काला जामून

Submitted by दिनेश. on 25 January, 2010 - 16:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाव किलो खवा (गुलाबजामचा वेगळा मिळतो तो ), १५० ग्रॅम पनीर, एक टेबलस्पून अरारुट पावडर, दोन टेबलस्पून साखर. वासासाठी वेलची पावडर. दहाबारा पिस्ते किंवा काजूचे तूकडे (ऐच्छिक) , दूध
पाकासाठी ३ कप साखर.
तळण्यासाठी तूप

क्रमवार पाककृती: 

खवा मोकळा करुन थोडावेळ पंख्याखाली ठेवा (म्हणजे तो मोकळा होतो ) पनीर कुस्करुन घ्या त्यात दोन टेबलस्पून साखर घाला. मग त्यात खवा मिसळा, व एकजीव मळून घ्या. मळताना अरारूट पावडर घाला. मिश्रण अगदी एकजीव झाले पाहिजे. मिश्रण कोरडे वाटले तर थोडे दूध घाला. पाण्यात भिजवून घट्ट पिळलेल्या कपड्याने मिश्रण झाकून ठेवा. वापरत असाल तर पिस्ते वा काजू दूधात भिजत घाला.
साखरेत पाणी घालून एकतारी पाक करा ( याबाबतीत मी सविस्तर लिहिले आहे ) पाक कोमट राहील असे पहा.
मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करुन घ्या. (वापरत असाल तर आत पिस्ता वा काजू ठेवा ) तूप तापवा. गॅस बंद करा. गोळे सोडा, ते वर आले कि परत कढई गॅसवर ठेवा. मध्यम आचेवर झार्‍याने अलगद फिरवत, काळसर रंगावर तळून घ्या. (मिश्रणात साखर असल्याने, ते लवकर लाल होतात. ) पण जळू देऊ नका. गोळे फार लहान केले तर आत जळतात.
मग ते पाकात सोडा. चांगले मूरले कि ताटात पसरुन ठेवा. हे जामून पाकात न देता, कोरडेच देतात.
बरोबर व्हॅनिला आईस्क्रीम असेल तर मस्त बेत जमतो.

वाढणी/प्रमाण: 
दहा ते बारा जामून होतील.
अधिक टिपा: 

हे जमायला थोडेफार कौशल्य हवे. आधी कमी प्रमाणात करुन बघा.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृती भारी वाटतेय, आधी अगोच्या कृतीचे गुलाबजाम करणं पेंडीग आहेत.. ते झालं करुन की ह्यांच्याकडे (काला जामुन कडे) बघेन...

हो नानबा, आणि ते ही(काला जाम) बिघडले तर हे आहेच. Happy ह. घ्या.

तू बिंधास करून तुझा अनुभव मलाही सांग कारण मी गोड खाणे कमी केलेय. Happy

दिनेश, मी काल रात्री केले. आता माझ्या शंकांची उत्तरे द्यायला तयार व्हा Happy

१. पहिल्यांदा तुम्ही दिलेत तेच प्रमाण वापरले. खवा अर्थातच गुलाबजामचा नव्हता तर गावाहुन आलेला घरी बनवलेला ताजा खवा होता. आणल्यावर मी फ्रिजमध्ये ठेवला होता. गुजा करताना फॅनखाली ठेवला थोडा मोकळा करुन. तसा खुप ओलसर वगैरे नव्हता. (दोन महिन्या पुर्वी घरच्या खव्याचे केले होते ते घट्ट झाले होते, म्हणुन जुन्या माबोवर तुम्ही लिहिल्याप्रमाणे १/२ चमचा बे.पावडर घातली)

२. पनिर विकतचे आणुन घातले.

३. प्रमाण सगळे तसेच घेतले आणि मग एकत्र करुन मळले. उगाच हाताने रगडत बसायची सवय म्हणुन ब्लेंडरने मळले. (जुन्या माबोवर वाचलेले गुजा चे पिठ जास्त रगडु नका म्हणुन)

४. नीट एकजीव झाले होते पण पोळ्यांच्या पिठाचा जसा गोळा दिसतो तसा दिसत नव्हता. अगदीच भजी पिठ नाही पण पोळ्यांपेक्षा थोडे पातळ असे झाले. पण हाताला तुप लावुन गोळा बनत होता.

५. तासभर झाकुन ठेवले आणि मग तेल मंदाग्निवर तापवुन हळून जरासे पिठ टाकले तर लगेच विरघळले. मग दिड चमचा थोडा मैदा टाकला, तरी विरघळतच होते, अजुन दिड टाकला, तेव्हा मळलेले पिठ आपल्या पुरणपोळीच्या पिठासारखे दिसायला लागले आणि जामुन विरघळायचे बंद झाले.

६. गोळे मी गोलच केले होते पण तेलात टाकल्यावर जरा नरम झाल्यासारखे वाटले. एक पापुद्रा दिसत होता. पुर्णपणे मंदाग्निवर तळले पण आकार बदलला. गोल ऐवजी पॅटिससारखा आकार आला.

७. मी खाल्ले नाहीत पण चवीला खुप चांगले झाले असा अभिप्राय आला पण माझे काही समाधान नाही, कारण ते दिसायला पॅटिससारखे दिसत होते.

तर आता सांगा कुठे काय चुकले, काय करायला हवे आणि काय करायला नको.
(गावच्या म्हैसबाईंचे नुकतेच बाळंतपण झाल्यामुळे गावाहुन खवा येत राहतो आणि मी एकदा त्याचे गुजा करुन खायला घातल्यामुळे आता नेहमीचेच ते काम माझ्या गळ्यात पडलेय Happy )

तू पिठ मळलेस का खूप ज्यास्त? कारण काय होते पनीर व खोवा पण तेल सोडते मग एकदम गरम तेलात घातले की विरघळते. दुसरे म्हणजे हाताला तूप लावायची गरज नाही.
१. तेल खूप गरम नाही पण एक गोळी टाकून पहायचे की १-२ मिनीटे लागून वर आलाय कि योग्य तापमान आहे समजायचे.
२. तूप लावायचे नाही.
३. पिठ जरा घट्टच पाहिजे पण कडक नाही.
(दिनेश तुमच्या आधी घूसून सांगितले,सॉरी).. Happy

मी फक्त पनीर व माव्यात लागेल तेवढेच हेवी क्रीम टाकून जरासा मैदा व बेपॉ टाकते व हाताने जरासे मळून घेते.
मग आत एक साखरेचा दाणा ठेवून गोळी वळते. पुर्ण साखर नाही टाकत.

अगं मी गोळा होतो का ते पाहायला तुप लावुन पाहिले, कारण पिठ एकदम घट्ट दिसत नव्हते. बाकिचे गोळॅ असेच केले, तुप न लावता. पिठ घट्ट व्हायला त्यात मग मैदा घालावाच लागतो ना, कारण ते दोन चमचे वगैरे घालुन काही होत नाही बहुतेक..

एनी वे, दिनेश सांगतिलच.. माझ्यावर गुजा करायचा प्रसंग हल्ली वारंवार यायला लागलाय त्यामुळे ते चांगलेच जमायला पाहिजेत हा ध्यास मी घेतलाय....

कदाचित मी पिठ जास्त मळले असेन.. तरी हाताने न मळता ब्लेंडर वापरला. Sad

ते गुजामावशीला हाक मारल्यावानी वाट्टय!

हाहा.... मला टायपायचा कंटाळाय्य्य्य्य

हो साधना, मनस्विनी ने सांगितल्या प्रमाणे, साधारण खवा मळताना, अलगद हाताने मळायचे असते.
खवा तर तूप सोडू लागला, तर ते तुप काढून टाकावे लागते (कपड्यात गूंडाळून )
पनीरही ओलसर होते का ? सहसा बाजारचे पनीर ओलसर नसते.
भज्याच्या पिठात जर मोहन जास्त झाले, तर भजी विरघळतात, तसेच झाले. तळणीत पदार्थ विरघळला वा पसरला म्हणजे त्यात पाणी वा तेल जास्त झाले. इथे मैद्याच्या जागी, मिल्क पावडर, किंचीत भाजून घालायला हवी होती. एनीहाऊ, चव चांगली आली होती ना, मग आणखी काय पाहिजे ?

मला चव जमलीये, आता ते आकाराचे जमले की बस्स्स्स्स्स्स्स.... गुलाबजामचे दुकानच टाकते.. Proud

(....भज्याच्या पिठात जर मोहन जास्त झाले, तर भजी विरघळतात, तसेच झाले. तळणीत पदार्थ विरघळला वा पसरला म्हणजे त्यात पाणी वा तेल जास्त झाले. इथे मैद्याच्या जागी, मिल्क पावडर, किंचीत भाजून घालायला हवी होती....)

.... मिल्क पावडर, किंचीत भाजून घालायला हवी .....

हि टीप एकदम छानच....आणी उपयुक्त...