हितगुज दिवाळी अंक २०१०- घोषणा

Submitted by संपादक on 24 August, 2010 - 23:39

नमस्कार मायबोलीकर रसिकहो,

दरवर्षी हितगुज दिवाळी अंकातून आपण काही आगळेवेगळे देण्याचा आवर्जून प्रयत्न करतो. शब्ददिंडीच्या या उज्ज्वल परंपरेनुसार, यंदा आम्ही घेऊन आलो आहोत 'चार संकल्पनांवर आधारित अंकाचा प्रस्ताव'.
या चारही संकल्पनांची आपण विस्तृत ओळख करून घेऊ या!

poster_updated.png

१. निसर्गायण

आंतरराष्ट्रीय जैववैविध्य वर्षानिमित्ताने ही संकल्पना योजिली आहे. निसर्ग आणि माणसाच्या परस्परसंबंधांवर आधारित कुठल्याही पैलूंवर आपण साहित्य पाठवू शकता. काय म्हणता, नाव ऐकून चक्रावलात? अहो, ऐकून तर घ्या नीट. या संकल्पनेवर आपण कशा प्रकारे काम करू शकता, याची काही उदाहरणं:
- निसर्गाशी जोडली गेलेली माणसाची नाळ यावरील कथा/कविता/ललित/वैचारिक लेख, नैसर्गिक जीवनपद्धतीचा सहज अवलंब आणि प्रयोगांचे अनुभव.
- साहित्य/कविता/कलाकृती यातून डोकावणारी निसर्गसोहळ्याची वर्णनं.
- दर्‍याखोर्‍यारानांतल्या भ्रमंतीचे सचित्र अनुभव.
- विराट नैसर्गिक आपत्तींचे व्यक्तिगत अनुभव.
- कुठल्याही निसर्ग प्रकल्पांची ओळख, पर्यावरणसंवर्धनातील कसल्याही कार्यात व्यग्र असलेल्या व्यक्तींशी संवाद, जल/घनकचरा व्यवस्थापन, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समस्या.
- पारंपरिक हस्तकलेतील/ वस्त्रकलेतील/ चित्रकलेतील प्राणी, पक्षी, निसर्गातून आलेली प्रतीकं.
- आपल्या राहत्या देशातील जैववैविध्याचे नमुने, आपली आवडती झाडं निगुतीने जोपासण्याचे अनुभव.
- लहान मुलांसाठी सृष्टीच्या गोष्टी.


२. वेगळ्या वाटा, नवी क्षितिजे

या संकल्पनेअंतर्गत आपण स्वतः अथवा आपल्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीने निवडलेल्या काहीश्या वेगळ्या वाटांचे अनुभव पाठवू शकता. या वेगळ्या वाटा केवळ व्यावसायिक, शैक्षणिकच असाव्यात असे नाही, एखादा वेगळा छंद जोपासण्याचीही वेगळी वाट असू शकते, एखादा धाडसी निर्णय असू शकतो, एखादे अजून पूर्णत्वात न आलेले पण उराशी धरलेले असे वेगळ्या वाटेचे स्वप्नही असू शकते, एखादा वेगळ्या वाटेवरचा प्रवासही असू शकतो. त्यातील बरेवाईट, कडूगोड, हृद्य-मासलेवाईक अनुभव कथा/काव्य/ललित/ वैचारिक/विनोदी स्वरुपातही लिहू शकता किंवा वेगळ्या वाटा शोधलेल्या व्यक्तींशी संवाद साधू शकता किंवा आपल्या आगळ्यावेगळ्या छंदाविषयी एक छोटी दृकश्राव्यफीतही पाठवू शकता.

३. रंग उमलल्या मनांचे

आंतरराष्ट्रीय युवा वर्षाचे औचित्य साधून ही 'तरुणाई विशेष' संकल्पना घेऊन आलो आहोत. टवटवीत, उत्फुल्ल, प्रीतरंग हळुवार हाताने उलगडणार्‍या कथा/कविता आपण पाठवू शकता. 'उमलत्या' मनाचे तळ्यात-मळ्यात असणे किंवा 'गद्धेपंचविशीचे' साहसी, वेचक-वेधक अनुभव खुसखुशीत शैलीत शब्दबद्ध करू शकता. राजकीय/सामाजिक/कला/क्रीडा क्षेत्रातील तरूण आणि धडाडीच्या व्यक्तींशी संवाद साधू शकता, त्यांच्या कार्यावर प्रकाशचित्रमालिका पाठवू शकता. आपल्या चष्म्यातून आपल्या राहत्या देशातील आजच्या तरूणाईविषयीचे मनोगतही ललित शैलीत व्यक्त करू शकता, तरूण तुर्कांच्या 'फॅशन'वरही सचित्र लेख लिहू शकता.

चला तर मग, तरुणाईच्या अंतरंगी डोकावू या!

४. कला आणि जाणिवा

आता शेवटच्या संकल्पनेकडे वळू या. कलाप्रवास हा मुख्यत्वे जाणिवेचा प्रवास. या प्रवासातील निवडक सौंदर्यस्थानांचा आस्वाद घेऊ या. या संकल्पनेसाठी आपण अशा प्रकारचे साहित्य पाठवू शकता:
- गाजलेल्या साहित्याचे, कलाकृतींचे, कलाकारांचे, लेखक/कवी/चित्रकार/गायक/कालखंड यांचे आपल्या दृष्टिकोनातून रसग्रहण.
- चित्रशैली/नृत्यशैली/वस्त्रशैली/संगीतातील घराणी यावर सचित्र लेखमालिका.
- पुस्तक परिचय, प्रताधिकारमुक्त अनुवादित साहित्य.
- कलाकार आणि कलाकृती यावर आधारित शब्दकोडे, प्रश्नमंजुषा.
- गाजलेल्या/भावलेल्या चित्रपटांवर/संगीतावर लेख.
- गायक/वादक/संगीतकार/लेखक/कवी/अभिनेते/कलाकार यांच्याशी ऐसपैस गप्पा.
- एखाद्या कलाकार/लेखकाच्या शैलीतील विनोदी स्फुट, विंडबनं.


चला, अभिरुची म्हणजे काय ते उलगडून पाहू या!

तर रसिकहो, अशा या चार संकल्पना.
कुठल्याही संकल्पनेसाठी आपण कुठलाही प्रकार पाठवू शकता (कथा,कविता, ललित, वैचारिक लेख, दृकश्राव्य, बालसाहित्य, दिवाळी संवाद, प्रकाशचित्रमालिका, शब्दकोडं, इ.). प्रत्येक संकल्पनेसाठी उदाहरणं फक्त ती संकल्पना कशा प्रकारे फुलवता येईल यासाठीच दिली आहेत. नमनाला घडाभर तेल, केवळ संकल्पना स्पष्ट व्हाव्यात म्हणून!
२०१० हितगुज दिवाळी अंकासाठी, संकल्पनांवर आधारित साहित्याला प्राधान्य दिले जाईल.

विशेष सूचना: दिवाळी अंकाची वाढीव मुदत आता ५ ऑक्टोबर, २०१० पर्यंत. आपले साहित्य पीएसटी प्रमाणवेळेनुसार रात्री १२पर्यंत पाठवता येईल.
संपादकमंडळाशी सदस्यखात्यातून संपर्क करू शकता.
हितगुज दिवाळी अंक २०१०- नियमावली
मालकीहक्क (Copyright)
शुद्धलेखनासंबंधी नियमावली


दिवाळी संवाद साधण्याआधी संपादकमंडळाशी विचारविनिमय करणे अनिवार्य आहे.

लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. तुम्ही, आम्ही मिळून यंदाची संकल्पनादिवाळी धडाक्यात साजरी करू या!

आपले नम्र,
संपादकमंडळ
विषय: 

मस्त Happy

व्वा मस्त संकल्पना.
२०१० हितगुज दिवाळी अंकासाठी मनापासुन शुभेच्छा.
श्राव्य घोषणेची कल्पनाही आवडली.> अनुमोदन
Happy

.

चारही संकल्पना मस्त आहेत. श्राव्य घोषणेची आयडीया चांगली. पण बोलणारीच्या मागचं संगीत कानाला खटकलं त्याऐवजी काहीतरी शांत चाललं असतं. ज्याने प्रसन्न वाटलं असतं.
दिवाळी अंकाकरता शुभेच्छा.

कोणाचा आवाज आहे? Happy एकदम प्रोफेशनल डबिंग स्टार!

बाकी कार्यक्रम एकदम भारीच ! शुभेच्छा!!!

श्राव्य घोषणा घरी जाऊन ऐकेन .. पण घोषणा छान झालीये एकदम .. Happy

फीडबॅकः
चारी संकल्पना individually खुपच छान वाटतात पण एका अंकात घेण्याच्या दृष्टीने त्यांचा आपापल्यात काय संबंध आहे, त्यांची एकात एक गुंफण कशी होते आणि या दिवाळी अंकासाठी या चार संकल्पना निवडण्यामागचं प्रयोजन काय त्याबद्दल निवेदन असतं तर जास्त आवडलं असतं ..

चू. भू. दे. घे.

सशलच्या म्हणण्याला दुजोरा.. ह्यातला एक-एक विषय अंकाचा प्रमुख विषय होउ शकतो.. चार विषय एकदम घेतल्याने खूप जास्त (आणि त्यामुळे बरचसं) साहित्य घ्यावे लागेल असे वाटते. तसेच कथा-कविता-विनोद इत्यादी विभागात विविध विषयांवर लोकं लिहून पाठवतीलच.. त्याचे काय करणार? जर अंक आटोपता ठेवायचा असेल तर ह्या चार संकल्पनांच्या बाहेरचे साहित्य अंकात समाविष्ट करु नये.. पण मग अजून माबोवर इतके सिद्धहस्त लेखक नाहीत की ते ह्याच चार संकल्पनांच्या मर्यादेत राहून उत्तम/दर्जेदार साहित्य देतील (माझे मत).

असूदेत ना टण्या. या विषयांपुरताच राह्यला अंक तर भले तो लहान का असेना एक दर्जेदार संग्रह होईल ना.
भाराभर वाचण्यापेक्षा मोजकं, नेमकं आणि उत्तम वाचायला मिळणं महत्वाचं की नाही?

Pages