एका श्रद्धांजलीची चिरफाड

Submitted by प्रकाश घाटपांडे on 16 August, 2024 - 03:53

डॉ शंतनू अभ्यंकरांचे निधन झाले ही बातमी सांगण्यासाठी एकाने नास्तिक विचारांच्या कायप्पा गटात तिथे एक मजकूर फार्वर्ड केला होता. मजकूर असा होता.
कळवण्यास अत्यंत दुःख होते की सुप्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ञ डाॅ. शंतनु अभ्यंकर यांना आज देवाज्ञा झाली. त्यांच्या कुटूंबीयांना हे दुःख सहन करायची ताकद मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
झाले उजळ नास्तिक गटावर चर्चा चालू झाली
एकाने म्हटले की कोण येडझवा असले मेसेज बनवतो? आपण किमान ते फॉरवर्ड तरी करू नयेत ना! ‌अभ्यंकर नास्तिक होते.
दुसरा म्हणाला कि अरे मतितार्थ लक्षात घे.
नाही. हा खोडसाळपणा आहे. शोक व्यक्त केला नाही तरी चालेल. त्या गहिऱ्या संवेदनां‌अभावी आजवर कोणी नातेवाईक मेलेले नाहीत. पण जर शोकसंदेश द्यायचाच असेल तर तो आमच्या टर्म्सवरच द्या. असे एक मत व्यक्त झाले

परमेश्वर चरणी प्रार्थना करणाऱ्याने एवढे लक्षात ठेवायला हवं की, शंतनू अभ्यंकर आणि त्यांचे पूर्ण कुटुंब हे पूर्णपणे नास्तिक होते. तेव्हा अशा प्रकारच्या प्रार्थना करणारे आणि असे मेसेज फॉरवर्ड करणारे त्या विवेकी कुटुंबाचा अपमान करत असतात.हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याने विचार करायला नको? की तो पण डोळे मिटून अंधभक्तांसारखाच वागणार? असे देखिल एक मत व्यक्त झाले

फॉरवर्ड करणारे गृहस्थ उजळ नास्तिक समूहाचे सदस्य आहेत, त्यांनी किमान तारतम्य बाळगून एडिट करायला हवा होता किंवा दोन ओळीचा त्यांच्या निधनाचा वेगळा मेसेज टाकायला हवा होता असे वाटते. अशी एकाने टिप्पणी दिली

आता मी त्या गटात होतो . अधूनमधून मी ही तिथे लिहित असे मी म्हणालो कि देव न मानणार देव माणूस अशी प्रतिक्रिया देणारे अनेक सश्रद्ध अस्तिक लोक असतात कि ज्यांना संबंधित व्यक्ती नास्तिक आहे हे माहित असते. त्यांची आदरांजली वहाण्याची ती पद्धत आहे. सश्रद्ध लोकांना त्यांच्या पद्धतीने आदरांजली वहाण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच. समजा ते फॉर्वड केले तरी त्यामागचा आशय समजून घेणे महत्वाचे.

त्यावर त्या सदस्याने असे सांगितल की आशय जाउ द्या वैश्विक पोकळीत. त्यांच्या संवेदना त्यांनी स्वतःपाशी ठेवाव्यात. इथे कोणाला शोकसंदेशांची भीक लागलेली नाही

त्यावर मी असे म्हणालो कि शंतनू चिकित्सक व नास्तिक असला तरी हेकट नव्हता. इतरांच्या भावना त्यांच्या भाषेत समजावून घ्यायचा.

मग त्याने सांगितले की शंतनू हेकट नव्हते तर तसले आचरट मेसेज केवळ शंतनूंना पाठवा

त्यावर मी असे म्हणालो की देवाने खुद्द त्याची जागा स्वर्गात राखून ठेवली आहे. देव स्वत: न्यायला आला होता नास्तिकाचे रुप घेउन. शंतनूने ओळखले पण देवाशी पण गप्पा मारल्या. कारण तो देव मानत नसला तरी देव मानणार्‍यांना शत्रू पण मानत नव्हता. आता ही संवादाच्या ओघातील टिप्पणी आहे, यात भाषिक सौंदर्य आहे. परमेश्वराने सुद्धा शंतनूविषयी आदर दाखवला कारण शंतनू परमेश्वराला शत्रू मानत नव्हता. असे मला सूचित करायचे होते. शंतनूच्या लिखाणातील भाषाशैली ही हलकी फुलकी विनोदी उपमा अलंकार वाकप्रचार बोली भाषा यांनी समृद्ध असायची.
त्यावर त्यांनी असे सांगितले की हा मेसेजही आम्हाला नको
त्यावर मी म्हणालो पण वाचून झालाच ना!
त्यावर त्यानी ते पाठवणाऱ्याचा अपमान करता आला अशी आशा करतो असे वक्तव्य केले
मी त्या वक्त्यव्यावर असे म्हणालो कि दाभोलकर म्हणायचे ती भावना आपण स्वीकारली नाही कि त्याला ती परत घेउन जावी लागते.
तेही वारले आता. जे जिवंत आहेत ते नियम ठरवतात. सध्याचे नियम मी ठरवतो. अशी त्या सदस्याने टिप्पणी दिली

आता या चर्चेनंतर मी "हा डॉ शंतनू अभ्यंकरांचा ब्लॉग. जरुर वाचा" हा संदेश द्यायला आलो होतो तर मला ग्रुपवरुन काढून टाकल्याचे दिसले.त्यामुळे पुढील संवादच खुंटला आता या ग्रुपवरील मंडळी काही माझी शत्रू नाहीत. शंतनू पण या कायप्प गटात होता. क्वचित कधीतरी लिहित असे. त्याचे लिखाण अत्यंत संयत असे. मी सुद्धा या गटात अधून मधून लिहित असतो. या गटाचे नास्तिक मेळावे होत असतात. मागच्य वर्षी पुणे व सांगली इथे मेळावे झाले होते. त्यापैकी पुण्यातील मेळाव्याला मी गेलो होतो. गटातील काही धुरीण लोक कठोर नास्तिक व तर्ककर्कश आहेत. शुभ, श्रद्धा, देव असे शब्द चर्चेत जरी आले की त्यांची सटकते. सर्वच तसे नाहीत. फार कमी लोक कडवे आहेत. अशाच एका वैचारिक चर्चेत मी दाभोलकरांच्या श्रद्धांजली बाबत ही इथे खालील प्रमाणे लिहिले होते कि जे मी अन्य चर्चापीठांवरही वेळोवेळी लिहिले होते. 2007 पासून मी अशा विषयांवर उपक्रम, मिसळपाव,मनोगत, ऐसी अक्षरे व मायबोलीवर लिहित आलो आहे. यात नवीन असे काही नाही. श्रद्धांजलीच्या चिकित्सेची पार्श्वमूमी समजावी व त्यावर चर्चा व्हावी म्हणुन मी हे सगळे नमुद करत आहे.
----------------
दाभोलकरांच्या स्मृतीस विनम्र "श्रद्धांजली" अशा प्रकारची आपली भावना व्यक्त करणारे अनेक माणसे आहेत. वेगवेगळ्या विचारसरणीची आहेत. दाभोलकरांविषयी आदर व प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आहे.
अंनिस मधे काही कडवे कार्यकर्ते श्रद्धा शब्द वापरत नाहीत.बाकी शब्द योजना करताना अंनिस वार्तापत्रात शुभेच्छा ऐवजी जाणीवपुर्वक सदिच्छा हा शब्द वापरला जातो. दिवाळी अंका ला दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. व्यासपीठा ऐवजी विचारपीठ म्हटले जाते. असे नाही केले तर आपणच अंधश्रद्ध ठरु कि काय अशी भीती वाटते की काय कोण जाणे? शुभ शब्दाचे वावडे असल्याने मी शुभांगी नावाच्या एका मैत्रिणीला गमंतीने सदांगी म्हणतो.
दाभोलकर शब्दच्छला विषयी अनौपचारिक गप्पा मारताना सांगायचे कि जेव्हा पुरुष असे म्हणतो कि मी भीती ने अगदी गर्भगळीत झालो. तेव्हा तू पुरुष आहे तुला कसला आलाय गर्भ? असे आपण म्हणतो का? भाषेतले अनेक शब्दप्रयोगांचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. हा किस्सा जेव्हा मी जेव्हा सदानंद मोरेंना सांगितला तेव्हा ते म्हणाले की बुद्धीवादी कार्यकर्ते लोकभाषा बोलत नाहीत. पण लोकभाषेमुळे एक भावनिक जवळीक साधली जाते. हे अगदी खर आहे. पण या मुद्द्याची दुसरी बाजू पण आहे. लोकभाषेची परंपरा गतानुगतिकतेनसार राखली तर समयोचित सुयोग्य पर्यायी शब्द रुढ होणार नाहीत. त्यामुळे डॉ दाभोलकरांच्या स्मृतीस "आदरांजली" हे ही तितकेच उत्कट व भावपूर्ण आहे.
-----------------
मी स्वत: अंनिस मधे 1988-89 पासून कार्य करतो. माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद असे पुस्तक अंनिस ने देखील प्रकाशित केले आहे. शिवाय अंनिस वार्तापत्राचा लेखक पुरस्कार ही मला मिळाला होता. 2008 मधे झालेल्या फलज्योतिष चाचणीचा मी समन्वयक होतो. नारळीकर, दाभोलकर, संख्याशास्त्रज्ञ कुंटे व समन्वयक मी अशी चाचणी टीम होती. सर्व पत्रिका मी स्वत: तयार केल्या होत्या. दाभोलकर गेल्यानंतर माझा अंनिसतील सक्रिय सहभाग कमी झाला. पण मी आजही संपर्कात व हितचिंतक आहे. शंतनू अभ्यंकरांशी ही माझा व्यक्तिगत परिचय, संवाद व संपर्क होता. लिव्हिंग विल, अवयवदान, इच्छामरण अशा विषयांवर आमची देवाण घेवाण होत असे. आमच्या दोघांचेही लिव्हिंग विल माझ्या बायकोने नोटराईजड केल होते. मुख मुद्दा हा कि अशा पद्धतीचे अनेक लिखाण मी समाज माध्यमात करत असतो. त्यावर प्रतिक्रिया येतात. त्यातून समाज मनाची स्पंदने कळतात. अशा वैचारिक चर्चा संवाद या सामाजिक नोंदी असतात. मायबोलीवर अशा अनेक विषयाची नोंदी आहेत. सामाजिक दस्तैवज म्हणून त्याचे एक महत्व आहे त्यामुळे मला हे इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटले. यावरील प्रतिक्रिया या मानसशास्त्रीय अभ्यासासाठी देखील उपयुक्त ठरतील याबाबत माझ्या मनात शंका नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांतपणे, त्या व्यक्तीचा विचार करत त्याच्या प्रती प्रेम, संवेदना बोलुन किंवा न बोलता मनात व्यक्त करणे. >>> या व्यक्त होण्याला श्रद्धांजली म्हटले नाही तर त्याचे महत्व राहत नाही का ? जगात सर्वत्र श्रद्धांजली शी समानार्थी शब्दच वापरत असतील का ? प्रेमांजली म्हटले तर काय फरक पडतो ?

खरे तर श्रद्धांजली शब्दाचा शब्दशः अर्थ काय हे कुणी तरी सांगावे. साधनाताईंनी जी व्याख्या केली आहे त्यात श्रद्धेचा संबंध काय ?

नास्तिकाच्या पत्नीचे नाव श्रद्धा असू शकते. श्रद्धा नावाची स्त्री नास्तिक असू शकते.
फक्त शब्द म्हणून त्याकडे पहायचे असेल तर.

ज्यांनी ती श्रद्धांजली उजळ कायप्पा गटावर फार्वर्ड केली त्यांना आपण अ म्हणू यात. या कायप्पा गटावर 450 पेक्षा अधिक सदस्य आहेत. बहुसंख्ह्य नाममात्र, काही वाचनमात्र काही अल्पप्रतिसादमात्र व अगदी 25-30 सक्रिय. उजळ सोसायटीचे अधिकृत सभासद व अन्य समविचारी सुद्धा कायप्पावर आहेत. आता या अ यांना नंतर मी फोन केला. तुम्ही खोडसाळ पणे इथे ते फॉर्वर्ड केले आहे असे चर्चेत म्हटले आहे. ते विज्ञान शिक्षक असून मुलांमधे विज्ञान प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतलेले गृहस्थ आहेत. ते म्हणाले की केवळ बातमी म्हणून फक्त सहज फार्वड केली या पेक्षा अधिक काही नाही. एवढ काही होईल असे मला वाटले नाही. माझा हेतु तो नव्हता.
त्यांनी फक्त फॉर्वड केले आहे त्यात खोडसाळपणा नाही हे मला माहित होते. म्हणजे तसा अंदाज होता पण केवळ खात्रीसाठी मी त्यांना फोन केला.
आता मी ही चर्चा केवळ मायबोलीवर नाही तर फेसबुकवर ही घडवून आणली आहे. उद्देश अगदी सरळ आणि स्वच्छ आहे. हा दस्त ऐवज सामाजिक नोंद म्हणून इथे मुद्दाम नमूद करत आहे. त्यावर चर्चा घडवून आणणे. मानसशास्त्रीय अभ्यासासाठी ती उपयुक्त ठरेल असे मला वाटत्ते
आत कायप्पावरील गटातून चर्चा चालू असतानाच मला उडवण्यात आल्याने तिथे पुढची चर्चा मला माहित नाही. पण फेसबुकवर त्या लोकांनी प्रतिवाद केले आहे. ते लोक म्हणजे ठराविक दोन चारच ऎक्टीव्ह मेंबर. बर या प्रकारच्या चर्चा मी त्या गटात अनेक वेळा केल्या आहेत ही काही पहिली वेळ नाही. जनरली कायप्पा गटात अनेक अन्य विषयाम्वरील भरताड असते. तशी ती तिथेही आहे.
माय बोली वर चर्चेत बेफीकिर यांनी उचित प्रश्न निर्माण केला आहे की एक संपूर्ण नास्तिक व्यक्ती निवर्तली तर त्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या श्रद्धांजलीची शब्दरचना कशी असायला हवी हे कोणी सांगेल का? आता त्या अ गृह्स्थांनी जे फार्वड केले त्या देवाज्ञा,श्रद्धांजली, परमेश्वर असे शब्द होते जे तेथील काही धुरीण लोकांना खटकले होते म्हणूनच तर चर्चा झाली. हे वैचारिक मुद्दे आहेत. ते म्हणजे काही खाजगी गटातील गोपनीय कटकारस्थान रचले जातेय आणि मी ते उघड केले असा भाग नाही. लेखाच्या शेवटी म्हणल्याप्रमाणे मी फक्त विचारपट मांडला आहे. विचारसरणींची विविधता ही जगात असणारच. एकाच रंगाच्या सुद्धा किती तरी छटा असतात. विचार बंदिस्त असू नये. मग ते विचार कुठलेही असोत. सामाजिक नोंदींसाठी ते महत्वाचे ठरतात. हे तर मी कायमच म्हणत आलो आहे. या चर्चेतील काही मंडळी माझी मित्रच आहेत. 2007 पासून मी अशा विषयांवर उपक्रम, मिसळपाव,मनोगत, ऐसी अक्षरे व मायबोलीवर लिहित आलो आहे. यात नवीन असे काही नाही. फार तर काही वाचक नवीन व प्रतिसाद नवीन असतील. याचेच तर मला निरिक्षण करायचे आहे. कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा नाहीये. समाजमनाच्या स्पंदनांची नोंद होते व एक द्स्त ऐवज तयार होतो. आश्चिग यांनी वैयक्तिक अंधश्रद्धा वैयक्तिक लढा या धाग्यात एक चांगला दस्तैवज तयार झाला आहे. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी व पेशानुसार त्यांचा बघण्याचा दृश्टीकोन ऎकेडमिक आहे हे जाणवते. समजा मुद्दा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. तर त्यावर चर्चा करताना समोर कोण आहे याचा विचार करुन उदाहरणॆ द्यावी लागतात. उदा. आमच्या गावी सोमवारी बैलांचा बाजार असायचा. सोमवारी एसटीच्या बाजार गाड्या असायच्या. एकदा एस टी त एक म्हातारी गर्दित चढली. कंडक्टरला गाडीत गर्दी झाल्याने पुढ्ची 'शीटं' नाकारायची होती. तो म्हतारीला खाली उतरायला सांगत होता. म्हतारी काही ऐकत नव्हती. 'मपल्या एकटीच्या वझ्याने तुपल्या यवढ्या मोठ्या गाडीला काय व्हतय रे" कंडक्टर म्हणाला," तसं न्हाय म्हतारे, गाडी उराळन ना?" म्हतारी पटकन खाली उतरली.{ उरळणे- बैलगाडीत ओझे भरताना बैलांची क्षमता, ओझ्याचा प्रकार, आकार. वजन याचा विचार करुन ते ठेवावे लागते अन्यथा गाडीचा गुरुत्वमध्य ढासाळून जू[बैलगाडीचा बैलांच्या मानेवर येणारा भाग] उलटे होण्याची संभावना असते त्यामुळे बैलाच्या गळ्याला फास बसतो} म्हणजे म्हतारीला तिच्या भाषेत सांगितल्यावर बरोबर समजले. अशी मॉडेल्स विकसित करावी लागतील.
बेफी यांचा एक मुद्धा मला आवडला तो म्हणजे शांतपणे दोनदा वाचून त्यावर प्रतिक्रिया ठरवायची. लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झाल्याने प्रतिक्रिया द्यायची घाई. शांतपणे वाचले कि लक्षात येते कि अरे आपण ज्यावर प्रतिक्रिया देणार होतो ते याला म्हणायचे नाहीये. मग कधी कधी घाईघाईत प्रतिकिया एडिट करावी लागते. शिवाय मुद्दा काय आहे याबरोबर कोण तो मांडतय हे आपण त्यांने केलेल्या आतापर्यंतच्या लिखाणावरुन ही ठरवतो. कधी कधी एखाद वाक्य घेउनच त्यावर झोडपले जाते. उदा. धर्म ही अफूची गोळी आहे.
लोकशाहीचा उद्गाता व्हॉल्टेअर चे सुप्रसिध्द वचन आहे, ज्यात व्हॉल्टेअर म्हणतो, "I May Not agree with a word what you say but I will defend untill my death your right to say so.'' 'याचाच अर्थ मी तुझ्या मताशी एका अक्षरानेही सहमत नाही, पण तुला तसे सांगण्याचा अधिकार आहे, हे मी माझ्या कंठात प्राण असेपर्यंत सांगत राहीन'. मात्र आज ही वैचारिक मतभिन्नता हरवत चालली आहे.एखादी विचारश्रेणी ही सर्वांसाठी व चिकित्सेसाठी खुली असावी. वैज्ञानिक दृष्टीकोन हा सर्वांसाठी खुला असतो. विचारश्रेणी ला बंदिस्त करणे हे त्या त्या विचारश्रेणीला घातक असते. आपापली विचारश्रेणी व्यक्त करणे विचारांचे आदानप्रदान करणे हे विचारमंथन असते. आपले विचार इतरांना पटलेच पाहिजे असे नाही. राज्यघटनेत काही मर्यादा पाळून अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिले आहे. ते सर्व विचारसरणीसाठी आहे. मला या निमिताने एक युट्युबर व्याखान आवडले होते. https://youtu.be/G0HMuIXWCAc
चुकवू नये असे काही लोकशिक्षण व प्रबोधन -धर्मनिरपेक्षता
डॉ विकास दिव्यकिर्ती यांचे हे सलग 5 तास 20 मिनिटांचे व्याखान आहे. धर्मनिरपेक्षता सांगताना प्रथम धर्म ही काय संकल्पना आहे याने सुरवात केली आहे. हे व्याखान आपल्याला तुकड्या तुकड्यांनी पहाता येते. लिंक तुटत नाही.कारण श्रोत्यांशी जोडलेली नाळ. हे सर्व विचारश्रेणीच्या लोकांसाठी, चळवळींसाठी,युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी, सजग नागरिकांसाठी, सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एक वैचारिक मेजवानी आहे. एक संस्कार देखील आहे. कार्यकर्त्यांनी उन्मादात भरकटू नये यासाठी घातलेला एक लगाम देखील आहे व नैतिक बनण्यासाठी दिलेले एक प्रोत्साहन देखील आहे. संयम तटस्थता बाळगून केलेले एक विवेकी विश्लेषण आहे.या निमित्ताने मला डॉ दाभोलकरांची प्रकर्षाने आठवण आली. कार्यकर्त्यांनी व्यापक बनताना ज्याचे भान राखले पाहिजे ते नेमके काय असते याची प्रचिती भाषणात येते. आज डॉ हयात असते तर त्यांनी अशा बौद्धीक अभ्यासवर्गाचा आग्रह धरला असतात.काही प्रमाणात डॉ यशवंत सुमंत यांनी ही गरज पुर्ण केली आहे. दुर्दैवाने यशंवत सुमंत आपल्यातून लवकर गेले व कार्यकर्त्यांना ट्रॅकवर ठेवणार विवेक कमी पडायला लागला. असो यावर चर्चा निरंतर होत रहाणार आहे. शब्द हे शस्त्र आहे जपून वापरावे लागते. आवरते घेतो

एखाद्या whatsapp ग्रुपवर झालेली वादावादी/चर्चा ही इतर माध्यमांवर नेऊन त्यावर चर्चा/त्या चर्चेचं दस्तावेजीकरण करण्याइतकी महत्त्वाची आहे असं तुम्हाला का वाटलं?
अशा प्रकारचे वाद/चर्चा या नास्तिक/विवेकवादी व्यक्तींच्या मृत्यूनंतर होतात असं तुमचं निरीक्षण असेल तर काही दिवस जाऊ देऊन, जरा सखोल विचार करून, नावं न घेता, निरीक्षण मांडणे आणि त्यावर आपलं मत देणे हा जास्त योग्य मार्ग असू शकत नाही का?

तुम्हीच म्हटलं आहे की बर या प्रकारच्या चर्चा मी त्या गटात अनेक वेळा केल्या आहेत ही काही पहिली वेळ नाही. जनरली कायप्पा गटात अनेक अन्य विषयाम्वरील भरताड असते. तशी ती तिथेही आहे.

मग आता परत कशासाठी? की तिथे करता येत नाही म्हणून इथे?

वावे, तुम्हाला पटेल असे उत्तर देण्याची क्षमता माझ्यात नाही. मला हे योग्य वाटले एवढेच उत्तर आहे.क्षमस्व!

मायबोली हे न्यायालय असेल तर न्यायालयासमोर दुसरा पक्षही आपली बाजू मांडण्यासाठी आला पाहिजे.
न्यायाधीश त्यानंतरच आपला निकाल देतील.

हा अतिशय अतिरेकी प्रकार वाटला. नास्तिक असले म्हणून त्यांच्या संदर्भात कोणतीही आस्तिक भाषा वापरायची नाही ह्याचा इतका हट्ट करणे समजले नाही.

<<<त्यापेक्षा agnostic असणे ही जास्त योग्य भुमिका वाटते. परमेश्वर /सृष्टिनियंती अशी एखादी कोणती शक्ती आहे की नाही याची कल्पना नाही आणि असली काय किंवा नसली काय त्यामुळे काही फरक पडत नाही.>>>

Null hypothesis विश्वास न ठेवणे असते. मी ड्रॅगन आणि दंतपरी ह्या संकल्पनानबाबत agnostic नाहीये. तर देव परमेशवर ह्या बाबत का agnostic राहू?

<<<असली काय किंवा नसली काय त्यामुळे काही फरक पडत नाही.>>>
मामी, हे अगदी पटलं. देव विसरा, मी तर स्वतः बद्दलही काय ते agnostic आहे. मी ड्रॅगन, सांटा आणि दंतपरी ह्या संकल्पनां बाबतही agnostic आहे.
जाणारा जातो जीवानिशी आणि लोक इकडे चर्चा करताहेत.

कवीचा मृत्यू आणि इतर, याची आठवण झाली.
सगळ्यांच्या सोयीसाठी/वाचनासाठी वर काढतोय.
बाकी शब्द म्हणजे निव्वळ बुडबुडे, जिलब्या
. >>> या सर्वाचा या धाग्याशी काय संबंध आहे हे कधीपासून समजून घेतोय. पण प्रतिसाद देण्याचे टाळले होते.
जाणारा जातो जीवानिशी आणि लोक इकडे चर्चा करताहेत. >> आता समजून घेण्याची तीव्र इच्छा आहे. शहाणे करून सोडावे, सकळ जन.

डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी स्वतःच्या आजारपणाबद्दल लिहिलेली फेसबुक वरची पोस्ट वाचली.
आणि हा लेख "सत्य असत्याशी मन केले ग्वाही| मानियले नाही बहुमता."
लेखक डॉ अनिल यशवंत जोशी
https://www.aisiakshare.com/node/9068
एव्हढेच वाटले,
"Death, be not proud."

या अवलिया (आणि नास्तिक) इसमाची पहिली भेट आणि ओळख (लताबाई गेल्या त्या दिवशी) पुण्यात शनिवार पेठेतील जुनी मंदिरे बघण्याच्या भटकंतीत झाली होती! अगदी नीट‌ आठवतं आहे की संदीप गोडबोले यांनी घडवून आणलेल्या या परिक्रमेत वाईहून डॉक्टरसाहेब सकाळी सात वाजता ओंकारेश्वरी(!) हजर होते. हां, आता ते देवळात जाऊन देखल्या देवा दंडवत घालत होते अथवा नाही, हे काही केल्या आठवत नाहीये.
मायबोलीवर त्यांच्या लेखनावर, त्यांच्या कार्यावर चर्चा होणे हे अपेक्षित आहे, तिथे ही कुठली मगजमारी चालली आहे?

अबुवा,

संदीप गोडबोले यांना तुम्ही ओळखता का?

मायबोलीवर त्यांच्या लेखनावर, त्यांच्या कार्यावर चर्चा होणे हे अपेक्षित आहे, तिथे ही कुठली मगजमारी चालली आहे? >> +१

बेफिकीर,
मी त्यांना ओळखतो. पण ते मला ओळखत असतील असं वाटत नाही.
जुन्या पुण्याविषयी, त्या इतिहासाविषयी, संस्कृतीविषयी माहिती आणि आस्था असणारा इसम (असामी?!). त्यांच्या सोबत तीन जुन्या पुण्याची ओळख करून घेण्याचे वॉक केले आहेत.

कॉमी तुमच्या नास्तिक मालिकेत अजून छटेची भर घालतो नास्तिकातला एक वर्ग असाही आहे त्यांचा सूर असा असतो. यात ही अनेक छटा दिसतील. उदा.
जी गोष्ट नाहीच आहे ती गोष्ट तुम्ही मानताच कशी? याचा अर्थ तुम्ही यडपट आहात. तुमच्या बुद्धीचा विकास अजून व्हायचा आहे. जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती मानणे हा मनोविकार आहे. शहाणे करुन सोडावे सकल जन म्हणून आमचे ते कर्तव्य आहे की तुम्हाला सत्याची जाणीव करुन देणे. एवढ आम्ही कंठशोष करुन सांगतोय की जी गोष्ट नाहीये ती मानणे तद्दन मुर्खपणा आहे तर तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला (वैचारिक) झोडपूनच काढले पाहिजे.तुम्हाला विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे? ईश्वर या गोष्टीला विज्ञानात काहीही आधार नाही ती मानायची कशाला? अंधश्रद्धाळू कुठले? संकल्पना पातळीवर तरी कशाला मानायचा? उगीच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल कपोल कल्पित संकल्पना मांडत बसून फुकट वैज्ञानिक जाणीवांचा अपमान करायचा? जे विज्ञान सिद्ध आहे तेच मानावे. जर ईश्वर विज्ञानाने सिद्ध केला तर आम्ही तो तेव्हा मानू. जी गोष्ट कदापिही शक्य नाही.अन काय हो तुमचा तो निर्गुण निराकार ईश्वर मानला काय आन न मानला काय? अन जो नाहीच आहे तो काय शिक्षा देणार?तुमची सदसदविवेकबुद्धि दिलीय ना निसर्गाने ती वापरा.
कशाला देव पाहिजे? मी सदसदविवेकबुद्धीला पटत नाही म्हणून खोटे बोलणार नाही. देवाला आवडत नाही म्हणून नाही. तुम्ही देवाला आवडत नाही म्हणून खोटे बोलणार नसाल तर आम्हाला ते मान्य नाही................
तुम्हाला विज्ञानाची शपथ घेउन सांगतो कि या श्रद्धा, ईश्वर, भावना या तद्दन फालतू गोष्टी आपल्या बुद्धीला लागलेले ग्रहण आहे.ही मानसिक गुलामगिरी आहे. ही चक्क बौद्धीक दिवाळखोरी आहे.वेळीच सावध व्हा अन्यथा विनाश अटळ आहे.

चर्चेच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झाले व होतात. त्यात वाचक अजून काही भर घालू शकतात
एक संपूर्ण नास्तिक व्यक्ती निवर्तली तर त्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या श्रद्धांजलीची शब्दरचना कशी असायला हवी हे कोणी सांगेल का? इथे एक उपप्रश्न येतो की श्रद्धांजली वाहणारी व्यक्ती रुढार्थाने नास्तिक आहे की अस्तिक? सश्रध्द, अस्तिक व्यक्ती वारली तर नास्तिक मंडळी सांत्वनाचे शब्द लिहीताना त्या मृत व्यक्तीच्या श्रद्धेस अनुसरून म्हणजे- देव, ईश्वर, प्रार्थना, ईश्वरेच्छा, प्रारब्ध इ शब्द वापरून - मेसेज लिहीतात का? की चित भी मेरी और पट भी मेरा?
जन्मला तो मरणार व मेला ही वस्तुस्थिती आहे निसर्ग नियम आहे तो मग नास्तिकांना वाईट वाटणे, दुःख होणे हे कसे संभवते? सश्रद्ध लोकांनी नास्तिक व्यक्तिंना श्रद्धांजली वाहताना ईश्वर,श्रद्ध,परमेश्वर,देव,देवाज्ञा,आत्मा असे शब्द वापरले तर तो मृत व्यक्तिचा अपमान ठरेल का? इथे त्यांच्या भावना दुखावल्या असे म्हणता येते का? आदरांजली ऐवजी श्रद्धांजली वा उलट असे शब्द वापरल्याने अस्तिक/नास्तिक लोकांच्या भावना अनुक्रमे दुखावतात का? श्रद्धांजली ची चिरफाड करावी का? केली तर ती केव्हा करावी? किती काळाने केली तर ती समयोचित म्हणता येईल? नास्तिक लोकांनी भावनेला किती थारा द्यावा? नास्तिकतेचे उपप्रकार किती? त्यांच्या छटा कोण कोणत्या आहेत? नास्तिकांचे संघटन होउ शकते का? कडवा, ठार नास्तिक म्हणजे नेमके काय? व कोण? नास्तिक म्हणजे नेमके कोण? ईश्वर ही संकल्पना नेमकी काय आहे? प्रत्येकाच्या या संकल्पना वेगळेवगळ्या असतील तर नास्तिकांचा कोणत्या ईश्वराच्या संकल्पनेला विरोध नाही वा आहे? नास्तिक व अस्तिक लोक एकमेकांचे सहअस्तित्व मान्य करतान त्यांना काय अडचणींचा सामना करावा लागतो?अशा चर्चा कुठे कराव्यात? कोणी कराव्यात? या चर्चा वेळेचा अपव्यय आहे का?

डॉ. शंतनू अभ्यंकर नास्तिक होते. आता ते नाही आहेत. अगदीच वाईट गोष्ट आहे. Sad

आदरांजली, श्रद्धांजली, वाईट झाले... देवाघरी अशी शब्द योजना केली तरी त्यात खटकण्याचे कारण नाही. त्यांच्या कार्याबद्दल मला आदर आहे तसाच तो इतरांना पण आहे. कुणी कसे व्यक्त व्हाव्हे हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच.

त्यांचे विचार / लेख/ सामाजिक कार्य/ वैद्यकीय सेवा/ कॅन्सरशी लढत असतांनाचे त्यांचे अनुभव यावर वाचायला जास्त आवडेल. त्यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे एव्हढे तर आपण करु शकतो.

जन्मला तो मरणार व मेला ही वस्तुस्थिती आहे निसर्ग नियम आहे तो मग नास्तिकांना वाईट वाटणे, दुःख होणे हे कसे संभवते? >> म्हणजे नास्तिकांना भावना नसतात? हा शोध कधी आणि कुणाला लागला? पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, डॉ. जयंत नारळीकर ही तीन मला चटकन आठवलेली नावं. हे तिघेही नास्तिक. यांना भावना नव्हत्या/नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय?
जगात आस्तिक आणि नास्तिक असे दोन गट पाडलेले आहेत आणि एका गटातील सगळी माणसं अगदी एकमेकांसारखी असतात, त्यांची सगळ्या बाबतींतली मतं एकमेकांशी परफेक्ट जुळतात आणि विरुद्ध गटातल्या माणसांच्या मतांशी ती सदासर्वकाळ १८० अंशाने विरुध्द असतात, कुठल्याही बाबतीत त्यांचं विरुद्ध गटातल्या कुणाशीच जमणं शक्य नाही,
असं नसतं.
काही नास्तिकांच्या मतांवरून सगळ्याच नास्तिकांबद्दल सरसकट विधानं करणं (आणि आस्तिकांच्या बाबतीतही हेच) हे चुकीचं आहे.

प्रकाश घाटपांडे, एक विनंती आहे. पहा विचार करून.
या विषयावर तुम्हाला मायबोलीवर सविस्तर आणि जनरल चर्चा करायची इच्छा असेल तर कृपया धागा संपादित करून डॉ. शंतनू अभ्यंकरांच्या बाबतीतले whatsapp मेसेजेस असं जे स्वरूप आहे ते बदलून तुम्ही Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 August, 2024 - 11:14 या प्रतिसादात मांडलेले मुद्दे हेडरमध्ये लिहा. ज्यांना इच्छा/रस आहे ते चर्चेत भाग घेतील.
किंवा नवीन धागा काढा आणि हा धागा उडवण्याची विनंती प्रशासकांना करा.

कोणी श्रद्धांजली मेसेज फॉरवर्ड केला तर ठीक आहे पण त्यावर हे लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.. अनावश्यक वाटले

>>>>>>>मी:- देवाने खुद्द त्याची जागा स्वर्गात राखून ठेवली आहे. देव स्वत: न्यायला आला होता नास्तिकाचे रुप घेउन. शंतनूने ओळखले पण देवाशी पण गप्पा मारल्या.

डिस्क्लेमर: मी नास्तिकांचा प्रतिनिधी नाही. खालील पोस्ट एका नास्तिकाचे मत असे समजावे.

<<<एक संपूर्ण नास्तिक व्यक्ती निवर्तली तर त्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या श्रद्धांजलीची शब्दरचना कशी असायला हवी हे कोणी सांगेल का? >>>

आपापल्या परीने द्याव्यात. द्याव्यातच असेही नाही, देऊच नयेत असेही नाही. नास्तिक आहे म्हणुन मुद्दाम खिल्ली उडवून देऊ नयेत ही अपेक्षा. कोणी असे केल्यास नक्की काय लिहिले यानुसार संयत निषेध/टिका/दुर्लक्ष करावे. हेच आस्तिक व्यक्ती निवर्तली असता नास्तिक व्यक्तीने त्यावर व्यक्त होताना लागु.
नास्तिक व्यक्तीने श्रद्धांजली शब्द वापरला (किंवा इतर कुठल्याही वेळी अरे देवा! असे उद्गार काढले, इत्यादि) याचा अर्थ तो ढोंगी नास्तिक किंवा अद्यापही गोंधळलेला नास्तिक आहे असा होत नाही. हे केवळ सवयीने तोंडात येणारे शब्द असू शकतात. देवाची (देव या संकल्पनेची) आठवण झाली असेल तरच त्या नास्तिक व्यक्तीच्या मनात अद्याप गोंधळ आहे असे म्हणता येईल.

<<<इथे एक उपप्रश्न येतो की श्रद्धांजली वाहणारी व्यक्ती रुढार्थाने नास्तिक आहे की अस्तिक? सश्रध्द, अस्तिक व्यक्ती वारली तर नास्तिक मंडळी सांत्वनाचे शब्द लिहीताना त्या मृत व्यक्तीच्या श्रद्धेस अनुसरून म्हणजे- देव, ईश्वर, प्रार्थना, ईश्वरेच्छा, प्रारब्ध इ शब्द वापरून - मेसेज लिहीतात का? की चित भी मेरी और पट भी मेरा?>>>
वरच्या उत्तरात कव्हर झाले आहे.

<<<जन्मला तो मरणार व मेला ही वस्तुस्थिती आहे निसर्ग नियम आहे तो मग नास्तिकांना वाईट वाटणे, दुःख होणे हे कसे संभवते?>>>
का वाईट वाटु नये अथवा का दु:ख होऊ नये कळले नाही. हा मूळ प्रश्न ज्यांनी विचारला त्यात पुढे त्यांनी याचे जे स्पष्टीकरण दिलंय ते अतार्किक आणि श्रद्धेशी ओढुन ताणुन संबंध जोडलेले वाटले.

<<<सश्रद्ध लोकांनी नास्तिक व्यक्तिंना श्रद्धांजली वाहताना ईश्वर,श्रद्ध,परमेश्वर,देव,देवाज्ञा,आत्मा असे शब्द वापरले तर तो मृत व्यक्तिचा अपमान ठरेल का?>>
नाही. पहिल्या प्रश्नाचे उत्तर बघा.

<<इथे त्यांच्या भावना दुखावल्या असे म्हणता येते का?>>
मृत व्यक्तीच्या भावना कशा दुखावणार?

<<आदरांजली ऐवजी श्रद्धांजली वा उलट असे शब्द वापरल्याने अस्तिक/नास्तिक लोकांच्या भावना अनुक्रमे दुखावतात का? >> दुखायला तर नको. पण असतात काही लोक दोन्ही बाजूचे जे दुखावून घेतात.

<<श्रद्धांजली ची चिरफाड करावी का? केली तर ती केव्हा करावी? किती काळाने केली तर ती समयोचित म्हणता येईल?>> >> ज्याने त्याने ठरवावे. माझ्या मते व्यक्ती गेल्या क्षणी पहिली श्रद्धांजली आली तरी करायला हरकत नाही. पण गेलेली व्यक्ती नास्तिक असली तरी तिचे सगळे प्रियजन नास्तिकच असतील असे नाही. केव्हा करावी हे ठरवताना त्याचाही विचार करावा असे सुचवतो.

<<नास्तिक लोकांनी भावनेला किती थारा द्यावा?>>
प्रश्नाचा रोख नीट कळला नाही. नास्तिकाना भावना असतात का/असाव्यात का असा प्रश्न आहे का? असल्यास या सृष्टीचा निर्माता कुणी परमेश्वर आहे सर्व काही त्याच्या इच्छेनुसार चालते अशा प्रकारची संकल्पना नाकारणे याचा त्याच्याशी काय संबंध?

<<नास्तिकतेचे उपप्रकार किती? त्यांच्या छटा कोण कोणत्या आहेत?>> >>
असे काही विशिष्ट उपप्रकार, छटा आहेत का माहीत नाही.
पण आस्तिक व नास्तिक हे दोन्ही बायनरी नाहीत.

<<नास्तिकांचे संघटन होउ शकते का?>> सर्व नास्तिकांचे वेगळे असे संघटन का करावे? मी तरी अशा संघटनेत सामील होणार नाही. काही ठराविक उद्दिष्टे असतील तर विचार करता येईल. या दृष्टीने काही परंतु फक्त नास्तिक असलेली संघटना का शक्य नाही?

<<कडवा, ठार नास्तिक म्हणजे नेमके काय? व कोण?>> मला वाटते कट्टरवादी, ज्यात टॉलरन्स फारच कमी या दृष्टीने जिथे कुठे कडवा/ठार असा शब्द वापरतात तसाच इथे वापरत असतील. याचा नास्तिकतेपेक्षा स्वभावाशी अधिक संबंध असावा.

<<<नास्तिक म्हणजे नेमके कोण? ईश्वर ही संकल्पना नेमकी काय आहे? प्रत्येकाच्या या संकल्पना वेगळेवगळ्या असतील तर नास्तिकांचा कोणत्या ईश्वराच्या संकल्पनेला विरोध नाही वा आहे?>>>>>
मला वाटते मान्य नसणे आणि विरोध असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि कॉमी यांच्या धाग्यात नास्तिकांची भूमिका विस्तृतपणे स्पष्ट केली आहे.
इथे थोडक्यात सांगायचे म्हणजे ईश्वर अथवा एक कुठली अशी शक्ती (एक किंवा अनेक).आहे जिने हे सर्व विश्व बनवले आहे आणि ते ती नियंत्रित करते आहे. (आता ती शक्ती इंटिलीजंट, कॉन्शस, निरीक्षण करणारी, निर्णय घेणारी इत्यादि असणार हे ओघाने आलेच. हे कंसातले मुद्दाम लिहिले आहे कारण केवळ "हे विश्व नियंत्रित करणारी एखादी शक्ती आहे" एवढे नमुद करून ही शक्यता कशी काय नाकारता असा प्रश्न इथे मामीने विचारला आहे. तसेच बरेचजण जशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तशीच अशी एक शक्ती आहे हे का मान्य नाही विचारत असतात) अशी सर्वसाधारण ईश्वराची संकल्पना शेवटी मांडली जाते. ती मान्य नसणे म्हणजे नास्तिक असणे.

<< नास्तिक व अस्तिक लोक एकमेकांचे सहअस्तित्व मान्य करतान त्यांना काय अडचणींचा सामना करावा लागतो?>>
मोठी पोस्ट होईल. नास्तिक या नात्याने प्रत्यक्ष जीवनात काय अडचणी येतात हे वेगळ्या प्रतिसादात लिहेन जमल्यास.
तसेच या बाबतीतएक निरीक्षण आहे.
कुठे काही चर्चा होत असताना किंवा वेगळा धागा काढुन, मांडलेली मते वाचून अनेकदा लोक जणु आपल्या आस्तिक/नास्तिकतेवरच गदा आली असा समज करून घेतात असे त्यांच्या प्रतिसादातुन जाणवते. परंतु अशा प्रकाराला मी अडचणी समजत नाही. तसेच कळत नकळत काही लोक आस्तिकतेचा/नास्तिकतेचा प्रचार करतात किंवा सरसकटीकरण केलेले असते. त्यावर आक्षेप आला तर त्यालाही मी अडचणी समजत नाही. तसेच ट्रोल्स ही समस्या सर्वच क्षेत्रात आढळते. तेव्हा प्रत्यक्ष जीवन जगताना काय अडचणी येतात त्याच इथे अपेक्षित आहे असे मी समजतोय.

<<अशा चर्चा कुठे कराव्यात? कोणी कराव्यात? या चर्चा वेळेचा अपव्यय आहे का?>>

वेळेचा अपव्यय आहे हे कुणाचे वैयक्तीक मत असू शकते. त्यामागे त्यांचा तसा काही अनुभव असु शकतो जसे की चर्चेत उद्भवलेल्या प्रश्नांचे मुद्देसूद उत्तर दिले आहे तिकडे दुर्लक्ष करून परत परत तेच ते रेटले जाते वगैरे. चर्चा कुठेही कराव्यात, कोणीही कराव्यात.

मानव पोस्ट अतिशय आवडली आहे.

वावे, जर धागाकर्त्याला तो फॉरवर्ड देऊन त्यावर चर्चा अपेक्षित असेल. धाग्याचा ट्रिगरच तो असेल तर सारखा सारखा हा धागा काढायलच नको होताचा धोशा का
लावलायस? ज्यांना डॉक्टरांच्या कार्याबद्दल चर्चा करायची आहे ते वेगळा धागा काढू शकतात आणि या धाग्याकडे दुर्लक्ष करू शकतात की.

या धाग्यामुळे डॉक्टरांच्या विचारांचा / कार्याचा अपमान वगैरे झाल्यासारखं का वाटतंय?

एखाद्या मर्यादित ग्रुपवरची त्रोटक चर्चा देऊन एकांगी बातमीदारी करून चर्चाप्रस्ताव मांडणे योग्य वाटते का? इतरांची बाजू ऐकून मत बनवणे योग्य आहे.

त्यांची इच्छा असेल, वेळ असेल तशी गरज वाटत असेल तरच. एकतर्फी बातमी आहे हे स्पष्ट झालेले असताना आता यावर पूर्ण विराम देणे योग्य आहे राहील. उपप्रस्ताव स्वतंत्र धागा म्हणून मांडता येईल.

Pages