रोमहषर्क जीवन भाग ४

Submitted by अविनाश जोशी on 30 August, 2024 - 07:12

रोमहषर्क जीवन भाग ४
मी दुबई, ऑस्ट्रिया, बव्हेरिया , इंग्लंड किंवा सिंगापूर येथे कोठेही सेटल होऊ शकलो असतो. पण या सर्व देशात तिथल्या समाज्यात आपण एकरूप होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी भारतीयांचे वेगेळे ग्रुप होतच राहतात. माझ्या अनेक प्रवासात मला सेटल व्हायला श्रीलंका फारच आवडली होती. कारण नसताना कित्येक वेळेला मी व्हाया कोलंबो प्रवास करायचो. श्रीलंकेचे निसर्ग सौन्दर्य आणि विविधता खरोखरच वेड लावणारी आहे. पाचूचे बेट हे त्याचे सार्थ नाव आहे. माझ्या एका आवडत्या लेखकाने ऑर्थर सी क्लार्क हा पण वयाच्या ४०व्या वर्षी इंग्लंडहुन श्रीलंकेत गेला होता. त्याच्या निवासस्थानी मला २-३ वेळा भेट घ्यायची संधी मिळाली होती.
अखेर मला कटुनायके फ्री ट्रेड झोन मध्ये एका मोटोक्रॉस बायसिकल कंपनीची एग्झिक्युटिव डायरेक्टर पोस्ट साठी ऑफर आली. मी तातडीने होकार देऊन तेथे गेलो. तेथे माझा, मोठी गार्डन्स आणि २-३ लॉन्स असलेला ५ बेडरूमचा बंगला होता. त्याच बरोबर मेड, कूक ,व्हॅले कम हाऊसकिपर, माळी अशी नोकर मंडळीही होती. इतका लवाजमा बाळगणे फक्त अब्जाधीशालाच शक्य झाले असते. आमच्या कारखान्याचे उत्पादने सुरु होऊन हॉलंडला निर्यात सुरु झाली. असे ७-८ महिने छान गेले. माझ्या भारतात महिन्याला २-३ ट्रिप चालूच होत्या.
सिंहली लोक तसे शांतताप्रिय. मला अनेक सिंहली मित्र मिळाले होते आणि मी त्यातल्या कित्येकांबरोबर श्रीलंकाभर भटकत होतो. श्रीलंकेत तामिळांचे प्राबल्य उत्तर भागात आहे. तामिळनाडूहून हा भाग फारच जवळ आहे. तेथील तामिळांचे साधारण खालील भाग पाडता येतील. राजा चोलचौला साम्राज्यातील १३ व्या शतकात गेलेले तमिळ, १७व्या शतकानंतर ब्रिटिशांनी चहाच्या मळ्यावर मजूर म्हणून नेलेले तमिळ, आणि सरकारी नोकरी केलेले असंख्य तमिळ . तामिळना श्रीलंकेतून फुटून वेगळे राज्य निर्माण करायचे होते. जात्याच तमिळ लोक भरपूर शिकत असल्याने अनेक ठिकाणी त्यांचा वरचष्मा होता. सिंहली भाषा न येणे त्यांना भीषण वाटत होते. उत्तरेकडील विभागात प्रभाकरन या बंडखोराने प्रचंड तमिळ सैन्य उभारले. त्यांना टायगर्स असे म्हंटले जात होते. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी श्रीलंकेचे लष्कर उत्तर भागात ठाण मांडून बसलेले असे. माझ्या भटकंतीत दोन वेळा तरी टायगर्सनी माझी कार अडवली होती. याच टायगर सैन्याला आवरण्याकरिता राजीव गांधीने लष्कर पाठवले होते आणि त्यातूनच पुढे तमिळांनी राजीव गांधींची हत्या केली.
१९८३ च्या गुरुपौर्णिमेला आम्ही बरेचजण संध्याकाळी एकत्र जमलो होतो. अर्ध्यातासानंतर संयोजकांनी सर्वांना तातडीने घरी जाण्याची सूचना केली आणि शक्यतो घराच्या बाहेर पडू नये असेही सुचवले. चर्चा करायला सुद्धा थांबू नका असे सांगण्यात आले. नंतर थोड्याच वेळात असे कळले की टायगर्स नी मारलेल्या १५-२० सैनिकांची प्रेते कोलंबो मध्ये आणण्यात आली आहेत. तेवढी ठिणगी पुरेशी होती आणि तामिळ विरोधी प्रचंड दंगल त्यारात्री कोलंबोमध्ये सुरु झाली. एका रात्रीत तामिळ दुकाने जाळून , तामिळ घरांवर हल्ले सुरु झाले. दुसऱ्यादिवशी सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय बंद पडले. वस्तूंचे भाव आकाशाला भिडले. १५ रुपये लिटर असलेले दूध दुसऱ्यादिवशी ३०० रुपयांवर गेले. सिंहली लोकांचे मुख्य अन्न भात आणि मासे असल्यामुळे त्यांची वाण वाण होती. आट्याची आयात झाली तरच ब्रेड मिळायचा. सर्व बँका बंद झाल्या आणि छोटी तामिळ हॉटेल्सही जाळली गेली. कोलंबो पोलीस कमिशनर माझा मित्र असल्यामुळे मला आणि ड्राइवरला कर्फ्यू पास होता. बरेच असे भीषण प्रसंग पहिले आहेत. एखाद्या घरातील सिंहली लोकांना बाहेर काढून बाकीचे घरे जाळणे, आतील कोणी बाहेर पडू लागल्यास त्याचे तुकडे करून परत आत टाकणे, कोलंबोच्या बाहेर जाणाऱ्या बसेस अडवून सर्व सिंहली लोकांना खाली उतरवून सर्व तामिळ प्रवाश्यांसकट बस जाळणे असे नित्य घडत होते. त्याच बरोबर टायगर्स नी काहीप्रमाणात बॉम्बस्फोट केले. अशाच एका स्फोटात माझा मित्र आणि उद्योगमंत्री अतुल मुदाली याच्या चिंधड्या झाल्या. अनेक तामिळ मित्र मारले गेले. कारखाना बंद पडल्यातच जमा होता पण काही करून ८०-८५ कामगारांना पैसे देणे जरुरीचे होते. कोलंबो एअरपोर्ट किंवा कारखाना कोलंबो शहरापासून ४०-४५ किलोमीटरवर होता. सर्व तर्हेच्या बँका बंद होत्या. शेवटी असे आढळून आले की लंका ओबेरॉय अथवा ताज समुद्र यासारख्या हॉटेल्समध्ये प्रचंड कॅश जमली आहे , त्याच्याशी बोलणी करून त्यांना चेक देऊन कॅश घेतली आणि कामगारांची निदान महिनाभराची तरी सोय केली. कारखान्यातील गुंवणूक आखाती प्रदेशातील होती. गंमत म्हणजे फक्त हॉंगकॉंग ची दूरध्वनी सेवा चालू होती. तेव्हा हॉंगकॉंगतर्फे भारतात आणि अन्य ठिकाणी निरोप पाठवणे शक्य होते.
काही दिवसांनी तेथे राहण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. दंगलीचे प्रमाण हळूहळू वाढतच होते आणि ते लंकाभर पसरत चालले होते. कोलंबो - चेन्नई एवढीच स्थलांतर सेवा चालू होती. शेवटी सर्वांचा निरोप घेऊन मी एअरपोर्ट कडे जाण्यास तयार झालो. सिंहली लोक कोणाशीही सिंहली बोलत आणि सिंहली येत नसल्यास त्याला तामिळ समजून ठार करत. पोलीस कमिशनर ने मला पोलिसांची गाडी दिली आणि वाटेतील सर्व रोडब्लॉकर्सना संदेश पाठवून माझ्याबद्दल कळवले. ठिकठिकाणी रोडब्लॉकर्सवर थांबत मला एरपोर्टवर पोहचायला साडेसहा तास लागले. नेहमीचा हा प्रवास फारतर १ तासाचा होता. एरपोर्टवर एकच मोठी रांग लागली होती. विमाने चेन्नईवरून येत होती. विमान बस शटर सारखी भरली कि विमान सुटत होते. ही चेन्नई ची शटर सेवा सतत सुरूच होती. अखेर चेन्नईला सर्व प्रवासी उतरल्यावर तेथील लोकं सर्वांचे प्रचंड स्वागत करत होते. कित्येकजण रडत होते, गळ्यात हार घालत होते, हवी ती मदत देण्याचे आश्वासन देत होते. मला पुण्याला जायचे आहे कळल्यावर कोणीतरी दहा मिनिटातच मला चेन्नई - पुणे विमानाचे तिकीट हातात ठेवले, तसेच एकाने पैसे देण्याची तयारी दाखवली. विमान प्रवासाला २ तास अवकाश होता. लोकांनी मला अक्षरशः पोट फुटेपर्यंत खायला घातले. अखेर मी सुखरूप पुण्याला पोहचलो . नंतर हे प्रकरण चिघळत गेले.
अर्थातच श्रीलंकेच्या रम्य आठवणी मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळेच शांतता झाल्यावर मी माझ्या मित्रांना बऱ्याचदा भेलटोही आहे. ऑर्थर सी क्लार्क ५२ वर्षे श्रीलंकेत राहिला पण मला एक वर्ष ही राहण्याचे भाग्य नव्हते हे खरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिले आहे. तुमची लिहिण्याची शैली इतकी सुंदर आहे की सगळे जणू काही डोळ्यासमोर उभे राहतेय. पुढील भागाची वाट बघत आहे.