तूर्त पुणे-१

Submitted by संप्रति१ on 16 November, 2024 - 02:05

इथं आवडलेल्या दोन भोजनालयांबद्दल लिहिलंय. काय पुण्यातले लोक आता लिहित बिहीत नाहीत. त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी बदलल्या असतील. आणि आता समजा त्यांनी या क्षेत्रातून परागंदाच व्हायचं ठरवलं असेल, तर त्यांना कोण कसं थांबवणार ना ? मग मधल्या मध्ये आपल्यासारख्या बाहेरून आलेल्यांनी का हात मारून घेऊ नये? म्हणून हा उपद्व्याप.

१. तर सदाशिव पेठेत 'न्यू पूना बोर्डिंग हाऊस' म्हणून एक भोजनालय आहे. जुनं आहे, शंभरेक वर्षांपूर्वींचं. शाकाहारी थाळी असते. चांगली असते. पुण्यात आल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांत बऱ्याच मेस, हॉटेल्समध्ये खाऊन पोटाचं कब्रस्तान करून घेतल्यावर शेवटी हे सापडलेलं. तेव्हा इथल्या चवीशी जे गणित जुळलं ते अजून सुटलं नाही.

साधंसरळ रूचकर जेवण. ज्यावर सरासरी मराठी मनुष्याचा पिंड पोसला गेलेला असतो, असं जेवण.! गरम चपाती, दोन भाज्या, आमटी, भात, कोशिंबीर, कांदा, लिंबू, चटणी, पापड, ताक/दही.!

जेव्हा पहिला घास घेतलेला, तेव्हा डोळ्यांच्या कडा नॉस्टॅल्जियानं ओल्या झालेल्या आठवतात. तेव्हा माझे केस पूर्ण काळे होते. आता कानांजवळ थोडेथोडे पांढरे व्हायला लागलेत. हरकत नाही. समजा इथेच असलो तर अगदी जख्ख म्हातारा होईपर्यंत सुखाने इथे जेवत राहू शकेन‌, असं वाटतं. (सलग पन्नास साठ वर्षांपासून इथं जेवत जेवत पक्व म्हातारपण आलेली माणसं खूप आहेत म्हणजे.)

याचे मालक, वाढपी, आचारी ही चांगली माणसं असावीत. देहबोलीतून, भाषेतून कळतं ते. काउंटरवर बसलेल्या मालकांकडे बघून मला सुरुवातीला नवल वाटायचं.! हा माणूस दिवसातल्या कोणत्याही वेळी एवढा हसतमुख, एवढा वेलकमिंग, आदबशीर आणि उत्साहानं सळसळता कसा काय असू शकतो.!!

पण मग समजतं की यात आश्चर्य असं काही नसतं. तुम्ही तुमचं काम सचोटीनं करता. लोकांना चांगलं जेवू घालता. त्यांना तृप्त होऊन जाताना बघता. ते तुमचं संचित असतं, ते काही वाया जात नाही. नंतर हजार दिशांनी, हजार वाटांनी ते तुमच्याकडे माघारी येत राहतं. तुम्ही तुमचं काम फक्त परफेक्ट करत रहा. 'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!' असं समजा. याकडे निव्वळ धंदा म्हणून न बघता, हा एक अनादि अनंत यज्ञ चाललाय, असं समजा. आणि यज्ञाच्या सूत्रसंचालनाची जी काही जबाबदारी तुम्ही स्वीकारलीय ती चोखपणे पार पाडा. बाकी सगळं जगदुनियेवर सोडून द्या. त्याचं काय नसतं एवढं. दिलं-घेतलं काय असतं शेवटी?

गर्दीच्या वेळांमध्ये मालकांमध्ये वीज संचारते. पावनखिंडीत शिर तुटून पडलं तरी बाजीप्रभूंचं कबंध नाचत होतं, म्हणतात. इथं हे एका हाताने कानावर मोबाईल पकडून ऑर्डरी घेत, दुसऱ्या हाताने इशारे करत पार्सल घ्यायला आलेल्यांचं किंवा वेटींगमधल्यांचं बसण्याचं नियोजन करत हॉलभर भुईचक्रासारखे भिरभिरत असतात.

रात्री उभं रहायला जागा नसते दाराबाहेर. अशा गर्दीतही आरडाओरड नाही, किंचाळणं, भांडाभांडी नाही. हा म्हणजे एक प्रकारचा अप्रतिम काव्यात्म कोलाहल नांदत असल्यासारखा वाटतो. पण त्या कोलाहलासही स्वतःची एक शांत धीमी लय असते. कधीकधी हे दृश्य एखाद्या क्लासिक सिनेमासारखं वाटतं. ज्यात एका कोपऱ्यातल्या टेबलशी मी माझा यज्ञ शांत करत बसलेला दिसतो.
IMG_20241106_195150~3.jpg----------------------***********------------------

२. सदाशिव पेठेतच 'हॉटेल नागपूर' म्हणून एक भोजनालय आहे. टिळक स्मारक चौकातून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर. टिपीकल ओल्ड स्कूलचं, त्यामुळे काही 'शो' नाही. झगमगाट असा काही नाही.

जुना, नव्वदच्या दशकातला काळोखा ॲंबियन्स. एकावेळी जास्तीत जास्त तेरा चौदा लोक बसू शकतात, एवढंच, छोटेखानी. दोन्ही बाजूच्या भिंतीकडेला स्टूल्स ठेवलेले असतात. त्यावर बसून भिंतीकडे बघत रहायचं. इकडं तिकडं बघायची सोयही नाही, कारणही नाही, आवश्यकताही नाही आणि मुळात बघण्यासारखं काही नसतंही. मेन्यकार्ड प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर भिंतीवर चिटकवलेलं, त्यात मोजकेच ऑप्शन्स.! कन्फ्युजनला काही स्कोप नाही.

मग एक ताट. त्यात एका प्लेटमध्ये पात्तळ रश्शात बुडालेले वाफाळलेले मटनाचे तुकडे, भाकरी, कांदा, लिंबू, मीठ.! खलास.! सप्ला विषय.‌! इतर कसलीही सजावट नाही. बिनकामाच्या पदार्थांची गर्दी नाही. गप खाली बघून आपापलं चालू करायचं.

हा जो रस्सा आहे, खरी जादू त्यात आहे. कायतरी करणी भानामती चेटूक मंत्र तंत्र वगैरे. दोन घोट घशाखाली उतरताच अन्ननलिका लख्ख उजळते. धुवॉं धुवॉं होते. म्हणजे रस्सा काही तिखटजाळ असतो, असं नाही. म्हणजे जिभेवर आगीचा लोळ पसरतो, असं नाही. तर अगदी बारीक बारीक सूक्ष्म फुलबाज्या तडतडायला लागतात जीभेवर !

जीभेवर एक हल्का झटका बसतो. आणि जीभ त्याला तात्काळ आणि उत्कट प्रतिसाद देते. रंध्रं मेंदूतली मोकळी होतात, आणि तोंड खवळतं. आणि मग आपण तुटून पडतो.

पाचेक मिनिटांनी कधीतरी कानांमागून घामाचा एक बारीक थेंब मानेवर ओघळतो. बास्स. हे एवढंच आणि असंच पाहिजे.!! एका वयानंतर पार घामाघूम होईपर्यंतची लढाई सोसवत नाही.! पण अशी ह्या रश्शाची चटक लागते.

बाकी, ही काही फॅमिली टाईपची जागा नाही, साधी आहे. म्हणजे गल्ल्यावर मालक, वाढायला एकजण, आणि आत पडद्याआड भाकऱ्या थापायला एकजण. हे दोघे इंट्रोवर्ट तरी आहेत किंवा निरीच्छ मनोदशेला तरी पोचलेलेयत किंवा कसलीशी रहस्यमयी गुळणी तरी धरून बसलेलेयत.! मी चौकशी केली नाही.

जरूरीशिवाय कुणी कुणाशी बोलत नाही तिथं. पद्धत नाही तशी. फालतूचं अगत्य, बनावट आपुलकी, कृत्रिम मॅनर्स वगैरे तर अजिबातच मिळत नाही म्हणजे. जेवायला आलायत ना? मग जेवा आपापलं, आणि निघा. उगाच अघळपघळ गळ्यात पडू नका.! आवडलं म्हणून लगेच खांद्यावर हात टाकायला जाऊ नका..!

बाकी, कधीकधी शेजारी येऊन बसलेला एखादा 'टाईट'ही असू शकतो. तर असू द्यावं. तो काय आपल्याला त्रास देत नाही. आणि तो तरी बिचारा कुठं जाणार??

महत्वाचं म्हणजे तिथं कुणालाही कसलीही घाई नसते. खरंतर आयुष्यात कसलीही घाई नसलेलेच तिथं येतात. आणि मग येतच राहतात. बहुतांशी चाळीशी पन्नाशी नंतरचे, स्थिरावलेले गृहस्थ, एकांडे शिलेदार ! आता चवीत कसलाच बदल करून घ्यायची चाह, इच्छा, ऊर्मी आणि गरजही न राहिलेले लोक.!

तसे डबे वगैरे पिशवीत घालून पार्सल न्यायला आलेलेही असतात बरेच, पण आता सदाशिवपेठ म्हटल्यावर कशाला उगाच जास्त खोलात शिरा..!
IMG_20241115_173559~2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉटेल नागपूर माहिती नाही, कारण मी मांसाहारी नाही. पण पूना बोर्डिंग हाऊस मात्र मला प्रचंड आवडतं..गेल्या वर्षी खूप वर्षांनी तिथे जेवले आणि आत्मा तृप्त झाला! इतकं साधं, तरीही चविष्ट जेवण. दुसऱ्या कुठल्याही डायनिंग हॉलपेक्षा मला पूना बोर्डिंग हाऊस जास्त आवडतं. श्रेयसपेक्षाही कणभराने जास्त.

छानच लिहिले आहे..
दोन्ही ठिकाणी तुमच्यासोबत जेवून आल्याचे फिलिंग आले..
पुणे हॉटेलमध्ये जाऊन जेवायला आवडेल...
नागपूर पार्सल घेऊन हॉस्टेल रूमवर जाऊन खायला आवडेल.. मला ते ओळीने बसून भिंतीकडे बघून खा सीटिंग अरेंजमेंट फार वैतागवाणी वाटते. पण नेमके अश्या जागीच चवदार पदार्थ असतात.

मस्त लिहिलंय. अगदी सुग्रास. Happy
दोघे इंट्रोवर्ट तरी आहेत किंवा निरीच्छ मनोदशेला तरी पोचलेलेयत किंवा कसलीशी रहस्यमयी गुळणी तरी धरून बसलेलेयत>>>>> Lol

पुण्याला गेलं की नागपूर हाॅटेलला फेरी ठरलेली.
हाॅटेल उघडायच्या आधीपासून दुपारी रांग असते.
संध्याकाळी कधी गेलो नाही. जेवण एकदम मस्तच तिथलं.