Nuclear Deception: फसवणूक- प्रकरण पाचवे : "एकत्र बांधणारे धागे"

Submitted by sudhirkale42 on 4 August, 2010 - 02:46

Nuclear Deception front cover.JPGNuclear Deception: फसवणूक- एकत्र बांधणारे धागे
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© मराठी रूपांतर (मूळ लेखकांच्या वतीने): सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे 'युरेंको'ची युरेनियम शुद्धीकरणप्रक्रिया वीजनिर्मितीपुरती अंशत: शुद्धीकरणाची होती. त्यात योग्य ते बदल करून खानसाहेबांनी सेंट्रीफ्यूजेसची एकापाठोपाठ एक अशी मांडणी करून अतिशुद्धीकृत आणि अण्वस्त्रयोग्य युरेनियम यशस्वीपणे नमुन्यादाखल बनविल्याचे झियांना १९८१ च्या मार्च-एप्रिलमध्ये कळविले होते. १ मे रोजी त्यांच्या फोनची घंटी खणखणली व झियांनी त्यांना फर्मावले कीं ते त्यादिवशी जातीने त्यांचा कहूता प्रकल्प पहायला येत आहेत. पूर्वसूचना न देता खुद्द राष्ट्राध्यक्ष येत होते त्यामुळे खानसाहेबांची एकच तारांबळच उडाली. त्यांनी ब्रि. सजवालना या भेटीबद्दल कळविले व सांगितले कीं ते स्वत: त्यांना त्यांच्या घरी गाडी आणतील व त्यांनी त्यांच्याबरोबर यायला गणवेषात तयार असावे.

झियांची कल्पना होती कीं शाळा-कॉलेजात असतो तसा कांहींतरी प्रकार त्यांना पहायला मिळेल, पण त्यांना दिसली ती शुभ्र कोटातल्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली काचेच्या दालनांत शांतपणे फिरणार्‍या सेंट्रीफ्यूजेसची मालिका असलेली एक पाश्चात्य प्रयोगशाळेच्या धर्तीवरची प्रयोगशाळा! त्यांचे डोळे विस्फारले व ते उद्गारले कीं हे तर एक साम्राज्यच आहे!
ही झियांची कहूताभेट खानसाहेबांना व त्यांच्या सहकार्‍यांना नीतिधैर्य देणारी ठरली. झिया इतके दिपून गेले होते कीं त्यांनी तडकाफडकी "Engineering Research Laboratories" या सध्याच्या नावाऐवजी "Dr. A. Q. Khan Research Laboratories" असे नवे नांव ठेवले. "असा सन्मान कुठल्याच वैज्ञानिकाला त्याच्या हयातीत कधीच मिळाला नव्हता!" असे खानसाहेब आपल्या स्वभाववैशिष्ट्यानुसार आढ्यतेखोरपणे लिहून मोकळे झाले.

झियांनी खानसाहेबांना प्रशस्तीपत्रकेही (citations) दिली. त्यातले एक खानसाहेबांनी फ्रेम करून मुख्यालयात लावले व प्रत्येक पाहुण्याला ते अभिमानाने दाखवत असत. त्यांच्या नावाचा फलकही मुख्य फाटकावर लागला. झियांनी त्यांना अधीक निधी उपलब्ध करून दिला व cold testing साठी एक बाँब बनविण्याची व दुप्पट गतीने काम करण्याची आज्ञा केली.

एवढी मोठी घटना झाली पण त्याचे प्रतिसाद कुठेच उमटले नाहींत. उलट मे १९८१ साली पाकिस्तानवर असलेली नियंत्रणे सहा वर्षांसाठी उचलण्यात आली व १०० कोटी डॉलर्सची मदत व F-16 विमानेही विकायची अनुज्ञाही मिळाली*१!

या दरम्यान CIAचे पाकिस्तानसाठीचे नवे प्रमुख हॉवर्ड हार्ट इस्लामाबादला आले. इस्लामाबादयेथील दूतावासाची जळालेली इमारत तयार नव्हती (प्रकरण ३ पहा) म्हणून त्यांनी आपले ऑफीस जुन्या 'USAID'च्या इमारतीत थाटले. आता इथूनच अफगाणिस्तानमधील युद्धाचे नियंत्रण केले जायचे होते. हार्टना स्पष्ट आदेश होते की अण्वस्त्रप्रकल्प व पाकिस्तानातील इतर अंतर्गत बाबीवर त्यांनी लक्ष द्यायचे नाही, त्या गोष्टी परराष्ट्रखाते सांभाळेल. हार्ट यांचे पाकिस्तानी संपर्काधिकारी होते ISI चे प्रमुख व झियांशी खूप जवळीक असलेले ज. अख्तर अब्दुर रहमान. पाकिस्तानला रशियाला डिवचायचे नव्हते म्हणुन ही बंडखोरी हलकीच ठेवायची होती. शिवाय कुठल्या अफगाण मुजाहिदीनना कुठली व किती शस्त्रे द्यायची हे ठरवायला ISI लाही वेळ हवा होता.

दरम्यान पाकिस्तानला प्रचंड मदत देण्याच्या रेगन यांच्या योजनेला विरोध वाढतच राहिला. त्यात २ जून १९८१ रोजी इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत यहूदा ब्लूम यांनी एक सनसनाटी बातमी आमसभेत फोडली. त्यानुसार 'खान रिसर्च लॅबोरॅटरी'मध्ये युरोपमधील 'युरेंको'कडून चोरलेले तंत्रज्ञान वापरून व चौदा देशांत उभ्या केलेल्या 'डमी' कंपन्यांच्या शृंखलांमधून खरेदी केलेले सुटे घटकभाग वापरून उभारलेली १००० सेंट्रीफ्यूजेस चालू असून आणखी ९००० सेंट्रीफ्यूजेस उभारून वर्षाला ७ अणूबाँब बनविण्यास पुरेल इतके (१५० किलो) अतिशुद्धीकृत युरेनियम बनविण्याची योजना आहे.

अमेरिकेला कित्येक वर्षांपासून हे माहीत होते पण त्या देशाने 'चुप्पी' साधली होती! उलट त्यांनी इस्रायलला एका गुप्त खलित्याद्वारे पूर्णपणे खोटी माहिती कळविली कीं आतापर्यंत पाकिस्तानला सेंट्रीफ्यूजेस चालविण्यात यश आलेले नाहीं व त्यांनी अद्याप अतिशुद्धीकृत युरेनियम बनवलेलेही नाहीं आणि जरी पाकिस्तान्यांनी या अडचणींवर मात केली तरी त्यांना एक अणूबाँब बनवायला लागेल इतके शुद्धीकृत युरेनियम बनविण्याला कांहीं वर्षें लागतील. अणूबाँब वाहू शकतील अशी क्षेपणास्त्रे बनवायलाही दहा एक वर्षें लागतील. थोडक्यात अमेरिका केवळ उपलब्ध असलेल्या गुप्त माहितीचा विपर्यासच करीत नव्हती तर पाश्चात्य परमाणूविषयक नियतकालिकांत कहूताला सेंट्रीफ्यूजेस उभारणीतील अडचणींवर कशी मात करण्यात आली याबद्दलच्या खानसाहेबांनी स्वतःच लिहिलेल्या अनेक लेखांकडेही दुर्लक्ष करीत होती. म्हणूनच अमेरिकेचा गुप्त खलिता वाचल्यावर जेरुसलेममध्ये सन्नाटा झाला. अमेरिका सफाईने थापा मारत होती कारण पाकिस्तान त्यांचे अवघड जागेचे दुखणे झाले होते! इस्रायलची खात्री होती कीं जेवढे इस्रायलींना माहीत होते त्याहून जास्त माहिती अमेरिकनांना होती कारण इराणच्या शहांच्या पतनानंतर अमेरिकेला जाणार्‍या गुप्त माहितीचा भरघोस भाग इस्रायलकडूनच त्यांना जात होता!

खरे तर 'RAW (रॉ)' भारतीय गुप्तहेरसंघटनेने अमेरिकेच्या दूतावासात उगम झालेल्या व सायरस व्हान्स या परराष्ट्रमंत्र्यांना जाणार्‍या संदेशाची प्रत इस्रायलींना दाखविली होती! या संदेशात पाकिस्तान २-३ वर्षांत अणूबाँबचा स्फोट करू शकेल अशी माहिती दिली होती. हे वाचून इस्रायलींना इतका धक्का बसला कीं ते कहूतावर हवाई हल्ला करायची योजना आखू लागले पण अमेरिकेच्या दबावाखाली ती योजना सोडून द्यावी लागली. आणि आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रचांचणीसाठी 'रास कोह' पर्वतात खोल बोगदे खणण्याचेही काम सुरू झाले होते व भारत व इस्रायल आणखीनच चिंतेत पडले.

भारताचे ले.ज. सुंदरजींनी तर पाकिस्तानने जर अणूबाँब बनवला तर कसा प्रतिकार करायचा याबाबत एक 'वॉर-गेम'ही*२ बनवला. पण इस्रायलने १९८१मध्ये अमेरिकन विमाने वापरून, अमेरिकन दारूगोळा वापरून, अमेरिकन उपग्रहाच्या मदतीने नेम साधून इराकमधील ओसीराकवर हल्ला करून ते केंद्र उध्वस्त केले होते व जगाला सांगितले होते कीं अमेरिकेचे धोरण कांहींही असो, इस्रायल अण्वस्त्रधारी बनू पहाणार्‍या नव्या राष्ट्रांची गय करणार नव्हता. आता त्यांनी पाकिस्तानवर नजर रोखली व खानसाहेबांना माल पुरवणार्‍या कंपन्यांवर हल्ले सुरू केले.

पहिला हल्ला झाला खानसाहेबांचे West Berlin Technische Universitat मधले जुने मित्र मेबुसवर व मिग्युलेंवर. या दोघांनी पकिस्तानची फ्लुओराईड व युरेनियम रूपांतराची साधनसामुग्री १९७९ मध्ये बसवून दिली होती. एरलांगेन येथील मेबुसच्या घरात तो घरी नसताना पाकिटातल्या बाँबचा स्फोट झाला. या स्फोटाचे स्वित्झर्लंडमधील बर्न येथे 'कोरा' कंपनीच्या व्यवस्थापकीय निर्देशक एदुआर्ड गेर्मान यांच्या घरी आधीच्या जानेवारीत झालेल्या स्फोटाशी साम्य आढळले. या कंपनीने पाकिस्तानला UF6चे वायूकरण करणारी व या वायूचे पुनर्घनीकरण करणारी यंत्रणा पुरवली होती. अशाच साधनसामुग्रीचा आणखी एक संच निर्यातीला तयार होता त्याचवेळी हा स्फोट झाला. पाठोपाठ कोराने पाकिस्तानशी चालवलेला व्यापार ताबडतोब थांबवावा अशी मागणी करणारा एक निनावी फोनही आला. या घटनेची दोन महिन्यात पुनरावृत्ती झाल्यावर कोराने पाकिस्तानशी असलेला आपला व्यापार थांबवला. अमेरिकेला हे कळले पण मदतीची पहिली गाडी सुटणार होती त्यात खीळ नको म्हणून त्यांनी ही बातमी गुप्तच ठेवली.

बर्नच्या पोलिसांना या बाँबहल्ल्याच्या हल्लेखोरांचा पत्ता लागला नाहीं. फक्त 'दक्षिण आशिया अण्वस्त्रप्रसारविरोधी संघटना' या नावाखेरीज कांहींच हाती लागले नाहीं. अशाच तर्‍हेचे हल्ले अशाच धागादोरा न सापडणार्‍या संघटनांकडून खानसाहेबांशी व्यापार करणार्‍या इतर युरोपीय कंपन्यांवरही झाले होते.

इंटरपोलच्या सहकार्याने मिळालेल्या माहितीनुसार 'अल्कॉम इंजिनियरिंग' या धातूचे घटकभाग पुरवणार्‍या कंपनीलाही अशाच तर्‍हेची पत्राद्वारे दमदाटी झाली होती व परिणामार्थी या कंपनीने पाकिस्तानशी व्यापार थांबविला होता. १९८१च्या 'मे'मध्ये १९७६पासून पाकिस्तानशी व्यापार करणार्‍या व मार्कडॉर्फ गावातल्या एका कंपनीतही स्फोट झाला. पाठोपाठ नोव्हेंबरमध्ये आलब्रेक्ट मिग्युलेंच्या फ्राइबर्गमधील घरी पाठविलेल्या पाकिटातल्या स्फोटकाचा स्फोट झाला. स्विस पोलिसांचे गुन्हा अन्वेषण धडपडतच चालले होते. यात सरकारी दहशतवादाचा हात असल्याचा त्यांना संशय आला व 'मोसाद'चे नांव सर्वात वर होते. ग्रिफिननाही असाच अनुभव आला. एकदा बॉनला गेलेले असतांना एका 'बार'मध्ये एक अनोळखी माणूस त्यांच्या शेजारी येऊन बसला व "तुम्ही करताय् ते आम्हाला पसंत नाहीं. तरी ते थांबवावे" असा निरोप देऊन तो नाहींसा झाला. मग ग्रिफिन आपल्या सर्व व्यवहाराचे व हालचालींचे टिप्पण ठेवू लागले आणि कंपनीचे सर्व दस्तावेज बॅन्केच्या वॉल्टमध्ये ठेवू लागले व आपले कांहीं बरे-वाईट झाल्यास काय करायचे याबद्दल सूचनाही त्यांनी आपल्या पत्नीला दिल्या.

दुसरीकडे रेगन यांच्या कंपूने अण्वस्त्रप्रसारबंदीबाबतच्या आपल्या निष्ठेचे नाटक चालूच ठेवले. इराकमधील अण्वस्त्र बनवणारी सुविधा नष्ट केल्यावर रेगन म्हणाले कीं अमेरिकेचा अण्वस्त्रप्रसाराला विरोध आहे व अण्वस्त्रप्रसार होऊ नये म्हणून जरूर ते सर्व अमेरिका करेल*३. पुढे जूनमध्ये जॉन ग्लेन यांच्या 'शासन कारभार समिती'ला*४ त्यांनी सांगितले कीं त्यांना पाकिस्तानकडून निखालस ग्वाही मिळाली आहे कीं पाकिस्तान अण्वस्त्रें बनविणार नाहीं किंवा त्यांची चांचणीही करणार नाहीं. सप्टेंबरमध्ये उपपरराष्ट्रमंत्री बकलींनीही प्रतिनिधी सोलार्त्झ व प्रतिनिधीगृहाच्या परराष्ट्रसंबंध समितीपुढे दिलेल्या साक्षीत सांगितले कीं अमेरिकेची अशी भरघोस मदत मिळाल्यावर पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रप्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचे नक्की थांबवेल व संयुक्त राष्ट्रांतर्फे निर्बंध लादून अयशस्वी झालेल्या प्रयत्नांऐवजी रेगन सरकार अशा राष्ट्रांना मदत देऊन त्यांची अण्वस्त्र बनवायची मूलभूत गरजच नाहींशी करून अण्वस्त्रप्रसार थांबवणार आहे. ग्लेनचे सहायक म्हणाले कीं अण्वस्त्रसज्ज होऊ पहाणार्‍या राष्ट्राला पैसे व विमाने बक्षीस देणे ही एक विपरीत पद्धतच झाली.

अशा साक्षी चालू असतानाच अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे करार 'मागच्या दाराने' आणखी स्पष्ट करण्यासाठी बकलींच्या व इतर अधिकार्‍यांच्या इस्लामाबाद वार्‍या चालूच होत्या! थोडक्यात अमेरिकेला हे पाकिस्तानला स्पष्ट करायचे होते कीं रेगन यांचे "अमेरिका पाकिस्तानच्या अण्वस्त्र महत्वाकांक्षांच्याकडे दुर्लक्ष करेल" हे विधान चुकून केलेले विधान नव्हते. म्हणूनच F-16 विमानांच्या आगमनानंतर ज. आरिफनी अण्वस्त्रांचा विषय काढताक्षणी बकली उद्गारले होते कीं त्याबद्दल बोलायची गरजच नाहीं.

१९८१च्या डिसेंबरमध्ये ३२० कोटी डॉलर्सच्या मदतीवर सिनेटने शिक्कामोर्तब केले. इस्रायल व इजिप्तनंतर पाकिस्तान एवढी मोठी मदत मिळविणारे तिसर्‍या क्रमांकाचे राष्ट्र होते. रेगन सरकारने प्रतिनिधिगृहाला सांगितले होते कीं ही मदत पाकिस्तानने अण्वस्त्रप्रकल्प बंद करण्याशी निगडित आहे. पण जेंव्हा आगाशाहींनी बकलींना मुद्दाम विचारले कीं उद्या आम्ही बाँब बनवला व चांचणी करायचे ठरविले तर अमेरिका त्याबद्दल कांहींच करू शकणार नाहीं. त्यावर बकली म्हणाले ते अमेरिकेला माहीत आहे.

दरम्यान पाकिस्तानच्या खरेदीजालाचे धागे पाश्चात्य व इस्रायली हेरखात्याला मिळत राहिले व पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचे पुरावेही समोर येऊ लागले. १९८०च्या एप्रिलमध्ये अझीझसाहेबांसकट तीन पाकिस्तानी कॅनेडियन लोकांना अटक झाली. सिहालाप्रकल्प छोट्या प्रमाणावर सुरुवात झाल्यापासून कहूतापर्यंतच्या वाटचालीचे वर्णन करणारी, खानसाहेबांच्या विश्वासू सहकार्‍यांची आणि माल पुरवणार्‍या कंपन्यांची नावे असलेली खानसाहेबांची पत्रेही जप्त झाली. पण ही केस क्यूबेकमधील कोर्टात बंद दारांमागे चालली व पुरावाही सीलबंद केला होता!

अण्वस्त्रांबद्दलची रहस्यें, खास करून अमेरिकन कंपन्यांनी बरेच घटकभाग खानसाहेबांना पुरवल्याबद्दलची रहस्यें, गुप्त ठेवण्यासाठी कॅनेडियन सरकारने या खटल्याची मुस्कटदाबी केली होती असे वाटते. पण त्यामुळे अमेरिकन प्रतिनिधीगृहाला इतर बाबतीतही तपास करता आला नाहीं. पुढे अज़ीजसाहेब "मी केवळ खाद्यप्रक्रियेची व वस्त्रनिर्मितीची निरुपद्रवी सामुग्री विकली" असा युक्तिवाद करून निर्दोष सुटले. पण खूपसे पुरावे या खटल्यात अडकून राहिल्यामुळे खानसाहेबांच्या अनेक 'डमी' कंपन्यांचे अस्तित्व वगैरेबद्दलचा तपास झालाच नाहीं व झियांचे "शांततेसाठीच परमाणूतंत्रज्ञान, आम्ही कष्ट करू, उसनवारी करू, भीक मागू पण ते ज्ञान दुसर्‍याला देणार नाहीं"चे तुणतुणे चालूच राहिले.

याच वेळी ५००० पौंडाची झिर्कोनियम धातूची SJ Enterprise या 'डमी' कंपनीला चाललेली निर्यात पकडली गेली. एका पाकिस्तानी प्रवासी तो माल न्यूयॉर्कच्या केनेडी विमानतळावर 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरवेज'च्या विमानात 'गिर्यारोहणाचे साहित्य' या खोट्या नावाखाली चढवत होता. कस्ट्म्सच्या अधिकार्‍यांनी ते सामान उघडायला सांगितल्याबरोबर तो प्रवासी नाहींसा झाला. तो एक झियांचा खास दोस्त व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होता. चौकशीचे अश्वासन दिले गेले पण कांहींच चौकशी झाली नाहीं.

'व्हाईटहाऊस'ला उत्तर अमेरिकेमधील व प. युरोपमधील खानसाहेबांच्या सेंट्रीफ्यूजेसना, कार्यशाळांना (machine shops) व संशोधनाला लागणार्‍या सुविधांच्या घटकभागांच्या 'खरेदीजाळ्या'ची बित्तंबातमी होती पण ती प्रतिनिधीगृहाला कधी पोचायचीच नाहीं. पण परराष्ट्रखात्याच्या नजरेखालून जाणार्‍या हजारों तारांमधील "पाकिस्तान अणूबाँब बनवायचे जोरात प्रयत्न करतोय् व अण्वस्त्राचा स्फोट सुरू करण्यासाठी लागणारी उपकरणें शोधत आहे अशी दाट शंका आम्हाला आहे" अशा आशयाची एक महत्वाची तार त्यात होती.

झियांनी खानसाहेबांना शीतचांचणी†साठी दिलेला आदेश CIA ला कळला होता. बाँब बनवायची जबाबदारी PAEC चा संस्थापक सदस्य व मुलतानच्या बैठकीला हजर असलेला डॉ. मुबारकमंद यांच्याकडे होती. इस्लामाबादच्या उत्तरेस असलेल्या 'वाह'च्या दारूगोळ्याच्या कारखान्यात काम करणारा मुबारकमंद एका अज्ञात प्रयोगशाळेत सहकारी शास्त्रज्ञांच्या व अभियंत्यांच्या गटाबरोबर १९७४ सालापासून काम करत होता पण अणूबाँबची संरचना अजून संपली नव्हती. १९८१ साली झियांनी केवळ एक 'शर्यत' लावण्यासाठी खानसाहेबांनाही कहूताला प्रतिस्पर्धी गट बनवायला सांगितले.

इतके इशारे मिळूनही रेगन यांनी झियांना 'व्हाईटहाऊस'ला निमंत्रित केले. त्या प्रसंगीच्या शाही जेवणाच्या वेळी (डिसेंबर १९८२) प्रशंसापर भाषणात रेगन म्हणाले कीं अमेरिका व पाकिस्तान यांच्या संबंधांत मतभेद झाले आहेत पण ते क्षणभंगुर होते. आपल्याला एकत्र बांधणारे धागे*५ मात्र दर वर्षी मजबूतच होत चालले आहेत. दुसर्‍याच दिवशी झियांनी पाकिस्तानवर लबाडीचा आरोप करणार्‍यांना 'आमच्या मुलकी परमाणूप्रकल्पावर अस्तित्वातही नसलेल्या लष्करी महत्वाकांक्षांचा आरोप करून पाकिस्तानच्या नालस्तीची एक खोटी मोहीमच सुरू करण्यात आलेली आहे' या शब्दात धारेवर धरले! NEC च्या Meet the Press कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले कीं "शांतीपूर्ण परमाणू उपकरण" कधीच नसते. ते उपकरण एक तलवार आहे. तुम्ही आपला गळा कापून घेऊ शकता. तुम्ही स्वतःला वाचवू शकता. आम्हाला दोन्ही करायचे नाहीं.

एका वर्षात एक बदनाम राष्ट्र म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून जेवू घातले गेलेले राष्ट्र बनले. नाताळच्या निमित्ताने अमेरिकन जनतेला दिलेल्या चित्रवाणीवरील भाषणात रेगननी दूरवर पहाडी मुलुखात स्वातंत्र्यासाठी रशियाशी झुंजणार्‍या झुंजार अफगाण योद्ध्यांची अमेरिकन लोकांना आठवण करून दिली व त्याचा अमेरिकन जीवनावर कसा परिणाम होतोय हे "आपल्यापासून कितीही दूर असले तरी अफगाणी योद्ध्यांची ही झुंज आपण विसरता कामा नये" या शब्दात विशद केले.
पण रेगन कंपूच्या खानसाहेब अणूबाँबची संरचना करत आहेत याबद्दलचा पुरावा दडपायच्या हालचाली पडद्यामागून चालूच होत्या. अण्वस्त्रांची स्फोटक शक्ती कित्येक पटीने वाढवू शकणार्‍या बेरिलियम परावर्तकांची खरेदी ब्रिटिश हेरखात्याने उघडकीस आणल्यावर रेगननी CIAचे ज्येष्ठ अधिकारी ज. वर्नन वॉल्टर्स यांना झियाला ताकीद देण्यासाठी घाईघाईत १९८२च्या ऑक्टोबरमध्ये इस्लामाबादला धाडले. परराष्ट्रखात्याच्या मध्यपूर्व व दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख रॉबर्ट गालुच्चीही बरोबर गेले. "अमेरिकन सरकार तुम्हाला खलित्यावर खलिते पाठवत आहे व सांगत आहे कीं तुमच्या सरकारातील कांहीं लोक मोठ्या चुका सातत्याने करत आहेत!" या चुकांचा पुरावाही त्यांनी झियांना दाखवला. पण ही माहिती तुम्हाला भारताकडून मिळालेली चुकीची माहिती आहे असे सांगून झियांनी हे आरोप नाकारले. कहूताचे फोटो दाखवल्यावर "हे परमाणूकेंद्र कसे असेल? ही तर बकर्‍या बांधायची टपरी आहे" असे उडवा-उडवीचे उत्तर दिले. झिया त्यांच्याशी खोटं बोलत होते यावर वॉल्टर्सचा विश्वासच बसेना!

पण वॉल्टर्सना 'व्हाईटहाऊस'कडून झियांना अत्यंत अदबीने त्यांचे अण्वस्त्रप्रकल्पाचे खरेदीचे व्यवहार जास्त गुप्तपणे करायला सांगण्याची आज्ञा होती, अण्वस्त्रप्रकल्प बंद करण्याची नव्हे हे गालुच्चींना माहीत नव्हते! वॉल्टर्सनी पडलेल्या चेहेर्‍याने त्यांच्या वरिष्ठांना सांगितले कीं मला हुकूम होता कीं झियांना त्यांचे परमाणूधंदे गुपचुप करा असे सांगायचा. म्हणजे सडेतोडपणे हे उद्योग बंद करायला सांगायच्या ऐवजी रेगन त्यांना ते गुपचुप करायला व त्यांना स्वतःला अडचणीत न आणायला सांगत होते. त्यांचे वरिष्ठही चाटच पडले कारण रेगन जनतेला एक सांगत होते तर करत होते उलटेच!

पण झियांनी कांहीं ऐकले नाहीं व पुरावे वाढत गेले! गुप्तहेर, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी, फोनटॅपिंग, उपग्रह, मानवी व तंत्रज्ञानावर आधारित अशा अनेक मार्गाने मिळविलेली माहिती परराष्ट्रखात्याकडे होती, पण रेगन यांच्याकडून त्यांना आदेश हवा होता. राजनीती हा या अधिकार्‍यांचा प्रांत नव्ह्ता. शेवटी रेगन हे अण्वस्त्रप्रसारबंदीचे खंदे पुरस्कर्ते होते ही एक परीकथाच निघाली.

कहूताच्या आसपास पाळत ठेवण्यासाठी त्या पर्वतावरील खडकात बेमालूमपणे मिसळून जाईल अशी एक 'हायटेक' यंत्रणा तिथल्या डोंगरावर ठेवली होती. दुर्दैवाने एका उघड्या ट्रकमधून त्या टेकडीवरून जाणारा एक पाकिस्तानी विद्यार्थी बेभान थट्टा-मस्करी करतांना तिथे पडला. पण त्याच्या लक्षात आले की जरी आपले डोके खडकावर आदळले असले तरी आपल्याला मोठी इजा झालेली. शिवाय त्या 'खडका'तून अनेक दिवे मिचमिचतही होते व खडकातून 'भिरभिरे' आवाजही येत होते. नंतर हा खडक पाकिस्तान्यांनी हलवून हेरगिरी प्रशिक्षण केंद्रात ठेवला.

झिया अण्वस्त्रनिर्मितीत गुंतले नाहींत असे प्रशस्तीपत्र सतत तिसर्‍या वर्षी दिल्यापासून चारच महिन्यात गालुच्चींनी अत्यंत प्रतिकूल असा अहवाल सादर केला. "पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मितीत सक्रीयपणे गुंतलेला आहे" असा निःसंदिग्ध पुरावा उपलब्ध आहे. झियांच्या राजनैतिक व स्थानिक धोरणानुसार कारणांसाठी झिया म्हणतील त्याक्षणी 'तात्काळ' अण्वस्त्रचांचणी घेण्याची क्षमता असणे हा पाकिस्तानचा प्राथमिक उद्देश आहे.

सगळ्यात नुकसानकारक भाग होता 'परमाणू स्फोटकां'चा. यात अण्वस्त्रें डागण्याची प्रक्रिया कार्यप्रवण करणारे प्रज्वलक‡ बनविणार्‍या इलेक्ट्रॉनिक विद्युत्मंडलांवर पाकिस्तान कसा काम करीत होता, बाँबच्या गाभार्‍यावरील स्फोटक अशा नेहमीच्या आणि खास आकारांच्या आवरणांवर (परमाणूविघटनाच्या साखळीप्रक्रियेची*६ सुरुवात या आवरणांपासून होते) कसे काम करत होता याबद्दल माहिती दिली होती. असे संरचनेचे व स्फोटकांचे बरेच प्रयोग पाकिस्तानने आधीच केले असून तो आता एक चांचणीयोग्य बाँब बनवण्याच्या टप्प्यावर आला आहे या निष्कर्षावर गालुच्ची आले होते. वॉल्टर्सनी झियांना त्यांच्या खरेदीचे उद्योग उघड-उघड करू नयेत ही सूचना देऊनही खरेदी केलेल्या कितीतरी गोष्टी त्यात होत्या इतकेच काय कीं जी ड्रॉइंग्ज खानसाहेबांच्या सहाय्यकांनी माल पुरवणार्‍या कंपन्यांना दिली होती तिच्या प्रतीही गालुच्चींनी मिळविल्या होत्या व त्यात दाखविलेला माल स्पष्टपणे अण्वस्त्रसंबंधित होता.

गालुच्चींना पाकिस्तानच्या चीनबरोबरच्या कराराची धक्कादायक बातमीही मिळाली. चीनकडून आलेल्या ड्रॉइंग्सवर मॅन्डारिन भाषेतली माहिती अमेरिकेत तपासून पाहता १९६४ साली 'लोप नोर' येथील चीनच्या बाँबस्फोटाशी उल्लेखनीय साम्य आढळले व यावरून चीनने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीत अण्वस्त्रप्रसारबंदीच्या अटींना धाब्यावर बसवून भरघोस मदत दिली होती हे गालुच्चींना उघड झाले. ही माहिती इतकी सर्वंकष होती की तीवरून फुटबॉलच्या आकाराच्या पाकिस्तानच्या भावी अणूबाँबची प्रतिकृतीही बनवून पेंटॅगॉनमध्ये ठेवली गेली. शिवाय त्यात अनेक डिटोनेटर्स होते व संगणकाच्या सिम्यूलेशनमध्ये प्रत्येक वेळी ते डागले गेले.

एवढेच नव्हे तर हवे तितके युरेनियम कहुताप्रकल्पात बनायच्या आधीच झिया चांचणीला तयार झाल्यास अडचण येऊ नये म्हणून चीनने एक-दोन बाँब बनविता येतील इतके अण्वस्त्रयोग्य अतिशुद्धीकृत युरेनियमही पाठविले होते व खानसाहेबांच्या शास्त्रज्ञांनी चिनी संरचनेच्या बाँबमध्ये सरकवता येईल असा युरेनियमचा गाभाही बनवला होता. हा चांचणी बाँब २०-२५ किलोटनचा चीनने केलेल्या चौथ्या चांचणीस्फोटाइतका व एक लाखाचा नरसंहार करू शकेल अशा शक्तीचा होता.

चिनी लोकांनी पाकिस्तानचे युरेनियम शुद्धीकरणाचे कालचक्रही सुधारून दिले होते व या चीन-पाकिस्तान संबंधांतील वैशिष्ठ्यांना गालुच्चींनी अधोरेखित केले. चीनसारख्या अनुभवी अण्वस्त्रधारी राष्ट्राची मदत मिळाल्याने पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पातल्या एरवी जाणवल्या असत्या अशा अडचणी चुटकीसरशी सुटू लागल्या होत्या. तरीही १९८३ साली आपल्या सायमिंग्टन-ग्लेन घटनादुरुस्त्यांमुळे पाकिस्तानला मदत देण्याबद्दलच्या अडचणी बाजूला केल्याच्या समर्थनार्थ प्रतिनिधीगृहाला पाठविलेल्या एका गुप्त अहवालात रेगन यांनी ठोकून दिले होते कीं नजीकच्या भविष्यकाळात पाकिस्तान अण्वस्त्रचांचणी करेल असे वाटत नाहीं कारण कहूता व पिन्सटेक प्रयोगशाळेतून (PINSTECH) पाकिस्तानला शुद्धीकृत युरेनियम मिळायला अडचणी आहेत.

याउलट एका सुरक्षेच्या वेढ्यात कहूतात काम जोशात चालले होते. मुख्य फाटकावर सोनेरी रंगाची चकचकीत अक्षरे असलेली खानसाहेबांच्या नावाची पाटी झळकत होती, ISI चे व हेरखात्याचे सैनिक इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर गस्त घालत होते. ब्रि. सजवाल या व्यवस्थेचे प्रमुख होते व त्यांची या रस्त्यावर हलणार्‍या प्रत्येक वस्तूवर नजर होती. प्रत्येक आयात केलेल्या मालाचा अहवाल सैन्याच्या मुख्यालयाला दिला जायचा. टेकडीवरही सशस्त्र सैनिक तैनात होते. सैनिकी हेरखाते, १०००० सैनिकांच्या दोन ब्रिगेड्स, एक विमानवेधी तोफखाना, एक श्वानपथकासह कमांडो तुकडी व संकेतपलटणф अशी रचना होती. मध्यावर चार आत्मनिर्भर असलेले विभाग होते. मध्यवर्ती व सगळ्यात जास्त संवेदनाशील असे सेंट्रीफ्यूजेसचे दालन होते, B विभाग क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी होता, संवेदनाशील नसलेल्या कार्यशाळा (workshops) होत्या व जखमा व किरणोत्सर्गामुळे झालेल्या विकारांवर इलाज करू शकणारा वैद्यकीय विभागही होता. एका विभागात काम करणार्‍याला दुसर्‍या विभागात प्रवेश करायला मनाई होती. कुठेही पाट्या नव्हत्या. भेट देणार्‍या पाहुण्यांसाठी व तंत्रज्ञांसाठी वातानुकूल यंत्रणेला लागणार्‍या पाण्यासाठी बांधलेल्या कृत्रिम तलावाकाठी बांधलेली अतिथीगृहे होती. ज्या देशांचे लोक इतरात मिसळू इच्छित नव्हते असे चिनी, इराणी व उत्तर कोरियन लोक या अतिथी गृहात रहात.

सर्व हालचाली शीतचांचणीच्या दिशेने घोडदौड करत होत्या. रेगन यांनी पाकिस्तानला अण्वस्त्रांच्या मार्गापासून दूर करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचे कौतुक करून दोनच महिने झाले होते तर मार्च १९८३मध्ये अण्वस्त्रचांचणीसाठी सरगोढा या हवाईदलाच्या सर्वात मोठ्या तळापासून व दारूगोळ्याच्या कोठारापासून जवळ असलेल्या 'किराना' डोंगरात भूमीगत बोगदे खणण्याचे कामही सुरू झाले. शीतचांचणीची जबाबदारी डॉ मुबारकमंद या PAEC च्या शास्त्रज्ञाकडे होती. त्यांनी खानसाहेबांच्या सहाय्याने नुकताच एक चांचणीयोग्य बाँब बनवला होता. शास्त्रज्ञांनी अमेरिका व जर्मनीहून मिळविलेले सुपरसंगणक 'बूट' केले. चांचणीचा उद्देश होता triggering mechanism बरोबर काम करतो कीं नाहीं हे पहाणे. (शीतचांचणीसाठी किरणोत्सर्गी गाभा काढून ठेवला होता.)

एक सशस्त्र लष्करी गाडी हा बाँब घेऊन आली. बाँबच्या सुट्या घटकविभागांची जुळणी त्या बोगद्यातच करण्यात आली, मापनयंत्रें जोडण्यात आणि तपासण्यात आली. पहिली चांचणी रचली होती trigger mechanism चालतो का व परमाणूविघटनमालिका सुरू करण्याएवढे पुरेसे neutrons बनतात कां याची. थोडी बारीकसारीक दुरुस्ती केल्यावर चांचणी यशस्वीरीत्या पार पडली. मग ज. आरिफ, PAECचे प्रमुख डॉ. मुनीर खान व वित्तमंत्री गुलाम इशाक खान यांच्या उपस्थितीत केलेली चांचणीही व्यवस्थित पार पडली. "सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखा दिवस" असे ज. आरिफ उद्गारले. पाकच्या हातात अणूबाँब आला. अशा २४ चांचण्या केल्यावर त्या triggering mechanism स्वामित्व येणार होते.

पण १८ ऑक्टोबरला डच राजदूताने खानसाहेबांवर १९७५ सालच्या 'युरेंको'ची हेरगिरी केल्याच्या आरोप ठेवून त्यांच्यासाठी असलेला कोर्टात हजर रहाण्याचा हुकूम पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयास जारी केला. परराष्ट्रमंत्रालयाने कायदेमंत्रालयाला दिला पण त्यांनी वेळेवर उत्तर न दिल्याने डच कोर्टाने त्यांना गैरहजरीत खटला चालवून दोषी ठरवून चार वर्षें कारावासाची शिक्षाही दिली. खानसाहेब भडकले व किंचाळत राहिले कीं त्यांनी कुठलीही चूक केली नव्हती आणि डचांनी त्यांना समन्सही दिले नाहीं. जी माहिती त्यांनी हॉलंडहून आणली ती मुक्तपणे मिळणारी सार्वजनिक क्षेत्रातली होती! "त्यांच्या लोकशाहीचा त्यांच्याविरुद्ध वापर करून त्यांना छळून काढू!" वगैरे वल्गनाही झाल्या. या खटल्याचा निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेतल्याशिवाय त्यांना हॉलंडला व इतर पश्चिम युरोपीय देशांना भेटणे अशक्य होते. झियांच्या परवानगीने व पाकिस्तानच्या सरकारी खर्चाने त्यांनी खूप नावाजलेल्या व खूप खर्चिक अशा सर डेव्हिड नाप्ली यांना आपला वकील नेमले.

भडकू स्वभाव, इतका गुंतागुंतीचा प्रकल्प चालविण्यातील तणाव व त्यांच्यावरील गुन्हेगारी खटला या सर्वांमुळे त्यांचे हेनीशी भांडण होऊ लागले. डच कोर्टात केस लावल्यावर तिने घटस्फोट मागितला. खानसाहेबांनी तिला शारीरिक इजा करण्याबद्दल धमकी दिली अशी एका मित्राने माहिती दिली. खानसाहेबांनी हा आरोप अमान्य केला. दोघांनी प्रा. हारून अहमद या मानसोपचारतज्ञाकडे जायचे मान्य केले. "मी शांतिप्रिय, हिंदुस्तानची समर्थक व बाँबच्या विरोधात असलेली बाई खानबरोबर कशी जोडली गेले तेच कळत नाहीं. खान कधीही बेसुमार रागावतात, त्यांच्याबरोबर रहाणे असह्य झाले आहे. ते एक सायको केस झाले आहेत" असे उद्गार तिने काढले.

त्यांचा मानसिक तणाव वाढला होता कारण त्यांना "इस्लामिक जगाला बाँब देणारा पहिला शास्त्रज्ञ" व्हायचे होते. युरेनियमच्या शुद्धीकरणाची बाजी त्यांनी मारली पण पहिला बाँबही PAEC ला हरवून त्यांनाच बनवायचा होता. कारण ते फक्त युरेनियमच्या रूपाने कच्चा माल पुरवणार होते, बाँब डिझायनर नव्हे. "मला रेसिंग कार चालवायची आहे, पेट्रोल पंपावरचा 'पोर्‍या' नाहीं बनायचे!" असेही ते म्हणायचे. हेनीनेही या शर्यतीत त्यांना साथ द्यावी असे त्यांना वाटे. खान नव्या-नव्या पायर्‍या चढत होते तर हेनी विणकाम आणि तिच्या कुत्र्यांत रमणारी होती. असुरक्षिततेची भावना असणारे खानसाहेब प्रा. अहमदना वारंवार फोन करू लागले, त्यांना कराचीला जाऊन भेटू लागले व त्यांचे म्हणणे ऐकू लागले.

त्यांच्या फीची भरपाई म्हणून खानसाहेबांनी प्रा. अहमद बनवत असलेल्या मोफत मनोरुग्णालयाचे आश्रयदाते बनून एक इमारत देण्याचा निर्णय घेतला. त्यांना इस्पितळाच्या प्रशासनमंडळावर घेण्यात आले. पण हेनी बरोबरचे त्यांचे संबंध बिघडत गेले. 'होयबां'च्या कळपात वावरणार्‍या खानसाहेबांचा पीडनभ्रम*७ वाढत गेला. हेनी दुरावत गेली. पुन्हा तिने खानसाहेबांनी दिलेल्या शारीरिक इजेच्या, खुनाच्या धमकीची वाच्यता केली. तिच्या व मुलींच्या मागे ISI चे लोक लावले होते हेही त्यांनी मान्य केले. या तिघांची पाकिस्तानपेक्षा युरोपवर जास्त निष्ठा आहे असे त्यांना वाटे तर त्यांच्या विशीतल्या मुलींना युरोपसारखी अनामिक जीवनशैली हवी होती. इराकचा प्रकल्प उद्ध्वस्त केल्यापासून आपल्या कुटुंबियांना अमेरिका किंवा इस्रायल पळवून नेऊन पाकिस्तानी अण्वस्त्रप्रकल्प पूर्णपणे सुटा करे पर्यंता ओलीस म्हणून वापरेल अशीही एक भीति त्याना वाटे. आधी त्यांना स्वतःच्या (नसलेल्या) हीनतेची लाज वाटे. पण युरेंकोची खाण हाती लागल्यावर त्यांचा स्वभाव एकदम उलटा झाला. ते जणू हिटलरच झाले.

पुढच्या क्षणी खानसाहेब काय करतील याची प्रा. अहमदना भीती वाटे. ते स्वतःला सरकारच्याही वर समजत. लष्कर व ते जणू ’सयामी जुळ्या’सारखे कमरेला जोडले गेले होते. हेनीच्यामागे लागल्याची माहिती बाहेर आल्यापासून हेरांनाही त्यांच्या वाटेला न जाण्याचा हुकूम होता. त्यांच्या महत्वाकांक्षेला कुठलीच अडकाठी नव्हती. पण तेच त्यांचे सर्वात मोठे शत्रू होते.

†) cold test
ф) Signals battalion
*१) पाकिस्तान अशा सवलती कशा काय मिळवीत असते हे अभ्यासून पहाण्यासारखे आहे!
*२) A wargame is a game that deals with military operations of various types, real or fictional.
*३) थोडक्यात इस्रायलने केलेल्या कृतीचे परस्पर श्रेय रेगन यांनी उपटले काय?
*४) Government Affairs Committee
*५) या प्रकरणाचे शीर्षक
*६) Fission chain reaction
*७) Paranoia
Sudhir Kale JP-Silver Jubilee_1.JPG

गुलमोहर: 

छान.
चीन Angry
<पाकिस्तान अशा सवलती कशा काय मिळवीत असते हे अभ्यासून पहाण्यासारखे आहे!> खरोखरच.

मी ही मालिका नियमित वाचतो आहे, प्रतिसाद द्यायचा रहात होता नेहमी...
खुप चांगली लिहीली आहे तुम्ही. लिहीत रहा.
धन्यवाद!

ऋयाम-जी आणि विवेक नाईक-जी,
वाचकांचे प्रतिसाद वाचल्यावर केलेल्या श्रमाचे सार्थक झाले असे वाटते.
धन्यवाद.

दो इतशिमाशिते Happy
मदत पुस्तिका मधे जाउन अ‍ॅडमिनना विनंती करुन तुमच्या लेखांची कादंबरि किंवा मालिका करायला सांगा. म्हणजे नंतर कोणालाही सगळी प्रकरणे एकत्र वाचता येतील

Back to top