मी बारा-तेरा वर्षांची असताना आईनी तिची ’वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’मधली नोकरी सोडायचा निर्णय घेतला. तो घेताना तिनी सगळ्यांचा सल्ला घेतला होता. अण्णा आजोबा, बाबा, तिचे व्यावसायिक भागीदार, माझे मामे आणि परिवारातील इतर मान्यवर सगळ्यांनीच तिला पाठिंबा दिला होता. पण एक दिवस तिने माझ्याकडे येऊन मला, "सई, मी सोडू ना नोकरी? तुला काय वाटतं?" असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी ती मला अगदी लहान मुलीसारखी वाटली होती. आणि एवढ्या सगळ्या सल्ल्यानंतरदेखील तिला माझा सल्ला महत्वाचा वाटतो यानी मला नवीन आत्मविश्वास आला होता. अखेर तिनी तिचा निर्णय अमलात आणला आणि १९९५ साली मार्क लॅब्सची स्थापना झाली. आई आणि बाबा दोघेही त्यात गुंतल्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक होती. सुरुवातीला आम्ही आमच्या घराच्या खाली एक दुकान गाळा घेतला. तिथे आईचं पहिलं ऑफिस थाटण्यात आलं. पहिलं वर्ष नक्की काय करायचं, लॅबसाठी कर्ज कुठून घ्यायचं या विचारात निघून गेलं. मग आई-बाबांचा कोल्हापूरचा बालमित्र, विनूकाका मदतीला आला आणि आम्हाला सिंहगड रोडवर जागा मिळाली. तिथे आमच्या लॅबची पहिली इमारत बांधण्यात आली. तेव्हा पाच खोल्यांची बैठी इमारतसुद्धा खूप मोठी वाटायची. आता पंधरा खोल्यांची तीन मजली इमारतसुद्धा लहान वाटते.
सुरुवातीला भांडवल गोळा करण्यासाठी आईनी 'सुक्रोस्कॅन', या साखरेचा रंग मोजायच्या अतिशय सोप्या सिस्टिमची कल्पना सत्यात उतरवली. या मशीनबरोबर कारखान्यांना त्यांच्या साखरेचा दर्जा तपासायला शिकवलं जायचं. हे करण्यासाठी आईला भारतातल्या सगळ्या भागांमध्ये जावं लागायचं. आधी महाराष्ट्रात त्याचा प्रचार केला. तेव्हा मीदेखील सुट्टी असेल तेव्हा आईबरोबर जायचे. कधी अजिंक्यतारा, कधी किसन-अहीर, कधी वारणानगर, सगळीकडे कृती ठरलेली असायची. आधी तासभर अधिकार्याची वाट बघायची, मग पुढे त्यांना माहिती द्यायची आणि या मशीननी तुमच्या साखरेचा दर्जा कसा सुधारता येईल याचं प्रात्यक्षिक. तेवढा वेळ मी कारखान्यात फेरफटका मारून यायचे. कधी एखादा चीफ केमिस्ट, "मॅडमच्या मुलीसाठी रस आण जाऊन पटकन" अशी आज्ञा द्यायचा. कधी कधी आई मला गाडीत बस असं सांगून जायची. तेव्हा मी (आमच्या यशोधनमध्ये) कारखान्याच्या मोठ्या गेटातून आत येणार्या, उसानी मढलेल्या बैलगाड्या बघत बसायचे. कधी कधी या भेटी आमच्या सुट्टीच्या मध्ये पेरल्या जायच्या. त्यामुळे कारखान्याजवळचा तो मळीचा वास आला की माझी चिडचिड सुरु व्हायची.
सुक्रोस्कॅनमुळे लॅबसाठी लागणारं भांडवल उभं राहू लागलं. आईनी केमिटो नावाच्या नाशिकच्या कंपनीशी मशीन बनवून द्यायचा करार केला. आणि त्यांना खास भारतीय साखरेसाठी लागणार्या सगळ्या सुविधा त्यात बसवण्याचं प्रशिक्षण दिलं. साखरेचा रंग तपासण्यासाठी लागणारी सगळी रसायनं आई त्या मशीनबरोबर बनवून द्यायची. थोडक्यात साखर कारखान्यांसाठी हे 'मॅगी' बनवण्यासारखं झालं होतं. साखरेचा रंग उसाच्या रसापासून साखरेच्या शुभ्र दाण्यापर्यंत कसा बदलतो यामागे खूप सारं रसायनशास्त्र आहे. भारतीय साखर परदेशी पाठवता यावी यासाठी साखरेचा रंग तपासावा लागतो. आणि एकदा साखर तयार झाली की तिचा रंग बदलता येत नाही. त्यामुळे साखर तयार होत असताना, वेगवेगळ्या टप्प्यांवर रंग मोजण्याची प्रथा आईने कारखान्यांमध्ये रुजवली. याला तिनी "कलर बॅलन्स स्टडी" असं नाव दिलं होतं! तो अभ्यास करायला वेगवेगळे कारखाने तिला आमंत्रण देऊ लागले. थोडेच दिवसात आईचा हा अभ्यास भारतातल्या इतर कारखान्यांपर्यंत जाऊन पोहोचला. साधारण या काळात भारतात कोका-कोला आणि पेप्सी हे परदेशी शीतपेयांचे उत्पादक दाखल झाले होते. आधी साखरेचा रंग मोजणं, तिच्यातील इतर भेसळयुक्त पदार्थांचा अभ्यास करणं गरजेचं मानलं जात नसे. कारण भारतात साखरेवर सरकारचे नियंत्रण होते. त्यामुळे कारखान्यांमध्ये कुठलीच स्पर्धा नव्हती. पण परदेशी उत्पादक भारतीय बाजारात उतरल्यामुळे साखर उत्पादनात एक नवी क्रांती झाली.
पण क्रांती होत असताना मात्र त्यात भाग घेणार्या लोकांची खूप दमछाक होते. तशीच आईचीसुद्धा झाली. त्या काळात आई कधी उत्तर प्रदेश, कधी बिहार, कधी कर्नाटक, कधी तमिळनाडू अशा सगळ्या कारखान्यांमध्ये जायची. अजून सगळीकडे विमानांनी जाण्याइतके पैसे नसल्यामुळे आई रेल्वेनी जायची. त्यात तिच्या चुकणार्या गाड्या पकडून देताना आमची खास त्रेधा तिरपीट व्हायची ते वेगळंच! पण कधी वेटिंग लिस्टवर नाव पुढे न सरकल्यामुळे, तर कधी काम वाढून वेळ निघून गेल्यामुळे आईला रात्री अपरात्री एकटीला जनरल डब्यातून परत यावं लागायचं. पण अगदी बिहारच्या खेडेगावातून जाताना देखील तिला नेहमी चांगलीच माणसं भेटली.
मग आईचा दौरा असला की कुसुमअज्जी आमच्याकडे येऊन राहायची. आणि आई कामावर गेली की तिच्या फोनची आम्ही दोघी वाट बघत बसायचो. पण या सगळ्या कष्टातून आमची लॅब मोठी होऊ लागली. मी शाळेतून बाहेर पडल्यावर कधी कधी आई मला तिच्याबरोबर घेऊन जायची. आणि कारखान्यात छोटी छोटी कामं मला करायला द्यायची. त्याबद्दल मला पैसे मिळायचे. त्यामुळे मी खूष असायचे. अकरावी बारावीच्या सुट्टीत मला रोज शंभर रुपये अशा बोलीवर तिनी नोकरीला ठेवलं होतं. तेव्हा पहिल्या दिवशी तिनी तिच्या स्टाफला मला प्रयोगशाळेतली भांडी घासायला द्या असा आदेश दिला होता. तेव्हा मी फक्त अंती मिळणार्या नोटेकडे डोळे लावून ते काम केलं होतं.
याच दरम्यान तिला सुक्रोस्कॅनच्या अभिनव कल्पनेसाठी पारखे पुरस्कार मिळाला. त्यानंतर खर्या अर्थाने आमची लॅब सुरु झाली. जागतिक स्तरावर काम करण्यासाठी म्हणून मार्कला आय.एस.ओ १७०२५ मान्यता मिळायला हवी होती. ती सगळ्यांनी मिळून मिळवली. आणि मग कोका-कोला आणि पेप्सी सारख्या उत्पादकांमधला आणि कारखान्यांमधला दुवा मार्क झाली. हळू हळू आमच्याकडचे कर्मचारी वाढू लागले. यातही आई नेहमी खेड्यातून येणार्या तरुणांना प्राधान्य देते. त्यांची राहायची व्यवस्था करायला मदत करते आणि त्यांना आय.एस.ओ प्रणालीनुसार प्रशिक्षण देते. आज तिच्याकडे जवळपास चाळीस लोक काम करतात. मार्क लॅब्सबरोबरच मार्क हेल्थ प्रॉडक्टस् सुद्धा सुरु झालं. या उपक्रमातून कनक गूळ पुण्याच्या बाजारपेठेत आला. बाजारातला गूळ सोनेरी दिसावा म्हणून शेतकरी त्यात हायड्रॉस या रसायनाचा मारा करतात. म्हणून आईमाधल्या शास्त्रज्ञ गृहिणीने कनक गूळ तयार करायची कल्पना अमलात आणली. यातही कोल्हापुरातल्या काही शेतकर्यांना तो तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. हल्ली साप्ताहिक सकाळमध्ये पुरणपोळीच्या कृतीत, 'अर्धा किलो कनक गूळ' अशी जिन्नस यादीत सूचना असते. ते बघून आईचा खूप अभिमान वाटतो. कनक गुळाच्या प्रचारासाठीदेखील आईनी मला पगार दिला होता. तेव्हा मी अभियांत्रिकीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये होते. ग्राहक पेठ, वेगवेगळी महिला मंडळं, भिशा अशा ठिकाणी मी माझं पुणेरी काकूंच्या सगळ्या खडूस प्रश्नांसाठी तयार केलेलं भाषण घोकून जायचे. आणि बहुतेकवेळा माझ्या तोंडाची भरपूर वाफ दवडूनदेखील मनाजोगता खप व्हायचा नाही. मग आम्ही प्रचारानंतर पाणीपुरी खाऊन आमचं दु:ख विसरायचो.
आईच्या कर्माचार्यांमध्ये सत्तर टक्के महिला आहेत. कनक गुळापासून ते थेट लॅबपर्यंत सगळीकडे तरुण मुली काम करताना दिसतात. आणि एखाद्या मोठ्ठ्या परिवारासारख्या सगळ्या एकमेकींना मदत करतात. आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांचे वाढदिवस साजरे होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्या मुलींना त्यांच्या मुलांसकट कुठेतरी सहलीला जायला मिळतं. महिला दिनानिमित्त मार्क मध्ये एखाद्या पाहुण्या यशस्विनीला बोलावण्यात येतं आणि सगळ्या मुलींना गुलाबाची फुलं देण्यात येतात. आमच्या अभियांत्रिकी गटातल्या चुणचुणीत मुलांनादेखील या दिवशी बक्षीस दिलं जातं.
आईचं वर्ष दिवाळीनंतर भारत दौ्र्यात तर दिवाळी आधी आंतरराष्ट्रीय दौर्यात वाटलेलं असतं. इकुम्सा या साखर संशोधनाच्या जागतिक कमिटीवर ती भारताचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे साखरेसाठी लागणार्या नवनवीन मेथड्सवर ती सतत काम करत असते.
आईबद्दल बर्याच मासिकांतून लेख लिहून आले आहेत. पण हे सगळं करताना तिची होणारी घालमेल, तिची चिंता, तिची जिद्द, तिचा साधेपणा मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलून गेला. भूतकाळातील प्रसंग सांगताना नेहमी लोक त्याला वेगवेगळ्या झालरी लावतात. कुणी "पुरुष-प्रधान व्यवसायात पाय रोवून उभी राहिलेली महिला" म्हणतात तर कुणी "यशस्वी महिला उद्योजिका" म्हणतात. पण आई मोठी होताना मात्र, 'महिला', 'उद्योजिका', 'यशस्वी' हे कुठलेही शब्द तिच्या डोक्यात नव्हते. तिच्या समोर फक्त एकच ध्येय होतं. हाती घेतलेलं काम पूर्ण करणे. जगात कुठेही वावरताना, 'मला चांगली माणसंच भेटतील' असा आत्मविश्वास बाळगायची ताकद मला आईमुळेच मिळाली.
या महिन्यात माझ्या आईचा वाढदिवस असतो. तिला तिच्या या प्रवासात माझ्या खूप खूप शुभेच्छा. तिनी कुठलही काम आनंदाने करण्याच्या मला लावलेल्या सवयीचा मला आजही पावलोपावली उपयोग होतो आहे.
-------
मूळ लेख: http://unhalyachisutti.blogspot.com/2010/09/blog-post.html
आई मोठी होत असताना..
Submitted by सई केसकर on 13 September, 2010 - 17:50
गुलमोहर:
शेअर करा
तुझ्या आईला सलाम!!
तुझ्या आईला सलाम!!
छान माहिती दिलीस तुझ्या
छान माहिती दिलीस तुझ्या आईच्या वाटचालीची. तिला खूप खूप शुभेच्छा.
खूपच प्रेरणादायी! सई, तुझ्या
खूपच प्रेरणादायी! सई, तुझ्या आईला शुभेच्छा - वाढदिवसाच्या आणि पुढील यशासाठी.
तुझे लिखाण नेहमीप्रमाणेच सुंदर!
सई - तुझ्या आईला दंडवत सांग.
सई - तुझ्या आईला दंडवत सांग.
छान दर्शन घडवलत सगळ्या
छान दर्शन घडवलत सगळ्या प्रवासाचं! केवढी धडाडी आहे अंगात.
पण आई मोठी होताना मात्र, 'महिला', 'उद्योजिका', 'यशस्वी' हे कुठलेही शब्द तिच्या डोक्यात नव्हते. तिच्या समोर फक्त एकच ध्येय होतं. हाती घेतलेलं काम पूर्ण करणे.>>>>>>> हे वाक्य खूप आवडलं. सगळ्याच्या पायथ्याची "हाती घेतलेलं काम नीट पूर्ण करणे" हेच आहे.
लेख तर छान लिहीला आहेच पण तुमच्या आई बद्द्ल वाचून खुप छान वाटलं, अंगात थोडं बळ संचारल्या सारखं वाटलं.
सई, तुझ्या आईला नमस्कार आणि
सई, तुझ्या आईला नमस्कार आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुझी आई ग्रेट आहे, लेख पण छान आहे.
माझ्या सासुबाईंचा कनक गुळच वापरण्याचा नेहमी आग्रह असतो, त्या पण अप्रत्यक्षपणे कनक गुळाचं मार्केटींग करतात म्हणायला हरकत नाही
मस्तच गं!! तुझी आई एकदम ग्रेट
मस्तच गं!! तुझी आई एकदम ग्रेट आहे. त्यांच्या एकुणच वाटचालीविषयी अजुनही जाणून घ्यायला आवडेल. छान लिहीले आहेस . खूपच प्रेरणादायी आहे.
सई, खूप छान लिहिलंय! आई
सई, खूप छान लिहिलंय! आई खरोखरंच ग्रेट आहे.
बर्याच महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीने या आर्टिकलची लिंक इ-मेलमधे पाठवली होती. आज खणून काढली आणि पुन्हा एकदा वाचली. डॉ. वसुधा केसकर तुमची आई हे आज कळलं.
सर्वप्रथम तुझ्या आईला
सर्वप्रथम तुझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!! मार्क लॅब्चं वाचुन खुप छान वाटल. त्याना त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा! तुझं लिहीण नेहमीप्रमाणेच सुंदर आणि प्रामाणिक!
@मृण्मयी, आर्टिकलची लिंक
@मृण्मयी,


आर्टिकलची लिंक दिल्याबद्दल आभारी आहे.
मी आईला नेहमी म्हणते, "तुझे आता डॉ. केसकर म्हणून मिरवण्याचे दिवस कमी आहेत. कारण आता मीपण डॉ.केसकर होणारे".
प्रतिक्रियांसाठी सगळ्यांचे आभार. आईला मी सगळ्यांच्या सुभेछा देईन!!
सई
सई, एकदम सच्चा लेख. तुझ्या
सई, एकदम सच्चा लेख. तुझ्या आईची (आणि पर्यायाने तुमच्या लॅबची) वाटचाल किती समर्पक शब्दातून आणि नेमकेपणे मांडली आहेस. तुला तुझ्या आईबद्दल वाटणारा अभिमानसुद्धा अगदि संयमित शब्दातून रेखाटला आहेस. आईचं फारच छान व्यक्तीचित्र उभं राहिलं गं. शिवाय सहसा कोणाला माहित नसलेल्या एका विषयाची पण ओळख करून दिलीस. शुभेच्छा!!
रच्याकने: हा एक छान उपक्रम नकळत घडत आहे. आपल्याला माहित नसलेल्या क्षेत्रांची, व्यवसायांची ओळख अशा लेखांतून आपसूक होत आहे. नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करणार्या माबोकरांनी असे लेख लिहून आमच्या ज्ञानात भर घालत रहावं. जसं विशाल कुलकर्णींनी त्यांच्या लेखातून अशाच एका वेगळ्या टेक्नोलॉजीची माहिती करून दिली होती.
सई खुपच छान लिहिलयसं , तुझ्या
सई खुपच छान लिहिलयसं , तुझ्या आईला खुप खुप शुभेच्छा !
अतिशय सुरेख चित्रण आईचे.
अतिशय सुरेख चित्रण आईचे. तुझ्या आईला Congrats! आणि पुढील वाटचालीकरता All the Best!
ह्या वाक्याला दुजोरा,
>>जगात कुठेही वावरताना, 'मला चांगली माणसंच भेटतील' असा आत्मविश्वास बाळगायची ताकद मला आईमुळेच मिळाली.<<
हा अनुभव मलाही आला, तो हि माझ्या आईमुळेच.
तुमची आई खरोखरंच ग्रेट
तुमची आई खरोखरंच ग्रेट आहे.....
फार छान जबरदस्त काम केलंय
फार छान
जबरदस्त काम केलंय !!! चांगली प्रेरणादायक माहिती दिलीत.
डॉ. ना शुभेच्छा!!!!
एकदम मस्त वाटले हा लेख
एकदम मस्त वाटले हा लेख वाचतांना.
तुझी आई खरच ग्रेट आहे. त्याना
तुझी आई खरच ग्रेट आहे. त्याना खुप खुप शुभेच्छा.. आणि तुला पण
सई अतिशय सुंदर लिहिल आहेस. आई
सई अतिशय सुंदर लिहिल आहेस. आई मोठी होताना लेकीच्या नजरेतुन पहाणे खरच छान वाटलं. तुझ्या आईचा आत्मविश्वास , ध्येय फारच ग्रेट आणि खुप प्रेरणादायी. तीने तुला दिलेलं काम आणि जबाबदारी सुद्धा फार दुरदृष्टीने दिली होती.
तुझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सई, खुप सुरेख लिखाण. तुझ्या
सई,
खुप सुरेख लिखाण. तुझ्या आईची वाटचाल खुप प्रेरणादायी आहे. त्यांना पुढच्या वाटचालिसाठि शुभेछ्छा! आणि वाढदिवसाच्याहि!
खूप छान, सई. 'लोकसत्ता' मधला
खूप छान, सई.
'लोकसत्ता' मधला हा लेख: http://www.loksatta.com/daily/20070414/ch05.htm
थोर आहेत तुझ्या आई, आणि
थोर आहेत तुझ्या आई, आणि तुझ्या लेखनातून ठिकठिकाणी डोकावणारे बाबाही. खूप छान वाटलं वाचून.
सिनियर स्त्रियांने सगळ्या डगरींवर हात ठेऊन कसेकाय करियर केले आणि आम्ही कुठे आणि का कमी पडतो हे काही कळत नाही .
खरेच थोर काम!! सिनियर
खरेच थोर काम!!
सिनियर स्त्रियांने सगळ्या डगरींवर हात ठेऊन कसेकाय करियर केले आणि आम्ही कुठे आणि का कमी पडतो हे काही कळत नाही .>> खरय.मला तर माझ्या कामाला करियर म्हणायचे का नुसती पोट्यापाण्याची सोय हा प्रश्न पडतो असे काही वाचले ,पाहिले की
सई, छान लिहिलं आहेस. आईचे
सई, छान लिहिलं आहेस. आईचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
मस्त सई . तुमचे अभिनंदन आणि
मस्त सई . तुमचे अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा..
सई, तुझे आणि आईचे अभिनंदन!
सई, तुझे आणि आईचे अभिनंदन! खरच कठोर परिश्रम, ध्यास आणि आत्मविश्वासानेच हे साध्य झाले आहे. तुझ्या आईला मनापासून सॅल्यूट!
वा! अतिशय प्रेरणादायी! आईला
वा! अतिशय प्रेरणादायी! आईला मनापासून शुभेच्छा!
कनक गूळ ग्राहक पेठेत कायम असतो.. जेव्हापासून तो मिळायला लागला आहे, तेव्हापासून आई तोच गूळ आणते.. त्याची उद्गाता तुझी आई आहे, हे वाचून मस्त वाटले
सई खूप खूप आवडलं. तुझ्या आईचं
सई खूप खूप आवडलं. तुझ्या आईचं अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छासुद्धा.
सई, ग्रेट आहे तुझी आई! तुझ्या
सई, ग्रेट आहे तुझी आई! तुझ्या आईचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
लिहिलंही छान आहेस.
छान लिहीलंयस सई. आवडलं
छान लिहीलंयस सई. आवडलं
तुझ्या डॉक्टर आईला आणि होऊ घातलेल्या डॉक्टरलाही अनेक शुभेच्छा
सई तुझे लेख वाचताना त्यातला प्रामाणिकपणा भावतो. फक्त अगदी छोट्या छोट्या शुद्धलेखनाच्या चुका आणि काही टायपिंग एरर्स टाळल्यास तर तुझे लेख वाचताना अजून बहार येईल.
मस्तच सई. आईला मनापासून
मस्तच सई. आईला मनापासून शुभेच्छा !!!
Pages