उन्हाळ्याचे दिवस आहेत, अंधार पडल्यावर थोडाफार गारवा पसरला आहे. बाबा घरात आहेत आणी मूडमधेही. कारण ते जोराजोरात गाणी म्हणत पेपर वाचतायत.अचानक ते विचारतात 'तू डॉन पाहिलायस का?' मी गोंधळून त्यांच्याकडे पाहतो. 'अरे डॉन,अमिताभचा, नसशील पाहिला तर जाऊया आज ९ ते १२ ला'. बाबांचं असचं असतं त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की ती तात्काळ अमलात आणायला सुरुवात करतात. अशावेळी विरोधी सुर काढणे धोकादायक ठरु शकते हे मला चांगलेच ठाऊक आहे.खरेतर आताच पावणे नऊ झालेत, तिकीट कसं मिळणार वगैरे प्रश्न माझ्या मनात येतात पण बाबांचा प्लॅन झालेला असतो- 'पटकन जेवूया, एवढा जूना सिनेमा आहे गर्दी काय नसेल तिकीट मिळेल लगेच, तसाही तो सेंट्रल टॉकिजवाला ओळखीचा आहे आपल्या, काय?' जेवतानाही सर्वकाळ डॉन प्रशस्ती चालूच असते. धावपळ करीत आम्ही सव्वानऊ पर्यंत थेटरवर पोचतो आणी आमचे स्वागत हार घातलेल्या 'हाऊसफुल्ल'च्या बोर्डने होते. पण बाबा हार मानायला तयार नाहीत, ते मॅनेजरला गाठतात,जुना वशिला लावतात. मॅनेजर आमच्याकडे सहानूभुतीने पाहतो. 'तुमाला तेकिट देनार की वो,गल्लीमदले तुमी;पन माजं ऐका आत्ताच्या शोला जाऊ नका, ह्या पब्लिकला समदा शिणेमा पाठ आहे येक डायलाक पन नीट ऐकू द्येत नाहीत.' आमच्या चेहर्यावरचा अविश्वास तो वाचतो आणी आम्हाला 'येक थोडं शँपल' दाखवायला बाल्कनीत घेऊन जातो.तिथे सॉलीड बोंबाबोंब चाललेली असते,तेवढ्यात अमिताभची एंट्री होते आणी तक्षणी शेकडो, नाणी,कोल्ड्रींकचे क्राऊन,शर्ट,टोप्या हवेत उडतात;आणि खरच सांगतोय; त्यामागे क्षणभर का होईना,पडदा दिसेनासा होतो.बहिर्याचे देखील कान किटतील असला गदारोळ सुरु होतो.आम्ही चूपचाप दुसर्या सिनेमाला जातो.
सिनेमा रिलिज होऊन जवळजवळ २० वर्षांनी, रात्रीच्या शेवटच्या शो ला,गावातल्या सर्वात टीनपाट थेटरात मी त्यादिवशी जे दृष्य पाहिले ते केवळ अदभुत या शब्दांनी वर्णन करण्यासारखे आहे.लोकप्रियता काय असते आणि सिनेमाचे वेड कशाला म्हणतात हे मला त्यादिवशी नीट्च कळाले.
नशिबाने मी सिनेमावर निस्सीम प्रेम करणार्या गावात जन्माला आलो. सोलापूरात सिनेमा पाहणे हा एक सिरिअस उपक्रम असतो. घरातले सर्व लोक म्हणजे पुरुष आणि बायका, तरणे आणि म्हातारे सगळे आपपल्या आवडीचे सिनेमे आपपल्या वेळेत पाहतात. सगळ्या कुटूंबाने एकत्र सिनेमा बघायचे दिवस म्हणजे फक्त सुट्टीचे. अन्य दिवशी मॉर्निंग आणि ६ ते ९ चा शो कॉलेजकुमारांचा, मॅटीनी बायकांचा आणि ९ ते १२ लास्ट शो घरातील पुरुषांचा असं या गावाचं साधारण वेळापत्रक आहे!
सिनेमा बघायला जाणं हीच मुळात अंगावर रोमांच उभे करणारी प्रक्रिया आहे! सोलापूरातील स्थानिक वर्तमानपत्रात दर शुक्रवारी जवळजवळ दोन पानं भरुन सिनेमाच्या जाहिराती येत. ('सकाळ' सारखे पांचट पेपर आल्यापासून मात्र हे प्रमाण कमी होत चालले आहे, ज्या पेपरात सिनेमाच्या जाहिराती नाहीत त्याचा उपयोग तरी काय?). माझ्या लहानपणी तर नुसत्या या जाहिराती वाचूनदेखील सिनेमाची झिंग चढायला लागायची. काय बहारदार भाषा असायची ती! ' मेघास्टार चिरंजीवीची अप्रतीम अदाकारी- घराना मोगुडू', 'सप्तरंगी गर्दीचा सातवा आठवडा', ' डॉ. राजकुमारचे हृदयस्पर्शी महान कौटुंबिक कन्नड चित्र - बंगारद मनुष्य', 'तुफान हाणामारीने भरलेले जी-९ मिथूनचे इस्टमनकलर मनोरंजन - कसम पैदा करनेवाले की', 'गुलाबी थंडीत घाम फोडणारा भयानक हॉरर सिनेमा - इव्हिल डेड'. त्यात पुन्हा एखादा गाजलेला डायलॉग! नुसती जाहिरात वाचूनच माणूस जागच्याजागी उड्या मारायला लागायचा. गावभर लागलेल्या पोस्टर्सनी हा सिनेमा फिवर अजूनच वाढवलेला असे. मग शो कुठला आहे, अॅडव्हान्स कधी आहे, किती हाउसफुल्ल आहे, कुठल्या थेट्राची ब्लॅक कुठे मिळतील, कुठल्या 'मामांचा' वशिला लावता येईल वगैरे चर्चा जोरात सुरु व्हायच्या. कोण,कुठून,कसा, कोणाला घेउन येणार याचे प्लॅनिंग व्हायचे. पैशाची व्यवस्था लावण्यात यायची (सिनेमाला चाललेल्या मुलाला पैसे न देणे याला सोलापूरी बालसंगोपनात अत्याचार समजला जाई!), आणि शेवटी सगळी वरात थेटरच्या दारात पोहोचायची. मीना,छाया,आशा,प्रभात,भागवत,कल्पना; पूर्व भागातले लक्ष्मीनारायण, गेंट्याल अशी कितीतरी थिएटर्स.
तिथला देखावा तर काय वर्णावा! एकतर सोलापूरात ७-८ थेटर्स एकाच चौकात आहेत त्यामुळे सुटणार्या आणि नव्या शोची एकच तोबा गर्दी उसळलेली. गाड्यांचे हॉर्न,लोकांचा आरडाओरडा, एकमेकाला शोधणारे हाकारे, त्यातच ब्लॅकवाल्यांची धांदल; थोडक्यात काय तर विश्वनिर्मीतीच्या वेळी कसला तो 'केऑस' होता म्हणतात तो असाच असला पाहिजे याची खात्री पटवणारे सारे वातावरण. आता इथे केवळ थेटर्सच्या जवळच दिसणार्या खास सोलापूरी व्यक्तिमत्वांची ओळख तुम्हाला होते. गर्दी नियंत्रणासाठी असलेले हे माजी पैलवान लोक, शारिरीक शक्तीचा वापर करण्यापेक्षा केवळ मौखिक बळावर (म्हणजे तोंडतून येणारी भक्कम पिंक आणि शिव्या) कितीही लोकांवर काबू ठेवत आले आहेत. अर्थात गरज पडली तर एकाचवेळी शंभराच्या घोळक्याला ढकलून सरळ लायनीत उभे करण्याची ताकद यांच्यात आहे. कुठल्याही सिनेमाच्या यश-अपयश, बरा-वाईट याने अजिबात प्रभावित न होणारे हे स्थितप्रज्ञ आहेत. हिंदी सिनेमाचा आख्खा इतिहास त्यांच्यासमोरुन गेला आहे त्यामुळे कुठला सिनेमा चालणार आणि कुठला पडणार हे केवळ एका शोच्या रिस्पॉन्सवरुन सिनेमा न पाहता ही सांगू शकणारे हे ट्रेड पंडीतही आहेत. थेटरबाहेरचे प्रचंड मोठे कटआऊट्स हे ही इथले वैशिष्ठ्य. त्यातही सिनेमात हिरो शेवटी मरत असेल तर त्याच्या कटआउट्ला मोठाले हार घालतात.यल्ला-दासी या कलाकार जोडीने या पेंटींगच्या क्षेत्रात एक काळ अक्षरशः गाजवला.
तिकीटाच्या रांगेत घुसाघुसी करुन, घामेघूम होत बाहेर पडल्यावर जरा स्थिरस्थावर होउन,अजून कोण आलेय त्यात कोणी 'इंटरेस्टींग' आहे काय, असल्यास कुठले तिकीट आहे इ.इ. चौकश्या सुरु होतात. बरोबर बायका-मुली नसतील तर सहसा बाल्कनीचे तिकीट काढले जात नाही. एकदा तिकीट हातात आल्यावर मग मोर्चा थिएटरच्या आत वळतो. तिथे नोटीस बोर्डसारख्या चौकटीत सिनेमातील दृष्ये किंवा स्टील्स लावलेली असतात. त्यांच्या काचेला नाक लावून सिनेमात कायकाय आहे याचा अंदाज घेतला जातो. काही जास्त जिज्ञासू, सिनेमाच्या पोस्टरवरची श्रेयनामावली बारकाईने वाचतात आणि त्यावर आपली अज्ञ-तज्ञ मते सांगू लागतात. तेवढ्यात घंटा वाजते आणि व्यवस्थित तिकीट काढले असले तरी प्रचंड घाई करुन लोक आत घुसतात. याला कारण हे आहे की एकाच सीटची अनेक तिकीटे असल्याचा चमत्कार इथे बर्याच वेळा घडतो. त्यामुळे पहिले जाउन सीट बळकावणे याला पर्याय नसतो. मी त्याच्या जवळ बसणार,बसणार नाही वगैरे होउन एकदा सगळी गँग स्थानापन्न झाली की सर्व दिशांना माना वळवून वळवून ओळखीचे कोण दिसतेय काय याची चाचपणी होते (काही 'विशिष्ट' प्रकारच्या इंग्रजी सिनेमांच्या वेळी तर हे फारच गरजेचे असते!). मग जाहिराती सुरु होतात. त्यांचे सर्टिफीकीट झळकताच त्यावरचे नाव डोळे बारीक करुन वाचण्याची धांदल होते. हळूहळू थेटर भरते, वाढलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचा, पान-गुटख्याच्या पिंकांचा आणि मुतारीकडून येणार्या दरवळाचा एक एकत्रित वास सगळीकडे ठासून भरतो. हाच तो सिनेमाचा वास. तो वास, तो अंधार डोक्यात शिरतो, तुमचा कब्जा घेतो, हळूहळू तुम्ही बाहेरचे जग विसरता पडद्यावरच्या सुखदु:खात सामील होता.
पण शांतपणे सिनेमा पाहतील तर ते सोलापूरी कसले. सिनेमा कितीही चांगला असो वा वाईट सतत कॉमेंट केल्याशिवाय पैसे वसूल होत नाहीत अशीच इथे समजूत आहे. 'आला बग,आला बग, ए मान वळीव की मागं हाय तुझ्या, ए काय बघतो रे इ. नेहमीची कॉमेंट्री तर असतेच पण एक सिनेमा अनेकदा बघणारे वीर आख्खे डायलॉगदेखील म्हणतात.'दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे' पहाताना शाहरुखबरोबर आख्खे थेटर 'पलट, पलट' म्हणताना मी अनुभवले आहे. अर्थात ही बडबड बाकीचे शांतपणे ऐकून घेतात असे समजू नका. कॉमेंट्सवरुन बाचाबाची आणि भांडणे अधूनमधून होतातच. सिनेमाच पकाऊ असेल तर मात्र या कॉमेंट्सचे कौतुकही होते. सिनेमा कितीही वाईट असला तरी या ना त्याप्रकारे स्वतःचे मनोरंजन करण्याची वृत्ती इथे आहे. मध्यंतरात पॉपकॉर्न पाहिजेतच कारण मग त्यांच्या पिशवीचे फुगे करुन योग्य संवादाच्या वेळी फोडता येतात!
काळ बदलला, गाव ही बदलले. डीजिट्ल पोस्टर्सनी पेंटींगवाल्या कटआउट्सची जागा घेतली. पेपरातील सिनेमाच्या जाहिरातींची संख्या रोडावली. टिव्हीवरुन सतत होणार्या जाहीरातबाजीने त्या जाहिरातींचे आकर्षणही मावळले. मोठ्या शहरात तर १०० रुपयाला फक्त पॉपकॉर्नच मिळू लागले. सिंगल स्क्रीन थेटर्सना देशभरातच अवकळा आली त्याला आमचे गाव तरी कुठून अपवाद ठरणार? सोलापूरच्या एकंदरीत आर्थिक दुरावस्थेचा फटका या धंद्यालाही बसला.
बर्याच वर्षांनी पुन्हा एकदा गावात 'थ्री इडीअट्स' पहायचा योग आला. बायकोला घेउन पहिल्यांदाच सोलापूरात सिनेमा पहात होतो त्यामुळे तिला फार कल्चरल शॉक बसू नये म्हणून तिच्या पुणरी पठडीतला 'क्राऊड' असेल अशा मल्टीप्लेक्स मधे गेलो! सिनेमा रंगला होता लोक एंजॉय करत होते,तेवढ्यात वीरू सहस्त्रबुद्धे आमिरला त्याचे ते खास पेन भेट देतो हा प्रसंग आला आणि मागून आरोळी आली 'फसवायला बे त्याला, काय काय सांगून सादं रेनॉल्ड्स द्यायला बग तेनी!'
आणि माझं गाव अजून आहे तसचं आहे याची खात्रीच पटली!
अगदी अगदी. मी पण अनुभवलय हे
अगदी अगदी. मी पण अनुभवलय हे सगळं सोलापुरात. मल्टीप्लेक्स ही कंसेप्ट आता आता पुण्या-मुंबईमधे आली आहे पण आमच्या सोलापुरात १९७० पासुन ४-४ पडदे असलेली थिएटर्स होती.
अरे, कसलं मस्त
अरे, कसलं मस्त लिहिलय.......... सबंध चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं.
सिनेमाचा वास >> असं असतं ख्ररं..... पण तुम्ही ज्या टाईपच्या थेटरांमध्ये गेलेला आहात तिथे आम्ही कधीच गेलेलो नाही. कल्याण ला एक कृष्णा म्हनून टॉकिज आहे. ते वर उल्लेख केलेल्या टाईपच्या थेटरांमध्ये मोडते. तिथे फक्त एकदम लहानपणी काही सिनेमे पाहिलेत. मोठी झाल्यावर मात्र अशा थेटरांमध्ये जाण्याचे टाळले.
पण सिनेमाला किंवा नाटकाला गेल्यानंतर सुरुवातीचे माझे क्षण अजूनही तो चिरपरिचित वास अनुभवण्यात जातात. त्यातही नाटकाचा आणि सिनेमाचा वास वेगवगेळे.
नाटक असेल तर अत्तरे, गजरे यांचा वास, बांगड्यांचा किणकिणाट, ठेवणीतल्या साड्या/कपडे यांची सळसळ, ओळखीचे दिसल्यानंतर "काय, कसे" च्या औपचारिक गप्पा.
एक एक घंटा वाजल्यानंतर "कधी सुरू होणार?" ची उत्कंठा!!! सारेच भारल्यासारखे. 
भारी लिवलंस रे.
भारी लिवलंस रे.
अगदी चित्र उभं केलंत
अगदी चित्र उभं केलंत डोळ्यासमोर सोलापुरातल्या चित्रपटगृहांचं....
मस्तय. आमच्या गावात पुर्वी
मस्तय.
आमच्या गावात पुर्वी सिनेमाची जाहिरात करणारी एक ऑटो रिक्षा फिरत असे. कुठलाही चित्रपट असला तरी जाहिरातीतली वाक्ये चित्रपटाचे नाव बदलुन तिच असत. उदाहरणार्थ..(डॉन च घेऊया)
डॉन डॉन डॉन... बंधु आणि भगिनींनो, आपल्या 'शिव चित्र मंदीर' मध्ये पहायला विसरु नका डॉन. आपण ही पहा आपल्या सहकुटुंब सहपरिवारालाही दाखवा डॉन. एक सामाजिक कौटुंबिक चित्र डॉन....
नंतर चित्रपटातील कलाकारांची नांव
अमिताभ बच्चन
झिनत अमान
प्राण
आपण ही पहा आपल्या सहकुटुंब सहपरिवारालाही दाखवा डॉन. एक सामाजिक कौटुंबिक चित्र डॉन....
आपण ही पहा आपल्या सहकुटुंब
आपण ही पहा आपल्या सहकुटुंब सहपरिवारालाही दाखवा डॉन. एक सामाजिक कौटुंबिक चित्र डॉन....
>>>
बाप्रे........ आवाजामुळे डोकं दुखून सॅरि"डॉन" घ्यावी लागणार आता
....... ह. घ्या. 
ब्येष्ट रे. एक सामाजिक
ब्येष्ट रे.
एक सामाजिक कौटुंबिक चित्र डॉन....
>>
मस्त लिहलय रे. तुमच्या
मस्त लिहलय रे. तुमच्या सोलापुराचीच कथा इथे हैद्राबादेत आहे बघ. शेम टु शेम.
आगाऊ, छान लेख. सोलापूरच्याच
आगाऊ, छान लेख. सोलापूरच्याच कुठल्यातरी एका थेटरात मॅटिनीला "माहेरची साडी" पाह्यला होता... सात जन्मात कधी तो पिक्चर विसरणार नाही. काय रडत होत्या बायका... स्वतःच्या लग्नात इतक्या रडल्या नसतील.
मस्त!
मस्त!
आगावा, असा खर्या थेटराचा
आगावा, असा खर्या थेटराचा अनुभव मी दादा कोंडकेचे ९ सिनेमे पाहिले होते प्रभात ला... अरारा काय लोक गोंधळ घालतात...
हवालदारला तर मी हसून लोळले होते सिनेमाघरात..
तुझा लेख अति उत्तम आहे..
मला आता कोल्हापूरचं पार्वती, व्हिनस, उषा.. यांची आठवण यायलिये..
मस्त आवडला.
मस्त
आवडला.
आगावा.. मस्त लिहिलं आहेस रे..
आगावा.. मस्त लिहिलं आहेस रे.. आमचं गाव एव्हडं सिनेमा हौशी नसलं तरी थेटरं अशीच (मोजून ५ थेटर होती तो भाग वेगळा).. जत्रेत तंबूत सिनेमा बघणे हा एक स्वतंत्रच अनुभव आहे..
मस्त लिहीलय
मस्त लिहीलय
चिंचवडला जयश्री नावाच थिएटर
चिंचवडला जयश्री नावाच थिएटर होण्यापुर्वी आत्ताचा अन्नपुर्णा हॉटेलजवळ अजंठा नावाचे थेएटर होते साधारण १९६९ ते १९७२ सालातल्या ह्या आठवणी. जमिनीवर मुरुम होता. बाल्कनी नव्हती. इथे शो सुरु असताना उंदरांची पळापळ सुरु व्हायची. मधेच सिनेमा रंगात आला असताना आलेरे आले म्हणुन कोणी आरोळी दिली की तमाम पब्लीक उंदीरांच्या भितीने पाय वर घेउन सिनेमा पाहायचे. कोणाचाही रसभंग व्हायचा नाही.
आगाऊ, अगदि जिवंत अनुभव.
आगाऊ,
अगदि जिवंत अनुभव. कोल्हापुरात थोडेफार असेच असायचे.. पण आता नाही.
आफ्रिकेत मात्र अजुनही असा राडा करतात, हिंदी सिनेमासाठी.
वाचता वाचता मन भूतकाळात गेलं
वाचता वाचता मन भूतकाळात गेलं आणि बालपण आठवलं..
खडतर परिस्थितीतून आलेले असल्याने दादा कधिच सिनेमे बिनेम दाखवायचे नाहीत. मग ते कामानिमित्त बाहेरगावी गेले कि आम्ही आईकडं लकडा लावायचो. तिला इमेशनली ब्लॅकमेल करायचो..
मग सात आठ किमी जाऊन बँकेतून दहा रूपये काढायचे, तिकिटाला लाईनीत उभं रहायचं..
ज्यांना तिकीट मिळालंय ते केबीसी जिंकल्याच्या थाटात एन्ट्रन्सला उभे !!
ए उघड चा जयघोष चालू..
त्या वेळी फक्त दोनच जाती असायच्या
एक तिकीट मिळालेल्यांची आणि दुसरी न मिळालेल्यांची.
इतक्यात ब्लॅकवाले गर्दीच्या डोक्यावरून चालत यायचे आणि दोन्ही मुठीत तिकीटं घेऊन जायचे...
हाऊसफुल्लचा बोर्ड दाखवत खिडकी बंद..
एकदा मि. नटवरलाल सारख्या सिनेमाला आम्ही बारा, तीन आणि सहा अशा तीन शो ला जाऊन तिकिटाचा पाठपुरावा केलेला,पण व्यर्थ !
मग मॅनेजरला पोलिसात तक्रार देऊ असं सांगितल्यावर त्यानं तीन तिकीटं दिली. धाकट्याला मांडीवर घेऊन पिक्चर पाहीला..
त्या वेळी अमिताभ जे दाखवल ते बघत रहायचं इतकंच सिनेमाबद्दलचं ज्ञान होतं.
साधारण आठवीच्या दरम्यान थोडंफार "कळायला" लागलं तेव्हा नेमके बेताब आणि हीरो हे दोन सिनेमे आलेले.
बेताब डेक्कन ला नटराज ला आणि हीरो अलंकारला..
डेक्कनला पोरींची तोबा गर्दी.. अलंकारला ही फुल्ल टू पब्लिक !!
आम्ही अमिताभच्या संस्कारात वाढलेलो असल्यानं हीरो जास्त आवडला. पोरींना बेताब आवडायचा, त्यांना नावं ठेवायचो.
एक महंमदअली होता कॉलनीत. अलंकारला शाळेच्या नावाखाली वर्षभर त्यानं हीरो पाहीला.
सगळे डायलॉग्ज पाठ, आणि ते सगळे लिहून काढलेले
फक्त
जॅकी अपना मुहल्ला ,अपने लोग
इथं जॅकीच्या जागेवर महंमद अली नाव यायचं
हीरो मधे तू मेरा जानू है या गाण्यात मधेच एक ब्रेक आहे.
वारा सुटायचा आवाज
जॅकीला मीनाक्षी काही दिसत नाही
सन्नाटा
आणि जॅकी जोरात आवाज देतो
,
,
,
रा S S S S S धा S S S S S S
थेटरमधे पिनड्रॉप सायलेन्स
.........................
........................
........................
आणि त्या जीवघेण्या शांततेला भेदत मागून एक आवाज यायचा..
दो स्पेशल ..........................
एक सा S S S S S धा S S S S S S
तो आवाज या महंमदालीचा असायचा.....
( संपूर्ण पोस्ट पुन्हा टंकून काढलीय.. मघाशी पोस्टताना लाईट गेलेली )
मोठ्या शहरात तर १०० रुपयाला
मोठ्या शहरात तर १०० रुपयाला फक्त पॉपकॉर्नच मिळू लागले.
आयला रे भो! मी विखे
आयला रे भो!
मी विखे पाटलांच्या लोणी मधी शिकायला होतो, तव्हा थेटरात लैच गोंधळ असायचा! ओपन थेटराची मजा मल्टीप्लेक्स ला न्हाई
सोलापुरात आपली गाठभेट झाली तर एखादा लास्ट शो टाकु सोबत!
मध्यंतरानंतर आवाज करीत पापड
मध्यंतरानंतर आवाज करीत पापड खाणारे, पॉपकॉर्नच्या पिशव्या फोडुन आवाज करणारे ही पण
सोलापुरची खासीयत.
सेंट्र्लला मेरा गांव मेरा देश दरवर्षी लागणार व पब्लीक पण फायटींग करणार , हे ठरलेले.
मस्त रे आगाऊ. अलिकडे बर्याच
मस्त रे आगाऊ.
अलिकडे बर्याच वर्षांने मल्टिप्लेक्सात थ्रिड्यटस पाह्यला. लोकं इतकी हसत होती, की डायलॉग ऐकु येत नव्हते. लिटरली. माझ्या सुदैवाने शेजारी बसलेल्या बाईला सर्व डायलॉग पाठ होते, ती प्रॉम्प्टिंग करत होती. भन्नाट मज्जा आली.
मागच्याच आठवड्यात बदमाश कंपनी पाह्यला एका गावात. तिकडं आख्ख्या थेटरात फक्त आमचीच फॅमिली. पैकी दोन छोट्या कार्ट्या. पिक्चर लै बोर झाला. मग पंधरावीस मिनीटांने मी वर प्रोजेक्ट करणार्याला ओरडुन विचारलं " ओ जरा दुसरा पिक्चर लावा ना, नायतरी कोणी नाहिये थेटरात". त्याने "नाय मॅडम, असं व्हत नाय" वगैरे सांगीतलं. मग आम्ही पाच मिनीटं वाद घातला आणि गुमान पुढचा पिक्चर पाह्यला. खाली मधुनच आमच्या पोरांनी सांडलेले पॉपकॉर्न खायला तुरुतुरु उंदिर येऊन जायचे.
पलट, पलट फाकडू लेख आगावा!
पलट, पलट
फाकडू लेख आगावा!
मस्त
मस्त
मस्त रे.
मस्त रे.
लै म्हंजे लै म्हंजे लै च भारी
लै म्हंजे लै म्हंजे लै च भारी लेख
वास! एन्ट्रन्स लय भारी असतो
एन्ट्रन्स लय भारी असतो थेट्राचा, पन एग्झिट लय घाआन..... कस्ला घान वास मारतो नै?
मी ५/६वीत असताना आत्तेभाऊ मला कोल्हापूरात पिच्चरला घेऊन गेला. सरस्वती टॉकीज, ताराबाई रोड, कोल्हापूर. पिच्चरः - १९४२ अ लव्ह श्टोरी....
...आणि ते गानं चालु झालं... एक कडवं कसाबसा धीर धरुन मग दुसर्या कडव्याच्या सुरुवातीलाच अनिल कपुरनं मनिषा कोईरालाला पकडलं आनि मुका घेनार येवढ्यात भाऊ आणि त्याची कॉलेजची सगळी गँग जोरात "तुझ्यायचा तुझ्या..... सोड... सोड तिला..... सोडतो का हानु..... "
मला खुप राग यायचा पिच्चर चालु असताना आजुबाजुचे लोक बोलु लागले की.
.................... नंतर मी कुल झालो.
सगळा लेख व प्रतिक्रिया
सगळा लेख व प्रतिक्रिया अफलातून!!
रविवारी सायंकाळी भागवत मध्ये
रविवारी सायंकाळी भागवत मध्ये नुसते उभे राहूनही बरीच धमाल करमणूक होत असे. एखादे कुटुंब आलेले असेल तर आई बाबा आणी मुले कोणता बघायचा यावर चर्चा करीत. आईला जयाप्रदाचा हवा, बाबांना झीनातामान (सोलापुरी उच्चार) तर मुलांना दुसराच कोणता. शिवाय सारी थियेटर्स एकाच भागात असल्याने इतक्या लांबून आलेली मंडळी सिनेमा न पहाता जात नसत. हिम्मतवाला आणी वारदात हौसफुल्ल आहेत म्हणून पथेर पांचाली बघणे होत असे.
इंग्रजी चित्रपटाच्या पोस्टर वर लिहिलेला परिचयपर मराठी मजकूर हा तर एक स्वतंत्र वाड्मय प्रकार.
वाह ! प्रत्येक गावाची,
वाह !
प्रत्येक गावाची, शहराची आपली एकेक स्टाईल असते 'पिच्चर' पाहण्याची..
मस्त लेख
मस्त लेख रे आगावा मला
मस्त लेख रे आगावा


मला डोंबिवली ला टिळक/गोपी मध्ये पाहिलेले चित्रपट आठवले. रामचंद्रला जाउ द्यायचे नाहीत घरचे म्हणुन ते मात्र राहिले
>>>इंग्रजी चित्रपटाच्या पोस्टर वर लिहिलेला परिचयपर मराठी मजकूर हा तर एक स्वतंत्र वाड्मय प्रकार.
विकु, एक दोन मासले टाका ना ...
Pages