एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 5. विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1872)

Submitted by अवल on 18 July, 2024 - 23:33

(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.
न्या. रानडे, म. फुले, राजा राममोहन रॉय यांसारखी काही नावे, त्यांचे कार्य बहुतांश माहिती असते. किमान नावं नक्की माहिती असतात. परंतु इतर अनेकांना मात्र आज आपण विसरले आहेत की काय असं वाटतं. म्हणून त्यांच्या नावांची, त्यांच्या कार्याची सर्वसामान्यांना पुन्हा आठवण करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आधी म्हटलं तसं माहितीवजा छोटेखानी लेख. अधिक वाचायचं, माहिती करून घ्यायची तर विकिपिडिया, विश्वकोश वा ग्रंथालयांची जुनी पुस्तकं उपलब्ध आहेतच. इथे फक्त छोटीशी ओळख.)

vishnubava.jpeg

विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म 1825 मध्ये रायगड जिल्ह्यातल्या शिरवली गावामध्ये झाला.
अगदी लहान वयातच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे आणि गरीबीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवता आले नाही. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांना दुकानांमध्ये कस्टमच्या कार्यालयामध्ये य अशा विविध ठिकाणी नोकऱ्या कराव्या लागल्यात. लहानपणापासून त्यांचा ओढा अध्यात्माकडील होता. त्यामुळे आपल्या नोकरीच्या काळातही विविध धार्मिक ग्रंथांचा त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास चालू ठेवला. त्याचबरोबर कथाकिर्तेने, पुराणे, साधू संन्यासी यांच्याशी संवाद अशांमधे त्यांचे मन रमत असे. कालांतरानं यातही त्यांचे समाधान होई ना. अखेर 23 व्या वर्षी त्यांनी सगळ्याचा परित्याग केला आणि ते अरण्यामध्ये निघून गेले. विष्णुबुवांनी त्यानंतर अनेक सद्गुरुंना गुरु मानण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेच त्यांचे समाधान झाले नाही. अखेर सप्तशृंगीच्या डोंगरावर ते गेले आणि तेथील देवीचे सानिध्यात फक्त कंदमूळ खाऊन वेदांत विचार ध्यान साधना यावर त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले. कालांतराने ज्यासाठी आपण साधना केली होती ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. उग्र तपश्चर्याच्या योगाने आपण स्वतःचा कल्याण तर साधला; पण आपला कार्यभाग पूर्ण झाला नाही. समाजाच्या कल्याणासाठी आपले उर्वरित आयुष्य आपण वेचले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्याच वेळेस " पाखंडी मतांचे खंडन करून; तू वैदिक धर्माची पुन्हा स्थापना कर" असा संदेश परमेश्वराने आपल्याला दिला आहे असे त्यांना वाटले. त्यामुळे ते गावाकडे परत आले. विष्णुबुवा त्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर अशा वेगवेगळ्या गावी गेले. वैदिक धर्माचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या वक्तृत्वाची छाप लोकांना पडत असे. लवकरच त्यांचं नाव सर्वांना माहिती झाले. लोक त्यांना ब्रह्मचारी बुवा या नावाने ओळखू लागले. 1856 मध्ये विष्णुबुवा मुंबईस आले. त्या काळी ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी भारतीय लोकांच्या मध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचे काम अतिशय पद्धतशीरपणे चालवले होते. ख्रिस्ती धर्मातील उदात्त तत्त्वे, मानवतावादी तत्त्वे यांच्या आधारे सुशिक्षितांवरील प्रभाव त्यांनी पाडण्यास सुरुवात केली होती. आणि मिशनऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचा सामान्य जनतेवर प्रभाव पडत होता. ख्रिस्ती धर्मप्रचाराकांच्या या दुहेरी आक्रमणामुळे हिंदू धर्मावर मोठे संकट येऊ घातले होते. ख्रिश्चन धर्मांच्या या प्रभावावर नियंत्रण घालण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी प्रयत्न सुरु केले. ख्रिस्ती धर्म प्रचारकांच्या प्रचाराला उत्तर म्हणून विष्णुबुवांनी जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्मातील दोष सांगत असत, त्यांचे विष्णुबुवा आपल्या व्याख्यानातून खंडन करत. जवळ जवळ 50 सभा त्यांनी घेतल्या. यात त्यांनी वैदिक धर्मातील आक्षेपांचे खंडन करून त्याची श्रेष्ठता समाजाला पटवून दिली. आपल्या तार्किक युक्तिवादाने आणि पुराव्यांनी समाजातील सर्वांची मने त्यांनी पुन्हा हिंदू धर्माकडे खेचून आणली. त्यांच्या या व्याख्यानांना वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळाले. त्यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर बोलवायला झाला पुढे ख्रिस्ती धर्माच्या धर्मपदेशकां बरोबर मुंबईच्या समुद्रकिनारी वीस दिवस जाहीर वादविवाद झाले. समुद्रकिनाच्या वादविवादांंचा समाजावरती खूप मोठा प्रभाव पडला. मुळात धार्मिक क्षेत्रात मिशनऱ्यांना अडवण्याचे पहिले पाऊल विष्णुबुवांनी उचलले.
पुढे विष्णुबुवांनी तामिळनाडू, प. बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात येथे जाऊनही हिंदूंचे प्रबोधन केले.

विष्णुबुवा वैदिक धर्माचे अभिमाने असले तरी त्यांनी समाजाची दोषांकडे देखील त्यांनी डोळेझाक केली नाही. प्रचलित जातीधर्म हा वेदांतील वर्णव्यवस्थेला सोडून आहे. या जातीभेदामुळे आणि सामाजिक विषमतेमुळे हिंदी समाजाची दुर्गती झाली आहे असे त्यांनी मांडले. समाजसुधारणांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. त्यांचे व्यक्तिगत आचरण हे सुधारणांच्या विचारांना धरून होते. ते कोणाच्याही हातचे पाणी पीत असतात, अन्न खात असत. खाण्यापिण्याचे बाबतीत जातीभेदाचे, धर्माचे, स्पर्शाचे बंधन त्यांनी कधी पाळले नाही.
समाजातील जाती विषमतेप्रमाणेच अतिशूद्रांवर होणाऱ्या अमानुष अन्यायाविरुद्ध देखील विष्णुबुवांनी आवाज उठवला. दलितांच्या मागासलेपणाची जबाबदारी सर्व उच्च वर्णीयांवरती आहे. आणि म्हणून त्यांच्या सुधारण्यासाठी उच्च वर्णीयांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मत मांडले.
पुनर्विवाह, घटस्फोट, प्रौढविवाह, शुद्धीकरण या सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचे विचार आधुनिक होते. लोकांच्या स्तुती वा निंदा कशाची पर्वा त्यांनी केली नाही.

विष्णुबुवांनी 'वेदोक्तधर्मप्रकाश' या नावाचा धर्मग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजनीति संदर्भात एक स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिले आहे. पुढे त्याच मतांचा विस्तार करून 1867 मध्ये 'सुखदायक राज्यप्रकरणी निबंध' हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी मांडलेले विचार साम्यवादाशी खूपच मिळते जुळते आहेत. उदाहरणादाखल त्यांनी असं लिहिलंय की "सर्व प्रजे कडून सर्व जमिनीची लागवड करावी. आणि अनेक प्रकारची फळे, कंद, भाज्या, अन्न उत्पादन करून गावोगावी कोठारे भरून ठेवावीत. त्यामधून सर्व गावकऱ्यांच्या पोटास लागेल तितके अन्न द्यावे. याप्रमाणे बाराही महिन्यात एकसारखे सर्व जमिनीतून उत्पन्न घ्यावे. ते सर्वांचे उत्पन्न एकत्रच ताब्यात राहून त्यातून सर्वांस खावयास भरपूर न्यावे.
सर्वांची पाच वर्षांची पोरे झाली म्हणजे मुलगा मुलगी राजाच्या ताब्यात द्यावी. नंतर त्याने त्यांना सर्व विद्या शिकून ज्याला त्याला, ज्या कामात गती आहे तो उद्योग करण्याची सवड द्यावी." विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या या विचारावरून त्यांनी साम्यवादा सारखाच विचार मांडला होता असे म्हणावे लागते. अर्थात बुवांचे हे विचार कार्ल मार्क्स याचे लिखाण वाचून बनलेले नव्हते, तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे डोळेसपणे अवलोकन अवलंबून करून, साकल्याने विचार करून लिहिलेले आहेत. यावरून त्यांची बौद्धिक झेप आणि आणि द्रष्टपणा कळून येतो.

विष्णुबुवांनी भावार्थसिंधू , वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, चतु:श्लोकी भागवताचा अर्थ, बोधसागराचे रहस्य, सेतूबंधनी टीका, सहजस्थितीचा निबंध, समुद्र किनारीचा वादविवाद इत्यादी पुस्तके लिहिली होती.
---

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण लेख, अवल. विष्णुबुवा मिशनऱ्यांना वादविवादाचे जाहीर आव्हान देत हे यापूर्वी वाचलेलं मी. बहुतेक तसा प्रसंग( संवादरूप) वाचलेला. ते मला भारी वाटलेलं. त्या काळाच्या पार्श्वभूमीवर.

धन्यवाद प्राचीन.
हो ते वादविवाद वाचताना फार आश्चर्य वाटलेलं. या सभांना गर्दीही भरपूर होत असे. ती सगळी वर्णनं मुळातून वाचण्यासारखी आहेत

फार सुंदर ओळख. चातुर्वर्णाश्रमाबद्दलची स्पष्ट मते मौल्यवान आहेत. बहुमोल, सुधारक आहेत. मिशनर्‍यांनी या सामाजिक उतरंडीचा, विषमतेचाच तर फायदा करुन घेतला.

धन्यवाद सामो
तुम्ही काही जणं आवर्जून वाचताय म्हणून इथे लिहितेय.
इच्छा होती बऱ्याच जणांच्या नजरेखालून जावं... पण इट्स ओके

विष्णुबुवा ब्रह्मचारी हे नाव कधी तरी पुसटसं कानावरून गेलं होतं. आज प्रथमच त्यांचं जीवन आणि कर्तृत्व वाचनात आलं. धन्यवाद!

खूप धन्यवाद या मालिकेकरिता. यापैकी काही नावंच फक्त ऐकलेली आठवताहेत, पण त्यांचं कार्य इतकं तपशीलवार ठाऊक नव्हतं. लिखाण सोपं ओघवतं असूनही तुमचा अभ्यास जाणवतो आहे. तुमचा ब्लॉगही सुंदर आहे. पुलेशु. वाचते आहे.

अवल, अत्यंत चांगला उपक्रम आहे हा. तुमच्या ओघवत्या शैलीमधे ह्या थोर समाजसुधारकांची थोडक्यात काय होईना पण माहिती आमच्या पर्यंत पोचवता आहात, तुम्हाला धन्यवाद आणि पुढील अनेक भागांच्या प्रतिक्षेत

छान मालिका, वाचतोय.
लखमसी नप्पू यांच्याबद्दल काही माहिती आहे का? उत्सुकता आहे त्या नावाबद्दल, पण कुठे फारशी माहिती मिळाली नाही.

धन्यवाद उबो
लखमसी नप्पू यांबद्दल फार माहिती नाही, शोधायला हवी. चिनुक्स अधिक सांगू शकतील. परंतु त्यांते चिरंजीव वेलजी लखमशी नप्पू (जन्म साधारण 1890) यांनी मुंबईमधे मोठे काम केले आहे. प्रामुख्याने गुजराथी समाजासाठी. आपल्या वडिलांच्या नावे विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था उभ्या केल्या. भरपूर आर्थिक मदत पुरवलाी.
यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी लखमसी नप्पू यांचे नाव दिसते. बहुदा म्हणूनच हे नाव तुमच्या लक्षात आले असावे Happy

अवल, छान मालिका आहे ही. वाचते आहे.
काही नावे इमारती, संस्था, स्थानके, रस्ते यांना व्यक्ती ची नावे दिलेली असतात, ती वाचून ओळखीची झाली तरीही त्यापैकी बर्याच जणांबद्दल नीट माहिती नसते.
तुमच्या या लेखमालेमुळे ही माहिती मला कळते आहे. धन्यवाद.