कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.१

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 21:16

आता मात्र ठरवलं... बास झालं.... जेव्हा आरश्यामधे ही स्वतःची प्रतिमा मावेनाशी झाली तेव्हा काहीतरी केलंच पाहिजे... अगदी ६० नाही पण निदान ७०/७५ पर्यंत खाली उतरलंच पाहिजे... (वजन हो..!!) अगदी चवळीची शेंग नाही पण निदान मटारची किंवा शेवग्याची शेंग तरी व्हायचा प्रयत्न केलाच पाहिजे.. तसही बरेच दिवसांपासून त्या कोपर्‍यावर उघडलेल्या हेल्थ क्लब च्या आत जाऊन "बघायचंच" होतं... एकदा ठरलं आणि तयारी पण जोरात सुरू झाली.. मॉल मधे जाऊन Nike चे t-shirts, Rebok ची track pant, Adidas चे shoes आणले.. (सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे ना !!), आयपॉड मधे गाणी भरली, recharge केला, Cover आणालं, हेल्थ कल्ब मधे जाऊन नाव नोंदवलं, nutrionist ची appointment घेतली आणि ह्या खुषीत येता येता फक्त १ पायनॅपल संडे खाल्लं..
प्रथम ग्रासे का काय म्हणतात तसं nutrionist नी सांगितलं नुसत्या व्यायामाने काय होणार "जिव्हानियंत्रण" हवं (हा आपला माझा शब्द... हल्लीच्या इंग्रजाळलेल्या मुलांना काय येणार असं शुद्ध मराठी) डाएट च्या नावाखाली दिवस भर उपवास (तरी सकाळी खाल्लेले २ पेढे आणि थोडे चिप्स सांगितले नाही instructor ला) २० मिनीटं ट्रेड मिल, त्यानंतर १५ मिनिटं स्टेपर, सगळी स्नायू हलवून टाकणारे स्ट्रेचेस आणि हे सगळं करूनही वर कोक, ज्यूस न पिता भयंकर रंगाचा बीट आणि गाजराचा रस... कसं व्हायचं आपलं????????????
********************************************************************
नियम :
१. शब्दमर्यादा २००० शब्द.
२. एक आयडी कितीही प्रवेशिका टाकू शकतो.
३. निकाल मतदानाद्वारे.
४. कथा तुम्ही हवी अशी फुलवू शकता. आजूबाजूची पात्र, लोकेशन(देश/परदेश), प्रसंग हे सगळं हवं ते घेऊ शकता.
५. कथेला logical end असावा.
६. कथेला शीर्षक असावे.
७. कथा प्रतिसादामध्ये लिहावी.

लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा आली मंजु! अगदी घराघरातली गोष्ट लिहीली आहेस.. त्यामुळे ती सत्यकथा वाटते.. Happy
आई आई गं... का तू इतका चांगला स्वयंपाक करतेस? का?? का?? >> अगदी अगदी! माझं पण अस्संच होतं बघ घरी. एवढ्या कौतुकाने आई आपल्यासाठी काही पदार्थ बनवणार.. आपल्यापुढे बशीत आणून देणार.. मग नाही म्हणवत नाही ना!! Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

पूनम, मंजु मस्तच.. मलाही मनावर घ्यायला हव आता.. छे छे गोष्ट लिहिण नव्हे, वजन कमी करणे हो.....

पूनम छान गं. मंजु, बाई तुझी कथा वाचता वाचताच वजन वाढलं की! Wink

या कथेची सुरुवात वाचुन कथा लिह्याची फारच इच्छा झाली. म्हणुन मी एक प्रयत्न करायचे ठरवले. कथा अगदी perfect नाही वाटली तरी आशा करते तुम्हाला आवडेल.

"असा घेतला निर्णय"
-------------------------------
खरं तर ही सगळी मेहनत घेण्याचा उत्साह येण्या मागे एक मोठं कारण आहे... कारण तेच जे सगळ्यांच्या जीवनात एका काळात एकदम महत्वाचं होऊन जाते. बरोबर ओळखल तुम्ही ... माझे आई - वडील माझ्या साठी एक देखणा मुलगा शोधत आहेत. तसे तर माझ्या आई - वडीलांना माझे खुप कौतुक आहे ... ते तर सहाजिकच, त्यांची मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर झाली ना दोन वर्षां पूर्वी. पुण्याच्या पी.आय.सी.टी तुन मी इंजिनीयर झाले ; कैम्पस मधेच नौकरी लागुन एकदम पाच आकडी पगार मिळु लागला आणि बघता बघता दोन वर्षात तर पगार तिप्पट झाला . सगळे काही एकदम मजेत होते . बघता-बघता माझ्या पूर्ण कुटुंबाला माझ्या लग्नाची घाई सुरु झाली . घाई फक्त घरच्यांनाच नाही तर दूर-दूरच्या नातलगांना, शेजार्‍यांना , एकंदर सगळ्यांनाच झाली . देवाच्या कृपेने सगळचं आहे माझ्या नाशीबात सध्या .... वैभव - सौंदर्य - संस्कार . पण लाइफ मधे कुठे तरी फाइट मारण्याची संधी देव सगळ्यांना देतो. मला जसे देवाने सगळं भर- भरून दिले तसेच माझे वजनही भरपूर वाढले होते. कॉलेज मधे असताना , दोन वर्षा नोकरी करत असताना नेहमीच वाटायचे की कोणी तरी माला आवडीचा मिळेल आणि आई-बाबांची वर शोधायची कटकट वाचेल. पण नशिबात arrange-marriage होते की. आता त्या साठीच तर वजन कामी करणे ही एक्दम priority चं झाली. पुन्हा आज-काल नोकरी करणार्‍या सगळ्या सॉफ्टवेर मधल्या, पाच आकडी पागारच्या मुलींचे जसे एकदाम हुशार आणि मोठ्या पगाराच्या मुलाशी लग्न करण्याचं स्वप्न असते तेच माझे ही होतेच. आणि मग काय मोठ्या पागाराचा मुलगा म्हंटलं की त्याला लट्ठ मुलगी कशी चालणार ना ... ह्या मुळेचं सगळी कसरत सुरु झाली .

मा़झ्या ऑफिस ची वेळ सकाळी नऊची असते . आता तर माला सकाळी पाचलाचं उठावं लागतं. थोडी तयारी करुन आता मी जिमला जाते. जिमसाठी मी इतकी खरेदी केली ना इतक्यात, म्हणुन पाहटे पाचला उठण्याचा नवीन उत्साह पण आहेच . आता डाएटिंग करायचे म्हणजे इतके सोपे नाही हां . मी माझ्या मैत्रिणी सोबत राहते . रोजचा स्वयंपाक म्हणजे आमचेच एक्सपेरीमेंट्स असतात .माझ्या इतर रूम-मेअट्सचं एकदम पर्फेक्ट फिगर . त्यांचा काय एखादी भाजी चविष्ट नाही झाली की घातलं बटर, घेतलं भरपूर तेलातल लोणचं ... पण माला तर आता डाएट प्लॅन करायचं आहे. सकाळचा नाष्टा व लंच मी नेहेमीच ऑफिस मधे करायचे पण आता तर दिवस बदलले . आता मझं सकाळच जिम झालं की मग एक ग्लास गाजराचा रस. त्याची पण गंमतच झाली ना. काल जी गाजरं आणली ती थोडी कडु होती. मी साखर घालायला गेले आणि मनातुन आवाज आला.. "ए नको नको , साखर घालशील तर सकाळची अर्धी मेहेनत पाण्यात". मी थांबले आणि तो रस डोळे मिटुन तसाच प्याले.हे आता रोजचंच झालय. मला वटायला लागल.. माझ्या सोबतच्या माझ्या मैत्रिणी ... रुची आणि अदिती किती lucky आहेत. त्या एकदम छान figure वाल्या . त्या रोज सकाळी छान ब्रेड-बटर-ज्याम ची मजा घ्यायच्या. ते बघुन तर माझ्या मनातलं calorie-meter पळायच. मी त्यांना पण गाजराच्या रसाचे गुण समजवायला लागले.... "गाजराच्या रसाने चेहेर्‍या वर काय glow येतो माहीत आहे?" तर मला उत्तर पण मिळतेच ना.. "डाएटच्या नावा खाली उपाशी राहुन तो glow जातो पण ना". अशी वाक्यं ऐकुन तर मी द्विधेमधेच पडते. पण या वेळेस काहीही करुन मी दहा किलो वजन कमी करायचे ठरवले.

आता सकाळच्या अत्यंत rigorous workout मुळे ऑफिस मधे जी झोप येते त्या बद्दल तर तुम्हाला कल्पना असेलच...पुर्ण शरीर कस ठणकत होतं. जशी सोमवारची सकाळ असते तशी आता माझी रोजची सकाळ. पुन्हा चहा, कॉफीला पण हात नाही लवायचा हा ही एक नियम केलाच मी. नवीन ipod मधे गाणी टाकली होते मी ऑफिसच्या संगणकामधुन जिम साठी. त्यांनीचं झोप उडवून काम करणं सुरु केलं. दिवस भर बाकी काम सुरु असलं तरीही मनातला निश्चय नेहमी गिरवत असे. काम करता करता वेळ मिळाला की झालं मी मिस्टर गूगल ला विचारत बसायची "वजन कमी करण्याच्या पद्धती". असा दिवस सुरु असतांना मग तिथुन कोणी तरी यायचं मिठाई घेउन, काही तरी बातमी घेऊन किंवा घरी आराम करून. काही दिवसांपुर्वी, असं कुणीही आलं की मी आधी पोहचायची मिठाई खायला, पण आता ते घरचे तुपातले लाडु , onsite वरून आलेले Swiss chocolates अशा वस्तुंकडे पाहुन मला वाटु लागले ते मला चिडवत आहे . आता ऑफिसच्या लोकांना तर मी सांगणार नव्हते डाएट प्लॅन विषयी. कारण एकदा सांगितले की माझ दहा किलो वजन घटण्याऐवजी वाढायचं असा प्रण बाकी सागळयांनी घेतला असता. म्हणुन मी चुप-चाप तो अर्धा-अधिक लाडु खात असे. पण तरीही मी हे सगळं करता करता frustrate नाही व्हायचं अस निश्चित केलं.

मग आता माझा लंच टाईमचा पण मेनु बदलला . मी कही दिवस एकटीने लंच करायच ठरवलं ज्यामुळे मला कोणी unwanted advices न देता मी आरामात माझ्या मताने जेवु शकेल. तर मी मझ्या colleagues ला म्हणायची, "मला काही काम पुर्ण करायचे आहे urgently , तुम्ही व्हा पुढे". मग मी आपल्या जेवणात नुसतं selected salad आणि कडधान्यांची निवड करण्यास सुरुवात केली. ज्या भाज्या खायचा माला आधी कंटाळा येत असे त्याही भाज्या आता माला चवीष्ट दिसु लागल्या. पण मी माझं मन मुठीत एकदम घट्टं घरलं होतं.

एक दिवस माझ्या काही जुन्या मैत्रिणींचा फोन आला. खुप दिवस झाले चल भेटुया आणि pizza-party करुया. ते ऐकल्या बरोबर माझ्या मनातलं calorie-meter पुन्हा धावु लागल. आधी झालेल्या पार्टी मधली बटर पाव -भाजी आणि रस-मलाईची गंमत मला आवु लागली. अगदी प्रिय असणारी पार्टी आता माला tension वाटली. मन थोड दुखावलं, लठ्ठंपणा का देतो रे तु देवा कुणाला असा प्रश्न मला पडला. तरीही माझा उपास आहे अस नाटक करुन मी ती पार्टी enjoy करत आहे अस सगळ्यांना सांगितलं. नंतर आमचा नेहमी प्रमाणे सिनेमा चा प्लॅन असायचा. कधी चीप्स आणि कोल्ड-ड्रीन्क न घेता मला सिनेमा बघवत नसे पण या वेळेस मी तो कोरडाच सिनेमा बघितला.

हे सगळं सुरु असतांना अजुन एक गमंत मी केली.ती म्हण्जे shopping करताना. मला कित्ती छान छान आणि गोड कपडे आवडायचे, पण नेहमीच साईजचा problem. एकदा असच माला एक dress फार आवडला. मी तो घालुन बघितला आणि नेहमी प्रमाणेच तो माला tight होता. पण या वेळेस मी विचार केला घेउन घेते हा dress आणि हा perfect fit झाल्या शिवाय डाएटिंग आणि जिम सोडायचे नाही. दर दोन दिवसांना मी तो dress try करुन बघायला सुरुवात केली.

माझ्या या सगळ्या मेहेनतीच फळ मला मिळु लागलं होतं. लोक मला "रोड दिसतेस आज काल" अशा compliments देऊ लागले. बघता बघता वजन काटाही गोड बोलु लागला. पण अजुन माझे १० किलो चे टार्गेट पुर्ण नाही झाल. मी कधी कधी विचार करत बसायची, मी इतक्यात कशा-कशाशी सन्यास घेतला... माझे आवडते पदार्थ मी किती दिवसांपासुन सोडले होते. आणि हे सगळं एका चांगल्या मुलाशी लग्न व्हावं म्हणुन. एक चांगला मुलगा म्हणजे जो माझं मन बघेल, रुप नाही. वाटल, पार्वती ने तर शंकर भगवान नशीबी येण्या करीता एक दिवसाचे व्रत केले , पण मी माहीत नाही कुणासाठी इतके कष्ट करत आहे. पण मग वाटलं, हे सगळं करुन मला पण तर मनात एक वेगळाच आनंद वाटतो आहे.

तितक्यात, दिवाळी आली आणि मी घरी गेले. दिवाळीचा विचार येताच तो सगळा दिवाळी स्पेशल फराळ माझ्या डोळ्यांसमोर आला. आणि मग आईने केलेल्या चकल्या, चीवडा आणि लाडुला मी नाही कसे म्हणार हे कळतच नव्ह्ते. मला बघुन घरचे सगळेच अत्यंत आनंदी झाले. माला इतकं रोड झालेल बघुन आईच मन मात्र भरून आल. मी तिला फोन वर नव्हत सांगितलं कधी मझ्या ह्या "१० किलो च्या धेया" बद्दल.पण एका नजरेत तिने माझ्या डाएट प्लॅनबद्दल सगळं समजुन घेतलं. डोळे पुसत ' छान दिसते आहेस' असं ती म्हणाली, पण तिने मला मग एक खुपच साधी आणि सरळ गोष्ट समजाविली. ती म्हणाली, "मुली, तु रोज जिमला जा, योगा कर, aerobics कर, swimming कर, माला काहीही त्रास नाही, नियमीत व्यायाम करणे अगदी महत्त्वाचे असते; पण पोरी खाणं-पीणं बंद करुन मात्र रोड झालेली मला आवडणार नाहीस. अगं आज काही आजार नाही तुला, सगळं खाऊ शकतेस. मर्यादित खा पण खाणेसोडुन नको देऊ गं. लाइफ एन्जॉय करु शकतेस ते छान एन्जॉय कर" आईची ती दोन वाक्य मझ्या मनाला पटली. Calorie-meter मनातुन गेल नव्हतं, पण मर्यादित खायच आणि नियमीत व्यायाम करायचा, हे मी ठरवले .

काही दिवसांनी मला एका मुलाचं स्थळ आल. मुलगा अगदी माझ्या मनासारखा. मुख्य म्हणजे त्यालाही मी फारच आवडले. पण मुलगा मात्र थोडा लट्ठ होता. आमच्या पहिल्या भेटितच मुलानी मला सांगितले की त्याला खायची आणि स्वयंपाकाची फार आवड आहे. ते ऐकुन मी जरा थक्कच राहिले. मी आता बर्‍या पैकी रोड झाले होते. पण इतकं पुराण झाल्यावर माझ्या समोर कुठलीच द्विधा नव्हती आणि मी आनंदाने लग्नाला होकार दिला !!!

मंजु, छान लिहिले आहेस. अगदी पटले मला... इथे कामवाली बाई अजुन मिळालेली नाही. त्यामुळे, मीच करते सगळे घरी. आता वजन करुन बघितले पाहिजे,काही फरक आहे का???? Happy

रोझी, छान लिहिले आहे.

तीळतीळ झिजलीस ना म्हणूनच.. तोळातोळा तरी झिजायला हवं होतंस >>> एक नंबर ...
मस्त झाली कथा
मंजु छान..:)

मंजु.. कथे ला सत्यकथे त उतरव.. Happy एकदम झकास..
पुनम, रोझी.. छानच..

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

पुनम... तुझी सिग्नेचर बदल आला... "एक वडा दोन पाव, जिकडे मिळेल तिकडे धाव..." सही जमलियं

मंजू... तुझी खादाडी बघून पोट भरलं... धमाल लेखन

मोरया!!!

योगी, इन्द्रा,पूनम, प्राचि, ऍडॅम, चिन्नू, आशू, अमृता, श्रद्धा अनेक धन्यवाद..

मंजु.. कथे ला सत्यकथे त उतरव..

योग्या, जल्लां त्यासाठी मला पंचवार्षिक योजना राबवावी लागेल Proud

वैनी , मंजुडी मस्त जमल्या आहेत कथा Happy
****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

मंडळी, गणेशोत्सव स्पर्धेत भाग घ्यायचाच होता. पण पुरेसा वेळ नसल्यामुळे साचा तोच ठेवुन गोष्ट लिहीली आहे. गोड मानावी Happy
*************************************
हुब्या जागी पळपळ आन गंगीची चंगळ
*************************************
नमस्कार मंडली...वळख हाये का नाय ? आवो बगता काय...अवो म्या तरुप्ती...हितं काय समद्या बायाच जमल्या वाट्ट...असुदेत की..मला काय त्याचं...आयाय गं...अश्शी कळ येऊन र्‍हाईली का काय ईचारु नगा...आत्ता ईचारु नका म्हटलं तर काय झालं कोन म्हनतयं ? सांगु म्हन्ता...मंग ऐकाsss...

आमचं ह्ये बी महिती हाये की तुमा समद्यास्नी. तर त्येच्या सायबाकडं पारटी व्ह्तं. आमी बारक्याला घेउन गेल्तो की. तिथं अजुक एक्-दोघाचं मंडली आनी हापिसातल्या बाया बी जमलेल्या. समद्या निस्त्या मरतुकड्या. काय जीव हाये कुडीत का न्हायी. आन समद्या लान्ह्या पोरासुदिक इवलं इवलं आंगडं आन टोपडं घालुनशान आलत्या. काय ते हाट हाट म्हनं. म्या मातुर झ्याक पैटनी घालुन गेल्ते. तिथल्लीच येक बया मला ईचारतीया की म्या आमच्या ह्येंची आय हाय का. असा राग आल्ता. न्हायी म्हनायला म्या बारक्या झाल्यापातुर येकदम गोलमटोल झालीये पन म्हुन काय ह्येंची आय म्हनावं ? काय जिभला हाड ? पन काय कर्नार..हापिसातल्या लोकास्नी काय म्हनायचं न्हाय म्हनं.

घरला आल्यावर ह्येस्नी म्या सम्दा किस्सा सांगित्ला. तर त्ये बी प्वाट धरु धरु हसाया लागलं. आत्ता...म्हंजी म्या खरच की काय ह्येंची आय दिसते ? तवापास्न निस्त मन खात व्हतं. मंग आमचं ह्ये मला म्हन्लं रोजच्याला वायम केला पायजे. आन त्ये करायचं तर ज्येममधी गेलं पायजे. मंग येक दिस आमी गानं ऐकायचं मिशीन, ढवळी बुटं अस काय बाय घेउन आलो. मंग त्ये मला ज्येममदी घेऊन गेलं.

इथल्ली बया बी तसलीच मरतुकडी आन लांडे कपडे घातलेली. गेल्या गेल्या ती म्हन्ली "हान!!". म्या मस्तपयकी काकणं सारली आन म्हटलं, "कुनाला हानु ?" पन आमचं ह्ये मधी पल्डं आन त्या बयेशी विंग्रजीत काय्-बाय बोल्लं. मंग बाकी गडीमानसांमधी जाउन हुब्या जागी पळाया लागलं.

हिकडं पयलं त्या बयेनं माझं माप घेत्लं आन म्हनाली, "आव !!". म्या म्हटलं, "हाये की हितंच हुबी आजुन कुटं आव". म्या काय बी बोल्ले की बया निस्ती खिदळायची. मंग तिनं मला हुब्या जागी पळाया लावलं. तिथं येक मिन्टात वाट लाग्ली बगा. न्हायी...साळंत असताना गुर्जी मागं आन म्या फुडं असं लयी पळापळी केलं की पन हे असं हुब्या जागी काय जमना. पळता पळता लुगडं आटकलं ना. म्या आशी दाणकनी थोबाडावर आपटले की काय ईचारु नगा. वर पुना ती बया, "आव". मंग म्हने शाईकल चालीव. त्ये बी हुब्या जागी. ह्ये जरा बरं हाये. तिथं म्या झ्याक पायडल मारत व्हते तर तिथं बी पदराचं टोक आटकलं. येवडी सोभा होईस्तवर आमचं ह्ये आलं आन बयेला टोमारो म्हनुन आमी तिथनं निघलो.
ह्ये मला घरला सोडुन हापिसात गेलं. येताना बयेनं यक कागुद दिल्ता. त्यात काय खायचं न्हाय लिवलं व्हतं. आन यक डब्बा बी दिल्ता. जेवाण म्हनं. घरला येउन बगते तर त्यात निस्तं घासफुस. अशा येळेस बगा डोस्क लयी भारी चाल्तं आपलं. माजी बाय ती...लई मायाळु हो. गंगीसाठी चारा दिल्ता की वो तिनं. गंगी कोन म्हन्ता ? आवो मागल्या महिन्यात शेरडु घेतलं. आता बरक्यास्नी दुध्-दुभतं नको ? गंगी बी आशी खुस जाली बगा त्यो घासफुस खाऊन.

दुसर्‍या दिसाला कोनाला ठो मारायचं म्हुन मी जरा खुसीतच गेल्ते. पन कशाच खुशी आन काय. बयेनं माजा असा छळ मांडला की काय ईचारु नगा...आयाई गं...आदी हुब्या जागी पळ्-पळ केलं. मंग शाईकिल चालीवलं. मंग अजुन काय बाय मिशीनं दावली. त्ये निस्त बगुनच धाप लागल्यागत झाल्तं मला. पन बयेनं त्या समद्या मिशीनीवर्ती मला वर्ती-खाल्ती, हुबं-आडावं केलं. बाई हाये का कसाई. असा लयी येळा झाल्यावर पार माजा जीव जायला लागला तवा कुटं बया म्हटली, "फिनिस". म्या बी बिगी बिगी "ठोमारो" म्हटलं नी आले घरला. गंगीला त्ये काचंच्या डब्ब्यातलं चारा दिला नी म्या चांगलं वाटीभर तेल मारुन ठेसा, कालवन आन भाकर हानली तवा कुटं जीवात जीव आला. सारं अन्ग निस्त ठनकत व्हतं. मंग दुपारच्याला बारक्यासोबत मस्त तानुन दिली. उटल्यावर मस्तपयकी चा आन दहा पाच भिस्कुट खाल्लं. आत्ता कशी जरा मानसांत आल्यावानी वाटलं.

सांजच्याला आमचं ह्ये घरी आलं. तवा म्या त्येस्नी समदं सांगितलं. मला वाट्लं ह्ये जरा अंग रगडुन देतील पन न्हायी. त्ये निस्तचं वरडत सुटलं. म्हनं गंगीसाटी दिलेलं जेवाण म्याच खायचं. म्या घास खायचं ? निसत्या ईचारानच प्वाट ढवळलं. अवो म्या भल्या घरची ल्येक हाये. पाच्-पन्नास येकर जिमीन हाये माज्या बा ची. बगितल्या बरुबर दिस्ते का न्हाय बागायतदाराची ल्येक. आन म्या घास खायचं ? माझं बी टकुरडं फिर्ल. म्या त्येस्नी सपस्ट सांगित्लं, "म्या त्ये घास खाणार न्हायी आन ज्येमला बी जानार न्हायी. मंग मला कुनी तुमची माय म्हनुदेत न्हायतर बा म्हनुदेत न्हायी तर गनपती बाप्पा म्हनुदेत" !!!!

शिंडरेला, लयीच बाय तू झ्याक लिवतीस गं!! किती हासू आन् किती नको आस झाल्त की ह्ये वाचताना!! Lol येकदम ब्येष्ट!!

शिन्डीबाय माझी! लई गुनाची! अशीच खात्यापित्या अंगाची र्‍हाय वो माय!

मस्तच गं!

..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

शिन्डिबाय (स्वारि वो मृणताई) लै झकास बघा.

cinderella,

येकदम फससक्लास लिवलंय.... आमी बी वाचता वाचता लई हसलो बगा.... Happy

अवो म्या भल्या घरची ल्येक हाये. >>>>big_lol.gif

सिंडरेला Lol लई झ्याक लिवलंस बाय..

सिंड्रेला, हा फॉर्म तुला मस्त जमतो.

सिंड्रेला, मस्तचं जमल्य. मी अर्धा-अधिक वेळ हसतचं बसले. Happy

शिन्डे, लयी झ्याक बग... Rofl

काय सही लिहिलंय. झ्याक!!!

धन्यवाद लोकहो.

पूनम, लीलाबाई, रोझी मस्तच Happy

Lol cinderella , इतकं भारी लिहिलस पण नाव काय "तृप्ती", मी तर म्हणतो टोटल ट्रांस्फोर्मेशन करुन टाक...
गंगी नाव फक्कड बसलं असत पण तु नेमकं ते वापरलं .."मंदी" कसं काय आहे ?
पुढचा लेख आता "मंदी रिटर्न्स" या नावानी लिही ..... मी तर म्हणतो लेखमालाच चालु कर.... फुल्ल टु हीट आयटम आहे हे पात्र....

मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
मायबोली गणेशोत्सव २००८

रोझी, तृप्ती खुपच छान....

Pages