नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या ४थ्या भागात आपले मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जिथे रोमॅंटीसिझम, रम्य कल्पना-विलास हे उर्दू शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील जमाली ह्यांची, एक अतिशय दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या वाचण्यात आली, आणि तीच गझल, तिच्या ह्या वैशिष्ठ्यामुळेच, मी आपणासोबत शेअर करतोय; गझल समजायला अतिशय सोपी आहे.
मतला असा आहे की-
अब काम दुआओं के सहारे नहीं चलते
चाबी न भरी हो तो खिलौने नहीं चलते
ह्या शेरात शायराने बदलत्या काळाकडे अगदी अचूक अंगुली-निर्देश केलाय. यंत्र-युगाच्या वाढत्या प्रभावामुळे मानवी जीवनातील भाव-भावनांचे स्थान आणि पर्यायाने महत्व आता अगदी नगण्य होत चालले आहे, हे शल्य कविने अगदी मार्मिक शैलीत बोलते केलेय. हा शेर लिहिताना अशी एक काव्यात्म कल्पना कविच्या मनात कदाचित येऊन गेली असावी की ,आताचे युगच असे आले आहे, की जणू परमेश्वर सुद्धा आपल्यावर रागावला आहे असेच वाटत राहावे. पूर्वीच्या काळी(सत्ययुग म्हणा हवे तर), परमेश्वराला जर मनापासून प्रार्थना केली की एखाद्या बिचाऱ्याचा आजार बरा कर, तर त्याने करुणा येऊन तसे केलेही असते, पण आता कलीयुगात, काळच असा आहे की, देवसुद्धा म्हणेल की,"नाही, मी काही करु शकत नाही, ह्या खेळण्याला भरलेली चावीच संपली आहे". आजकालच्या काळात सद्भावनांचे महत्व आणि प्रभाव हे नष्टप्राय होत चालले आहेत, असेच कविला म्हणायचे असावे; अगदी दैवी शक्ती सुद्धा ह्याला अपवाद नसाव्यात. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या घटना बघून आपण सुद्धा नेहमी हाच विचार करत असतो, नाही का? (’खिलौने नही चलते’ मधे मला आशयाचा आणखी एक पदर दिसला- तो म्हणजे, जो पर्यंत स्वार्थ आहे, तो पर्यंतच एखादी व्यक्ती कार्यरत राहील, स्वार्थ संपला की पुढे नाही; अर्थात हे माझे मत!)
पुढील शेर असा आहे की-
अब खेल के मैदानसे लौटो मेरे बच्चो
ता उम्र बुजुर्गों के असासे नहीं चलते
[ १) असासे= संपत्ती, पूंजी (अनेक-वचनी), २) ता उम्र = आयुष्यभर ]
आपला बहुतेक वेळ खेळाच्या मैदानावर घालवणाऱ्या तरुण पिढीला एक बुजुर्ग वडीलकीचा सल्ला देतोय की, आता खेळणे, मौज-मजा पुरे करा, आणि आपापली जवाबदारी संभाळायला लागा, स्वत:च्या पायावर उभे रहा, कारण आम्ही जे कमावून ठेवले आहे, ते तुम्हाला आयुष्यभर थोडेच पुरणार आहे? तेंव्हा वेळीच आपली जवाबदारी ओळखून कामाला लागावे, ह्यातच तुमचे हित आहे. शेवटी, आम्ही तुम्हाला किती दिवस पुरणार आहोत ? हा आशय तर प्रत्येक घरातील परिस्थीतीला लागू पडतो, नाही का?
आगे कुछ यूँ फर्माया है-
इक उम्र के बिछुडो़ का पता पूछ रहे हो,
दो रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं चलते
अगदी कटु सत्य आहे, शायर म्हणतोय ते! तो म्हणतोय की, "अहो, इथे दोन-चार दिवस सुद्धा रक्ताचे संबंध टिकत नाहीत, अन तुम्ही तर अनेक वर्षांपूर्वी हारवलेल्या तुमच्या कुणा नातेवाईकाचा पत्ता विचारताय. दुनिया इतकी आप-मतलबी झालीय की लोक, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या रक्ताच्या नात्याचा गळा घोटायला सुद्धा कमी करत नाहीत. इथे तर सख्खे नाते सुद्धा दोन दिवसही टिकण्याची मारामार आहे, आणि तुम्ही काही वर्षांपूर्वी धूसर झालेल्या, काळाच्या पडद्याआड जाऊ बघणाऱ्या नात्याविषयी विचारता आहात!
पुढील शेर असा आहे की-
ग़ीबत मे निकल जाते है तफ़रीह के लम्हे
अब महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं चलते
[ १) ग़ीबत= कुचाळक्या, चुगली, चहाडी, २) तफ़रीह= फुरसत, मनोरंजन, ३) लतीफ़े= विनोद ( अनेक-वचन) ]
शकील म्हणतात की आता महफिलीची संस्कृतीच बदलत चालली आहे, चार मित्र एकत्र जमले तर दुसऱ्यांच्या चुगल्या, चहाडी करण्यातच लोकांचा वेळ जातो. एकमेकांना विनोद सांगून हसविणे, चार घटका एकमेकांची करमणूक करणे, हा प्रकारच आता राहिला नाहीय. मित्रांच्या महफिलीत आता एकमेकांची निखळ करमणूक करणाऱ्या गप्पा-विनोद ह्यांना स्थानच राहिलेले नाही. (आज-कालच्या सिरीयल्स मधे तरी काय दाखवितात? प्रत्येक पात्र एक-दुसऱ्याच्या कुचाळक्या, चुगल्या करत असतानाच आपण बघत असतो.) हे सांस्कृतीक अध:पतनच म्हणायचे नाही, तर दुसरे काय?
ह्या पुढचा शेर तर ह्या गझलेतील मला अत्याधिक आवडलेला शेर आहे. तो असा की-
यह विल्स का पॅकेट , ये सफ़ारी, ये नगीने
हुज़रो में मेरे भाई ये नक़्शे नहीं चलते
[ १) नगीना= दागिना, २) हुज़रा= फकीराची, किंवा पुजाऱ्याची खोली; हुज़रो-अनेकवचन, ३) नक़्शा= ढब, शैली, ढंग; नक़्शे-अनेकवचन ]
प्रसंग असा आहे की, कुणीसा एका पुजाऱ्याच्या किंवा संन्यास्याच्या खोलीत आलाय, आणि तो ही कसा तर, अगदी आपला बडेजाव मिरवित; एका हातात विल्स सिगारेटचे पाकीट, अंगामधे सफ़ारी ड्रेस, गळ्यात सोन्याच्या साखळीसारखा एखादा दागिना! म्हणून तो फकीरच बहुदा त्या वल्लीला उद्देशून म्हणतोय की, " अरे बाबा, ही एका फकीराची- ज्याने सर्व ऐहिक, भौतिक सुखांचा त्याग केलेला आहे, त्याची खोली आहे. इथे असे शान-शौक चालत नाहीत. इथे यायचे असेल तर एक साधा-सुधा माणूस म्हणून ये. जरा आठवून बघा; एखाद्या संताच्या किंवा देव-देवतांच्या दर्शनासाठी जाताना सुद्धा लोग अगदी नटून-थटून जातात, असे कितीतरी फोटो आपण अनेकदा सर्वच मिडीयामधे बघत असतो.( पुन्हा एकदा आजच्या सिरीयल्स आठवा; त्यात तर झोपायला जातानाही दागिने घालतात!)
ह्या गझलेचा शेवटचा शेर सुद्धा अतिशय अर्थवाही असा आहे-
लिखने के लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं चलते
[ क़ौम = वर्ण, जाती, वंश, राष्ट्र ]
ह्या गझलेतील प्रत्येक शेरच वास्तवाचे भान करुन देणारा आहे. आणि हा शेर देखील गझलेतील बदलत्या विषयांवर अगदी यथार्थच सांगतोय की, पूर्वी प्रेमिका, तिच्या दिलखेचक अदा हा गझलांचा प्रमुख विषय असायचा, पण आता बदलत्या काळाबरोबर शायरी सुद्धा बदलत चाललीय. आताच्या काळात भोवतालच्या समाजातील समस्या, प्रश्न, दु:खे ह्यांनाच प्राधान्य दिल्या जातेय किंबहुना द्यायला हवे. त्यामुळे गझलसुद्धा ’रिलेव्हंट’ होत चाललीय, तिच्यातील विषय आता ’रोमांस’ हा न राहता, त्यात सामाजिक वास्तवाचे भान येत चालले आहे. आणि अगदी खरेय ते! अगदी आज-कालच्या मराठी गझलाच बघा ना, अतिशय प्रगतीशील होतेय मराठी गझल. दलित काव्य हे सुद्धा ह्या संदर्भातील एक उत्तम उदाहरण ठरु शकेल.
चला तर, आता निघतो! पुढच्या भागात कतील शिफ़ाई ह्यांची एक गझल आपल्याशी ’शेअर’ करण्याचा ’मानस’ आहे! पुन्हा भेटूच!
-मानस६
सही!!!!!!!
सही!!!!!!!
क्या बात है.. बहोत बढीया रे..
क्या बात है.. बहोत बढीया रे..
छान लिहलय मानस!
छान लिहलय मानस!
मस्तच.
मस्तच.
मानस, सुंदर. सगळेच शेर
मानस, सुंदर. सगळेच शेर अप्रतिम... पण मला आवडलेला शेवटला -
लिखने के लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं चलते
गजलच्याच का, एकूण साहित्याच्या बदलत्या प्रवाहाच्या खुणा...
माझी आवडती गालिबची - नक्षं फरियादी है.. ह्यावर भाष्यं करणार?
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व माय-बोलीकरांचे आभार!
'दाद',... नक्श फरियादी है; नक्कीच घेणार आहे, बहुदा ६व्या भागात, अतिशय आशय-संपन्न, गहिरी गझल आहे, शेवटी गालिब आहे!!
-मानस६
खुप सुंदर... तुमचे प्रयत्न
खुप सुंदर...
तुमचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत....
ग़ीबत मे निकल जाते है तफ़रीह के लम्हे
अब महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं चलते
-- हंसके बोला करो बुलाया करो,
आपका घर है आया जाया करो....
मानस, गझल आणि त्याचबरोबरीने
मानस, गझल आणि त्याचबरोबरीने ती लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न दोन्ही आवडले.
उर्दू शायरी हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्याने मी आजवरचे ह्या लेखमालेचे सगळे भाग वाचत आले आहे.
गझल समजायला किंवा अनुभवायला ती जितकी जास्त ऐकावी तितकी भिनते आणि भिडते असं म्हणतात आणि ते अगदी खरं आहे.
त्याच न्यायानं मी हा लेखही एकापेक्षा अधिक वेळा वाचला... आणि मग मला जाणवलं की काही शेरांचं माझं interpretation थोडं वेगळं आहे.
उदा. 'चाबी न भरी हो तो खिलौने नही चलते' हे वाचलं तेव्हा मला आपणहून काम केल्याशिवाय कोणतही फळ प्राप्त होणार नाही याची जाणीव दिसली. त्यामुळे नुसतंच 'देवा मला मदत कर' अशी देवाकडे दुवा मागून, त्याची प्रार्थना करून उपयोग होणार नाही तर आयुष्य घडवायला कष्टाची, श्रमाची आवश्यकता आहे.
साधं खेळणं सुद्धा किल्ली दिली नाही तर चालत नाही..मग माणसाच्या आयुष्याची तर गोष्टच मोठी आहे
असं कवीला म्हणायचं असावं असं मला वाटलं.
ह्याच विचारांना पुरक असाच पुढचा शेरही !
बापजाद्यांनी जे कमावून ठेवलं आहे ते कायमचं पुरणार नाहीये.. त्यामुळे नुसताच हुंदडण्यात काळ घालवण्यापेक्षा कष्ट करा (आणि स्वतःची रोजीरोटी कमवून खा)
बघ, ह्या ही बाजूने ह्या दोन शेरांचा विचार करून
खूप लिहिलं गेलं असेल तर माफी !
आर.ए.आर. तुमच्या मनमोकळ्या
आर.ए.आर.
तुमच्या मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पहिल्या मिसर्यातील 'अब' महत्वाचा आहे. आता परिस्थिती बदलली आहे, पूर्वी अशी नव्हती.
कष्ट केल्याशिवाय माणसाचे जीवन घडत नाही, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे.
मग आत्ता असे काय बदलले आहे की, जे पूर्वी नव्हते? काम पहले दुआओ के सहारे चलते थे, अब नही चलते है.
हा> पण तुम्ही जो धागा सुचविला आहे तोच पकडून मी असे म्हणेन की, 'दे रे हरी, खाटल्यावरी', असे देवाने आधी कदाचित ऐकले असते, पण आता नाही...आता तो म्हणेल स्वतः कमावून खा... असो.
दुसर्या शेराच्या बाबतीत आपण दोघांनीही व्यक्त केलेले मत एक-सारखेच तर आहे.
धन्यवाद. लोभ असू द्यावा
-मानस६
मानसजी, आपला हा प्रयत्न खूप
मानसजी,
आपला हा प्रयत्न खूप आवडला.
वर्णन खूप आवडले!!
अत्यंत सुंदर ग़ज़ल आहे. एक एक
अत्यंत सुंदर ग़ज़ल आहे. एक एक शे'र कसा काळजात घुसतोय.
मस्त उपक्रम आहे. मानस, असाच चालू ठेव.
पूर्ण गझल अप्रतिम.. मतला तर
पूर्ण गझल अप्रतिम.. मतला तर सुरेखच.. पण मला आवडलेले शेर -
इक उम्र के बिछुडो़ का पता पूछ रहे हो,
दो रोज़ यहाँ ख़ून के रिश्ते नहीं चलते
ग़ीबत मे निकल जाते है तफ़रीह के लम्हे
अब महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं चलते
'खिलौने' या शब्दावरून एक शे'र
'खिलौने' या शब्दावरून एक शे'र आठवला:
"घर जाके रोयेंगे चुपचाप अकेले में,
मिट्टीके खिलौनेभी सस्ते न थे मेले में!
मला वाटते कवीवर्य दुष्यंत यांची ग़ज़ल असावी.
वा शरदजी, फारच कारूण्यपूर्ण
वा शरदजी,
फारच कारूण्यपूर्ण शेर आहे
-मानस६
या लेखमालिकेचा धागा नक्की
या लेखमालिकेचा धागा नक्की कुठे सापडतो? म्हणजे कुठल्या विभागात? बर्याच दिवसांनी आले तेंव्हा मागचे भाग शोधायचा प्रयत्न केला पण कळेना.
संघमित्रा, मी जुन्या
संघमित्रा,
मी जुन्या भागांच्या लिंक्स प्रत्येक नव्या भागात द्यायचा प्रयत्न केला होता, पण काय झाले कुणास ठाऊक, लिंक सेव्हच होत नव्हती. पण एक करु शकता, माझ्या 'वाटचालीत' तुम्हाला सर्वच लेख मिळतील. धन्यवाद.
-मानस६
ह्या मालिकेतील सर्व लेख आता
ह्या मालिकेतील सर्व लेख आता वरील लेखमालिका दुव्यावर जाऊन पाहू शकाल.
http://www.maayboli.com/node/17840
धन्यवाद, प्रशासक! -मानस६
धन्यवाद, प्रशासक!
-मानस६
जबरदस्त ग़ीबत मे निकल जाते है
जबरदस्त
ग़ीबत मे निकल जाते है तफ़रीह के लम्हे
अब महफ़िल-ए-याराँ में लतीफ़ें नहीं चलते >> पोचलं एकदम
ही गजल निवडल्याबद्दल विशेष धन्यवाद कारण गजलमधे केवळ 'मयखाना-साकी-शबाब' हेच असते असा जोरदार गैरसमज आहे तो दूर व्हायला मदत होईल.
लिखने के लिये क़ौम का
लिखने के लिये क़ौम का दुख-दर्द बहुत है
अब शेर में महबूब के नखरे नहीं चलते
खरे आहे. तो काळ गेला. वाडवडीलाच्या गडगंज संपत्तीवर जगण्याचा काळ. सोन्याचा धुर नीघणारा काळ.
पहीले दुवावो के लीये भी लोग काम करते थे.... अब चाबी भरणे के सीवा कुच नही चलता
क्या बात है मानस..तुझ्यामुळे
क्या बात है मानस..तुझ्यामुळे इतकी अप्रतीम गझल वाचायला आणि समजायला मिळाली.ही गझल विसरणे अशक्य आहे.. कायम लक्षात राहील.शकील जमाली आणि तुला मानाचा मुजरा!!!!!!
शेवटचा शेर फारच छान
शेवटचा शेर फारच छान आहे.
धन्यवाद!
बहोत खुब .
बहोत खुब .