मी बारा-तेरा वर्षांची असताना आईनी तिची ’वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’मधली नोकरी सोडायचा निर्णय घेतला. तो घेताना तिनी सगळ्यांचा सल्ला घेतला होता. अण्णा आजोबा, बाबा, तिचे व्यावसायिक भागीदार, माझे मामे आणि परिवारातील इतर मान्यवर सगळ्यांनीच तिला पाठिंबा दिला होता. पण एक दिवस तिने माझ्याकडे येऊन मला, "सई, मी सोडू ना नोकरी? तुला काय वाटतं?" असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी ती मला अगदी लहान मुलीसारखी वाटली होती. आणि एवढ्या सगळ्या सल्ल्यानंतरदेखील तिला माझा सल्ला महत्वाचा वाटतो यानी मला नवीन आत्मविश्वास आला होता. अखेर तिनी तिचा निर्णय अमलात आणला आणि १९९५ साली मार्क लॅब्सची स्थापना झाली. आई आणि बाबा दोघेही त्यात गुंतल्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक होती. सुरुवातीला आम्ही आमच्या घराच्या खाली एक दुकान गाळा घेतला. तिथे आईचं पहिलं ऑफिस थाटण्यात आलं. पहिलं वर्ष नक्की काय करायचं, लॅबसाठी कर्ज कुठून घ्यायचं या विचारात निघून गेलं. मग आई-बाबांचा कोल्हापूरचा बालमित्र, विनूकाका मदतीला आला आणि आम्हाला सिंहगड रोडवर जागा मिळाली. तिथे आमच्या लॅबची पहिली इमारत बांधण्यात आली. तेव्हा पाच खोल्यांची बैठी इमारतसुद्धा खूप मोठी वाटायची. आता पंधरा खोल्यांची तीन मजली इमारतसुद्धा लहान वाटते.
सुरुवातीला भांडवल गोळा करण्यासाठी आईनी 'सुक्रोस्कॅन', या साखरेचा रंग मोजायच्या अतिशय सोप्या सिस्टिमची कल्पना सत्यात उतरवली. या मशीनबरोबर कारखान्यांना त्यांच्या साखरेचा दर्जा तपासायला शिकवलं जायचं. हे करण्यासाठी आईला भारतातल्या सगळ्या भागांमध्ये जावं लागायचं. आधी महाराष्ट्रात त्याचा प्रचार केला. तेव्हा मीदेखील सुट्टी असेल तेव्हा आईबरोबर जायचे. कधी अजिंक्यतारा, कधी किसन-अहीर, कधी वारणानगर, सगळीकडे कृती ठरलेली असायची. आधी तासभर अधिकार्याची वाट बघायची, मग पुढे त्यांना माहिती द्यायची आणि या मशीननी तुमच्या साखरेचा दर्जा कसा सुधारता येईल याचं प्रात्यक्षिक. तेवढा वेळ मी कारखान्यात फेरफटका मारून यायचे. कधी एखादा चीफ केमिस्ट, "मॅडमच्या मुलीसाठी रस आण जाऊन पटकन" अशी आज्ञा द्यायचा. कधी कधी आई मला गाडीत बस असं सांगून जायची. तेव्हा मी (आमच्या यशोधनमध्ये) कारखान्याच्या मोठ्या गेटातून आत येणार्या, उसानी मढलेल्या बैलगाड्या बघत बसायचे. कधी कधी या भेटी आमच्या सुट्टीच्या मध्ये पेरल्या जायच्या. त्यामुळे कारखान्याजवळचा तो मळीचा वास आला की माझी चिडचिड सुरु व्हायची.
सुक्रोस्कॅनमुळे लॅबसाठी लागणारं भांडवल उभं राहू लागलं. आईनी केमिटो नावाच्या नाशिकच्या कंपनीशी मशीन बनवून द्यायचा करार केला. आणि त्यांना खास भारतीय साखरेसाठी लागणार्या सगळ्या सुविधा त्यात बसवण्याचं प्रशिक्षण दिलं. साखरेचा रंग तपासण्यासाठी लागणारी सगळी रसायनं आई त्या मशीनबरोबर बनवून द्यायची. थोडक्यात साखर कारखान्यांसाठी हे 'मॅगी' बनवण्यासारखं झालं होतं. साखरेचा रंग उसाच्या रसापासून साखरेच्या शुभ्र दाण्यापर्यंत कसा बदलतो यामागे खूप सारं रसायनशास्त्र आहे. भारतीय साखर परदेशी पाठवता यावी यासाठी साखरेचा रंग तपासावा लागतो. आणि एकदा साखर तयार झाली की तिचा रंग बदलता येत नाही. त्यामुळे साखर तयार होत असताना, वेगवेगळ्या टप्प्यांवर रंग मोजण्याची प्रथा आईने कारखान्यांमध्ये रुजवली. याला तिनी "कलर बॅलन्स स्टडी" असं नाव दिलं होतं! तो अभ्यास करायला वेगवेगळे कारखाने तिला आमंत्रण देऊ लागले. थोडेच दिवसात आईचा हा अभ्यास भारतातल्या इतर कारखान्यांपर्यंत जाऊन पोहोचला. साधारण या काळात भारतात कोका-कोला आणि पेप्सी हे परदेशी शीतपेयांचे उत्पादक दाखल झाले होते. आधी साखरेचा रंग मोजणं, तिच्यातील इतर भेसळयुक्त पदार्थांचा अभ्यास करणं गरजेचं मानलं जात नसे. कारण भारतात साखरेवर सरकारचे नियंत्रण होते. त्यामुळे कारखान्यांमध्ये कुठलीच स्पर्धा नव्हती. पण परदेशी उत्पादक भारतीय बाजारात उतरल्यामुळे साखर उत्पादनात एक नवी क्रांती झाली.
पण क्रांती होत असताना मात्र त्यात भाग घेणार्या लोकांची खूप दमछाक होते. तशीच आईचीसुद्धा झाली. त्या काळात आई कधी उत्तर प्रदेश, कधी बिहार, कधी कर्नाटक, कधी तमिळनाडू अशा सगळ्या कारखान्यांमध्ये जायची. अजून सगळीकडे विमानांनी जाण्याइतके पैसे नसल्यामुळे आई रेल्वेनी जायची. त्यात तिच्या चुकणार्या गाड्या पकडून देताना आमची खास त्रेधा तिरपीट व्हायची ते वेगळंच! पण कधी वेटिंग लिस्टवर नाव पुढे न सरकल्यामुळे, तर कधी काम वाढून वेळ निघून गेल्यामुळे आईला रात्री अपरात्री एकटीला जनरल डब्यातून परत यावं लागायचं. पण अगदी बिहारच्या खेडेगावातून जाताना देखील तिला नेहमी चांगलीच माणसं भेटली.
मग आईचा दौरा असला की कुसुमअज्जी आमच्याकडे येऊन राहायची. आणि आई कामावर गेली की तिच्या फोनची आम्ही दोघी वाट बघत बसायचो. पण या सगळ्या कष्टातून आमची लॅब मोठी होऊ लागली. मी शाळेतून बाहेर पडल्यावर कधी कधी आई मला तिच्याबरोबर घेऊन जायची. आणि कारखान्यात छोटी छोटी कामं मला करायला द्यायची. त्याबद्दल मला पैसे मिळायचे. त्यामुळे मी खूष असायचे. अकरावी बारावीच्या सुट्टीत मला रोज शंभर रुपये अशा बोलीवर तिनी नोकरीला ठेवलं होतं. तेव्हा पहिल्या दिवशी तिनी तिच्या स्टाफला मला प्रयोगशाळेतली भांडी घासायला द्या असा आदेश दिला होता. तेव्हा मी फक्त अंती मिळणार्या नोटेकडे डोळे लावून ते काम केलं होतं.
याच दरम्यान तिला सुक्रोस्कॅनच्या अभिनव कल्पनेसाठी पारखे पुरस्कार मिळाला. त्यानंतर खर्या अर्थाने आमची लॅब सुरु झाली. जागतिक स्तरावर काम करण्यासाठी म्हणून मार्कला आय.एस.ओ १७०२५ मान्यता मिळायला हवी होती. ती सगळ्यांनी मिळून मिळवली. आणि मग कोका-कोला आणि पेप्सी सारख्या उत्पादकांमधला आणि कारखान्यांमधला दुवा मार्क झाली. हळू हळू आमच्याकडचे कर्मचारी वाढू लागले. यातही आई नेहमी खेड्यातून येणार्या तरुणांना प्राधान्य देते. त्यांची राहायची व्यवस्था करायला मदत करते आणि त्यांना आय.एस.ओ प्रणालीनुसार प्रशिक्षण देते. आज तिच्याकडे जवळपास चाळीस लोक काम करतात. मार्क लॅब्सबरोबरच मार्क हेल्थ प्रॉडक्टस् सुद्धा सुरु झालं. या उपक्रमातून कनक गूळ पुण्याच्या बाजारपेठेत आला. बाजारातला गूळ सोनेरी दिसावा म्हणून शेतकरी त्यात हायड्रॉस या रसायनाचा मारा करतात. म्हणून आईमाधल्या शास्त्रज्ञ गृहिणीने कनक गूळ तयार करायची कल्पना अमलात आणली. यातही कोल्हापुरातल्या काही शेतकर्यांना तो तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. हल्ली साप्ताहिक सकाळमध्ये पुरणपोळीच्या कृतीत, 'अर्धा किलो कनक गूळ' अशी जिन्नस यादीत सूचना असते. ते बघून आईचा खूप अभिमान वाटतो. कनक गुळाच्या प्रचारासाठीदेखील आईनी मला पगार दिला होता. तेव्हा मी अभियांत्रिकीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये होते. ग्राहक पेठ, वेगवेगळी महिला मंडळं, भिशा अशा ठिकाणी मी माझं पुणेरी काकूंच्या सगळ्या खडूस प्रश्नांसाठी तयार केलेलं भाषण घोकून जायचे. आणि बहुतेकवेळा माझ्या तोंडाची भरपूर वाफ दवडूनदेखील मनाजोगता खप व्हायचा नाही. मग आम्ही प्रचारानंतर पाणीपुरी खाऊन आमचं दु:ख विसरायचो.
आईच्या कर्माचार्यांमध्ये सत्तर टक्के महिला आहेत. कनक गुळापासून ते थेट लॅबपर्यंत सगळीकडे तरुण मुली काम करताना दिसतात. आणि एखाद्या मोठ्ठ्या परिवारासारख्या सगळ्या एकमेकींना मदत करतात. आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांचे वाढदिवस साजरे होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्या मुलींना त्यांच्या मुलांसकट कुठेतरी सहलीला जायला मिळतं. महिला दिनानिमित्त मार्क मध्ये एखाद्या पाहुण्या यशस्विनीला बोलावण्यात येतं आणि सगळ्या मुलींना गुलाबाची फुलं देण्यात येतात. आमच्या अभियांत्रिकी गटातल्या चुणचुणीत मुलांनादेखील या दिवशी बक्षीस दिलं जातं.
आईचं वर्ष दिवाळीनंतर भारत दौ्र्यात तर दिवाळी आधी आंतरराष्ट्रीय दौर्यात वाटलेलं असतं. इकुम्सा या साखर संशोधनाच्या जागतिक कमिटीवर ती भारताचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे साखरेसाठी लागणार्या नवनवीन मेथड्सवर ती सतत काम करत असते.
आईबद्दल बर्याच मासिकांतून लेख लिहून आले आहेत. पण हे सगळं करताना तिची होणारी घालमेल, तिची चिंता, तिची जिद्द, तिचा साधेपणा मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलून गेला. भूतकाळातील प्रसंग सांगताना नेहमी लोक त्याला वेगवेगळ्या झालरी लावतात. कुणी "पुरुष-प्रधान व्यवसायात पाय रोवून उभी राहिलेली महिला" म्हणतात तर कुणी "यशस्वी महिला उद्योजिका" म्हणतात. पण आई मोठी होताना मात्र, 'महिला', 'उद्योजिका', 'यशस्वी' हे कुठलेही शब्द तिच्या डोक्यात नव्हते. तिच्या समोर फक्त एकच ध्येय होतं. हाती घेतलेलं काम पूर्ण करणे. जगात कुठेही वावरताना, 'मला चांगली माणसंच भेटतील' असा आत्मविश्वास बाळगायची ताकद मला आईमुळेच मिळाली.
या महिन्यात माझ्या आईचा वाढदिवस असतो. तिला तिच्या या प्रवासात माझ्या खूप खूप शुभेच्छा. तिनी कुठलही काम आनंदाने करण्याच्या मला लावलेल्या सवयीचा मला आजही पावलोपावली उपयोग होतो आहे.
-------
मूळ लेख: http://unhalyachisutti.blogspot.com/2010/09/blog-post.html
आई मोठी होत असताना..
Submitted by सई केसकर on 13 September, 2010 - 17:50
गुलमोहर:
शेअर करा
@ मंजूडी, माझ्या लेखातल्या
@ मंजूडी,
माझ्या लेखातल्या चुका काही वेळा वाचल्यानंतर मला दिसेनाशा होतात. त्यामुळे वेळ असेल तेव्हा मला त्या दाखवून दिल्या तर भारी होईल. मग मला त्या इथेच दुरुस्त करता येतील. 'बेसिक मधे राडा' असलेल्या चुका गायत्री तपासते. पण शुद्धलेखन फार चपळ आणि चलाख आहे.
इथे पोस्ट करणे म्हणजे पीअर रिव्ह्यूड जर्नलला पेपर पाठवण्यासारखेच आहे. त्यामुळे चोखंदळ (पण प्रेमळ) वाचकांनी जरूर टीका करावी. ती माझ्यासाठी महत्वाची आहे.
सई, खूप छान आणि प्रामाणिक
सई, खूप छान आणि प्रामाणिक लेख! ग्रेट आहे आई तुझी.
तुझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ग्रेट !!
ग्रेट !!
मस्तच लेख.... आईंना
मस्तच लेख....
आईंना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा...
सई, मस्त लेख.... ग्रेट आहे आई
सई,
मस्त लेख....
ग्रेट आहे आई तुझी.
तुझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सई, छान लिहिलय.त्यांना आम्हा
सई, छान लिहिलय.त्यांना आम्हा सर्वांचा नमस्कार.
पण याबाबत आईकडून थोडी तांत्रिक माहिती मिळाली असती तर !
मस्त सई! आईला आमच्या
मस्त सई!
आईला आमच्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छा कळव!
एकदम झकास... दोन्ही डॉ.ना
एकदम झकास... दोन्ही डॉ.ना शुभेच्छा...
आणि दिनेशदांच्या तांत्रिक माहितीच्या मुद्द्याला अनुमोदन..
किती सुंदर आणि साधेपणाने
किती सुंदर आणि साधेपणाने लिहिलयंस !
तुझ्या आईला वाढदिवसाच्या खूप
तुझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या यशामागे किती कष्ट आहेत त्याचा अंदाज तुझ्या लेखातून येतोय. खरोखर प्रेरणादायी लेख.
शुभेच्छा.... (चॉकलेटवाल्या
शुभेच्छा....
(चॉकलेटवाल्या बाई, साखर्-गूळवाल्या बाई , आता पुढचा नंबर कोणाचा? )
सई, तुमच्या आई खरच ग्रेट
सई, तुमच्या आई खरच ग्रेट आहेत. छान ओळख करुन दिलित.
मस्त सई . तुमचे अभिनंदन आणि
मस्त सई . तुमचे अभिनंदन आणि खुप सार्या शुभेच्छा
हम्म्म! धंद्याच्या कल्पना मला
हम्म्म! धंद्याच्या कल्पना मला पण सुचतात, पण प्रत्यक्षात उतरविण्याचं धाडस, जिद्द, उमेद असलं काही नाही. सगळी बोंब तिथेच आहे. असो.. तुझ्या आईला सलाम! फक्त कनक गूळ आम्ही वापरायचो, ती तुझ्या आईची निर्मिती हे आत्ता कळालं. तुझ्या आईच्या हातचा गूळ खाल्लाय म्हणायला हरकत नाही.
मनापासून लिहिलेला लेख.
मनापासून लिहिलेला लेख. तुझ्या आईला वाढदिवसानिमित्त आणि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
सई, मस्तच लेख. तुझ्या आईला
सई, मस्तच लेख. तुझ्या आईला सलाम......
आणि तुझ्या भावी वाटचालिसाठी शुभेच्छा..........!!!
ग्रेट. फार छान लिहिलयस सई.
ग्रेट. फार छान लिहिलयस सई. आईला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा.
मस्तच सई. खूप भावला हा लेख.
मस्तच सई. खूप भावला हा लेख. तुझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा! होऊ घातलेल्या डॉक्टरलाही शुभेच्छा!
आईची मुलाखत घे ना मायबोलीसाठी.
सई, मस्त लिहिलयस. तुझ्या आईला
सई, मस्त लिहिलयस. तुझ्या आईला वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा!!
मुलाखतीसाठी अनुमोदन.
सई, तुझ्या आईच्या जिद्दीला,
सई, तुझ्या आईच्या जिद्दीला, मेहनतीला व सार्थ प्रयत्नांना मनःपूर्वक सलाम!!! किती सोप्या, सहज शब्दांमध्ये तू मांडलंस हे सारं.... पण त्या शब्दांआडून देखील तुझ्या आईचे अखंड परिश्रम, कळकळ जाणवत राहिले. तिला व तुला दोघींनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
रच्याकने, कनक गुळाला सुरुवातीला किती त्रास झाला होता बाजारात प्रचलित होताना आठवतंय मला..... माझा एक मित्र तळमळीने सर्वांना रसायनविरहित गूळ वापरायला सांगायचा, आणि लोक, गृहिणी ढिम्म असायचे!! आता मात्र बर्याच किचन्समधून कनक गूळच वापरला जातो!!
सई, खूप छान लिहीले
सई,
खूप छान लिहीले आहेस.
तुझ्या आईस खूप खूप शुभेच्छा!!!
सई खुप मस्त लिहिल
सई खुप मस्त लिहिल आहेस.
तुझ्या आईला असंख्य शुभेच्छा !!
सई, खूप छान वाटलं वाचताना.
सई, खूप छान वाटलं वाचताना. तुला आणि तुझ्या आईला पुढच्या यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
खुप छान!!
खुप छान!!
ग्रेट! तुझ्या आईचं अभिनंदन
ग्रेट! तुझ्या आईचं अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!
तुम्च्या आईंना अनेक शुभेच्छा!
तुम्च्या आईंना अनेक शुभेच्छा! आम्ही कनक गुळच वापरतो. विशेष करुन आम्हाला बारीक पावडर खूप आवडते.लेख अप्रतिम आहे.
सई, या लेखाच्या निमित्ताने
सई,
या लेखाच्या निमित्ताने 'कनक गूळ आणि बाजरातला पिवळा गूळ ' यातला फरक सांगितलास तर
आमचे चांगले प्रबोधन होईल.
खूप खूप शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा
सहिय .... दिनेशदांच्या
सहिय .... दिनेशदांच्या तांत्रिक माहितीच्या मुद्द्याला अनुमोदन..>>>>
खूप छान लिहीले आहे. तुझ्या
खूप छान लिहीले आहे. तुझ्या आईचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
यावर 'माझी कॉर्पोरेट यात्रा' सारखे पुस्तक लिहायला हवे त्यांनी. आवडेल वाचायला.
कनक गुळात मग त्या रसायना ऐवजी काय वापरतात?
Pages