वन डिश मील- डाळी दोसा - मॅगी

Submitted by मॅगी on 7 September, 2024 - 06:29

सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

साहित्य:
मूग, तूर आणि मसूर या डाळी - प्रत्येकी अर्धी वाटी
तांदूळ - एक वाटी
लसूण - पाच सहा पाकळ्या
हिरवी मिरची - दोन
जिरे - एक टीस्पून
मीठ चवीनुसार
लोणी, लसूण चटणी रंगरंगोटीसाठी!

कृती:
१. डाळी आणि तांदूळ पाणी थोडे वर राहील इतके भिजवून दिवसभर ठेवा. रात्री ते पाण्याशिवाय मिक्सरमधून फिरवून रवाळ पातळसर पीठ झाकून ठेवा.

२. सकाळी पीठ आंबून छान फुगलेले असेल. त्यात लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आणि मीठ घाला. थोडे पाणी घालून बॅटर नीट ढवळून घोटून घ्या.

३. तवा तापल्यावर त्यात थोडं तेल फिरवून दोसा घाला. झाकण ठेवा, थोड्या वेळाने उलटून दुसरी बाजू शिजू द्या. तव्यावरून नीट सुटायला लागला की काढून ताटात घ्या.

IMG-20240907-WA0002.jpg

४. चमचाभर घरचे पांढरे लोणी दोश्यावर वितळवून वरून लसणीचे तिखट भुरभुरा. आवडत असेल तर दह्याबरोबर खाऊ शकता.

IMG-20240907-WA0003.jpg

मी दोसा म्हणतेय पण या पदार्थाला धिरडे, आंबोळी, घावन काहीही म्हणता येईल :p लहान मुलांसाठीही हा उत्तम पौष्टिक पदार्थ आहे. आवडीने खातात.

वेळ: एक दिवस आणि एक रात्र पीठ आंबून तयार होण्यासाठी, दोसा दहा मिनिटात होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी आहे आणि पौष्टिक पण.यात सर्व डाळी आणि तांदूळ एकत्र भिजवले तर चालतील की 3 डाळी एकत्र आणि तांदूळ वेगळे भिजवावे लागतात?

मी पूर्ण रेसिपी डोश्यावर मॅगी कधी आणि कशी पसरवणाऱ याची वाट बघत वाचली Happy

बाकी मुलांना डाळीचे डोसे आवडतात. आमच्याकडे सुद्धा वन डिश मील म्हणूनच काही वेरीएशन होतात.

मस्त रेसिपी.

वन डिश मध्ये एकसो एक पाकृ येताहेत.

छान आहे रेसिपी...करून पाहणार.
माझ्या सारख्या सैपाकात फार वेळ न घालवणार्या लोकांना फार उपयुक्त होणार आहे हि वन डिश मिल स्पर्धा...