एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 1. जगन्नाथ शंकरशेठ (1803-1865)

Submitted by अवल on 11 July, 2024 - 04:46

(परवा एका चित्रपटाबद्दल एके ठिकाणी वाचलं, तिथे डॉ. भाऊ दाजी लाड यांचा उल्लेख वाचला. अन मग वाटलं की या एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सुधारकांवर कितीतरी पुस्तकं, लेख लिहिले गेले आहेत. अगदी विकिपिडिया, विश्वकोश इथेही यांची माहिती लिहिलेली आहे. पण तरीही यातली बरीच लोकं हळूहळू काळाच्या पडद्या आड हरवून जात आहेत. अगदी काही कारणांनिमित्त कोणी ती मुद्दाहून जाऊन वाचतीलही. अन भरपूर तपशील, विश्लेषण सापडेल. पण सहजी समोर आलं तर अनेकांना त्यांची नव्याने ओळख होईल. या दृष्टिकोनातून एका व्हॉट्सअप गृपवर काही सुधारकांची माहिती लिहिलेली. नंतर ती ब्लॉगवरही डकवली. असं वाटलं किमान इतपत माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी. म्हणून मग इथे ती आणतेय. मान्य आहे की हे लिखाण अगदी प्राथमिक स्वरुपाचं आहे. पण सध्या रिळांच्या दुनियेत इतका वेळही कुठे आहे साऱ्यांना खूप तपशीलवार, विवेचन वाचायला? चूक नाही, परिस्थिती शरणता!
खरे तर या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.
न्या. रानडे, म. फुले, राजा राममोहन रॉय यांसारखी काही नावे, त्यांचे कार्य बहुतांश माहिती असते. किमान नावं नक्की माहिती असतात. परंतु इतर अनेकांना मात्र आज आपण विसरले आहेत की काय असं वाटतं. म्हणून त्यांच्या नावांची, त्यांच्या कार्याची सर्वसामान्यांना पुन्हा आठवण करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आधी म्हटलं तसं माहितीवजा छोटेखानी लेख. अधिक वाचायचं, माहिती करून घ्यायची तर विकिपिडिया, विश्वकोश वा ग्रंथालयांची जुनी पुस्तकं उपलब्ध आहेतच. इथे फक्त छोटीशी ओळख.)

1. जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ (1803-1865)
1200px-Jagannath_Sunkersett (1).jpg
(फोटो नेट वरून साभार!)
जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड या गावी झाला. नाना शंकरशेठ या नावाने ते विशेष प्रसिद्ध पावले. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे अतिशय श्रीमंत घरात जन्मले होते. त्यांच्या वडिलांनी व्यापारात अमाप संपत्ती कमावली होती. त्यामुळे नानांचे बालपण अतिशय सुखात गेले. पुढे त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी, वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे संपूर्ण व्यापाऱ्याची जबाबदारी नानांवर येऊन पडली. त्यांच्या व्यापाराचा इतका प्रचंड व्याप होता की त्यांना इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नसे. परंतु नानांना सार्वजनिक कामाची अत्यंत आवड होती. त्यामुळे जनसेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मुंबई शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीमध्ये नानांचा सहभाग होता. बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी इत्यादी संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये त्यांनी आर्थिक स्वरूपाची मदतही केली.

भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाचे ते खंदे पुरस्कार होते. त्या काळातील सनातनी लोकांचा प्रखर विरोध पत्करून 1848 मध्ये मुंबई येथे, स्वतःच्या घरात त्यांनी मुलींची शाळा सुरू केली.

1829 मध्ये सतीची चाल बंद करणारा कायदा, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केला. या कायद्याला भारतातल्या सनातनी लोकांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे देशामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. अशावेळी नानांनी या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले. आणि सतीची चाल कशी अमानुष आहे हे त्यांनी जनतेला पटवून दिले.

सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांची सरकार दरबारी दाद लावण्यासाठी नाना तत्पर असत. मुंबईतील अनेक सामान्य लोकांची गाऱ्हाणी, त्यांनी सरकार दरबारी मांडली. आणि त्याला योग्य तो न्याय मिळवून दिला. सामान्य जनतेला, विशेषत: गोरगरिबांना, नाना आपल्या आधार वाटत असत.

नानांनी शिक्षण क्षेत्रातही अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. मुंबई इलाख्यात नव्या शिक्षणाचा पाया घालण्याचे कार्य, मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ड एल्फिन्स्टन यांच्या मदतीने, नाना शंकरशेठ यांनी सुरु केले. 1823 मध्ये मुंबईत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेच्या मार्फत मुंबई शहरांमध्ये आणि मुंबई बाहेरही अनेक शाळा त्यांनी उघडल्या. या कामी त्यांना सदाशिवपंत छत्रे, बाळाशास्त्री जांभेकर यांचेही सहकार्य लाभले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच सुरुवातीच्या इंग्रजी राज्यकारभारात पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तरुणांची पहिली पिढी उदयास आली. त्यापैकी अनेक तरुणांनी महाराष्ट्रातील समाज सुधारण्याच्या कार्यात खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले. याचे सर्वांचे श्रेय अर्थातच जगन्नाथ शंकरशेठ यांच्याकडे जाते.

भारतीय समाजात विद्येचा आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि येथील तरुणांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 1845 मध्ये मुंबईमधे स्टुडन्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. नानांनी या संस्थेला आर्थिक आणि इतरही खूप मदत केली मुंबईच्या इलाख्याचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ड एलफिन्स्टन यांनी अतिशय चांगली काम केली होती. त्यांच्या सन्मानार्थ, त्यांचे स्मारक उभारण्यासाठी नानांनी एक फंड जमवल्या. या फंडातून मुंबईमधे एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना केली. आजही हे अतिशय महत्त्वाचे कॉलेज म्हणून मुंबईत मानले जाते. तसेच मुंबई इलाखाचा आणखीन एक गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मरणार्थ मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेज उभारण्यात नानांनी पुढाकार घेतला होता.

राजकीय कार्यातही नाना पुढे होते. राजकीय प्रश्नांबाबत नानांचे मत आज आपल्याला वेगळे वाटेल परंतु 1818 मध्ये मराठ्यांचा राज्य संपून ब्रिटिश राजवट भारतामध्ये स्थिरावली. आणि लगतच्याच काळात, साधारण 1825 ते 35 -40 पर्यंत नाना शंकरशेठ यांचे कार्य आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळातील सर्वांचे ब्रिटिश राजवटी बद्दल चांगले मत होते. अनेक वर्ष चालू असलेली युद्धे संपली, कायद्याचे राज्य आले, सुरक्षितता वाढली. यामुळे सुरवातीच्या शिक्षित वर्गाला ब्रिटिश राजवट आपल्या भल्यासाठी आली आहे असे वाटत असे. इंग्रज राज्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आपल्या लोकांच्या गाऱ्हाण्यांची, अडीअडचणींची दाद लावून घेता येईल असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी याबाबत राज्यकर्त्यांशी सहकार्य करण्याच्या गरजेवरती भर दिला.

याच उद्देशाने जगन्नाथ शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांनी मुंबईत १८५२ मध्ये बॉम्बे असोसिएशन संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून येथील जनतेची दुःखे, अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. आणि जनतेच्या सुखाकरता सरकारला प्रत्येक गोष्टी सहकार्य करावे, असा त्यांचा प्रयत्न असे. बॉम्बे असोसिएशन ही भारतातील राजकीय स्वरुपाची पहिली संस्था होती. बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही, भारतातील सनदशीर राजकारणाची सुरुवात मानता येईल. पुढील काळात हीच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय पातळीवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. यावरूनच बॉम्बे असोसिएशनचे महत्त्व लक्षात येईल.

प्रारंभीच्या काळात सरकारी नोकऱ्यांमध्ये इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये खूप पक्षपात होत असे. प्रशासनातील महत्त्वाची पदे इंग्रज किंवा गोऱ्या लोकांसाठी राखीव ठेवली जात. सरकारच्या या पक्षपाती धोरणाविरुद्ध ज्या भारतीय नेत्यांनी सुरुवातीला आवाज उठवला, त्यामधे जगन्नाथ शंकरशेठ हे होते. भारतीय लोकांना विविध क्षेत्रांमध्ये गोऱ्यांचे बरोबर अधिकार मिळावेत यासाठी ते प्रयत्नशील होते.उदाहरणार्थ सुप्रिम कोर्टा मध्ये जी ज्युरीची पदे असत ती, सुरुवातीला फक्त गोऱ्यांनाच दिली जात. नानांनी या पदांवर भारतीय लोकांचाही समावेश केला जावा म्हणून प्रयत्न केले. 1836 मध्ये प्रथमच भारतीय लोकांचा ग्रँड ज्युरी मध्ये बसण्याचा हक्क मान्य झाला.

जगन्नाथ शंकरशेठ हे दातृत्वाबद्दल देखील फार प्रसिद्ध होते. शाळा, दवाखाने, धर्मशाळा, ग्रंथालय, मंदिरे यासारख्या अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी उदार हस्ते देणग्या दिल्या. आपल्या संपत्तीचा अतिशय सुयोग्य वापर त्यांनी केला. नानांचा त्यांच्या कार्याचा भारतीयांनी गौरव केलाच परंतु ब्रिटिश सरकारनेही त्याचा गौरव केला. अनेक समित्या, पदे यावर त्यांची नियुक्ती करून सरकारने त्यांना सन्मानित केले. मुंबईच्या शिक्षणच्या व्यवस्थेवरती नियंत्रण करण्यासाठी सरकारने 1840 मध्ये बोर्ड एज्युकेशनची स्थापना केली होती. हे बोर्ड जोपर्यंत अस्तित्वात होते तोपर्यंत नाना त्याचे सन्माननिय सदस्य राहिले. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठाचे फेलो म्हणूनही नानांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मुंबईचे मुन्सिपल कमिशनवरही त्यांची नियुक्ती झाली होती. 1835 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमान ब्रिटिश सरकारने त्यांना दिला.
आधुनिक मुंबईच्या शहराच्या उभाणीतही त्यांचा फार मोठा वाटा आहे. नानांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे मुंबईच्या प्रगतीचा आलेखच होता असे म्हटले जाते.

सर्वांगीण सुधारण्याचे बिजारोपण करणारे महाराष्ट्राचे पहिले समाज सुधारक असे वर्णन नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे केले जाते.
---
(पूर्वप्रकाशित : https://asa-asa-ghadala.blogspot.com/2024/04/1-1803-1865.html)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख! हे नाव फक्त "शंकरशेठ स्कॉलरशिप" या मुळे (ऐकून) माहित होते.
सनातन विचारांच्या काळात आणि तेही श्रीमंत घरात जन्माला येऊन, समाज सुधारणेबद्दल कळकळ असणे आणि इतके सुधारक विचार असणे हे किती रेअर आहे! आत्ताही इतके रेग्रेसिव विचारांचे पालथे घडे सर्रास आजू बा़जूला दिसत असताना याचे महत्त्व अजून जाणवते.
सुरुवातीच्या काळातील सर्वांचे ब्रिटिश राजवटी बद्दल चांगले मत होते. अनेक वर्ष चालू असलेली युद्धे संपली, कायद्याचे राज्य आले, सुरक्षितता वाढली. यामुळे सुरवातीच्या शिक्षित वर्गाला ब्रिटिश राजवट आपल्या भल्यासाठी आली आहे असे वाटत असे. इंग्रज राज्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आपल्या लोकांच्या गाऱ्हाण्यांची, अडीअडचणींची दाद लावून घेता येईल असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी याबाबत राज्यकर्त्यांशी सहकार्य करण्याच्या गरजेवरती भर दिला. >>>> हे इन्टरेस्टिंग आहे.

चांगला लेख. यातल्या बर्‍याच गोष्टी माहीत नव्हत्या.
मुंबई ठाणे रेल्वे मागेही जगन्नाथ शंकरशेट होते असे वाचल्याचे आठवले.
नुकतंच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल या स्थानकाचं नाव जगन्नाथ शंकरशेट स्थानक असं बदलण्यात आलं किंवा येणार आहे. खात्री करण्यासाठी शोधलं तर मुंबई मनपाच्या संकेतस्थळावर त्यांच्याबद्दलचं हे पान मिळालं. इथेही बरीच माहिती आहे.

पहिलीत की दुसरीत असताना मी भाषण स्पर्धेत नाना शंकरशेठ यांच्यावर भाषण दिलं होतं आणि माझा तिसरा नंबर आला होता. त्यावेळी मला बक्षीस म्हणून सहा रुपये मिळाले होते. आमच्या गावच्या पारावर तेव्हा आइस्क्रीमवाला यायचा त्याच्याकडून महागातलं आइस्क्रीम घेतलं होतं त्या पैशातून.

छान ओळख!
असे अजुन लेख वाचायला आवडतील.

छान ओळख. हे इथे आणल्याबद्दल अनेक आभार. आजचे मुंबई घडविण्यामागे त्यांचे मोठे योगदान होते.
काही वर्षांपूर्वी जितेंद्र जोशीच्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या मालिकेत अशा अनेक थोर व्यक्तिमत्त्वांबद्दल माहिती झाली होती . त्या मालिकेची लिंक इथे देत आहे. बघा सर्वांनी. मला फार आवडले होते. Happy
https://youtu.be/9DEVBU2hFl0?si=Gh-vsasCNIfztt0m
हा शंकरशेट यांच्यावरचाच भाग आहे.

मुंबई मराठेशाही संपायच्या आधी १०० १५० वर्षे तरी इंग्रजांच्या ताब्यात होती. रेक्लेमेशन साधारण पानिपत च्या काळात चालू झाले. त्यामुळे बाकी महाराष्ट्राच्या तुलनेत तिथे फार आधी इंग्रजी राजव्यवस्थेची आणि विज्ञानात पारंगत लोक तयार झाले.

लोकहितवादींची शतपत्रे वाचली तर त्या काळातील लोक आणि आज यात अजूनही बरेच साम्य आहे.

लेख छान आहे.

धन्यवाद सर्वांना
मै - " आत्ताही इतके रेग्रेसिव्ह विचारांचे पालथे घडे..." - अगदी अगदी

भरत, माझ्याकडून चुकून राहिलं रेल्वेबाबत लिहायचं, थँक्स अडिशन बद्दल. तुम्ही दिलेली लिंक बघितली, मस्तच आहे.

बोकलत Happy

अस्मिता, थँक्स बघते

चिडकू, अगदी खरंय बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, चिपळुणकर या पहिल्या पिढीतील पत्रकार, संपादकांनी इतकं काही दिलय, आज त्यातलं 10% वाचलं तरी समाज सुधारेल.

या बहुतेक सुधारकांवर मराठी विश्वकोशामधे खूप सविस्तर माहिती आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

छान लेख अवल.

हे नाव फक्त "शंकरशेठ स्कॉलरशिप" या मुळे (ऐकून) माहित होते. >>> मला पण

या दृष्टिकोनातून एका व्हॉट्सअप गृपवर काही सुधारकांची माहिती लिहिलेली. नंतर ती ब्लॉगवरही डकवली. असं वाटलं किमान इतपत माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी. >>> आता सगळेच लेख आण इथे.