१. कोंबडीचा रसा -
एक चांगली कोंबडी घेतल्यास त्याचा मसाला -
अर्धा तोळा मिरच्या, १ तोळा मीठ, ४ मासे हळद, ३ मासे कोथिंबीर, ५ मासे अलें, २ मासे शहाजिरे, १ मासा लवंगा, १ मासा बडीशोफ, २ मासे मिर्यें, ३ मासे दालचिनी, अदपाव तूप, २ मासे वेलदोडे, ३ भाजलेले कांदे, अदपाव भाजलेले खोबरे
२. मांसभात -
एक शेर सागुती घेतल्यास त्याचा मसाला -
अदशेर बारीक सडीक तांदूळ, दीड तोळा मीठ, ६ मासे अलें, ३ मासे दालचिनी, पावशेर तूप, ३ मासे लवंगा, १ छटाक धणे, ३ मासे शाहाजीरे, अदपाव कांडे, ३ मासे वेलदोडे, ४ सोलीव लसणाच्या कांड्या.
३. वांग्याच्या कापट्या -
मोठी बाणवांगी, मीठ, वाटल्यास चिमूट सांबार, तिखट, तांदुळाचें सुकें पीठ, कवट
१. कोंबडीचा रसा -
मसाला पाट्यावर वाटून एका पात्रांत ठेवावा. कोंबडी कापल्यावर पाऊण तास तशीच ठेवावी ह्मणजे त्यांतील रक्त व पाणी सुकून जाते. नंतर चुलीवर अतिगरम (अधणाचें) पाणी करून त्या कोंबडीचे पाय हातांत धरून त्या गरम पाण्यांत बुडवावी ह्मणजे पिसें काढण्यास फार त्रास होऊं शकत नाहीं. पिसें काढल्या वर दोन तीन पाण्यानें स्वच्छ धुवावी. नंतर सुरीनें तुकडे करून एका पात्रांत ठेवावी. मग तुकड्यास अलें व हळद चोळून चुलीवर कल्हईचें भांडें ठेवून त्यांत थोडें तूप घालावें, तें कढलें ह्मणजे त्यांत एक कांदा विळीनें चिरून घालावा. तो गुलधवा झाल्यावर सागुती फोडणीस टाकून पळीनें हलवावीं. ती शिजली ह्मणजे अर्धाशेर गरम पाण्यांत वाटलेला मसाला कालवून त्यांत ओतून पळीनें ढवळून वर झांकण ठेवावे. चांगला कढ आला ह्मणजे भांडें चुली वरून खालीं उतरावें. सदर्हू प्रमाणे बदकाचा, होल्याचा रसा करावा.
२. मांसभात -
तांदूळ, कांदे, व तूप निराळे ठेवून बाकीचा मसाला भरड वाटून ठेवावा. नंतर एका भांड्यांत पाऊणशेर पाण्याचें अधण चुलीवर ठेवून, कांद्याचे वरचा पाचोळा काढून वेगळ्या न होतील अशा चार फांकी चिरून एका निर्मळ रुमालांत धण्याची गांठोडी बांधून ती व कांदे त्या अधणांत टाकून वर झांकण ठेवावे, नंतर सुमारे अदपाव पाणी आटलें म्हणजे भांडे खालीं उतरून ठेवावें; तें थोडें थंड जाहल्यावर धण्याची गांठोडी व कांदे काढून टाकावेत. आणि तें पाणी दुसरे एका भांड्यांत भरून झांकून ठेवावें. नंतर सागुती दोन पाण्यानें धुवून पिळून उकडत ठेवावी; पाणी आटून ती शिजली ह्मणजे त्यांत अदपाव तूप सोडून परतून परतून गुलधावी (तांबूसपणा येई अशी गव्हाळी) तळावी; नंतर दुसर्या भांड्यांत ठेवलेलें पाणी त्यांत घालावें. मग तांदूळ स्वच्छ धुवून त्यांत वैरावें. नंतर वर सांगितलेला मसाला आंत सोडावा आणि पळीचे दांड्यानें हलवावें, आत थोडे गरम पाणी व मीठ घालून पुन्हा पळीचे दांड्यानें हलवावें आणि वर झांकण ठेवावें, नंतर चांगला कढ आला ह्मणजे उरलेलें तूप त्यांत ओतून फिरून झाकण ठेवावें आणि निखारां एकीकडे काढून त्यावर भांडें ठेवावें ह्मणजे भात चांगला मुरतो.
३. वांग्याचे कापटे -
मोठी बाणवांगीं घेऊन त्यांच्या अंगुळभर जाड अशा चकत्या चिराव्या; बेताचें मीठ, हळद, वाटल्यास चिमूट सांबार, तिखट ह्या जिनसा एकत्र करून त्या चकत्यांना चोळाव्या व खोल तव्यावर तेल तापवून चकत्यांना तांदुळाचें सुकें पीठ किंवा कवटाचें मिश्रण लावून ब्रेडच्या चुर्यांत दडपून तळाव्या व गरम वाढाव्या. थंड झाल्या की गोडी जातें. अशाच राताळ्याच्या, सुरणाच्या, दोडक्याच्या कराव्या.
कोंबडीचा रसा आणि मांसभात या कृती पार्वतीबाई यांनी लिहिलेल्या ’मांसपाकनिष्पत्ति अथवा मांस मत्स्यादिक प्रकार तयार करणे’ या पुस्तकातल्या आहेत. हे पुस्तक १८८३ सालच्या सप्टेंबर महिन्यात पुण्यात प्रकाशित झालं. आधुनिक पाकपुस्तक लिहिणार्या पार्वतीबाई पहिल्या महाराष्ट्रीय महिला होत. शिवाय मांसाहारी पाककृती असलेलं हे पहिलं मराठी पुस्तक आहे.
श्रीपतराव कोंडाजीराव येळवंडे यांनी ते छापलं. हे कमिशन एजंट होते. बेलबाग चौकात त्यांची कचेरी होती. प्रकाशनावेळी या पुस्तकाची किंमत होती सहा आणे. पुस्तकात तीन विभागात बेचाळीस पाककृती आहेत. पहिला विभाग मटणाचा, दुसर्या कोंबडी आणि अंडी, तिसर्यात ’मुसलमानी’ पद्धतीनं रांधायचे मासे व मटण आहेत.
एकोणिसाव्या शतकात अ-ब्राह्मण उच्चवर्गीय कुटुंबांमध्ये रांधल्या जाणार्या या कृती आहेत. बहुतांश कृती सोप्या आहेत. त्यांत नारळ, तीळ यांचा वापर नाही. रश्श्याला दाटपणा आणण्यासाठी बेसन वापरलं आहे.
त्या काळी कोंबडी खाण्यास प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे पुस्तकात कोंबडीचे फक्त दोन पदार्थ आहेत.
पुस्तकाच्या शेवटी दोनशे देणगीदारांची यादी आहे. त्यांनी आगाऊ पैसे देऊन आपली प्रत राखून ठेवली. त्या पैश्यातून पुस्तक छापलं गेलं. या देणगीदारांमध्ये काही मिशनरी स्कूलचे विद्यार्थी आहेत, शरीरविक्रय करणार्या स्त्रियाही आहेत.
पार्वतीबाईंच्या सूचना काही ठिकाणी नेमक्या नाहीत. काही पाककृतींत मीठ, कोथिंबीर अंदाजानं घाला, असं म्हटलं आहे, तर काही ठिकाणी मिठाचं वजन दिलं आहे. कोंबडीच्या रश्श्यात त्यात अदपाव तूप घ्यायला सांगतात. मात्र कृतीत त्यापैकी ’थोडे’ तूप वापरावं, असं म्हटलं आहे. पुस्तकात योजलेले गुलधवा, बहुगुने (भांडं), नजर असे अनेक शब्द लोभस आहेत.
लक्ष्मीबाई धुरंधर यांचं 'गृहिणीमित्र' हे पाकपुस्तक १९१० साली प्रकाशित झालं. कापट्यांच्या कृतीत सांबार म्हणजे मसाला. सांबार या शब्दाचा अर्थ मसाला अथवा तोंडीलावणं.
१ मासा = ०.९७२ ग्रॅम
१ तोळा = ११.७ ग्रॅम
१ शेर = ९३३ ग्रॅम
१ छटाक = ५८ ग्रॅम
कोंबडीचं / मटणाचं वजन, तांदूळ यांच्या प्रमाणात त्रैराशिक मांडावं. कोंबडी साधारण सव्वा किलोची समजून मी साहित्य घेतलं.
कोंबडीचा रसा करताना घरात कोथिंबीर नाही, हे मला ऐनवेळी लक्षात आलं. त्यामुळे ती घातली नाही. शिवाय पार्वतीबाईंच्या प्रमाणापेक्षा निम्म्या मिरच्या घेतल्या आहेत.
मांसभातासाठी मटण वापरणं अपेक्षित आहे. मी चिकन वापरलं. त्यांनी दिलेल्या प्रमाणाच्या निम्मं तूप वापरलं.
मस्त! हे भारी आहे. नंतरची
मस्त! हे भारी आहे. नंतरची माहिती फार इंटरेस्टिंग आहे. काही शब्दांचे स्पेसिफिक उच्चार ("ह्मणजे") हे तेव्हाच्या वापराप्रमाणे केलेले दिसत आहेत.
नेमक्या श्रावणी सोमवारीच
नेमक्या श्रावणी सोमवारीच पौराणिक पाककृती !
भारी आहे पण.
भारी आहे ! रोचक माहिती.
भारी आहे ! रोचक माहिती.
माझ्याकडे गृहिणीमित्रची संस्कारित केलेली आवृत्ती आहे.
अवांतर - कोंबडी कापल्यानंतरच्या उस्तवारीचे वर्णन वाचून जुने दिवस आठवले. मध्यंतरी अमेरीकन मैत्रीणीशी गप्पा मारताना ती म्हणाली - 'माझी लग्न करताना अट होती शेतकरी नवरा चालेल पण चिकन सुपरमार्केटातून आणणार, घरी प्रोसेस करणार नाही.'
रोचक
रोचक
मला ही माहिती सुद्धा नवीन
१ मासा = ०.९७२ ग्रॅम
१ तोळा = ११.७ ग्रॅम (फक्त हे माहीत होते)
१ शेर = ९३३ ग्रॅम
१ छटाक = ५८ ग्रॅम
यातले फक्त तोळा माहित होते ते सुद्धा इतके अचूक नाही.
यापुढे कोणी काही छटाकभर मागितल्यास मोजून 58 ग्राम देण्यात येईल
अतिशय रोचक लिहिलं आहेस.
अतिशय रोचक लिहिलं आहेस. लेखाची भाषा आवडली.
बहुगुने चा अपभ्रंश भगुणे हा
बहुगुने चा अपभ्रंश भगुणे हा गावाकडे सर्रास वापरताना ऐकलं आहे.
रेसिपीपेक्षा त्यातल्या जुन्या
रेसिपीपेक्षा त्यातल्या जुन्या पद्धतीच्या भाषेसाठी सविस्तर वाचलं.
बहुगुनेचा अपभ्रंश भगुणे हा गावाकडे सर्रास वापरताना ऐकलं आहे. >>> +१
.... जुन्या पद्धतीच्या
.... जुन्या पद्धतीच्या भाषेसाठी सविस्तर वाचलं...
सेम टू सेम. लेखातले काही शब्द फारच गोड वाटले
तोळा -शेर प्रमाण आणि प्लेटिंग फार आवडले.
जुन्या पद्धतीच्या भाषेसाठी
जुन्या पद्धतीच्या भाषेसाठी सविस्तर वाचलं.>>>>>>+१
बहुगुनेचा अपभ्रंश भगुणे हा गावाकडे सर्रास वापरताना ऐकलं आहे. >>> +१
बाणवांगी म्हणजे नेमकी कोणती वांगी? भरीत करायला वापरतो तो मोठी वांगी?
फोटो आणि भाषा लेखाचे usp आहेत
फोटो आणि भाषा लेखाचे usp आहेत.
बाणवांगी म्हणजे भरताची वांगी का कापाकरता मिळतात ती लांब वांगी. तुझ्या फोटोतल्या कापांच्या आकारावरून (साधारण वाटीच्याच आकाराची) भरताची वांगी वाटताहेत पण 'बाण' शब्द लांब वांग्याकडे निर्देश करतोय.
चिकन सुपरमार्केटातून आणणार, घरी प्रोसेस करणार नाही >>> अमेरीकेत किंवा भारतात शहरी भागात अजून कोंबडी घरी प्रोसेस होते?
रेसिपीपेक्षा त्यातल्या जुन्या
रेसिपीपेक्षा त्यातल्या जुन्या पद्धतीच्या भाषेसाठी सविस्तर वाचलं...... +१.
>>अमेरीकेत किंवा भारतात शहरी
>>अमेरीकेत किंवा भारतात शहरी भागात अजून कोंबडी घरी प्रोसेस होते?>> भारतात होत नसावे. मला सध्याची कल्पना नाही. मी तालुक्याच्या गावात वाढले. माझ्या आठवणीत मी साधारण ११-१२ वीत असताना पोल्ट्री फार्म आणि त्यांच्या दुकानात चिकन प्रोसेस करुन मिळणे ही सुविधा पहिल्यांदा अनुभवली.
इथे आम्ही रहातो तो मेट्रोचा भाग आहे मात्र त्यातच शेती, एकरेज वगैरे रुरल एरीआ टिकून आहे. जोडीला अर्बन फार्मिंग, अर्बन होमस्टेड वगैरे आहे शिवाय नव्याने जोरही धरतेय. ते लोकं अमुकच जातीचा फ्लॉक वाढवणे, घरी प्रोसेस करुन स्वतःसाठी फ्रिझरमधे आणि जोडीला फार्मर्स मार्केटात विकायला असे करतात. ओळखीत एकीच्या सुनेने गेल्या वर्षी फ्लॉक वाढवला आणि विकला त्या वरुनच आमच्या जुन्या आठवणी निघाल्या.
जुनी मराठी वाचून मजा येते.
जुनी मराठी वाचून मजा येते. काही शब्द नव्यानेच समजले व आवडले. उदा. गुलधवा
गृहिणीमित्रची एक आवृत्ती माझ्याकडे आहे.
छान आहे लेख. या पाकृ करून
छान आहे लेख. या पाकृ करून पहायला हव्यात.
अवांतर:
अवांतर:
गुलधवा शब्दाने काल छळले. कुठेतरी ऐकल्यासारखे वाटत होते.माझी आजी या शब्दाशी साधर्म्य असणारा ' गोरोधवो'(गोरापान) कोकणीत बोलला जाणारा शब्द वापरत असे हे नंतर आठवले.
विदर्भात सांबारं म्हणजे
विदर्भात सांबारं म्हणजे कोथिंबीर ना?
रच्यकने. खूप दिवसांनी चिनुक्स यांचे लिखाण दिसले.
सांभार
सांभार
सांबार म्हणजे सांबारच.
हैद्राबादेत कोथमीर.