स्वतःच्या अटींवर जगलेला अवलिया साहित्यिक: चंद्रकांत खोत
***
भोलाराम, लखपती, आसरा, जोकर.
जोरदार, जयशंभो, चक्रम, जयजयकार.
चँपियन, अनाडी, मास्टर.
शालिमार, खजाना, सनडेली, रिपोर्टर.
ही नावं आहेत- 'उभयान्वयी अव्यय' नावाच्या कादंबरीतला दिनकर नावाचा सहनायक खेळत असलेल्या लॉटर्यांची. या कादंबरीच्या लेखकाच्या वाट्यालाही जवळजवळ अशाच शब्दांत मांडता येईल, अशा तर्हेचं आयुष्य आलं. खरंतर ते त्याने स्वतःच निवडलं. रुळलेल्या वाटांशी उभा दावा मांडत अचाट आणि रूढ परिघाबाहेरचं लिहित आणि करत निघालेला हा एक मराठी लेखक.
नाव- चंद्रकांत खोत.
दृष्ट लागावं इतकं देखणं रूप लाभलेल्या या माणसाने प्रतिभेची वीज कोसळवून घेऊन आयुष्यात एकच कवितासंग्रह लिहिला, तीनच कादंबर्या आणि एक आकडीच कथा लिहिल्या. संपादनही ठळकपणे नोंद करता येईल असं एकाच अंकाचं केलं आणि मराठी साहित्य-संपादनाच्या इतिहासात तो अमर होऊन बसला. संपूर्ण आयुष्यभर गुढत्वाचं धुकं लेवून बसलेल्या या माणसाच्या उल्लेखाशिवाय श्लील-अश्लील साहित्यासंदर्भातलं बोलणं लिहिणं अपुरं राहील. साक्षेपी, कष्टाळू आणि तल्लख संपादकांची मांदियाळी समृद्ध होणार नाही आणि अध्यात्मिक व्यक्तीचरित्रकारांची गणतीही पूर्ण होणार नाही. या तीन गोष्टींतल्या एकातच मुशाफिरी करावी, तर त्यासाठी मोठमोठ्या प्रतिभावंतांना जन्म घालवावा लागतो पण या अतरंगी माणसाला एकच जन्म पुरला; आणि या जन्मातही 'मला आणखी खूप जगायचं आहे' असं म्हणत मी आणखी काय करू शकतो ते बघाच- असं जणू आपल्या खाशा स्टायलीत सांगितलंही. 'मुळात मी एक चमत्कारिक मनुष्य असल्याने चमत्कारिक साहित्यिकही आहे' असं ठासून सांगणारे खोत किती खरे, नैतिक, प्रामाणिक होते हे त्यांच्या आयुष्याने घेतलेल्या असंख्य चमत्कारिक घटना-वळणांनी पुढे सिद्धच केलं.
***
देखणा साहित्यिक
"चंद्रकांत खोत, त्याच्या आणि आमच्या अनेक भुमिकांमधले मतभेद गृहित धरूनही नेहमीच आमच्यातला एक म्हणून वावरत आला, आणि तरीही यात एक खोच आहेच. ती अशी मी भाऊ पाध्ये, रघु दंडवते, भालचंद्र नेमाडे, अशोक शहाणे या आमच्यातल्या ज्येष्ठ मित्रांना एकेरी उल्लेखाने हाकारू शकलो. पण आजतागायत चंद्रकांत खोत या आमच्या प्रदीर्घ काळातल्या मित्राला एकेरी संबोधनाने हाक देणे कसे काय कोण जाणे, पण जमलेच नाही.." (सतीश काळसेकर, प्रस्तावना, 'निवडक अबकडई')
जबरदस्त देखणं, राजबिंंडं रूप लाभलेल्या या माणसाचा मित्रांंमधलाही वावर असा दबावदार राहिला होता. गोरापान रंग, रेखीव भुवया, पाणीदार डोळे, धारदार नाक, कडक पठाणी वेष, मेंदी केलेले केस आणि दाढी, डोळ्यांत सुरमा, डोक्यावर मौलाना फर कॅप असं खास व्यक्तिमत्त्व घेऊन ते मित्रांत, आणि एकंदरच आपल्या साहित्यिक वर्तुळांत फिरत. या वर्तुळांच्या बाहेरही त्यांच्या या आबदार पहनावा आणि अंदाजा-ढंगाने लोकांना दडपण येई आणि "कोण आहेत हे" असं नजर खिळवून बायका विचारत ते उगाच नाही. खोतांनी मात्र आपल्या असण्यावर आणि एकंदरच आयुष्यावर चढवून घेतलेली पुटे-पापुद्रे उघड करून कुणाला फार दाखवले नाहीत.
"..तो मॉडर्न मिल्स कंपाऊंडच्या बैठ्या चाळीत, पूर्णतः गिरणगावातच राहत होता. घरात आणि शेजारात अस्सल मालवण त्याच्यासोबत होते, पण तरीही तो त्यांच्यापासून काहीसा दूरस्थ असावा असा मला सतत भास व्हायचा. तो आपली वेगळी प्रतिमा जोपास्त होता. त्याच्या घरी जावे तर त्यांच्या ओळखीही तो करून देत नव्हता. बैठ्या चाळीच्या पडवीत जाळीच्या पार्टिशनने आपले एक स्वतंत्र खुराडेच त्याने तयार केले होते. तिथे त्याची पुस्तके, मासिकांचे अंक आणि चटईवरची निद्रा असे वेगळेच जग होते. एका अंगाने भवतालाच राहून त्याशी फटकून वागणेच.." असं सतीश काळसेकर वर उल्लेख केलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, आणि खोत याच ग्रहावर आपलं एक वेगळं प्लॅनेटोरियम करून राहत होते- हे पटतं.
लिटल मॅगॅझिन, अर्थात लघुनियतकालिकांच्या चळवळीतल्या शहाणे, खोत, नेमाडे, ढाले, ओक, लचके, नेरुरकर, काळसेकर, दंडवते, पाध्ये, परब, गुर्जर या बंडाचा पवित्रा घेतलेल्या शिलेदारांच्या साथीतल्या वाटचालीत नामदेव ढसाळ त्या मानाने उशिरा आले. ढसाळ म्हणतात 'खोत आमचा हिरो होता. त्याच्या चाळीतल्या खोलीतला तो त्याचा कोपरा, टापटीपीने मांडलेली पुस्तकं, मासिकं, ट्रंका- यामुळे तो संपृक्त वाटायचा. त्याचं व्यक्तिमत्त्व हे त्याच्या दाढीइतकंच जटिल आणि थांग न लागणार्या डोळ्यांइतकंच गहन होतं.' ('नामदेव कानामागून आला आणि तिखट झाला' असं खोत म्हणत).
या मोहिनी घालणार्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनी एका सुप्रसिद्ध सिनेमानटीला पडली आणि खोतांचं आयुष्य रहाडपाळणा होऊन बसलं. पण ते फार नंतर. त्याआधी लोकांनी डोळे मोठे करून तोंडात बोटं घालावी असं या अतरंगी माणसाचं एक प्रपाती लेखक आणि संपादक म्हणून कर्तृत्व दिसायचं होतं..
***
'मर्तिक' ते 'विषयांतर' व्हाया 'उभयान्वयी अव्यय'
रस्त्यांवर रस्त्यांची रस्तेशाही
रस्त्यावरली बहीण आणि रस्त्यावरली आई
रस्ते फक्त रस्त्यांनाच मिळतात
रस्त्यांचे पाय असतात उलटे
रस्ते फुटपाथवरली स्वप्ने पाहतात
रस्त्यांना जाळतात दिव्यांचे खांब
रस्ते मरत नसतात
रस्ते अमिबा असतात....
दक्षिण गिरगावातल्या सातरस्ता- इथं खोत जवळजवळ आयुष्यभर राहिले. अजब व्यक्तिमत्त्व असलेले हे रस्ते, त्यांचं चलनवलन, त्यांची लैंगिकता, नैतिकता, सभ्यता-संस्कृती, अपरिहार्यता, त्यांचे प्राधान्यक्रम यांची खोतांना आयुष्यभर भुरळ पडली. हे रस्ते, हा इलाका आणि त्याचंच रूपडं आणि प्राक्तन लाभलेली माणसं त्यांना खुणावत राहिली. नागपाडा, आग्रीपाडा, महालक्ष्मी, चिंचपोकळी, आर्थर रोड इकडे जातात हे सातरस्ते; आणि अशाच सातहजार प्रकारच्या माणसांची आयुष्यं आपल्या कवेत घेतात. त्यांना झुंजवतात, जोजवतात आणि कोडीही घालतात. या इथल्या पात्रांच्या नैतिक आणि लैंगिक पेचांना सोडवण्याचा आव न आणता त्यांनी ते सारं खुलेपणाने, प्रामाणिकपणे त्यांच्या कविता-कथा-कादंबर्यांत मांडलं. मुंबईतल्या कामगार वस्त्यांचं आगर असलेला हा परिसर, चाळजीवन, बकाली आणि त्यात निष्ठेने जगणारे लोक- हे सारंच खोतांच्या साहित्यात आलं आहे. भाऊ पाध्यांच्या (आणि श्रीकांत सिनकरांच्याही) साहित्यापेक्षा नि शैलीपेक्षा ही जातकुळी निराळी होती.
विसावं शतक दोन तृतियांश उलटून जावं लागलं आपल्या साहित्यातल्या कल्पनांचा कस लागायला. या काळातल्या तरुण लेखक-कवींनी त्याआधीचा स्वप्नवाद, आदर्शवाद, रोमँटिसिझम हा 'तद्दन भंपकपणा' म्हणून उलथून टाकला. सारे निकष उधळून लावले, आणि सार्या सीमाही पार केल्या. आधीचं साहित्य, साहित्यकार, समीक्षक आणि या सार्यांच्या कल्पना-नितीनियम-निकष यांना जबरदस्त तडाखे दिले. लैंगिकतेची 'झाकपाक' सपशेल अमान्य केली. नीतीवाद, श्लीलवाद हे सारं झूठ असून लैंगिकता हेच मुख्य सूत्र आहे, कारण ते टाळून आयुष्याकडे तुम्ही बघू शकत नाही- असं उच्चरवाने याच लोकांनी सांगायला सुरुवात केली. याच काळाचं वर्णन खोतांसारख्या बंडखोरांनी त्यांच्या लहेजात नसतं केलं तरच नवल होतं..
एकविसावं शतक फाकवून बसलंय
मी हात घालून बघतो आरपार
उगवत्या सूर्याची
कोवळी किरणं...
लघुअनियतकालिकांच्याच चळवळीतल्या मनोहर ओकांसारख्या अस्मानी प्रतिभेचं वरदान मिळालेल्या कवीचा पगडाही खोतांवर होता- असं जयंत पवारांसारखे ते वातावरण साक्षात जगलेले लोक सांगतात. खोतांच्या प्रतिमांतला जोर, आवेग आणि शब्दयोजना बघता हे लक्षात येतंच. 'बिनधास्त' कादंबरीत खोत काय पद्यसदृश गद्यरचना करतात ते पाहा-
"माझं जग नखाएवढं आहे खरं. म्हणून मी काय आभाळभर जाळं टाकून बसू नये? रातकिड्यांनी वार्षिक वर्गणी भरली नाही म्हणून जंगलचं मुखपत्र त्यांच्या नावावर पोस्ट होत नाही की काय??"
"उंच माणसांचे रफार फार झालेत. साले हे रफार नाकातल्या नथीत गरोदर राहतात. किसलेले क्रियापद नि करपलेला कर्ता."
'बिनधास्त' कादंबरी ही हस्तमैथुनाचा नाद लागलेल्या आणि त्यातच आपलं अस्तित्त्व पाहणार्या 'बाबुराव' नावाच्या नायकाची कथा आहे. तसं तर यात रुढार्थाने 'कथा' अशी काहीच नाही. सरळसरळ 'लैंगिक' आणि 'अश्लील' वाटणार्या या कादंबरीची पात्रे कशी नैतिक आहेत हेच त्यांनी आपल्या प्रतिमा आणि काव्याम शैलीचा अतिशय परिणामकारक वापर करून सांगितलं आहे.
दळदार डोळ्यांचे कलंदर इतिहास
सर्वत्र अस्ताव्यस्त माझ्या शरीरभर
मी माझ्या छातीवर गोंदल्यात
सस्तन गटारी अमावस्या
श्वास उच्छवास एक नाकेले हस्तमैथुन
जांघांच्या आसपास फोफावलेत
कटेल्या बुल्ल्यांचे तह करारनामे
'उभयान्वयी अव्यय'चा नायक रुबाबदार, देखणा; तर 'बिनधास्त' मधला नायक बुटका, कुरूप. पण अतिशय मनस्वी. सेक्स वाट्याला न आलेल्या या नायकाच्या कथेत इतक्या 'सेक्सविषयक' घटना घडतात, की तो अक्षरशः छिन्नविछिन्न होऊन जातो. त्याचं कवीमन तरीही जागंच असतं, मात्र बंडाचा पवित्रा तोच. जगावेगळ्या प्रतिमांचा घाट घालत चंद्रकांत खोत अशा असंख्य बाबुरावांना अवकाश देतात, जागा देतात.
डोळ्यांत तू सुरेखसं काजळ घालायचीस
काजळाच्या फासात डोळे सुळावर चढतात
तुझ्या श्वासात मला एक अनामिक गंध जाणवायचा
श्वासातून परतवता येतात उच्छवासाच्या पोळ्या
लैंगिकतेचा गुंता सोडवण्याचा अथक प्रयत्नात असलेला बाबुराव प्रत्यक्ष आयुष्यात, व्यवहारात फारच निर्लेप असा आहे. आईच्या बाहेरच्या संबंधावरून भाऊ 'खून करीन' म्हणतो, याला त्याचं उत्तर आहे- 'खून करणंच काय, पण काहीच वाईट नाही या जगात. जगात अश्लील वगैरेही काही नसतं. श्लील सुद्धा नसतं. असतं ते एक नग्न सत्य, जे पाहिल्यावर तुमच्या आत्म्याला झाकण्याचा प्रयत्न करता तुम्ही.' बाबुरावच नव्हे तर खोतांच्या सर्वच नायक-नायिकांमध्ये ही एक प्रकारची अलिप्त, साक्षेपी आणि प्रामाणिक अशी 'नैतिकता' सापडते.
'उभयान्वयी अव्यय' ही नावाइतकीच अगाध कथा. जिगोलो, म्हणजे पुरुषवेश्या- असा विषय हाताळणारी पहिली कादंबरी. शिवाय मानलेल्या का होईना, बहीण-भावाच्या प्रेमातलं लैंगिक आकर्षण- जे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी जाणवतंच. पण हे कथात्म साहित्यात कुणी लिहून दाखवण्याचं धार्ष्ट्य अजून दाखवलं नव्हतं. या कथेत नायक धरून चार मुख्य पात्रं आहेत. दोन पुरुष, आणि दोन स्त्रिया. हे लोक आयुष्याच्या पटावर कसेही भिरकावून दिले जात असताना ते अवचित एकमेकांना भेटत जातात आणि त्यांच्यात अनामिक असे घट्ट बंध तयार होतात. या लोकांच्या नात्यांच्या आणि शरीराच्या 'उपयोगितेच्या' व्याख्या सर्वसामान्य पांढरपेशा चौकटीत बसणार्या नाहीत- एवढं कारण कादंबरीवरून गदारोळ उठवायला पुरेसं होतं. अत्यंत प्रामाणिकपणे आपापली 'नैतिकता' घेऊन जगणारी ही पात्रे इतर कुठच्याही सर्वसामान्य व्यक्तीसारखंच अधःपतनाला शरण जातात, पडतात, उठतात, नव्याने चालू लागतात आणि मुंबईच्या रस्त्यांवरचं आपापलं जगणं एक प्रकारच्या निष्ठेने पार पाडतात.
'बिनधास्त' मध्ये अचाट कविता येतात तसं; 'उभयान्वयी अव्यय' मध्ये एखाद्या पार्श्वसंगीतासारखं, एक प्रकारच्या वेदनेचा अंडरकरंट असलेलं 'तत्त्वज्ञान' खोत पेरत राहतात. ते पाठीमागे वाजत राहत, अस्तित्त्व दाखवत राहतं, भळभळत्या जखमेसारखं हळुहळू वाहत राहतं, आणि आपण अस्वस्थ होत राहतो. इथं मग कथानक आणि नॅरेशन महत्वाचं राहत नाही. खोत आपल्याला काहीतरी वेगळंच उच्चरवाने सांगू पाहत आहेत, हे लक्षात येतं आणि आपण खोतांनी तयार केलेल्या कृष्णविवरांत अपरिहार्यपणे खेचले जातो. खोत आपल्याला ताब्यात घेतात ते असं.
"अनेकांच्या मोठेपणाचं भांडवल इतकंच असतं, की त्यांना आपापल्या आईबापांची नावं सांगता येतात."
"सत्यालाच विजय मिळतो असं नाही तर ज्याला विजय मिळतो, तेच सत्य ठरतं."
"सृष्टीच्या आरंभी मॅटर होती. मॅटरने डेव्हिलला जन्म दिला. या डेव्हिलपासून गॉड उत्पन्न झाला. प्रथम गॉडचा अंत झाला, नंतर डेव्हिलचा."
"मी माझ्या एका कवितेत लिहिलंय- 'God is the best model of nude'. मी आता कपडे चढवून बसलोय, पण मी नागडा आहे. ईश्वरासारखा."
'विषयांतर' ही कादंबरीही अशीच. 'फ्री सेक्स' ही कल्पना मांडणारी. आता जे लपूनछपुन का होईना आधीच समाजात, भवतालात आहे- त्यात आणखी काय नवीन क्रांतिकारी मांडणार असा प्रश्न आता २१व्या शतकात आपल्याला पडेलच. मात्र पन्नास वर्षांपुर्वी ही परिस्थिती नव्हती. हा असा कंटेंट आणि ते लिहिणारे- यांवर संस्कृतीरक्षक तुटून पडत होते. (आताही तसे संस्कृतीचा ठेका घेतलेले आहेतच. मात्र त्यांचा साहित्याशी काही संबंध नाही). पुस्तकं बहिष्कृत होत होती. नाटकांचे खेळ बंद पडत होते. खटले भरले जात होते. मात्र यामुळेच या नव्याने जाणीवा लिहून दाखवणार्या या तरुणांना चेव येत होता. सारंग, नगरकर, पाध्ये, नेमाडे, काळसेकर, तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार, आळेकर, चित्रे, शेळके यांच्या या बंडखोर काफिल्यात खोतही सहभागी झाले.
'उभयान्वयी अव्यय' च्या प्रस्तावनेत जयंत पवार म्हणतात, 'शहरातल्या औद्योगिकरणाने लादलेलं कप्पेबाज जीवन, गुंतागुंत आणि या सार्यातून आलेली तुटकता खोतांच्या तिन्ही कादंबर्यांतून दिसते. वास्तव सलगपणे बघू न शकणं किंवा अनुभवांची एकसंधता न साधू शकणं हेच महानगरी लेखकाचं वास्तव आहे. खोत त्याशी प्रामाणिक राहतात. त्यांच्या कथा कथानकप्रधान नाहीत, 'मौज स्कूल' सारख्या रीतीवादी, तपशीलवादी नाहीत. मानवी मनाचा तळबीळ धुंडाळण्याची पैज त्यांनी घेतलेली नाही. त्या वास्तवाशी नाळ राखून आहेत, पण त्यातली असंगतता, अतर्क्यता जशी आहे तशी स्वीकारतात. अंतःसूत्र पक्कं असलं तरी त्या विस्कळितपणे व्यक्त होतात.. 'उभयान्वयी अव्यय' आणि 'विषयांतर' मध्ये असलेली असंबद्धता 'बिनधास्त' मध्ये वाढते. जणू अनुभवांचं अराजकच खोत निर्माण करतात. त्यामुळे आधुनिकवाद्यांच्या काळात लिहिणारे खोत मला उत्तराधुनिकतावादी वाटतात..'
'बंडखोरी विध्वंसात असते, त्याहीपेक्षा आधिक मात्रेने निर्माणात असते' असं मानणार्या खोतांनी आपल्या पहिल्या कवितासंग्रहाचं नाव 'मर्तिक' ठेवलं. ते म्हणतात, 'स्वप्न, गंध, पुष्प, नभ, खग अशांच्या सदैव मिठीत असलेली मराठी कवितासंग्रहांची नावं पाहिली, तर माझ्या संग्रहाचं नाव हीच पहिली बंडखोरी ठरेल असं मला वाटलं.'
अनाकलनीय श्वासांचे कोसळते उत्पात
तू तुझ्यात सामावून गहिवरतेस
डाबक डबक डोळ्यांचे अनावर
आवर्त सतत दिठीसमोर सामोरे
प्रत्यहीन निखळ शब्दांची ओझी
डोळ्यांच्या कडांना लटकून..
‘मर्तिक’ ची अर्पण पत्रिका ‘तुकारामाच्या सगळ्या ‘अश्लील’ शब्दांस-’ अशी आहे. यामधली रेखाटनं केली होती षांताराम पवार, राजा ढाले, वसंत आबाजी डहाके, प्रदीप नेरूरकर याच समकालीन समविचारी मित्रांनी. 'मर्तिक'च्या मलपृष्ठावर वसंत गुर्जर म्हणतात, 'हा कवी म्हणजे साला एक गुढच. एखाद्या हेमिंग्वेसारखा दिसतो. गोरागोरापान. याला पाहिल्यावर कुणाला खरं वाटणार नाही की याने आजवरचं आयुष्य मुंबईतल्या कामगारवस्तीत घालवली आहेत. गिरणी कामगार याला रामराम करतो. गल्लीतले मवाली याला सलाम करतात. फोर्टमधल्या पॉश दुकानाचा मालक स्वतः धावत येऊन याचं स्वागत करतो...'
आज 'मर्तिक' उपलब्ध नाही. यातल्या आणि या अशाच कवितांची सुरूवात या आणि अशाच सार्या मित्रांनी 'लिटिल मॅगझिन्स' मधून केली होती. छोटं वर्तुळ, छोटी धाव आणि छोटं बजेट असलेल्या या मॅगझिन्सने महाभारत घडवलं.
***
'अबकडइ'- एका साक्षेपी संपादकाची क्रांती
मराठी दिवाळी अंकांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो 'अबकडइ' शिवाय पुर्ण होणं शक्य नाही इतकं त्याचं योगदान आहे.
'लिट्ल मॅगझिन' (लघुअनियतकालिक) नावाचं नवं हत्यार साठीतल्या बंडखोर लेखकांना मिळालं. 'सत्यकथे'ला विरोध- या सारख्या कारणापायी सुरू झालेलं हे प्रकरण काही काळाने विधायक मार्गाला लागलं खरं पण तोवर या लोकांनी काय नको ते सारे अतरंगी प्रकार करून बघितले. उदाहरणार्थ इराण्याच्या हॉटेलात बसून भंकस करत एकेकाने एकेक ओळ अशी सामाईक कविता करायची. अशा कवितांचा कवी 'राम खोलकाने' असा एकेकाच्या नावा-आडनावातून अक्षरं घेऊन तयार झाला. या कविता लिहून ठेवल्या असत्या, तर तो काळाचं, परिस्थितीचं नेपथ्य लाभलेला एक दस्तावेजच झाला असता. एकदा या मंडळींनी 'तरल' होऊन स्मशानात कवितावाचनाचा कार्यक्रम आयोजित केला. हा काय गोंधळ म्हणून पोलिस आले, तर हे लोक त्यांच्याशी अट्ट्ल इंग्रजीत वाद घालू लागले. शेवटी वाया गेलेली कार्टी म्हणून पोलिसच तिथून निघून गेले. अशा अनेक गंमती.
या मंडळींनी स्वतःच्या साहित्याला हक्काचं स्थान म्हणून छोटी, कमी खर्चातली वगैरे लघुमासिकं चालू केली. ती मुळातच 'अनियतकालिकं' होती. त्यांची नावं येरू, आता, किंवा, शब्द, वाचा, असो, अथर्व, फक्त- अशी होती. यावरून यांनी काय पवित्रा प्रस्थापितांविरुद्ध घेतला होता- याचा अंदाज येतो. यांतली काही तर चक्रमुद्रित (सायक्लोस्टाईल) स्वरूपातली होती. 'फक्त' मधल्या 'बाटलेल्या कविता' या सदरात सुरुवातीला खोतांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. एकुणच या केव्हाही निघणार्या लघुमासिकांतलं कंटेंट असं प्रक्षोभक, 'नेव्हर सीन बिफोर' आणि सो-़कॉल्ड क्रांतिकारक वगैरे होतं की कृष्णराव मराठ्यांच्या जातकुळीतले टीकाकार भडकून उठले. खोतांच्या भाषेत- "..मराठीतले टीकाकार डोळे चोळीत उठले. नि झोपेच्या तारेतच जी काय त्यांना दोन चार लिटिल मॅगॅझिन्स गावली, त्यांच्या अर्धवट वाचनातून त्यांनी फुसक्या मारायला सुरुवात केली. अर्धवट पचलेले पावटे शेवटी दगा देतात. दीज मॅगझिन्स इज इक्वल टू 'विध्वंस' अँड नो 'क्रिएशन' अशी खुणगाठ त्यांनी बांधली, नि त्या गाठीचा पुढे कँसर झाला!"
प्रस्थापित साहित्य, साहित्यिक आणि साहित्यपत्रिका यांच्याविरुद्ध नुसती विरोधाची वा संयत बंडखोरीची नव्हे तर संतप्त भुमिका घ्यायला हवी असं खोत मानत होते. एका मुलाखतीत ते म्हणतात, " 'लिटल मॅगझिन्सचा विचार आणि संतप्त पिढीचा विचार हे दोन भिन्न विचार आहेत' असा शोध आमच्या एका मित्राने एक ठिकाणी लिहून ठेवला आहे. तो मराठीच्या बाबतीत लागू पडत नाही, हे त्याने आणि सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. मराठीत तरी लिट्ल मॅगझिन्सवाले आणि संतप्त पिढीवाले वा बंडखोरीवाले यांना विभागणारी मॅकमोहन रेषा उपलब्ध नाही. अशी रेषा कुठे निर्माण करण्याचा प्रयत्न झालाच तर ती भयानक वादग्रस्त ठरेल.." आता यालाही सतीश काळसेकरांनी तेव्हाच विस्तृत उत्तर देऊन काहीसा वेगळा पवित्रा घेतला आहे. हे दोन्ही लेख मुळातून वाचावे असे आहेत.
आव्हान म्हणून खोतांनी १९७१ साली 'अबकडइ' ची घोषणा केली. सुरुवातीला फक्त ५ अंकांपुरती. आणि एका थोर संपादकाचा जन्म झाला.
सतीश काळसेकर म्हणतात- 'चंद्रकांत खोत आमच्या अनियतकालिकांच्या चळवळीतला आमचा एक सोबती होता आणि 'अबकडइ'चे विशेषांक हे कुठेतरी या लघुअनियतकालिकांच्या चळवळीशी आपला सांधा जुळविण्यात जवळचे होते. प्रथम त्याचे अव्यावसायिक असणे, नंतर स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करणे, साहित्यव्यवहारातल्या नव्या नव्या प्रयोगांना अवकाश प्राप्त करून देणे आणि प्रस्थापित साहित्य व्यवहारापासून जरा दूरवर असणार्यांना अधिक प्रेमाने जवळ करणे- या सार्या लघुअनियतकालिकातल्या गोष्टी त्याच्यात होत्याच..'
'अबकडइ' हे काय प्रकरण होतं, याचं यावरून थोडक्यात आकलन होतं. हे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे हे १९७१-७२ मधल्या पहिल्या पाच अंकांतच त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकार, मांडणी आणि मजकूर यावरून स्पष्ट होतं. या पाच अंकांनंतर दुसर्या पर्वात खोतांनी १२ अंकांची घोषणा केली. प्रत्यक्षात त्यातले सहाच निघू शकले. १९७३ नंतर मात्र खोतांनी फक्त वार्षिकांक, म्हणजे दिवाळी अंक काढले ते थेट १९९६ पर्यंत. या २४ वर्षांतले २१ दिवाळी अंक हा अभ्यासाचा विषय आहे. खोतांनी यांत मजकुराचं वैविध्य तर ठेवलंच, मात्र एखाद्या विषयाला वाहून घेतलेला दिवाळी अंक- ही कल्पना पहिल्यांदाच त्यांनी राबवायला सुरुवात केली, आणि खोतांचं संपादकीय कौशल्य अनोख्या पद्धतीने दृग्गोचर व्हायला सुरुवात झाली. या २१ दिवाळी अंकांच्या निवडक लेखांचं पुस्तक 'निवडक अबकडइ' या नावाने देखण्या स्वरूपात सतीश काळसेकरांनी २०१२ साली संपादित करून प्रसिद्ध केलं. हे पुस्तक वाचल्यावर 'अबकडइ'चे अंक किती अचाट असावेत याची कल्पना येते. या अंकांतून कोण लिहित होतं? तर नमुन्यादाखल एक छोटी यादीच बघा- दुर्गा भागवत, नारायण सुर्वे, राजा ढाले, श्रीकांत सिनकर, उद्धव शेळके, विलास सारंग, गुरुनाथ धुरी, भाऊ पाध्ये, श्री.दा. पानवलकर, डॉ. श्रीराम लागू, नामदेव ढसाळ, चंद्रकांत काकोडकर, दया पवार, चंद्रकांत खोत, सतीश काळसेकर, शिरीष पै, विश्वास पाटील, वसंत आबाजी डहाके, अरुण साधू, जयंत पवार...
या अशा लोकोत्तर लेखकांकडून लिखाण घेणं आणि तेही स्वतः ठरवलेल्या विषयावर- हे खायचं काम नव्हतं.
खोतांचा अतरंगीपणा खूप कष्ट-मेहनत करून काढलेल्या या दिवाळी अंकांतही चालूच राहिला. १९७३ च्या पहिल्या दिवाळी अंकातलं एक वाक्य- 'आमच्या वाचकांस ही दिवाळी, इतकंच नव्हे तर पुढील वर्षातली होळी, गटारी अमावस्या देखील सुखात जावोत.' १९९३च्या अंकातलं एक वाक्य- 'हा अंक ज्या वाचकाला अजिबात आवडणार नाही त्याला 'अबकडइ'तर्फे 'पद्मश्री' दिली जाईल!' श्री. ना. पेंडसे सारख्या लेखकाचं लिखाण आवडलं नाही, जमलं नाही म्हणून न छापता मानधन देणारा माणूस हाच.
१९८७ साली 'लग्नाची बेडी'च्या नव्या संचाने महाराष्ट्रव्यापी दौरा केला. या संचात लागू, फुले, हट्टंगडी, अमरापुरकर होते आणि तनुजाही होती. तिने सांगितलं- या वेगळ्या अनुभवावर मी डायरी लिहिणार. खोतांचे संपादकीय डोळे लकाकले. त्यांना अॅन फ्रँक, व्हॅन गॉगसारख्यांच्या डायर्या दिसल्या. आणि ठरलं- हा दिवाळी अंक 'डायरी/रोजनिशी विशेषांक' असणार. हा अशा प्रकारचा पहिलाच विशेषांक होता. तनुजासकट असंख्यांच्या डायर्या मिळवण्याचा त्यांचा उद्योग त्यांनी खुद्द स्वतःचीच डायरी लिहून शब्दबद्ध केला आहे. ही डायरी एखादा कष्टाळू, बुद्धिमान, कल्पक, व्यासंगी आणि चिकाटी न सोडणारा संपादक कसा असतो ते दाखवणारी आहे. त्यांच्याच शब्दात, त्या डायरीतले काही अंश (मूळ डायरी फार विस्तृत, आणि मुळातून वाचण्याजोगी आहे) - (परिशिष्ट)
दोन तपांतल्या 'अबकडइ' दिवाळी अंकांत त्यांनी आत्मकथा, डायरी, पत्र, व्यक्तिचित्र, मुलाखती असे विषय तर हाताळलेच, पण शेवटची काही वर्षे त्यांनी तर्कातीत अनुभव, श्रद्धा: अर्थ-अनर्थ, चमत्कारः सत्यता-असत्यता, पुनर्जन्म अशा काहीशा अध्यात्मिक विषयांचीही मांडणी केली. १९९६ नंतर अंक बंद केला, तेव्हा ते म्हणतात, ''अबकडइ' हा एकखांबी तंबू होता. अंकाला खूप मागणी असायची. ५००० अंक हातोहात खपत, २१ दिवाळी अंकांनंतर लक्षात आलं की आपल्याकडे भांडवल नव्हतं. अंक बाजारात आला की मी लोकांची बिले भागवत असे. एजंट लोक ऐन दिवाळीत माझ्या घरी ठाम बसलेले असायचे. पैशासाठी तगादा लावायचे. या अंकाच्या कारकिर्दीत मी एकही दिवाळी नीट पाहिली नाही, अनुभवली नाही. ऐन दिवाळीत टेन्शनमध्ये असायचो. नंतर नंतर मला या सगळ्याचा वीट आला होता. अंकाला फायदा जाहिरातीतून होत असे. विक्रीतून नव्हे. या जाहिरातींसाठी खूप आटापिटा करावा लागे. अंकाची विक्री उत्तम होती. पण त्यातील पैशाने मी बिले भागवत असे. शेवटी माझ्या हाती शून्य उरे. या सगळ्यात दम निघायचा. शेवटी १९९६ साली मी अंकच बंद करून टाकला. त्यानंतर मोठी गंमत झाली. मला फोन यायला लागले जाहिरात कंपन्यांतून. आपके अबकडइ के लिये फूल पेज अॅड रखा है. लेके जाव. कारण अंकाचं नाव झालं होतं. या मंडळींना मी अंक बंद केलाय हे ठाऊकच नव्हतं..'
***
मनमोहक आभासिका- बालकथा
खोतांसारखा अवलिया आपली जबरदस्त प्रतिभा वापरून 'बालकथा' लिहिल, असं कुणी स्वप्नही पाहिलं नसेल. पण १९९१ ला 'अबकडइ' तर्फेच खोतांनी 'चनिया मनिया बोर' नावाचं सुरेख बालकथांचं पुस्तक प्रसिद्ध केलं. अतिशय कल्पक आणि मनोरंजक कथा, सुरेख चित्रे, डोळ्यांना सुखावणारं प्रेझेंटेशन आणि दुर्गा भागवतांची सुंदर प्रस्तावना - अशा जोरदार पद्धतीने ते खोतांनी आणलं. यात 'खुळो इलो रे इलो' आणि 'माका ढेकुण लुचता तेची गजाल' या अस्सल मालवणी बोलीत आहेत. 'लाल' नावाचं झुरळ, 'बाल' नावाच्या मुंग्या, 'पाल' याच नावाची पाल, खुळो नावाचा पायांत घुंगरू घातलेला कावळा, 'औरंगझेब' नावाचा ढेकुण, 'धार्मिक' नावाचं मांजर, 'सदरा' घातलेला 'सुखी' उंदीर अशा जबरदस्त पात्रांचा आणि विस्मयजनक फँटसी असलेल्या घटनांचा चित्तरंजक खेळ खोत मांडतात, आणि मग या बालकथांचं साहित्यिक मुल्य लक्षात येतं. औरंगझेब ढेकणाशी नायकाच्या जमलेल्या प्रेमकथेत आपण रंगून जातो. 'कंसमे तलवार उपसके, अर्थात (कंसात) तलवार उपसून' ही शेवटची कथा 'आज शिवाजी महाराज असते तर..' या फँटसीवर लिहिलेल्या सुंदर कथेत ते म्हणतात, 'आज शिवाजी महाराज असते तर आज शिवचरित्र लिहिण्याचा प्रयत्न करणारे व ते लिहिणारे द.वा. पोतदार, सेतुमाधवराव पगडी, बाबासाहेब पुरंदरे यांना घरी बोलावून शेला-पागोटे दिले असते आणि शेवटी निरोप देताना म्हणाले असते, 'इतिहासकारांनो, माझे खरे व अस्सल चरित्र मीच लिहिणार आहे, तेव्हा तूर्तास तरी तुमचे लेखन थांबवा!''
आज अर्थातच हेही पुस्तक उपलब्ध नाही.
***
पद्मा चव्हाण ते अध्यात्म व्हाया 'दुरेघी'
अत्र्यांनी जिला 'मादक सौंदर्याचा अॅटमबाँब' असं बिरुद दिलं, ती मराठीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री- पद्मा चव्हाण, तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना चंद्रकांत खोतांच्या प्रेमात पडली. अमोल पालेकरांच्या १९८१ सालच्या 'नरम-गरम' या सिनेम्याच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली असे उल्लेख सापडतात. दोघांनी लग्नही केलं होते असे कुठेकुठे उल्लेख सापडतात खरे, पण त्याला पुरावा नाही. ज्या अवलियाच्या कुंडलीतले ग्रहच बिनसलेले होते, त्याच्याशी पुढे पद्माचं न बिनसतं तरच नवल! बेबनाव झाला आणि कसल्याशा व्यवहारात फसवल्याचा आरोप आणि मग खटला बाईंनी दाखल केला. खोतांना यातही भरपूर प्रसिद्धी मिलाली, खरंतर त्यांच्या साहित्यिक म्हणून मिळालेल्या किर्तीपेक्षा जास्तच! त्यांच्या कादंबर्या-कथा आणि कवितांचं भर कोर्टात विच्छेदन करण्यात आलं. काही वर्षांनी खोत हा खटला जिंकले. पण तोवर त्यांचं सर्वच बाजूंनी नुकसान झालं होतं. खूप आर्थिक नुकसान झालं होतं. आयुष्यभर तिखटपणा जपलेले खोत अंतर्मुख आणि दैववादी झाले होते. 'अबकडइ' च्या कामाने त्यांना थोडाफार मानसिक आधार दिला असेल, पण हे शेवटचे अंकही सारे दैववाद आणि अध्यात्मा-चमत्कारांकडे झुकलेले होते.
'अबकडइ' बंद केल्यानंतर ते कुणालाही न सांगता गायब झाले. ते हिमालयात गेले असावेत असा अनेकांनी अंदाज केला, पण तो शेवटी अंदाजच. कुणालाही नीट काही कळलं नाही आणि खोतांनीही शेवटपर्यंत काहीच सांगितलं नाही. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी ते उगवले तेव्हा त्यांचा नूर पालटला होता. डोळ्यांतला सुरमा गायब होता, पठाणी वेष जाऊन भगवी कफनी आणि अंगरखा आला होता. दाढी पांढरीशुभ्र आणि लांबलचक झाली होती. त्यांच्या त्या सिग्नेचर ऐटबाज फरकॅपच्या जागी आता तुळतूळीत टक्कल होतं. या घमासान खटलेबाजीने ते कोलमडून गेले होते. ते सतत घाबरलेले, भ्रम-भासांच्या जाळ्यात अडकलेले होते. 'माझ्यावर अघोरी विद्येचा वापर होतोय. अचानक कुणीतरी माझी शक्ती काढून घेतो. चालता चालता मी मटकन खाली बसतो. माझे हात कापायला लागतात. तोंडातून शब्द फुटत नाहीत..' असं त्यांनी जयंत पवारांना एकदा सांगितलं. हे कुणीतरी म्हणजे त्यांना छळणारी कुणी बाई, पण ते नाव घेत नव्हते. खोतांना मानसिक आजाराने घेरल्याची ही लक्षणं होती. याच काळाच्या आगेमागे त्यांनी 'मी-आम्ही-तू-तुम्ही-तो-ती-ते-ते-त्या-ती', 'कागदी होडीच्या शिडावर बसलेल्या पक्षाच्या चड्डीची नाडी',
'मेंढीकोट', 'चिचुंद्री' अशा दीर्घकथा (किंवा लघुकादंबर्या लिहिल्या) आणि त्या 'अबकडइ'त प्रकाशितही केल्या. या कथांना पारंपारिक सुरुवात नाही, आणि शेवटही वाटेल तिथं येऊन केला आहे. यापुर्वीही 'अबकडइ' व्यतिरिक्त मेनका, श्री, आक्रोश, पिसारा, स्पंदन, शब्दश्री- अशा अनेक दिवाळी अंकासाठी त्यांनी कथा लिहिल्या, पण त्यांच्या कथासंग्रहाचं त्यांनी कधी मनावर घेतलं नाही. मेंढीकोट आणि चिचुंद्री या कथांमिळून नंतर 'दुरेघी' हे पुस्तक प्रसिद्ध झालं.
'दुरेघी'ची अर्पण पत्रिका त्यांच्या दोन मित्रांसाठी आहे, आणि 'दोघांनी 'दुरेघी'ची एकेक रेघ वाटून घ्यावी' असंही त्यांनी त्याच पत्रिकेत बजावलं आहे. 'दुरेघी'मधल्या दोन्ही कथा या त्यांच्याबद्दलच आहेत, असा अंदाज करायला जागा आहे. 'मेंढीकोट' मधला नायक भगवे कपडे घालून अचानक परागंदा होतो, आणि वाट फुटेल तिकडे प्रवास करत राहतो, प्रवास करताना डायरी लिहित राहतो- तीच ही कथा. नाशिकरोडवरच्या पुलाखाली जगणार्या आवारा मुलांसोबत जमलेलं जगावेगळं मैत्र आणि त्या पाशात न अडकण्याची नायकाची धडपड. 'चिचुंद्री' मधल्या लेखक आणि अभिनेत्री या पात्रांच्या जागी पद्मा चव्हाण आणि खोत- यांची कल्पना सहजच करता येते. या कथांमधल्या नायकांच्या वागण्यात असलेली भ्रमिष्टपणाची झाकही आपल्याला खोतांबद्दल पुष्कळ सांगून जाते.
खोतांनी शेवटच्या काळात जी अध्यात्मिक चरित्रं लिहायचा धडाका धरला तो बघता लंबक दुसर्या दिशेच्या टोकाला पोचला होता याची खात्री पटते. नास्तिक असलेले खोत आता दैववादी झाले होते, चमत्कारांवर विश्वास ठेऊ लागले होते. प्रचंड खपलेली आणि किर्ती झालेली त्यांनी शेवटच्या काळात लिहिलेली ही पुस्तकं-
- अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र)
- अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनचरित्र)
- गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र)
- दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी)
- बिंब प्रतिबिंब (विवेकानंदाच्या जीवनावर)
- मेरा नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
- संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
काही काळ ते पुन्हा आपल्या सातरस्त्यावरच्या गिरगावातल्या घरात राहिले. त्यानंतरच्या आयुष्याची शेवटची अनेक वर्षं त्यांनी डिलाईल रोडवरच्या साईमंदिरात बसून काढली. त्यांचा वेष आणि वागणं पाहून मंदिरात येणारे लोक त्यांना साधुपुरूष समजून पाया पडत. स्वतःबद्दलच्या गुढ, अनाकलनीय प्रश्नांचं जाळं मागे सोडून २०१४ साली, पाऊणशे वर्षं जगल्यावर त्यांनी याच मंदिरात शेवटचा श्वास घेतला.
***
'सरळ सांगायचं म्हणजे मी एक चमत्कारिक माणूस असल्याने चमत्कारिक साहित्यिकही आहे. त्यामुळे मी आपसूकच जेव्हा-केव्हा लिहायला सुरुवात केली, किंबहुना जेव्हा-केव्हा मला लिहावंसं वाटलं, त्यावेळी चाकोरीतलं काहीच लिहायचं नाही, अशी शपथ मी माझ्या मनाशीच घेतली..' असं म्हणणार्या खोतांवर जरा अन्यायच झाला असं म्हणायला हरकत नाही. जयंत पवार म्हणतात, 'खोतांचं दुर्दैव हे की अन्य लेखकांना (आधीचे वादग्रस्त. उदा, पाध्ये, सिनकर, काकोडकर, चित्रे इ.) मराठी साहित्यविश्वाने कालांतराने का होईना मान्यता दिली. पण ती मान्यता खोतांना त्यांचा हक्क असूनही कधीच मिळाली नाही.'
'डिंपल' प्रकाशनाने त्यांच्या तिन्ही महत्वाच्या कादंबर्या नुकत्याच प्रसिद्ध केल्या आहेत. २०१२ साली 'लोकवाड्मय गृह'ने प्रसिद्ध केलेलं 'निवडक अबकडइ', फारसं कुठे नसलेलं 'दुरेघी', आणि त्यांची सारी अध्यात्मिक चरित्रं इतकं आता उपलब्ध दिसतं. इंटरनेटवर खोतांबद्दल शोधायला गेलं तर त्यांच्या मृत्युच्या बातम्या (त्यांतल्या एका बातमीत मुख्यमंत्र्यांनी वाहिलेली श्रद्धांजली) किंवा त्रोटक मृत्युलेख, एखादा छोटा व्हिडिओ, ई-कॉमर्सवरची त्यांची तुरळक पुस्तकं (त्यांतली बरीचशी 'आऊट ऑफ प्रिंट'), लोकसत्तेचा 'आशिक मस्त फकीर' हा छोटेखानी लेख, 'चंद्रकांत खोतांच्या मर्तिकाचं भजन' हा जयंत पवारांचा मटामधला लेख- इतकंच दिसतं. सदर लेखामुळे थोड्याफार मराठी जनांना आणि साहित्यप्रेमींना चंद्रकांत खोतांचं अवलियापण, त्यांच्या तत्कालीन बंडखोरीच्या जोरकस अभिव्यक्तीचा अन्वयार्थ, साक्षेपी आणि तल्लख संपादक म्हणून त्यांची कारकीर्द आणि त्यांच्या साहित्यिक ऐवजाचं दुर्मिळत्व कळलं तरी या लेखाचा उद्देश साध्य झाला असं म्हणता येईल.
एक माणूस आणि साहित्यिक म्हणून जी भुमिका खोत आयुष्यभर घेत आले आणि निष्ठेने निभावत आले, ती वर्णन करणार्या त्यांच्याच 'बिनधास्त'मधल्या कवितेच्या ओळींनी लेखाचा शेवट करायला हरकत नाही. त्यांच्याच शब्दांत -
सर्वकालीन मीमांसकांनो
तुमचे उनाड कळप आभाळभर
खुळखुळ्यातल्या झोपाळू दगडांनो,
तुम्ही तुमचे बोचे वाजवत राहा बघू कसे
माझ्या धमन्यात अल्कोहोल फुललाय
म्हणूओन तुम्ही काकड्यांची शेतं लावा
तुम्ही गजकर्णासारखे पसरा शरीरभर
बेचाळीस पिढ्यांची मूळव्याध सोबतीला घेऊन
कुणी कुठे खाजवायचे कायदे करा
डिसेंट्री झालेल्या मुलासारखे राहा चिरपत
अनादी अनंत काळाची पकपक पिकवा...
***
***
================
परिशिष्ट :
'आणि डायरी एका वेड्या संपादकाची'- चंद्रकांत खोत, प्रथम प्रसिद्धी- 'अबकडइ' दिवाळी १९८७, द्वितीय प्रसिद्धी- 'निवडक अबकडइ', संपादक- सतीश काळसेकर, अरुण शेवते
या लेखातील काही अंश -
९ मार्च
..अशोक जैनचं दिल्लीहून पत्र. 'डायरी लिहिण्याचा विलक्षण कंटाळा' असं लिहिलंय. बेट्याला मी तसा सुका सोडणार नाही. तो म्हणाला- मधु दंडवते नित्यनेमाने डायरी लिहितात...
२७ मार्च
...अलंकार-कमल टॉकीजच्या परिसरात जुनी पुस्तके विकणार्याकडून 'किशोर'चा जानेवारीचा अंक घेतला. त्यात सत्यजित राय यांच्या बालपणीच्या आठवणींचा लेख.. त्यांच्या काकांच्या आठवणी- ते डायरी लिहित म्हणे.. ही डायरी बंगालीत प्रसिद्ध झालीय का याबद्दल चौकशी करायला हवी. अशोक शहाणे नाहीतर कलकत्त्याचे श्री. बा. जोशी यांच्याकडे.
१ एप्रिल
...कालनिर्णय मध्ये जयंत साळगावकरांची भेट घेतली. डायरी विशेषांकाबद्दल बोललो. त्यांनी शिरीष पैंना फोन केला. अत्रे ५५ साले तुरुंगात डायरी लिहित म्हणे. त्याचं पुस्तक झालं नाही. शिरुभाऊ लिमयांच्या तुरुंगातल्या डायर्या पुस्तरुपाने प्रसिद्ध झाल्यात. साने गुरुजींनी एमिल झोला यांच्या डायर्यांचा अनुवाद प्रसिद्ध केला आहे...
२३ एप्रिल
...व.पु. काळे घरी नव्हते.. परत येताना अरुण साधु भेटले. मी त्यांना तुम्ही डायरी लिहिता का विचारलं. ते म्हणाले- जमत नाही, कठीण काम. मग मी त्यांना येत्या काही महिन्यांसाठी नव्याने डायरी लिहायला सुरुवात करा, असं सुचवलं...
५ मे
...राजेंद्र पै, शिरीष पै. शिरीष म्हणाल्या- पपांच्या डायर्या म्हणजे फक्त नोंदी आहेत. पण कुसुम कुलकर्णी डायरी लिहितात. त्यांच्या ४२ च्या चळवळीतल्या किंवा सखाराम बाईंंडरच्या काळातल्या डायर्या मिळू शकतात...
२६ मे
...निराशेचा झटका. अबकडइ बंद करून टाकावं. फार त्रास होतो मटेरियल गोळा करताना. यात क्रिएशन आहेच. पण एकंदरित हमालीच...
२७ जुलै
...वांद्र्याला साहित्य सहवासात य. दि. फडक्यांकडे..
...ते म्हणाले, वर्षभर डायरी लिहिली. ४७-४८ वगैरे. माझे डोळे चमकले.. हा स्वातंत्र्याचा आणि गांधींच्या खुनाचा काळ. मी म्हणालो- मला मिळेल का ती डायरी पाहायला? ते म्हणाले- शोध घेतो..
..तिथून समोरच्या इमारतीत रा. भि. जोश्यांकडे..
..तिथून पत्रकार कॉलनीत अरुण साधुला भेटायला..
२ ऑगस्ट
..माधव मोहोळकरांच्या बिर्हाडी जुहूला. अजून श्रीगणेशाच नाही म्हणे. नेहमीचेच..
..'चिरेबंदी'वर अमोल पालेकरकडे. तो घरी नव्हता. तिथला माणसाला माझं कार्ड देतो तर तो म्हणे- अ ब क ड इ माहित हाये. सायबांकडे येतं. तुमीच काय ते...
७ ऑगस्ट
सी.पी. टँकच्या हिंदी रत्नाकरमध्ये गेलो. हिंदीत प्रसिद्ध झालेल्या डायर्या दाखवायला सांगितल्या. मोहन राकेश की डायरी. अमृता प्रीतम की डायरी. पण 'सफरनामा' नावाची बलराज सहानीची पाकिस्तान प्रवासाची डायरी मिळत नाही..
ती मिळवण्यासाठी तंगडतोड.. चर्नी रोडवरचं महात्मा गांधी मेमोरियल लायब्ररी... काळबादेवीचं आर. आर. शेठ दुकान. तिथं विनोबांची विष्णुसहस्त्रनामवरली स्वहस्ताक्षरातली डायरी... मग मारवाडी संमेलनची हिंदी लायब्ररी. तिथंही सफरनामा नाही.. मग भारतीय विद्याभवन.. मग काँग्रेस हाऊसच्या मागे हिंदी राष्ट्रभाषा भवन.. माहीमची बंबई हिंदी विद्यापीठाची लायब्ररी. तिथंही नाही..
९ ऑगस्ट
...मोहोळकरांनी घरातून आणलेली कात्रणं मला दाखवली. म्हणाले- ही अभिनेत्री शशिकलेची डायरी, आणि ही गजानन माधव मुक्तिबोध यांची..
१९ ऑगस्ट
...दुर्गा भागवतांची एशियाटिक लायब्ररीत अचानक भेट. बाई म्हणजे एक चालता बोलता अनुभव कोषच आहेत...
३० सप्टेंबर
...राहून राहून वाटतं की, त्या त्या काळात लिहिलेली एखाद्या अनामिक दारुड्याची डायरी मिळाली तर बहार होईल...
अफाट आहे हे! विलक्षण!
अफाट आहे हे! विलक्षण!
बघू काही मिळालं आणि झेपलं तर! इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद!
अबकडइ घरी येत असे आणि लहानपणी वाचलेला आहे. आता लक्षात काही नाही.
अनेक वर्षांपूर्वी कुठल्यातरी
अनेक वर्षांपूर्वी कुठल्यातरी दिवाळी अंकात खोतांनी लिहिलेली एक बालकथा वाचली होती. कदाचित अबकडईच असेल्,आता आठवत नाही. एका पानावर चार छोटी पाने होती. अशी सगळी पाने एकत्र जुळवून त्याचं छोटं वेगळं पुस्तक तयार करायचं होतं अशी काहीतरी कल्पना होती. आता पूर्ण आठवत नाही पण एका मुंगीच्या दृष्टीकोनातून होती. खोत जिथे लेखन करायचे तिथे गूळ का साखर काहितरी सांडलेलं असतं ते खायला एक झुरळ येतं आणि सर्व मुंग्या त्याच्यावर हल्ला करतात. शेवटी ते झुरळ आपल्याला वाचवण्यासाठी खोतांचं लक्ष जावं म्हणून त्यांची शाईची दौत उलटी करतो असं काही तरी होतं. तेव्हा लहान वयात ते काही नीट कळलं नव्हतं, खोत कोण काही माहितीही नव्हतं.
चीकू, तुम्ही म्हणताय ती
चीकू, तुम्ही म्हणताय ती खोतांच्या पुस्तकातली 'लाल बाल पाल' ही पहिलीच कथा. लाल- झुरळ, बाल-मुंगी, पाल-पाल.
हे लिखाण अफाट आहे!
हे लिखाण अफाट आहे! चंद्रकांत खोतांबद्दल एवढी सखोल आणि उत्कट चर्चा करणारा आजच्या काळातला लेख वाचनात आलेला नाही. तसे पाहता हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकतो.
धन्यवाद साजिरा.
मस्त ओळख, साजिरा.
मस्त ओळख, साजिरा.
तू दोनेक ठिकाणी 'गिरगाव' असा उल्लेख केला आहेस तो बहुधा 'गिरणगाव' असा हवा आहे का?
अगदी बरोबर स्वाती, 'गिरणगाव'
अगदी बरोबर स्वाती, 'गिरणगाव' असा उल्लेख हवा आहे. थँक्स..
भारी लेख.. अर्थात माझ्यासाठी
भारी लेख.. अर्थात माझ्यासाठी हे सगळेच नवे.. पण सातरस्ता आणि डिलाईल रोड मुळे जवळचे वाटले..प्रतिसाद वाचतोय...
चीकू, तुम्ही म्हणताय ती
चीकू, तुम्ही म्हणताय ती खोतांच्या पुस्तकातली 'लाल बाल पाल' ही पहिलीच कथा. लाल- झुरळ, बाल-मुंगी, पाल-पाल.>>
हा हा बहुतेक तेच नाव असावं. आता खूप काही आठवत नाही. पण त्यात त्या मुंग्या खोतांचं लि़खाण वाचतात आणि लेखकाचं नाव खोत की रवोत याच्यावर खल करतात ते आठवतं
बाकी लेख खूपच भारी आहे!
बिंब प्रतिबिंब फार आवडली होती
बिंब प्रतिबिंब फार आवडली होती. चंद्रकांत खोतांची इतकी सविस्तर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
सुरेख ओळख, साजिरा. मनापासून
सुरेख ओळख, साजिरा. मनापासून धन्यवाद.
अगदीच अजब रसायन वाटत आहे हा माणूस. भन्नाट!
सुंदर लिखाण आणि छान परिचय
सुंदर लिखाण आणि छान परिचय
सविस्तर परिचय आवडला छान ओळख
सविस्तर परिचय आवडला
छान ओळख
सुरेख, अभ्यासपूर्ण लेख.
सुरेख, अभ्यासपूर्ण लेख.
विलक्षण, अफाट आहे हे.
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
कै च्या कै विलक्षण
कै च्या कै विलक्षण व्यासंगपूर्ण लिहीले आहे. काय वेगळीच वल्ली आहेत. साजिरा खरच वरती कोणीतरी म्हटलय तसा हा दस्तावेजच आहे.
लेख सुंदर लिहिला आहे.रचनाबंध
लेख सुंदर लिहिला आहे.रचनाबंध सुरेख झालाय. म्हणजे मध्येच लोकप्रिय अभिनेत्री आयुष्यात पुढे येणार आहे, वादळ उठणार आहे ह्याची hint दिलीत. मग कोण बरे असेल या विचाराने पुढे वाचत गेले. पुढच्या चार ओळीत परत एवढे गुंतायचे झाले -खोतांचे आयुष्यच इतके वेगळे, घडामोडींनी भरलेले की अभिनेत्री कोण असावी याचा विचार करायलाच वेळ मिळाला नाही.
लेख वाचताना खोतांचे आयुष्य चित्रपटासारखे उलगडत गेले.
बापरे! हे अक्षरशः काहीही
बापरे! हे अक्षरशः काहीही माहीत नव्हतं. मराठीच आहे ना हे सगळं, असं अनेक ठिकाणी प्रश्न पडावा इतकं अनोखं आणि अचंबित करणारं आहे हे. घरातच एखादं भुयार असावं आजवर त्याचा पत्ता नसावा आणि आज अचानक त्याचा रस्ता सापडावा तसं झालं. खूप धन्यवाद साजिरा. हे सगळं लिहायला काय तयारी पाहिजे वाचन आणि लेखनाची. कमाल लिहिलेस. मभादि साजरा झाला.
सुरेख, अभ्यासपूर्ण लेख.
सुरेख, अभ्यासपूर्ण लेख.
अफाट आहे हे.
अफाट आहे हे.
पुन्हा एकदा वाचावे लागेल.
नांव कानावर पडले होते पण अजिबात माहिती नव्हती.
भारी ओळख करुन दिली आहेस. एका
भारी ओळख करुन दिली आहेस. एका दमात वाचून काढले. मभागौदिमूळे एव्ढ सुरेख लिखाण वाचायला मिळाल.
आता लिहिले आहेसच तर लिहिताच रहा
मस्त ओळख साजिरा!
मस्त ओळख साजिरा!
बिंब-प्रतिबंब मी वाचलं आहे. ते जरी स्वामी विवेकानंदांचं चरित्र असलं तरी काहीसं बिनधास्त आणि मस्त आहे वाचायला! वेळ मिळाला की पुन्हा वाचणार आहे. ते आणलं तेव्हाच मला खोतांबद्दल समजलं आणि अचंबा वाटल्याशिवाय राहिलं नाही.
संन्याशाची सावली भगिनी निवेदिता यांच्याबद्दल आहे ना?
यातल्या एकदोन पुस्तकांची नावं
यातल्या एकदोन पुस्तकांची नावं आणि अबकडइचं नाव सोडल्यास बाकी काही म्हणजे काही माहिती नव्हतं
ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! अवलिया लेखक होता!
सुंदर ओळख साजिरा. का कोण जाणे
सुंदर ओळख साजिरा. का कोण जाणे हे आधी कधी तरी वाचल्यासारखे / याबद्द्दल बोलल्यासारखे वाटते आहे.
काळसेकरांची ओळख / नाव पहिल्यांदा काळसेकरांच्या वाचणार्याची रोजनिशी पुस्तकात आले. आणि नंतर पाचपाटील या मायबोलीवरच्या साक्षेपी पुस्तक खाणार्या वाचकाकडून ऐकले.
उभयान्वयी अव्यय च्या नव्या आवृत्तीमध्ये अनिल बांदेकर यांची अत्यंत समर्पक रेखाचित्रे आहेत. ते पाहून वासुनाकाचीही अशी आवृत्ती असावी असे वाटले. जयंत पवारांची प्रस्तावनाही वाचनीय.
उभयान्वयी अव्यय हे खोतांचे मी वाचलेले एकमेव पुस्तक. त्याची शॉक वॅल्यु खूप आहे. कादंबरी म्हणून तिचे मुल्यमापन - माझ्यासाठी - अजून माझ्याच्याने झालेले नाही.
सुंदर ओळख आणि माहितीपूर्ण लेख
सुंदर ओळख आणि माहितीपूर्ण लेख. मी यांच्याबद्दल कधीच वाचले नव्हते आता शोधून वाचेन. धन्यवाद.
अजीबातच माहीत नव्हते
अजीबातच माहीत नव्हते यांच्याबद्दल
ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
औरंगजेब ढेकणाची गोष्ट किशोर
औरंगजेब ढेकणाची गोष्ट किशोर मासिकात कधीतरी १९८४ ते ८६ च्या दरम्यान वाचल्याचे आठवते. मस्त गोष्ट होती. "का रे बसलास टेकून टेकून ? कापडात भरलो ढेकून ढेकून " असं सारखं येत होतं त्या गोष्टीत. मालवणी लहेजात होती. मुलांसाठी अगदी मूल होऊन लिहिलेली निरागस आणि मजेदार गोष्ट होती. आणि औरंगजेब हे ढेकणाचे नाव केवळ काहीतरी विचित्र म्हणून ठेवले आहे. मुघल बादशहाशी काडीमात्र संदर्भ नाही. तो मुलगा अगदी खूप विचार करून ढेकणाचे नाव औरंगजेब ठेवतो हे वाचून फुटलो होतो हे आठवतं
जबरदस्त लिहिले आहे. निवांत
जबरदस्त लिहिले आहे. निवांत वाचायचा होता म्हणून आज वाचतेय. अनेक धन्यवाद या लेखासाठी. मी यांचं काहीतरी वाचलं होतं हे नक्की, पण कॉलेजमधे असताना बहुतेक. आता मुळीच आठवत नाहीये. लेखाचा शेवट वाचून वाईट वाटले.
खूप छान लिहिले आहे. निवांत
खूप छान लिहिले आहे. निवांत वाचण्यासाठी राखून ठेवला होता. परिस्थितीमुळे त्यांना एम ए वगैरे इच्छा असूनही करता आले नाही पण त्यांच्या साहित्यावर एकदोघांनी पी एच डी केली असे वाचल्याचे स्मरते. अबकडई दिवाळी अंक लहापनणी वाचले होते. अवलिया माणूस. आणी अतिशय छान लेखाबद्दक साजिरा यांचे आभार !
रॉय किणिकरांवर ही एक लेख येऊ द्या (तुमच्या सिनेमात एक सितारिस्ट तेव्हढं घ्या की च्या चालीवर वाचावे)