'फू बाई फू' च्या सेटवरून

Submitted by कौतुक शिरोडकर on 2 August, 2010 - 00:42

नमस्कार !

गेले अनेक दिवस लिहीन-लिहीन म्हणत होतो त्याला आज मुहुर्त सापडला. विषय तसा साधाच आहे म्हणा. 'फू बाई फू'च्या सेटवरील माझा चंचूप्रवेश.

अनेक वर्षापुर्वी एक वाक्य वाचलं होतं. "डॉक्टर म्हणून दुसर्‍यांच्या आजारावर जगण्यापेक्षा किंवा वकील म्हणून दुसर्‍याचा भांडणावर जगण्यापेक्षा लेखक म्हणून जगणे मला जास्त आवडेल." या वाक्याचा जनक कोण ते आज आठवत नाही. पण वाक्य मात्र मनावर कोरलं गेलं. पण सर्वसामान्य मराठी माणूस जसा जगतो, तसं जगण्यासाठी नोकरीशिवाय पर्याय नाही हे मात्र भिंतीत खिळा ठोकावा तसं डोक्यात ठसलं होतं. व्यवसायास लागणारा पिंड आपला नाही हे काही व्यवसायाच्या उचापती केल्यावर लक्षात आलं. नोकरीतही 'मराठी बाणा' आड येत असल्याने एका जागी टिकणं शक्यच नव्हतं. तरी 'घेतला वसा टाकू नये' या उक्तीस अनुसरून 'प्रपंच करावा नेटका' या उक्तीमागे धावत होतो.

या सगळ्या गदारोळात डुबत्याला काठीचा असावा तसा माबोचा आधार मिळाला. मनाच्या तळाला दाबून टाकलेल्या सार्‍या इच्छा उफाळून वर येऊ लागल्या. धगधगत्या निखार्‍यावरची राख फुंकरीने उडवल्यावर पुन्हा निखार्‍याची धग जाणावी तस काहीस. (काय साली समर्पक (?) उपमा आहे !) कालपर्यत श्री. कौतुक शिरोडकर इतकीच ओळख असलेला एक सर्वसामान्य माणूस माबोवर लिहू लागला. अल्पावधीत त्या नावामागे 'लेखक' हे बिरुद जोडलं गेलं. काही जण फक्त 'कवी' म्हणूनही ओळखतात तो भाग अलाहिदा. या प्रवासात अनेक चांगले अनुभव आणि मित्र जोडता आले. (वाईट अनुभवांबद्दल लिहू नये असा शिरस्ता आहे.) ज्ञानाच्या कक्षा बर्‍यापैकी रुंदावल्या. माबोकरांनी मला दिलेल्या प्रोत्साहनामुळे 'आपल्याला लिहीता येत' हे कळालं. 'उच्च' या शब्दाच्या दृष्टीक्षेपात जरी नसलो तरी लिहीतोय हेच पुरेसं ठरलं.

यातच मग लेखक म्हणून प्रयत्न करावा अशी उर्मी उसळून वर आली. इतकं सहजी ते शक्य नव्हतं. कारण तेच जुने, ज्याने तुकाराम महाराजांचाही पिच्छा सोडला नव्हता. पण घरून परवानगी मिळाली आणि मग 'स्ट्र्गल' सुरु केला. एका नामांकीत निर्मातीसाठी दोन सिरियल्स लिहील्या. चॅनलकडून हिरवा सिग्नल मिळाला. पण गाडी पुढे सरकेना. रात्रीची जागरणं करून डोळे ताणत लिहीलेल्या त्या लेखनाने जर टिव्हीचा छोटा पडदा पाहीला असता तर सगळं भरून पावलं असतं. पण तस काही घडलं नाही. अपयश ही यशाची पहीली पायरी असते ह्या अनुभवांकीत वाक्याचा पुनःप्रत्यय आला. पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' करावे लागतेय की काय अशी परिस्थिती. पैसे मिळाले नाहीच हे शेवटचे शल्य.

पण प्रयत्न सुरु होतेच. यात सोबत होती माबोकर 'देवनिनाद' उर्फ 'निनाद शेट्ये' यांची. यातच 'झी' मराठीवर फू बाई फू' सुरु होणार हे कळलं. मग दोघांचा मोर्चा त्या दिशेला वळला. मुख्य प्रयत्न निनाद शेट्ये यांचे. मी आपला ड्रायव्हर मागे क्लीनर जावा तसा. यात मग लेखक सचिन मोटे आणि निर्माते राकेश सारंग याचे मेल आयडी हाती आले. स्कीटस वर संस्कार करून त्यांचा मारा करायला सुरुवात केली आणि एक दिवस 'हॅलो' हे स्कीट झाल्याचे कळले. करण्यापुर्वी त्यांनी कळवायला हवं होतं अस आधी मनात आलं खरं. पण सुरुवात तर झाली हा आनंद जास्त होता. पण तो प्रक्षेपण पाहील्यावर फुर्रर्रर्र झाला. एडीट मध्ये जवळजवळ ६०-७० टक्के भाग नाहीसा झालेला. मग सचिन मोटेंशी संवाद सुरु झाला. मनात धाकधुक होतीच. अनेक नाटक, सिरियल्समध्ये ठसा उमटवलेला माणूस आपल्यासारख्या नवोदीताशी कसा वागेल, बोलेल ? पण हा प्रश्न पहिल्या संवादातच विरून गेला. जमिनीवर पाय रोवून उभा असलेला लेखक. कसला बडेजाव नाही की बोलण्यात 'अ‍ॅटीट्युड' नाही. कुठला कन्सेप्ट छान आहे, कुठे बदल करावा लागेल, मॅडनेस कसा आणावा याचे उत्कृष्ट टेलिफोनिक दिग्दर्शन मिळत गेलं.

सरते शेवटी एक दिवस फू बाई फूच्या सेटवर पोहोचलो. बुजलो होतो. ओळखी झाल्या पण बुजरेपण चटदिशी जायला तयार नव्हतं. शांतपणे एका बाजूस उभा असायचो. गणेश रेवडेकर व मानसी कुलकर्णी यांनी पहिलं स्कीट केल होतं. पण त्यांनाही साधी ओळख द्यायचं धाडस झालं नाही. कदाचित स्वभावाचाही दोष असेल. पण पहिला दिवस त्या अनोळखी वातावरणात समरस होण्यातच गेला. जो स्कीट करणार असेल त्याच्यापुरताच मर्यादीत होतो. नंतर मात्र हे लेखक ही ओळख रुढ झाली.

सेटवरचं वातावरण मात्र धमाल. स्कीटच्या रिहर्सलस चालू असलेल्या. प्रत्येकजण स्वतःची रिहर्सल करता-करता कंटाळला की मग दुसर्‍याच्या खोलीत डोकावून एखाद दुसर्‍या पंचचे कॉन्ट्रीब्युशन द्यायला तत्पर. एकमेकांची खेचणे हा जन्मसिद्ध अधिकार असावा तसे सगळेच एकमेकांच्या टोप्या उडवत होते. त्यामुळे त्या प्रवाहात सामिल व्हायला वेळ लागला नाही. 'जेवणाची वेळ म्हणजे फक्त टर उडवण्यासाठी दिला गेलेला वेळ ' हेच गणित. यात आनंद इंगळे आघाडीवर. त्यांचा पुणेरी बाणा ठायी ठायी दिसत असायचा. बोलता-बोलता कधी कोण गिर्‍हाईक होईल याचा नेम नसायचा. वैभव मांगले म्हणजे काहीतरी नवा एक्ट हे समीकरण ठरलेलं. त्या वेळातही मध्येच एखाद्या जुन्या इवेंटमध्ये केलेल्या एक्टची झलक दिसायची. हसून हसून सगळेच बेजार. मध्ये एकदा स्टार माझाचे प्रतिनिधी 'रिमोट माझा' च्या चित्रिकरणासाठी आलेले तेव्हा आनंद इंगळे यांनी स्कीट दिग्दर्शक विश्वास सोहोनीला ही सोडलं नाही. "आपल्यासाठी ते इतकं करतात त्यामुळे सगळ्या कलाकारांनी त्यांच्या पाया पडायला हवं' या वाक्यासरशी पुढे पळणारे विश्वास सोहोनी व पाय धरायला धावणारे आनंद इंगळे हे दृश्य बघण्याजोगे होते.

पर्व सुरु झाल आणि मी सेटवर पोहोचेपर्यंत काही जोड्यांनी निरोप घेतला होता. तरी गणेश रेवडेकर व मानसी कुलकर्णी, संजय कुलकर्णी व शैला, गणेश मयेकर व समीरा, अजय जाधव व चैत्राली, संदीप पाठक व स्वाती देवल, रमेश वाणी व मौसमी तोंडवळकर या जोड्या होत्याच. मराठीत विनोदाची जाण असलेले असे अनेक कलाकार या सेटवर भेटले. यांच्या सोबत पर्वाची वाटचाल सुरु होती.

पर्व पुढे सरकत होते आणि एकेक कलाकार निरोप घेत होते. हळूहळू रिहर्सल रुम्समधला राबता कमी होऊ लागला. वाईट वाटायचं या गोष्टीचं. पण शेवटी स्पर्धा म्ह्टलं की हारजीत आलीच. आणि शेवटी फक्त चार जोड्या उरल्या.

आनंद इंगळे म्हणजे संयमित अभिनय. शक्य तो अंगविक्षेप टाळणारे. जुन्या दर्जेदार गाण्यात रमणारं व्यक्तीमत्व. स्कीटमध्ये अभिनयाच्या छोट्या छोट्या जागा हुडकून एक्ट उत्तम करण्याच्या प्रयत्नात असलेला कलाकार.
हिंदी व मराठी या दोन्ही आघाड्यांवर लढणारी क्षिती जोग. प्रचंड व्यस्त असल्याने सगळी समीकरणेच व्यस्त. या सेटवरून त्या सेटवर होणारी धावपळ. त्यातही मिळणार्‍या कमीत कमी वेळात स्कीटची मनापासून तयारी करणं. हातात शक्य तो सतत एखादी कडक कॉफी. झोप उडवण्यासाठीच असावी. पण जे हाती असेल त्यात स्वतःला झोकून देणारी.

वैभव मांगले म्हणजे व्यक्तीरेखेप्रमाणे स्वतःला बदलणारा कलाकार. एकदा का भुमिकेचं बेअरींग घेतलं की मग तो वैभव मांगले तिथे दिसत नाही. असते ती फक्त व्यक्तीरेखा. मग तो उद्धट मंगलकार्यालयाचा मालक असो वा हिप्नोटिझम करणारा. सेटवर घरचे वडे वाटून आपला जन्मदिवस साजरा करणारा कलाकार.
विशाखा सुभेदार म्हणजे शांतपणा. शक्य तेवढा वेळ स्कीटच्या रिहर्सलमध्येच बिजी असलेली. गालावरच्या खळीसह हास्य म्हणजे निव्वळ प्रसन्नपणा. बोलण्यात, वागण्यात आब राखलेला.

दिगंबर नाईक म्हणजे प्रत्येक क्षणी नव्या नव्या पंचेसच्या शोधात असलेला कलाकार. मराठी, आगरी, बाणकोटी, वर्‍हाडी, मालवणी, कोंकणी, अहिराणी अशा महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भाषांवर प्रभुत्व असलेला कलाकार. महसुलमंत्री राणे यांची नक्कल करावी तर त्यानेच.
त्याची सोबत आरती सोलंकी म्हणजे 'कम्प्लिट चार्ज' बॅटरी. गाणं आणि नाच या दोन गोष्टींवर जीवापाड प्रेम. प्रत्येक स्कीटनंतर अजून चांगल करता आलं नाही याची उगाच खंत बाळगत बसणारी.

विकास समुद्रे म्हणजे मध्येच काढलेले दिलखुलास चिमटे. विनोदाची उत्तम जाण असलेला कलाकार. लेखनातही कमी नाही. त्यातही चौकार, षटकार लगावलेले आहेतच. सहज बोलता-बोलता फिरकी घेणं हा बहुतेक जन्मजात स्वभाव असावा.
सुप्रिया पाठारे ही विकासला लाभलेली उत्कृष्ट सोबत. त्याही बर्‍याच सिरियल्स मध्ये बिजी असलेल्या. माझ्या माहीतीतला हा त्यांचा विनोदी भुमिकेचा पहिलाच प्रयत्न आणि तोही इतका जमला की सरळ फायनलमध्ये त्यांचा प्रवेश झालाय.

निर्माते राकेश सारंग व त्यांच्या पत्नी संगीता सारंग या जोडीचे विशेष कौतुक यासाठी की कार्यक्रम उत्कृष्ट व्हावा म्हणून त्यांचा असलेला सहभाग. वेशभुषा आणि रंगभुषा यात श्रीमती सारंग याची बारीक नजर. त्यासाठी होणारी धावपळ. व्यक्तीरेखेला जे हवं, ते हवच. त्यात तडजोड नाही. त्याला वेळेच वा बजेटचं बंधन नाही. श्री. राकेश सारंग हे फक्त पैसा टाकून बाजूला होणारे निर्माते नाहीत हे पहिल्याच दिवशी त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत जाणवलं. प्रत्येक जोडीला त्यांच्यासमोर रिहर्सल सादर करणं कंपलसरी असायचं. त्यावेळी त्यांनी सुचवलेल्या जागा इतक्या अफलातून असत की संपुर्ण एक्टला एक वेगळं परिमाणं मिळत असे. कलाकारांचे आवाजातील चढ-उतार, त्यांनी घ्यावयाचे 'पॉजेस', शब्दांवरचा जोर, हालचाल, देहबोली या सगळ्यांवर बारीक लक्ष. कुठला पंच कसा घ्यावा आणि कुठला शब्द कसा फेकावा याचं ते स्वतःच सादरीकरण करत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरचं. नुसतीच संकल्पना दिली की झालं याऐवजी ती कशी नीट राबवता येईल याचा पाठपुरावा करण्यासाठी ते सदैव तत्पर. ज्याला विनोद समजतोय त्याच्यासाठी आपण लिहीतोय हा मिळणारा आनंद अवर्णनीय. याउपरही एखादा कलाकार जेव्हा कमी पडत असे तेव्हा ती गोष्ट त्यांच्या मनाला टोचायचीच. प्रत्येकाने त्याचे शंभर टक्के द्यावे ही त्यांची अपेक्षा आज फू बाई फूच्या प्रत्येक कलाकाराला लोकप्रियतेच्या वेगळ्या पातळीवरच घेऊन गेलीय.

डॉ. निलेश साबळे म्हणजे फू बाई फूची सुरुवात. सुत्रधार म्हणून वेगवेगळे गेटअप करून पुन्हा त्या निवेदनात वेगवेगळ्या कलाकारांच्या आवाजाने धमाल उडवून देण्याचं कसब वाखाणण्याजोगं. त्यांच्या निवेदनाचं लेखन ते स्वत:च करतात. मोजक्या शब्दात बरचं काही देणारा मनस्वी कलाकार. त्यांच्याशी जशी गट्टी जमली तशी ती तुषार देवल व त्यांचा वाद्यवृंद, यांच्याशीही जमली. वेशभुषेसाठी सुई दोरा घेऊन तत्पर असलेला प्रशांत हाही एक चांगला मित्र या सेटवर लाभला.

परिक्षकांशी आमना-सामना होण्याचा प्रश्नच नव्हता. तरी एकदा माझी भाची खास निर्मिती सावंत यांना भेटायला सेटवर आली तेव्हा त्यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. एवढ्या मोठ्या कलाकाराचा त्यांच्या फॅन्सबरोबर असलेला 'एप्रोच' लक्षात ठेवण्याजोगा होता.

आता पहिलं पर्व संपत आलय. फायनल कडे या पर्वाची वाटचाल सुरु आहे. चारही जोड्या कंबर कसून तयार आहेत. कोण हरेल, कोण जिंकेल यात व्यक्तीश: मला रस नाही. कोणी जिंकला तरी आनंदच आहे, कारण सर्वच आता मित्र आहेत. ही भावना कलाकारांमध्येही मला वेळी अवेळी जाणवली. त्यामुळे कधी कधी ती स्पर्धा आहे हे जाणवत ही नसे. कारण जर खरचं 'काटे की टक्कर' हा प्रकार असता तर वातावरण इतकं खेळीमेळीचं नसतं. कोणीही दुसर्‍याला 'हा पंच घे. मस्त आहे' असं सांगितलं नसतं. मला तरी असं वाटतं नाही की महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा थोडा व्यापक विचार मांडता, तमाम मराठी जनतेला हसवण्याचा, रिझवण्याचा वसा घेतलेले हे कलाकार फक्त त्या स्पर्धेतल्या काही रुपड्यांच्या पारितोषिकासाठी एवढं जीवाचं रान करत असतील. शक्यच नाही. स्वतःचं दु:ख विसरून, स्वतःला होणारे शारिरीक क्लेश विसरून मराठी रयतेला हसवण्यासाठी अटकेपार विनोदाचे झेंडे फडकावणारे हे सगळेच कलाकार फायनललाच नव्हे तर दुसर्‍या पर्वातही आपणा सर्वाना हसवून हसवून बेजार करोत हीच श्रींच्या चरणी प्रार्थना !!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशात असताना फु बाई फु पहात तुमचं नाव दिसलं तेव्हा घरी सगळ्यांना सांगितलं 'हा आमचा मायबोलीकर आहे' Happy

देवनिनाद बद्दल माहित नव्हत. तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!

सॉरी अरुण, माझी वाचण्यात चुक झाली... Uhoh

कौतुक, आज पाहिला मी तो कालचा एपिसोड...काय मस्त स्किट होतं तुमचं...आणि आनंदची एनर्जी!!!!! खरोखर वाखाणण्याजोगी होती...आवडला मला हा अ‍ॅक्ट....

आता शेवटी शेवटी सगळेच कलाकार एवढे अप्रतिम परफॉर्म करायला लागले आहेत, की मला व्होटींग करतांना कोणा एका जोडीची निवड करणं फार अवघड वाटत होतं... Sad ह्या चार जोड्यांमध्ये विभागून नसता का देता आला फायनल अ‍ॅवॉर्ड????????

कौतुक, तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनप्रवासासाठी शुभेच्छा Happy
खूप छान वाटलं वाचून. सध्या watchindia चा काहीतरी प्रॉब्लेम असल्याने अमेरिकेत झी मराठी बघायला मिळत नाहीये. आता यू-ट्यूबवर बघते फू-बाई-फू चे भाग मिळाले तर.

आत्ताच घरमालक आणि भाडेकरुचा भाग बघितला Rofl
स्क्रिप्ट सॉलिड आहेच आणि कलाकारांनीही अफलातून न्याय दिलाय ! ...आनंद इंगळे जबरी आहेत एकदम.

कौतुक तुझे आणी निनाद चे अभिनंदन... मि फिनाले प्रत्यक्ष पाहीला अपेक्षेप्रमाणे वैभव आणी विशाखा जिंकले हे बघुन बरे वाटले... Wink

कौतुक तुझे आणी निनाद चे अभिनंदन... मि फिनाले प्रत्यक्ष पाहीला अपेक्षेप्रमाणे वैभव आणी विशाखा जिंकले >> अरे ... फिनाले तर १५ ऑगस्ट ला आहे ना ?

अगो,
watchanytv.com वर पण बघु शकतेस झी मराठी.

अरे ... फिनाले तर १५ ऑगस्ट ला आहे ना ?>>>>>>>>>>>> टिव्हीवर १५ ला दाखवणार आहेत.खरी अंतिम फेरी परवाच झाली. क्षीती आजारी होती बहुतेक्,फक्त १च स्किट केलं तिने.

कौतुकराव व देवनिनाद, मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
कौतुकराव, हा त्या सेटवरचा तुमचा नुसताच चंचूप्रवेश नव्हे तर या क्षेत्रातल्या घोडदौडीचा तो शुभारंभ ठरेल, हे नक्की !

टिव्हीवर १५ ला दाखवणार आहेत.खरी अंतिम फेरी परवाच झाली >> ओह ... मला वाटले सारेगम सारखे live असेल ...
आता पुढचे पर्व लवकर चालु झाले पाहिजे ...

मित्रानो, आभार. आनंद बद्दल काय बोलू ? मला जे अभिप्रेत होते ते त्याने तंतोतत केलेच वर त्या दोघांनी स्वत: त्यात काही पर्सनल कॉन्ट्रीब्युशन केले ते वेगळेच. क्षितीचे एक मेजर ओपरेशन झाल्यामुळे ती परफॉर्मन्स करण्याची शक्यताच नव्हती. पण डॉक्टरकडून (बहुतेक जबरदस्तीने) परवानगी घेऊन ती एक स्कीट करायला पोहोचलीच. शारिरीक हालचालींना तर बंदीच होती. 'शो मस्ट गो ऑन' म्हणून हे सगळं. त्याबद्दल तिला खरच सलाम !!!
फायनलला माझं स्कीट दिगंबर व आरतीने केले. पण ऐनवेळी वेळेच्या बंधनाने त्यात एडीट करावे लागल्याने एक्ट हवा तसा खुलला नाही. वाईट वाटलं पण त्यातही फायनलला स्कीट होतं हा आनंद जास्त. त्या भाऊगर्दीतही आनंदने आठवणीने मला व निनादला 'थम्स अप' केला. दिगंबरने माझा उल्लेख केला. यातच इतक्या दिवसांची सगळी मेहनत फळाला आली.
पहिल्या पर्वात अपेक्षेपेक्षा जास्त दान पदरात पडलय. दुसर्‍या पर्वाकडेही अपेक्षेने पहातोय. माबोकरांना हे सांगायला आनंद होतोय की भरत जाधव यांच्या मी मराठी वरील 'वन टू का फोर' या मालिकेसाठी मी दोन भाग दिले आहेत. एकंदरीत घडामोडी पहाता ते पास होतील अशी शक्यता आहे. ते जर भरत जाधव यांच्या पसंतीस उतरले तर मग त्या सिरियलचं लिखाण करायला सुरुवात होईलच. तिसर्‍या एका सिरियलसाठी आज बोलावणं आलं आहे. माबो आणि माबोकर यांच्याशी माझं नात अतुट आहे. म्हणून मला मिळणारी प्रत्येक संधी माबोकरांशी शेअर करावीशी वाटते. कारण या यशात तमाम माबोकरांचा हात आहे. पुन्हा एकदा माबोकरांचे आभार !!!!

कौतुकराव मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !
तुम्हाला भरपुर संधी मिळोत .... प्रत्येक संधीचे तुम्ही सोनं कराल ही खात्री आहे !

कौतुकराव मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !
तुम्हाला भरपुर संधी मिळोत .... प्रत्येक संधीचे तुम्ही सोनं कराल ही खात्री आहे !>>>>अनुमोदन

अरे वा कौतुक, सहीच.. तुला उत्तरोत्तर अशीच संधी मिळो आणि तुझी प्रतिभा अधिकाधिक बहरत जावो ही शुभेच्छा... Happy

अरे वा! कौतुक तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. काल मी पण भाडेकरुवाला भाग पाहिला. मस्त जमलेलं स्किट. एकदम धमाल.

मेसेज मिळाल्यावर फु बाई फु पाहील, छानच वाटलं, खुप आनंद झाला असा ब्रेक मिळाला म्हणून.
अशीच उत्तरोत्तर प्रगति होउ दे.
सेट वरच्या अनुभवावर फारच सुरेख लिहीलय.
असेच लिहिते रहा.

अरे कौतुक.. आत्तावाचाला तुझा मेसेज.. आणी इतका आनन्द झाला ना. तुझ्या मेहनतीला आता रन्ग येत आहे.

तुझ नावच कौतुक्,त्यामुळे ते होणारच तुझ नेहमी

तुला खूप खूप शुभेच्छा

कौतुक......... कित्येक दिवसांनी आलेय आज मायबोलीवर. त्यामुळे हे तुझं कौतुक वाचायला उशीर झाला.
तुझं अगदी मनापासून खूप खूप कौतुक Happy तुला अशा संधी वारंवार मिळोत आणि तुझं लिखाण असंच बहरत जावो Happy

कौतुक आणि निनाद , मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!

मला कोणी सांगेल का की कोण जिंकलं ?

कौतुक, तुमचं मनापासून खूप खूप कौतुक. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.
वैभव अन् त्याच्या बरोबरची (नाव आठवत नाही :() जिंकले.

आभारी आहे मित्रांनो. एका नवीन सिरियलचा पायलट एपिसोड लिहायची जबाबदारी शिरावर घेतलीय. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या जीवावर हे शिवधनुष्य उचलतोय. सगळं नीट जमुन आलं तर मग पुढील माहीती लवकरच देईन.
फुबाईफुच्या दुसर्‍या पर्वाला पुढच्या आठवड्यात सुरुवात होतेय. पहायला विसरू नका. शिवाय कुणाला जर असं मॅड मॅड लिहून महाराष्ट्राच्या जनतेला हसवायची इच्छा असेल तर मला कळवा. आमच्यासोबत अजून एखादा माबोकर यात सहभागी झाला तर आनंदच आहे.

Pages