चिकन बिर्यानि

Submitted by दिनेश. on 19 January, 2010 - 15:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

पाऊण किलो चिकन, (नुसते लेग पीसेस घेतले तरी चालतील), तेल वा तूप

स्टॉकसाठी : चिकनमधले टाकाऊ भाग जसे मान, प्ंखाची टोके, स्कीन वगैरे
एखादे तमालपत्र, दोनचार मिरिदाणे, दोन कप भाज्यांचे भाग (यात बटाट्याच्या
साली, फ़्लॉवर कोबीचा मधला दांडा, मटाराच्या साली, कोथिंबीरीची वा पालेभाजीची
देठे, गाजर, दुधी, नवलकोल सारख्या भाज्यांचे तूकडे वगैरे )

मुरवण्यासाठी : १. दोन टेबलस्पून आले लसुण हिरवी मिरची पेस्ट, एक कप आंबट दही
एक टीस्पून् हळद व थोडा हिंग व मीठ.
२. चार हिरव्या वेलच्या, एका बड्या वेलचीचे दाणे, आठ दहा मिरीदाणे, एक इंच दालचिनी,
एक लवंग, एक टिस्पून जिरे, दोन टिस्पून धणे, एक टिस्पून् बडीशेप, दोन टिस्पून खसखस,
हे सर्व गरम करुन त्याची बारीक पूड करुन. त्यात दोन टिस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे
कमीजास्त ) मिसळून.

भातासाठी : दोन कप बासमति तांदूळ, तीन मोठे कांदे उभे चिरून, फ़ोडणीला खडा मसाला
( अख्या सुक्या काश्मिरी मिरच्या, तमालपत्र, वेलची, दालचिनी वगैरे ) मीठ

साजवटीसाठी : चार अंडी घट्ट उकडून, दोन हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर व बटर वा तूप.
मीठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम चिकन साफ़ करुन घ्या हवे तसे तूकडे करुन घ्या. एक नंबरचे मुरवण चोळून् अर्धा
तास ठेवा.
चिकनमधले काढलेले भाग, व स्टॉकसाठी दिलेले जिन्नस एकत्र करुन त्यात सहा कप पाणी
घाला. सर्व कूकरमधे दहा मिनिटे शिजवा. कूकर उघडून थोडेसेच घोटा. व पाणी गाळून घ्या.
वर चरबी जमली असेल तर काढून टाका.
मग चिकनला २ नंबरचा मसाला लावून घ्या.
तांदूळ धुवून निथळत ठेवा.
एका जाड बुडाच्या पातेल्यात कांदा तळून सोनेरी कुरकुरीत करुन घ्या. (त्यावर थोडेसे मीठ व
साखर घातल्यास तो लवकर सोनेरी होतो. ) तो बाहेर काढा व त्यात पातेल्यात चिकन परतून
घ्या. झाकण ठेवून चिकन पूर्णपणे शिजवून घ्या. (यासाठी प्रेशर पॅन वापरले तर चांगले )
चिकन शिजले कि त्यात, तळलेल्या कांद्यापैकी बराचसा कांदा कुस्करून घाला. व ते बाजूला ठेवा.
(आवडत असेल तर चिकनमधे शिजताना अर्धा कप टोमॅटो प्युरी घाला, व तेल सुटेपर्यंत शिजवा )

खड्या मसाल्याची फ़ोडणी करुन, त्यात मोजून चार कप तयार केलेला स्टॉक घाला. स्टॉकला उकळी
आली कि त्यात् तांदूळ वैरा. अधून मधून ढवळत तो शिजवा. लागलाच तर शिजण्यापूरता आणखी
स्टॉक घाला. तांदूळ थोडी कणी राहील असाच शिजवा. (आवडत असल्यास र्ंगासाठी भातात थोडी
हळद् घाला. वेळ आणि हौस असेल तर अर्धा भातच पिवळा करा. )

आता चिकनवर तो अलगद पसरा. दोनरंगी असेल तर त्याचे थर द्या. त्यावर उरलेला कांदा पसरा
अगदी मंद आचेवर आठ दहा मिनिटे ठेवा. भांड्याखाली तवा ठेवला, तर चांगले.

उकडलेली अंडी जाड्या किसणीने किसून् त्याचा चूरा करून् घ्या. हिरव्या मिरच्या अगदी बारीक
चिरुन घ्या. बटर गरम करुन त्यावर मिरच्या परतुन घ्या. त्यावर अंड्याचा चुरा व मीठ घाला.
आच बंद करुन कोथिंबीर घाला. सगळे हलक्या हाताने मिसळा. तयार बिर्यानिवर वाढण्यापूर्वी
हे मिश्रण पसरा.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

खास निकिताच्या विनंतिला मान देऊन.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank you Happy

दिनेश, मस्त आहे कृती.... मी ही करुन मग सांगते तुम्हाला.. ते शेवटचे अंड्याचे एकदम भारी.. माझ्या घरात ते नुसते पण दोन मिनिटात फस्त होईल...

आभार निबंध. मी लिहायचे विसरलो, पण साधनाने सुचवले त्या प्रमाणे, हे तिनही पदार्थ (चिकन, भात आणि अंडे, )स्वतंत्ररित्या खाता येतात.