'जय जय राम कृष्ण हरी’
ह्या मंत्राची भूल तर सगळ्या वारकरी संप्रदायाला पडली होती. पण माझ्यासाठीतरी ह्याचा गानमंत्र केला पंडितजींनी, पं. भीमसेन जोशींनी.
फार पूर्वीची गोष्टं आहे. गावात पंडितजींचा अभंगवाणीचा कार्यक्रम होता. किती किती ऐकून होते ह्या कार्यक्रमाबद्दल. क्लासमधे गुरूजीसुद्धा खूप बोलले पंडितजींबद्दल, किराणा घराण्याबद्दल... गोष्टी, किस्से... काही दिवस आयुष्यं नुस्तं पंडितजी आणि त्यांचा अभंगवाणीचा होणारा कार्यक्रम ह्याभोवतीच घोटाळलं.
पंडितजी, त्यांचं गाणं, त्यांचे अभंग, ह्याच्यावर बोल बोल बोलत होतो... आम्ही सगळेच...
घरातल्या मोठ्यांनी शेवटी, ’तिथे जाऊन तरी गप्पं बसेल’ एव्हढ्या एकाच आशेवर घरून लवकर निघायला कबुली दिली.
तरी आम्ही कार्यक्रमास्थळी पोचेपर्यंत सूर्य मावळून गेला होता. पण कार्यक्रमातला पहिला ’सा’ तरी ऐकून जाऊया असल्या चुकार प्रयत्नात काही ओढाळ किरणं अजून मैदानावर रेंगाळत होती. इतरवेळीचं ते मैदान आता वेगळंच दिसत होतं. प्रवेशदाराची कमान, त्यावरची झेंडूच्या माळांची झालर, आंब्याच्या पानांची तोरणं, इथे तिथे वावरणार्या कार्यकर्त्यांची लगबग, आता येऊ लागलेल्या प्रेक्षकांचे घोळके, अत्तरांचे, गजर्यांचे वास.... ह्यामुळे इतरवेळी त्याच्या व्याप्तीमुळे अंगावर येणारं मैदान एकदम घरच्या अंगणासारखं मवाळ, ओळखीचं अन तरीही वेगळं वाटू लागलं.
माझं लक्ष प्रकाशाचे झोत सोडलेला भल्या थोरल्या मंचाकडे गेलं. स्टेजवरच एका बाजूला एका छोट्या लहान उंचावलेल्या स्थानावर पखवाज आणि तबला दोन्ही होते. दुसया बाजूला एक ऑर्गन म्हणजे पायपेटी होती. बर्रोब्बर मधे एका मंचावर चार तानपुरे उभे करून ठेवले होते आणि एका बाजूला साधी हार्मोनियम. त्याहूनही कहर म्हणजे समोर दोन ओळीत दहा दहा टाळांचे जोड. हे नुस्तं बघुनच मला भिरभिरल्यासारखं झालं.
मागे सजावटीत लावलेला, कर कटी घेऊन विटेवरी उभा वैकुंठीचा राणा, हे कौतुक जवळून न्याहाळायला पाऊल टाकतो की काय अस्सं वाटलं.
सगळ्या ओळखीच्यांना हात कर, हाका मार, बोलावून घेऊन बोल, न आले तर तिथे जाऊन बोल, ह्या सगळ्यातून कधीतरी स्टेजवरचा ऑर्गन आणि त्या नंतर तानपुरे वाजू लागल्याचं कानांनी टिपलं. तबला, पखवाज लागल्याचंही जाणवलं... आणि आपसूकच अवधान स्टेजकडे वळलं.
भगवे फेटे घालून वीस टाळकरी जेव्हा स्टेजवर आले आणि मागे, कोनात मिळणार्या दोन तिरक्या ओळीत बसले.... तेव्हा त्या भल्या थोरल्या मैदानातली हजाराची गर्दी नि:शब्द झाली.
मग ह्या सोहोळ्याचे आनंद निधान पंडितजी शाल सावरीत मंचावर आले आणि ’नाभी नाभी’ म्हणणार्या त्या राजस सुकुमाराच्या आकृतीला मागे वळून नमस्कार करीत स्थानापन्न झाले. पुन्हा एकदा तानपुरे हातात घेऊन पंडितजींचं सूर-जवारी तपासून होईपर्यंत, त्याला स्वत:लाच ओझं झालेलं निवेदन निवेदकाने उरकलं होतं.
...पंडितजींनी खूण करताच साधी उठान घेत पखवाज भजनी ठेका बोलू लागला... धीरगंभीर सागराच्या गाजेसारखा.. संथ तरी वाहता, स्थिर तरी सजीव.
पखवाजाला एक गंभीर नाद आहे.... मुग्ध करणारा. आपल्याच मनाच्या तळाशी बुडी मारून बसावं असं वाटू लावणारा... एखाद्या अंतर्नादासारखा....
दोन-तीनच आवर्तनात त्याला तबल्याचा निर्झरू येऊन मिळला. स्वराच्या तबल्याने निर्माण झालेला खळाळ, तितकाच काय तो दोन प्रवाहातला खंड म्हणायचा... परत दोन्ही वाजू लागताच एकच एक भजनीचा प्रवाह वाहू लागला.
इतका वेधक असतो भजनी ठेका? तर होय. असतो.... त्याचं काय असेल ते कारण, डोक्याच्या, मनाच्या तळी बुडी मारून शोधू जाण्याआधीच एक अकल्पित घडलं....
एकाचवेळी चाळीस हात उठले, एका स्वरातल्या वीसच्या वीस टाळांनी उठान घेतली... आणि वीस आघातांचा एकच आवाज, एकाच लयीत वाहू लागला.
अंगावरचा रोम न रोम तरारून उठला, डोळ्यात पाणी आलं, समोरचं दृश्य दिसेनासं झालं, फक्तं भजनी ठेक्याची ती धारा आणि त्याचाच एक भाग बनून वाहणारं हे जग... आपल्यासहं.
अजून शब्दाचाच काय पण, स्वराचाही स्पर्श न झालेल्या, नादाच्या ह्या प्रवाहाला इतकं आगळं वेगळं वेधक रूप कोण देतंय? अशी कोणती ही शक्ती?
आत्ता इतकं मोठं झाल्यावर लक्षात येतय....साध्या पाण्याचं ’तीर्थं’ करणारी जी कोणती शक्ती आहे ना, तीच ती!
...... अन ह्या सार्याहूनही साजिरं दिसत होतं पंडितजींचं डोलणं. लहान लहान चुटक्या वाजवीत जागच्या जागी डोलणारी ती मूर्त. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना ’हाल कारे कृष्णा डोल कारे कॄष्णा’चं रुपडं आपला सकंकण बाहू हालवीत, त्याच तालात डोलत असलेलं दिसत असणार बहुतेक...
सारं अस्तित्वं कानात येऊन उभं रहाणं म्हणजे काय ते त्याक्षणी तन-मनाने तिथेच असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने नक्की अनुभवलं असणार. त्यांच्याकडे बघता बघताना जाणवलंच की, ओंकाराचं ’सा’रूप छातीत कोंदून आत्ता हुंकार फुटणार....
....हात उंचावत, आकाशाकडे डोळे लावत पंडितजींनी आपल्या गुण-गंभीर आकारात, वरच्या ’सा’ पासून धबधब्यासारखी कोसळणारी एक तान घेतली आणि सूर शब्दावले....
’जय जय राम कृष्ण हरी’!
समोर बसलेल्यांत ज्यांच्या मुखातून काही उमटू शकलं, ते होतं, ’अहाहा’, किंवा काळजाच्या चुकलेल्या ठोक्यासाठी ’च्च च्च’..... उरलेले सगळे नि:शब्दी फक्तं विनम्र अन हतबलही होऊन मान हलवते झाले.
त्यानंतर सुरू झाला यमन रागात नुसता ’जय जय राम कृष्ण हरी’चा जप. एकतर यमन राग हाच मुळी एखाद्या प्रचंड सागरासारखा... त्या संथ लयीशी खेळत पंडितजी गात होते.... दुसरं काssही नाही.... हा तेरा अक्षरी मंत्र फक्त...
आधी-व्याधींच्या स्पर्शातून मुक्तं करणारा, सुख-दु:खाची पुटं झटकून मोकळा झालेला असा निव्वळ भक्तिरसाचा झळाळ अगदी काहीच क्षणांसाठी का होईना पण.... पडेल का कधी आमच्यासारख्या सर्वसामान्य मनांच्या उमाठ्यावर?.... त्याक्षणी तेच झालं... अगदी तेच झालं!
त्या यमन रागाच्या अथांग सागरात ’राम कृष्ण हरी’ची पताका देऊन लोटून दिलं पंडितजींनी आम्हाला.... जणू एकच भरवसा.... एकच भाव... ’भक्ती’!
काही आवर्तनांनंतर त्यांनी लय वाढवली. फक्त पाच शब्द, सात स्वर, एक ठेका... एव्हढ्या जुजबी सामनासहीत ह्या गानसम्राटाने निर्माण केलेलं भक्ती रसाचं राज्यं... राम आणि कृष्णाच्या सत्-चिताचं, आनंदाचं साम्राज्य....
हे असं किती वेळ?... माहीत नाही, आठवत नाही...
त्यानंतर पंडितजी उरलेल्या कार्यक्रमात काय गायले, आठवत नाही...
एक मात्रं लख्खं आठवतंय..... की त्या गजराच्या वेळी स्थळ, काळाचं माझंतरी भान नुरलं होतं....
अजूनही कधीतरी यमन रागात ’जय जय राम कृष्ण हरी’ चा जप मनाच्याच कुठल्यातरी अंतर्कोनातून लहरत मन:पटलावर येतो.
त्याला अगदी आता आता पर्यंत त्या कार्यक्रमाचा, आमच्या त्या दिवसाच्या तयारीचा, त्या सजावटीचा, वातावरणाचा संदर्भ होता....
आता हळू हळू ती आवरणं गळून पडलीयेत आणि उरलाय तो फक्त नादाचा, सुराचा रस. पंडितजींचा आवाज, पखवाज-तबल्याचा, वीस टाळांचा नाद, ऑर्गनचा सूर ह्यात गुंथला.... निव्वळ भक्तिभाव!
समाप्त
पंडीतजींच्या सुरांची अनुभूती
पंडीतजींच्या सुरांची अनुभूती अनुभवण्याच भाग्य मलाही लाभलं आहे दाद!
अहा!
छे! शब्दातून मांडताच येत नाहीये मला ते,
तुम्ही लिहिलेल सुरेख!!!!!!!!!!!!!!!!!!
अद्वितीय! अक्षरशः स्वर्गीय
अद्वितीय! अक्षरशः स्वर्गीय अनुभवाचं इतकं अप्रतिम वर्णन वाचून तो अनुभव आपणही "याचि देही याचि डोळा" घेत आहोत, असं वाटून गेलं! जितक्या वेळा वाचलं, तितक्या वेळा मैफल प्रत्यक्ष रंगली मनात.
दाद, परत एकदा सुंदर लेख.
दाद,
परत एकदा सुंदर लेख. तुझ्याच शब्दात...
आपल्याच मनाच्या तळाशी बुडी मारून बसावं असं वाटू लावणारा...
***
***
अदभुत निव्वळ अदभुत! अनुभव आणि
अदभुत निव्वळ अदभुत! अनुभव आणि आणि त्याचे कथन दोन्ही
नशिब,नशिब म्हणतात ते हेच की हो
जे सामर्थ्य पंडितजिंच्या
जे सामर्थ्य पंडितजिंच्या तानेत्, आवाजात आहे कि ज्याने माणुस ईश्वराशि तादात्म्य पावतो तसेच तुमच्या लेखनात जे वाचुन आपल्या डोळ्यासमोर ते वेभव ऊभे राहते.
अप्रतिम. केदारचा कार्यक्रम
अप्रतिम.
केदारचा कार्यक्रम मस्त झाला ना.
डोळ्यासमोर उभ राहतय.
डोळ्यासमोर उभ राहतय.:)
जितक्या वेळा वाचलं, तितक्या
जितक्या वेळा वाचलं, तितक्या वेळा मैफल प्रत्यक्ष रंगली मनात... हो हो.. अगदी हेच्च होतय! दाद तुला दाद द्यायला शब्द कायम अपुरेच रे!
सगळ्यांचे आभार. पंडितजींचं
सगळ्यांचे आभार.
पंडितजींचं गाणं हे आयुष्यं समृद्ध करणारा अनुभव आहे हे सांगायलाच नको. मला तरी कधी कधी त्यांचं ऐकायला लागले की, निव्वळ माझ्याच मनात नाही पण सगळ्या जगात सगळं आलबेल असणार असं वाटायला लागतं. अगदी मिया मल्हार ऐकतानाही तानांचा पाऊस, खर्जातल्या धैवत्-निषादाचे ढग गडगडत असतात... तरी त्यात वाहून जाण्याला माझी ना नसते. कुठेतरी "समर्पणाचा" भाव जागा करण्याची अद्भुत शक्ती असलेलं गाणं आहे ते.
किती वर्षं ऐकतेय...
असो....
पुन्हा एकदा धन्यवाद
थेट मैफिलीत नेवून बसवलेस.
थेट मैफिलीत नेवून बसवलेस.
मी हरवून गेलो ह्या दृष्यात
मी हरवून गेलो ह्या दृष्यात एवढंच म्हणेत. अत्युच्च- पराकोटीचं वर्णन !! अप्रतीम !!!! बस्स...................
................अज्ञात
व्वा दाद...शब्दच नाहीत या
व्वा दाद...शब्दच नाहीत या वर्णानाला...अगदी सुरेख!!! मस्त!
अगदी अगदी ..... !!!!
अगदी अगदी ..... !!!!
सुंदर वर्णन!!! शब्दातून
सुंदर वर्णन!!!
शब्दातून प्रसंग उभा करण्याचं कौशल्य ओळी-ओळीत जाणवतंय...
शुभेच्छा!!
अप्रतिम! शब्दमैफिल ने
अप्रतिम! शब्दमैफिल ने प्रत्यक्ष मैफिलीला हजर असल्याच समाधान मिळाल
पखवाजाला एक गंभीर नाद आहे....
पखवाजाला एक गंभीर नाद आहे.... मुग्ध करणारा. आपल्याच मनाच्या तळाशी बुडी मारून बसावं असं वाटू लावणारा... एखाद्या अंतर्नादासारखा....
दोन-तीनच आवर्तनात त्याला तबल्याचा निर्झरू येऊन मिळला.
अंगावरचा रोम न रोम तरारून उठला, डोळ्यात पाणी आलं, समोरचं दृश्य दिसेनासं झालं, फक्तं भजनी ठेक्याची ती धारा आणि त्याचाच एक भाग बनून वाहणारं हे जग... आपल्यासहं.
अजून शब्दाचाच काय पण, स्वराचाही स्पर्श न झालेल्या, नादाच्या ह्या प्रवाहाला इतकं आगळं वेगळं वेधक रूप कोण देतंय?
<<<
धन्य.
हल्ली तुम्ही इतक्या दुर्मिळ लिहिता... पुरवून पुरवून वाचायला लागतं.
अप्रतिम! किती सुंदर अनुभव आणि
अप्रतिम! किती सुंदर अनुभव आणि तितकाच सुंदर उतरलाय! शब्दच नाहीत माझ्याजवळ!
आजीबरोबर किर्तनाला जायचे तो अनुभव मनाच्या कुठल्यातरी कोपर्यातुन उसळुन आला. विश्वास असो वा नसो आपण आपोआप त्या गर्दीशी, कथेशी, निरूपणाशी, गाण्याशी एकरूप जातो. आपण अगदी एवढेएवढेस्से असल्याची जाणीव होत जाते. शेवटी हलकं हलकं होत आपणच सगळ्या आसमंतात भरून राहीलोय, तरंगतोय असं वाटत असतांनाच 'पंढरीनाथ महाराज की जय!' सुरू झालं की हळुच आपण आपल्यात परत येतो.
आज पुन्हा आवर्जून हा लेख
आज पुन्हा आवर्जून हा लेख वाचावासा वाटला आणि वाटलं पंडितजी गेले कुठे? ते तर आपल्यातच आहेत! हा एवढा अनमोल ठेवा घेऊन थांबले आहेत आपल्यासाठी!
आज परत वाचलं, आणि.. वा वा!
आज परत वाचलं, आणि.. वा वा! सुंदरच!
वा ! वा! दाद, तुमच्या
वा ! वा! दाद, तुमच्या लिखाणालाही दाद द्यावी तेवढी कमीच आहे. पहिला लेख पण आताच वाचला, डोळ्यांसमोर द्रुष्य अगदि उभं केलत.
उद्या,रविवार दि. 30.०१.२०११
उद्या,रविवार दि. 30.०१.२०११ सकाळी ९.३० वाजता झी-मराठी वर पं. भीमसेन जोशींना श्रद्धांजली म्हणून "नक्षत्रांचे देणे" हा कार्यक्रम आहे.
आता यावर काय बोलू!!!!!!
आता यावर काय बोलू!!!!!! साक्षात मैफिलीत घेऊन गेलात......
<अंगावरचा रोम न रोम तरारून उठला>
हेच म्हणतो.
अप्रतिम, परवा फक्त सुरुवात
अप्रतिम,
परवा फक्त सुरुवात वाचूनच हळवा झालो होतो.
काल पूर्ण वाचला लेख.
दाद,
हे लिहिल्याबद्दल मनापासून आभार!
http://www.youtube.com/watch?v=bH6vPetUtIM
इथे ऐकता येईल हा नामगजर !
अप्रतिम!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!
मला यमन काय ते माहित नाही.
मला यमन काय ते माहित नाही. भजनी ठेका त्यातल्या त्यात ओळखीचा असला तरी बोल माहित नाहीत...
पंडितजींना लाईव्ह कधीच ऐकलेलं नाही...
तरी हे वाचता वाचता डोळे का धूसर झाले??
>> पहिला ’सा’ तरी ऐकून जाऊया
>> पहिला ’सा’ तरी ऐकून जाऊया असल्या चुकार प्रयत्नात काही ओढाळ किरणं अजून मैदानावर रेंगाळत होती. >> मस्त
>> स्वत:लाच ओझं झालेलं निवेदन निवेदकाने उरकलं होतं. >>
>> अजून शब्दाचाच काय पण, स्वराचाही स्पर्श न झालेल्या, नादाच्या ह्या प्रवाहाला इतकं आगळं वेगळं वेधक रूप कोण देतंय? अशी कोणती ही शक्ती? >> अगदी सत्य.
>> एव्हढ्या जुजबी सामनासहीत ह्या गानसम्राटाने निर्माण केलेलं भक्ती रसाचं राज्यं... >>
दाद गं दाद........... थँक्स
पहिला ’सा’ तरी ऐकून जाऊया
पहिला ’सा’ तरी ऐकून जाऊया असल्या चुकार प्रयत्नात काही ओढाळ किरणं अजून मैदानावर रेंगाळत होती.>>>
अजून शब्दाचाच काय पण, स्वराचाही स्पर्श न झालेल्या, नादाच्या ह्या प्रवाहाला इतकं आगळं वेगळं वेधक रूप कोण देतंय?>>>>
अप्रतिम...., निव्वळ अप्रतिम !!
Pages