भारत का दिल देखो (पाककृती): उपजे / उब्जे

Submitted by मनिम्याऊ on 23 December, 2024 - 10:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदळाची चुरी / कण्या: २ वाट्या
चनाडाळ: अर्धी वाटी
खवलेला ओला नारळ: अर्धी वाटी
फोडणीसाठी
तेल, मोहरी, हिंग, हळद, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता,
धणेपूड १ लहान चमचा
एका लिंबाचा रस
मीठ, साखर चवीपुरते
पाणी ३ कप

क्रमवार पाककृती: 

चण्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. ( हा वेळ पूर्वतयारीत धरला नाही)
तांदुळाच्या कण्या कढईत किंवा तव्यावर हलक्या कोरड्याच भाजून घ्यावा.

कण्या भाजल्यानंतर 5 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवून नंतर उपसून घ्यावे. त्यातच रात्रभर भिजवलेली चणाडाळ उपसून एकत्र करून ठेवावी.
सर्वप्रथम 3 कप पाणी आधण ठेवणे.
एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा लहान कुकर मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्याला हिंग, मोहरीचा कडक तडका द्यावा. त्यातच लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हळद घालून उपसून ठेवलेल्या कण्या आणि चण्याची डाळ घालावी. खोवलेले नारळ घालावे. दोन मिनिटे परतल्यावर धणेपूड व चवीनुसार मीठ व साखर घालावी.
एका लिंबाचा रस पिळून हलकेच परतून घ्यावे.
आधणाचे पाणी घालून झाकण ठेवून भात शिजू द्यावा. ( भात मोकळा शिजायला हवा त्यानुसार पाण्याचे प्रमाण घ्यावे.. कुकर मध्ये करत असल्यास 2 शिट्ट्यांमध्ये काम होते)
वाफ जिरली की लगेच गरम गरम खायला घ्या. वरून बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर छान लागते.
IMG-20241223-WA0001.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात २-३ लोकांचा नाश्ता होतो.
अधिक टिपा: 

माझी आजी यवतमाळची होती. तिच्या माहेरघरचा पदार्थ आहे हा. उन्हाळयात सुट्ट्यांमध्ये सगळी नातवंडे राहायला आली की बरेचदा सकाळी न्याहारीला उपजे असायचे. खूप काही मेहनत न घेता झटपट होणारा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता. यात बऱ्याचदा लिंबाच्या रसाऐवजी कैरीचा कीस घालून कैरीचे उपजे केले जायचे.
स्वयंपाकघरात खाली जमिनीवर गोलाकारात पाट मांडून आम्ही सगळी मावस भावंडे रोज नाश्त्याला बसायची. आजोबा रोज काहीतरी कोडे घालीत. ते सोडवत नाश्ता व्हायचा.
खूप फॅन्सी चवीचा नसला तरी आजीच्या हातचा आणि बालपणाशी आठवणींशी निगडित असल्याने माझा अत्यंत आवडीचा पदार्थ..

माहितीचा स्रोत: 
आजी, आई, मावश्या नेहमीच करायच्या.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी.
चित्रान्नाचा चुलतभाऊ वाटतो आहे. त्यात भात शिजवून घेऊन मग फोडणीवर परततात - ही वन पॉट मेथड.

छान आहे पाकृ.
खूप वर्षाआधी झी मराठीवर पाहिल्यासारखी वाटते.
प्लेट आणि ट्रे पण खूप छान आहे.

लिंक साठी धन्यवाद रायगड.. उबजे प्रकारात बरीच विविधता आहे. वरतीच कैरी घातलेल्या उबज्यांची आठवण दिली आहे. एकंदरीत उपजे म्हणजे तांदूळ आधी भाजून घेउन नंतर भिजत घालून केलेला भाताचा पदार्थ