माझी अनेक गोष्टींमुळे चिडचिड होते. त्यातली एक मुख्य म्हणजे लोकं जेव्हा स्वतः मध्ये अगदी सहजसाध्य असलेली सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, सरकार, व्यवस्थापन, पोलीस – ही यादी न संपणारी आहे – यांना दोष देत बसतात.
अर्थात उपरोल्लेखित घटकांचा काहीच दोष नसतो असं नाही, पण एक बोट त्यांच्याकडे असताना स्वतःकडे असलेली तीन बोटं मात्र दुर्लक्षिली जातात.
'यथा राजा तथा प्रजा' अशी म्हण आहे. पण ती बदलून 'यथा प्रजा तथा राजा' अशी करायला हवी असं हल्ली प्रकर्षानं वाटू लागलंय. आपल्या समाजाचं नैतिक अध:पतन इतकं झालंय की आपल्याला हे असले राज्यकर्ते मिळाले कारण आपलंच नाणं खोटं होतं म्हणून हे पटू लागतं.
तर, ह्याच विषयाशी संबंधीत माझी ही अवांतर चिडचिड.....
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
चिडचिड क्रमांक एकः गुन्हेगार आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
(१) संजय दत्त हा विविध आरोपांखाली मुंबई बाँबस्फोट खटल्यात अडकला आणि निकालात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वगैरे आरोपांखाली दोषी आढळला. त्यानंतर सामान्य जनतेने त्याच्यावर बहिष्कार घालायचं सोडून संजूबाबा संजुबाबा म्हणून डोक्यावर घेतलं, त्याचे अनेक चित्रपट लोकांनी उचलून धरले. सर्वसामांन्यांकडून देशद्रोह्याला हा असा पाठिंबा?
सायरा बानूला लगेच आपल्या धर्मभगिनीच्या मुलाचा पुळका आला आणि तिने "इस लडके को इतना पर्सिक्युट किया गया है...." असे एका वृत्तवाहिनीवर तारे तोडले ते वेगळंच. शिवाय तो सहा वर्षांसाठी तुरुंगात गेल्यास तो काम करत असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांच कसं कोट्यावधींच नुकसान होईल वगैरे बकवास हिंदी चित्रपट क्षेत्रातील तथाकथित विद्वानांनी सुरु केलीच. म्हणजे ह्यांनी गुन्हा केला त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, तुम्हाला त्या गुन्ह्याबद्दल कायद्याप्रमाणे शिक्षा होणं महत्वाचं नाही, पण तुमच्या नसण्यानं किती आर्थिक नुकसान होईल आणि ते टाळता कसं येईल किंवा भरून कसं काढता येईल ते महत्वाचं! बाकी देश, कायदा, वगैरे सटरफटर गोष्टी नका हो सांगू यांना!!
(२) "हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्या महिलांच्या तोंडून हे असले उदगार? हरे राम!
(३) उपरोल्लेखित डॉन महाशयांची ठेवलेली बाई म्हणजेच रखेल म्हणजेच हिंदी चित्रपटातील दुय्यम नटी मोनिका बेदी हिचा एका रिअॅलिटी शो मध्ये सहभाग आणि एका दिवंगत राजकीय नेत्याच्या मुलाने तिच्याबरोबर केलेली सलगी वजा लगट - अनेक लोकांनी हाही कार्यक्रम चवीने बघितला आणि ट्रेन आणि बस मध्ये, नाक्यावर वगैरे कोण कसं दिसलंय याच्या जोरदार चर्चा झडल्या. ह्या कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. मग मालिका निर्मात्यांनी जर "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद केल्यास त्यात चूक काय?
(४) पुढे ह्या आणि अशा अनेक प्रकारे शेण खाल्लेल्या तसंच मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे पहिल्या बायकोने घटस्फोट दिलेल्या या नेतापुत्राचं एका वाहिनीनं चक्क स्वयंवर मांडलं. त्याचा हा इतिहास ठाऊक असूनही देशभरातून मुलींची ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झुंबड उडाली. कार्यक्रम सुरु असतानाही ह्या दिवट्याचे वेडेचाळे सुरुच. कार्यक्रम त्या वाहिनीवर सुरु झाल्यावर चक्क गगनभेदी टी.आर.पी.
या स्वयंवरात 'निवडलेल्या' दुसर्या बायकोलाही मारहाण आणि शिवीगाळ झाल्यावर तर कहर झाला. खेळ, शेती, हवामान, भाववाढ, पाऊस, महागाई, जागतिक घडामोडी वगैरे सारख्या बातम्या तीन-चार दिवस चक्क दुय्यम ठरल्या. पुढे साहेबांनी बायकोबरोबर प्रभादेवीला सिद्धीविनायक दर्शन कसं घेतलं, आम्ही आता सुखाने संसार कसा करू वगैरे टँण टँण टँण पद्धतीने मुलाखती दिल्या. हेही सगळं लोकांनी उत्साहाने पाहिलं.
(५) हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खानला एका दुर्मिळ जातीच्या प्राण्याची शिकार केल्याबद्दल अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!!
काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं. नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअॅलिटी शो यामधून झळकला आणि लोकांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला.
या सगळ्यात मिडीया कसा पिसाटल्यासारखा करत होता त्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.
तुरुंगात असताना सलमानने कुठली भाजी खाल्ली, त्याच्या नेहमीच्या आवडी-निवडी काय ह्याची चवीने अक्षरशः दिवसभर चर्चा सुरू होती. संजय दत्त तुरुंगात कसा सुतारकाम शिकला हेही समजलं. तो तुरुंगात किती शांत असतो वगैरे आवर्जून सांगितलं गेलं.
पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी ह्या घटिंगणांवर बहिष्कार घालायचं सोडून त्यांना एखाद्या महात्म्याप्रमाणे वागणूक द्यावी हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्यांना बहिष्काराच्या मार्गाने धडा शिकवायचा सोडून त्यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची ह्याला काय म्हणावे?
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
चिडचिड क्रमांक दोनः लोका सांगे ब्रह्मज्ञान...
मला काही दिवसांपूर्वी आंतरजालावरून फिरत फिरत एक विपत्र आलं होतं, त्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या त्या गुन्ह्याप्रमाणे होणार्या दंडाची रक्कम किती याची यादी दिली होती. म्हणजे सिग्नल तोडल्यास किती दंड, नो एन्ट्री मध्ये शिरल्यास किती दंड, गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास किती दंड, वगैरे. कारण अर्थाच की पोलीस वाट्टेल तो दंड आकारतात आणि पावती देत नाहीत. ते विपत्र कितीही उपयोगी असलं तरी मला अंमळ गंमतच वाटली. कारण तोपर्यंत आणि हा लेख लिहीपर्यंत वाहतूकीच्या नियमांचं पालन कसं करावं यासंदर्भात एकही विपत्र असं आंतरजालावर फिरताना आढळलं नाही किंवा मला कुणी पाठवलं नाही.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
चिडचिड क्रमांक तीनः स्वतःकडे तीन बोटं
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कंपनीमधला किस्सा ऐकण्याचा योग आला. कंपनी व्यवस्थापनाने 'ओपन फोरम' सभा आयोजित केली होती. त्यात काही कर्मचारी 'कँटीनमध्ये असणारा स्वच्छतेचा अभाव' या विषयी तावातावाने बोलत होते.
अॅडमिनच्या व्यवस्थापक साहेबांनी प्रश्न केला "नक्की कसली अस्वच्छता असते?"
जी उत्तरं आली त्यात प्रामुख्याने कँटीनमध्ये अर्धवट खाल्लेल्या बिस्किटांचे पुडे, शीतपेयांचे रिकामे कॅन, चॉकलेट वगैरेंचे इतस्ततः पडलेले कागद, सिगरेटची थोटके, इत्यादींचा समावेश होता. अर्थातच कँटीन प्रशासनाकडून हा कचरा कसा वेळेवर साफ केला जात नाही ही मु़ख्य तक्रार होतीच.
"ठीक आहे, मी संबंधितांना सूचना देतो," व्यवस्थापक उत्तरले, "पण मला एक सांगा, हा कचरा कोण करतं?"
उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु झाली. आता कुणीही उत्तर द्यायला पुढे येईना.
"मी सांगतो ना, तुम्हीच," व्यवस्थापकांनी बाँब टाकला.
"कॅंटीनमध्ये कोण खातं? तुम्ही." आता व्यवस्थापक साहेबांचा आवाज किंचित चढला होता.
"कॅंटीनमध्ये योग्य जागी कचर्याचे डबे ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग करण्याऐवजी टबलांवर, खुर्च्यांवर, आणि जमिनीवर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी कोण टाकतं किंवा तशाच ठेवतं? तुम्ही."
"सगळेच असं करतात असं नाही, पण जे करत नाहीत ते इतरांना हे करण्यापासून परावृत्त का करत नाहीत? ऐकलं नाही तक्रार/सुचना करण्यासाठी पत्रपेटी ठेवलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष कोण करतं? तुम्ही."
पुढे काही सुधारणा झाली की नाही ते समजलं नाही, पण स्वच्छतेबद्दल कंपनी व्यवस्थापनाला जाहीर दोष देणार्यांची तोंड निदान तेव्हा तरी बंद झाली.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
तर माझी चिडचिड होण्याची ही काही कारणं. समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थेला कायम दोष देणार्यांविषयी तुमचा काय अनुभव आहे?
मंद्या चांगलं
मंद्या चांगलं लिहिलंयस...
खरंतर हा विषय फार ब्रॉड आहे आणि त्याला चिक्कार वेगवेगळे पैलू आहेत. चिडचिड तर पदोपदी होते, वाहतुक, लाच, पाणि, वीज, सरकारी कोणतेही काम (पासपोर्ट्/रेशनकार्ड, गॅस इ.) सर्वंच ठिकाणी आपण लाच देण्याची सवय लावून ठेवली आहे. पण लोकांना कामं पटापट करून हवी असतात त्यासाठी स्वत:ची तत्व बाजूला ठेवून थोडे पैसे सोडायला तयार असतात, पण सर्वंच लोकांना ते जमेल असं नाही, आणि पटेल असं ही नाही.. तरिही घालून दिलेल्या अलिखित नियमाप्रमाणे सर्वांना सरसकट ते पाळावे लागतात.. ही माझी चिडचिड
मंद्या चिडचिड तर होतेच. कुठे
मंद्या चिडचिड तर होतेच. कुठे कुठे स्वतःला त्रास करुन घेणार?? डोंबिवली फास्ट बघितलास?? काय होत शेवटी???
मस्त मंदार... छान टिपलय सगळ
मस्त मंदार... छान टिपलय सगळ !
तुमच सगळ लिखाण वाचायचय एकदा... मेनली ते कोकणवरच....
प्रचंड चिडचिड
प्रचंड चिडचिड
दक्शे, बरोबर. आपण बरोबर
दक्शे, बरोबर. आपण बरोबर अस्तानाही समोरच्याला फुकट नि xक मारत पैसे द्यावे लागतात त्याचि चिडचिड होते... सरकारी लोक तर नुस्ते हराम्खोरा सार्खे वागतात. रस्त्यावरचा भिकारी परवडला त्या पेक्शा...
माझी चिडचिड ... मी सहसा चिडत
माझी चिडचिड ...
मी सहसा चिडत नाही ...
उगाच कोणी फिलोसोफिकल डेस द्यायला लागंलं ......कुठे तरी इन्फेरीयोरीटी कॉम्प्लेक्ष द्यायला लागलं की माझं टाळंकं सरकतं ...:राग:
(एकदा का चिडलो के कोणाला माझ्या १०० मीटर रेडीयस मधे फिरकु देत नाही .( अॅक्टुअली माझी समजुत घालण्यात अर्थ नाही हे घरच्यांना कळुन चुकलंय ...)
सरळ गाडी काढतो ..बस्स्टेशन वर जातो ...मस्त चहा सिगरेट मारतो .....(तिथे अगदी रात्री ३ लाही सगळे मिळते...)..की परत नॉर्मल !!!)
या गोष्टींची चीड येतेच.
या गोष्टींची चीड येतेच. आणखीही कित्येक मुद्दे आहेत ज्यावर आपण प्रत्येकाने कारवाई केली पाहिजे. त्यासाठीच मी रामदेवबाबांचा भक्त आहे.
लेख आवडला, पद्धत आटोपशीर आहे,
लेख आवडला, पद्धत आटोपशीर आहे, पण छान लिहलंत.
आभार.
लेख आवडला... 'यथा राजा तथा
लेख आवडला...
'यथा राजा तथा प्रजा' अशी म्हण आहे. पण ती बदलून 'यथा प्रजा तथा राजा' अशी करायला हवी असं हल्ली प्रकर्षानं वाटू लागलंय. आपल्या समाजाचं नैतिक अध:पतन इतकं झालंय की आपल्याला हे असले राज्यकर्ते मिळाले कारण आपलंच नाणं खोटं होतं म्हणून हे पटू लागतं.
हे अगदी खरे आहे. आपल्या आजुबाजुला जे दिसतेय ते आपलेच प्रतिबिंब आहे. संजुबाबा आणि सल्लुभय्याचे नंतर आलेले चित्रपट तुम्हीही पाहिले असतीलच.. मी तरी पाहिलेत.
म्हणुन चिडचिड करणे सोडुन द्या, तब्येतीला चांगले नाही. त्यापेक्षा आपल्याला जे जिथे जेवढे जमतेय तेवढे करायचे...
मंदार.. तुझी होणारी सात्विक
मंदार.. तुझी होणारी सात्विक चिडचिड समजली.. भारतात आलं कि माझंही हमखास एका आठवड्यात कोणाशीतरी भांडण,वादावादी होते..ज्यादा पैसे दिल्याशिवाय झाडूवाला ( ते त्याच्या कामांत इन्क्ल्यूड असलं तरी)टेरेस झाडायला येत नाही.. भाजीवाले,ऑटो-टॅक्सीवाले, वॉचमन,झालच तर कणीस,भेळ विकणारे अतिशय गुर्मीत असतात.. उर्मट उत्तरं देतात्..आपल्यावर केवळ कृपा म्हणून त्यांनी माल विकायला आणला असतो .. पोलाइटनेस चं तर नांवच टाकलय सगळ्यांनी..
आताच्या मीटरजॅम मधे मीपण स्वखुशीने सहभाग घेतला होता.. त्या एकाच दिवशी त्यांच्यावर सूड घेतल्याचा आनंद उपभोगला
बाकी मीडिया..बापरे त्या भयानक बातम्या आणी बातम्या सांगणारे त्याहून भयानक..
वाहतूक,खड्डेरूपी रस्ते.. श्या!!! कशाकशाबद्दल चिडायचं रे... आपल्यालाच थोड्या दिवसांनी हाय बीपी च्या गोळ्या घेणे सुरू करावं लागेल
कालच आमची दिडशे माणसांनी
कालच आमची दिडशे माणसांनी भरलेली पि.एम्.पी.एम एल अचानक रस्त्यात बंद पडली. मी मुद्दाम फोन फिरवुन तक्रार केली दिडशे लोकांपैकी किमान २५ लोकांना कळेल इअतक्या आवाजात. फक्त एका महिलेने हा नंबर कोणता जाणुन घेऊन हा नंबर माझ्याकडुन घेतला. होते होते रोजच चिडचिड होते. शांतपणे कृतीयोजना करण्यावर हल्ली भर ठेवलाय. याने रक्तदाब वाढत नाही.
वाचतोय, प्रतिसादाकरता जागा
वाचतोय, प्रतिसादाकरता जागा राखुन ठेवतोय. सविस्तर सवड काढुन लिहीन.
विशाल काय वेगळी चिडचिड आहे का
विशाल काय वेगळी चिडचिड आहे का तुझी?? नै सविस्तर प्रतिसाद म्हणुन म्हणल
माझी चिडचिड..... पिसाटलेला
माझी चिडचिड.....
पिसाटलेला मिडिया आणि त्यावर 'ब्रेकिंग न्यूज' च्या नावाखाली दाखवण्यात येणार्या अत्यंत सुमार बातम्या....
मंदार, म्हणून तर 'कंट्रोल कंट्रोल' रागावर
मंजिरी, अगदी अगदी धन्यवाद
मंजिरी, अगदी अगदी
धन्यवाद लोक्स
माझी चिडचिडः १. 'सूर्याची
माझी चिडचिडः
१. 'सूर्याची पिल्ले" चं तिकिट काढायला शिवाजीमंदिरच्या बाहेर रांगेत उभे होते तेव्हा - मागचा माणूस फार जवळ उभा होता. पुढची रांग सरकायचा अवकाश, मी सरको अथवा ना सरको, हा दोन पावलं पुढे यायचा. शेवटी एकदा वळून रागाने पाहिलं तेव्हा मागे झाला. असेच अनुभव बायकांचेही येतात. पर्सनल स्पेस हा प्रकार आपल्या लोकांना कधी कळणार? रांगेत २ पावलं पुढे जाऊन काय मिळतं?
२. मी लिफ्टच्या रांगेत प्रथम उभी. लिफ्ट येताच आतल्या लोकांना बाहेर येऊ द्यायला मी थांबते. मला ओलांडून मागच्या २ बायका - शिकल्यासवरलेल्या दिसणार्या - आत जातात. रागारागाने त्यांच्याकडे बघून मी आत जाते. काही बोलावं तर आपल्यालाच त्रास. इथे मॅनर्स दाखवून काही उपयोग आहे का? का मी पण त्यांच्यासारखंच वागायचं?
३. सिग्नलवर पादचार्यांच्या चालण्यासाठीची खूण येईतो मी शांतपणे थांबलेली. मागून एक आजोबा येतात आणि खुशाल धावणार्या गाड्यांना हात करून रस्ता क्रॉस करतात. ५ मिनिटं थांबावं असं ह्या so-called senior citizen ला वाटू नये?
४. फूटपाथ असताना लोक रस्त्यावरून चालतात आणि गाडीने हॉर्न दिला की रागारागाने बघतात. अश्याच एका बाईला माझ्या भावाने एकदा उतरून "फूटपाथ माणसांसाठी आहे आणि रस्ता गाड्यांसाठी" असं सुनावलं होतं.
५. ४-५ लोक कोंडाळं करून फूटपाथच्या मधोमध गप्पा मारत उभे. गर्दी आजूवाजूने वाट काढून जातेय. मी अश्या वेळेला मुददाम त्यांच्यामागे जाऊन जोरात "एक्सक्यूज मी" म्हणून ओरडते आणि त्यांना बाजूला व्हायला लावते. वर जाताना "काय मॅनरलेस लोक आहेत" असाही शेरा मारते. ते सुधारणार नाहीत मला माहित आहे. पण तेव्ह्ढीच चिडचिड कमी होते.
६. हिंदी चित्रपटातल्या आयटम सॉन्गजवर अचकट-विचकट नाच करणारी छोटी मुलं. ह्यांच्या आईवडिलांना शोधून काढून त्यांच्या कानाखाली आवाज काढावासा वाट्तो.
रोज माझी आई माझ्या मुलाची
रोज माझी आई माझ्या मुलाची दृष्ट/द्रीष्ट काढते तेव्हा... (पोरगं झोप आली की कायमच किरकिरतं)
विज्ञान शाखेची उच्चशिक्षीत बायको नवस न फेडल्याने बाळाला ताप आला म्हणते तेव्हा... (दात येत असतात)
घरातला आवशीदाचा ढीग बघून... (सबकुछ है तरीपण आरोग्य का नाही राखता येत नाही)
सकाळी सात नंतरही झोपलेली व्यक्ती बघून...
खूप मोठी लिस्ट आहे. आता सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करायला शिकतो आहे.
छान लेख मंदार.
पूर्वी माझी चीडचीड व्हायची,
पूर्वी माझी चीडचीड व्हायची, आता होऊ देत नाही!
माझ्यापुरतं मला वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्यात जे जे चान्गल करता येईल, ते ते करत रहातो!
बाकी दुनियेला फाट्यावर मारतो!
ह.बा., तुमच्यासारख्यान्च्या
ह.बा., तुमच्यासारख्यान्च्या पहिल्या ३ वाक्यान्कडेबघुनही माझी चीडचीड व्हायचीपूर्वी! हल्ली होऊ देत नाही
(ती तिन वाक्ये बघितल्यावर एकच सान्गावस वाटतं, एकदा कुन्डली दाखवुन कोणती जननशान्त वगैरे लागलेली आहेका ते बघुन घ्या नि करा इमानेइतबारे! )
रोज संध्याकाळी ऑफिसच्या
रोज संध्याकाळी ऑफिसच्या बसमधून उतरलं की मी सिग्नल लाल होण्याची वाट पहात थांबते, सिग्नल लाल होतो तरिही सायकल पासून ते कार पर्यंत काही गाड्या ह्या सिग्नल तोडून पुढे जातच राहतात... लाल सिग्नल झाल्यावर झेब्रा क्रॉसिंग चा स्पेस हा पादचार्यांसाठी आहे त्यांना रस्ता ओलांडू द्यावा इतकं या गाडी हाकणार्यांना कळू नये?
दुसरी बाब पण सिग्नलचीच.. हिरवा लागतो, यलो लागलो, लाल होण्याच्यावेळी बंद पडतो, लोकांचं लॉजिक इतकं पूअर असतं की बाकि दोन लागतायंत त्या अर्थी ऑफ झाला की आपण थांबायचं आहे इतकं कळू नये लोकांना?
आपले उपमहापौर श्रीयुत प्रसन्नदादा जगताप यांचं ऑफिस आमच्या तानाजी मालुसरे रस्त्यावर आहे. व्यक्तिश: तो मनुष्य खुप डाऊन टू अर्थ आणि चांगला वाटला मला. पण त्याच्या जीवावर रस्त्याच्या बरोबर मधोमध कार घेऊन उभं राहणार्या लोकांना काय म्हणावं? त्याहूनही चिड आणणारी गोष्ट.. बाईक साईडस्टँड ला लावून त्याचं हँडललॉक राईट साईड ला करणे.. यामुळे जास्त्तीत जास्त स्पेस खाल्ला जातो पार्किंगमधला...
३१ डिसेंबर.. चं आपल्या मराठी कॅलेंडर मध्ये शून्य महत्व आहे. पाडव्याच्या आदल्या दिवशी सरत्या वर्षाला किती जण निरोप देतात? पाडव्याला किती जण तो आपला सण म्हणून साजरा करतात? याउलट ३१ डिसें. ला अगदी नको इतकी दारू पिऊन वाट्टेल तितके पैसे देऊन कोणत्या तरी क्लबाचे कपल तिकिट काढुन भरमसाठ पैसे खर्चून, नाच धिंगाणा करून कसला आनंद मिळवतात लोक? त्याच दिवशी खूपसे दारू प्यायलेले स्वत:च्या कर्माने हातपाय मोडून घेतात किंवा मरतात शिवाय त्यांच्याच चुकिमुळे कित्येक निष्पाप पादचारी ही बळी पडतात
हिंदी चित्रपटातल्या आयटम
हिंदी चित्रपटातल्या आयटम सॉन्गजवर अचकट-विचकट नाच करणारी छोटी मुलं. ह्यांच्या आईवडिलांना शोधून काढून त्यांच्या कानाखाली आवाज काढावासा वाट्तो.>>>>>>
अगदी अगदी स्वप्ना.. प्रचंड चिडचिड!
वाचते आहे मंदार! माझी चिडचिड
वाचते आहे मंदार!
माझी चिडचिड : आमच्या घराच्या आजूबाजूला ''सांस्कृतिक कोंडाळे'' आहे. भर चौकापासून जवळच असल्यामुळे सर्व सण, जयंत्या, पुण्यतिथ्या, पवित्र दिवसांना आमच्यावर पहाटेपासून ते रात्रीपर्यंत सांस्कृतिक गायन-वादन-पठणाचा लाऊडस्पीकर्समधून मारा होत असतो. अधून मधून भाषणेही झडत असतात. पूजा-यज्ञ-मंत्रपठण वगैरेही सगळं लाऊडस्पीकर्समधून ---- देवीचा गोंधळ, जागरण.....तेही लाऊडस्पीकर्समधून! ठो ठो करत असतात नुसते!
बरं, निवडणुका आल्या की तर विचारायलाच नको! घोषणा देत रात्री अपरात्री घोळक्याने, बाईक्स - ओपन जीप्समधून हिंडणारे कार्यकर्ते सर्रास दिसतात व त्यांचा गदारोळ ऐकावा लागतो.
गणपती, नवरात्रात तर सारा रस्ता आपलाच आहे अशा थाटात ऐसपैस मांडव घालणे, मध्यरात्रीपर्यंत ढँट्ढॅं आवाजात वाट्टेल ती गाणी वाजवणे, भल्या पहाटेपासून भसाड्या आवाजात पूजा-मंत्र-आवर्तने वगैरे ह्यांचा कळस होतो.
राजकीय पुढार्यांचा वरदहस्त असल्यामुळे येथील कार्यकर्त्यांना पोलिसही ''डिस्टर्ब'' करत नाहीत. मी आपली दर वेळी रात्रीचे १० वाजून गेले व तरीही लाऊडस्पीकर्स ठणाणा करत असले की इमाने इतबारे पोलिस कंट्रोल रूमला फोन करून त्या लोकांवर अॅक्शन घेण्याची विनंती करते. पोलिसांची गाडी थोडा वेळ गस्त घालायला येते, तेवढ्यापुरता आवाज कमी/ बंद होतो. गाडी गेली की पुन्हा धिंगाणा चालू!!! वर्षानुवर्षे हेच दृश्य!! संस्कृतीच्या नावाखाली हा टाहो कशासाठी???
मंजिरी सेम पिंच .
मंजिरी सेम पिंच .
विविध मंडळांतले हे सो कॉल्ड
विविध मंडळांतले हे सो कॉल्ड भक्त (???) लोकांकडून धाकधपटशा करून पैसे मिळवतात.. कमीत कमी पैसे देवावर आणि जास्तीत जास्त पैसे ढोल, स्पिकरच्या भिंती, गलिच्छ आणि आचकट विचकट (द्वैर्थी) गाण्यांच्या सीडीज, विसर्जनाच्या दिवशी रोषणाई, फटाके आणि रात्रभर नाचण्यासाठी एनर्जी देणारी दारू यांवर खर्च करतात. आपला गणपा हे सगळं करा म्हणतो का कधी?
आत्ताच समजलं की इथे आमच्या ऑफिसच्या एरिया मध्ये जितक्या कंपन्या आहेत त्यांना सर्वांनाच हा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. इथे लोकल पब्लिक फार जबरदस्तीने विविध प्रकारची कॉन्ट्रॅक्ट्स जबरदस्तीने मिळवायचा प्रयत्न करतंय. कालंच इथला एक आमदार येऊन आमच्या अॅडमिन मॅनेजरला धमकी देऊन गेला की आता गोड बोलणी बास अमुक ढमुक कॉन्ट्रॅक्ट हवंच, नाहीतर बाहेर भेटू... आमच्या कडे हाऊसकिपिंगचा मॅक्झिमम स्टाफ हा लोकल आहे, न सांगता दांड्या मारणे, कामाच्या वेळेत टेरेसवर जाऊन पत्ते खेळत बसणे, कामचुकारपणा करणे, सुपरवायझर ला हातपाय तोडण्याच्या धमक्या ... कुठवर चालणार हे?
ट्रान्स्पोर्ट चे कॉन्ट्रॅक्ट मिळावे म्हणून ही बरेच प्रयत्न झाले होते, आमच्या केपीओ च्या जास्तीत जास्त गाड्या ह्या इथल्या लोकल व्हेंडरच्या आहेत. त्यांनी कोणतीही अघोरी अॅक्शन घेण्या आगोदर आम्ही कॉन्ट्रॅ़क्ट देऊन टाकले होते, पण कॅपजेमिनी च्या बसेस एमआयडीसीच्या बाहेरच थांबवून ठेवल्या होत्या..
well said मंदार! हेच परवा
well said मंदार!
हेच परवा रैना म्हणाली "पीपल गेट वॉट दे डिजर्व'
ह.बा., तुमच्यासारख्यान्च्या
ह.बा., तुमच्यासारख्यान्च्या पहिल्या ३ वाक्यान्कडेबघुनही माझी चीडचीड व्हायचीपूर्वी!????
का?
एकदा कुन्डली दाखवुन कोणती जननशान्त वगैरे लागलेली आहेका ते बघुन घ्या नि करा इमानेइतबारे!
तुम्हाला जमत असेल तर तुम्हीच बघा की. सांगा काय काय माहिती हवी आहे. मला तर माझी रासही कन्फर्म माहिती नाही. मिथून आहे असे काकानी (गावातल्या) सांगितलेले. तुमच्यासारखा एकजण वृषभ आहे म्हणाला (मला वाटलं रागाच्या भरात मला 'बैला' असे म्हणायचे असेल त्याला)
जाऊदे गंमत सोडा. का पटत नाही तुम्हाला माझी तीन वाक्य? एक माहिती देऊन ठेवतो.... मी देव मानतो. अगदी मनापासून.
मंदार छान लिहीले आहे. मी पण
मंदार छान लिहीले आहे. मी पण एकेकाळी वरिल सर्व प्रकारावर चिडायचो... आता 'प्रमाण' कमी झाले आहे, अजुन काही वर्षांनी अंगवळणी पडेल.
मंदार, माझ्या आयूष्याने मला
मंदार,
माझ्या आयूष्याने मला एक शिकवलय, चिडचिड करुन काहिच होत नाही (आपल्यालाच त्रास होतो) त्यापेक्षा जिथे शक्य असेल तिथे, थेट कृति करणे योग्य असते, आणि मी ति करतोच.
आणि आपण विवेकानेच वागायचे, हा नियम मी कधीच मोडत नाही. मिडियामधल्या मूर्खपणाला, त्याला प्रतिसाद न देणे, हे तर आपण करु शकतो ना ?
लिंबुकाका, माझ्या ज्योतिष
लिंबुकाका,
माझ्या ज्योतिष शिकवणार्या सरांनी त्याच फी मध्ये एक सल्ला दिला होता. गरज नसताना आपल्याला ज्योतिष समजत अस बोलु सुध्दा नये. ज्याच त्याला भोगु द्याव आपल्या __च काय जात?
मी सुध्दा हा सल्ला विसरुन चिडचिड केली ते पाहिलच असेल आपण.
छान लेख! मंदार्....पण मी नंतर
छान लेख! मंदार्....पण मी नंतर जरा सविस्तर प्रतिसाद देइन!
Pages