डॉ शंतनू अभ्यंकरांचे निधन झाले ही बातमी सांगण्यासाठी एकाने नास्तिक विचारांच्या कायप्पा गटात तिथे एक मजकूर फार्वर्ड केला होता. मजकूर असा होता.
कळवण्यास अत्यंत दुःख होते की सुप्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ञ डाॅ. शंतनु अभ्यंकर यांना आज देवाज्ञा झाली. त्यांच्या कुटूंबीयांना हे दुःख सहन करायची ताकद मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
झाले उजळ नास्तिक गटावर चर्चा चालू झाली
एकाने म्हटले की कोण येडझवा असले मेसेज बनवतो? आपण किमान ते फॉरवर्ड तरी करू नयेत ना! अभ्यंकर नास्तिक होते.
दुसरा म्हणाला कि अरे मतितार्थ लक्षात घे.
नाही. हा खोडसाळपणा आहे. शोक व्यक्त केला नाही तरी चालेल. त्या गहिऱ्या संवेदनांअभावी आजवर कोणी नातेवाईक मेलेले नाहीत. पण जर शोकसंदेश द्यायचाच असेल तर तो आमच्या टर्म्सवरच द्या. असे एक मत व्यक्त झाले
परमेश्वर चरणी प्रार्थना करणाऱ्याने एवढे लक्षात ठेवायला हवं की, शंतनू अभ्यंकर आणि त्यांचे पूर्ण कुटुंब हे पूर्णपणे नास्तिक होते. तेव्हा अशा प्रकारच्या प्रार्थना करणारे आणि असे मेसेज फॉरवर्ड करणारे त्या विवेकी कुटुंबाचा अपमान करत असतात.हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याने विचार करायला नको? की तो पण डोळे मिटून अंधभक्तांसारखाच वागणार? असे देखिल एक मत व्यक्त झाले
फॉरवर्ड करणारे गृहस्थ उजळ नास्तिक समूहाचे सदस्य आहेत, त्यांनी किमान तारतम्य बाळगून एडिट करायला हवा होता किंवा दोन ओळीचा त्यांच्या निधनाचा वेगळा मेसेज टाकायला हवा होता असे वाटते. अशी एकाने टिप्पणी दिली
आता मी त्या गटात होतो . अधूनमधून मी ही तिथे लिहित असे मी म्हणालो कि देव न मानणार देव माणूस अशी प्रतिक्रिया देणारे अनेक सश्रद्ध अस्तिक लोक असतात कि ज्यांना संबंधित व्यक्ती नास्तिक आहे हे माहित असते. त्यांची आदरांजली वहाण्याची ती पद्धत आहे. सश्रद्ध लोकांना त्यांच्या पद्धतीने आदरांजली वहाण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच. समजा ते फॉर्वड केले तरी त्यामागचा आशय समजून घेणे महत्वाचे.
त्यावर त्या सदस्याने असे सांगितल की आशय जाउ द्या वैश्विक पोकळीत. त्यांच्या संवेदना त्यांनी स्वतःपाशी ठेवाव्यात. इथे कोणाला शोकसंदेशांची भीक लागलेली नाही
त्यावर मी असे म्हणालो कि शंतनू चिकित्सक व नास्तिक असला तरी हेकट नव्हता. इतरांच्या भावना त्यांच्या भाषेत समजावून घ्यायचा.
मग त्याने सांगितले की शंतनू हेकट नव्हते तर तसले आचरट मेसेज केवळ शंतनूंना पाठवा
त्यावर मी असे म्हणालो की देवाने खुद्द त्याची जागा स्वर्गात राखून ठेवली आहे. देव स्वत: न्यायला आला होता नास्तिकाचे रुप घेउन. शंतनूने ओळखले पण देवाशी पण गप्पा मारल्या. कारण तो देव मानत नसला तरी देव मानणार्यांना शत्रू पण मानत नव्हता. आता ही संवादाच्या ओघातील टिप्पणी आहे, यात भाषिक सौंदर्य आहे. परमेश्वराने सुद्धा शंतनूविषयी आदर दाखवला कारण शंतनू परमेश्वराला शत्रू मानत नव्हता. असे मला सूचित करायचे होते. शंतनूच्या लिखाणातील भाषाशैली ही हलकी फुलकी विनोदी उपमा अलंकार वाकप्रचार बोली भाषा यांनी समृद्ध असायची.
त्यावर त्यांनी असे सांगितले की हा मेसेजही आम्हाला नको
त्यावर मी म्हणालो पण वाचून झालाच ना!
त्यावर त्यानी ते पाठवणाऱ्याचा अपमान करता आला अशी आशा करतो असे वक्तव्य केले
मी त्या वक्त्यव्यावर असे म्हणालो कि दाभोलकर म्हणायचे ती भावना आपण स्वीकारली नाही कि त्याला ती परत घेउन जावी लागते.
तेही वारले आता. जे जिवंत आहेत ते नियम ठरवतात. सध्याचे नियम मी ठरवतो. अशी त्या सदस्याने टिप्पणी दिली
आता या चर्चेनंतर मी "हा डॉ शंतनू अभ्यंकरांचा ब्लॉग. जरुर वाचा" हा संदेश द्यायला आलो होतो तर मला ग्रुपवरुन काढून टाकल्याचे दिसले.त्यामुळे पुढील संवादच खुंटला आता या ग्रुपवरील मंडळी काही माझी शत्रू नाहीत. शंतनू पण या कायप्प गटात होता. क्वचित कधीतरी लिहित असे. त्याचे लिखाण अत्यंत संयत असे. मी सुद्धा या गटात अधून मधून लिहित असतो. या गटाचे नास्तिक मेळावे होत असतात. मागच्य वर्षी पुणे व सांगली इथे मेळावे झाले होते. त्यापैकी पुण्यातील मेळाव्याला मी गेलो होतो. गटातील काही धुरीण लोक कठोर नास्तिक व तर्ककर्कश आहेत. शुभ, श्रद्धा, देव असे शब्द चर्चेत जरी आले की त्यांची सटकते. सर्वच तसे नाहीत. फार कमी लोक कडवे आहेत. अशाच एका वैचारिक चर्चेत मी दाभोलकरांच्या श्रद्धांजली बाबत ही इथे खालील प्रमाणे लिहिले होते कि जे मी अन्य चर्चापीठांवरही वेळोवेळी लिहिले होते. 2007 पासून मी अशा विषयांवर उपक्रम, मिसळपाव,मनोगत, ऐसी अक्षरे व मायबोलीवर लिहित आलो आहे. यात नवीन असे काही नाही. श्रद्धांजलीच्या चिकित्सेची पार्श्वमूमी समजावी व त्यावर चर्चा व्हावी म्हणुन मी हे सगळे नमुद करत आहे.
----------------
दाभोलकरांच्या स्मृतीस विनम्र "श्रद्धांजली" अशा प्रकारची आपली भावना व्यक्त करणारे अनेक माणसे आहेत. वेगवेगळ्या विचारसरणीची आहेत. दाभोलकरांविषयी आदर व प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आहे.
अंनिस मधे काही कडवे कार्यकर्ते श्रद्धा शब्द वापरत नाहीत.बाकी शब्द योजना करताना अंनिस वार्तापत्रात शुभेच्छा ऐवजी जाणीवपुर्वक सदिच्छा हा शब्द वापरला जातो. दिवाळी अंका ला दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. व्यासपीठा ऐवजी विचारपीठ म्हटले जाते. असे नाही केले तर आपणच अंधश्रद्ध ठरु कि काय अशी भीती वाटते की काय कोण जाणे? शुभ शब्दाचे वावडे असल्याने मी शुभांगी नावाच्या एका मैत्रिणीला गमंतीने सदांगी म्हणतो.
दाभोलकर शब्दच्छला विषयी अनौपचारिक गप्पा मारताना सांगायचे कि जेव्हा पुरुष असे म्हणतो कि मी भीती ने अगदी गर्भगळीत झालो. तेव्हा तू पुरुष आहे तुला कसला आलाय गर्भ? असे आपण म्हणतो का? भाषेतले अनेक शब्दप्रयोगांचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. हा किस्सा जेव्हा मी जेव्हा सदानंद मोरेंना सांगितला तेव्हा ते म्हणाले की बुद्धीवादी कार्यकर्ते लोकभाषा बोलत नाहीत. पण लोकभाषेमुळे एक भावनिक जवळीक साधली जाते. हे अगदी खर आहे. पण या मुद्द्याची दुसरी बाजू पण आहे. लोकभाषेची परंपरा गतानुगतिकतेनसार राखली तर समयोचित सुयोग्य पर्यायी शब्द रुढ होणार नाहीत. त्यामुळे डॉ दाभोलकरांच्या स्मृतीस "आदरांजली" हे ही तितकेच उत्कट व भावपूर्ण आहे.
-----------------
मी स्वत: अंनिस मधे 1988-89 पासून कार्य करतो. माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद असे पुस्तक अंनिस ने देखील प्रकाशित केले आहे. शिवाय अंनिस वार्तापत्राचा लेखक पुरस्कार ही मला मिळाला होता. 2008 मधे झालेल्या फलज्योतिष चाचणीचा मी समन्वयक होतो. नारळीकर, दाभोलकर, संख्याशास्त्रज्ञ कुंटे व समन्वयक मी अशी चाचणी टीम होती. सर्व पत्रिका मी स्वत: तयार केल्या होत्या. दाभोलकर गेल्यानंतर माझा अंनिसतील सक्रिय सहभाग कमी झाला. पण मी आजही संपर्कात व हितचिंतक आहे. शंतनू अभ्यंकरांशी ही माझा व्यक्तिगत परिचय, संवाद व संपर्क होता. लिव्हिंग विल, अवयवदान, इच्छामरण अशा विषयांवर आमची देवाण घेवाण होत असे. आमच्या दोघांचेही लिव्हिंग विल माझ्या बायकोने नोटराईजड केल होते. मुख मुद्दा हा कि अशा पद्धतीचे अनेक लिखाण मी समाज माध्यमात करत असतो. त्यावर प्रतिक्रिया येतात. त्यातून समाज मनाची स्पंदने कळतात. अशा वैचारिक चर्चा संवाद या सामाजिक नोंदी असतात. मायबोलीवर अशा अनेक विषयाची नोंदी आहेत. सामाजिक दस्तैवज म्हणून त्याचे एक महत्व आहे त्यामुळे मला हे इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटले. यावरील प्रतिक्रिया या मानसशास्त्रीय अभ्यासासाठी देखील उपयुक्त ठरतील याबाबत माझ्या मनात शंका नाही.
अनुत्तरीत प्रश्न
अनुत्तरीत प्रश्न
श्रद्धा या शब्दाची व्याख्या काय आहे?
आस्तिक श्रद्धांजली वाहतात म्हणजे काय करतात? या विधीला श्रद्धांजलीच का म्हणावे? प्रेमांजली किंवा अन्य शब्द वापरला तर?
मानव पृथ्वीकर विश्लेषण आवडले.
मानव पृथ्वीकर विश्लेषण आवडले. प्रश्नांची भर टाकू शकता
दिवाळीत फार पूर्वी चमनचिडी
दिवाळीत फार पूर्वी चमनचिडी नावाचा एक फटाका मिळायचा. तो पेटवला की उडून वाट्टेल तिकडे जायचा. तो कुठे जाईल हे माहीत नसणे आणि तो वाट्टेल तिकडे जातो आहे हे बघणे यातच खरी मजा असायची. तो फटाका डिझाईनच तसा केला जायचा.
किती द्रष्टे होते ते लोक! चाळीस पन्नास वर्षांनी इथे एक असा धागा निघेल तेव्हा त्याला कशाची उपमा द्यावी हे ठरवण्यात अडचण येऊ नये म्हणून केव्हाच त्यांनी चमनचिडी तयार करून ठेवली होती.
मामी, मला हे औचित्यपूर्ण वाटत
मामी, मला हे औचित्यपूर्ण वाटत नाहीये म्हणून धोशा लावलाय!
बेफि आणि "मिरची" आठवतेय?
बेफि

आणि "मिरची" आठवतेय?
किती द्रष्टे होते ते लोक! >>>
किती द्रष्टे होते ते लोक! >>> या धाग्यावर हसायला नको म्हणून कंट्रोल करतोय. बेफिकीर फॉर्म मधे आलेत.
भरत तुम्ही तीसरे सर म्हणताहात
भरत तुम्ही तीसरे सर म्हणताहात हे कशाबद्दल? तुमची मते त्यांच्याशी पटत नाहीत म्हणुन तुम्ही हे लेबलिंग करता का? मलाही तुम्ही मॅडम म्हणुन संबोधलेले आठवते का तर माझी मते पटली नाहीत. प्रत्येकाला त्याची मते मांडण्याचा अधिकार आहे माबोवर तो तरी अबाधित असू द्या. उगाच लेबलिंग करुन ट्रोलिंग कशाला?
श्रद्धांजली म्हणजे tribute या
श्रद्धांजली म्हणजे tribute या अर्थाने. तुम्ही एखाद्या व्यक्तीचे गुण, कर्तृत्व याबद्दल तुमच्या मनात जो आदर आहे तो व्यक्त करता. गेलेली व्यक्ती माझ्यासाठी आदरणीय होती असे म्हटल्यासारखे. हिंदीत श्रध्येय म्हणतात - विचारधारेमुळे आदरणीय असलेले.
श्रद्धा म्हणजे विश्वास, ट्रस्ट. नास्तिक व्यक्तीसाठी देव नाही हाच विश्वास आहे.
बाकी माझ्यासाठी संबंधीत व्यक्ती आणि तिचे निकटवर्तीय यांना काय अपेक्षित आहे ते महत्वाचे. समोरची व्यक्ती देव मानत नाही हे पक्के माहित आहे तर मी दु:खद निधन झाले/ दु:खात सहभागी आहे असे म्हणेन. समोरची व्यक्ती 'अ' धर्माची आहे हे माहित आहे तर मी त्या व्यक्तीला 'ब' धर्मातील सणाच्या शुभेच्छा देणार नाही, तसेच हे देखील.
बाकी नास्तिक असो वा आस्तिक, आपले माणूस आता आपल्या सोबत नाही याचे दु:ख होतेच. माझे एक जवळचे नातेवाईक कुटुंब बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तीक होते. मृत्यूनंतर कर्मकांड नको हे त्यांच्या कुटुंबापुरते ते पाळत मात्र नात्यात दु:खद प्रसंगी आधार द्यायचा म्हणून जात असत. कारण दुसर्या कुटुंबाची जी विचारधारा आहे त्यानुसार त्यांचे क्लोझर शोधणे असणार, आधार अपेक्षित असणार. माझा कर्मकांडावर विश्वास नाही पण दु:खाचा प्रसंग/कार्य आहे तर मनुष्यबळाची गरज जास्त असा साधा विचार असे.
आदरांजली या अर्थाने
आदरांजली या अर्थाने श्रद्धांजली हा शब्दप्रयोग वापरात असेल तर काथ्याकूट निरर्थक आहे. यात श्रद्धा हा शब्द वापरला
म्हणून नास्तिकांना आरोपी बनवायला नको आणि उलटपक्षी सुद्धा.
आस्तिक स्वतःच हा शब्दप्रयोग धार्मिक अर्थाने वापरत नाहीत त्यामुळे नास्तिकांना ( तुम्ही बाटला या अर्थाने? विचारणे निरर्थकच.
स्वाती 2, श्रद्धांजली म्हणजे
स्वाती 2, श्रद्धांजली म्हणजे tribute या अर्थाने. तुम्ही एखाद्या व्यक्तीचे गुण, कर्तृत्व याबद्दल तुमच्या मनात जो आदर आहे तो व्यक्त करता. गेलेली व्यक्ती माझ्यासाठी आदरणीय होती असे म्हटल्यासारखे हे अगदी खरेच आहे. पण शब्दयोजना हा भाषिक आग्रहाचा प्रश्न बनतो कारण त्यात अस्मिताही लपलेली असते. लोकभाषेची परंपरा गतानुगतिकतेनसार राखली तर समयोचित सुयोग्य पर्यायी शब्द रुढ होणार नाहीत म्हणुन तो आग्रह केला जातो. पण अन्य कुणी त्याच्या अंगवळणी पडलेले शब्द प्रयोग वापरतात तेव्हा ते आपल्याला डिवचण्यासाठीच वापरलेत अशी समजूत काही लोक करुन घेतात. राजकारणात काही वेळा ते विरोधी पक्षास डिवचण्यासाठी वापरतात हे देखील खरे आहे. पण शाब्दिक कोपरखळी, टपली, खिल्ली, घरचा आहेर, शालजोडीतले मारले, चेष्टा,गंमत, मस्करी अशा भाषिक सौंदर्यात ही काही शब्दयोजना येतात. त्यात डिवचणे हा हेतु नसतो. शाब्दिक हिशोब चुकते करणे हा भाग जास्त असतो.
या ठिकाणी श्रद्धांजली चा मेसेज फॉर्वड केला तो खोडसाळपणा आहे अशी समजूत काही लोकांची झाली पण मी त्या व्यक्तीला फोन करुन तसे ते नसल्याचे खात्री केले ते वरच्या वरच्या एका प्रतिसादात नमूद केले आहे. त्याने फक्त बातमी देण्यासाठी ते फार्वड केले होते पण मी त्याची वकिली केल्याने मला गटातून उडवण्यात आले.
प्रघा, एकदा टोकाची भूमिका
प्रघा, एकदा टोकाची भूमिका घ्यायचीच असे एखाद्या गटाने ठरवले तर मग पुढे बोलणेच खुंटते. त्यातून सोशल मेडीआवर हे अजूनच होते.
'अ' व्यक्तीला बातमी पटकन देण्याच्या नादात व्यवधान नाही राहीले हे होवू शकतेच आणि गटात जहाल मताचे प्राबल्य असेल तर उमटणार्या टोकाच्या प्रतिक्रियांचे नवलही वाटायला नको. त्यात ती व्यक्ती नंतर स्वतः स्पष्टीकरण द्यायला आली नाही मात्र तुम्ही पुढाकारर घेवून त्यांची वकिली केली तेव्हा ....... असो जे झाले ते झाले. आपल्याला सम विचारी वाटलेला गट तितकासा समविचारी नाही असा विचार करुन मुव ऑन करा. तुमचा शंतनू अभ्यंकरांशी व्यक्तीगत परीचय होता, एका परीने तुम्ही मैत्र गमावलेत, अशा परीस्थितीत स्वतःला अजून त्रास करुन घेवू नका.
डॉ. शंतनु अभ्यंकर यांना
डॉ. शंतनु अभ्यंकर यांना विनम्र श्रद्धांजली.
त्यांनी लिहीलेला त्यांच्या आजारावरचा लेख कुठे वाचायला मिळेल?
शक्य असेल तर लिंक देता आली तर बरं होईल..
डॉ. शंतनु अभ्यंकर यांना
डॉ. शंतनु अभ्यंकर यांना विनम्र श्रद्धांजली.
त्यांनी लिहीलेला त्यांच्या आजारावरचा लेख कुठे वाचायला मिळेल?
शक्य असेल तर लिंक देता आली तर बरं होईल..
शुगोल
शुगोल
तुम्ही ऐसी अक्षरे ह्या संस्थळावर जा, तिथे डॉक्टरांवर एक लेख आहे. समोरच दिसेल, त्या लेखात त्यांच्या फेसबुक करील लेखाची लिंक एम्बेड केली आहे. किंवा ही लिंक वर कुठेतरी माझ्या प्रतिसादात मी दिली आहे. ती पहा.
खूप काळजाला हात घालणारा आहे
खूप काळजाला हात घालणारा आहे लेख.आणि खूप विवेकी, संयत, विचारीसुद्धा.
https://www.facebook.com/100000435374413/posts/pfbid0PoQAQver2cAVqtuenTF...
केशवकूल, mi_anu, खूप धन्यवाद!
केशवकूल, mi_anu, खूप धन्यवाद!
आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं
आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..
वाईहून तुला निरोप देऊन परतले आणि दोन दिवस अस्वस्थतेत गेले. काहीतरी म्हणावेसे, लिहावेसे वाटत होते. तुझे सह्रद, चाहते, सहकारी, मित्रपरिवार भावनाविवश होऊन तुझ्याबद्दल लिहीत होते, बोलत होते. पण माझ्यासाठी तुझी ओळख ही दोन पातळ्यांवरची होती. एक वैयक्तिक..मामे भाऊ म्हणून आणि दुसरी एक विज्ञानवादी, तत्वनिष्ठ डॅाक्टर, लेखक, कवी, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा, लोकविज्ञान संघटनेचा कार्यकर्ता. ..आणि बरंच काही ! तुझ्या वेगळेपणाची जाणीव आम्हाला लहानपणीच झाली.. तू सतत वाचनात दंग असायचास. आम्ही आजोळी सुट्टीला वाईला आलो की आम्हाला माडीवरच्या पुस्तकांच्या खोलीत हातात एक पुस्तक देऊन बंद करायचास आणि पुस्तक वाचून झाल्याशिवाय खोली बाहेर यायचं नाही अशी तंबी द्यायचास. कुठलाही खेळ असो..त्यातही तू सतत प्रयोगशील असायचास!
जसे मोठे होत गेलो तसे तुझे इतर अनेक गुण समोर येत गेले..लोकविज्ञान संस्था, अंधश्रद्धानिर्मूलन चळवळ, नास्तिक परिषदा यांच्याबरोबर काम करतांना एकीकडे तू पुरेसे मार्क्स न मिळाल्याने नाराजीनेच होमीओपॅथी ची पदवी घेतलीस.. तुझा सखोल अभ्यास, विवेकबुदधी मात्र तुला स्वस्थ बसू देत नव्हती. न पटणाऱ्या गोष्टी प्रॅक्टीस करायच्या हे तुझ्या स्वभावातच नव्हतं, तू नेटाने परत अभ्यास करत, सी. ई. टी मधून बी.जे. मेडिकल ला प्रवेश मिळवलास आणि मग नंतरची तुझी घोडदौड सर्वसाक्षी आहे.
वाईला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि बाबा डॅा. शरद अभ्यंकर यांच्या बुद्धीप्रामाण्यवादाच्या छत्रछायेखाली तुझ्या विचारांची जडणघडण झाली. ओघानेच तू विज्ञानवादी, नास्तिक झालास पण म्हणून भावनाशून्य, अरसिक नव्हतास.. तुझ्याबरोबरच्या काव्य, शास्त्र, विनोदाच्या मैफीली, तुझं ललित लिखाण, कविता, नाटकं हे याला साक्षी आहेत! दोन वर्षांपूर्वी तुला कर्करोगाचे निदान झाले आणि तेव्हाच बरेच टप्पे ओलांडलेल्या ह्या रोगाशी पुढची लढाई सोपी नाही हे लक्षात आलं. “आपुले मरण पाहीले म्या डोळा” या लेखात तर तू तुझ्या आजाराचा आणि उर्वरित आयुष्याचा लेखाजोखाच मांडलास. आजार नसतांना जपलेली विज्ञाननिष्ठा गंभीर आजार झाल्यावरही तसूभर ढळू दिली नाहीस..हतबल होऊन अविवेकी झाला नाहीस. असह्य क्षणांत अवैज्ञानिक मार्ग चोखाळले नाहीस. मर्यादीत वेळ लक्षात घेऊन दुप्पट वेगाने काम करायला लागलास. या वेळात काय काय केले नाहीस?! मग ते राघिका सांत्वनम सारखे भाषांतरीत नाट्यवाचनाचे प्रयोग असोत, पुस्तके, भाषांतरे, व्याख्यानं असोत..भरभरून दिलेस..आणि वेळ संपत आल्याचे लक्षात येताच तटस्थपणे आवराआवरीची तयारी सुरू केलीस. नेहमीचीच तुझी तर्कनिष्ठ भुमिका घेतलीस.. जवळच्या व्यक्ती, कुटुंबीय अशावेळी भावनावश होऊ शकतात.. तिथेही तू आता पुढील औषधोपचार किंवा कुठलाही लाईफ सपोर्ट घेणार नाही अशी ठाम भुमिका घेतलीस.. पण तुझी पत्नी डॅा. रूपा तुझ्या आजारपणात जितक्या खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी होती त्याच खंबीरतेने तिने तुझ्या विचारांच्या पाठीशी उभे राहत तुझ्या निर्णयाचा आदर केला. “माझ्या मृत्युनंतर माझ्यावर कुठलेही अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत” असं लिहून ठेवलंस..जे उपयोगी अवयव असतील त्यांच्या अवयवदानाची ही व्यवस्थित तजवीज करून ठेवलीस..आणि अलविदा म्हटलंस… हे बळ आलं कुठून? येतं कुठून? वाईहून परततांना मामाजवळ (डॅा शरद अभ्यंकर) बसले. तो तसाच.. वयाच्या ८९ व्या वर्षी या परिस्थितीतही कुठे ही तोल न ढळू दिलेला, स्थिरबुद्धी! आणि तिथेच तू परत भेटलास..त्याच्यात…तस्साच..स्थिरबुद्धी, तोल ढळू न दिलेला! तेव्हा कळलं,
“आनंद मरा नहीं …आनंद मरते नहीं”
ता क - तुला श्रद्धांजली, RIP, आत्म्यास शांती वगैरे म्हणण्याच्या भानगडीत मी पडणार नाही कारण तुझ्याच एका व्याख्यानात तू म्हणतोस “मी गेल्यानंतर माझ्या आत्म्यास शांती लाभो असं म्हणणार्यांना मी एवढेच म्हणेन की तुम्ही मला ओळखलेच नाही!
आणि मी तर तुला चांगलीच ओळखून आहे!
- शर्मिला रानडे
बेफ़िकीरजी चमनचिडी च्या
बेफ़िकीरजी चमनचिडी च्या प्रकारातले अनेक माणसां मुळे मायबोलीतले चांगले लेखक सोडून गेले. कुठलाही विषय असो राजकारण त्यात आणणारच नाहितर नको ते विषय त्यात घुसडणार असो....
शूगोल ही लिंक घ्या आपले मरण
शूगोल ही लिंक घ्या आपले मरण पाहिले म्या डोळा https://shantanuabhyankar.blogspot.com/2022/10/blog-post_98.html
https://www.youtube.com/@shantanuabhyankar3466 हे शंतनुचे युट्युब चॅनेल आहे. त्यात वैद्यकीय विषय व अन्यकाही विषयांवर व्हीडीओ आहेत
<< केशवकूल, mi_anu, खूप
<< केशवकूल, mi_anu, खूप धन्यवाद! >>
------- लेख / लिंक दिल्या बद्दल धन्यवाद. उपयोगी माहिती आहे.
https://youtu.be/9dqIyxKTjVw
https://youtu.be/9dqIyxKTjVw?si=6x9YWSM353imboyj शंतनू अभ्यंकरांच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास या माहितीपटात आहे.
हिंदू असण्यासाठी देव मानावाच
हिंदू असण्यासाठी देव मानावाच लागतो का? - डॉ. शंतनु अभ्यंकर यांची मुलाखत
https://youtu.be/B6bDYdjwgxo?si=wupVt5nv8Hj3IhrX
नक्की ऐका
Pages