'फू बाई फू' च्या सेटवरून

Submitted by कौतुक शिरोडकर on 2 August, 2010 - 00:42

नमस्कार !

गेले अनेक दिवस लिहीन-लिहीन म्हणत होतो त्याला आज मुहुर्त सापडला. विषय तसा साधाच आहे म्हणा. 'फू बाई फू'च्या सेटवरील माझा चंचूप्रवेश.

अनेक वर्षापुर्वी एक वाक्य वाचलं होतं. "डॉक्टर म्हणून दुसर्‍यांच्या आजारावर जगण्यापेक्षा किंवा वकील म्हणून दुसर्‍याचा भांडणावर जगण्यापेक्षा लेखक म्हणून जगणे मला जास्त आवडेल." या वाक्याचा जनक कोण ते आज आठवत नाही. पण वाक्य मात्र मनावर कोरलं गेलं. पण सर्वसामान्य मराठी माणूस जसा जगतो, तसं जगण्यासाठी नोकरीशिवाय पर्याय नाही हे मात्र भिंतीत खिळा ठोकावा तसं डोक्यात ठसलं होतं. व्यवसायास लागणारा पिंड आपला नाही हे काही व्यवसायाच्या उचापती केल्यावर लक्षात आलं. नोकरीतही 'मराठी बाणा' आड येत असल्याने एका जागी टिकणं शक्यच नव्हतं. तरी 'घेतला वसा टाकू नये' या उक्तीस अनुसरून 'प्रपंच करावा नेटका' या उक्तीमागे धावत होतो.

या सगळ्या गदारोळात डुबत्याला काठीचा असावा तसा माबोचा आधार मिळाला. मनाच्या तळाला दाबून टाकलेल्या सार्‍या इच्छा उफाळून वर येऊ लागल्या. धगधगत्या निखार्‍यावरची राख फुंकरीने उडवल्यावर पुन्हा निखार्‍याची धग जाणावी तस काहीस. (काय साली समर्पक (?) उपमा आहे !) कालपर्यत श्री. कौतुक शिरोडकर इतकीच ओळख असलेला एक सर्वसामान्य माणूस माबोवर लिहू लागला. अल्पावधीत त्या नावामागे 'लेखक' हे बिरुद जोडलं गेलं. काही जण फक्त 'कवी' म्हणूनही ओळखतात तो भाग अलाहिदा. या प्रवासात अनेक चांगले अनुभव आणि मित्र जोडता आले. (वाईट अनुभवांबद्दल लिहू नये असा शिरस्ता आहे.) ज्ञानाच्या कक्षा बर्‍यापैकी रुंदावल्या. माबोकरांनी मला दिलेल्या प्रोत्साहनामुळे 'आपल्याला लिहीता येत' हे कळालं. 'उच्च' या शब्दाच्या दृष्टीक्षेपात जरी नसलो तरी लिहीतोय हेच पुरेसं ठरलं.

यातच मग लेखक म्हणून प्रयत्न करावा अशी उर्मी उसळून वर आली. इतकं सहजी ते शक्य नव्हतं. कारण तेच जुने, ज्याने तुकाराम महाराजांचाही पिच्छा सोडला नव्हता. पण घरून परवानगी मिळाली आणि मग 'स्ट्र्गल' सुरु केला. एका नामांकीत निर्मातीसाठी दोन सिरियल्स लिहील्या. चॅनलकडून हिरवा सिग्नल मिळाला. पण गाडी पुढे सरकेना. रात्रीची जागरणं करून डोळे ताणत लिहीलेल्या त्या लेखनाने जर टिव्हीचा छोटा पडदा पाहीला असता तर सगळं भरून पावलं असतं. पण तस काही घडलं नाही. अपयश ही यशाची पहीली पायरी असते ह्या अनुभवांकीत वाक्याचा पुनःप्रत्यय आला. पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' करावे लागतेय की काय अशी परिस्थिती. पैसे मिळाले नाहीच हे शेवटचे शल्य.

पण प्रयत्न सुरु होतेच. यात सोबत होती माबोकर 'देवनिनाद' उर्फ 'निनाद शेट्ये' यांची. यातच 'झी' मराठीवर फू बाई फू' सुरु होणार हे कळलं. मग दोघांचा मोर्चा त्या दिशेला वळला. मुख्य प्रयत्न निनाद शेट्ये यांचे. मी आपला ड्रायव्हर मागे क्लीनर जावा तसा. यात मग लेखक सचिन मोटे आणि निर्माते राकेश सारंग याचे मेल आयडी हाती आले. स्कीटस वर संस्कार करून त्यांचा मारा करायला सुरुवात केली आणि एक दिवस 'हॅलो' हे स्कीट झाल्याचे कळले. करण्यापुर्वी त्यांनी कळवायला हवं होतं अस आधी मनात आलं खरं. पण सुरुवात तर झाली हा आनंद जास्त होता. पण तो प्रक्षेपण पाहील्यावर फुर्रर्रर्र झाला. एडीट मध्ये जवळजवळ ६०-७० टक्के भाग नाहीसा झालेला. मग सचिन मोटेंशी संवाद सुरु झाला. मनात धाकधुक होतीच. अनेक नाटक, सिरियल्समध्ये ठसा उमटवलेला माणूस आपल्यासारख्या नवोदीताशी कसा वागेल, बोलेल ? पण हा प्रश्न पहिल्या संवादातच विरून गेला. जमिनीवर पाय रोवून उभा असलेला लेखक. कसला बडेजाव नाही की बोलण्यात 'अ‍ॅटीट्युड' नाही. कुठला कन्सेप्ट छान आहे, कुठे बदल करावा लागेल, मॅडनेस कसा आणावा याचे उत्कृष्ट टेलिफोनिक दिग्दर्शन मिळत गेलं.

सरते शेवटी एक दिवस फू बाई फूच्या सेटवर पोहोचलो. बुजलो होतो. ओळखी झाल्या पण बुजरेपण चटदिशी जायला तयार नव्हतं. शांतपणे एका बाजूस उभा असायचो. गणेश रेवडेकर व मानसी कुलकर्णी यांनी पहिलं स्कीट केल होतं. पण त्यांनाही साधी ओळख द्यायचं धाडस झालं नाही. कदाचित स्वभावाचाही दोष असेल. पण पहिला दिवस त्या अनोळखी वातावरणात समरस होण्यातच गेला. जो स्कीट करणार असेल त्याच्यापुरताच मर्यादीत होतो. नंतर मात्र हे लेखक ही ओळख रुढ झाली.

सेटवरचं वातावरण मात्र धमाल. स्कीटच्या रिहर्सलस चालू असलेल्या. प्रत्येकजण स्वतःची रिहर्सल करता-करता कंटाळला की मग दुसर्‍याच्या खोलीत डोकावून एखाद दुसर्‍या पंचचे कॉन्ट्रीब्युशन द्यायला तत्पर. एकमेकांची खेचणे हा जन्मसिद्ध अधिकार असावा तसे सगळेच एकमेकांच्या टोप्या उडवत होते. त्यामुळे त्या प्रवाहात सामिल व्हायला वेळ लागला नाही. 'जेवणाची वेळ म्हणजे फक्त टर उडवण्यासाठी दिला गेलेला वेळ ' हेच गणित. यात आनंद इंगळे आघाडीवर. त्यांचा पुणेरी बाणा ठायी ठायी दिसत असायचा. बोलता-बोलता कधी कोण गिर्‍हाईक होईल याचा नेम नसायचा. वैभव मांगले म्हणजे काहीतरी नवा एक्ट हे समीकरण ठरलेलं. त्या वेळातही मध्येच एखाद्या जुन्या इवेंटमध्ये केलेल्या एक्टची झलक दिसायची. हसून हसून सगळेच बेजार. मध्ये एकदा स्टार माझाचे प्रतिनिधी 'रिमोट माझा' च्या चित्रिकरणासाठी आलेले तेव्हा आनंद इंगळे यांनी स्कीट दिग्दर्शक विश्वास सोहोनीला ही सोडलं नाही. "आपल्यासाठी ते इतकं करतात त्यामुळे सगळ्या कलाकारांनी त्यांच्या पाया पडायला हवं' या वाक्यासरशी पुढे पळणारे विश्वास सोहोनी व पाय धरायला धावणारे आनंद इंगळे हे दृश्य बघण्याजोगे होते.

पर्व सुरु झाल आणि मी सेटवर पोहोचेपर्यंत काही जोड्यांनी निरोप घेतला होता. तरी गणेश रेवडेकर व मानसी कुलकर्णी, संजय कुलकर्णी व शैला, गणेश मयेकर व समीरा, अजय जाधव व चैत्राली, संदीप पाठक व स्वाती देवल, रमेश वाणी व मौसमी तोंडवळकर या जोड्या होत्याच. मराठीत विनोदाची जाण असलेले असे अनेक कलाकार या सेटवर भेटले. यांच्या सोबत पर्वाची वाटचाल सुरु होती.

पर्व पुढे सरकत होते आणि एकेक कलाकार निरोप घेत होते. हळूहळू रिहर्सल रुम्समधला राबता कमी होऊ लागला. वाईट वाटायचं या गोष्टीचं. पण शेवटी स्पर्धा म्ह्टलं की हारजीत आलीच. आणि शेवटी फक्त चार जोड्या उरल्या.

आनंद इंगळे म्हणजे संयमित अभिनय. शक्य तो अंगविक्षेप टाळणारे. जुन्या दर्जेदार गाण्यात रमणारं व्यक्तीमत्व. स्कीटमध्ये अभिनयाच्या छोट्या छोट्या जागा हुडकून एक्ट उत्तम करण्याच्या प्रयत्नात असलेला कलाकार.
हिंदी व मराठी या दोन्ही आघाड्यांवर लढणारी क्षिती जोग. प्रचंड व्यस्त असल्याने सगळी समीकरणेच व्यस्त. या सेटवरून त्या सेटवर होणारी धावपळ. त्यातही मिळणार्‍या कमीत कमी वेळात स्कीटची मनापासून तयारी करणं. हातात शक्य तो सतत एखादी कडक कॉफी. झोप उडवण्यासाठीच असावी. पण जे हाती असेल त्यात स्वतःला झोकून देणारी.

वैभव मांगले म्हणजे व्यक्तीरेखेप्रमाणे स्वतःला बदलणारा कलाकार. एकदा का भुमिकेचं बेअरींग घेतलं की मग तो वैभव मांगले तिथे दिसत नाही. असते ती फक्त व्यक्तीरेखा. मग तो उद्धट मंगलकार्यालयाचा मालक असो वा हिप्नोटिझम करणारा. सेटवर घरचे वडे वाटून आपला जन्मदिवस साजरा करणारा कलाकार.
विशाखा सुभेदार म्हणजे शांतपणा. शक्य तेवढा वेळ स्कीटच्या रिहर्सलमध्येच बिजी असलेली. गालावरच्या खळीसह हास्य म्हणजे निव्वळ प्रसन्नपणा. बोलण्यात, वागण्यात आब राखलेला.

दिगंबर नाईक म्हणजे प्रत्येक क्षणी नव्या नव्या पंचेसच्या शोधात असलेला कलाकार. मराठी, आगरी, बाणकोटी, वर्‍हाडी, मालवणी, कोंकणी, अहिराणी अशा महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भाषांवर प्रभुत्व असलेला कलाकार. महसुलमंत्री राणे यांची नक्कल करावी तर त्यानेच.
त्याची सोबत आरती सोलंकी म्हणजे 'कम्प्लिट चार्ज' बॅटरी. गाणं आणि नाच या दोन गोष्टींवर जीवापाड प्रेम. प्रत्येक स्कीटनंतर अजून चांगल करता आलं नाही याची उगाच खंत बाळगत बसणारी.

विकास समुद्रे म्हणजे मध्येच काढलेले दिलखुलास चिमटे. विनोदाची उत्तम जाण असलेला कलाकार. लेखनातही कमी नाही. त्यातही चौकार, षटकार लगावलेले आहेतच. सहज बोलता-बोलता फिरकी घेणं हा बहुतेक जन्मजात स्वभाव असावा.
सुप्रिया पाठारे ही विकासला लाभलेली उत्कृष्ट सोबत. त्याही बर्‍याच सिरियल्स मध्ये बिजी असलेल्या. माझ्या माहीतीतला हा त्यांचा विनोदी भुमिकेचा पहिलाच प्रयत्न आणि तोही इतका जमला की सरळ फायनलमध्ये त्यांचा प्रवेश झालाय.

निर्माते राकेश सारंग व त्यांच्या पत्नी संगीता सारंग या जोडीचे विशेष कौतुक यासाठी की कार्यक्रम उत्कृष्ट व्हावा म्हणून त्यांचा असलेला सहभाग. वेशभुषा आणि रंगभुषा यात श्रीमती सारंग याची बारीक नजर. त्यासाठी होणारी धावपळ. व्यक्तीरेखेला जे हवं, ते हवच. त्यात तडजोड नाही. त्याला वेळेच वा बजेटचं बंधन नाही. श्री. राकेश सारंग हे फक्त पैसा टाकून बाजूला होणारे निर्माते नाहीत हे पहिल्याच दिवशी त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत जाणवलं. प्रत्येक जोडीला त्यांच्यासमोर रिहर्सल सादर करणं कंपलसरी असायचं. त्यावेळी त्यांनी सुचवलेल्या जागा इतक्या अफलातून असत की संपुर्ण एक्टला एक वेगळं परिमाणं मिळत असे. कलाकारांचे आवाजातील चढ-उतार, त्यांनी घ्यावयाचे 'पॉजेस', शब्दांवरचा जोर, हालचाल, देहबोली या सगळ्यांवर बारीक लक्ष. कुठला पंच कसा घ्यावा आणि कुठला शब्द कसा फेकावा याचं ते स्वतःच सादरीकरण करत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरचं. नुसतीच संकल्पना दिली की झालं याऐवजी ती कशी नीट राबवता येईल याचा पाठपुरावा करण्यासाठी ते सदैव तत्पर. ज्याला विनोद समजतोय त्याच्यासाठी आपण लिहीतोय हा मिळणारा आनंद अवर्णनीय. याउपरही एखादा कलाकार जेव्हा कमी पडत असे तेव्हा ती गोष्ट त्यांच्या मनाला टोचायचीच. प्रत्येकाने त्याचे शंभर टक्के द्यावे ही त्यांची अपेक्षा आज फू बाई फूच्या प्रत्येक कलाकाराला लोकप्रियतेच्या वेगळ्या पातळीवरच घेऊन गेलीय.

डॉ. निलेश साबळे म्हणजे फू बाई फूची सुरुवात. सुत्रधार म्हणून वेगवेगळे गेटअप करून पुन्हा त्या निवेदनात वेगवेगळ्या कलाकारांच्या आवाजाने धमाल उडवून देण्याचं कसब वाखाणण्याजोगं. त्यांच्या निवेदनाचं लेखन ते स्वत:च करतात. मोजक्या शब्दात बरचं काही देणारा मनस्वी कलाकार. त्यांच्याशी जशी गट्टी जमली तशी ती तुषार देवल व त्यांचा वाद्यवृंद, यांच्याशीही जमली. वेशभुषेसाठी सुई दोरा घेऊन तत्पर असलेला प्रशांत हाही एक चांगला मित्र या सेटवर लाभला.

परिक्षकांशी आमना-सामना होण्याचा प्रश्नच नव्हता. तरी एकदा माझी भाची खास निर्मिती सावंत यांना भेटायला सेटवर आली तेव्हा त्यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. एवढ्या मोठ्या कलाकाराचा त्यांच्या फॅन्सबरोबर असलेला 'एप्रोच' लक्षात ठेवण्याजोगा होता.

आता पहिलं पर्व संपत आलय. फायनल कडे या पर्वाची वाटचाल सुरु आहे. चारही जोड्या कंबर कसून तयार आहेत. कोण हरेल, कोण जिंकेल यात व्यक्तीश: मला रस नाही. कोणी जिंकला तरी आनंदच आहे, कारण सर्वच आता मित्र आहेत. ही भावना कलाकारांमध्येही मला वेळी अवेळी जाणवली. त्यामुळे कधी कधी ती स्पर्धा आहे हे जाणवत ही नसे. कारण जर खरचं 'काटे की टक्कर' हा प्रकार असता तर वातावरण इतकं खेळीमेळीचं नसतं. कोणीही दुसर्‍याला 'हा पंच घे. मस्त आहे' असं सांगितलं नसतं. मला तरी असं वाटतं नाही की महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा थोडा व्यापक विचार मांडता, तमाम मराठी जनतेला हसवण्याचा, रिझवण्याचा वसा घेतलेले हे कलाकार फक्त त्या स्पर्धेतल्या काही रुपड्यांच्या पारितोषिकासाठी एवढं जीवाचं रान करत असतील. शक्यच नाही. स्वतःचं दु:ख विसरून, स्वतःला होणारे शारिरीक क्लेश विसरून मराठी रयतेला हसवण्यासाठी अटकेपार विनोदाचे झेंडे फडकावणारे हे सगळेच कलाकार फायनललाच नव्हे तर दुसर्‍या पर्वातही आपणा सर्वाना हसवून हसवून बेजार करोत हीच श्रींच्या चरणी प्रार्थना !!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतुकजी अभिनंदन! Happy मी मागे एका स्कीटला बघितलं होतं तुमचं नाव, लेखक म्हणुन! पण ते तुम्हीच हे माहीत नव्हते!

कौतुकराव, आजच तुमची आठवण झाली होती, की खुप दिवसात काही लेखन वाचायला मिळाल नाही तुमच. तुम्हाला शंभर+ वर्षे आयुष्य Happy
आता वाचते आणि मग प्रतिक्रिया देते Happy

कौतुक तू हे कधीतरी लिहावस अशी माझी मनापासुन ईच्छा होती आज पुर्ण झाली. तुझे प्रयत्न कधीच तोकडे नव्हते त्यामुळे यशाची कवाड सदैव उघडीच राहतिल तुझ्यासाठी. तुला पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा Happy

कौतुक,
तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
फु बाई फु हा कार्यक्रम जेव्हा लागतो, तेव्हा माझ्या सगळ्या मित्रानां सागंतो की हे माझ्या मित्राने लिहीले आहे म्हणून.
मला आपला अभिमान वाटतो.

कौतुका मी नेहमी आवर्जुन पहातो फु बाई फु, आणि आजच फोन करुन विचारणार होतो कि देवनिनाद म्हणजे खरं नाव काय ते. ते तुझ्या लेखातुन समजलं. बाकि फोनतोच तुला..
तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि पुढच्या सोनेरी वाटचालीसाठी लाख शुभेच्छा! Happy

अगदी अगदी !! गणेशजींना अनुमोदन !!!
मी हि घरात सांगत असते की हे माझ्या ओळखीचे आहेत ... .बळंच Lol

हार्दिक अभिनंदन !!

तुझ नाव त्या दिवशी पाहील खुप खुप आनंद झाला.

निनाद शेट्ये हे ही देवनिनाद नावाने मा बो कर आहेत हे नव्याने कळल Happy

तुम्हा दोघांचे खुप खुप अभिनंदन Happy

तुमच्या लेखावरुन तुम्ही छान समरस झालेत, हे दिसून येते.
उत्तरोत्तर आपली लेखनी अशीच बहरत जावो, ही सदीच्छा.

Dear Kautuk Sir,

Congratulation!
& All the best for..........................

----Amol

कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

बरेच दिवसात ईथे दिसला नाहीत याचे कारण आता समजले!

या कार्यक्रमाच्या सी डीज उपलब्ध होतील का? असल्यास कुठे संपर्क करायचा?

(फु बाई फु हा सध्याचा एकमेव चांगला कार्यक्रम आहे असे मध्यंतरी कोणीतरी म्हणाले होते तेव्हापासुनच तो बघण्याची उत्सुकता होती. आता तुमचा एव्हढा मोठा सहभाग असताना बघायलाच हवा.)

Pages