मायबोली गणेशोत्सव २०२४ - "आमच्या घरचा बाप्पा"

Submitted by संयोजक on 5 September, 2024 - 22:07

वाजत गाजत, थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या, समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीनच उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.

त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

IMG-20240906-WA0020.jpg

मंगलमूती मोरया! गणपती बाप्पा मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा बाप्पा.. गणपती माझ्या माहेरचा... कुलदैवत असल्याने आमच्या बाप्पाचं विसर्जन करत नाही. त्यामुळे दरवर्षी पूजेत पूर्वापार चालत आलेली पंचधातूची गणेशमूर्तीच असते..
IMG-20240909-WA0024.jpg
यावर्षी लेकीला कागदी प्राजक्त-फुलांचा हार करायला शिकवला.
सजावट करतानाचा व्हिडिओ इथे पाहू शकता .
https://youtube.com/shorts/bbyVxSMDKic?si=0YMpxFz4cO6R70we

Ganapati2024.jpg

हा आमच्या घरचा गणपती व यावेळचे डेकोरेशन - प्राचीन देऊळ
कार्डबोर्डचे एक देऊळ बनवावे व जमले तर नंतर देव्हारा म्हणूनही वापरावे असा विचार करत होतो. आम्ही दर वर्षी नवीन डेकोरेशन करतो व नंतर या डेकोरेशन्सचे काय करायचे हा प्रश्न पडतो. कधी कधी आमची डेकोरेशन्स मग मित्र वापरतात पण तरीही बरीच नंतर तशीच राहतात. यावेळेस बरेचसे पॅकेजिंग मटेरियल वापरून हे देऊळ तयार केले. साधारण कल्पना काळ्या दगडापासून बनवलेले व सोनेरी नक्षी असलेले एक पुरातन देऊळ अशी डोक्यात होती. कोणत्याही एखाद्या विशिष्ठ देवळाची ही प्रतिकृती नाही. अनेक देवळांचे फोटो व व्हिडीओज पाहून त्यातून एकत्र आलेली ही कल्पना आहे.

यात एका कपड्यांच्या वॉशरबरोबर आलेले पॅकेजिंग मटेरियल बरेचसे वापरले आहे कार्डबोर्डचे विविध प्रकार आणि थर्मोकोल. बॉक्सची पॅनेल्स, कार्डबोर्डचे ठोकळे ई. नक्षीकरता व कार्डबोर्डच्या मधे लिंपणासारखी भरायला "मॉन्स्टर क्ले" ची माती. खाली "माती" म्हणून जो उल्लेख आहे ती ही मॉन्स्टर क्ले आहे पण वाचायला सोपे म्हणून "माती" असा उल्लेख केलेला आहे. ही माती "प्ले डो" सारखी पण प्रचंड घट्ट असते. तापवल्यावर पाहिजे तशी वळते आणि नंतर जेथे लावाल तेथे चिकटते.

खोके वापरल्याने चौकोनी आकार तयार होता. पण चारी बाजूच्या पॅनेल्सवर कमानी करण्याकरता बाकीचा कार्डबोर्ड कापल्यामुळे त्याचा दणकटपणा कमी झाला. पॅकिंग मटेरियलमधे चारी कोनात अगदी लाकडाच्या वाटतील इतक्या दणकट कार्डबोर्डच्या इंग्रजी एल आकाराच्या पट्ट्या होत्या. त्या मापात कापून चारी कोनात लावल्या. त्यामुळे मग देवळाला आतून भक्कम सपोर्ट तयार झाला. त्याच्या भोवती चौथर्‍याचा आकार करायला कार्डबोर्डचे काही ठोकळे लावून त्यावर एक थर्मोकोलची लेयर लावली. तसेच दोन्ही बाजूला कठडा करायला दोन थर्मोकोलच्या पट्ट्या वापरल्या आहेत. यावर अनेक ठिकाणी जे मोदक दिसत आहेत ते ही त्या वरती लिहीलेल्या मातीचे आहेत. तसेच बांधकामात जसे सिमेण्ट लिंपतात तशी ती मातीही अनेक ठिकाणी जेथे कार्डबोर्ड एकमेकांना जोडले आहेत तेथे लिंपली आहे.

मग फेव्हिकॉल व पाणी याचे मिश्रण करून त्यात कागदाचे तुकडे बुडवून त्यावर "पेपर मॅशे" केले सगळ्या बाजूंनी. ते वाळल्यावर जुन्या दगडासारखा पृष्ठभाग नीट दिसू लागला. त्यावर काळा रंग लावला. छतावर बाहेरच्या बाजूने आधी कार्डबोर्डच्या साधारण एक इंच रूंदीच्या पट्ट्या उभ्या चिकटवून मग त्यावर त्या शेडसारख्या फ्लॅप्स चिकटवल्या. वेगवेगळे साचे वापरून त्यात माती भरून ते भिंतींवरचे नक्षीचे आकार तयार केले. ते तेथे कार्डबोर्डवर दाबले की बहुतांश आपोआप चिकटत. तरीही त्यावर आणखी डिंक लावला. मग त्यावर सोनेरी रंग लावला. काळ्या व सोनेरी रंगांच्या शेड्सची दोन स्वतंत्र विविध मिश्रणे करून/बदलून पाहिजे तशा छटा मिळाल्यावर वापरली.

छतावर कार्डबोर्डवर एक थर्मोकोलची लेयर लावली. त्यावर थर्मोकोलचाच एक अष्टकोनी आकार ठेवला. त्यावर पुढे गणपती आणि बाजूला मोत्यांचे डिझाइन असलेले काही क्राफ्ट पीसेस, आणि त्यावर अष्टविनायकाची चित्रे आणखी एका थर्मोकोलच्या थोड्या लहान पण अष्टकोनी आकारावर लावली. मग त्या दोन्हीच्या मधे एक मोटर वापरून फिरणारी डिस्क चिकटवली. त्यातून रंगीत प्रकाशही येतो व ती फिरत राहते, त्यामुळे अष्टविनायकातील प्रत्येक गणपती पुढे येत राहतो. त्यावर वरती कळस व नंतर समोरची घंटा - घंटेचा आकार व त्यावर तीच माती - ती वरती पुढच्या कमानीमागे आतून चिकटवली. एल आकाराच्या त्या पट्ट्या बर्‍याच होत्या. त्यातल्या काही मग पायर्‍यांकरता वापरल्या. त्या सलग आडव्या राहाव्यात म्हणून आतमधे कार्डबोर्ड च्या ठोकळ्यांचा थोडा सपोर्ट दिला.

त्यातून आम्हाला पाहिजे तसा रंग व आकार तयार झाला. तरी आदल्या दिवशीपर्यंत त्यात कोठेतरी जेथे सिमेट्री किंवा अलाइनमेण्ट दिसत नाही असे वाटले तेथे थोडेफार बदल करणे सुरूच होते Happy

साधारण २-३ आठवडे जवळजवळ रोज एक दोन तास हे काम करत होतो. यात विकत घेतलेल्या गोष्टींच्या लिंक्स मी कोणाला हव्या असतील तर देईन. आम्ही ज्या क्लिप्स/फोटो पाहिले त्यातील ही एक क्लिप आम्ही संदर्भाकरता सर्वात जास्त वापरली. आमच्या देवळाचा आकार यातील देवळापेक्षा थोडा मोठा आहे पण "प्रमाण" साधारण तसेच आहे. ती फिरणारी डिस्क बॅटरी खूप खाते पण तिला पॉवर अ‍ॅडॅप्टरही आहे - आम्ही नंतर त्यावरच लावली. ती अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतली. प्राचीन देवळांवर इलेक्ट्रिक मोटरने फिरणारी डिस्क नसते हे माहीत आहे पण तेवढी "डेकोरेशन लिबर्टी" घेतली आहे Happy

हे डेकोरेशन प्रचंड आवडले सर्वांना. म्हणून इथेही इतके सविस्तर लिहीले आहे. यातील वापरलेल्या वस्तुंबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर विचारा.

सुरेख झालय! तुझ्या डेकोरेशनचा युट्युब व्हिडीयो असेल तर लिन्क दे..मला प्राचिन देवळाची आयडीया फार आवडलिये, मी करेलच अस नाही पण दादाला देइल..

तु दिलेल्या क्लिपमधल देउळ पण छान सफाइदार झालय पण एक्दम झगर मगर सोनेरी कागद वापरुन त्यानी त्यातल अ‍ॅस्थेटिकच घालवुन टाकल..

सुंदर गौरी जाई. मोहक चेहरा आहे अगदी. /\ Happy
यामागे घरातील स्त्रियांची मेहनत लागते माहिती आहे म्हणून कौतुक.

थँक्स ममो ताई .

अस्मिता थँक्स, होय ! आम्हा सगळ्या जाऊ बाईंचे , नणंदांचे काही ना काही रुपात हातभार लागलेत

सर्वच बाप्पा सुरेख आहेत. Happy

फारएण्ड, दंडवत. /\
तो प्राचीन मंदिराचा रंग फारच पर्फेक्ट आला आहे. शिसवी - दगडी - किंचित तेलकट किंवा rustic वगैरे. सोनेरी सुद्धा तसाच worn out आहे. ते प्राचीन वाटणे ही फारच कमाल आहे. फिरणारे अष्टविनायक, वरचा घुमट, पायऱ्या घंटा, कमान, हे साचेबद्धपणे वळवणे वगैरे कमाल. त्यासाठी रोज वेळ काढून करणे. हॅट्स ऑफ. गणपती बाप्पा खूश झाला असणारे. कलाकार आहेस, कौतुक. Happy

फारच सुंदर आहेत सर्वांची डेकोरेशन्स,
फारएण्ड, एक साष्टांग नमस्कार माझ्यातर्फे.सुंदर फिनिश आलेय(हे पुण्यात कोणा मखर वाल्याने बनवले तर निश्चितच 4000 च्या वर विकेल.बिझनेस चालू होउदे us मध्ये.)

फारएण्ड, दंडवत. /\
+786
भारीच आहे.. आणि अशी उत्साहाने मेहनत घेणे कमाल. चाळीतले बालपण आठवले. कारण हल्ली हे लोप पावले आहे.
मायबोली गणेशोत्सवात एखाद्या वर्षी अशी मखर बनवायची स्पर्धा हवी आणि त्यात असेच प्रत्येकाने सविस्तर सांगायला हवे.

अरे धन्यवाद लोकहो, पण तुमचे दंडवत मी बायकोला ट्रान्स्फर करेन. मी यात मदत केली आहे पण कल्पना, कोणत्या साहित्याने काय इफेक्ट येईल याचा विचार, डिझाइन आणि मुख्य काम सगळे तिचेच. क्राफ्ट मला जमत नाही. मी कार्डबोर्ड कापून देणे, ती माती साच्यात घालून देणे, पेपर मॅशेकरता ते कागद चिकटवणे वगैरे स्पेसिफिक कामे केली आहेत यात Happy

शिसवी - दगडी - किंचित तेलकट किंवा rustic वगैरे. सोनेरी सुद्धा तसाच worn out आहे >>> हे असे जाणवत असेल तर उद्देश सफल झाला. कारण तसे दिसावे अशाच उद्देशाने बनवले आहे.

या प्रतिक्रियांचे स्क्रीनशॉट्स देतो तिला.

Pages