशियनने हातही न लावण्याविषयी त्याचा आग्रह, हे सगळं सगळं आत आत झिरपत होतं.
एक चांगला कलाकार होणं म्हणजे काय, ते कळत होतं असं तेव्हा वाटत होतं, हे आत्ता कळतय. आत्ता हे ही कळतय की एका चांगल्या कलाकाराची बाह्य स्वरूपातली वर्तणूक कशी असावी ह्याचा तो एक आदर्श म्हणून मला मनोमन पटला होता.
झाकीरचा प्रत्येक ना आणि प्रत्येक धा... किंबहूना प्रत्येक बोल हा एकमेव बोल आपण ह्या आयुष्यात तोही एकदाच वाजवणार आहोत अशा भक्तीने प्रत्येक वेळी कसा काय वाजतो? ठाय आणि मध्यम लयीत तब्येतीत वाजलेला बोल जितका स्वच्छ आणि मधूर तितकाच अतिद्रुत गतीतही... तिथेही तेच खणखणीत बोलणारं लखलखीत नाणं. ही किमया, असाधारण रियाजाची.
आपण ज्याला "प्रॅक्टीस" म्हणतो ना, ती नाही. डोळे बंद करून केलेला चक्कूताड्या-घोटाताड्या नाही. हा समजून केलेला योग आहे. अभ्यासपूर्णं अथक परिश्रम.
झाकीर तबला वाजवतो तेव्हा "झाकीर" "तबला" "वाजवत" नाही. झाकीर आणि तबला मिळून काहीतरी एकच वाजत असतं. ह्यालाच मला त्याचं आणि तबल्याचं अद्वैत म्हणायचय. तबला हे एक वाद्य न रहाता, त्याच्याच शरिराचा, मनाचा एक भाग असल्यासारखी एकरसता, एकतानता. गाणार्याचा कंठ जसा, तसंच. तो ’धा’ वाजवतो तेव्हा त्याच्या शरिराचा आणि मनाचा कणनकण ’धा’ बनून वाजतो....
अगदी काहीच मोजके अपवाद सोडल्यास त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात, रेकॉर्डिंगमध्ये, काहीतरी, ’सध्या प्रचलित आहे’ त्याच्या पल्याडचं तो वाजवून गेल्याचं जाणवतं.
एक वेगळा विचार! तालाचा, तालाच्या वजनाचा, एखाद्या पारंपारिक तुकड्याचाही... पण वेगळ्या अंगाने केलेला विचार त्याच्या वादनात कुठेनाकुठेतरी सारखा डोकावत रहातो. मग ती गायनाला, वादनाला केलेली साथ असो किंवा त्याच्या स्वत:चा सोलो असो.
मग कधीतरी एखादाच कार्यक्रम त्यानं ’टाळ्यांसाठी’ वाजवल्यासारखं मला जाणवलं की, उगीच जीवाची तडफड होते. नवनवीन क्षितीजं रंगवू शकणार्या ताकदीची हुनर आज कित्ती गिरवण्यात खर्ची पडली..... असलं काहीतरी यडचापसारखं वाटत रहतं. त्याला कळलं तर तो ही म्हणेल, ’काहितरीच... रोज उठून कोण कसं रंगवेल नवीन क्षितीज?’
कॉलेजच्या अशाच एका चक्रम दिवशी कुणी एक म्हणाला, चल तुला झाकीर आणि वसंतरावांची एक ठुमरी कुणाकडेतरी ऐकवतो. ही फार जुनी गोष्टं आहे. तेव्हा ’सावरे अय जैयो’ चं रेकॉर्डिंग सर्वत्र आजच्या सारखं उपलब्ध नव्हतं. कुणीतरी लपवून केलेल्या रेकॉर्डिंगची ती कॉपी होती. ऐकायला त्यांच्याच घरी जाणं आवश्यक होतं. ’झाकीर’ ह्या शब्दांची आणि त्याच्या वादनाची भुरळ अशी की, मी त्या माहीत नसलेल्या घरी गेले. वेड्यासारखी ती टेप आम्ही परत परत ऐकली. अख्ख्या ठुमरीत कोणताही ठेका दोन आवर्तनापेक्षा जास्तं वेळा वाजवला नाहीये. वसंतरावांच्या चालीप्रमाणे ह्याचे ठेके बदललेयेत.
’दुप्पट लयीत लग्गी’, हा साथीच्या वादनाचा अविभाज्य भाग. पारंपारिक लग्ग्यांचे काही बोल आहेत, जे सगळेच वाजवतात. त्यालाही हटकून वेगळ्या बाजात लग्ग्या अजून काही जण वाजवतातही.
पण त्या ठुमरीत मी पहिल्यांदा असे बोल लग्गी म्हणून वाजवलेले ऐकले की जे बोल कुणी मला ’हं, हा घे लग्गीचा बोल’ म्हणून दिला असता तर मी कदाचित काय भंकस करतोय म्हणून एखादी ’चाट’ वाजवली असती, देणार्याच्याच पाठीवर....
त्याहुनही झेपल्या नाहीत त्या, त्याच्या उठान आणि पडण. उठान म्हणजे सरळ चाललेला ठेका सोडून लग्गी लावायला सुरूवात करण्याच्या जssरा आधी, नांदी म्हणून जो छोटा तुकडा वाजतो ना तो. हा ठेक्याच्या जमिनीला आणि लग्गीच्या आसमानाला जोडणारा ’टेक ऑफ’ आहे असं म्हणूया. आणि तेच पडणलाही लागू. तिनदा वाजणारा एक तुकडा घेऊन लग्गी सोडून तालावर यायचं.... ह्याला लॅंडिंग म्हणूया.
फुरशासारखी चाललेला लग्गी जेव्हा झाकीरने पडण घेऊन तालावर आणून सोडलीये तेव्हा ती अजगरासारखी सुस्तं न होता फडा काढलेल्या पिवळ्या आकड्यासारखी सळसळणारी, लुब्ध करणारी, जिवंत... होते.
छ्छ्या! ह्यांना काय लग्ग्या म्हणायचं? आयला, हा लग्गीतही "विचार" मांडतो..., हा वेगळा विचार मांडतो, असा विचार या पूर्वी कुणी केला नाहीये,.... असलेच विचार करीत घरी आले. हुरळून जाऊन आईला सांगितल्यावर तिनं अनोळखी घरी गेल्याबद्दल माझी ’जातीने ’विचार’पूस’ केल्याचं अजून आठवतं.
’झाकीर’ म्हटल्यावर मग जरा कान देऊन ऐकणं व्हायला लागलं. प्रत्येक कलाकार कलेची नवीन क्षितिजं आपल्यापरीने उघडायचा प्रयत्नं करतो, अत्त्युच्च शिखराचं टोक गाठायचा प्रयत्नं करतो, आणि जमलं तर त्यावरही अजून एक मचाण "आपल्यापरीने" तयार करतो. जेणेकरून पुढल्यांसाठी एक नवीन आव्हान तयार होतं.
हे प्रयत्नं तोकडे पडले तर, कुठल्यातरी खालच्याच शिखरावर पडाव पडतो आणि आयुष्यं नुस्तं त्या आधीच्यांनी बांधलेल्या शिखराच्या दिशेने प्रवासाचा प्रयत्नं करण्यात जातं.
झाकीरने नुस्ती नवीन क्षितिजं उघडली नाहीत तर प्रत्येक क्षितिजावर एकेक आपलं म्हणून शिखर रोवलय, असं माझं प्रामाणिक मत आहे.... हे, त्याच्यावरची माझी वेडी भक्ती शहाणी झाल्यानंतरचं मत!
त्याच्या काळापर्यंत घराण्याचे पेशकार, तोडे, कायदे, खास चीजा जशाच्या तशा साथीला वाजवण्याची परंपरा होती.
पण मुख्य गायक-वादक वाजवीत असलेला बाज, डौल, नोक-झोक, वजन उचलून त्यानुसार पारंपारिक, घराण्याच्या बंदिशींमधे योग्य तो बदल करून ते तोडे, तुकडे वाजवण्याची चाल त्यानं सुरू केली. हे माझं म्हणणं प्रमाण देऊन सिद्ध करता येण्यासारखं नाही.... त्यामुळे चूकही असेल. मी असं म्हणेन की माझ्या ऐकण्यानुसार..... ही आत्ता सर्वत्र दिसणारी साथीची विशिष्टं पद्धत ही त्याची देन आहे.
झाकीरचे कार्यक्रम किती बघितले ह्याची गणती नाही. लक्षात राहिलेला एक कार्यक्रम जो.... बघितलाच नाही. ’शक्ती’ ग्रूपचा एक कार्यक्रम ओपनएअर थिएटर मध्ये आहे, हे फार उशिरा कळलं. त्या दिवशी माझाच एका ठिकाणी कार्यक्रम होता. आधी कळूनही तसाही फायदा नव्हता कारण तिकिट परवडलं नसतं. पण योगायोगाने त्याचं साऊंड इंजिनियरिग करणार्या कुणा पारशी गहस्थाचा मुलगा, मी ज्याच्याबरोबर वाजवणार होते, त्याच्या वर्गात होता.
आणि आम्हाला अनुभवायाला मिळाला तो एक अविस्मरणीय साऊंड टेस्टिंगचा भाग. जो सर्वसाधारण प्रेक्षकांना कधी दिसतच नाही.
त्या ओपन एअर थिएटर मध्ये झाकीर, विक्कू विनायकराम (घटम), एल शंकर (व्हायोलीन), जॉन मॅक्लोफिन (१२ स्ट्रिंग गिटार) सगळे दुपारी दोनच्या लख्ख उन्हात साउंड टेस्टिंग करीत होते. ’हाताची घडी तोंडावर बोट’ ह्या अटीवर आम्हाला तिथे चार तास उभं राहून तो प्रकार बघायला मिळाला. रंगमंच फिरता होता त्यामुळे वर टांगलेले सोळा माईक्स, रंगमंचावरचे असेच आठ दहा माईक्स, झाकीर आणि विक्कूना दिलेले कॉलर माईक्स... ह्या सगळ्या सगळ्याचं सेटिंग करून ही मंडळी साडेसहाला परत आपापल्या मुक्कामी गेली. झाकीरने स्वत: येऊन साऊंड पॅनेल बंद केलय ना, ते बघितलं. ते लॉक करून फक्तं मास्टर वॉल्यूम वर खाली करता येणारे नॉब्स बाहेर ठेवले होते. म्हणूनच साऊंड टेक्निशियननी, कार्यक्रम चालू असताना कुणाच्याही सांगण्यावरून बटणं फिरवण्याचा त्याला किती मनस्ताप होत असेल ह्याची कल्पना आली.
संपूर्ण घामाने भिजलेला, पांढरा सुती झब्बा, जीन्समधला, डोळ्यावरचा काळा गॉगल आपल्या झुल्फांवर चढवून समाधानाने त्या साऊंड इंजिनियरच्या पाठीवर थाप मारणारा.. असा चार फुटांवर उभा झाकीर अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. कोपर्यात हाताची घडी, तोंडावर बोट अवस्थेतच अजून डोळे विस्फारून त्याच्याकडे बघणारी टकरी मुलगी त्याला दिसलीही नसेल, कदाचित.
तबल्याची टोनल क्वालिटी म्हणजे प्रत्येक बोलाची आस, नाद शुद्ध ठेवत वाजवणं ह्यावरची त्याची हुकुमत इतकी आहे की. तो एक "बेन्चमार्क".... एक प्रमाण मानतात. एका कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशींबरोबर ’जो भजे हरीको सदा’ वर वाजवलेला साधा भजनी ठेका आणि मधूर पारंपारिक लग्ग्याही जतन करून ठेवण्यासारख्या आहेत. त्याने वाजवलेले अनेक प्रचलित आणि अनवट तालातले सोलो मी जमा केलेत.
एका कार्यक्रमात एका पंधरा-सतरा वर्षाच्या बासरीवादक मुलाबरोबर झाकीरने इतक्या गंभीरपणे अष्टरूपक वाजवलाय की विचारू नका. रूपक हा सात मात्रांचा प्रचलित ताल आहे. रूपकचाच नोक-झोक ठेऊन एक जास्तीची मात्रा लागणारा हा आठ मात्रांचा ताल चकवा देतो.
मी प्रत्यक्ष पाहिलेल्या ह्या मैफिलीत, पहिल्या दहा मिनिटात त्या मुलाने एकदाही झाकीरना पेशकार, मुखडे-तोडे वाजवण्याचा इशारा केला नाही. झाकीरसारखं दैवत तबला वाजवतंय ह्याचं जराही टेंन्शन न घेता वाजवणारा तो वीर... झाकीर अपार कौतुकाने एकटक त्याच्याकडे बघत फक्तं ताल धरून बसला होता. त्याचा इशारा होईपर्यंत झाकीरने ताल सोडल्यास एकही जादा बोल वाजवला नाही. अन जेव्हा त्यानं परत गतीवर येऊन हसून त्यांच्याकडे बघितलं तेव्हा.... एखाद्या बुजुर्ग कलाकाराची परवानगी मिळाल्यावर नवखा तरूण तबलावादक ज्या विनयाने मान तुकवेल... तितक्या लीनतेनं झाकीरने तो इशारा उचलला होता.
त्या लहानग्याची झेप ओळखून झाकीर त्यानंतर नुस्ता ’सुटला’ होता. अतिशय लक्ष देऊन झाकीरच्या सगळ्या कोलांट्या होईपर्यंत एकाग्रचित्ताने त्याला गतीची साथ करीत हा मुलगा डोळे मिटून वाजवीत होता.
शेवटी प्रचंड चक्रीवादळासारखा घोंघावणारा झाकीर जेव्हा समेवर आला, तेव्हा आपल्या गतीच्या हिंदोळ्यावर त्याला अलगद झेलत त्या मुलानं गतीचं ते आवर्तन पूर्ण केलं. मगच बासरी खाली ठेऊन स्टेजला दोन्ही हात लावीत बसल्या जागेवरून झाकीरला वाकून नमस्कार केला. झाकीरही कमीचा नव्हता... त्यानं एक नजाकतदार "आदाब" त्याला परतभेटीत दिला, तिथ्थे स्टेजवर...
प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला... दोघांच्यातल्या कलाकाराला, माणसाला, सहस्त्रं मनांची दाद होती ती.
अशाच एका कार्यक्रमात उ. अमजद अली खानसाहेबांबरोबर सरोदला साथ करताना, अतिद्रुत गतीत झाल्याला, सरोदची तार तुटली. ती लय सुटू नये म्हणून खानसाहेबांची तार लावून होईपर्यंत झाकीर कमी आवाजात त्या मॅड लयीत तीनतालाचे नुस्ते ठेके वाजवीत होता. एकही ठेका, तोडा त्याने परत वाजवला नाही, लय जराही हलली नाही, कोणत्याच तुकड्याचे बोल जराही अस्पष्ट किंवा बोबडे वाजले नाहीत, तबल्याचा आवाजही इतकाच होता की, तार लावून झाल्यावर खा साहेबांना ती परत स्वरात लावताना त्यांचा तानपुरा ऐकू यावा.
इतकी व्यवधानं संभाळीत वाजवणार्या झाकीर नामक देहाचे, डोळे मिटलेले... तो आत्ममग्नं चेहरा, वाजवणारे हात, समोरचा तबला, त्यातून निघणारे बोल... हे सारं सारं एकरस, एकसंध, संततधार बनून वहात होतं.
धुंदीत तो जे काही वाजवीत होत, ते इतकं वेधक होतं की, .... क्षणमात्रं विचार मनात येऊन गेला.... तार लागूच नये, ना!
एकामागेएक निघाल्या ठेक्यांची, तोड्यांची, बोलांची ती सळसळणारी जिवंत धारा बघून वाटलं.... आपण ह्या वेगळं असू नये.... ह्यातलाच एखादा तोडा बनून वाहून जावं....
लक्ष्मण झुल्यापासची गंगेची अधीर धारा बघून असंच वाटलं होतं, मला.... ह्या असल्या जळावर्ताला, ह्या ओघाला, ह्या चैतन्याला, कशाला हवा तीर? होऊन जाऊदे ना, जळ-मळ... एक!
समाप्तं
तळटीपः हे छायाचित्रं माझं सगळ्यात आवडीचं आणि दयानिता सिंगच्या त्या फीचमधून घेतलय.
मस्त प्रत्येक बोल हा एकमेव
मस्त
प्रत्येक बोल हा एकमेव बोल आपण ह्या आयुष्यात तोही एकदाच वाजवणार आहोत>>>>>>> म्हणून तर प्राण पणाला लागतात प्रत्येक बोलाला आणि स्वर्गीय काहीतरी समोर येऊन ठाकतं
सूक्ष्म, सुयोग्य, रोचक विवेचन
सूक्ष्म, सुयोग्य, रोचक विवेचन ..... मनापासून लिहिलय तुम्ही. गाण्यातच जगताहात हे जाणवतय शब्दाशब्दाला... झाकिरजींचा फोटो अप्रतिम!! वाह, उस्ताद!
दाद, मस्तच! शब्दांच्या
दाद, मस्तच! शब्दांच्या पलिकडचं वाजवणार्याला झाकीरला मस्त पकडलयस. वा! असं एखादा तुझ्यासारखा तबल्याचा जाणकारच लिहू जाणे!
फारच अप्रतिम!! एकतर झाकीर
फारच अप्रतिम!!
एकतर झाकीर हुसेन हा माझाही क्रश!! तबला काही कळत नसला तरी त्याचे वाजवणे पाहायला, ऐकायला खूप आवडते.. एकदाही प्रत्यक्ष ऐकले नाही, तरीही हा लेख वाचून खूपच अनुभवता आले त्याचं वाजवणं व एकंदरीत ती धुंदी!
बायदवे, फोटो मलाही प्रचंड.............. आवडला!
खूपच छान लिहिलत दाद तोड
खूपच छान लिहिलत दाद
तोड नाहि.
छान लिहिलं आहेस दाद. झाकिर
छान लिहिलं आहेस दाद. झाकिर हुसेनचा एक(च) कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकला आहे. अप्रतिम !!!
दाद, मस्त लिहिलं आहेस. मी
दाद, मस्त लिहिलं आहेस. मी तबल्याचा विद्यार्थी असल्यामुळे अगदी प्रत्येक वाक्य नीट वाचलं.
मी झाकीर हुसेनचा एकही कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिलेला नाहीये अजून. पण रेकॉर्ड्स भरपूर ऐकल्या आहेत.
झाकीरचा प्रत्येक ना आणि प्रत्येक धा.. ठाय आणि मध्यम लयीत तब्येतीत वाजलेला बोल जितका स्वच्छ आणि मधूर तितकाच अतिद्रुत गतीतही...
>>
संपूर्ण अनुमोदन. झाकीरचा उत्कृष्ट 'धा' ऐकल्यावर जो काही आनंद मिळतो, त्याला तोड नाही. बाकीच्या बोलांच्या बाबतीतही ते खरे आहे.
<<शेवटी प्रचंड चक्रीवादळासारखा घोंघावणारा झाकीर जेव्हा समेवर आला>>
वा! अगदी समर्पक आणि योग्य उपमा दिली आहेस.
दाद, अप्रतिम लेख!
दाद, अप्रतिम लेख!
पुन्हा एकदा, सगळ्यांचे खूप
पुन्हा एकदा, सगळ्यांचे खूप आभार.
त्या वेडपट काळात, 'त्याला पुरणपोळी आवडते' असले अचरट डिटेल्स लक्षात ठेवायचे
झाकिर सारखीच मी अनिंन्दोंची फॅन आहे. त्यांना फार सोलो वाजवण्यासाठी पाचारण्यात आलेलं नाही. पण जमलं तर जरूर जरूर अगदी सोलो ऐकण्यासारखा गुणी कलाकार आहे हा.
आजच्या काळात अनिश प्रधान अजून एक!!
धा तिरकीट धा तिरकीट धा
धा तिरकीट धा तिरकीट धा धा
तिरकीट धा तिरकिट धा तिरकीट
ता तिरकीट धा तिरकिट ता ता
तिरकिट तिरकिट तिरकिट तिरकिट
व्वाह उस्ताद!!
व्वाह उस्ताद!!
दाद, लै भारी. झाकिर हुसेन वर
दाद, लै भारी.
झाकिर हुसेन वर न 'मरणारी' ( हो हीच भाषा) मुलगी नॉर्मल नाही असं माझं लै ठाम मत होतं पूर्वी.
साधना नावाच्या दूरदर्शनवरील कार्यक्रमात झाकीर हुसेन यांच्यावरचा पहिला कार्यक्रम पाहिला, and ...
अप्रतिम लेख, दाद ..
अप्रतिम लेख, दाद ..
वा ! काय लिहलंय ! यापेक्षा
वा ! काय लिहलंय ! यापेक्षा जास्त दाद देऊ शकत नाहीये !
>एकामागेएक निघाल्या ठेक्यांची, तोड्यांची, बोलांची ती सळसळणारी जिवंत धारा बघून वाटलं.... आपण ह्या वेगळं असू नये.... ह्यातलाच एखादा तोडा बनून वाहून जावं....
क्या बात है !
२००३ मधे एक अमेरिकन पठ्ठ्या माझ्याकडे आला. कुठून तरी ओळखीतून माझ्याकडे तबला आहे असं त्याला कळालं होतं. त्यानं आयुष्यात कधी तबला वाजवला नव्हता. पण एका क्लास साठी , त्याला एक आठवड्यासाठी उसना हवा होता. मित्राने त्याच्या बद्दल ग्वाही दिली म्हणून मी भीत भीत दिला. त्याला त्या क्लासबद्दल काहीही माहिती नव्हती पण त्याच्या एका मैत्रिणीने दोन वर्षाअगोदर त्या क्लास मधे नाव नोंदवलं होतं आणि आयत्या वेळेस तिचा नेहमीचा मित्र आला नाही म्ह॑णून हे महाशय जाणार होते. माझा तबला बर्याच दिवस धूळ खात पडला होता. तेंव्हा त्यालाच सांगितलं तो कदाचित नीट वाजणार नाही तेंव्हा तिथे कुणाकडून तरी लावून घे.
तबला परत करायला आला, तेंव्हा मस्त लावलेला होता. या महाशयांनी मला कसेबसे तित्रालमधले बोल काढून दाखवले. कुणी लावला तर म्हणाला " The Teacher Tuned it". मी म्हटलं कोण टीचर. तर याने आता क्लासचं Brochure आणलं होतं त्यावरचा "टीचर" चा फोटो दाखवला.
ज्याने आयुष्यात कधी तबला वाजवला नव्हता त्याने सगळ्यात पहिल्यांदा तो धडा झाकीर पासून घेतला होता. आणि त्या गुरुनेही तितक्याच मनापासून या एका विद्यार्थ्याला धा धीं धीं धा पासून धडे दिले होते !
नितिन, - तक तिरिकिट धा तक
नितिन,
- तक तिरिकिट धा तक तिरिकिट धा तक तिरिकिट धा!!!
ये बात, वेब्मास्तर!
त्या फोटो फीचरमधे झाकीर एका शिष्याला डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताने "ना" समजावून सांगतानाचा फोटो आहे. मॅड! त्या कृष्ण-धवल चित्रात मला झाकीर त्याला काय (काय) सांगत असेल ते ऐकू येतं.... इतकं सुंदर आहे.
अआई गं.......... किस दुखती रग
अआई गं.......... किस दुखती रग को छेडा रे कातिल.....!!
त्या तुझ्या.....नाही आपल्या झाकीरचं कौतुक वाचू की इतकं सुंदर लिहिणार्या दादला दाद देऊ हेच कळत नाहीये.
ए .... कसं लिहितेस गं असं कत्लेआम करणारं..... एक बार तुझे मिलना है यार..... !!
रैना, माझं अजुनही तेच मत
रैना, माझं अजुनही तेच मत आहे..!
मस्त!
जायले, केदारच्या लहानपणी
जायले, केदारच्या लहानपणी त्याच्या मते, तबला हे बायकांचं वाद्यं!!!
त्याला अगदी वाटायचं की, "आई त्याने शिकावं म्हणून त्याला फसवतेय, झाकीरचा व्हिडिओ दाखवून.... खरतर "तो" मुलगीच आहे"
बराच काळ जावा लागला त्याचं हे मत बदलायला
वेडी दाद! आम्हालाही असंच वेड
वेडी दाद!
आम्हालाही असंच वेड लावणारं शेअर करत जा!
खरंतर काहीतरी शिकवायला सुरवात कर .. अगदी बेसिक!
ह्या जलतरंगाला व सोबत
ह्या जलतरंगाला व सोबत असलेल्या तबला वादनाला "दाद" दिल्याशिवाय या लेखाला दिलेली "दाद" पुर्ण कशी होईल. मला समजत नव्हत की दाद यांनी लग्गी, चाट, मुखडा, तुकडा असे शब्द तांत्रीक शब्द असलेला लेख कसा लिहला.
जाणुन घ्यायच असेल तर मागे दिनेशदाने दिलेली क्लीप इथे पहा आणि ऐका तबला.
दिनेशदा | 27 May, 2010 - 13:01
रंजना प्रधान यांचा जलतरंग ऐका, आणि पहा.
खास म्हणजे आपल्या मायबोलीच्या शलाका माळगावकर ( दाद ) तबल्यावर आहेत
http://www.youtube.com/watch?v=CDm2uhcgIPY
मायबोलीवरचा हा कलाकारांचा मेळावा लाजबाब आहे. वाह दाद वा !
क्या बात है... एकदम जानलेवा
क्या बात है... एकदम जानलेवा चीज बनी है भाई.. मझा आ गया ...!!!!
श्रध्देयाच कौतुक कराव की श्रध्देची दाद द्यावी.... कुछ समझमे नही आ रहा है... मी एकदम मुग्ध !!!!
जियो !!!
दाद, थॅन्क्स अजून पूर्ण
दाद, थॅन्क्स अजून पूर्ण वाचून व्हायचय पण तरही.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
धन्यवाद, पुन्हा एकदा
धन्यवाद, पुन्हा एकदा सगळ्यांनाच.
झाकीरचं व्यक्तिमत्वं आणि कलाकारी शब्दात पकडणं म्हणजे वार्याची मोट बांधण्यासारखं.... जमलच नसतं आणि नाहीये हे मलाच कळतय...
तरीही तुम्हाला आवडलय हीच त्याच्यवरच्या, संगीतावरच्या तुमच्या प्रेमाची साक्षं... हेच खरं.
त्या बासरीवादक मुलाचं नाव अजिबात लक्षात नाही.
गिरिराज, शिकवायचं खरच मनात आहे. शिकवतही होते. ह्या "दो टकियोंकी नौकरी"चा तकादा संपला किंव कमी झाला की करेनच करेन. माझं आयुष्यं ज्यानं समृद्ध झालं ते दुसर्याला न देता मी निघून गेले, तर माझ्यासारखी स्वार्थी, कृतघ्नं मीच... तेव्हा नक्की शिकवणारय.
दाद केवळ अप्रतिम
दाद केवळ अप्रतिम लिहीलयस!!
आम्ही ही झाकिरचा कार्यक्रम असला की अक्षरशः मरायचो जायला ,
नशिबाने त्याचा हरिप्रसादजीं बरोबर आणि शिवकुमारांबरोबर लाईव्ह कार्यक्रम बघायला मिळाला, तेव्हा वाटल होत बस्स्स !! आता सगळ संपल इथेच
दाद केवळ अप्रतिम
दाद केवळ अप्रतिम लिहीलयस!!
आम्ही ही झाकिरचा कार्यक्रम असला की अक्षरशः मरायचो जायला ,
नशिबाने त्याचा हरिप्रसादजीं बरोबर आणि शिवकुमारांबरोबर लाईव्ह कार्यक्रम बघायला मिळाला होता, केवळ अप्रतिम, अशक्य !!
दाद -तुमच्या लिखाणास दाद
दाद -तुमच्या लिखाणास दाद द्यायला शब्दच नाहीत.
अकार ,उकार ,मकार करिती विचार्-तुमची प्रतिभा अपरंपार्-शब्दे वर्णू कैची???
अ-प्र-ति-म शलाकाताई! तू
अ-प्र-ति-म शलाकाताई!
तू भन्नाटच लिहिलं आहेस !
हा लेख संग्रही ठेवणार म्हणजे ठेवलाच ....
एकच -- त्या बासरीवादक मुलाचे नाव सांग ना प्लीज !
दाद... ह्या लेखाला काय दाद
दाद... ह्या लेखाला काय दाद द्यावी ह्याचाच विचार करतोय....
कॉलेजमध्ये असताना पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झकीर हुसैन ह्यांची जुगलबंदी ऐकायला गेलो होतो.. आधी उस्ताद तौफिक कुरेशी आणि ग्रूपने सगळे वातावरण तालमय करून टाकले होते.. आणि त्या नंतर शिवजी आणि झकीरजींनी त्या मैफिलीवर जादूच केली.. कार्यक्रम संपल्यावर ती जादू दुसर्या दिवशी कॉलेजमध्ये पण तशीच होती..
शिवजी संतूर वाजवताना जो बारिक नाद करतात तो सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचावा म्हणून झकीरजींनी प्रत्यक्ष साउंड इंजिनियरला केलेल्या सूचना महान होत्या... आणि त्या सूचनांमुळे जो आवाज शेवटच्या श्रोत्यापर्यंत पोहोचला त्याला खरच तोड नाही... आपण जे सादर करत आहोत ते सगळ्यांपर्यंत जसेच्या तसे पोहोचावे म्हणून जी काळजी घेतात तिला नक्की काय म्हणावे हेच समजत नाही...
अप्रतिम लेख आहे >>झाकीर तबला
अप्रतिम लेख आहे
>>झाकीर तबला वाजवतो तेव्हा "झाकीर" "तबला" "वाजवत" नाही. झाकीर आणि तबला मिळून काहीतरी एकच वाजत असतं. >>
भन्नाट!!!!
Pages