सीतेचे हरण केल्यामुळे राम- रावण युद्ध झाले हा चुकीचा समज आहे. बहुतेक रामायणाच्या सर्व प्रकारच्या प्रतीमधून एक गोष्ट निश्चित आहे. श्रीराम अवतार मुळातच रावण वधासाठी झाला होता. या लेखात काही दंत कथा, पुराणोक्त कथा आणि वेगळे विचार मांडले जाऊ शकतात.
त्याकाळी आर्यावर्त म्हणून समजला जाणारा भाग अफगाणिस्थानपासून (गांधार देश) ते ब्रह्मदेशाच्या पूर्वेपर्यंत आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेपासून ते स्वर्ग देशा पर्यंत पसरला होता. हा स्वर्ग म्हणजे स्वर्ग - नरक मधला नव्हे. स्वर्ग नावाचा देश तिबेटच्या आसपास कुठेतरी होता. चिनी लोककथांमध्ये सुद्धा शांग्रीला असे राज्य मानले गेले आहे. अनेक राजांनी या स्वर्गावर स्वारी केली आहे. इंद्र याचा अर्थ प्रमुख आणि त्या राज्यातला प्रमुख म्हणजे देवेंद्र किंवा इंद्र. प्रमुख या अर्थाने इंद्र हा शब्द अनेक वेळा वापरला जातो जसे नरेंद्र, राजेंद्र, गजेंद्र इत्यादी.. राजाला तेच नाव ठेवण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आढळते. थायलंड मध्ये रामा १, रामा २ असे बरेच राजे होऊन गेले तर इंग्लंडच्या राजघराण्यात राजाला एडवर्ड, जॉर्ज अशी ठराविक नावे असतात. रघुकुलामुळे आणि भौगोलिक परिथितीमुळे अयोध्या हे तत्कालीन सामर्थ्याचे केंद्र बिंदू होते. त्यामुळे रामाचा अवतार तेथेच होणे जरुरीचे होते.
यात एक अडचण होती की दशरथाच्या पत्रिकेत पुत्र योग नव्हता , अर्थात दशरथ निपुत्रिक मात्र नव्हता. त्याला एक मुलगी होती आणि ती त्याने आपल्या एका मित्राला दान म्हणून दिली होती. त्या राजाने या मुलीचे लग्न ऋष्यतुंग नावाच्या मुनीशी केले होते.
राम कथेत वसिष्ठ, विश्वामित्र आणि कैकयी यांचे महत्व अनन्यसाधारण होते. कैकयी ही अत्यंत महत्वाकांक्षी असून ती युद्धनिपुण आणि अत्यंत मुत्सद्दी स्त्री होती. वसिष्ठ आणि विश्वामित्रानंतर राम अवताराकरिता असंख्य ऋषींची , अस्त्रांची आणि मदतनीसांची अभेद्य फळी उभी केली होती. या दोन ब्रह्मऋषिनी कथेतील पात्रांना कळसूत्री बाहुली प्रमाणे हलवले आहे. दशरथ राजा वनात शिकारीला गेला आणि त्याच्या हातून श्रावण बाळाचा वध झाला. श्रावण बाळाच्या वडिलांनी दशरथाला तू पुत्रशोकानी मारशील असा शाप दिला. आता हा शाप जर खरा व्हायचा असला तर दशरथाला पुत्र होणे अपेक्षित होते. या ब्रह्मऋषिनी पुत्र कामेष्टी यज्ञाचा संकल्प केला. या यज्ञाचे पौरोहित्य मात्र ऋष्यतुंग या मुनींना करावयास भाग पडले. या यज्ञातील पायसामुळे तीन राण्यांना चार पुत्र तर वाऱ्याने एक भाग नेल्यामुळे आणि नंतर तो अंजनीला प्रदान केल्यामुळे हनुमान जन्माला आला. इथे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की दरशरथाला पुत्र योग नव्हता हे लक्षात ठेऊन दशरथाशिवाय हे पुत्र दाशरथी झाले. याच पायसातला एक भाग घारीने आणि नंतर वायूने अंजनीला दिला तरी हनुमानाला दशरथ पुत्र संज्ञा नाही. त्याला वायूपुत्रच म्हटले गेले आहे. या कथित योगामुळे वसिष्ठानी एका दाक्षिणात्य प्रजातीला नकळत आपले केले..... अपूर्ण ...
रामायण - एक राजकीय प्रवास भाग - १
Submitted by अविनाश जोशी on 23 August, 2024 - 02:57
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विनोदी लेखन मध्ये नेता येईल
विनोदी लेखन मध्ये नेता येईल का पहा कृपया.
विषय अतिशय रोचक आहे. महाभारत
विषय अतिशय रोचक आहे. महाभारत आणि त्यातिल पात्रांचे मानवी कंगोरे ह्याबद्दल दुर्गा भागवत, इरावती कर्वे, नरहर कुरुंदकर ह्यांसारख्या विद्वान मंडळीने बर्याच विस्ताराने लिहून ठेवलंय. त्यामुळे चमत्कार विरहीत महाभारत किंवा महाभारत कालीन लोकांचे वास्तव ह्या अनुषंगाने विचार करता येतो.
पण रामायणावर ह्या मंडळींनी किंवा इतर कुणी तशाच पद्धतीने सविस्तर विवेचन केल्याचे निदान मला तरी ठावुक नाही. मला ह्याबद्दल उत्सुकता खुप आहे. महाभारताच्या अगदी विरुद्ध रामायणात राम ही व्यक्तीरेखा इतकी "लार्जर दॅन लाइफ" आहे की मुळात हा इतिहास आहे कि वाल्मिकी ऋषिंचे काव्य आहे अशी शंका येते. पण काही संदर्भ आहेत जे रामायण पुर्णपणे काल्पनिक नसावे हे सुचित करतात.
उदा. (१) सीतेचा जन्म. उत्तर रामायण प्रक्षिप्त आहे असे बर्याच अभ्यासकांचे मत आहे. ते जर खरे असेल तर मुळ रामायणात सीतेवर फार कमी फोकस आहे. रामाने शिवधनुष्य मोडुन मोठा पराक्रम गाजवला आणि तिला स्वयंवरात जिंकुन घेतले. पुढे रामाने वनवासाला जायचे ठरवल्यावर एका आदर्श पतिव्रता स्त्री प्रमाणे ती ही त्यांच्यासोबत वनवासाला गेली आणि १२+ वर्षे वनात काढुनी वनवास जवळ जवळ पुर्ण होत आला असताना, पंचवटीत रावणाने तिचे हरण केले. ह्या संबंध घटनाक्रमात सीता कुणाला तरी शेत नांगरताना सापडली आणि मग जनक राजाने तिला दत्तक घेतले. ह्या घटनेचे काही च प्रयोजन दिसत नाही तरीही तसा उल्लेख आहे.
(२) वाली वधाचा संपूर्ण प्रसंग: आपण वाली सारख्या पराक्रमी योद्ध्याचा वध करायला सक्षम आहोत ह्याची सुग्रीवाला खात्री पटावी म्हणून रामाने जे चमत्कार करुन दाखवले ते बघता रामानेच वालीला द्वंद युध्दाचे आव्हान देणे संयुक्तिक ठरले असते. पण तसे न करता रामाने सुग्रीवाला त्यांच्याशी द्वंद करायला पाठवुन दुर अंतरावरुन बाण मारुन वालीचा वध केला. रघुकुलाच्या किर्ती शी आणि रामाच्या क्षत्रिय प्रोटोकॉलशी हे वर्तन अजिबात सुसंगत नाही. बरे एवढ्या महत्प्रयासाने स्वतःला डोईजड असलेल्या वालीचा ज्याने वध केला त्या मित्राला ताबडतोब मदत करण्याऐवजी सुग्रीव नव्याने मिळालेल्या सत्तेच्या उपभोगात मग्न झाला आणि त्याला त्याच्या वचनांची आठवण करुन द्यायला रामाने लक्ष्मणाला पाठवले!
असे संदर्भ बघता राम (जर खरी व्यक्ती असेल तर), हा एक मानवी मर्यादा असलेला पुरुष होता आणि कालौघात त्यांचे दैवतीकरण होत गेले. असा माझा सध्याचा समज आहे.
तुम्ही ह्या विषयाची मांडणी कशी करता ह्याची उत्सुकता आहे. तुम्हाला पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!!!
रामाने सुग्रीवाला त्यांच्याशी
रामाने सुग्रीवाला त्यांच्याशी द्वंद करायला पाठवुन दुर अंतरावरुन बाण मारुन वालीचा वध केला. रघुकुलाच्या किर्ती शी आणि रामाच्या क्षत्रिय प्रोटोकॉलशी हे वर्तन अजिबात सुसंगत नाही. >>>> रामायणानुसार, वालीला वरदान प्राप्त झालं होतं की त्याच्याशी युद्ध करण्यासाठी जो कोणी येईल, त्याच्या शरीरातील अर्ध बल वालीला प्राप्त होईल. त्यामुळे तो खूप काळ अजिंक्य होता. त्याने आपल्या लहान भावाच्या, म्हणजेच सुग्रीवच्या पत्नीला धाक दाखवून तिचा उपभोग घेण्याचं घोर अधम कृत्य केलं होतं. आणखी एका रामायणानुसार, श्रीराम वालीला म्हणाले होते की " लहान भाऊ हा मोठ्या भावासाठी आपल्या पुत्रासमान असतो, पण तू मात्र त्याच्या पत्नीशी संबंध ठेवून स्वतःच्या पुत्रवधूचा उपभोग घेऊन धर्मशास्त्रांचं उल्लंघन केलं आहेस आणि असे पाप करणाऱ्या साठी शास्त्रांमध्ये मृत्यू दंडाचं विधान आहे.त्याच बरोबर तू माझ्यासाठी फक्त एक शाखामृग, म्हणजेच जंगलात विहार करणारा केवळ एक पशु आहेस, आणि पशुशी युद्ध केलं जात नाही; त्याची लपूनच शिकार केली जाते म्हणून हे वानरराज मी तुझा वध केला नसून तुझी शिकार केली आहे."
कडक
कडक
सीतेचे हरण केल्यामुळे राम-
सीतेचे हरण केल्यामुळे राम- रावण युद्ध झाले हा चुकीचा समज आहे. >>> सीता हरण न्हवती झाली, मारिच हरण झाला होता. त्यामुळे युद्ध झाले.
रामायणाचे कोणकोणते versions /
रामायणाचे कोणकोणते versions / अन्य ग्रंथ संदर्भासाठी वापरलेत ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
बाकी पुत्रकामेष्टी यज्ञाचे
बाकी पुत्रकामेष्टी यज्ञाचे कॉपीराइट ऋषी तुंगांकडे नसून विभांडकपुत्र शृंग ऋषिंकडे आहे. त्यांच्या रूपवैभवावर भाळून दशरथ कन्या शांता हिने त्यांचाशी लग्न केले ही कथा बहुतेक सर्व भाषांमधील रामायण आवृत्त्यांमधे आहे.
लहान भाऊ हा मोठ्या भावासाठी
लहान भाऊ हा मोठ्या भावासाठी आपल्या पुत्रासमान असतो, पण तू मात्र त्याच्या पत्नीशी संबंध ठेवून स्वतःच्या पुत्रवधूचा उपभोग घेऊन >> हा मानवांचा (पृथ्वीकर नाही) नियम झाला. वाली शाखामृग असेल तर त्यालाही हा नियम लागू होईल का? असो, वालीला नियमातले लूप होल्स शोधून मारले याबद्दल मला काही ऑब्जेक्शन नाही. उलट त्यामुळे राम आणखी चतुर आणि न्यायाच्या प्रसंगी पुस्तकी नियमांवर अडून न राहणारा वाटतो. पण तसा तो सगळ्याच प्रसंगात वाटत नाही हे मात्र खरं.
हा मानवांचा (पृथ्वीकर नाही)
हा मानवांचा (पृथ्वीकर नाही) नियम झाला. वाली शाखामृग असेल तर त्यालाही हा नियम लागू होईल का?>>> जर वाली मानव नसून एखादा वन्यप्राणी असेल तर त्यामुळे त्याला हा मानवांचा नियम लागू नाही होणार. पण जर त्याला शाखामृग मानलं तर तो एक वन्यप्राणी असल्याने त्याची लपून शिकार करणे यातही काही गैर नाही.
त्याने आपल्या लहान भावाच्या,
त्याने आपल्या लहान भावाच्या, म्हणजेच सुग्रीवच्या पत्नीला धाक दाखवून तिचा उपभोग घेण्याचं घोर अधम कृत्य केलं होतं.
>>
हे उलटं आहे.
वाली मोठा भाऊ आणि राजा होता. त्याची बायको (बहुधा) तारा होती.
वाली कुठल्याशा शत्रूशी लढायला एका गुहेत गेला. सुग्रीवाला त्याने बाहेर थांबायला सांगितले. त्या गुहेतून किंकाळ्या आणि रक्त बाहेर येताना दिसल्यावर सुग्रीवाने सोयीस्कर अर्थ काढला की वाली मेला आणि त्या गुहेच्या तोंडावर मोठा दगड लावून निघून गेला.
राज्यात परत गेल्या गेल्या त्याने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि वालीच्या बायकोशी लग्न केले.
इकडे वालीला तो दगड फोडून बाहेर यायला वेळ लागला, परत येऊन सुगीवचं हे वागणं बघून तो संतापला, म्हणून सुग्रीव स्वतःचा जीव वाचवून पळून गेला.
वालीने त्याच्या स्वतःच्या हक्काचं राज्य परत मिळवलं आणि स्वतःच्याच बायकोशी परत लग्न केलं.
म्हणजे खरंतर वालीने सुग्रीवाचा कुठलाही हक्क घेतला नव्हता, स्वतःचा हक्क परत मिळवला होता. सुग्रीवाला ठार मारण्याची मात्र त्याची इच्छा होती.
मला प्रश्न पडतो की यात खरंतर वालीची बाजू न्याय असताना रामाने सुग्रीवाची का साथ दिली?
कदाचित रावणाशी लढायला वाली तयार नसेल , सुग्रीवाशी राजा झाल्यावर सैन्य देईन हे डील झालं असेल.
रावण्याला वाली फूल टू चोपायचा
रावण्याला वाली फूल टू चोपायचा पकडून. रावण्याला माहित होतं वाली पकडून चोपतो तरी सारखं परत परत मार खायला जायचा त्याच्याकडे. एकंदरीत रावण्या क्युट आणि मजेशीर लाईफ जगत होता.
रावणाचा अपमान केल्याबद्दल
रावणाचा अपमान केल्याबद्दल निषेध! ^^
पिनी माफ करा पण मला वाटतं की
पीनी माफ करा पण मला वाटतं की आपला काहीतरी गैरसमज होतोय. आपण खात्रीसाठी वाल्मिकी रामायण किंवा रामचारितमानस एकदा पहावं. मी माझी वरील विधाने या दोन ग्रंथांच्या आधारेच केली आहेत.
मला प्रश्न पडतो की यात खरंतर
मला प्रश्न पडतो की यात खरंतर वालीची बाजू न्याय असताना रामाने सुग्रीवाची का साथ दिली? >>> संजय राऊतांच्या प्रातःकालीन परिषदेवर लक्ष ठेवा.
राज्य वालीचं होतं पण पत्नी
राज्य वालीचं होतं पण पत्नी सुग्रीवाचीच होती.
यावत्तं नाभिपश्यामि तव भार्यापहारिणम्।
तावत्स जीवेत्पापात्मा वाली चारित्रदूषकः
आत्मानुमानात्पश्यामि मग्नं त्वां शोकसागरे।
त्वामहं तारयिष्यामि कामं प्राप्स्यसि पुष्कलम्
सुग्रीवाची अजून कोणी दुसरी
सुग्रीवाची अजून कोणी दुसरी पत्नी होती का? कल्पना नाही. पण वाली मेला असं समजून त्याने राज्याभिषेक केला तसंच वालीच्या बायकोशी लग्नही केले - हिचं नाव तारा.
सुग्रीवानंतर राजा झालेला अंगद हा वाली आणि तारा यांचा मुलगा.
जर सुग्रीवाची अजून दुसरी कोणी बायको जिच्याशीही वालीने जबरदस्तीने लग्न केलं असेल तर कल्पना नाही. आता या सगळ्यात ताराची काय इच्छा होती, तेही माहीत नाही.
Submitted by पीनी on 25
Submitted by पीनी on 25 August, 2024 - 12:25 >>>>>
पीनी, मला माहित असलेली वाली आणि सुग्रीव कथा देखील हीच आहे. तुमच्या पोस्टशी सहमत.
आणखी शोधाशोध केल्यावर पिनी
आणखी शोधाशोध केल्यावर पिनी ह्यांचेच बरोबर आहे असे दिसत आहे. तारा वालीची पत्नी होती.
रामायणाची कथा म्हणे सगळ्यात
रामायणाची कथा म्हणे सगळ्यात पहिल्यांदा शंकराने पार्वतीला सांगितलि आणि त्यानंतर वेगवेगळ्या कल्पात वेगवेगळ्या कवि आणि ऋषिंनी आपापल्या पद्धतीने सांगितली. त्यातला लेटेस्ट प्रयत्न म्हणुन आपले हे मायबोली वरचे "संयुक्त रामायण" आणि त्यातला हिरो वाली असं म्हणायला हरकत नाही:).
जोक्स अपार्ट, पीनी ह्यांनी लिहलय तसंच काहीसं मी ही वाचल्याचे आठवते. पण तसे नसेल आणि दुष्कृत्य केल्याबद्दल दोन्ही बाजु ऐकून न घेता एखाद्याला परस्पर पशु घोषित करण्याचा अधिकार आणि जबाबदारी रामावर होती हे केवळ वादासाठी मान्य केले तरी मग ही शिक्षा एकट्या वालीला का हा मुद्दा अनुत्तरितच रहातो. वालीचा हा एकच गुन्हा होता किमान रामाला माहिती असलेला तरी एकच होता. त्याउलट रावणाने तर अनेक गुन्हे केले होते. मग त्याला पशुचा दर्जा देऊन परस्पर शिकार करायला काय हरकत होती? सीता हरणाचे निमित्त कशाला हवे होते? आणि ते मिळाल्यावर हाच फाॅर्म्युला का नाही वापरला? इथे जसा सुग्रीव मित्र होता तसा तिथे विभिषण होता.
सोपे उत्तर हे की हे गिमिक रावणाच्या बाबतीत चालण्यासारखे नव्हते. सरळमार्गी होता म्हणून ह्या प्लान चा अंदाज न आल्यामुळे किंवा उन्मत्त होता म्हणून सुग्रीवाला हलक्यात घेतल्यामुळे वालीचा अश्या पद्धतीने वध करणे रामाला शक्य झाले. रावणाच्या बाबतीत ते शक्य झाले नाही म्हणून लंकेवर चालुन जाऊन रामाने त्याच्याशी युद्ध केले.
हपा ह्यांनी म्हंटलय तसे त्यातुन रामाचे मुत्सद्दी पण स्पष्ट होते. अयोध्या च्या सैन्याला भरीला न पाडता त्याने किष्किंधेची राज्य सत्ता स्वतः ला अनुकूल करुन घेतली आणि वानर सेनेच्या मदतीने रावणाचा पडावं केला. रामाचे मानव असणे पण ह्या प्रसंगातुन अधोरेखित होते. तसंही पुढल्या प्रसंगातुन (सुग्रीवाने दिलेले वचन विसरणे आणि लक्ष्मणाने त्याला तंबी देणे), रामाला त्यावेळी 'देव किंवा अवतार ' म्हणून मान्यता नसावी ही शक्यता वाटते. हे देव किंवा अवतार स्टेटस बर्याच नंतर प्राप्त झाले असावे. जसे काही लोक शेवटी शेवटी शिवाजीराजांना शंकराचा अवतार मानु लागले होते तसे.
मी वाचलेल्या कथेत अंगद हा
त्यातला हिरो वाली असं म्हणायला हरकत नाही >>
राज्याला कुणी वालीच उरला नाही, म्हणून सुग्रीव पुढे आला असावा.
(No subject)
रामचरितमानस :

@ नारायण, निव्वळ उत्सुकता
@ नारायण, निव्वळ उत्सुकता म्हणून
ढोल, गवार, शुद्र, पशु, नारि|
सकल ताडना के अधिकारी||
ह्याबद्दल तुमचं काय मत आहे?
लेखक महोदय, आपण ज्या
लेखक महोदय, आपण ज्या ग्रंथांचा आधार घेऊन ही लेखमाला लिहिलित ती संदर्भ सूची जाहीर कराल का?
@पर्णीका, सर्वात आधी तर मला
@पर्णीका, सर्वात आधी तर मला असा प्रश्न पडलाय की तुम्हाला मला हा प्रश्न का विचारावासा वाटावा? कारण इथे चाललेल्या चर्चेचा या प्रश्नाशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. पण तरीही तुम्ही मला माझं मत विचारलं म्हणून सांगतो.
प्रभु भल कीन्ह मोहि सिख दीन्ही, मरजाता पुनि तुम्हरी कीन्ही. ढोल गंवार शुद्र पसु नारी, सकल ताड़ना के अधिकारी
हे विधान समुद्राचं आहे. जेव्हा श्रीरामांनी शांतपणे समुद्राला विनंती केल्यानंतरही समुद्राने श्रीरामांना वाट दिली नाही तेंव्हा श्रीरामांनी उग्ररूप धारण केलं आणि समुद्र शरणागत होऊन स्वतः हजर होऊन श्रीरामांना वरील प्रमाणे म्हणाला. आता जे विधान त्यांनं यावेळी उद्गारलं ते त्याचं वैयक्तिक मत आहे, हे उघड उघड दिसतं. तसेच त्याच्या या विधानाला श्रीरामांनीही कोणत्याही प्रकारे अनुमोदन दर्शविल्याचा कोणताही दाखला श्रीरामचरितमानस मध्ये नाही, त्यामुळे हे विधान रामचरितमानसची शिकवण असल्याचं किंवा हे वेदवाक्य असल्याचं आपण म्हणू शकत नाही. तसं तर पुढे रामचरितमानसमध्ये अनेक ठिकाणी रावणाचे अनेक क्षुद्र विचार दोहे रुपात विशद केले आहेत मग यावरून आपण हे रावणाचे विचार म्हणजे रामचरितमानसचे किंवा वैदिक संस्कृतीचे उपदेश आहेत असं म्हणू शकत नाही. कारण वेदांमध्ये तर
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।। असं म्हटलं आहे. आणि ज्या स्त्रीला वेदांनी देवतेच्या ही वरचा दर्जा दिला आहे त्या स्त्रीला सतत मारलं पाहिजे असं काहीतरी वेद सांगतील, असं मला तरी वाटत नाही.
अंगद हा वाली आणि तारा यांचा
अंगद हा वाली आणि तारा यांचा मुलगा.>> रामाने वालीला मारल्या नंतर अंगद रामाच्या बाजूने लढला. यामागे काही कारणमिमांसा आहे का?
<<<<पर्णीका, सर्वात आधी तर
<<<<पर्णीका, सर्वात आधी तर मला असा प्रश्न पडलाय की तुम्हाला मला हा प्रश्न का विचारावासा वाटावा? कारण इथे चाललेल्या चर्चेचा या प्रश्नाशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. >>>
मुळ वाल्मिकी रामायण ते तुलसीदास कृत रामचरित मानस पर्यंत रामाच्या कथेत येत गेलेले बदल हा मुळ मुद्दा होता. तो स्पष्ट करण्यासाठी वानगी म्हणून वरील चौपाई उद्धृत केली कारण त्यात तुलसीदासांच्या काळाचे प्रतिबिंब दिसते आणि तुमचे ह्या बदलांबाबत काय मत आहे ते विचारले.
वाल्मिकी रामायण हे "मर्यादा पुरुषोत्तम" रामाचे चरीत्र (बायोग्राफी) आहे आणि रामचरीतमानस हे विष्णुच्या सातव्या अवताराची गोष्ट आहे. राम हा देव आहे ही तुलसीदासांची श्रद्धा आहे. एकदा तो देव आहे हे मान्य केले की मग त्याने केलेली प्रत्येक कृती नैतिक दृष्ट्या योग्य आहे ही विचारांची बैठक ओघाने आलीच. राम हा विष्णूचा अवतार आहे ही वर्तमान काळात देखील अनेकांची श्रद्धा आहे. त्या भावनेचा आदर आहे पण त्यानंतर राम ह्या व्यक्ती किंवा व्यक्ती लेखे बद्दल चर्चा होऊ शकत नाही.
मला अभिप्रेत आहे वाल्मिकी रामायणातला "मर्यादा पुरुषोत्तम राम". तो अलौकिक गुणांनी युक्त आहे पण मानव आहे. माणुस म्हंटला की त्याच्या भावभावना, स्वार्थ परमार्थ , राजकारण हे सगळे ओघाने आले. वाली वधाचा प्रसंग हा मला त्या अनुषंगाने प्रातिनिधिक वाटतो. रामाचे वर्तन आदर्श न वाटता मुत्सद्दी वाटते. ह्या आणि ह्यासारख्या मुद्यांवर चर्चा मला अभिप्रेत होती.
>>जर सुग्रीवाची अजून दुसरी
>>जर सुग्रीवाची अजून दुसरी कोणी बायको जिच्याशीही वालीने जबरदस्तीने लग्न केलं असेल तर कल्पना नाही. आता या सगळ्यात ताराची काय इच्छा होती, तेही माहीत नाही.<<
सुग्रीवाची पत्नी रमा (चूभूदेघे, इट्स बीन ए व्हाइल)..
१. सुग्रीवाने गुहेवर दगड सोयिस्कर्पणे ठेवला नाहि. त्याला क्ल्पना न्हवती कि वाली मेला कि तो राक्षस. हि जस्ट वेंट विथ हिज इन्स्टिंक्ट्स. आत्ताच्या भाषेत - इट वाज अॅन ऑनेस्ट मिस्टेक..
२. मोठा भाऊ निवर्तला (प्रिझ्युम्ड डेड इन धिस केस) कि त्याच्या पत्नीची (तारा, इन धिस केस) जबाबदारी जिवीत भावांकडे यायची (त्या काळांत). सो सुग्रीव डिडंट क्रॉस द लाइन. पॉइंट #१..
३. वाली गुहेतुन बाहेर आल्यावर त्याने सुग्रीवाला किष्किंधेतुन पिटाळुन लावले. त्याची पत्नी (रमा) अॅबडक्ट केली. पॉइंट #२..
४. श्रीरामाने, या दोन मुद्द्यांवर वालीला दोषी ठरवले, आणि क्षात्रधर्म पाळला. हि डेफिनेटली हॅड वेस्टेड इंटरेस्ट किलिंग वाली, बट दॅट वाज ए मूट पॉइंट..
५. अर्थात, या बाबतीत हि राम "मर्यादा पुरुषोत्तम"च आहेत; इफ यु टेक ए होलिस्टिक लुक...
वाल्मिकि रामायणानुसार वाली
वाल्मिकि रामायणानुसार वाली सुग्रीव यांची माता ऋक्षराज हा पूर्वी नर असून राजा होता. त्याने उन्मत्त होऊन राज्ये पादाक्रांत करत कैलास पर्वतापर्यंत धडक मारली असता तिथे एका सरोवरात स्नान केल्यावर तो स्त्री झाला. हे सरोवर पार्वतीच्या शापाने शापित झाले होते. ऋषराज ने माता बनून वाली आणि सुग्रीव या दोघांना जन्म दिला. दोघांचे पिता भिन्न होते. बाली सूर्यपुत्र तर सुग्रीव इंद्रपुत्र.
दुंदुभि हा किष्किधाकान्ड मधील मायावी रेडा बालीच्या हातून मारला गेला. त्याचा मोठा भाऊ मायावी आणि बाली यांच्यात एका स्त्री वरून भांडण होते. मायावीने बालीच्या निवास असलेल्या पर्वतासमोर येऊन त्याला द्वंद्वाचे आव्हान दिले. बालीने ते स्विकारले. त्याचे भयंकर रूप आणि त्याचा भुभु त्कार ऐकून मायावीचे अवसान गळाले व तो पळू लागला ( किंवा त्याची तशी योजना).
त्याने पाताळातल्या एका गुहेत प्रवेश केला व लपून राहिला. वाली आणि सुग्रीव त्याच पाठलाग करत तिथे आले. वालीने गुहेत प्रवेश करण्याआधी सुग्रीवाला त्याच्या दाराशी पहारा द्यायला सांगितले.
एक वर्षभर दोघेही बाहेर आले नाहीत. वर्षभराने दानवाचा चित्कार ऐकू आला आणि गुहेतून रक्त वाहिले. ते पाहून सुग्रीवाने दानव जिवंत आहे असे समजून चटकन गुहेचे द्वार शीळेने बंद केले व परत येऊन सर्वांना वृत्तांत कथन केला कि बालीचा मृत्यू झाला.
त्याने स्वतःला राजा घोषित केले. इकडे वाली शिळा फोडून परत आला. सुग्रीवाला राजा बनलेला पाहताच त्याला हे कपट कारस्थान वाटले व त्याने सुग्रीवाला राज्याबाहेर हाकलून दिले आणि त्याची पत्नी रूमा व गादीवर आपला हक्क प्रस्थापित केला.
सुग्रीवाची पत्नी रूमा ही ताराची छोटी बहीण आहे असा उल्लेख रामायणाच्या प्रादेशिक आवृत्यांमधे आहे. तारा ही बालीची पत्नी आहे असा उल्लेख अन्य काही लोककथांमधे आहे. सुग्रीवाने बालीची पत्नी तारा आणि मुलगा अंगद यांचा स्विकार केला. ताराने बालीला सुग्रीवाशी युद्ध न करण्याचा सल्ला दिला होता. त्याला रामाचे संरक्षण असल्याशिवाय तो दोन दोनदा आव्हान देणार नाही हे तिला बाली चुकले होते. यावर वालीने तो सुग्रीवाचा वध करणार नाही पण त्याला जन्माची अद्दल घडवेल असे आश्वासन दिले होते. पहिल्या वेळी दोघांचेही रूप समान असल्याने रामाने बाण चालवला नव्हता. दुसर्या वेळी गळ्यात माला असल्याने त्याने बाली चा वध केला.
अशी कथा वाल्मीकि रामायणात आहे.
सीतेचे हरण केल्यामुळे राम-
सीतेचे हरण केल्यामुळे राम- रावण युद्ध झाले हा चुकीचा समज आहे. बहुतेक रामायणाच्या सर्व प्रकारच्या प्रतीमधून एक गोष्ट निश्चित आहे. श्रीराम अवतार मुळातच रावण वधासाठी झाला होता. या लेखात काही दंत कथा, पुराणोक्त कथा आणि वेगळे विचार मांडले जाऊ शकतात. >>> श्रीराम कथेकडे पाहण्याचा दृष्टीकोण म्हणून काहीच हरकत नसावी.
पण
त्याकाळी आर्यावर्त म्हणून समजला जाणारा भाग अफगाणिस्थानपासून (गांधार देश) ते ब्रह्मदेशाच्या पूर्वेपर्यंत आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेपासून ते स्वर्ग देशा पर्यंत पसरला होता. हा स्वर्ग म्हणजे स्वर्ग - नरक मधला नव्हे. स्वर्ग नावाचा देश तिबेटच्या आसपास कुठेतरी होता. चिनी लोककथांमध्ये सुद्धा शांग्रीला असे राज्य मानले गेले आहे. अनेक राजांनी या स्वर्गावर स्वारी केली आहे. इंद्र याचा अर्थ प्रमुख आणि त्या राज्यातला प्रमुख म्हणजे देवेंद्र किंवा इंद्र. प्रमुख या अर्थाने इंद्र हा शब्द अनेक वेळा वापरला जातो जसे नरेंद्र, राजेंद्र, गजेंद्र इत्यादी.. राजाला तेच नाव ठेवण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आढळते. थायलंड मध्ये रामा १, रामा २ असे बरेच राजे होऊन गेले तर इंग्लंडच्या राजघराण्यात राजाला एडवर्ड, जॉर्ज अशी ठराविक नावे असतात. रघुकुलामुळे आणि भौगोलिक परिथितीमुळे अयोध्या हे तत्कालीन सामर्थ्याचे केंद्र बिंदू होते. त्यामुळे रामाचा अवतार तेथेच होणे जरुरीचे होते.
>>>>>इथे लेखकाने आपले स्वतःचे रामायण सूरू केले आहे. तसेच हा इतिहास आहे असा समज यातून होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्या दिशेने कुणी प्रतिसाद दिला तर तो वावगा ठरत नाही.
लेखकाच्या या मताची पुष्टी होईल असे इतिहासात तरी काही आढळत नाहीच, शिवाय रामायणाच्या कोणत्याही आवृत्तीत असा उल्लेख नाही. लेखकाच्या दाव्यांना कुठला आधार आहे हे माहिती नाही.
वाल्मीकी रामायणाची लिखित प्रत ही दुसर्या शतकातली आहे. जेव्हां समुद्रगुप्ताने वेद, पुराणे, महाकाव्ये लिहून घेतली. रामायणाची रचना इसवी सन पूर्व दोन ते चार शतकामधे झाली असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
रामायणाची ही कथा जगभरात प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक कथेत वेगवेगळे नायक आहेत. ग्रीक साम्राज्य, रोमन साम्राज्य यातही या कथा आहेत. इ स पू ९०० मधे ग्रीक कवी होमरने याच अर्थाचे इलियड हे महाकाव्य लिहीले ज्याचा सारांश रामयणाशी मिळता जुळता आहे.
इटली मधे इलियडची रोमन आवृत्ती लिहीली गेली ज्याचे नाव अनियड. याचा रचेता वह्जल (virgil) आहे.
थायलंडमधील रामायणात असाच सारांश आहे.
प्रत्येक प्रांतात तिथल्या राजाला समोर ठेवून या कथेची रचना झाली असा एक मतप्रवाह आहे.
या विषयावर इथेच थांबणे योग्य.
या विषयावर इथेच थांबणे योग्य.

नाहीतर दोन चार प्रतिसादक नाराज होऊन बहीष्कार टाकतील.
काही ड्युआयडी घेऊन "वयाला शोभेल असे प्रतिसाद द्या, लाज वाटत नाही का ?" असे बळेच कुठे तरी वाद घालतील. एखादा ड्युआयडी हा खरा आयडी आहे असे समजून त्याची टिंगल केली कि त्याचा खरा आयडी पिसाळून कुठल्या तरी धाग्यावर भलताच पिसाळलेला प्रतिसाद देईल.
काही जण सांगतील कि तुमच्या नादाला लागू नये अशा सूचना आम्हाला आलेल्या आहेत.
त्यामुळे सत्याग्रहाचा आग्रह आग्रहाने थांबवणे ईष्ट.
इतके सारे विरोधात गेले कि मग हा अवतार समाप्त करणे आणखी ईष्ट.
ज्याचा जसा समज
त्यासि ठेवावे तैसेचि
मायबोलीवर
न मागावा पुरावा,
ना संदर्भ पुनातन्यांना
संघटीत
Pages