श्री. सुरेश खोपडे साहेब (विशेष पोलीस महानिरीक्षक) यांनी केलेले हे अध्यक्षीय भाषण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=553...

सुरेश खोपडे (विशेष पोलीस महानिरीक्षक) यांनी केलेले हे अध्यक्षीय भाषण..

=====================
शासकीय कर्मचारी साहित्यिकांचे सांस्कृतिक स्तरावरील एक वैचारिक व्यासपीठ तयार व्हावे, या हेतूने भरविण्यात येणारे शासकीय कर्मचाऱ्यांचे दुसरे साहित्य संमेलन अलिकडेच अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात पार पडले. कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) चे सचिव धनंजय धवड, शासकीय कर्मचारी साहित्य परिषद अकोल्याचे अध्यक्ष अविनाश डुडुळ, आदींच्या उपस्थितीत संमेलनाध्यक्ष सुरेश खोपडे (विशेष पोलीस महानिरीक्षक) यांनी केलेले हे अध्यक्षीय भाषण..

प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील मान्यवर साहित्यिक, रसिक बंधूभगिनींनो, दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल संयोजकांचा मी फार आभारी आहे. अनेक शासकीय कर्मचारी उत्तम लेखन करतात याची मला माहिती आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा जनतेशी खूप जवळून संबंध आल्याने त्यांचे मानवी जीवनाचे आणि स्वभावाचे आकलन मोठे असते. त्यांच्या व्यापक आणि सुस्पष्ट लिखाणामुळे दूरदृष्टीने विचार करून नियोजन करणे, अंमलबजावणी करणे व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरित करणे यासाठी शासनाला त्यांची मदत होईल, अशी माझी पूर्वीपासूनची धारणा आहे.
शाळेत असताना आमचे शिक्षक ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे’ ही बालकवींची कविता शिकवत, शार्दूलविक्रीडित वृत्त शिकवत, आणखी बरेच काही शिकवत. मातीत राबणे, उन्हात पोळणे, जनावरांचा गोठा साफ करणे, दुष्काळी कामांवर जाणे, १९७२ च्या दुष्काळात अमेरिकेतून आलेल्या मिलो, मका व सतूच्या भाकरी छपराच्या घरात बसून खाणे या सगळ्यात आम्हाला बालकवींसारखा ‘आनंद’ कुठेही दिसत नसे. शाळेतले साहित्य, आमचे जगणे आणि भोवतालचे वातावरण याचा काही मेळ बसत नव्हता. शाळा न आवडण्याचे हे कारण असावे..
‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर,आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ ही कविता मात्र खरी वाटे. तसेच पुस्तकातील डोक्यावर पदर घेतलेले बहिणाबाईंचे चित्र हुबेहूब माझ्या आईसारखे भासे. ध्यानात राहिला तो ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ते लिहिणारे माझ्या वडिलांसारखे डोक्याला पटका बांधणारे ज्योतिबा! इतक्या वर्षांनंतरही धडय़ात वर्णन केलेले शेतकरी चोहीकडे दिसतात..
शासकीय कर्मचाऱ्यांनी साहित्य निर्माण करण्याचा आणि अशी साहित्य संमेलने घेण्याचा हेतू काय, याबद्दलची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. ज्ञान, नीती आणि सौंदर्य ही मानवी जीवनाची तीन प्रमुख अंगे असल्याचे ढोबळपणे मानले जाते. ‘साहित्यमिर्मिती’ ही कला असल्याने ‘कलेसाठी कला, की जीवनासाठी कला’ हा वाद शासकीय कर्मचाऱ्यांच्या साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इमॅन्युअल कांट हा कलेसाठी कला या विचारसरणीचा पुरस्कर्ता होता. आनंदनिर्मिती हाच साहित्याचा मुख्य हेतू आहे, असा युक्तिवाद ना. सी. फडके करीत. पण वास्तवाचे आणि सत्याचे जेवढे दर्शन शासकीय कर्मचाऱ्याला होते तेवढे क्वचितच अन्य कोणाला होत असेल. अनुभवातून आलेले त्यांचे साहित्य वाचकाला जनतेच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव करून देते. अनुभवविश्व समृद्ध होणे आणि वेगळी दृष्टी प्राप्त होणे हे साहित्यनिर्मितीचे फायदेही त्यांना नक्कीच होतील. निव्वळ सौंदर्यनिर्मिती करणे हा साहित्याचा हेतू नसून जीवनसंघर्ष करणे हा साहित्याचा मुख्य हेतू असावा. साहित्यातून ज्ञानात्मक आणि नैतिक मार्गदर्शन असावे, या विचाराशी मी सहमत आहे.

साहित्यनिर्मितीचे अनेक फायदे आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या लेखनामध्ये नैतिक मूल्ये ठळकपणे मांडली गेली तर त्यांचा वाचकावर, इतर शासकीय कर्मचाऱ्यांवर अनुकूल परिणाम घडतो. त्यातून नोकरशाहीची जनमनातील प्रतिमा उंचावते. अशा कलाकृतीमध्ये व्यापक व सूक्ष्म स्वरूपात ज्ञान असेल तर ती रसिकाला वेगळ्या पातळीवरचा आनंद देऊ शकते. साहित्यनिर्मितीमुळे साहित्यिकाला आपोआप प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा प्राप्त होते, साहित्यिकाच्या व्यवहारज्ञानात भर पडते, उच्च कोटीचा आनंद मिळतो. शासन हे नियम, अधिनियम व कायद्यावर चालते. जनतेच्या सर्व भावना, समस्या त्यात समाविष्ट करणे शक्य नाही आणि त्या तशा केल्या तरी काही वेळा खातेप्रमुख अगर राजकारणी यांच्या आग्रहाखातर काही वेळा त्याला मुरड घालावी लागते. त्यातून होणाऱ्या कुचंबणेतून बाहेर पडण्यासाठी, फ्रॉइड या समाजशास्त्रज्ञाने मांडलेल्या, भावनांचे विरेचन (Cathorsis) या संकल्पनेची मदत होते. मनातील दडपलेल्या गोष्टी कलात्मक पद्धतीने व्यक्त केल्या तर त्यातून स्वत:ला व इतरांना आनंद देणारे साहित्य निर्माण करता येते.

औद्योगिकीकरणामुळे कुटुंबव्यवस्था विस्कळीत होत आहे. जात, धर्म, भूगोल, इतिहास या कारणांमुळे माणसामाणसांत वितुष्ट निर्माण होत आहे. म्हणून साहित्य ही समाजात बंधुभाव निर्माण करण्याचे कार्य करू शकते, असे लिओ टॉलस्टॉय म्हणतो. गांधीवादी विचारसरणीनुसार साहित्याने सत्य, अहिंसा, त्याग, जीवनशुद्धी, थोडक्यात नैतिकतेला अधिष्ठान द्यावे, असे अपेक्षित आहे. मार्क्‍सवादी विचारसरणीवर भर देणारे साहित्याच्या सामाजिक उपयुक्ततेला महत्त्व देतात. ना. सी. फडके यांचे साहित्य रंजनवाद किंवा भोगवादाला पूरक आहे, असे मानले जाते. पोलीस खात्यातील नोकरी हा तर बावनकशी अनुभवांचा कारखानाच. ज्या ज्या ठिकाणी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले, त्या त्या प्रत्येक ठिकाणच्या गुन्हेगारी आणि सामाजिक समस्येवर एकूण सहा पुस्तके मी लिहिली. शासकीय कर्मचाऱ्याच्या साहित्याला प्रशासनात उत्तेजन मिळत नाही, याचा मलाही अनुभव आला. पनवेल येथे डीवाय.एस.पी. म्हणून पहिली नेमणूक झाल्यावर पोलिसांना सतत बावीस वर्षे गुंगारा देणाऱ्या व स्थानिक आदिवासींना छळणाऱ्या सशस्त्र राम व श्याम या दरोडेखोरांना जिवावर उदार होऊन यमसदनाला पाठवले होते. त्या संपूर्ण घटनेवर आधारित ‘रामश्याम- शोध दरोडेखोरांचा’ हे पहिले पुस्तक लिहिले. पुस्तकाची एक प्रत तत्कालीन खातेप्रमुखांना कौतुकाने दिली. तेव्हा पुस्तक मागून पुढून पाहून माझ्या हातात परत देत ते म्हणाले, ‘ज्यांना काम करायचं नसतं ते लिहितात.’ त्यानंतर उभ्या आयुष्यात, ‘मी लिहितो’, असे कोणा वरिष्ठाला सांगितले नाही. माझे दुसरे पुस्तक भिवंडी दंगलीवर लिहिले होते. त्यामागे १९८४ साली भिवंडीत घडलेल्या दंगलीमागच्या कारणांचा सखोल अभ्यास होता. दंगली का घडतात, त्या कोण घडविते व त्या थांबविण्यासाठी काय करावे यासाठी मूलगामी व्यवहारी उपाय सुचविणारे पुस्तक लिहून मी ते मंजुरीसाठी पोलीस महसंचालकांकडे पाठविले. दीड वर्ष पाठपुरावा करूनही परवानगीबद्दल काहीच कळविले गेले नाही म्हणून ‘ग्रंथाली’मार्फत ‘भिवंडी दंगल १९८४’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले. काही दिवसांनंतर पोलीस महासंचालकांकडून पुढील आशयाचे अर्धशासकीय पत्र आले. ‘शासनाची परवानगी न घेता तुम्ही पुस्तक प्रकाशित केलेले आहे त्यातील मजकूर हा अतिशय प्रक्षोभक असल्याने तुमच्याविरुद्ध इंडियन पिनल कोड, कलम १५३ प्रमाणे कारवाई का करू नये याचा खुलासा आठवडय़ाभरात करा..’ हे पत्र वाचून मी उडालोच. कलम १५३ अन्वये हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगल घडविण्यासाठी चिथावणी देणारे लिखाण करणे, अशा या गुन्ह्याबद्दल कमीतकमी सात वर्षे सक्तमजुरी आणि दंड अशी शिक्षा सांगितलेली आहे. ‘आठ दिवसांत उत्तर नाही आले तर तुम्हाला काही सांगायचे नाही, असे गृहीत धरून पुढील कारवाई करण्यात येईल.’ असे निर्वाणीचे पत्र असल्याने मी मागे वळून पाहिले तर माझ्या मागे कोणीच दिसेना. शेवटी तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविले. हेच पुस्तक पुढे दंगली शमविण्याचा रामबाण उपाय म्हणून देशात व परदेशातील विद्वानांनी स्वीकारले!
दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा हेतू पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ कथा, कादंबऱ्या, कविता, प्रवासवर्णने यांना वाव देण्याशिवाय वेगवेगळ्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सृजनशीलतेस साद घालणे, हाही हेतू आहे. काही सरकारी शिक्षक ग्रामीण भागांत लोकप्रिय होऊन मुलांचे हजेरीचे प्रमाण वाढवितात, शाळेची गुणवत्ता वाढवितात. मुलांच्या कलागुणांना वाव देतात आणि गावाच्या विकासात सहभागी होतात. काही वनकर्मचारी लोकसहभागातून निष्ठेने वैराण माळरानाचे हिरव्यागार वनराईत रूपांतर करतात. एखादा महसूल कर्मचारी शेतीविषयक, धान्यपुरवठाविषयक, भूमी संपादनाविषयक नवनवीन उपक्रम राबवितो. तुरुंग कर्मचारी तुरुंगाचे रूप पालटत कैद्यांमध्ये सुधारणा घडवितो. एखादा पोलीस कर्मचारी जनतेच्या हिताचे प्रयोग राबवून समाजात सुरक्षिततेची भावना वाढीस लावण्याचा प्रयत्न करतो. पी. डब्ल्यू. डी., इरिगेशन, मृदसंधारण, कृषी इत्यादी सर्व खात्यांतील अनेक कर्मचारी नवनवीन प्रयोग राबवीत असतात. ही सगळी कामे नवनिर्मितीची व जनतेच्या हितास व राष्ट्रविकासास हातभार लावणारी आहेत. त्यांची दखल घेण्याचा संकल्प आपण सोडला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या साहित्याला आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांना खात्यातून पाठबळ मिळत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. याचे कारण शोधणे मनोरंजक ठरेल. ब्रिटिश येण्याअगोदर भारतात जे सरकारी अधिकारी होते त्यांना आतासारखे नियम नव्हते. पाटलाचा, कोतवालाचा व कुलकण्र्याचा मुलगा अनुक्रमे पाटील, कोतवाल व कुलकर्णी होत असे. हे पद वंशपरंपरेने येत असे. निवृत्तीचे वय ठरलेले नसे, ऑफिसची वेळ ठरलेली नसे, त्यांची बदली होत नसे. कार्यपद्धतीचे नियम ठरलेले नसत. त्या व्यवस्थेला पारंपरिक मॉडेल म्हणत असत. क्वचितप्रसंगी एखादा बलदंड इसम आपल्या करिष्म्यावर ते पद मिळवीत असे. याला करिष्मायुक्त (charismatic) मॉडेल म्हणतात. ब्रिटिशांनी या दोन्ही मॉडेलना छेद देऊन आता अस्तित्वात असलेली नोकरशाही- जिला रॅशनल लीगल मॉडेल म्हणतात- अस्तित्वात आणली. मॅक्स वेबर यांना या मॉडेलचा जनक म्हटले जाते. त्यानंतर गुलीक आणि फ्रेड्रिक टेलर यांच्या संशोधनाची भर पडली. या तिघांच्या तत्त्वज्ञानावर प्रत्येक सरकारी खात्याची मॅन्युअल बनविण्यात आलेली आहेत. या मॉडेलनुसार सरकारी नोकर निवडताना आनुवंशिकतेऐवजी परीक्षापद्धती उपयोगात आणली जाते. शिक्षणाची अट, निवृत्तीकाळ, बदलीचे तत्त्व ठरले, कामाचे नियम, अधिनियम, कार्यपद्धती ठरली. कर्मचाऱ्यांच्या अधिकारांची उतरंड ठरली.

पण रॅशनल लिगल मॉडेलने शिस्तबद्ध यंत्रणा निर्माण झाली तरी तिच्यामध्ये अनेक दोष आले. नोकरशहाने नोकरीचे ठिकाण व जनता यांच्याशी भावनिक नाते ठेवू नये तसेच दिलेल्या चौकटीत काम करावे, असे अपेक्षित आहे. नोकरशहांच्या भावना आणि प्रेरणा मारल्या जातात हा या मॉडेलचा पहिला मोठा दोष आहे. नियमावर बोट ठेवणारी प्रेरणाहीन व भावनाशून्य नोकरशहा निर्माण झाल्याने जनतेच्या तक्रारी साचत राहू लागल्या. त्यातून रेडटेपीझमचा उदय झाला.

दुसरा दोष ‘जैसे थे’ वृत्ती. स्थितीवादी वृत्ती. जुने नियम आणि नवीन प्रश्न त्यामुळे नवीन प्रश्न सोडवणे बंद झाले. नवीन प्रश्नांना नवीन उत्तरे देण्यासाठी जास्त बौद्धिक आणि शारीरिक श्रमाची गरज भासते. पण सरकारी नोकरीत मोठी सुरक्षा असल्याने नोकरशहा आळशी व बेफिकीर बनण्याची जास्त शक्यता असते. आळसाने जुनी चौकट मोडण्यास कोणी तयार होत नाही. कोणताही बदल हा मृत्यूसारखा क्लेशकारक असतो. त्यामुळे बहुतेकजण ‘जैसे थे’वादी बनतात. नावीन्याला विरोध करतात. वेबेरियम मॉडेल हे पाश्चिमात्य संस्कृती व प्रगत देशातील स्थितीवर बेतलेले आहे. भारतासारख्या प्रगतीशील देशात वेबेरियन मॉडेलमधील नोकरशहा हा ‘रॅशनल अ‍ॅक्टर’ बनण्याऐवजी ‘सोशल अ‍ॅक्टर’ बनतो. फ्रेड रिग्ज यांनी भारतासह इतर प्रगतीशील देशांतील प्रशासनाचा अभ्यास केला. त्यांच्या मते कोणत्याही देशातील प्रशासनव्यवस्था ही त्या देशातील सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था असते. लाल फितीचा कारभार आणि जैसे थे वृत्ती घालविण्यासाठी सृजनशील साहित्याची गरज निर्माण होते. वेबेरियन मॉडेलमध्ये सुधारणा करणारे महत्त्वाचे संशोधन जगभर झालेले आहे. त्याचा वापर सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सुरू झालेला आहे; पण भारतीय लोकप्रशासनाने त्याची अजिबात दखल घेतलेली नाही.
स्वैर आणि दिशाहीन लेखन टाळण्यासाठी लेखकाने बांधिलकी स्वीकारणे आवश्यक आहे. सार्त् या विचारवंताने साहित्यक्षेत्रातील बांधिलकीबद्दल मांडणी करण्याचा प्रयत्न केला. प्रचलित काळात साहित्यिकाला कोणतीतरी भूमिका घ्यावी लागणार. तटस्थपणे राहून जगता येणार नाही. जीवनाबद्दलच्या कोणत्याही एखाद्या दृष्टिकोनाचा विचार करून त्याप्रमाणे लिहीत राहणे आणि त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे. लेखनकृती ही स्वातंत्र्यावर आधारलेली नैतिक कृती असल्याने लेखकाने स्वत:च्या स्वातंत्र्याप्रमाणे वाचकांच्या स्वातंत्र्याचीही बूज राखली पाहिजे, असे तो म्हणतो.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या साहित्याला बांधिलकी असली पाहिजे आणि ती त्याला त्याच्या लभार्थीशी जोडावी लागेल. पहिला लाभार्थी म्हणजे ज्याच्या करामधून त्याचा खर्च भागवला जातो आणि ज्याच्यासाठी नेमणूक झालेली आहे ती जनता आणि दुसरा लाभार्थी म्हणजे ज्याच्या सहाय्याने हे काम पूर्ण करायचे ते कनिष्ठ कर्मचारी. जनतेतील काही गट पैसा, सत्ता, ज्ञान याच्या जोरावर स्वत:साठी शासकीय सेवा उपलब्ध करून घेऊ शकतात. आर्थिक दृष्टय़ा व सामाजिक दृष्टय़ा मागास, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगार, असंघटित कमगार यांना कुणी वाली नाही. साहित्यिकांनी बांधिलकी ठरविताना या गटाचा प्राधान्याने विचार करावा. सरकारी नोकरीतील साचलेपणा, निराशा, हडेलहप्पी, सांगकाम्या वृत्ती नष्ट करण्यासाठी प्रेरणादायक साहित्य निर्माण करावे.
चीन दौऱ्यानंतर माझ्या मनात एका बाजूला न्यूनगंड तयार झाला तर दुसऱ्या बाजूला पेटून उठलो. न्यूनगंडाचे कारण म्हणजे आपल्यानंतर दोन वर्षांनी स्वतंत्र झालेला; आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या, आपल्यासारखाच शेतीप्रधान व प्राचीन संस्कृती असलेला प्रगतीशील देश आपल्यापुढे शंभर वर्षे गेला आहे. तर बौद्धिक क्षमता, साधनसामग्री व मेहनत यामध्ये आपण त्यांच्यापेक्षा कमी नाही, हे जाणवून मी पेटून उठलो. आपल्यात कमतरता आहे ती जनता पेटण्याची, प्रेरणा घेण्याची. चीनमध्ये माओंनी सांस्कृतिक क्रांतीद्वारे सगळा समाज ढवळून काढला. जुने विचार-संस्कृती, जुन्या सवयी नष्ट करा, अशी घोषणा देऊन कलेच्या माध्यमातून त्यांनी जनतेला नवी दृष्टी दिली. त्यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या चिनी नेत्यांनी मार्केट इकॉनॉमीचे आधुनिक सूत्र वापरून चीनची अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलली.
पण आपल्याला नाउमेद व्हायचे मुळीच कारण नाही. हातामध्ये चिमूटभर मीठ उचलून गांधीजींनी निद्रिस्त भारतीयांना जागृत करून जगावर ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश सत्तेसमोर आव्हान उभे केले. नि:शस्त्र दुबळ्या भारतीयांच्या साह्याने ब्रिटिश सत्ता उलथून टाकली माओंच्या क्रांतीला रक्तपाताचे गालबोट आहे तर गांधीजींच्या क्रांतीला अहिंसेची झालर होती. दुर्दैवाने गांधीजींना नोकरशाहीला दिशा देणारे मॉडेल बनविण्यासाठी अधिक आयुष्य मिळाले नाही. स्वातंत्र्यानंतर हिंदू-मुस्लिम दंगली, काश्मीर प्रश्न व इतर समस्यांमुळे भारतीय नेतृत्वाला नोकरशाहीची पुनर्रचना करून सुधारणा करण्यास उसंत मिळाली नाही. त्यामुळे आहे त्याच व्यवस्थेचा विस्तार करण्यात आला. अशा या पुरातन व अवाढव्य नोकरशाहीत प्रचंड विस्कळीतपणा वाढला असून तो विस्कळीतपणा नष्ट करण्यासारखे साहित्य दुर्दैवाने निर्माण झालेले नाही.
आमच्या लहानपणी शिकविलेल्या साहित्याचा हेतू योग्य नव्हता, हे आता जाणवू लागले आहे. कलेसाठी कला, की जीवनासाठी कला, यात नक्की काय निवडायचे या संभ्रमावस्थेत आम्ही पाढे, कविता, धडे पाठ करीत राहिलो. त्यामुळे आमची सगळी पिढी संभ्रमावस्थेत चाचपडतेय. साहित्याने आमची कारकुनी वृत्ती जोपासली. सैनिकी बाण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम म्हणून की काय, सीमेपलीकडून फक्त दहा पोरे मुंबईत घुसली. संपूर्ण देशाला तीन दिवस वेठीस धरले. एकशे दहा कोटी जनतेमध्ये तसे कडवे तरुण निपजत नाहीत. निपजणार तरी कसे? कारण त्यांच्यापुढे स्फूर्तिदायक साहित्य तरी कोठे आहे? तेही आमच्यासारखेच कलेसाठी कला, की जीवनासाठी कला या वादातून बाहेर पडलेले नाहीत. दिशाहीन साहित्यामुळे देशातील सगळ्या पिढय़ा दुबळ्या बनल्या.
माणसे नैतिक मूल्याचे आचरण करून ताठ मानेने उभे राहून कार्यप्रेरित होण्याची प्रचंड क्षमता गांधीवादात आहे. मार्क्‍सवाद सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व अल्पसंख्याक, असंघटित कामगार, शेतकरी, प्रशासनातील तळाचे कर्मचारी या घटकांची प्राधान्याने दखल घेतो. मार्क्‍सवादी साहित्यामुळे या घटकाचे जीवनाचे आणि संघर्षांचे वास्तव चित्रण होईल. पुरोगामी विचाराला चालना देणारे, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मांडणी करणारे या गटाच्या विकासास मदत करणारे साहित्य निर्माण होऊ शकेल. गांधीवादाचा पाया, फुले, मार्क्‍स, लेनिन, माओवादाच्या भिंती व मार्केट इकॉनॉमीवादाचे छत घेऊन साहित्याचा इमला उभा करण्याचा प्रयत्न केला तर त्यात सर्व भारतीयांना सुरक्षित वाटेल. या तिन्ही वादांना (इझम्स) केंद्रस्थानी ठेवून लेखन केले तर जनता आणि कनिष्ठ सहकारी यांच्या जीवनाची गुणवत्ता आणि जगण्याचा दर्जा (Quality of Life and Standard of Living ) उंचावण्यास नक्कीच मदत होईल. साहित्याला अभिप्रेत असलेले आत्मोद्धार व राष्ट्रोद्धार हे हेतू साध्य होतील.

प्रकार: 

ह्या भाषणावरून खोपड्यांनी व्यवस्थापनाचे/प्रशासनाचे काही पाठ्यक्रम केलेले आहेत हे कळते.

साहित्याने आमची कारकुनी वृत्ती जोपासली. सैनिकी बाण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम म्हणून की काय, सीमेपलीकडून फक्त दहा पोरे मुंबईत घुसली. संपूर्ण देशाला तीन दिवस वेठीस धरले. एकशे दहा कोटी जनतेमध्ये तसे कडवे तरुण निपजत नाहीत.
कशाचा संबंध कशाशी जोडला! हास्यास्पद. एका विशेष पोलिस महानिरीक्षकाने अशी खंत व्यक्त करावी हे विशेष निंदनीय. असो. साहित्यनिर्मितीने बंधुभाव वाढावा.

या तिन्ही वादांना (इझम्स) केंद्रस्थानी ठेवून लेखन केले तर जनता आणि कनिष्ठ सहकारी यांच्या जीवनाची गुणवत्ता आणि जगण्याचा दर्जा (Quality of Life and Standard of Living ) उंचावण्यास नक्कीच मदत होईल.
खिचडी की काय? एकाचवेळी तिन्ही वाद असे कसे काय केंद्रस्थानी ठेवता येतील? आणि असा कुठलाही वाद केंद्रस्थानी ठेवून लिखाण करायचे असते का?

भंपक भाषण. क्लिशेंचा मारा.

आणि हे "श्री. सुरेख खोपडे साहेब" कशाला हवे? कुणाचे "साहेब" आहेत श्री. खोपडे? आमची गुलामी करण्याची प्रवृत्ती काही जात नाही.

जळजळीत वास्तवता अधोरेखित करणारे नाविन्यपुर्ण भाषण.
निव्वळ सौंदर्यनिर्मिती करणे हा साहित्याचा हेतू नसून जीवनसंघर्ष करणे हा साहित्याचा मुख्य हेतू असावा. साहित्यातून ज्ञानात्मक आणि नैतिक मार्गदर्शन असावे, या विचाराशी मीही सहमत आहे.
अभिनंदन मिस्टर खोपडे......

माफ करा, पण
>>>> साहित्याने आमची कारकुनी वृत्ती जोपासली. सैनिकी बाण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम म्हणून की काय, सीमेपलीकडून फक्त दहा पोरे मुंबईत घुसली. संपूर्ण देशाला तीन दिवस वेठीस धरले. एकशे दहा कोटी जनतेमध्ये तसे कडवे तरुण निपजत नाहीत. निपजणार तरी कसे? कारण त्यांच्यापुढे स्फूर्तिदायक साहित्य तरी कोठे आहे?
एकिकडे हे, तर पुढच्याच प्यार्‍यात हे...
>>>> माणसे नैतिक मूल्याचे आचरण करून ताठ मानेने उभे राहून कार्यप्रेरित होण्याची प्रचंड क्षमता गांधीवादात आहे.
या दोहोन्ची सान्गड " सरकारी व बिनसरकारी नोकरदार साहित्यिकान्नी" कशी घालावी याचे विश्लेषण मिळाले अस्ते तर बरे झाले अस्ते!

>>>>> मार्क्‍सवाद सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व अल्पसंख्याक, असंघटित कामगार, शेतकरी, प्रशासनातील तळाचे कर्मचारी या घटकांची प्राधान्याने दखल घेतो. मार्क्‍सवादी साहित्यामुळे या घटकाचे जीवनाचे आणि संघर्षांचे वास्तव चित्रण होईल. पुरोगामी विचाराला चालना देणारे, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मांडणी करणारे या गटाच्या विकासास मदत करणारे साहित्य निर्माण होऊ शकेल. <<<<<<<
मार्क्स्वाद पक्षी कम्युनिझम रशियातून हद्दपार झालाच, चीनमधुनही तो होऊ पहातोय, व जो काही उरलासुरला कम्युनिझम आहे, तो चीनमार्फतच, "नेपाळ" सार्कह्या हिन्दू देशात व नक्षलवादाच्या रुपाने भारतात थैमान घालतो आहे हे सत्य सान्गणारे साहित्य निर्माण होउन वाचावयास न मिळाल्यामुले बहुधा खोपडे साहेबान्चे यातिल तथ्यान्कडे दुर्लक्ष झाले असावे Biggrin

>>>>> गांधीवादाचा पाया, <<<<<<
गान्धीवादाच्या पक्षी टोकाच्या अहिन्सेच्या कोणत्या पायावर कारगिलसह एकुण चार युद्धात देशाचे अन दहशतवादी हल्ल्यात मुम्बईचे रक्षण करता आले हे खोपडे साहेब सान्गू शकतील काय?
अन गान्धीवादाचे अनुकरण करताना त्यातील परराष्ट्रधोरणातील आमचि अहिन्साविषयक भुमिका सोडली, तर ग्रामोद्धाराबाबत अन्य कोणती धोरणे गेल्या साठ वर्षात या देशात अम्मलात आणली गेली याची काही टक्केवारी?
जिथेतिथे ही नावे अनाठाई/अनाकलनीय रितीने गुम्फायची गेल्या साठ वर्षातील सवय जाता जात नाही हेच खरे! Happy

>>>>> फुले, मार्क्‍स, लेनिन, माओवादाच्या भिंती व मार्केट इकॉनॉमीवादाचे छत घेऊन साहित्याचा इमला उभा करण्याचा प्रयत्न केला तर त्यात सर्व भारतीयांना सुरक्षित वाटेल.
यातिल "मार्क्‍स, लेनिन, माओवादाच्या" ही कम्युनिझमची तीन नावे व आधुनिक "ग्राहकराजाला गरज निर्माण करा - भले ती धान्यापासून वाईनची असो, अन माल विका" या मार्केट इकॉनॉमीची नवि थेअरी यान्ची सान्गड कशी घालवी? अन यात जर सरकारी नोकरशाहीला खरोखरच गान्धीवाद वापरायचाच झाला तर त्यातील साधीरहाणी-उच्चविचारसरणी, स्वयम्पूर्ण गावे, अनकरप्टेड सिस्टिम ह्या थेअर्‍या कश्या घुसवायच्या?
मी वाट बघतो अशा "साहित्याची". Happy

तरीही मी असे नक्कीच म्हणू शकतो की खोपडे साहेबान्चा या प्रकारे प्रयत्नान्ची दिशा दाखवू पहाण्याचा प्रयत्न स्तुत्यच आहे. वरील टिका आहे ती त्या दिशेला - त्यातिल मुद्यान्ना
थोडा वैचारिक गोन्धळ नक्कीच आहे, पण सरकारी नोकरीत, व ते देखिल पोलिसखात्यात राहून, येवढा गम्भिर विचार केला जाणे, तो माण्डणे हे अपवादात्मकच आहे, म्हणूनच प्रशन्सनिय आहे Happy यातुन चान्गले तेच घडो ही इच्छा
शुभंभवतू

साहेब" कशाला हवे? कुणाचे "साहेब" आहेत >>>> शेंडा बुडुख नसलेल्या प्रतिक्रियेला उत्तत देणे योग्य नाही. पण, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, मान दिला जाउ शकणार्‍या सर्वांना मी साहेब म्हणतो किंवा सर म्हणतो! तो मॅनर्स, एटीकेटस अन एकुणात सुसंस्कृत असण्याचा एक भाग आहे असे मला वाटते.

अन शेवटी महत्वाचे.. संपुर्ण जगात एकच साहेब.. सन्माननीय श्री शरदचंद्ररावजी पवार साहेब!
(श्री. खोपडे साहेब पण बारामतीचेच आहेत! :))

*****
श्री खोपडे साहेबांचे भाषण हे 'आहे रे' अन 'नाही रे' या दोन वर्गातील फरकाचे चित्रण करणारे आहे असे वाटते. ते ज्या समाजाचे/वर्गाचे बोल बोलत आहेत, ते लक्षात घेणे महत्वाचे. 'आहे रे' वर्गातील साहित्यीक अन 'नाही रे' वर्गातील साहित्यीक यांच्या साहित्याचे मुल्यमापण करण्याचा त्यांचा प्रयत्न नसावा, असे वाटते.

साहित्यनिर्मितीचे अनेक फायदे आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या लेखनामध्ये नैतिक मूल्ये ठळकपणे मांडली गेली तर त्यांचा वाचकावर, इतर शासकीय कर्मचाऱ्यांवर अनुकूल परिणाम घडतो. त्यातून नोकरशाहीची जनमनातील प्रतिमा उंचावते. >>> हा परिच्छेद व या आधीचा भाग विषयाला धरून व चांगला वाटला. बाकी भाषण विस्कळित वाटले. चीन, पाक वगैरे गोष्टी आणि त्याचा साहित्याशी संबंध कळाला नाही (आणि चीन चे एवढे कौतुक केले आहे - तेथील सर्वसामान्य माणूस भारतीय सर्वसामान्य माणसापेक्षा चांगल्या स्थितीत आढळला काय?)

>>>> श्री खोपडे साहेबांचे भाषण हे 'आहे रे' अन 'नाही रे' या दोन वर्गातील फरकाचे चित्रण करणारे आहे असे वाटते. ते ज्या समाजाचे/वर्गाचे बोल बोलत आहेत, ते लक्षात घेणे महत्वाचे. 'आहे रे' वर्गातील साहित्यीक अन 'नाही रे' वर्गातील साहित्यीक यांच्या साहित्याचे मुल्यमापण करण्याचा त्यांचा प्रयत्न नसावा, असे वाटते. <<<<<
चम्प्या, तू भजाळला आहेस असे वाटते, झोप झाली नाही का पुरेशी? कामाच लोड आहे का जास्त? Proud
लेका, एकाच प्यारामधे इतके परस्परविरोधी कसे काय लिहीतोस?
फरक शोधाचया तर मुल्यमापन केल्याशिवाय शोधला जाईल का?
अन मुल्यमापन न करताच फरक शोधू पाहिले तर तो वरवरचा ठरणार नाही का?

अन ते ज्या कारकुनी जोपासण्यार्‍या साहित्याबद्दल बोलताहेत तो सरकारी "शिक्षणक्रम आहे" !
विजिगिषू, लढाऊ, सैनिकी प्रवृत्ती जोपासायची तर त्यास मूळात अभ्यासक्रमात स्थान दिलेले नाही, व जे काही थोडेबहुत होते ते येनकेनप्रकारेणे हरनिमेत्ते कुणाच्या तरी दाढ्या कुरवाळण्याकरता काढून टाकले.
परिस्थिती अशी की आयशीबापसान्नी पोरान्ना दाखवली दिशा तरच ते ते साहित्य वाचले जाते, अन्यथा नाही.
केवळ "सहा सोनेरी पाने" हे पुस्तक वाचले तरी पुरेसे आहे. पुण्यातल्या मोतीबागेत वा सन्घाच्या / विहिपच्या कुठल्याही कार्यालयात गेलात तर कारकुनी न जोपासणार्‍या साहित्याच्या पुस्तिका शेकडोनी उपलब्ध आहेत. पण एकदा का सन्घाला नि सन्घविचाराला वाळीतच नव्हे तर गजाआड डाम्बायचे नेहेरू-गान्धी तत्वज्ञान अन्गी बाणवल्यावर खोपडेसाहेबान्सारख्यान्च्यापर्यन्त तरी हे साहित्य कसे काय पोचणार? त्यातुन इतिहासात डोकवावे तर इतिहासाला कुरवाळू नका - प्रगतीसाठी वर्तमानात जगा हा धोषा!
माझा तर खोपडेसाहेबान्ना सल्ला राहिल की त्यान्नी साहित्याबद्दल उठाठेव करण्यापेक्षा, त्यान्चे जे "वरिष्ठ सत्ताधारी" आहेत, त्यान्च्या इन्च्छान्चा व सत्तेवर रहाण्याच्या त्यान्च्या पराकाष्ठेच्या प्रयत्नान्चा मागोवा घ्यावा, तो जर घेतला तर अस्ले कचकडी आक्षेप घ्यावेसे त्यान्ना वाटणार नाहीत व "साहित्याबद्दलच" नव्हे, तर ते प्रसुत होण्यावर असलेले अलिखित निर्बन्धदेखिल त्यान्च्या नजरेस येतिल! Happy

मी सुरेश खोपडे यांचे 'नाविन्यपूर्ण योजना' पुस्तक वाचले आहे. अप्रतिम पुस्तक आहे. मॅनेजमेंटचे चांगले धडे त्यांनी प्रत्यक्षात कसे राबवले व त्याचे परिणाम काय झाले हे त्या पुस्तकात वाचायला मिळते.