व्यसनातून जाताना

Submitted by संप्रति१ on 6 September, 2024 - 13:59

हे दारूच्या व्यसनासंबंधी टिपण आहे. दारूसोबतच्या बारा वर्षांच्या प्रवासात मला लागलेला चकवा, या अनुषंगाने हे टिपण आहे. अशा प्रकारच्या मजकुरात सहसा जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे, ते चर्चमध्ये देतात तशा कन्फेशन च्या वळणावर जाताना दिसतं. इथं तो मोह टाळून सिंपलशॉट आठवणींच्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न केला आहे.

हे लिहिण्याचं प्रयोजन, दारूसोबतचा माझा संघर्ष सांगून वाचकांना भकास करणं हा नाही. किंवा 'दारू नको, दूध प्या' वगैरे चळवळीत वाचकांना ओढणं, हे ही प्रयोजन नाही.
प्रयोजन, मला हे असं असं आठवतंय, एवढंच आहे. शिवाय हे आठवणं आत्ताचं या क्षणाचं आहे. ते बदलून जाण्याआधी लिहून टाकलेलं बरं, म्हणूनही लिहिलेलं आहे.

सुरूवात कॉलेजात असताना मजेमजेतच झालेली. या काळात दारूनं चांगला आनंद दिला. होस्टेल लाईफमध्ये बरेच मजेशीर, नॉस्टेल्जिक किस्से दिले.
नंतरच्या काही वर्षातही गोष्ट कंट्रोलमध्ये होती. पिताना चांगल्या चर्चा होत असत. त्यातून ज्ञानात भर पडत असे. शिवाय त्या अलवार अवस्थेत गाणी, गझला, कव्वाल्या ऐकताना एरव्ही लक्षात आली नसती अशी कलाकुसर लक्षात येत असे. एरव्ही जे समजलं नसतं ते समजत असे..!

मग येते नोकरीची फेज. पैसा येत राहतो. आणि त्याजोडीला त्याची किंमतही चुकवावी लागते. रोजचं जगणं साखळदंडांनी जखडलं जातं. अस्थिरता, तणाव, भय यांच्याखाली चिणून जात असतो. ऐन तिशीत मनाचं मृदू प्रतल फाटत चाललेलं असतं. एकेकाळचा तारूण्यातला तो सगळा पारिजातकाचा बहर कोमेजून जातो. उपाय काय? तर दारू.

पिल्यावर सगळे निर्बंध सैलावतात. एकप्रकारच्या मुक्तीचा, पॉवरचा आभास होतो. त्यामुळे प्यायला काही निमित्त लागत नाही. आनंद झाला प्या. पाऊस आला प्या. टेन्शन आलं प्या. सेलिब्रेशन आहे प्या. वीकेंड आला प्या. आऊटींग आहे प्या. कुणाचा बड्डे आला प्या. पगार झाला प्या. ट्रिपला चाललाय, जाताजाता येतायेता पितच रहा. लेव्हल कमी नाही झाली पाहिजे.

अशानं क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सीची सूत्रं हातातून निसटली. हे कधी कसं झालं कळलं नाही. पिल्याशिवाय बरंच वाटत नाही, अशी जीवन-अवस्था. रोज संध्याकाळी तेच. खूप पिणं, रात्री कधीतरी मोबाईलवर डोळे तारवटून थकून झोपी जाणं, रात्री बेरात्री झोपेतून उठून बसावं तर बाहेर बिनचंद्राचं झरणारं आभाळ दिसणं. सकाळी चुरचुरत्या डोळ्यांनी झोपेतून उठणं, उठताक्षणी मरगळ आणि नवीन दिवसाची नवीन चिंता सतावणं, आरशापुढे उभं राहिल्यावर आपला आत्माच सडून गेलाय की काय असं वाटणं.

चाललंय हे योग्य नाही, हे कळत असतं. पण तो फोर्सच एवढा पॉवरफुल असतो की कधी आपण वाईनशॉप मध्ये जातो, कधी जामानिमा घेऊन येतो, कधी निवांत पेग रिचवत बसतो, आणि प्यायला लागलं की वेड्यासारखं पितच राहतो, कळतही नाही. आपोआपच होतं. असं वाटतं की हे आपल्या नकळत दुसरंच कुणीतरी करतंय. हे असं व्यक्तिमत्त्व दुभंग होतं.

खूप पिल्यावर, ती ठार बधिर अवस्था गाठल्यावर तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळं आयुष्य जैसे थे उभंच असतं.!! नशेत असताना आपले सगळे प्रॉब्लेम्स आपल्या पाठीमागे दबा धरून बसलेले असतात. आपण नशेतून बाहेर आल्याक्षणी वेताळासारखे झडप घालतात.‌ आणि छळायला लागतात. म्हणजे पिणं हे तात्पुरत्या सुटकेसारखं आहे. पर्मनंट सुटका काय होत नाही.

भयाण नशेत असताना माणूस जे काही करतो, बोलतो, वागतो, ते धक्कादायक असतं. अगदी तळ गाठणं, म्हणजे फूटपाथवर लडखडत चालणं, अडखळून पडणं, पुन्हा उठता न येणं, तिथंच रांगणं, ओकताना रक्त ओकणं, हेही प्रकार झाले.

शिवाय, आपल्याविषयी बरी भावना असणाऱ्या व्यक्ती असतातच. हरेक काळात एखादीतरी असतेच. नशेत असताना आपण या व्यक्तींना कसं वागवतो, हे तेव्हा कळत नाही. तेव्हा विवेक, साक्षेप राहत नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उतरल्यावर पश्चात्ताप, आत्मकरूणा, आणि डार्क हॅंगओव्हरच्या लाटा आदळतात. त्याचा सामना करायला सकाळी सकाळीच उतारा.

कधीकधी निग्रहानं काही महिन्यांचा गॅप पाडण्यात यश मिळवलेलं असतं. अट्टल बेवड्याला (टॅंकरला) दोन दिवसांचा गॅपही सहन होत नसतो. मग एकेक दिवस मोजायचो, आज चार दिवस झाले, दहा दिवस झाले वगैरे. (हे असे दिवस मोजणं खरंतर पोरकटपणाच असतो.) प्यायचा मोह होईल अशा सर्व शक्यता, प्रसंग, व्यक्ती, ठिकाणं टाळायचो. भीती असायची की बैठकीतल्या लोकांसोबत बसलो आणि कुणी आग्रह केला तर कुठल्याही क्षणी माझ्या तोंडातून जाईल की 'भरा माझा पण.!'
आणि मग सुसाट चालूच होईल. 'रिपीट करो ब्लेंडर्स' 'और एक रिपीट करो', 'और एक रिपीट करो'. 'और सुनो ना, दो लाईट्स भी लाना.. और लायटर.!"

खूप ऊर्जा खर्च होते या आंतरिक झगड्यात. तो झगडा खरंतर फार हास्यास्पद आणि काल्पनिक असतो. पण तो त्यावेळी अगदी खराखुरा वाटतो.

तर प्रत्येक वेळी पुन्हा डबल वेगानं दारू चालू झाली. मी एकेकाळी सरंडर करून टाकलेलं. म्हटलं की आता काय आपल्याच्यानं होत नाही. आपण काय आता दारूला हॅंडल करू शकत नाही. साला दारूसारख्या क्षुद्र गोष्टीसमोरही हरलो.!
आता आपल्याला मदतीची गरज आहे, हे तेव्हा कळत होतं. पण ते मान्य करून एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात जाणं टाळत राहिलो. आणि दारू समांतरपणे चालूच राहते.

शेवटी कधीतरी अशाच एका सकाळी हॅंगओव्हरच्या दशेत,
पराभूत मानसिकतेत एका व्यसनमुक्ती केंद्रात गेलो. तिथंही माझी बहाणेबाजी चाललेलीच की माझी काही एवढी वाईट अवस्था आलेली नाहीये अजून वगैरे वगैरे.

पण त्यांचे काऊन्सेलर्स खमके असतात. त्यांनी ऐकून घेतलं घेतलं आणि शेवटी जवळपास ओरडलेच की, "मी काय सांगतोय ते कळतंय का तुम्हाला ? तुम्हाला महिनाभर ॲडमिट व्हावं लागेल.!! आणि तेही लवकरात लवकर.!! नाहीतर तुमचं हे आणखीनच वाढत जाणार आहे.!!"

मला तेव्हा अनोळखी व्यक्तीनं असं अंगावर ओरडणं अजिबात झेपलं नव्हतं. कारण मला तशी ट्रीटमेंट कुणी दिली नव्हती तोवर.!
आज आठवतो तेव्हा वाटतं की तो माणूस योग्य होता. त्याक्षणी मला त्याच भाषेत खडसावलं जाणं आवश्यक होतं.

अर्थात तेव्हा महिनाभर ॲडमिट होणं शक्य नव्हतं. व्यसनमुक्ती केंद्रात जाण्यासाठी बॉसकडून महिनाभर सुट्टी मागणं म्हणजे सगळीकडे बोभाटा. काय इमेज राहिल आपली..!
तर मग ते राहिलं.‌!

आता कुणाला वाटेल की या लेव्हल ला जाऊन आल्यावर तरी मला गिल्ट आला असेल आणि मी रूळावर आलो असेन. तर तसं काही होत नसतं. थोड्याच दिवसांत मी ती व्यसनमुक्ती केंद्राची भेट पूर्ण विसरून गेलो. आणि निर्ढावल्यासारखा पित राहिलो. त्या पिण्यात काहीही मज्जा राहिली नव्हती. ते एक रोजचं निरर्थक कर्मकांड होऊन बसलेलं. म्हणजे कचाकच पेग रिचवायचे. पटकन बधिर अवस्था गाठायची. आणि सुंद पडून रहायचं.‌ त्यात चव अशी काही नाही.

अशात गेली असतील वर्षं दोन वर्षं. आणि मग मार्च २०२० आला. कोविडचा पहिला लॉकडाऊन लागला. सगळा शुकशुकाट. कडक निर्बंध. पोलिस बंदोबस्त. कुठेच दारू मिळेना. चौपट पैसे द्यायची तयारी दाखवली तरी मिळेना. लॉकडाऊन कधी उठेल माहित नाही.
आपण स्टॉक का करून ठेवला नाही, याचा पश्चात्ताप.!
सुरूवातीला हाल झाले.‌ विथड्रॉअल सिंम्प्टम्सच्या जोरदार लाटा यायच्या आणि आता आपण पुन्हा वाहतीला लागणार, असं व्हायचं.‌ वन डे ॲट ए टाईम अशी स्ट्रॅटेजी ठेवली.‌ सुदैवानं बाहेर कुठंच दारू मिळत नव्हती. अटोकाट प्रयत्न, फोनाफोनी करून बघितलं. जर मिळत असती तर मग कंट्रोल झालं नसतं. मी कसंही करून मिळवलीच असती. पण मग दिवस जात राहिले. मनानं परिस्थिती स्वीकारली की आता आपल्याला एक थेंबही दारू मिळणार नाहीये. ते सगळे मार्ग बंद आहेत. बसा शांत.

जवळपास पन्नास साठ दिवसांचा गॅप पडत गेला. दारूची जी विलक्षण तलप असते, तिची ताकद क्षीण व्हायला लागली.
त्याच दरम्यान योगायोगानं तुषार नातू यांचं 'नशायात्रा' आणि आनंद नाडकर्णींचं 'मुक्तिपत्रे' ही दोन पुस्तकं वाचनात आली. नशायात्रा हे एका व्यसनी तरूणाचं प्रांजळ आत्मवृत्त आहे. आणि मुक्तिपत्रे मध्ये एक व्यसनी पेशंट आणि त्याचा काऊन्सेलर यांनी एकमेकांना पाठवलेली पत्रे आहेत.
मला ही दोन्ही पुस्तकं आवडलेली. कदाचित मी तेव्हा मनाच्या दिग्भ्रमित/ केविलवाण्या अवस्थेत असल्यामुळेही या पुस्तकांचा जोरदार इंपॅक्ट माझ्यावर पडला असेल. माहित नाही.

पण ते काहीही असलं तरी नंतर दारूच्या वाट्याला गेलो नाही. म्हणजे प्यावीशीच वाटली नाही नंतर. जणू काही एक चॅप्टर क्लोज झाला. एक पडदा पडला.!

आज साडेचार वर्षं झाली असतील, पूर्ण सोबर आहे. आठवणही होत नाही. कधी लोकांसोबत बारमध्ये जायची वेळ येते. त्या ॲंबियन्स ची सवय सुटून गेलेली असते. बारमध्ये जी टर्मिनलॉजी वापरले जाते, तीही स्मृतीतून निसटून गेलेली असते.
आश्चर्य वाटतं की आपणही एकेकाळी या ड्रिंक्सच्या, ब्रॅंड्सच्या आणि त्यासोबत जे काही लागतं त्या पदार्थांच्या ऑर्डर्स किती सराईतपणे द्यायचो..!

आता मला कुणी आग्रह वगैरे करत नाही आणि मला मोह होईल, अशी भीतीही राहिली नाही. त्या भीतीतून मुक्त झालो.

आता मंद मंद हसत हसत हात जोडतो की नको बाबांनो.!
त्या निखळ हसण्यात काय काय असतं, ते मी कुणाला सांगू शकत नाही.! ते गुपित आहे‌‌..!
बारमध्ये सभोवताली दारूचा महापूर वाहत असताना, त्यामध्ये मी झेन फकिरासारखा आरामात बसून असतो. चखणा, स्नॅक्स, फिश, तंदूर खात खात चाललेल्या चर्चेत कंपनी देत असतो. पण कुणाला दारू न पिण्यावर लेक्चर देत बसत नाही. कारण एकतर सगळेच दारूप्रेमी माझ्यासारखे पार वाहवत जाणारे नसतात.
शिस्तीत आयुष्यभर आनंद घेणारे खूप जण बघितले आहेत.

आणि दुसरं म्हणजे व्यसनी मनुष्य आधीच पुरेसा खचलेला असतो. त्याच्या आत स्वतःबद्दल गिल्ट असतो. त्याबद्दल तो संवेदनशीलही असतो. त्यात पुन्हा आपण त्याला काहीतरी टोचून बोलायचं म्हणजे काही खऱ्याचं नाही. आणि तशा बोलण्याचा फारसा उपयोगही होत नाही, हे मला माझ्यावरूनच जाणवलं आहे. अगदीच फार वाटलं तर प्रोफेशनल काऊन्सेलर्सचा मार्ग सुचवावा वाटतो. पण तेही अगदी हळूवारपणे. त्याची अहंता बिलकुल न दुखावता.

बाकी मला ही जी दारूची भानगड समजलीय ती माझ्यापुरती समजली आहे. बराच काळ एका काल्पनिक शत्रूशी झगडत होतो. हा सगळा झगडा म्हणजे माझ्याच मनाचा खेळ होता. ही एकप्रकारे मानसिक रूग्ण असल्याचीच अवस्था होती, हे आज कळतं. ही साधी गोष्ट कळण्यासाठी मध्ये एवढी वर्षं जावी लागली. आणि त्या ट्रॅपमधून सुटलो तोही एक योगायोगच होता.

असो. हे थोडंसं लांबलं. फक्त दारूनंतरच्या या वर्षांतलं एक इंटरेस्टिंग निरीक्षण आहे, ते सांगून थांबतो. माणसाचं मन फार काळ निर्वात पोकळीत राहू शकत नाही. एका गोष्टीचा अभाव ते दुसरीकडून भरून काढतं.‌ दारूचा अभाव मनानं पुस्तकांतून भरून काढला. मी पूर्वीही वाचत असे. पूर्वीही पुस्तकं विकत आणत असे, नाही असं नाही. पण मागच्या चार वर्षांत ज्या वेगानं माझ्याकडे पुस्तकं साठायला लागली आहेत, त्या वेगाचं मला फारच नवल वाटतं. तसं बघायला गेलं तर हेही एक व्यसनच समजा. पण सेल्फ डिस्ट्रक्टींग नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन! फार छान लिहीले आहे. एकदा त्यातून बाहेर पडल्यावर पुन्हा कॅज्युअली सुद्धा त्या वाटेला गेला नाहीत हे महत्त्वाचे. आणि पुढील व आयुष्याकरताही शुभेच्छा!

व्यसनाच्या काळात जे लोक दुरावतात त्यांच्याशी पुन्हा पूर्वीसारखे संबंध प्रस्थापित कसे केलेत वगैरेही वाचायला आवडेल.

बाकी लॉकडाऊनमधे 'मिळत नव्हती' म्हणजे तुम्ही असे अट्टल दारू पिणारे नव्हतात असा अर्थ आहे. >>> मी उलट असा अर्थ लावला की सोडायची प्रबळ इच्छा होती पण सुटत नव्हती. ते बधिरपणे रोज पिणे वगैरे वाचल्यावर तसेच वाटले. मग कोव्हिडकाळात दारू सहज मिळणे अवघड झाले, व ती संधी यांनी घेतली.

>>कारण एकतर सगळेच दारूप्रेमी माझ्यासारखे पार वाहवत जाणारे नसतात. शिस्तीत आयुष्यभर आनंद घेणारे खूप जण बघितले आहेत.<<
छान लिहिलंय. वरचं वाक्य, एस्पेशियली त्यातला प्रामाणिक-सरळसोटपणा आवडला... Happy

व्यसनातून तुम्ही मुक्त झालात आणि आता गुंतण्याची भीती नाही याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. पुढील आयुष्य असेच व्यसनमुक्त राहो ही सदिच्छा.
माझ्या काकांना सिगारेटचे व्यसन होते. चेन स्मोकर. पहिला heart attack त्यांना चाळिशीत आला. मी तेव्हा लहान होते त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काय सुनावले ठाऊक नाही. घरी आलयावर एके दिवशी एका झटक्यात सगळी सिगारेट पाकिटे फेकून दिली. पुढच्या 45 वर्षांत कधीच सिगारेट ओढली नाही. एकदा मन खंबीर झालं की माणूस काहीही करू शकतो.

अतिशय प्रांजळ आणि जबरदस्त लिहिलंय.
कोविड लॉकडाऊनची ही बाजू फार कुणाच्या लक्षात आली नसेल. >>> +९९९९

मुक्तीपत्रे पुस्तक वाचलेले आहे, फारच सुंदर लिहिलंय.

अफाट प्रांजळ आणि प्रेरणादायी लिहीले आहे. तुमची इच्छाशक्ती प्रबळ तर आहेच पण ईश्वरी कृपा आहे तुमच्यावरती. कारण या व्यसनातून यशस्वी एकवेळ माघारी येता येते पण परत त्या गर्तेत न पडणे हे सुद्धा जमायला लागते.

मला नखे खाणे सोडायचे आहे. तुमचा लेख वाचून प्रयत्न करेन.

>>>मला नखे खाणे सोडायचे आहे. तुमचा लेख वाचून प्रयत्न करेन.>>>
फक्त मनावर बिंबवा आजवर मी माझ्यासाठी जगले. आता माझ्यावर माझ्या कुटुबियांचा हक्क आहे. मला त्यांच्यासाठी जगायचंय.
या मत्रांची अनुभुती मी स्वतः घेतलीय.

कसलाच आव न आणता असं प्रामाणिक लिखाण करणारे फार च विरळा! अभिनंदन तुम्ही आत्मबळावर हे जोखड पेलून दाखवलेत & तावून सुलाखून बाहेर पडलात.
प्रचंड आवडला हा लेख Happy

दारू क्षुद्र आहे पण व्यसन ही फार मोठी लढाई असते. नशायात्रा वाचले आहे.जिंकलात तुम्ही.
व्यसनमुक्त सुंदर आयुष्यासाठी शुभेच्छा.

दारूचे व्यसन फारच वाईट. सुटता सुटत नाही. माझे सिगारिटचे व्यसन सुटले. दारूचे व्यसन सुटले असे वाटले. पण आजच दारू पितो आहे!
तसे मधे बरेच महिने दारू प्यायलो नव्हतो, पण मधून मधून अजून होते!!

प्रांजळ! माझ्या माहेरी एका जवळच्या व्यक्तीला ह्या सगळ्यातून जातांना पाह्यलं आहे, त्यामुळे फार relate झालं, सदैव मुक्त रहा! शुभेच्छा

साहेब मस्त लिहिले आहे, अशीच मला सिगरेट ची सवय लागलेली होती, सुरवातीला 2 पाकिटे एका दिवशी यावरून आता दर 3 दिवसांनी 1 सिगरेट यावर आलेलो आहे, आता हळूहळू आठवड्याला 1 आणि नंतर महिन्याला 1 करून पुर्ण बंद करायचा बेत आहे.

एकदम पुर्ण सोडणे जमत नाही, आधी प्रयत्न करून झालेला आहे, कोल्ड टर्की म्हणतात त्याला.
पण ही स्त्रतेजी काम करते आहे

>>>>>पण ही स्त्रतेजी काम करते आहे
अभिनंदन. जर प्रोत्साहन हवे असेल तर धागा काढू शकता. सगळे जण मदत करतील.

आता मला कुणी आग्रह वगैरे करत नाही आणि मला मोह होईल, अशी भीतीही राहिली नाही. त्या भीतीतून मुक्त झालो.>>

बाकी मला ही जी दारूची भानगड समजलीय ती माझ्यापुरती समजली आहे. बराच काळ एका काल्पनिक शत्रूशी झगडत होतो. हा सगळा झगडा म्हणजे माझ्याच मनाचा खेळ होता.>>

माणसाचं मन फार काळ निर्वात पोकळीत राहू शकत नाही. एका गोष्टीचा अभाव ते दुसरीकडून भरून काढतं.‌ >>

खूप छान मांडलंय. खास करून या ओळी. अभावाबाबत लिहलंय त्यानं अगदी अगदी झालं.

>>>>>>माणसाचं मन फार काळ निर्वात पोकळीत राहू शकत नाही. एका गोष्टीचा अभाव ते दुसरीकडून भरून काढतं.‌
होय अनुभव आहे.

ती गोष्ट आहे ना, ३ मुलांना वडील सांगतात एका पैशाने असे काहीतरी आणून दाखवा ज्याने खोली भरुन जाईल. जो कोणी हे यशस्वीरीत्या करुन दाखवे त्याला माझी संपत्ती. एक मुलगा सरळ हार मानतो., मधला मुलगा एक पैशाचा, मणभर कचरा आणून टाकतो अर्थात तरी खोली भरत नाही. धाकटा मात्र हुषार असतो. तो एका पैश्याची पणती व उदबत्ती आणतो व प्रकाश आणि सुगंधाने खोली भरुन टाकतो. Happy

तसे मनाचे असते. आपण त्यात चांगुलपणा, प्रेम, ध्येय, शिस्त भरतो, आपण काय वाचतो, मेंदूला काय खाद्य वगैरे वगैरे. तुम्ही व्यसनमुक्त झालात हा टर्निंग पॉइन्ट आहे तुमच्या आयुष्यातला Happy पुनश्च अभिनंदन!

Pages