व्हेज बिर्याणी (फोटोसहीत)

Submitted by अंजली on 16 May, 2010 - 23:02
veg biryani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
बटाटा १ मोठा- १ इंचाचे तुकडे
१ कप ग्रीन बीन्सचे (श्रावण घेवडा?) १ इंचाचे तुकडे
२ मध्यम गाजर थोडे मोठे तुकडे
१ .५ कप कॉलीफ्लावर मध्यम आकारचे तुकडे
आलं लसूण १ टे. स्पून
कांदा १ मोठा उभा चिरून
टोमॅटो २ बारीक चिरून
हि. मिरची ३ उभ्या चिरून
लवंग ५-६
हि. वेलची ५
दालचिनी १ इंचाचे २-३ तुकडे
मसाला वेलची २-३
तमालपत्र ३-४ पानं
काळी मिरी ८-९
दही एक मोठा चमचा
काजू १ वाटी- तळून घेऊन
बेदाणे १/२ वाटी- तळून घेऊन
केशर दोन तीन चिमूट - ३-४ मोठे चमचे दुधात खलून
तूप २-३ चमचे
बिर्याणी मसाला २ चमचे
केवडा इसेंस १ टि. स्पून (ऐच्छिक)
हळद एक लहान चमचा
तळलेला कांदा १ वाटी
बारीक चिरलेली कोथंबीर, पुदीना - दोन्ही मिळून अर्धी वाटी
झाकणाच्या कडेनं लावायला कणीक

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ स्वच्छ धुवून निथळून अर्धा तास ठेवा.
२. तांदळाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल, १ मसाला वेलची, तमालपत्र घालून उकळी आणावी.
३. तांदूळ एक-दोन कणी राहतील इतपत शिजवून उरलेलं पाणी पूर्णपणे काढून टाकून बाजूला ठेवावे.
४. ज्या पातिल्यात बिर्याणी करायची त्यात तेल तापवायला ठेवावे.
५. सगळा खडा मसाला घालून कांदा घालून परतून घ्यावा

६. कांदा मऊ झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून १-२ मिनीटे परतावे
६. टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परतावे

७. हळद घालावी परत एकदा परतून घ्यावे
८. बिर्याणी मसाला घालावा

९. केवडा इसेंस घालावा, परतावे
१०. दही घालावे

११. बटाटा, गाजर घालून परतावे
१२. उरलेल्या भाज्या घाल्याव्यात
१३. मीठ घालून नीट परतून घ्यावे
१४. भाज्या साधारण ३/४ शिजल्या की गॅस बंद करावा.
१५. भाताचा लेयर लावून लाकडी चमच्याच्या मागच्या बाजूने ५-६ भोकं पाडून त्यात केशराचं दुध घालावं उरलेलं दूध भातावर शिंपडावं.

१६. काजू, बेदाणे घालावेत, कडेने तूप सोडावे
१७. भरपूर बारिक चिरलेली कोथिंबीर, पुदीना घालावा
१८. तळलेला कांदा घालावा.

१९. झाकण लावून कडेनं कणीक लावून बंद करावं
२०. १ ते सव्वा तास मंद आचेवर ठेवावी. जाड बुडाच्या तव्यावर पातिलं ठेवल्यास खाली करपत नाही.

एकावर एक थर:

वाढणी/प्रमाण: 
नुसती बिर्याणी असेल तर ४ लोकांना
अधिक टिपा: 

१. मी शानचा बिर्याणी मसाला वापरते.
२. तेल न वापरता पूर्ण तुपातपण करता येते पण खूपच हेवी होते. काजू, बेदाणे पण तुपात तळून घ्यायचे.
३. दह्याच्या रायत्याबरोबर सर्व्ह करायची

यावेळेस शेफ मिलींद सोवनी यांच्या पुस्तकात दिलेली टीप वापरली आणि फरक जाणवला. खडा मसाला कांद्याबरोबर न परतता काजू / बेदाणे / कांदा तळून घेतानाच तळून घ्यायचा आणि या पदार्थांबरोबरच एकावर एक थर देताना वापरायचा. त्यामुळे उग्र चव न येता सुरेख स्वाद (फ्लेवर) आला.

माहितीचा स्रोत: 
पाककलेची पुस्तकं, इंटरनेट, स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!! तोंपासु!.

हे बिर्यान्यांचे प्रकार मला मनासारखे कधीच जमत नाहीत Sad

खूप छान रेसिपी. मी ही शानचाच मसाला वापरते अमेरिकेत आल्यापासून पण तरीही मनासारखी नाही जमत !
फोटो पण टाक ना जमलं तर.

मस्त रेसिपी अंजली.
माझीही कधी मनासारखी होत नाही. आता करुन पाहिन ह्या पद्धतीने.
पन्ना, अगो आणि आता मी... तिघीही मनासारखी बिर्याणी न बनणार्‍या सुग्रण सुगृहिण्या ... Wink
आता मला वाटतय, बिर्याणी हा प्रकार बहुदा स्वतःच्या मनासारखा बनणारा नसेलच Proud

मनासारखी बिर्याणी नाहीच बनणार कारण ती बिर्याणी आहे मन नाही Proud

अंजली, करुन बघेन तुझ्या पद्धतिने. आतापर्यंत अर्धा डझन रेसिप्या जमा केल्यात बिर्याणीच्या (ह्यातच काय ते ओळखून घ्या :फिदी:)

सिंडे, नुसत्या रेसीप्या गोळा केल्यास की त्या त्या पध्दतीने बिर्याणी करूनही पाहिल्यास?
मी नुसता शानचा मसाला न वापरता त्याबरोबर खडा गरम मसाला, केशर, केवडा इसेंस, भरपूर कोथिंबीर-पुदीना वापरते, त्यामुळे स्वाद चांगला येतो. वापरून बघा गं आणि सांगा कशी होते ते...

अंजली, आज रात्री करणार आहे ही तुझ्या पध्दतीची बिरयानी. (n th time is a charm!) Proud

शानचा सिंधी बिर्यानी, एव्हरेस्टचा शाही बिरयानी आणि बादशहाचा बिरयानी-पुलाव मसाला आहे. कोणता वापरावा?

अंजु मी करुन पहाते. शान चा मसाला आणायला पाहिजे.
मी आता पर्यंत नेहमी "तरला दलाल " च्या रेसीपीने (माझे त्यात चवीनुसार बदल करत) बिर्याणी केली आहे. अगदी चांगली होते. आता तुझ्या मेथड ने पण करुन बघीन.

मृ,
शानचा सिंधी बिर्याणी मसाला वापरून बघ. थोडा तिखट असतो त्यामुळे हि. मिरची नाही घातलीस तरी चालेल.
सीमा,
तुझी रेसेपी पण लिही ना. त्या पध्दतीने करून बघेन मग.

मी शानच्या बिर्याणी मसाल्याने केली बरेचदा.अगदी मस्त होते. फ्लेवरफुल !

मी कोरेलच्या भांड्यात घालून , फॉइलने झाकून वरून कोरेलचेच झाकण लावून ओव्हनमधे ठेवते ३७५ -४०० वर १ तासभर लागतो.

मस्त आहे रेसिपी. मी बिर्याणीच्या नादी लागतच नाही. फार खटपट वाटते मला. पण वाचून एकदा करुन बघाविशी वाटतेय.

आज मदर्स रेसिपीचे 'रेडी टू कुक' वापरुन केली. चांगली झाली. त्यात MSG, preservatives नाहीत.

मदर्स रेसिपीचे मसाले पूर्वी इथे मिळायचे ते मला आवडायचे. मग एकदम दिसेनासे झाले. मध्यंतरी लोणची आली. तीपण चांगली असतात. आज हे दिसले पण मसाले नव्हते तिथे.
ही साईट आहे - http://www.mothersrecipe.com/

( अंजली, हा धागा सार्वजनिक नाही आहे. )

मागच्या आठवड्यात ह्या रेसिपीने आमच्या घरी (पहिल्यांदाच) बिर्याणी केली होती.. आधी बर्‍याच बर्‍याच रेसिप्या आणि व्होडीयो पाहून मग ही रेसिपी सापडली आणि हीच वापरली.
छान झाली होती बिर्याणी ! आम्हांला खूप आवडली.. रेसिपीतली प्रमाणं एकदम परफेक्ट आहेत. कुठेच काहीच रीवर्क करावं लागलं नाही. शोनूने लिहिल्याप्रमाणे अवनमध्ये ३७५ डी. वर अ‍ॅल्युमिनीअम फॉईलने झाकूण तासभर ठेवली होती.
रेसिपी करता धन्यवाद. Happy

आज ह्या पद्धतीने केली बिर्यानी. पाहुण्यांनी लिटरली चाटुन पुसुन खाल्ली. धन्यवाद !!!

काल पुन्हा एकदा ह्या पद्धतीने बिर्याणी केली. एकदम हिट झाली. खाणार्‍यांना बिर्याणीचा आकडा दिला आहे. त्यांच्याकडून काय ते कळेलच Happy

साक्षीदार हाजिर हो Wink

बिर्याणी आवडली का? वा वा! रॉयल्टी पाठवा इकडे Wink
मी मागच्या आठवड्यात केली होती. फोटो काढलाय पण सापडत नाहीये. सापडला तर टाकते.

मला वाटलं आजच्या दिसाला कुठली पेसल बिर्याणी हाणतंय का काय पब्लिक Wink

ए फोटो टाका..त्याशिवाय कसं कळणार झेपणेबल आहे का?

साक्षीदार भलत्याच कोर्टात हजर झाले. त्यांना इथे हजर व्हायला सांगा Proud

फोटो टाका रे कुणीतरी इतक्या छान रेसिपीचा. सिंडी ?

अरे हो हो.. मी ईश्वराला स्मरून शपथपूर्वक सांगतो की सिंडरेलाची व्हेज बिर्याणी अ प्र ति म झाली होती. अगदी नेमका हवा तसा स्वाद आला होता, आणि तसे सगळ्यांनी कौतुक केल्यावर सदरहू मुलीने (महिलेने असे लिहिले होते ते खाल्ल्या बिर्याणीस जागून खोडले आहे ) पाककृतीचे श्रेय अंजलीला दिले.

अंजलीच्या पाककृतीने करून-ही बिर्याणी चांगली झाली असे सिंडी म्हणाल्याचे स्मरते. Happy

Pages

Back to top