न्यूक्लियर डिसेप्शनः प्रकरण सातवे-पाकिस्तानी अणूबाँब सार्‍या मुस्लिम जगताचा!

Submitted by sudhirkale42 on 14 August, 2010 - 01:13

न्यूक्लियर डिसेप्शनः प्रकरण सातवे-पाकिस्तानी अणूबाँब सार्‍या मुस्लिम जगताचा!\
Nuclear Deception front cover_0.JPG
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक) मराठी रूपांतर © (मूळ लेखकांच्या वतीने): सुधीर काळे, जकार्ता (या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)
("पाकिस्तानी अणूबाँब सार्‍या 'उम्मा'चा" याबद्दलचा उल्लेख प्रकरण-३ मध्ये आलेला आहे.)

या प्रकरणाचे मूळ शीर्षक आहे A Bomb for the Ummah! विकीपेडियाच्या व्याख्येप्रमाणे 'इस्लाम' धर्माच्या संदर्भात त्या शब्दाचा अर्थ होतो संपूर्ण मुस्लिम जग. [In the context of Islam, the word ummah is used to mean the diaspora or "Community of the Believers" (ummat al-mu'minin), and thus the whole Muslim world.]
आणखी एका शब्दकोषात मॉरिटानियापासून पाकिस्तानपर्यंतचा प्रदेश अशी व्याख्या दिलेली आहे. (Islamic Ummah is the Muslim community or people, considered to extend from Mauritania to Pakistan)

कहूताप्रकल्पावर फारच खर्च होऊ लागला होता! खानसाहेबांच्या व्यवहारांच्या पाळतीवर असलेल्या पाश्चात्य हेरखात्यांच्या गुप्त तपासणीनुसार १९८४ व १९८५ या दोन वर्षात त्यांनी ५५ ते ७० कोटी डॉलर्स खर्च केले होते. पण पाकिस्तान सरकारकडून त्यांना फक्त १.८ कोटी डॉलर्स मिळाले होते. पण कहूताप्रकल्पाचे अंदाजपत्रक वेगळेच होते व ते मंत्रीमंडळालाही दाखवले जात नसे व त्याचा कुठे उल्लेखही नसे. ज. बेग म्हणाले कीं केवळ पाकिस्तानी शास्त्रज्ञांच्या कौशल्यामुळे व पाकिस्तानी उद्योजकतेनेच खानसाहेबांचा प्रकल्प अद्याप जगला!
पण कहूताचा प्रत्यक्ष खर्च व पाकिस्तानी सरकारकडून अंदाजपत्रकाद्वारे मिळालेल्या रकमेत इतकी प्रचंड तफावत होती कीं पाकिस्तानी शास्त्रज्ञांच्या कौशल्यामुळे व पाकिस्तानी उद्योजकतेने ती भरून निघणे अशक्यच होते! आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार (IMF) पाकिस्तानकडे अजीबात गंगाजळी नव्हती ज्यातून तें अशी रक्कम खर्चू शकेल. हे केवळ १९७३ पासून ते १९८८ मध्ये राष्ट्राध्यक्ष होईपर्यंत कहूताच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असलेल्या गुलाम इशाक खान खानसाहेबां यांचे चातुर्य होते कीं कहूताप्रकल्प अद्याप चालू होता.

खानसाहेबांच्या खर्चावर नजर ठेवणारे युरोपीय अभ्यासक व त्याबद्दल परिचित असलेले सौदी गुप्तहेरखात्याचे अधिकारी यांच्या अनुमानानुसार पाकिस्तानच्या मूलभूत सुविधांसाठी(†) अमेरिकन सरकारकडून मिळालेल्या व सोविएत फौजांना भिडलेल्या अफगाणिस्तानमधील मुजाहिदीनांना शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी CIA कडून गुपचुप देण्यात आलेल्या मदतीवर हात मारला जात होता.

कहूताच्या संचालक मंडळाचे सभासद व झियांचे दोन नंबरचे सर्वेसर्वा ज. आरिफ यांनाही सर्व अंतस्थ माहिती उपलब्ध असायची. ते या आर्थिक चातुर्याला 'काळी कला (Black Art)' म्हणत. झियांच्या इच्छेनुसार अफगाण युद्धाच्या धीम्या सुरुवातीनंतर अमेरिका व सौदीकडून पैशाचा पाऊस पडू लागला. पैसे देणार्‍यांना त्यांच्या पैशाची किंमत वसूल होत होती कारण सोविएत रक्त वहातच होते. कांही पैसे योग्य जागी पोचले नसतीलही! पण जर या मदतनिधीचा १० टक्के भागही अशा अण्वस्त्रप्रकल्पासाठी अवैधपणे वापरला तरी या प्रकल्पाला सालिना कहूताच्या अंदाजपत्रकाच्या पाचपट म्हणजे ९ कोटी डॉलर्स मिळू शकले असते. (या आकडेवारीच्या अचूकपणाबद्दल पाश्चात्य अभ्यासकांचे एकमत नव्हते). "पैशाची किंमत वसूल होत होती" याचाच अर्थ अमेरिकी करदाते त्यांच्या नकळत पाकिस्तानी अण्वस्त्रप्रकल्पाला अनुदान देत होते!"

कायम आर्थिक विनाशाच्या कडेवर उभ्या असलेल्या देशात असूनही कहूताप्रकल्पाचा तुफान खर्च पाहून पाश्चात्य हेरखात्यांनी त्याची चौकशी १९८२पासून सुरू केली होती. हेरखात्यावर नजर ठेवणार्‍या एका मुरब्बी ब्रिटिश मुत्सद्द्याच्या आठवणीनुसार त्यांना कहूताप्रकल्पाच्या खरेदीशी निगडित बँकांच्या खात्यात येणार्‍या रकमा ISI व अफगाणिस्तानच्या मोहिमेसाठी उघडलेल्या खात्यांतून आलेल्या असायच्या. शिवाय बनावट पाकिस्तानी धर्मादायसंस्थांना(†), शिक्षणसंस्थांना व वैद्यकीय संघटनांना अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाकडून आलेला मदतनिधीही तिकडे वळविला जायचा! एकूण अशा तर्‍हेने युद्धाच्या काळात दुरुपयोग केला गेलेला पैसा अब्जावधी डॉलर्सच्या घरात जाईल.

CIA कडून आलेला निधी उचलणे तूलनेने सोपे होते. डॉलर्सच्या नोटांनी भरलेली पोती विमानाने पाकिस्तानात यायची व ISI चे संचालक ले. ज. अख्तर अब्दुल रहमान यांच्या सुपूर्द केली जायची. रहमान हे पैसे ISI च्या नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानमध्ये (NBP) किंवा पाकिस्तानी सरकारच्या अखत्यारीतील BCCI मध्ये किंवा Bank Of Oman मध्ये ISI च्या खात्यात भरायचे. (Bank of Oman मध्ये BCCI ची ३३% मालकी होती.) कहूताप्रकल्पाचीही याच बँकांत खाती होती. त्यामुळे रहमान किंवा गुलाम इशाक खान यांना या CIA च्या रकमेत हात घालून ते पैसे कुणालाही संशय न येता खानसाहेबांना देता येत असत. पाकिस्तानातून मग या रकमा BCCI च्या किंवा NBP च्या ७० वेगवेगळ्या देशांतील शाखांमध्ये पाठविल्या जात व तिथून दूतावासातले अधिकारी, लष्करी अताशे(†) व ISI चे स्थानीय प्रमुख लागेल तशी रक्कम काढून घेत असत. अर्थमंत्री गुलाम इशाक खान यांच्या वजनदार पदाखाली कहूताप्रकल्पाचे अंतर्गत आर्थिक प्रबंधक(†) 'भट्टी' नांवाचे गृहस्थ होते. त्यांचे कार्यालय इस्लामाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील RAF च्या हॅंगरमध्ये होते (तिथेच खानसाहेबांचे शहरातले कार्यालयही होते). ऑर्डर दिलेला माल तयार झाला कीं BCCI किंवा NBP च्या खात्यातून ISI च्या देखरेखीखालील व दूतावासात काम करणारे वाणिज्य अधिकारी रक्कम पाठवत असत. इक्रम्-उल्-हक खान हे असल्या व्यवहारात सर्वात जास्त गुंतलेले अधिकारी होते. ते पूर्वी 'बॉन'च्या दूतावासात काम करीत असत. १९८२मध्ये CIA व पाश्चात्य हेरखात्यांनी त्यांना खानसाहेबांच्या खरेदीजालातील प्रमुख 'खिलाडी' म्हणून ओळखले म्हणून त्यांना पाकिस्तानला परत बोलवून 'Technical Services' ही कंपनी चालवायला सांगितले. या कंपनीने एक टणक पोलादाचा कंटेनर (माराजिंग स्टील) कराचीत उतरवून घेतला होता. हा माल लंडनच्या लिझरोज कंपनीबरोबर मैत्री असलेल्या एका ब्रिटिश नागरिकाने घेतला होता आणि लंडनला जायचा होता(‡).

पाश्चात्य अभ्यासकांना नंतर या 'वळवलेल्या' रकमेची 'झलक' पहायला मिळाली. कारण प्राईस वॉटरहाऊसला BCCI च्या लेखापालीत(†) लंडनमधील मुख्यालयात ५ कोटी डॉलर्सची बिनहिशेबी रक्कम सापडली. ही रक्कम पाकिस्तानी सरकारने भरली होती व कहूताप्रकल्पासाठी ती तिथे ठेवली गेली होती.

कहूताप्रकल्पाला इतर अमेरिकन मदत पाकिस्तानस्थित 'BCCI प्रतिष्ठान'द्वारा(*१) पोचायची. हे प्रतिष्ठान BCCI च्या संस्थापकांनी १९८१ मध्ये स्थापले होते. वित्तमंत्री गुलाम इशाक खान यांनी या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते व त्याला करमुक्तीची सवलतही दिली होती. तसेच कहूताप्रकल्पाचे हिशेब ठेवण्याचे कामही त्यांनी केले होते!

BCCI बँकेचे दिवाळे वाजल्यानंतर अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने जी चौकशी केली त्यात अकाउंटिंगचे अनेक घोटाळे दिसून आले. BCCI अनेक थरांची बनली होती. या थरांचा एकमेकांशी संबंध होल्डिंग कंपन्यांतून, सहकारी कंपन्यांतून, बँकेत-बँक, आतून आलेल्या बातम्या व नॉमिनी पद्धतीच्या व्यवहारावर असायचा. अशा मुद्दामच बनविलेल्या ढिल्या संघटनेमुळे पैशाचा गोंधळ सहज करता यायचा व भांडवल एका खात्यातून दुसर्‍या खात्यात सहज नेता यायचे. त्याचा फायदा काळ्या उद्योगात व्हायचा.

तोंड बंद ठेवण्याच्या बाबतीत BCCI चे अधिकारी विश्वासार्ह होते. संस्थापक आगा हसन अबेदीसह सर्व ज्येष्ठ अधिकारी पाकिस्तानातून आलेले होते. ते इस्लामाबादच्या सर्व सरकारी खात्यांशी जवळचे संबंध ठेवून होते. "निसर्गाचेच नियम/कायदे कायम स्वरूपाचे असतात, बाकीचे लवचिक असतात व आपण त्यांच्याभोवती काम करू शकतो. कारण कायदे बदलतात" हा त्यांचा 'मंत्र' खानसाहेबांच्या गरजा व्यवस्थितपणे भागवायचा. अबेदी पहिल्यांदा धंद्यात आले ते BCCI ची आधीची आवृत्ती म्हणून १९५९ साली युनायटेड बँक नावाची बँक काढली त्यातून व तिचे अध्यक्ष म्हणून ज. अयूब खान यांचे निकटवर्ती चुंद्रीगार या भूतपूर्व पंतप्रधानांना नेमले.

१९७१ साली जेंव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले त्यावेळी अबेदींनी ज़ुल्फिकार अली भुत्तोंची भेट घेऊन त्यांच्यावतीने निवडणुकीत पैसे ओतले. एक वर्षानंतर अबेदींनी BCCI बँकेची स्थापना केली व ती झटपट जगातली सात नंबरची खासगी बँक झाली. १९७८ साली जेंव्हा भुत्तोंची उचलबांगडी झाली तेंव्हा नव्या राष्ट्राध्यक्षांना (झियांना) सलाम करायला जाणार्‍यातही ते पहिले होते व त्यांनी ४ कोटी रुपये वैयक्तिक देणगी म्हणून झियांना दिले. जेंव्हा जेंव्हा अबेदी पाकिस्तानला यायचे तेंव्हा ते झियांना भेटत. झिया त्यांना दिवसा कार्यालयीन वेळेत भेटत नसत तर रात्री भेटत. थोडक्यात अबेदींनी झियांना तर झियांनी अबेदींना यथेच्छ वापरले!

युरोपीय हेरखात्यांनी BCCI, BCCI प्रतिष्ठान व कहूताप्रकल्प यांच्यातील भानगडयुक्त देवाणघेवाणींबद्दल सतर्क करूनही रेगन सरकार नेहमीच अशा अडचणी असल्याचे नाकारत. रेगन सरकार नेहमी असल्या पाकिस्तानी अफरातफरीत 'मोठ्या चित्रा'कडे पहात! चापाच्या जुन्या बंदुका घेऊन खेचरांवर बसलेल्या टोळीवाल्यांची रशियाबरोबरच्या युद्धात सरशी होत होती हेच त्याना महत्वाचे वाटे. त्यात CIA चे अंदाजपत्रक सालिना ३ अब्ज डॉलर्सचे (30 billion) होते. त्यात कांहीं कोटी डॉलर्सची अफरातफर झाली तर तिकडे ते दुर्लक्ष करत. शिवाय बिल केसीही या पद्धतीवर खूष होते कारण अशा मार्गाने पाकिस्तानला गेलेल्या पैशाबद्दल अमेरिकन प्रतिनिधीगृहाला सांगावे लागत नसे! पण गेट्स नाराज होते. ते खासगीत म्हणत कीं त्यांना पाकिस्तान खूप रकमा घेत असे म्हणूनच नव्हे तर त्या मुजाहिदीनना न देता मधल्यामधे स्वाहा करत असे याचा संताप येई. अमेरिकेच्या मदतीचा पकिस्तानी लष्कराकडून असा दुरुपयोग ही एक मोठी साथच होती व त्यामुळे त्यांना पाकिस्तानी लष्कराची वागणूक विश्वासघातक वाटे. सोलार्त्झसारख्या लोकप्रतिनिधींना खात्री होती कीं अमेरिकेचा पैसा मधल्यामधे हडप होतोय्, पण सरकारकडे तगादा लावल्यास थापा मारून त्यांना फसविले जाई.

इस्लामाबादच्या उत्तरेस तक्षिलाच्या दिशेला दोन तासाच्या अंतरावर पाकिस्तानच्या अवजड संरक्षणउद्योगाच्या मधोमध एका उंच भिंतींच्या कुंपणाच्या आत ब्रि.ज. महम्मद यूसफ यांचे घर होते. ते एक राष्ट्रभक्त, सैनिक व गुप्तहेर होते व ते CIA चे अफगाणिस्तानातील गुप्त युद्ध चालवत असत व ते नेहमी अमेरिकनांना सतर्क करत कीं मुजाहिदीनांना गरज आहे ते त्यांना अशा लबाडीमुळे व चोर्‍यांमुळे मिळत नव्हते. साधारणपणे पाकिस्तानी उच्चपदस्थ लष्करी सेनानींना स्वतःचे घर व नेतृत्व केलेल्या प्रत्येक कोअरच्याबदल्यात जमीन देणगीरूपाने मिळे. सेवानिवृत्तीच्या वेळी हे सेनानी खूप 'मालदार' होत. पाकिस्तानी लष्करात व हेरखात्यात उच्चपदस्थ असलेल्या पण स्वतः स्वच्छ असलेल्या या अधिकार्‍याकडे-यूसफकडे-दाखवण्यासारखी कांहींच 'माया' नव्हती.

१९८३ सालच्या ऑगस्टमध्ये ISI चे संचालक रहमान यांनी यूसफना खास म्हणून निवडले होते. अस्वलासारख्या शरीरयष्टीच्या यूसफनी आपले आयुष्य पाकिस्तानच्या नेहमीच्या शत्रूच्या सरहद्दीवरील रखरखत्या वाळवंटात व हिमाच्छादित डोगरातील खिंडींत घालविले होते. पाकिस्तानी जनतेला ISI बद्दल भीती व दरारा वाटेच, पण लष्करातील अधिकार्‍यांनाही ISI चा तिरस्कार वाटे, कारण या अधिकार्‍यांच्या निष्ठेवर नजर ठेवणे व ते झियांच्या हुकुमशाहीबद्दल एकनिष्ठ आहेत कीं नाहीं हे पहाणे हेही त्यांचे काम होते. त्यामुळे झियांनी पुकारलेल्या 'मार्शल लॉ'दरम्यान ही भीती खरीखुरीच होती असे यूसफ म्हणतात.

बिल केसी या CIA च्या संचालकांना पहिल्यांदा भेटल्याची आठवण यूसफ सांगतात. ISI च्या अधिकार्‍यांना त्यांच्या "चक्री वादळ((*२)" या गुप्त नावाची खूप मजा वाटे. त्यांची भेट झाली तेंव्हा कुणीही मुत्सद्दी हजर नव्हते. एका खास विमानात बसून उड्डाणादरम्यान हवेतच इंधनभरती करवून ते अमेरिकेतून पाकिस्तानला न थांबता पोचले होते. इमिग्रेशन/कस्टम्सचे अधिकारीही नव्हते. इतर देशांच्या मुत्सद्द्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी त्याच रात्री अमेरिकेच्या राजदूताने एक जंगी मेजवानीही दिली होती. पाकिस्तानी हवाईदलाचे रक्षकही दूर होते.

यूसफना बिल केसी हे एक कोडेच वाटे. ते नंतर केसींना अनेकदा भेटले. ISI च्या ऑफीसमध्ये मीटिंग्समध्ये कधीकधी ते डुलकी घेत आहेत असे वाटे, पण एका क्षणात चपलख उत्तर देऊन सगळ्यांना चकित करत. ते जहाल कम्युनिस्टविरोधी होते व त्यांच्या स्वभावात 'साधनशुचिते'चा सोवळेपणाही नव्हता. त्यांचा लडाकू स्वभावही पदोपदी दिसायचा.
पण केसींची सर्वात मोठी चूक होती कीं त्यांनी युद्धाला पैसे पुरवण्याबाबतच्य़ा ISI च्या शर्ती मान्य केल्या ही. पाकिस्तानचा एक मूलभूत नियम होता कीं एकदा पैसे आले कीं कुठल्याही अमेरिकन माणसाने पैशांच्या किंवा शस्त्रांच्या वाटपात प्रत्यक्ष सहभागी होता कामा नये. पाकिस्तान मग त्या पैशाचे त्यांच्या मनाला येईल ते किंवा त्यांना जरूर वाटेल ते करत असे. रोख रक्कम कुठल्याही स्वरूपात वापरण्यासारखी होती. गुप्त युद्धात ती तशी हवीच! चेक, वायर किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर या पद्धती पकडल्या जातात. तशा झाल्या तर सोविएत सरकार त्याला अमेरिकेचा प्रत्यक्ष हस्तक्षेप मानण्याची व त्यामुळे हे स्थानीय युद्ध जागतिक व जास्त संहारक होण्याची शक्यता होती.

अमेरिका पैसा ओतत आहे अशी चर्चा होती, पण युद्धभूमीवर पैसे अपुरेच पोचत होते. त्यामुळे यूसफना नेहमीच काळजी असे कीं पैसे किंवा शस्त्रे संपून जातील व हातात कांहींच उरणार नाहीं. आम्हाला दरमहा १५लाख डॉलर्स केवळ पाकिस्तानातून अफगाणिस्तानला साधनसामुग्री हलवायला लागत. डॉलर्सच्या नोटा ISI च्या अधिकार्‍यांच्या हातात ठेवण्याच्या ठिकाणापासून ते पैसे यूसफ यांच्या नियंत्रणाखालील युद्धआघाडीवर पोचेपर्यंत ते मधल्यामधे विरून जायचे. रशियाचा पराभव करणे हा अमेरिकेचा एकमात्र हेतू होता. त्यामुळे अमेरिकेने दिलेले पैसे मधल्यामधे हडप होताहेत हे फुटले असते तर 'परस्पर विश्वास' हा काटेरी विषय चर्चेला आला असता व रेगनना ते अजीबात नको होते.

अमेरिकन वा पाकिस्तानी हस्तक्षेप उघडकीस येऊ नये म्हणून पहिल्यापासून मुजाहिदीनना शस्त्रे रशियन बनावटीची मिळायची. जसजशी अमेरिकेच्या गोदामातील रशियन बनावटीची शस्त्रें संपत आली व युद्धाचा व्याप्ती वाढून सालिना ६५,००० टन शस्त्रें वा दारूगोळा लागू लागला तशी अमेरिका रशियन शस्त्रें काळ्या बाजारात खरेदी करू लागली. त्यातून पैसे मिळवायचा एक नवा मार्ग मिळाला. पाकिस्तानी लोक CIA शी अशी शस्त्रे पुरविण्याबद्दल करार करायचे व अवाच्यासवा किमतीने ती विकून स्वत:चे उखळ पांढरे करून घ्यायचे. एकदा तर झिया व रहमान यांच्या संगनमताने ८० लाख डॉलर्सची पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीत निर्मिलेली शस्त्रे एका मर्जीतल्या मध्यस्थाला फुकटात दिली गेली. त्यांने ती जहाजाने कराची बंदरातून बाहेर नेली व एक दिवसाने परत आणून ती पाकिस्तानी सैन्यालाच 'विकली'. पण त्यांच्यावर पाकिस्तानी कारखान्याचे शिक्के असल्याने ही चोरी उघडकीस आली! मग त्या शस्त्रांवरचे पाकिस्तानी शिक्के नष्ट करायला तीन वर्षे व प्रचंड खर्च आला.

शेवटी १९८८ साली अमेरिकन बनावटीची खांद्यावरून डागता येणारी 'स्टिंगर'(*३) प्रक्षेपणास्त्रें जेंव्हा मध्य आशियातील काळ्या बाजारात विक्रीला आली तेंव्हा अमेरिकेने हस्तक्षेप केला व ओझीरा शस्त्रभंडारातील व्यवहारांबद्दल स्वतंत्र लेखपालीची(†) मागणी केली. पण अमेरिकेहून ऑडिट करण्यासाठी तज्ञमंडळ येण्यापूर्वीच १० एप्रिल १९८८ ला ओझरीच्या शस्त्रभांडारात रहस्यमय परिस्थितीत स्फोट झाला. त्यामुळे तोफांचे गोळे व तत्सम इतर गोष्टींचा रावळपिंडीवर व इस्लामाबादवर वर्षाव झाला व त्यात १०० लोक मृत्युमुखी पडले व हजारो घायाळ झाले. सकाळचे दहा वाजले होते व यूसफना वाटले कीं भारतानेच हल्ला केलाय्! एक 'स्टिंगर' प्रक्षेपणास्त्र तर खानसाहेबांच्या कहूतातील शेजार्‍याच्या घराच्या पाण्याच्या टाकीवर पडले. पाकिस्तानी सरकारचे स्पष्टीकरण होते कीं इजिप्तकडून विकत घेतलेल्या सदोष तोफेच्या गोळ्यामधून ठिणग्या बाहेर आल्या व आग लागली जी विझवताच आली नाहीं. पण त्यावेळी एक ज्येष्ठ ISF अधिकारी असलेल्या ज. हमीद गुल यांनी ISI संचालक रहमान यांच्या वतीने केलेल्या गुप्त चौकशीनुसार तो स्फोट एक परिणामकारक घातपात होता.

अमेरिकेचे राजदूत अर्नॉल्ड राफाएल यांच्या मते १२ ते १३ कोटी डॉलर्सचा दारूगोळा पैशाची अफरातफर लपविण्यासाठी वापरला गेला. शंभरावर माणसे मृत्युमुखी पडली ते वेगळेच.
ज. यूसफ यांच्या मते गुप्त युद्धाला मदत म्हणून मिळालेले पैसे कहूताप्रकल्पासाठी वापरणे आवश्यकच होते कारण त्यातून कहूताप्रकल्पाचा फायदाच होत होता. CIA कडून आलेली शस्त्रें पाकिस्तानी दलालांमार्फत विकली जात व त्यातून मिळालेला पैसा कहूताप्रकल्पासाठी वापरला जायचा(*४). नेहमीचे नियम पायदळी तुडवले जायचे, लेखी कांहींही नसायचे. ISI च्या अधिकार्‍यांनी अफगाण युद्धाबद्दल एक खोटी कहाणी रचली. जेंव्हा ते मुलकी लोकांशी व्यवहार करायचे व हे लोक तोंड उघडतील अशी शंका यायची तेंव्हा त्यांना खोटे सांगितले जायचे कीं ही हेराफेरी पाकिस्तानच्या अणूबाँबच्या गुप्त प्रकल्पासाठी होती. लोकांच्यात या एका विषयात इतकी प्रखर देशभक्ती व स्वाभिमान होता कीं लोक बोलायचे नाहींत. पण खरी गोष्ट अशी होती कीं ही हेराफेरी लष्करी अधिकारी करायचे!

झियांनाही माहीत होते कीं कहूताप्रकल्प चलता ठेवण्यासाठीची अमेरिकेची मदत व राजकीय सदिच्छा मर्यादित होत्या. मग झियांना भूतपूर्व परराष्ट्रमंत्री आगाशाही यांचा सल्ला आठवला. आगाशाही म्हणत असत कीं अमेरिकेने चालविलेल्या अफगाणयुद्धावर अवलंबून न रहाता पाकिस्तानला नव्या मित्रराष्ट्रांशी संघटन करून स्वतंत्र पैसे उभारण्याचा खात्रीचा मार्ग शोधला पाहिजे. पाकिस्तानच्या दृष्टीने कहूताप्रकल्प म्हणजे पैसा वाहून जाणारे एक प्रचंड भोक होते. प्रकल्प चालू ठेवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च होई पण युरेनियम शुद्धीकरणाबाबतच्या खानसाहेबांच्या सुधारणा इतक्या अद्वितीय व किमती होत्या कीं त्या विकून सहज पैसे उभे करता येण्यासारखे होते. ज्या हातावर मोजण्याइतक्या राष्ट्रांनी शुद्धीकरणासाठी सेंट्रीफ्यूजप्रणाली वापरली होती व तिच्यावर प्रभुत्व मिळविले होते त्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स व पाकिस्तान यापैकी हे तंत्रज्ञान विकायला चीन व पाकिस्तान ही दोनच राष्ट्रें मोकळी होती कारण त्यांनी अण्वस्त्रप्रसारबंदीच्या करारावर सही केली नव्हती!

खानसाहेबांच्या करारी व निर्धारी स्वभावामुळे पाकिस्तान सेंट्रीफ्यूजप्रणालीमध्ये चीनच्याही अनेक वर्षें पुढे होता व त्या प्रणालीद्वारा अतिशुद्धीकृत अण्वस्त्रयोग्य युरेनियम बनवू शकत होता. योग्य व श्रीमंत गिर्‍हाईक मिळाल्यास पाकिस्तान या सेंट्रीफ्यूजप्रणालीद्वारा अब्जावधी डॉलर्स मिळवू शकणार होता. झियांच्या मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांच्या मतानुसार १९८५च्या सुरुवातीपासून एक उच्चभ्रू समिती झियांच्या निर्देशनाखाली अतीशय गुप्तपणे कहूताच्या प्राविण्याबाबत व कहूताकडे असलेल्या परमाणूसंबंधीच्या मालमत्तेची खानेसुमारी करू लागली.

भावी गिर्‍हाइकांबाबत प्राथमिक चर्चा १९८५च्या सप्टेंबरमध्ये पाकिस्तानी परराष्ट्रखात्याच्या शिष्टमंडळाच्या इराण, सीरिया व लिबिया या राष्ट्रांच्या परराष्ट्रखात्याच्या शिष्टमंडळाशी झालेल्या व्यूहात्मक सहकार्याबद्दलच्या बैठकींत झाली. या विषयाबद्दलची संवेदनाशीलता व अण्वस्त्रप्रसारात गुंतल्यास व हा व्यवहार उघडकीस आल्यास सर्व जगाच्या बहिष्काराला तोंड द्यावे लागेल व अमेरिकेची मदत आटेल याची जाणीव या सार्‍यांना होती. पण असे असले तरी लष्कराच्या मुख्यालयातील एकाही ज्येष्ठ अधिकार्‍याला असे करणे अनैतिक ठरेल किंवा हा धोका फार खतरनाक आहे असे वाटले नाहीं. या व्यापाराबद्दलचा उत्साह कांहीं अंशी झियांच्या प्रारंभापासूनच्या मतांतून आलेला होता. ते पहिल्यापासून म्हणत कीं पाकिस्तानने हे तंत्रज्ञान मुस्लिम 'उम्मा'बरोबर विभागावे.

झिया एक धार्मिक सुन्नी मुस्लिमच होते असे नाहीं तर ते 'देवबंदी' या कट्टर पंथाचे अनुयायी होते व त्यामुळे शिया बहुसंख्य इराणला हे तंत्रज्ञान देण्याबद्दल त्यांना जरा मळमळ वाटे. पण त्यावेळी इराकबरोबरच्या युद्धात प्रत्यक्ष गुंतलेला व अफगाणिस्तानमध्ये आलेले सोविएत सैन्य इराणमध्येही घुसेल या भीतीने ग्रस्त झालेला इराण संरक्षक (defensive) पवित्र्यात होता. इराण स्वतःला हजारों वर्षांचा समृद्ध इतिहास असलेली एक प्राचीन संस्कृती समजत असे. याउलट पाकिस्तानला १९४७ साली जन्मलेले 'कालचे पोर' समजत असे. ISI ला इराणमधील अंतर्गत शिया जहालवादाबद्दल भीती वाटे व पाकिस्तानमध्ये अराजक पसरविण्यात त्यांचा हात आहे असेही ISI ला वाटे. याविरुद्ध सुन्नी अतिरेकी संघटना इराणला नेहमीच डिवचत असत व इराण या घटनांसाठी सहाय करण्यावरून ISI ला जबाबदार धरत असे. इराणमधील शिया राज्यक्रांतीबाबतीत पाकिस्तान जागरुक होता व त्या घटनेने जी नवीन अस्थिरता या भागात निर्माण केली व शिया धर्मातल्या मूलगामी धर्मगुरूंना जे उच्च राजकीय स्थान दिले त्याबद्दल चिंतातुर होता. शिवाय "विशाल सैताना"चा (अमेरिकेचा) तिरस्कार हे इराणच्या परराष्ट्रीय व स्वदेशी धोरणाची कोनशिला असल्याने पाकिस्तानच्या अमेरिकेवर अवलंबून रहाण्याच्या वृत्तीवरून इराण नेहमीच हताश होत असे.

झिय़ांच्या अगोदरच्या राज्यकर्त्यांपेक्षा झियांनी पाकिस्तानी मुल्ला-मौलवींना खूप उचलून धरले होते. त्यामुळे सर्व देशभर 'मद्रासा' या मुस्लिम धर्माच्या नियमांवर भर देणार्‍या धार्मिक शाळा खूप झपाट्याने वाढल्या. पाकिस्तानने इराणमध्ये धर्माधिष्टित राज्यक्रांती झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून या शेजारी राष्ट्राशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता.

मार्च १९७९ मध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आगाशाही आयातुल्ला खोमेनींना भेटायला तेहरानला गेले होते व तेंव्हापासून एकमेकांवरील विश्वास दृढ करण्याच्या प्रयत्नांना सरुवात झाली होती. या भावनांना आगाशाही अमेरिकेच्या कैदेतील मुत्सद्द्यांच्या मुक्ततेसाठी जेंव्हा तेहरानला पुन्हा गेले त्याने आणखी मजबूती आली. तेवढ्यात इराणचे इराकबरोबर प्रलयंकारी युद्ध सुरू झाले व पाकिस्तान या युद्धात इराणचा एक साथीदार बनला कारण इराणला व पाकिस्तानला सोविएत धोक्याला आवरायचे होते! या दोन्ही देशांनी अफगाणिस्तान युद्धाबद्दल सहकार्य तर केलेच पण इराणने आर्थिक सहाय्यही केले. फक्त कुठल्या प्रकारच्या मुजाहिदीनना पाठिंबा द्यायचा याबाबत त्यांच्यात मतभेद होते! १९८६च्या फेब्रूवारीत या विश्वासासार्हता वाढवायच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पाकिस्तान इराणच्या परमाणू प्रकल्पात मदत करायला तयार झाला व खानसाहेब ब्रि. सजवाल यांच्याबरोबर तेहरानला गेले!

इराणच्या अण्वस्त्रांबाबतच्या महत्वाकांक्षाना १९५० सालापासूनच मूर्त रूप येऊ लागले होते. त्यावेळी शहांनी तेहरान विश्वविद्यालयात परमाणू संशोधन केंद्र उभे केले होते. या महत्वाकांक्षा १९७४ सालापर्यंत जोरात होत्या कारण त्यावेळी जर्मनीने पुरविलेल्या परमाणू विद्युत् केंद्राचे काम इराणच्या आखातातले एक बंदर 'बूशहर' येथे सुरू झाले. पण १९७९ साली इराणमध्ये धर्माधिष्ठित सरकार आल्यावर हा प्रकल्प बंद झाला कारण त्या सरकारला कामगारांचे पगार व 'सिमेन्स'च्या जर्मन कंत्राटदारांची ४५ कोटी डॉलर्सची थकबाकी देता आली नाहीं. त्यामुळे जर्मन लोक निघून गेले. जेंव्हा १९८१ साली इराणी परमाणू संघटनेचे (IAEO) प्रमुख रेज़ा अमरोल्लाही यांनी इराणमध्ये भरपूर प्रमाणात युरेनियमचे खनिज असल्याचे जाहीर केले तेंव्हा आयातुल्ला खोमेनी यांनी परमाणू विषयाला पुन्हा हात घातला. १९८४ साली इराणी शास्त्रज्ञ एस्फाहान या शहराजवळील एका भूमीगत परमाणू केंद्रात संशोधन करू लागले आणि इराणने सेंट्रीफ्यूजप्रणालीवर आधारित एक युरेनियम शुद्धीकरणाची प्रयोगादाखलची सुविधा (pilot plant) 'मोआल्लेम कालाये' या तेहरानच्या नैऋत्येला असलेल्या शहरात सुरू केल्याची बातमी पाश्चात्य गुप्तहेर खात्यांना मिळाली.

१९७९ साली सत्तेवर आल्यावर इराणच्या धर्मगुरूंनी अण्वस्त्रांना मुस्लिम धर्माच्या शिकवणीविरुद्ध मानून तुच्छ लेखले होते. पण नंतर इराकबरोबरचे युद्ध जसजसे प्रलयंकारी होऊ लागले तसतसे त्यांनी हे कडक धोरण सोडले. दरम्यान बूशहरातील प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. पण मार्च १९८४मध्ये इराकी विमानांनी बूशहरावर बाँबहल्ला केला आणि एक महिन्यानंतर जर्मन हेरखात्याने "दोन वर्षात अणूबाँब" या इराणच्या ध्येयाबद्दल ऐकले. त्यानंतर काहीं आठवड्यातच फ्रेंच हेरखात्याने बातमी आणली कीं पाकिस्तानकडून तयार अतिशुद्धीकृत युरेनियम आयात करायचे कीं स्वतःचा अतिशुद्धीकरण कार्यक्रम सुरू करायचा यावर चर्चा होत होती. त्यानंतर थोड्याच अवधीत इराणने जाहीर केले कीं त्यांनी उच्चप्रतीचे युरेनियम खनिज खाणीतून काढायला सुरुवात केली आहे. पाठोपाठ इराणच्या शिष्टमंडळाच्या इस्लामाबाद भेटीने पाकिस्तानी योजनेचा पाठपुरावा करण्यात आला.

खानसाहेब नक्कीच इराणला परमाणूविद्या वापरून वीज निर्मितीबद्दल चर्चा करण्यासाठी गेलेले नव्हते तर युरेनियमच्या अतिशुद्धीकरण प्रकल्पासाठी गेले होते. AEOI चे संचालक रेज़ा अमरोल्लाही यांनी स्वतःसाठी आणखी एक गुप्त बैठक बोलावली. क्रांतिकारक सुरक्षादलाच्या (Revolutionary Guards) संशोधन दलाचे ज. एस्लामी यांनी खान यांच्याकडून कहूताप्रकल्पात कार्यरत असलेल्या सुविधांबद्दल माहिती देणारे एक व्याख्यान (presentation) द्यायची विनंती केली. परत आल्यावर खानसाहेबांनी या वृत्तांचा इन्कार केला.

खानसाहेबांना इराणच्या दूरदृष्टीबद्दल व बांधीलकीबद्दल शंका होती. इराणने वापरायला तयार असलेली पाकिस्तानी अतिशुद्धीकरणाची यंत्रे न वापरता स्वतःच ती निर्माण करण्यावर भर दिला याचेही खानसाहेबांना वैषम्य वाटले. पण त्यांनी तो दोन सरकारांतील मुद्दा(*५) समजून तिथेच सोडून दिला! खानसाहेब इस्लामाबादला परतल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष खामेनेई (जे सध्या इराणचे Supreme Leader आहेत) पाकिस्तानला आले व त्यांची परमाणूसहकार्‍याबद्दल झियांच्याबरोबर चर्चा झाली. झियांनी या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला आणि कहूता येथील सर्व साधनसामुग्री इराणला उपलब्ध करून देण्याविषयी एक अतिगुप्त करारावर स्वाक्षरी केली. या स्वाक्षरीबरोबरच इराणी धर्मगुरूंचा अण्वस्त्रस्पर्धेत न उतरण्याच्या निर्णयाचा अंत झाला.
झियांना व खानसाहेबांना आलेली इराणच्या बांधिलकीबद्दलची शंका खरी निघाली!

(†) Used in place of English words: Infrastructure, Charity Foundations, attaché, Comptroller etc.
(‡) ही माहिती सहाव्या प्रकरणात विस्ताराने आलेली आहे.
(*१) Charity Foundation
(*२) त्यांचे कोडनाव होते "The cyclone"!
(*३) ही 'स्टिंगर' प्रक्षेपणास्त्रें रशियाच्या हिंड हेलिकॉप्टर्सना खाली पाडण्यासाठी अमेरिकेने खूप गुप्ततेत व वादविवादानंतर मुजाहिदीनना दिली होती. या स्टिंगर क्षेपणास्त्रांची लोकप्रियता आजपर्यंत अबाधित आहे.
(*४) ही घटनेचे 'Iran-Contra Scandal'शी बरेचसे साम्य वाटते.
(*५) आणि असे असूनही त्यांच्यावर हा काळा धंदा एकट्याने केल्याबद्दल खटला चालवून व जबरदस्तीने कबूलीजबाब वदवून कैदेत टाकले. हे आहे पाकिस्तानी कृतज्ञतेचे उदाहरण!
Sudhir Kale JP-Silver Jubilee_1.JPG

गुलमोहर: 

Abdul Qadeer Khan हा व्यक्ती सद्दाम आणि ईराक यांपेक्षाही धोकादायक होता, पण अमेरीका त्याला अण्वस्रांची सौदेबाजी करण्यापासून थांबवू शकली नाही
.... माहितीपुर्ण लेखासाठी धन्यवाद

>>> BCCI बँकेचे दिवाळे वाजल्यानंतर अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने जी चौकशी केली त्यात अकाउंटिंगचे अनेक घोटाळे दिसून आले. BCCI अनेक थरांची बनली होती. या थरांचा एकमेकांशी संबंध होल्डिंग कंपन्यांतून, सहकारी कंपन्यांतून, बँकेत-बँक, आतून आलेल्या बातम्या व नॉमिनी पद्धतीच्या व्यवहारावर असायचा.

BCCI (Bank of Commerce and Credit International) ही बँक १९९१ साली बुडाली. या बँकेतून मोठ्या प्रमाणात हवाला ट्रान्झॅक्शन्स व मनी लाँडरिंग होत होते.

आणि असे असूनही त्यांच्यावर हा काळा धंदा एकट्याने केल्याबद्दल खटला चालवून व जबरदस्तीने कबूलीजबाब वदवून कैदेत टाकले. हे आहे पाकिस्तानी कृतज्ञतेचे उदाहरण
---- `अण्वस्त्र`प्रसार संबंधातील सर्व घटनांची आणि त्यात गुंतलेल्यांची इत्यंभुत माहिती अमेरिकेला होती. प्रसाराचे प्रकरण उघडकीला आल्यावर (आंतर-राष्ट्रिय स्तरावर दिसेल आणि पटेल असे) कुणाला तरी बळी देणे गरजेचे होतेच. बळी देण्यासाठी कादरखान पेक्षा दुसरे कुणिच लायक नव्हते. ते पाकचे हिरो आहेत.

तत्कालीन अध्यक्ष मुशर्रफ यांनी अत्यंत बुद्धीमान आणि कुतिल मुत्सद्दी पणा पुन्हा एकदा दाखवला आणि अत्यंत नगण्य किंमतीत हे प्रकरण निकालात काढले. अमेरिकेची त्यांच्या माफी (pardon) प्रकरणाला मुक संमती होती वा त्यांनी त्याच्या मोबदल्यात कजुन काही मोठे पदरात पाडले असेल. नंतर काही वर्षांनी, अमेरिकेत CNN वर मुलाखत देतांना `कुठल्याही पाष्चात्य राष्ट्राने माझ्याकडे कादरखान यांची चौकशी करण्याचा प्रस्ताव ठेवला नव्हता, प्रस्ताव नव्हता तर चौकशी बाबत परवानगीचा प्रश्नच निकालात निघतो` असे काहीसे मजेशीर उत्तर दिले होते. कादरखान यांच्याशी आंतरराष्ट्रिय बाजारात पाकची लाज राखण्याबद्दल मुशर्रफ यांनी वेगळा करार केला. जमेल तशा तडजोडी सर्वांनीच केल्या आणि प्रकरण अक्षरश: दाबले.

तिकडे इराक कडे WMD नसतांनाही ति बाळगण्याची शक्यता म्हणुन त्यांना जबर शिक्षा आणि या बाजुला सर्व आनंदी आनंद.... विकीलिंक्स च्या स्फोटालाही असेच दाबण्याचा पण अयशस्वी प्रयत्न अमेरिकेने केला. कशासाठी?

काळे साहेब,

सातही प्रकरणे आज वाचून पुरी झाली...
उत्कृष्ट! हे सर्व ईथे टायपल्याबद्दल शतश: आभार!

पुढील प्रकरणे आहेत का? ईथे टाईपणार आहात का? पुढील वाचायची उत्सुकता आहेच..