विजय आनंद उर्फ़ गोल्डी, आनंद बंधूतील सर्वात लहान. मोठा भाऊ डाव्या विचारसरणीने प्रेरित आणि काही जबरदस्त हिंदी सिनेमांचा ’जरा हटके’ निर्माता-दिग्दर्शक. मधला हिंदी सिनेमाचा आद्य लव्हरबॉय, ज्याचा अभिनय कधीही गंभीरपणे घेतला गेला नाही असा अतिप्रचंड यशस्वी हिरो आणि त्याचबरोबर अत्यंत अयशस्वी निर्माता-दिग्दर्शक. गोल्डीकडे ना देवसारखे व्यक्तिमत्व होते ना चेतन आनंदसारखा वैचारिक पाया. तो बनला हिंदी सिनेमात शहरी, चकाचक ’कूल’वातावरण आणणारा, थरारपटांना वेगळा दर्जा आणि उंची प्राप्त करुन देणारा कसबी कथा-पटकथालेखक आणि अत्यंत स्टाईलिश दिग्दर्शक.
वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी त्याने लिहीलेल्या कथेवरुन ’टॅक्सी ड्रायव्हर’ बनला; दिग्दर्शक होता चेतन आनंद आणि नायक म्हणून देव आनंद. देवची दिलफ़ेक आशीक प्रतिमा तयार करण्यात या चित्रपटाचा मोठा वाटा होता. दिग्दर्शक म्हणून गोल्डीची कारकिर्द १९५७ च्या ’नौ दो ग्यारह’ पासून सुरु झाली. पाठोपाठ काला बाजार आला आणि त्याची थ्रिलर- सस्पेन्सवरची घट्ट पकड सर्वांनाच दिसून आली. तिन्ही देव बंधूंनी एकत्र अभिनय केलेला हा एकमेव सिनेमा. त्या नंतरचा ’तेरे घर के सामने’ हा गोल्डीचा सगळ्यात साधे कथानक असलेला सिनेमा म्हणता येईल. या मधेच कधीतरी ’हम दोनो’ आला ज्याची पटकथा गोल्डीची होती आणि दिग्दर्शक म्हणून अमरजीतचे नाव असले तरी या सिनेमावरचा गोल्डीचा ठसा स्पष्ट होता.
आणि मग आला गोल्डीचा मास्टरपीस ’गाईड’. सुरुवातीला त्याला जेंव्हा हा विषय सांगण्यात आला तेंव्हा त्याने तात्काळ नकार दिला. देव आनंदने मग मोठ्या भावाला दिग्दर्शनाची विनंती केली पण चेतन आनंद त्यावेळी ’हकिकत’ बनवण्यात गुंतले होते. राज खोसलाशीही बोलणी झाली पण शेवटी दिग्दर्शनाची जबाबदारी गोल्डीवरच येउन पडली जी त्याने अनिच्छेनेच स्विकारली. आर.के नारायणन यांच्या कादंबरीवर बेतलेला हा सिनेमा अनेक प्रकारे अद्वितिय आहे. यात काय नाहिए? आक्रमक, स्वार्थी नायिका; इनसिक्युअर, असूयेने भारलेला, स्खलनशील नायक. पत्नीच्या काही इच्छा-अपे़क्षा असतात याची जाणिवच नसलेला नायिकेचा पती. सर्वच पात्रे ग्रे शेड्समधे. प्रस्थापित सुखांत होत नाही, शेवटचा अर्थ अनेक प्रकारे लावता येतो, किंबहुना तो रुढार्थाने शेवट आहे का नवी सुरुवात यावरही चर्चा होऊ शकेल! लग्नबंधनाशिवाय राहणारे नायक-नायिका, कुटूंबसंस्थेबद्द्लची अनास्था, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामान्य माणसासारखी, चुका करणारी, गोंधळलेली ’खरी’ पात्रे; नायक-नायिकेच्या पडद्यावरील नैतिक आचरणाविषयी अत्यंत सोवळ्या असलेल्या हिंदी चित्रसृष्टीसाठी गाईड हा प्रचंड धक्का होता.मूळ कादंबरीपासून पटकथेचा वेगळेपणा कायमच वादाचा विषय बनला. मूळ कथेचे हे शब्दश: रुपांतर नक्कीच नाही.गोल्डीने आपल्या पद्धतीने ही कादंबरी मांडली आहे. त्यामुळे छोट्या मालगुडीतून ही कथा उदयपूरच्या किल्ल्यात जाउन पोहोचली आणि तिला भव्यतेचे परिमाण आपोआप लाभले.त्या काळाच्या मानाने ’गाईड’ हा सर्वार्थाने एक धाडसी प्रयत्न होता गोल्डीला त्यासाठी दिग्दर्शन आणि पटकथा या दोन्हीचे त्यावर्षीचे (१९६५) फ़िल्मफ़ेअर मिळाले, एवढेच नव्हे तर देवला त्याच्या कारकिर्दितील एकमेव सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे अवॉर्ड देखील मिळाले!
नासिर हुसेन प्रॊडक्शनचा ’तिसरी मंजिल’ पुढच्याच वर्षी प्रदर्शित झाला आणि एका ’कल्ट क्लासिक’चा जन्म झाला. फ़िल्म जॉनरच्या बाबतीत गाईड आणि तिसरी मंजिल दोन धृवावरचे सिनेमे आहेत आणि ते दोन्ही गोल्डीचेच आहेत यापे़क्षा त्याच्या जिनिअसचा दुसरा पुरावा तो काय! इंग्रजीत ज्याला ’फ़िल्म नॉयर’ म्हणतात त्या प्रकारचा हा सस्पेन्स- थ्रीलर. अभिनेता शम्मी कपूर आणि संगीतकार आर.डी.बर्मन या दोघांचीही कारकिर्द कायमची बदलून टाकणारा हा सिनेमा. कपडेपट, मॅनेरिझम्स, कॅमेरा अँगल्स, पार्श्वसंगीत, संकलन सर्वच बाबतीत अत्यंत स्टायलिश आणि आधुनिक असा हा सिनेमा. दिग्दर्शक म्हणून गोल्डी आणि संगीतकार म्हणून आर.डी या दोन्ही गोष्टी शम्मीला आधी मान्य नव्हत्या. पण जसजसे शूटींग पुढे सरकत गेले तसे त्याचा गोल्डीवरचा विश्वास वाढत गेला. तिसरी मंजिलचे शूटींग चालू असतानाच शम्मीची पत्नी गीता बालीचे निधन झाले आणि शम्मी कोलमडलाच. पण त्याही अवस्थेत गोल्डीने शूटींग रेटून नेले आणि सिनेमा वेळेत पूर्ण करुन दाखवला. साईड-वे ट्रॅकिंग, कॅमेरा पुढेमागे न हलवता झूमचा वापर करुन वेगवेगळ्या प्रतलावर असलेल्या पात्रांच्या हालचाली दाखवणे, तुकड्यातुकड्याच्या माँटाज तंत्राचा रहस्यनिर्मितीसाठी अत्यंत प्रभावी वापर यामधून गोल्डीची एक सिग्नेचर स्टाईल उदयास आली ती याच सिनेमात.
त्याच्या या जबरदस्त तंत्राचा पुढचा आविष्कार होता १९६७चा ’ज्वेल थीफ़’; आणखीन एक कल्ट क्लासिक, अगदी हिचकॊकच्या शैलीतला. श्रेयनामावलीपासूनच वेगळेपणा दाखवणारा आणि एकदा घेतलेली पकड शेवटपर्यंत न सुटू देणारा हा हिंदी सिनेमातील एक सर्वश्रेष्ठ रहस्यपट आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. वर उल्लेख केलेल्या सर्व तांत्रिक करामाती गोल्डीने दाखवल्याच पण उत्तम रहस्यपटाची पटकथा कशी असावी याचा आदर्शच तयार केला. एक सेकंदही विचार करायला उसंत न देणारा आणि रहस्य माहिती होउनही पुन:पुन्हा बघीतला तरी तितकेच मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे. प्रसंग जिथे चालला आहे ती जागा पहिल्याच शॉटमधे पूर्णपणे न दाखवता, पात्रांच्या हालचाली जसजशा होतील तसा त्यांचा पाठलाग करत ती जागा दाखवणारा कॅमेरा ही क्लुप्तीही रहस्य वाढवणारी ठरली. तर दुसर्या बाजूला, कॅमेरा थोडासाच हलवून त्याच फ़्रेममधे पण वेगळ्या डायमेन्शनमधे काय चालले आहे हे दर्शकाला दाखवण्याची हातोटीही एकदम नविन होती.
यानंतर मात्र गोल्डीची कारकिर्द आश्चर्यकारकरित्या उताराला लागली. ज्वेल थीफ़नंतर त्याने १९८८ पर्यंत तब्बल ९ सिनेमे दिग्दर्शित केले. त्यातले जॉनी मेरा नाम, बुलेट, राम-बलराम हे बर्यापैकी चाललेही पण त्यात पूर्वीची जादू उरली नव्हती. हा कदाचित त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळे आणि देव आनंदने स्वत:च दिग्दर्शक बनण्याचा घातलेला घाट याचा एकत्रीत परिणाम असावा. या काळात उल्लेखनीय म्हणावा असा एकच सिनेमा त्याने बनवला तो म्हणजे १९७१ चा तेरे मेरे सपने’. ए.जे.क्रोनिनच्या ’सिटाडेल’वर बेतलेला हा सिनेमा त्याच्या दिग्दर्शनाबरोबरच अभिनयाचाही उत्तम नमूना आहे. एक ध्येयवादी डॊक्टर पैशाच्या मागे लागून स्वत:चे सत्व हरवतो ही कथा गोल्डीने अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर रंगवली.
या काळात त्याने अभिनय केलेले ’कोरा कागज’ आणि ’मै तुलसी तेरे आंगन की’ हे सिनेमेही आले. पण ते नायिकाप्रधान असल्याने गोल्डीचे काम झाकोळले गेले.
हिंदी सिनेमा आणि त्यातली गाणी हा एक न संपणारा विषय.या गाण्यांचे संगीत, काव्य, गायन या सर्व गोष्टींची चर्चा तर वारंवार होते आणि कट्टर समर्थकही बनतात.पण या गाण्यांबद्द्लचा तसा दुर्ल़क्षीला जाणारा मुद्दा म्हणजे त्यांचे चित्रीकरण. हिंदी सिनेमात गाण्यांचे महत्व अपरंपार असले तरी त्यांच्या सादरीकरणाबाबत मात्र सर्वसाधारणपणे एकप्रकारचा सरधोपटपणा दिसून येतो.
गाण्यांच्या चित्रीकरणात जबरदस्त कामगिरी करणारे तीन मुख्य दिग्दर्शक आहेत राज कपूर, बिमल रॉय आणि अर्थातच गोल्डी. या यादीत राज कपूरचे नाव कदाचित थोडे खटकणारे वाटेल पण त्याचा ’रोमँटीसिझम ऑफ़ अ केव्हमॅन’ अवतार सुरु होण्याआधी त्याची कामगिरी हिंदी सिनेमातील गाण्यांच्या चित्रिकरणाचे व्याकरण बदलून टाकणारी होती. ’घर आया मेरा परदेसी’चे स्वप्नदृष्य, ’मुड मुड के ना देख मुड मुड के’ चा मूड झकासपणे पकडणार्या वेगवान कॅमेरा मूव्हमेंट्स आणि ’आ अब लौट चले’ मध्ये मोकळे आकाश आणि विस्तिर्ण पठार यांच्या पार्श्वभूमीवरची भव्यता ही त्याच्या जिनीअसची काही उदाहरणे. बिमलदांची स्टाईल यापे़क्षा एकदम वेगळी. कथा आणि पात्रांचा सच्चेपणा हा त्यांच्या सिनेमाचा आत्माच. त्यामुळे ’लार्जर दॅन लाईफ़’चा सोस त्यांनी कधीच दाखवला नाही. त्यांच्या सिनेमातील गाण्याचे चित्रिकरणही त्या कथेच्या आणि पात्रांच्या स्वभावाला साजेसेच असे. या दॄष्टीने बंदिनी त्यांचा मास्टरपीस ठरावा. जेलमधले हताश, परिस्थितीशरण वातावरण अचूकपणे पकडणारे ’अबके बरस भेजे भैय्या को बाबूल’, खेडेगावातील साध्यासुध्या वैष्णव परंपरेत वाढलेल्या मुलीचे भावविश्व टिपणारे ’मोरा गोरा अंग लै ले’ आणि अर्थातच सिनेमाच्या क्लायमॅक्सला वापरलेले अद्वितीय ’मोरे साजन है उस पार’.
आपल्याला विजय आनंद या दोघांच्या मधे सापडतो. त्याच्या सिनेमाला बिमलदांसारखे वास्तवतेचे परिमाण कधीच लाभले नाही आणि राज कपूरसारखा ’ग्रँड शो’ही त्याला क्वचितच करता आला. त्याचे बहुतेक सिनेमे मुख्यत: देव आनंदसारख्या ’हिरो’बरोबर, त्याच्या इमेजचा वापर करीत आणि ती सांभाळीत तयार झाले आणि तरीही हिंदी सिनेमांतील गाण्यांच्या सादरीकरणातील अनेक अभिनव प्रयोग आणि तंत्राचा अभूतपूर्व वापर त्याने करुन दाखवला व काही नेत्रदिपक माईलस्टोन्स तयार झाले.
विजय आनंद उत्तम दिग्दर्शक तर होताच पण त्याबरोबर तो अत्यंत हुशार पटकथालेखक होता. त्यामुळे त्याच्या सिनेमातली गाणी कधिही अचानक सुरु होत नाहीत, ’हे कुठून सुरु झालं आता?’ असा प्रश्न प्रे़क्षकाला अजिबात पडत नाही. तो गाण्याचा एक माहोल तयार करतो, प्रेक्षक गाण्याची वाट पहात असतानाच ते सुरु करण्याचं त्याचं कौशल्य वादातीत आहे. ’कट टू साँग’ हा प्रकार होत नाही. ज्वेल थीफ़ मधे ’शालू ना सिर्फ़ नाचेगी पर अपना मूंह भी बंद रखेगी’ असं अशोककुमारने दरडावताच ’होटों पे ऐसी बात’ सुरू होणार याची जणू वर्दीच मिळते. देव आनंद आणि वहिदा रेहमान मधला एका झकास प्रसंग पुढच्या गाण्याची उभारणी करतो आणि मुंबईच्या पावसात,एका छत्रीतली ’रिमझीम के तराने लेके आई बरसात’ची धमाल सुरु होते (काला बाजार). http://www.youtube.com/watch?v=DRebkTpMmRs
पटकथेला पूर्ण महत्व देत असल्यानेच गाणे कुठेही, कोणत्याही परिस्थितीत फ़ुलवण्याची हातोटी त्याला दाखवावी लागली. उगीच गाण्यासाठी म्हणून स्विट्झर्लंडला जायची यश चोप्रागिरी त्याने कधी केली नाही. पण त्यामुळेच आपण कल्पनाही करु शकणार नाही अशा जागी अनेक अत्यंत मनोरंजक गाण्यांची निर्मीती झाली. कलाकारांना हालचाल करायला अत्यंत मर्यादित, बंदिस्त जागेत गाणी चित्रीत करणे ही तर त्याची खासियत म्हणावी लागेल. वरती उल्लेख केलेल्या त्याच्या पहिल्यावहिल्या ’नौ दो ग्यारह’मधेच त्याने ’सो जा निंदीया की बेला है,आजा पंछी अकेला है’ हे गाणं एक खोली आणि टॉयलेटमधे काय फ़ुलवलं आहे! http://www.youtube.com/watch?v=HktuThpRGy8
काला बाजारमधल्या ’अपनी तो हर आह एक तुफ़ान है’चा खोडसाळ रोमान्स तर ट्रेनच्या छोट्याश्या कंपार्टमेंटमधे रंगतो. http://www.youtube.com/watch?v=ZuRQ-9zK75g
जॉनी मेरा नाम मधलं ’पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले’ आणि त्यातली खिडक्य़ांची धमाल तर प्रसिद्धच आहे. आपण अक्षरश:आता कसली नविन खिडकी दिसते अशी वाट पहायला लागतो! देव आनंदचा ’स्वीट इडीअट’ पर्सोना त्याने काय खुबीने वापरलाय. http://www.youtube.com/watch?v=eqnjHf7PXjs
या यादीत ’दिल का भंवर करे पुकार’ अर्थातच असले पाहिजे. पडद्यावर देव-नूतन सारखी टवटवीत जोडी, सचिनदेव बर्मनचे एव्हरग्रीन संगीत आणि कुतुबमिनारच्या फ़िरत जाणार्या पायर्यांची अफ़लातून पार्श्वभूमी (अर्थात हे चित्रीकरण खर्या कुतुबमधे न होता सेटवर झालेले आहे). ट्यूनमधल्या प्रत्येक पॉझचा इतका अचूक वापर केला गेला आहे की बस्स! एका इंटरल्यूडमधे व्हायोलिन्सचा क्रिसेंडो आणि त्याचवेळी कुतुबच्या गॅलरीत हात पसरुन वारा अंगावर घेणारी नूतन हे काँबिनेशन केवळ अफ़ाट आहे.
http://www.youtube.com/watch?v=plAkyLrQIdI
सिनेमाच्या तंत्रावरची त्याची हुकूमत गाण्यांच्या चित्रिकरणात अजूनच फुलून येते. ट्रॅकिंग कॅमेर्याचा वापर त्याने अनेकदा कौशल्याने केला. ’होटों पे ऐसी बात’मधे या गोल फ़िरणार्या कॅमेर्याची मजा अनुभवता येते. http://www.youtube.com/watch?v=x92K2mUeYZ0
हाच प्रकार थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे लो अँगल ट्रॅकिंग त्याने ’आज फ़िर जीने की तमन्ना है’ मधे ही वापरला आहे. http://www.youtube.com/watch?v=1odcNKyfZJU
सलग, मोठे, अथक चालणारे शॉट्स त्याने खुबीने वापरले. गाईडमधलं ’तेरे मेरे सपने अब एक रंग है’ पहा. पूर्ण गाणं केवळ तीन शॉट्समधे पूर्ण होते. http://www.youtube.com/watch?v=xSrBkphlQuM
पण त्याचबरोबर अनेक तुकड्यातुकड्यांनी बनलेले ’मोंटाज’देखील त्याने तितक्याच ताकदीने वापरले. ’आजा आजा मैं हूं प्यार तेरा’मधला शेवटचा मॅडकॅप दंगा या प्रकारचे उत्तम उदाहरण ठरावे.http://www.youtube.com/watch?v=uSYQd2Q1N7I
माझ्या पिढीला गोल्डीची पहिली ओळख त्याच्या कारकिर्दिच्या शेवटी त्याने रंगवलेल्या ’तहकिकात’ मधल्या ’डिटेक्टीव्ह सॅम डिसिल्व्हा’च्या रुपात झाली. प्रेक्षकांचे मानसिक वय दहापेक्षा जास्त आहे याचे भान ठेवणार्या ज्या काही थोड्या रहस्यमालिका भारतीय दूरचित्रवाणीवर आल्या त्यातली ही एक (दुसरी अर्थातच ब्योमकेश बक्षी!). मोठ्या पडद्यावर तीन तास खिळवून ठेवणार्या गोल्डीने छोट्या पडद्यावरही तितक्याच ताकदीने आपला ठसा उमटवला.
आपल्या आयुष्याभराच्या कामाने हिंदी सिनेमाचे प्रस्थापित नियम बदलून टाकणारा हा अवलिया जेंव्हा सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष झाला तेंव्हा त्याने तिथेही नवीन विचार, नव्या पद्धती मांडण्याचा खूप प्रयत्न केला. अडल्ट सिनेमासाठी वेगळी नियमावली आणि सिनेमा थिएटर्स असावीत. त्यांची निर्मिती जास्त संवेदनशीलतेने व्हावी हा त्याचा क्रांतिकारी विचार हिंदी सिनेमाच्या दुटप्पी ढुढ्ढाचार्यांना अर्थातच पटला नाही आणि गोल्डीने या पदाचा राजीनामा दिला.
२३ फेब्रुवरी २००४ रोजी हॄदयविकाराच्या धक्क्याने गोल्डीचे निधन झाले तेंव्हा सार्या जगाने प्रथमच सर्वांसमोर आपल्या अश्रूंना मोकळेपणाने वाट करुन देणारा देव आनंद पाहिला.
विजय आनंदने एका पूर्ण पिढीचे प्रचंड मनोरंजन केले पण त्याचा कोणताही सिनेमा आजही तितकाच फ्रेश वाटतो. त्याही पलिकडे जाउन त्याने हिंदी सिनेमाला वयात आणले, मॅच्युअर केले. २००७साली 'जॉनी गद्दार' आला आणि त्याच्या अर्पणपत्रिकेत विजय आनंदचा उल्लेख होता. नविन पटकथालेखक, दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटासाठी अजूनही प्रेरणादायक ठरणार्या गोल्डीचा हा सुवर्णस्पर्श असाच कायम राहिल.
आगाउ - नेहेमी प्रमाणेच छान !
आगाउ - नेहेमी प्रमाणेच छान !
आगाऊ, मस्तच. हम दोनोमधलं
आगाऊ, मस्तच.
हम दोनोमधलं जिंदगी का साथ निभाता चला गया चं चित्रीकरण अफलातून आहे. आणि दारू प्यायलेल्या देवला नूतन ग्लासमधे दिसते (आणि चक्क्क गाणं म्हणते,) ही कल्पनाच अफाट आहे. :)तांत्रिक करामतीमधे शंभर पट सुधारणा होऊनदेखील अशी कल्पना अजून कुणाला सुचलेली नाही.
तिसरी मंझिलमधलं शम्मीचं तुमने मुझे देखा... हे पण असंच सुंदर गाणं.
विजय आनंदच्या बाबतीत अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याच्या पिक्चरमधली गाण्याची धुन आणि चित्रीकरण जितके कौशल्यपूर्ण असायचे तितकेच गाण्याचे शब्द देखील अर्थवाही आणि कथेला साजेसे. उगाच आपलं. सनम्,जानेमन, जानेजा, गोरीया, बेलिया असल्या गुळगुळीत शब्दाचा वापर केलेली गाणी त्याने कधीच वापरली नाहीत.
पलभर केलिये मधली ही ओळः
माना तू सारे हसीनो से हसी है.. अपनी भी सूरत बुरी तो नही है
हेमा आणि देवला याहून अजून परफेक्ट वर्णन कुठे दिसणार?
अपनी तो हर आह एक तूफान है
यावर वहिदाने दिलेले एक्स्प्रेशन्स जितके धमाल आहेत, तितकाच या ओळीतला श्लेष पण!
उपरवाला जानके अंजान है...
आगाऊ, मस्त लिहीले आहे. देव
आगाऊ, मस्त लिहीले आहे.
देव आनंद ने आपल्या चित्रपटांचे दिग्दर्शन विजय आनंदलाच का करू दिले नाही?
आज सकाळीच सोनी वर राम बलराम लागला होता.
सहिये आगावा. गाईड जरा
सहिये आगावा.
गाईड जरा स्टायलाईज्डच वाटतो कायम (तरीपण अतिप्रचंड आवडतो)
आणि गाणी, गाणी, गाणी, गाणी... उफ्फ्फ!! काय ती एकेक गाणी.
कडक..
कडक..
आगाऊ, आता परत उडवणार नसशील तर
आगाऊ,
आता परत उडवणार नसशील तर प्रतिक्रिया देऊ का?
छान लिहिलयस रे.
छान लिहिलयस रे.
मी एक्दम रंगून गेले त्या त्या
मी एक्दम रंगून गेले त्या त्या गाण्याची आणि सिनेमांची दृश्ये आठवून
फार छान लिहिले आहे.
येस्स. आणि तहकीकात आणि व्योमकेश बक्षी या माझ्या पण आवडत्या रहस्यमालिका
मस्त लिहीलंय
मस्त लिहीलंय
वा वा.. सुंदर लिहीलेस रे..
वा वा.. सुंदर लिहीलेस रे.. खुप आवडला लेख.
फ्रेश वाटले वाचुन. येस्स. आणि
फ्रेश वाटले वाचुन.
येस्स. आणि तहकीकात आणि व्योमकेश बक्षी या माझ्या पण आवडत्या रहस्यमालिका स्मित
माझ्याही आवडत्या आहेत त्या.
सुंदर लिहिले आहे. पण त्याने
सुंदर लिहिले आहे. पण त्याने मोजकेच काम केले. कदाचित देव सोडून इतर कलाकार घेतले असते तर त्याला जास्त स्वातंत्र्य मिळाले असते. देव च्या डोक्यात त्याचवेळी हवा जायला सुरवात झाली.
इतकी वेगळी कथा असूनही, गाईड चालला कसा, हे नवलच आहे. अर्थात त्यात गाण्यांचा आणि टेकिंगचाही मोठा हातभार आहे. पिया तोसे ची छाया त्या काळातल्या अनेक गाण्यांवर पडलेली आहे.
तेरे मेरे सपने मधे, हेमाचे ता थई तक थई असे एक नृत्यगीत आहे, त्याचे चित्रीकरण पण खास आहे, मला मुमताजचे जैसे राधा ने माला जपी चे पण चित्रीकरण आवडते. (या गाण्यांचा सहसा उल्लेख होत नाही.)
एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसलेले नायक नायिका, हि पोझ पण त्याकाळी फार फेमस झाली होती.
सॉरी चिनूक्स! अरे काय होत
सॉरी चिनूक्स! अरे काय होत होते तेच कळत नव्हते, मायनर एडीटींग करत होतो आणि त्यानंतर नीट सेव्हच होईना.
आता प्रतिक्रिया दे हो
देव आनंद ने आपल्या चित्रपटांचे दिग्दर्शन विजय आनंदलाच का करू दिले नाही?>>> विनाशकाले विपरीत बुद्धी!
आगाऊ ..फार सुरेख लिहलय.. एक
आगाऊ ..फार सुरेख लिहलय.. एक प्रकारची ही गोल्डीला वाहिलेली श्रद्धांजलीच..
'गाईड' वर पी एच डी करता येईल इतक्या वेळेला पाहिलाय ..दरवेळी गोल्डीला सलाम केला जातो..
मस्तच
मस्तच
छान लेख...!!
छान लेख...!!
आगावा, मस्त लेख!
आगावा, मस्त लेख!
मस्त लेख
मस्त लेख
अरे मस्त लिहिले आहेस रे
अरे मस्त लिहिले आहेस रे आगावा.. हम दोनो ला नावालाच अमरजीत दिग्दर्शक होता.. दिग्दर्शन खरे गोल्डीनेच केले असे गोल्डीचे म्हणणे होते.. (संदर्भः 'एक होता गोल्डी' अनिता पाध्ये)..
गाइड माझापण ऑल टाइम फेवरिट.. पुस्तका इतकाच सिनेमा सुंदर (भले दोन्ही वेगवेगळे असतील काही कळीच्या मुद्दयांवर).. तिसरी मंझील, ज्युएल थीफ दोन्ही मस्तच.. गोल्डीच्याच मते देवआनंद एक दिग्दर्शक म्हणुन अतिशय वाईट होता व त्याला पटकथेची जाण स्वतः दिग्दर्शन करताना चांगली नव्हती..
गोल्डीने लग्न फार उतारवयात केले आणि स्वतःच्या मामेबहिणीशी केले.. मामाशी वा मामेबहिणीशी लग्न ही गोष्ट दक्षिण भारतात दिसत असली तरी उत्तर भारतीय आनंद कुटुंबात मात्र फार विरोध झाला.. तसेच मधली अनेक वर्षे गोल्डीने ओशोचरणी घालवली.. गोल्डीचा मुलगा आजही सेकंड-थर्ड असिस्टंट डायरेक्टर म्हणुन काम करतोय..
वरच्या पोस्टमधले अनेक गोष्टी 'एक होता गोल्डी' ह्या अनिता पाध्येंच्या पुस्तकातून..
अगदी अगदी! मस्त लिहिले आहेस
अगदी अगदी! मस्त लिहिले आहेस
छान लिहिलेस, आवडले. वरचे ते
छान लिहिलेस, आवडले. वरचे ते सारे मास्टरपिसेस पुन्हा बघितले आता या निमित्ताने.
मस्त लेख. सगळि गाणी परत बघत
मस्त लेख.
सगळि गाणी परत बघत बघत वाचला. मी एवढ्या बारकाव्याने कधी बघितलीच नव्हती. मस्त वाटल.
मस्त एकदम! 'सॅम डिसील्व्हा'
मस्त एकदम! 'सॅम डिसील्व्हा' एवढा भारी माणूस आहे माहिती नव्हतं.
एक सुचना/विनंती करु का? जमल्यास नावात गोल्डीचं नाव टाका. जास्ती लोकांना वाचायला मिळेल...
जबरी..
जबरी..
तेरे मेरे सपने मधे, हेमाचे ता
तेरे मेरे सपने मधे, हेमाचे ता थई तक थई असे एक नृत्यगीत आहे, त्याचे चित्रीकरण पण खास आहे, मला मुमताजचे जैसे राधा ने माला जपी चे पण चित्रीकरण आवडते.>> हम भी बचपन में छायागीत देखते थे और ऐसे गाने भी बारीकीसे देखते थे!
अनुमोदन दिनेशदा.
आगाउ उत्तम लेख. मी पण गाइड फॅन आहे. मला प्लेन वॅनिला लवस्टोरीज पेक्षा अश्या काहीतरी ट्विस्ट वाल्या कथा खूप आवड्तात कारण प्रत्यक्षात असेच होत राहते. चेन्नै हून आल्यावर व्यवस्थित परत वाचून काढते.
मस्त आहे. आवडला लेख. (जुना
मस्त आहे. आवडला लेख. (जुना वाचला होता
)
माझ्या मते तिसरी मंझिल हा
माझ्या मते तिसरी मंझिल हा त्याचा सर्वात उत्तम चित्रपट. तो खरा न्वार पंथामधे बसतो, त्याच्या नंतर त्या पठडिमधल्या चित्रपटांची रांग लागली.
मस्त
मस्त
एकदम मस्त लेख रे आगावा...
एकदम मस्त लेख रे आगावा...

अगोदर हा नजरेतून कसा काय निसटला काय माहित??
गोल्डीच्या कोरीओग्राफीचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रुप डान्स असेल तर नाचणार्या हिरवणीच्या आणि बाकी डान्सर च्या स्टेप्स वेगळ्या असायच्या... अदरवाइज ग्रुप मध्ये नॉर्मली सगळ्यांच्या स्टेप्स एक सारख्याच असतात ... टेक एनी साँग ....
मस्त लेख!
मस्त लेख!
Pages