अनंतशक्तिरैश्वर्यं निष्यन्दाश्चाणिमादय: ।
स्वस्येश्वरत्वे संसिद्धे सिध्यन्ति स्वयमेव हि ॥
पुष्पमानया गन्धो विनेच्छामनुभूतये ।
पूर्णाहम्भावयुक्तेन परिच्छिन्ना विभूतय ॥ - मानसोल्लास:
पुष्प आणत असतांना त्यातील गंध यदृच्छया अनुभूतीला येतो तद्वत्, ज्याचा अहंभाव पूर्णत: नष्ट झालेला आहे अशा, स्वत:मधील ईश्वरत्वाने मोक्ष प्राप्त झालेल्या योग्याला अनंत शक्ती आणि ऐश्वर्य यांचा परिणाम असणार्या अणिमा इत्यादी सिद्धी स्वत:हूनच प्राप्त होतात.
॥ तृतीयो विभूतिपादः ॥
तिसरा चतकोर. विभूतीपाद. विभूती म्हणजे सिद्धी.
संप्रज्ञात समाधीच्या पाच बहिरंग साधनांचा म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ह्या पाच अंगांचा विचार दुसर्या समाधीपादात झाला. आता ह्या तिसर्या पादात, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तीन अंतरंग साधनांचा विचार केला आहे. ह्या पादाला विभूतीपाद असे नाव आहे. ह्याचे कारण असे, की ह्या पादात योगाभ्यासापासून प्राप्त होणार्या अनेक विभूती म्हणजे सिद्धी संयमापासून प्राप्त होत असल्याने प्रथम संयम म्हणजे काय हे सांगण्यासाठी संयमाचे घटक जी धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंगे आहेत, त्यांची लक्षणे पहिल्या तीन सूत्रांत सांगितलेली आहेत.
१. देशबन्धश्चित्तस्य धारणा ।
चित्ताला कोणत्यातरी देशावर म्हणजे स्थानावर जणू बांधून ठेवल्यासारखे स्थिर करणे ही धारणा होय.
२. तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ।
एका क्षणाला जी भावना चित्तात असेल तीच पुढील अनेक क्षणांत टिकणे ही त्या भावनेची म्हणजे प्रत्ययाची एकतानता होय. धारणा ज्या देशावर केली असेल त्या देशावर ही प्रत्ययैकतानता करणे म्हणजे ध्यान होय.
३. तद् एवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यम् इव समाधिः ।
भाव्य वस्तूव्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ भासमान न होता केवळ ती वस्तूच भासमान होणे ही त्या वस्तूची अर्थमात्रनिर्भासता होय. चित्ताची भाव्य वस्तूशी इतकी तन्मयता होणे, की अमुक भाव्य वस्तूचे ध्यान मी करत आहे असे स्फुरण न होणे ही त्याची स्वरूपशून्यता होय. ध्येय अशा रीतीने केवळ अर्थरूपानेच तेवढे भासमान होणे आणि त्याच्या स्वरूपाचेही अनुसंधान न होणे हाच समाधी होय.
४. त्रयम् एकत्र संयमः ।
धारणा, ध्यान आणि समाधी हे तिन्ही एकत्र प्रवृत्त झाले म्हणजे तो संयम होय.
५. तज्जयात् प्रज्ञाऽऽलोकः ।
प्रकर्षाने म्हणजे विशेष प्रकारे ज्ञान जिला होते ती प्रज्ञा होय. संयमाचा जय झाला म्हणजे अशा प्रकारच्या प्रज्ञेचा आलोक म्हणजे उदय होतो.
६. तस्य भूमिषु विनियोगः ।
त्या प्रज्ञेच्या उदयाचा विनियोग पुढील भूमीच्या ठिकाणी करावा.
७. त्रयम् अन्तरङ्गं पूर्वेभ्यः ।
यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ह्या पाच पूर्वीच्या योगांगांच्या अपेक्षेने धारणा, ध्यान आणि समाधी ही तिन्ही सबीज संप्रज्ञात समाधीची अंतरंग साधने होत.
८. तद् अपि बहिरङ्गं निर्बीजस्य ।
मात्र निर्बीज असंप्रज्ञात समाधीसाठी तीही बहिरंग साधनेच होत.
९. व्युत्थाननिरोधसंस्कारयोरभिभवप्रादुर्भावौ निरोधक्षणचित्तान्वयो निरोधपरिणामः ।
चित्त विषयाकार होणे हे व्युत्थान (purturbation, disturbance, deviation) आणि चित्तात विषयाभिमुख होण्याची जी ओढ असते तो व्युत्थान संस्कार. त्याच्या उलट सर्व वृत्तींचा उपशम करणे हा निरोध आणि ह्या निर्वृत्तिक अवस्थेत होणार्या सत्त्वसंपन्नतेची ओढ हा निरोधसंस्कार. व्युत्थान संस्कारांचा अभिभव होणे म्हणजे ते दुर्बळ होत जाणे आणि निरोध संस्कार प्रकट होत जाणे व निरोधक्षणांत चित्ताचा अन्वय असणे म्हणजे चित्त निरोधावस्थेत काही क्षण टिकणे ह्या अवस्थेला चित्ताचा निरोधपरिणाम म्हणतात.
१०. तस्य प्रशान्तवाहिता संस्कारात् ।
कसलाही विक्षेप न येता चित्त परिणामावस्थेत टिकून राहणे ही त्या परिणामाची प्रशांतवाहिता होय. मागील सूत्रात सांगितलेल्या निरोधपरिणामाची प्रशांतवाहिता निरोधाच्या संस्कारामुळे होऊ लागते.
जाणकारांना प्रतिसादास उद्युक्त करणे, अजाणत्यांची जिज्ञासा जागवणे, किमान आपल्या संस्कृतीने परंपरागत मौखिक पठणाद्वारे संचित केलेल्या आपल्या सांस्कृतिक ज्ञानाची ओळख करून घेण्यास सर्वसामान्यांना प्रोत्साहित करणे ह्या उद्देशाने मी ही मालिका लिहीत आहे. अपुरी, त्रोटक वाटणे स्वाभाविकच आहे. शिवाय मी 'तज्ञ' म्हणून नव्हे तर 'विद्यार्थी' म्हणूनच हे लिहीत आहे. आपण आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा उपयोग करू शकलो पाहिजे, तसेच कमीत कमी पुढल्या पिढ्यांकडे यथाशक्य सुपूर्त करू शकलो पाहिजे असे मला वाटते.
३. "पातंजल योगप्रदीप", डॉ.पु.पां. जाखलेकर, अनमोल प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती: २००१, किंमत: रू.१००/- फक्त, पृष्ठे १४५.
११. सर्वार्थतैकाग्रतयोः क्षयोदयौ चित्तस्य समाधिपरिणामः ।
चित्त सर्व अर्थाकडे म्हणजे विषयांकडे धावत असणे ही सर्वार्थता आणि ते एकाच आधारावर स्थिर राहणे ही एकाग्रता होय. सर्वार्थतेचा क्षय आणि एकाग्रतेचा उदय म्हणजे समाधी परिणाम होय.
१२.ततः पुनः शान्तोदितौ तुल्यप्रत्ययौ चित्तस्यैकाग्रतापरिणामः ।
पूर्व क्षणांतील प्रत्यय शांत होताच पुन्हा तत्सदृश प्रत्यय पुढील क्षणांत उदित झाला तर हे दोन्हीही तुल्यप्रत्यय झाले. अशाप्रकारे पूर्वोत्तर क्षणांत एकसारखाच प्रत्यय राहणे म्हणजे एकाग्रता होय.
१३. एतेन भूतेन्द्रियेषु धर्मलक्षणावस्थापरिणामा व्याख्याताः ।
अशाप्रकारे, भूते आणि त्यांची इंद्रिये ह्यांच्या ठिकाणी निर्माण होणारे धर्म, लक्षण आणि अवस्था ह्या तीन परिणामांची व्याख्या झाली.
१४. शान्तोदिताव्यपदेश्यधर्मानुपाती धर्मी ।
ज्यांचा व्यापार संपला आहे ते शांत धर्म होत. ज्यांचा व्यापार सुरू झाला आहे ते उदित धर्म आणि भावी काळात उत्पन्न होणारे, मात्र तोपर्यंत केवळ शक्तीरूपाने असलेले व म्हणूनच ज्यांचे ज्ञान होऊ शकत नाही ते अव्यपदेश्य धर्म होत. ह्या तिन्ही विशेष धर्मात अन्वयित्वाने राहतो तो धर्मी होय.
१५. क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतुः ।
धर्म, लक्षण आणि अवस्था ह्या तीन परिणामांतून परिणाम शांत होऊन दुसरा परिणाम उदित होतो हे परिणामान्यत्व होय. प्रतिक्षणी होणाऱ्या परिणाम क्रमात अन्यत्व निर्माण होते म्हणून परिणामान्यत्व घडून येते.
१६. परिणामत्रयसंयमाद् अतीतानागतज्ञानम् ।
धर्म, लक्षण आणि अवस्था तीन मागील सूत्रात सांगितलेले परिणामत्रय त्यावर संयम केल्याने अतीत म्हणजे मागे होऊन गेलेल्या आणि अनागत म्हणजे आज अव्यपदेश्य असलेल्या पण पुढे घडून येणाऱ्या अशा गोष्टींचे ज्ञान होते.
१७. शब्दार्थप्रत्ययानाम् इतरेतराध्यासात् संकरः । तत्प्रविभागसंयमात् सर्वभूतरुतज्ञानम् ।
कोणत्याही पदार्थाला उद्देशून उच्चारला जाणारा शब्द, ज्याला उद्देशून तो शब्द उच्चारला जातो तो त्या शब्दाचा अर्थ आणि त्या शब्दावरून त्या अर्थाचा जो बोध होतो तो प्रत्यय, ह्या तिन्ही गोष्टी परस्परांहून देशत:, कालत: व वस्तुत: अत्यंत भिन्न असूनही त्यांचा एकमेकांवर अध्यास होतो व त्यामुळे तिन्हींचा संकर झालेला असतो. ह्या संकराचे शब्द, अर्थ व प्रत्यय हे जे प्रविभाग त्यांवर संयम केला असता सर्व भूतांचे रुत म्हणजे बोलणे त्याचे ज्ञान होते.
१८. संस्कारसाक्षत्करणात् पूर्वजातिज्ञानम् ।
चितामधे अनंत जन्मार्जित वासनांचे संस्कार असतात. ह्या संस्कारांवर संयम केल्याने त्यांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार झाल्यावर त्यामुळे त्या योग्याला कोणत्याही पूर्वजन्माचे ज्ञान होते.
१९. प्रत्ययस्य परचित्तज्ञानम् ।
पर म्हणजे दुसरा मनुष्य. त्याच्या चित्ताचे ज्ञान, त्याच्या चित्तातील प्रत्ययाच्या साक्षात्काराने होते.
२०. न च तत् सालम्बनं,तस्याविषयीभूतत्वात् ।
हे ज्ञान त्या प्रत्ययाला जो आधार असतो त्यासह होत नाही. कारण तो आधार साक्षात्करणाचा विषय झालेला नसतो.
यापुढील सूत्रांत अदृश्य होण्याची सिद्धी, देहाचा मृत्यू कोठे व कसा होतो हे अगोदरच कळते ती सिद्धी आणि मैत्री, करुणा, आनंद व उपेक्षा करण्याच्या सामर्थ्यांच्या सिद्धी कशा प्राप्त होतात ते सांगितले आहे. त्यामुळे हा अतिशय रोचक भाग आहे. मात्र मुळात कोल्हटकरांनी दिलेली स्पष्टीकरणे व भाष्ये खूपच विस्तृत असल्याने इथे देणे सोपे नाही. ती मुळातच वाचावित. इथे केवळ त्या त्या सूत्रांचा शब्दश अभिप्रेत असणारा अर्थच काय तो देण्याचा प्रत्यत्न करत आहे.
२१. कायरूपसंयमात् तद्ग्राह्यशक्तिस्तम्भे चक्षुःप्रकाशासंप्रयोगेऽन्तर्धानम् ।
आपल्या शरीराचे जे रूप, त्यावर संयम केल्याने ते शरीर इतरांस डोळ्यांनी ग्रहणक्षम व्हावे अशा प्रकारची त्याच्या ठायी जी शक्ती असते तिचे स्तंभन होते व त्यामुळे पाहणाऱ्याच्या डोळ्यांचा जो प्रकाश त्याचेशी योग्याच्या शरीराच्या स्वरूपाचा संयोग होत नाही म्हणून योगी अंतर्धान पावतो. म्हणजे त्याच्या शरीराचे रूप पाहणाराला दिसत नाही.
२२. एतेन शब्दाद्यन्तर्धानमुक्तम् सोपक्रमं निरुपक्रमं च कर्म । तत्संयमाद् अपरान्तज्ञानम्, अरिष्टेभ्यो वा ।
सोपक्रम आणि निरूपक्रम असे कर्मांत दोन प्रकार आहेत. ज्या कर्माची फलप्राप्ती अगदी लवकर होते ते सोपक्रम कर्म होय. ज्याची फलप्राप्ती दीर्घकालाने होते ते निरुपक्रम कर्म होय. कर्मातील हे प्रकार जाणून घेऊन त्यांच्यावर संयम केला म्हणजे आयुष्याच्या अपरांताचे म्हणजे मृत्यूचे ज्ञान होते किंवा मृत्यूसूचक अरिष्टे शास्त्रांत सांगितली आहेत त्यावरूनही मृत्यू जवळ आल्याचे समजते.
२३. मैत्र्यादिषु बलानि ।
पाद एक, सूत्र तेहत्तीसमध्ये सांगितलेल्या मैत्री करुणा, आनंद आणि उपेक्षा ह्या भावनांवर संयम केल्याने त्या त्या भावनांची सामर्थ्ये प्राप्त होतात.
२४. बलेषु हस्तिबलादीनि ।
हत्ती इत्यादींच्या ठिकाणीचे जे बळ त्यावर संयम केला असता त्यांचे बल आपल्यास प्राप्त होते.
२५. प्रवृत्त्यालोकन्यासात् सूक्ष्मव्यवहितविप्रकृष्टज्ञानम् ।
पाद एक, सूत्र छत्तीसमध्ये सांगितलेल्या ज्योतिष्मती प्रवृत्तीचा उदय म्हणजे सात्त्विक प्रकाशाचा जो प्रसर त्याचा न्यास, सूक्ष्म म्हणजे अत्यंत बारीक, व्यवहित म्हणजे अन्य पदार्थांच्या अडथळ्यामुळे न दिसणार्या आणि विप्रकृष्ट म्हणजे अत्यंत दूर असलेल्या, अशा विषयावर केला म्हणजे तशा स्थितीतल्या त्या विषयांचेही ज्ञान होऊ शकते.
२६. भुवनज्ञानं सूर्ये संयमात् ।
सूर्यावर संयम केला असता चतुर्दश भुवनांचे ज्ञान होते.
२७. चन्द्रे ताराव्यूहज्ञानम् ।
चंद्रावर संयम केला असता आकाशातील तारांगणांच्या व्यूहाचे ज्ञान होते.
२८. ध्रुवे तद्गतिज्ञानम् ।
धृव नक्षत्रावर संयम केला असता त्याच्या व ताऱ्यांच्या गतीचे ज्ञान होते.
२९. नाभिचक्रे कायव्यूहज्ञानम् ।
नाभिचक्रावर संयम केला असता शरीरातील व्यूहाचे ज्ञान होते.
३०. कण्ठकूपे क्षुत्पिपासानिवृत्तिः ।
कण्ठातील कूपासारख्या भागावर संयम केला असता भूक, तहान ह्यांची पीडा दूर होते.
३१. कूर्मनाड्यां स्थैर्यम् ।
कूर्मनाडीवर संयम केला असता चित्ताला स्थैर्य प्राप्त होते.
३२. मूर्धज्योतिषि सिद्धदर्शनम् ।
मूर्धज्योतिच्या ठिकाणी संयम केला असता सिद्ध पुरूषांचे दर्शन होते.
३३. प्रातिभाद् वा सर्वम् ।
प्रतिभेवर संयम केला असता सर्व विषयांचे ज्ञान होते.
३४. हृदये चित्तसंवित् ।
हृदयावर संयम केला असता चित्ताचे ज्ञान होते.
योगसूत्रे आणि त्यांचे इंग्रजीत अर्थ हे विकीवर सापडतात. त्यांचा कर्ता कोण ते माहीत नाही. मात्र ढोबळ मानाने अर्थ-अन्वय लावण्याकरता कदाचित उपयोगी पडू शकेल. योगसूत्रे ही मुळात संस्कृतमधे लिहीली गेली असल्याने, "प्रसिद्ध दहा-बारा संस्कृत भाष्यकार, प्रा.सुरेंद्रनाथ दासगुप्ता, डॉ.बेहनन, प्रा.वूडस् इत्यादी विद्वानांचे पातंजल योगावरील पाच सहा ग्रंथ आणि योगशास्त्रावर आजपर्यंत मराठीत झालेले सर्व वाङ्मय ह्या सर्वांचे यथामती आलोडन करून हा ग्रंथ लिहिला आहे" असे कोल्हटकर म्हणतात. योगसूत्रांच्या प्रात्यक्षिक प्रयोगांच्या यशस्वीतेसाठी मूळ संस्कृत भाष्ये स्वत: समजून घेण्यास सोपे पर्याय मला दिसत नाहीत. परंतु ज्यांचे तैल बुद्धीस उपलब्ध साधनांवरून मूळ मार्गदर्शनाचे रहस्य जाणून घेण्याची क्षमता असेल त्यांना हे कदाचित साधूही शकेल. तरीही सर्व भाषांतील जाणकारांच्या सर्व भाष्यांचे संदर्भ, साधने म्हणून गोळा करण्याच्या कामाचे मूल्य अबाधित राहतेच. त्याच दृष्टीने ह्या प्रयत्नास अर्थ आहे.
३५. सत्त्वपुरुषयोरत्यन्तासंकीर्णयोः प्रत्ययाविशेषो भोगः। परार्थत्वात् स्वार्थसंयमात् पुरुषज्ञानम् ।
सत्त्व म्हणजे अंत:करण आणि पुरूष म्हणजे द्रष्टा आत्मा हे परस्परांहून अत्यंत असंकीर्ण म्हणजे भिन्न आहेत. तथापिही त्यांच्या भिन्नतेचा विशेष प्रत्यय न येणे हाच भोग होय. चित्ताच्या ठिकाणी हा भोग त्याच्या स्वत:करता नसून चित्ताहून पर जो द्रष्टा त्याच्याकरता असल्यामुळे स्वार्थ जो द्रष्टा पुरूष -आत्मा- त्याच्या ठिकाणी संयम केल्याने त्या चित्ताचा द्रष्टा असलेला साक्षी 'मी' असे पुरूषज्ञान होते.
नामी_विलास यांनी घातलेली थोडी भर. योगाभ्यासी साधकाची जसजशी प्रगती होत जाते तसतसे अंतःकरण अधिक शुद्ध होत जाते. त्यावरील रजस्तमोगुणांचा प्रभाव कमी होतो आणि वृत्ती उत्पन्न होत नाहीत. अंतःकरण शुद्ध होण्याचा परिणाम सत्त्व गुण वाढत जातो. अंतःकरणाचे सत्त्व, रज आणि तम हे घटक असले तरी सत्त्वगुण वाढीस लागल्यामुळे रज, तम हे सत्त्वगुणात विलिनभावाने राहतात. म्हणून येथे सत्त्व म्हणजे अंतःकरण असे म्हटले आहे.
३६. ततः प्रातिभश्रावणवेदनादर्शास्वादवार्ता जायन्ते । तत्संयमाद् अपरान्तज्ञानम्, अरिष्टेभ्यो वा ।
पुरूषज्ञानार्थ केल्या जाणाऱ्या वरील संयमापासून प्रतिभासामर्थ्यामुळे सूक्ष्म, व्यवहित किंवा अति दूर वस्तूंचे ज्ञान होणे आणि दिव्य असलेले शब्द ऐकू येणे (श्रावण), दिव्य स्पर्श कळणे (वेदन), दिव्य रूप दृष्टीस पाणे (आदर्श), दिव्य रसाची गोडी चाखता येणे (आस्वाद) आणि दिव्य गंध समजणे (वार्ता) ह्या सिद्धी उत्पन्न होतात.
३७. ते समाधाव् उपसर्गा व्युत्थाने सिद्धयः ।
मागील सूत्रांत प्रातिभ, श्रावण, वेदन, आदर्श, आस्वाद आणि वार्ता हे जे सिद्धीविशेष सांगितलेले आहेत ते निर्बीज असंप्रज्ञात समाधीच्या मार्गात उपसर्ग म्हणजे अडथळेच होत. त्या श्रावणादिक अद्भूत शक्ती व्युत्थानकालांत सिद्धी होत.
३८. बन्धकारणशैथिल्यात् प्रचारसंवेदनाच् च चित्तस्य परशरीरावेशः ।
चित्ताला एकाच शरीरात जणू बांधून ठेवण्यास कारण असलेले जे धर्माधर्मसंस्कार ते शिथील झाल्यामुळे आणि चित्ताचा प्रचार म्हणजे चित्तवहा नाडींच्या द्वारा होणारा चिताचा देहांतील संचार ह्यांचे संवेदन म्हणजे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे त्या चित्ताला परशरीरात प्रवेश करता येतो.
३९. उदानजयाज्जलपङ्ककण्टकादिष्वसङ्ग उत्क्रान्तिश्च ।
पाच प्राणांपैकी उदानाचा जय केला असता पाणी, चिखल किंवा काटेकुटे ह्यांच्याशी संग न होता त्यावरून चालता येते आणि स्वेच्छेने उत्क्रांती म्हणजे मरण प्राप्त होते.
४०. समानजयात् प्रज्वलनम् ।
समानाचा जय झाला असता कायाग्नी प्रज्वलित होतो.
४१. श्रोत्राकाशयोः संबन्धसंयमाद् दिव्यं श्रोत्रम् ।
श्रोत्रेंद्रिये आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता योग्याला दिव्य श्रोत्रेंद्रियाचा लाभ होतो.
४२. कायाकाशयोः संबन्धसंयमाल् लघुतूलसमापत्तेश्चाकाशगमनम् ।
शरीर आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता आणि कापसासारख्या हलक्या असणार्या पदार्थावर समापत्तिरूप तन्मयता प्राप्त करून घेतल्याने योग्याला 'आकाशगमन' हि सिद्धी प्राप्त होते.
४३. बहिरकल्पिता वृत्तिर्महाविदेहा ततः प्रकाशावरणक्षयः ।
अकल्पिता, म्हणजे शरीर निरपेक्ष असलेली, जी चित्ताची बहिर्वृत्ती ती महाविदेहा होय. ती प्राप्त झाली असता तिच्या योगाने चित्तातील जो सात्त्विक प्रकाश त्यावर असलेले जे रजस्तमोगुणांचे म्हणजे तत्कार्यभूत क्लेशादिकांचे आवरण त्याचा क्षय होत जाऊन शेवटी पूर्णत्त्वाने नाहीसे होते.
४४. स्थूलस्वरूपसूक्ष्मान्वयार्थवत्त्वसंयमाद्भूतजयः ।
जागृतावस्थेत घ्राणादी इंद्रियांनी ज्यांचे गंधादी गुण ग्रहण केले जात असतात ती भूतांची स्थूलावस्था. कठीणपणा इत्यादी धर्मांनी ज्ञात होणारी त्या भूतांची निर्व्यापारावस्था ही त्यांची स्वरूपावस्था. त्या त्या भूतांच्या तन्मात्रा ही त्यांची सूक्ष्मावस्था. सत्त्व, रज व तम हे तीन गुण तन्मात्रांत असतात, म्हणजे त्यांचा अन्वय तन्मात्रांत असतो. ही अन्वयावस्था आणि महत्तत्त्वापासून स्थूल भूतांपर्यंतचे सर्व गुण-परिणाम दृश्याच्या ठिकाणी असलेल्या भोगापवर्गार्थतारूप शक्तीमुळे घडून येत असल्याने ही शक्ती हीच अर्थवत्त्वावस्था. अशा स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय व अर्थवत्त्व ह्या पाच अवस्था भूतांच्या ठिकाणी आहेत. त्यांच्यावर क्रमाने संयम करून त्यांचा जय झाला असता भूतजय होतो.
सत्यवादिनमक्रोधं निवृतं मद्यमैथुनात् ।
अहिंसकं, प्रशांतं,जपशौचपरं, धीरं तपस्विनं ।
देव-गोब्राह्मणाचार्य-गुरूवृद्धार्चनरतं, आनृशंस्यपरं ।
अनहंकृतं, शास्त्राचारं, अध्यात्मप्रवणेंद्रियं ।
धर्मशास्त्रवरं, विद्यान्नरं नित्यरसायनम् ॥
नेहमी खरे बोलणारा, न रागावणारा, मद्यनिवृत्त, ब्रह्मचारी, अहिंसक, शांतवृत्त, जपशौचादीकांत तत्पर, धैर्यवान्, तपस्वी, देव-गायी-ब्राह्मण-आचार्य, गुरूजन आणि वृद्ध ह्यांना मान देणारा, कोणाचा घात-पात न करणारा, निरभिमानी, सदाचरणी, अध्यात्माकडे इंद्रियांची ओढ असलेला, धर्मपरायण असा जो मनुष्य तो मूर्तिमंत नित्यरसायन होय. – चरकसंहिता
जे रसायन नियमितरीत्या घेतले असता चिरतारूण्य प्राप्त होते अशास्वरूपाच्या रसायनास नित्यरसायन म्हणत असावेत. वरीलप्रमाणे व्रतस्थ वर्तणूकच नित्यरसायन असते असे सांगण्याचा हा प्रयास वाटतो.
४५. ततोऽणिमादिप्रादुर्भावः कायसंपत् तद्धर्मानभिघातश्च ।
अष्टमहासिद्धींचा लाभ - ह्या भूतजयापासून योग्याच्या ठिकाणी अणिमा आदी अष्टमहासिद्धी प्रकट होऊ लागतात. पुढील सूत्रांत सांगितल्याप्रमाणे त्या गुणांनी युक्त असलेली शरीरसंपत्ती त्यास प्राप्त होते आणि शरीराच्या ठिकाणी असलेल्या धर्मांचा अग्नी, वायू, जल इत्यादींकडून नाश न होण्याचे सामर्थ्य त्या शरीरात उत्पन्न होते.
४६. रूपलावण्यबलवज्रसंहननत्वानि कायसंपत् ।
सुंदर रूप, उत्तम लावण्य, श्रेष्ठ सामर्थ्य आणि वज्रासारखे सहननत्व म्हणजे अवयवसमूह ही कायसंपत् होय.
४७. ग्रहणस्वरूपास्मितान्वयार्थवत्त्वसंयमाद् इन्द्रियजयः ।
इंद्रिये आपापल्या विषयाशी संयुक्त होणे ही त्यांची ग्रहणावस्था, विषयाशी संयोग नसतांना ती आपापल्या गोलकांत निर्व्यापार स्थितीत केवळ प्रकाशरूप असतात. ही त्यांची स्वरूपावस्था, चित्तात 'मी आहे' असे जे अखंड स्फुरण होत असते ती अस्मितावस्था, अस्मितेत त्रिगुणांचे अस्तित्त्व असते ही अन्वयावस्था आणि त्रिगुणांतील भोगापवर्गार्थतारूप शक्ती ही अर्थवत्त्वावस्था. ह्या पाच अवस्थांवर संयम केल्याने इंद्रियजय ही सिद्धी प्राप्त होते.
४८. ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च ।
मनाच्या वेगासारखा गतीलाभ शरीरास होणे हे मनोजवित्व आणि कोणत्याही देशांतील आणि काळांतील विषयांचे सेवन इंद्रिय-निरपेक्ष घडू शकणे हा विकरणभाव. मागील सूत्रांत सांगितलेला इंद्रियजय प्राप्त झाला असता मनोजवित्व आणि विकरणभाव ही व्यष्टिनिष्ठ संयमाची फले आणि प्रधानजय हे समष्टिनिष्ट संयमाचे फल अशी तीन प्रकारची फले योग्यास प्राप्त होतात.
४९. सत्त्वपुरुषान्यताख्यातिमात्रस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं सर्वज्ञातृत्वं च ।
सत्त्व म्हणजे अंत:करण त्याचा द्रष्टा जो पुरूष ह्या उभयतांत असलेली जी अन्यता म्हणजे वेगळेपणा त्याची ख्याती म्हणजे प्रतीती ही सत्त्वपुरूषान्यताख्याति होय (हीच विवेकख्याति होय). ही ज्याच्या ठिकाणी स्थिरभावाला पोचली असेल त्या योग्याच्या ठिकाणी 'सर्व भावांचा अधिष्ठाता मीच आहे व म्हणून मी सर्वज्ञही आहे' अशी प्रतीती येऊ लागते.
५०. तद्वैराग्यादपि दोषबीजक्षये कैवल्यम् ।
वरील दोन्ही फलांविषयीही वैराग्य उत्पन्न झाले असता अविद्या-काम-कर्म ह्या दोषत्रयांचे बीज असलेला जो द्रष्ट्ट-दृश्य संयोग त्याचा नाश होऊन पुरूषास कैवल्याचा लाभ होतो.
५१. स्थान्युपनिमन्त्रणे सङ्गस्मयाकरणं पुनः अनिष्टप्रसङ्गात् ।
स्थानिन् म्हणजे देव. योग्याच्या तपामुळे प्रसन्न झालेले देव त्या योग्याला अनेक दिव्य भोग भोगण्यासाठी उपनिमंत्रण करतात, म्हणजे त्याने त्या भोगांचा स्वीकार करावा अशी त्यास प्रार्थना करतात. तेव्हा योग्याने मनात त्या भोगांविषयी आसक्ती निर्माण होऊ देऊ नये किंवा "देवही मला भोग भोगण्यासाठी निमंत्रण देत आहेत तेव्हा माझ्या ठिकाणी केवढे तप:सामर्थ्य प्रकट झाले आहे" अशा रीतीची स्वत:विषयी एक प्रकारची धन्यता वाटणे हा स्मयही त्याने करू नये. कारण तसे केल्यास पुन्हा संसाररूपी अनिष्टाचा प्रसंग प्राप्त होतो.
५२. क्षणतत्क्रमयोः संयमादविवेकजं ज्ञानम् ।
कालाचा अतिसूक्ष्म भाग म्हणजे क्षण, आणि पूर्वक्षण, उत्तरक्षण असा अखंडपणे चाललेला क्षणांचा प्रवाह हा त्यांचा क्रम होय.वस्तूंतील सूक्ष्म भेदांचे ज्ञान होण्याला कारण असलेली जी शक्ती ती विवेक होय. क्षण आणि त्याचा क्रम ह्यावर संयम केला असता ह्या विवेकापासून उत्पन्न होणारी वस्तूची भिन्नता जाणणारे ज्ञान होते.
५३. जातिलक्षणदेशैरन्यताऽनवच्छेदात् तुल्ययोस्ततः प्रतिपत्तिः ।
अन्यता म्हणजे दोन वस्तूंतील वेगळेपणा. गाय, म्हैस अशा जाती; काळी गाय, पांढरी गाय इत्यादी लक्षणे; आणि ह्या ठिकाणची गाय, त्या ठिकाणची गाय, हा देश; ह्या तिन्हींच्यामुळे दोन वस्तूंतील अन्यतेचा अवच्छेद म्हणजे वेगळेपणाचा निश्चय होऊ शकतो. परंतु तिन्ही मार्गांनी दोन वस्तूंतील अन्यतेचा अवच्छेद न झाल्यामुळे जेव्हा दोन पदार्थ अगदी तुल्य दिसतात तेव्हाही योग्याला त्या तुल्य पदार्थांची प्रतिपत्ती म्हणजे ते परस्परांहून भिन्न असल्याची प्रतीती मागील सूत्रांत सांगितलेल्या विवेकज ज्ञानामुळे होऊ शकते.
५४. तारकं सर्वविषयं सर्वथाविषयम् अक्रमं चेति विवेकजं ज्ञानम् ।
हे विवेकज ज्ञान योग्याला तारणारे असते म्हणून ते 'तारक' होय. त्या ज्ञानाला अविषय अशी कोणतीच वस्तू नसते म्हणून ते 'सर्वविषय' होय. त्या ज्ञानामुळे कोणत्याही विषयाचे नुसते सामान्य ज्ञान तेवढे होते असे नसून, त्या विषयांतील सर्व गुणधर्म आणि अवस्थाविशेष ह्यांचेही ज्ञान होत असल्यामुळे ते 'सर्वथा-विषय' होय आणि वस्तुगत गुणधर्मादिकांचे ज्ञान विशिष्ट क्रमाने न होता योग्यास इच्छा होताच वाटेल त्या वेळी वाटेल त्या गुणधर्मादिकांचे ज्ञान होऊ शकते म्हणून ते 'अक्रम' होय. अशा लक्षणांनी युक्त असे ते विवेकज ज्ञान असते.
५५. सत्त्वपुरुषयोः शुद्धिसाम्ये कैवल्यम् इति ।
चित्ताचे उपादानभूत जे सत्त्व त्यातून रजस्तमोमल नाहीसे होत होत ते पूर्ण शुद्ध झाले आणि त्यामुळे त्याच्यात व पुरूषांत शुद्धिसाम्य झाले म्हणजे चित्ताच्या ठिकाणी कैवल्य सिद्ध होते.
॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे तृतीयो विभूतिपादः ॥
याप्रमाणे पातंजल योगदर्शनाचा तिसरा विभूतीपाद संपूर्ण झाला.
ही लेखमाला चार लेखांची लिहीलेली असून चारही लेखांचे दुवे खाली देत आहे.
लेखांक एकूण ४ पैकी १ ला http://www.maayboli.com/node/12263
लेखांक एकूण ४ पैकी २ रा http://www.maayboli.com/node/12291
लेखांक एकूण ४ पैकी ३ रा http://www.maayboli.com/node/12306
लेखांक एकूण ४ पैकी ४ था http://www.maayboli.com/node/12307
.
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
खूपच छान गोळे साहेब! लाख लाख
खूपच छान गोळे साहेब! लाख लाख धन्यवाद! मला या संबंधी पुस्तकाचे नाव सांगाल का?
बी, आनंद ॠषी यांचे 'पातंजल
बी, आनंद ॠषी यांचे 'पातंजल योगदर्शन' हे संग्राह्य पुस्तक आहे. ते ओशोंचे शिष्य आहेत म्हणून मी जरा बिचकत बिचकत वाचायला सुरुवात केली होती, पण कधी त्यात गुरफटून गेलो ते कळलेच नाही. पुस्तकात त्यांची ओशोंवरची श्रध्दा दिसून येते पण अतिरेक जराही नाही. त्यामुळे विवेचन मूळ सूत्रांना धरूनच आहे.
गोळे साहेब, माहिती खूपच छान आहे पण खूप त्रोटक वाटतेय. तुम्हाला महत्वाच्या वाटलेल्या सूत्रांवर जरा विस्ताराने लिहा ना. वाचायला खूपच आवडेल.
छान लिहिले आहे...
छान लिहिले आहे...
माझ्याकडे कोल्हटकरांच्या''
माझ्याकडे कोल्हटकरांच्या'' भारतीय मानसशास्त्र ''या ग्रंथाची पाचवी आवृत्ति आहे .मला हा ग्रंथ फारच
मार्गदर्शक वाटतो .तुमचा हा उपक्रम स्तुत्य आहे .पुढच्या लेखापासून जर पहिल्या सर्व लेखांच्या लिंक्स
देत गेलात तर वेळ मिळेल तेव्हा हवी ती सूत्र वाचायला आवडेल .तुमची खरच आभारी आहे .
बी, माधव, जागोमोहनप्यारे आणि
बी, माधव, जागोमोहनप्यारे आणि छाया देसाई, आपणा सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद. या लेखांतील चर्चाविषय स्वरूपाने गंभीर खराच, पण तो आपल्या दैदीप्यमान परंपरेचा तेजस्वी ज्ञानपुंज आहे. आपणा भारतीयांना त्याचे मूल्य समजून घेऊन आपले जीवन दीप्तीमान करता येईल. तुम्हा सर्वांना त्यातील चांगुलपणा जाणवला हीच आनंदाची गोष्ट आहे.
छायाताई, आपण म्हणता तसे दुवे आता सर्व लेखांतच दिसू शकतील. मालिका चार लेखांत, पतंजलिमुनीकृत सर्व १९५ योगसूत्रे उद्धृत करून आणि त्यांचा मला कळलेला अर्थ (कित्येकदा कोल्हटकरांच्याच शब्दांत) देऊन संपूर्ण केलेली आहे.
गीतेच्या ६९७ श्लोकांच्या मानाने ही १९५ योगसूत्रे कमी लोकप्रिय आहेत असे मला आढळून आलेले आहे. आपल्या संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा सर्व मराठी लोकांत लोकप्रिय व्हावा हीच सदिच्छा! कारण त्यायोगे आपणांस उन्नतीचा प्रकाशमान मार्ग सापडू शकेल असा मला विश्वास वाटतो.
मी कोल्ह्टकरांचे "भारतीय
मी कोल्ह्टकरांचे "भारतीय मानसशास्त्र '' संग्रही ठेवले आहे. याच बरोबर आपल्या लेखमालेचा चांगला उपयोग होईल. ज्याने योगसुत्रांचा अभ्यास केला आहे असा योगी पुण्यात कोणी आहे का? या १९५ सुत्रांचा क्रमाने अभ्यास करावा कि एखाद्या सुत्राची अनुभुती घेणे शक्य आहे ?
बापरे, केव्हडा अवघड विषय आहे
बापरे, केव्हडा अवघड विषय आहे हा!
नीटपणे छापुन घेऊन निवान्तपणे घरी वाचला पाहिजे
इथे हा विषय मान्डल्याबद्दल आभार!
खुपच महत्वाचा विषय आणि सुंदर
खुपच महत्वाचा विषय आणि सुंदर विवेचन.
३२. मूर्धज्योतिषि
३२. मूर्धज्योतिषि सिद्धदर्शनम् ।
मूर्धज्योतिच्या ठिकाणी संयम केला असता सिद्ध पुरूषांचे दर्शन होते.
यामध्ये मूर्धज्योत म्हणजे काय ?
गोळेसाहेब, उत्तम विषय व लेख!
गोळेसाहेब, उत्तम विषय व लेख! प्रत्येक सूत्र व त्याच्या विवरणाबद्दल एक मोठा लेख होऊ शकेल.
नितीन, मी कोल्ह्टकरांचे
नितीन,
मी कोल्ह्टकरांचे "भारतीय मानसशास्त्र '' संग्रही ठेवले आहे. याच बरोबर आपल्या लेखमालेचा चांगला उपयोग होईल. ज्याने योगसुत्रांचा अभ्यास केला आहे असा योगी पुण्यात कोणी आहे का? या १९५ सुत्रांचा क्रमाने अभ्यास करावा कि एखाद्या सुत्राची अनुभुती घेणे शक्य आहे ?>>
अभिप्रायार्थ धन्यवाद. पुण्यात योगसूत्रांचा अभ्यास केलेले असे अनेक लोक असतील. आपणच शोध घ्यावा.
क्रमाने अभ्यास केला तरच कळू शकेल अशीच सूत्रांची रचना आहे. तेव्हा तसेच करावे.
लिंबूटिंबू, अभिप्रायार्थ धन्यवाद.
हा विषय गहन असून लिंबूटिंबूंना समजेल अशी अपेक्षा नाही. तरीही आपल्या साधनाक्षमतेनुरूप आपण अभ्यासू शकता.
मुटेसाहेब, आपणासही अभिप्रायार्थ अनेक धन्यवाद.
सुनिता, अभिप्रायार्थ अनेक धन्यवाद.
३२. मूर्धज्योतिषि सिद्धदर्शनम् ।
मूर्धज्योतिच्या ठिकाणी संयम केला असता सिद्ध पुरूषांचे दर्शन होते. यामध्ये मूर्धज्योत म्हणजे काय ?>>
मस्तकाच्या वरच्या बाजूला आणि कपाळाच्या मागच्या बाजूला जे छिद्र आहे त्यास ब्रह्मरंध्र असे म्हणतात. इथेच सुषुम्नेचा योग होत असल्याने त्यामुळेच मनुष्याभोवती तेजोवलय जाणवते. या तेजोवलयासच मूर्धज्योत म्हटलेले आहे. तिच्यावर संयम केला असता ती ज्योत नीट ओळखता येते आणि मग तिच्या साहाय्याने तेजोमय शरीरे धारण करून संचार करणार्या सिद्ध पुरूषांचे दर्शन साधकाला होऊ शकते.
श्री गोळेसाहेब, आपले अनुभव
श्री गोळेसाहेब,
आपले अनुभव सांगावे हि विनंती.
खूप छान!
खूप छान!