घरमालक डिपॉझिट परत करत नसल्यास काय करावे?

Submitted by रीया on 26 May, 2024 - 02:04

मी साधारण २२ महिन्यांपूर्वी भारतात भाड्याने घर घेतले होते. २२ महिन्याचा करार होता आणि १ लाख डिपॉझिट. आता घर सोडल्यानंतर १० दिवसात डिपॉझिट परत करतो असं घर मालकाच्या मुलाने सांगितलं. सगळे व्यवहार जरी घरमालकिणीच्या नावावर होत असले तरी सगळ्या बोलाचाली तिच्या मुलासोबत होत होत्या. व्यवहार घरमालकाचा खात्यावर झाले आहेत. आता महिना होऊन गेला तरी पैसे देत नाही आहे. मधे खूप बोलल्या नंतर त्याने केवळ ५० हजार ट्रान्सफर केले पण आता फोन उचलत नाहीये आणि मेसेजेसला रिप्लाय ही देत नाहीये. मी आता अमेरिकेत आहे त्यामुळे जाऊन भेट घेणं शक्य नाही. २२ महिने मी स्वतः तिथे राहिले आहे.
आमचा करार मार्च मधे संपला होता परंतु आम्हाला एक महिना अधिक रहायची वेळ आली काही कारणाने तर मी त्याची त्या साठी प्रॉपर परमिशन घेतली होती. त्याने त्या साठी सहमती दिली होती आणि त्या एक महिन्याचा करार नाही पण हे सगळे पुरावे मेसेज मधे उपलब्ध आहेत.
शेजारच्यांकडून कळालं की त्याने already दुसरे भाडेकरू सुद्धा ठेवले आहेत.
आता हे पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोलिसात तक्रार नाही केली का?
एकच महिना झाला आहे ना.. तक्रार करेन पोलिसात असा मेसेज तरी टाकता येईल त्याला

लीगल action घेईन असा मेसेज टाकला आहे. त्याला सुद्धा इग्नोर केलं त्याने. मला स्वतःला यातली माहिती नाही आणि अनुभवही पहिलाच म्हणून नेमक्या काय स्टेप्स घ्याव्या ते कळत नाही आहे. पोलीस कंपलेंट करायला हवी का लीगल नोटीस पाठवायची असते?

आधी ज्या पार्टीच्या नावे करार आहे तिच्या नावे स्वतः नोटीस पाठवा इमेल द्वारे, आणि त्याचे प्रिंट आउट भारतात कोणी घेऊन रजिस्टर्ड पोस्ट द्वारे त्या पत्त्यावर पाठवून रजिस्टर्ड पोस्टची पावती संभाळून ठेवा. नोटीस मध्ये एक मुदत द्या १० दिवस.
त्याला उत्तर नाही, समाधान कारक उत्तर नाही आले तर वकीला मार्फत लीगल नोटीस पाठवा. पोलीस मग पोलीस कंप्लेंट की काय ते वकिलच सांगतील.

---
जर ओळखीतले वकील असतील तर त्यांना फोन करायला लावा एकदा आणि फोन वरून रक्कम ठराविक वेळात नाही परत केली तर लीगल प्रोसेस सुरू करू असे त्यांनी सांगितले तर कदाचित पुढील कष्ट वाचतील.

ओके मानवदा. स्टेप्स बाय स्टेप्स काय करावं हे सांगितल्या बद्दल थँक्स. मी वकील शोधतेच आहे. ते कॉल करतायेत का बघते.

थँक्स र आ! त्या उत्तरात लिहिल्याप्रमाणे लीगल नोटीस पाठवतेच पण जर सिविल कोर्टात जावं लागलं तर मला भारतात हजर रहावं लागेल का?

खात्रीने सांगू शकत नाही. वकीलच सांगू शकतील यावर.
पण कदाचित सर्वाधिकार दिलेली व्यक्ती कोर्टात बाजू मांडू शकेल.

इंडीया कानून किंवा तत्समे वेबसाईटवर उत्तर मिळेल. पण नातेवाईकांना ओळखीतल्या विश्वासू वकीलाकडून पेड सल्ला घेणे हा खात्रीचा उपाय असेल. त्यालाच केस देणार असाल तर तो सल्ला फी घेणार नाही.

वकील किती फी घेईल हे आधी ठरवा...
सगळी फी एकदम देऊ नका. प्रत्येक तारखेप्रमाणे देणे उचित होईल.
तुम्हाला किती रक्कम खर्च करावी लागेल आणि मिळेल किती हे ही पहा.

पोलीस कंपलेंट करायला हवी का लीगल नोटीस पाठवायची असते?
>>>>

पोलिसांकडे सगळेच हक्क नसतात पण बरेच लोकं पोलिस दारात आले की घाबरतात. त्यामुळे आम्ही काही झाले की आधी पोलिसांकडे जातो. अर्थात थोडीफार पोलिसात ओळख असली की ते सुद्धा बरे पडते अश्यावेळी. आमच्याकडे हे काम करते. म्हणूनच कोर्ट आणि लीगल ॲक्शन आधी पोलिसच डोक्यात येते. पण मुंबई पोलिस आणि बाहेरचे पोलिस यात काही फरक असेल तर त्याची कल्पना नाही. कुठे पोलिस सुद्धा सेटलमेंट करून मध्ये पैसे घेतात असेही असू शकतात. कोर्टाबाबत सुद्धा केस टाकून वकिलाचा खर्च आहेच. तो मिळतो का परत याचीही कल्पना नाहीच.
असो, धागा वाचतोय..

खटल्यात घुसले की आणखी दीड लाख रुपये जातील. वेळ जाईल.
स्थानिक 'दमदार' व्यक्ती गाठणे. दोन तीन दिवसांत काम होईल. ( अशी केस माहितीत आहे. दोन तासांत फोन आला - "मी देणारच होतो पैसे. कशाला 'त्यांच्या' कडे गेलात?" अर्थात या कामाचे थोडे मोल दमदारला पोहोचते करावे लागेल.)

स्थानिक 'दमदार' व्यक्ती गाठणे. दोन तीन दिवसांत काम होईल>>>> समांतर न्यायव्यवस्था, धर्मात्मांची गरज इथे अधोरेखीत होते

पुण्यात वसंत मोरेंनी ( तेव्हा मनसे) एक वरीष्ठ नागरीकाचे भाड्याने दिलेले घर खाली होत नव्हते ते खाली करून दिल्याचे पेपरात वाचले होते.

अशी केस माहितीत आहे...... असा प्रकार डोळ्यादेखत घडलाय.ज्येष्ठ कलिगच्या मुलीचे पैसे मिळत नव्हते.तिला ऑफिसमधील एका 20-२२ वर्षांच्या मुलाने मुंबईवरून कोंढव्यातील घरमालकाला फोन केला."ते अमुक तमुक नगरसेवक माहीत आहेत का?आपल्या ओळखीचे आहेत."असं इतक्या खेळीमेळीत बोलला की जणू दोन दोस्त बोलताहेत.नंतर आपल्या कामाचे सूतोवाच केले.नंतर पैसे मिळाले हे वेगळे सांगायला नको.

तुम्हाला किती रक्कम खर्च करावी लागेल आणि मिळेल किती हे ही पहा....... बरोबर.

तो घरमालक तिथेच राहतोय अनेक वर्षं, त्याच्या ओळखी जास्त असतील की तुमच्या ते पाहून घ्या.

तुम्हीं करारनामा केला असेल ना ? आणि त्याची सरकारी नोंदही केली असेल ना ?त्यानुसार वकील गाठून नोटीस धाडा.

मुंबईत तरी करारनामा हा सरकार मान्य agent मार्फत , सरकारी कलमानुसार आणि तोही ऑनलाइन नोंद करून होतो, पुण्यात किंवा इतर ठिकाणी काय ते ठाऊक नाहीये

हो करारनामा केला आहे. मला यात लीगल मार्गाने जायचं आहे. राजकारणी व्यक्तींची मदत घेता येईलच पण हे सगळं म्हाताऱ्या आई बाबांना करायला लावण्यात अर्थ नाही. लीगली निस्तरता आलं तर जास्त चांगलं.
वकील शोधते आहे.

कसलेला गुंड नसेल तर एका नोटीसित घाबरून पैसे देईल. लहान सहान गुंड असला तरीही करार त्याच्यां आईच्या नावावर असल्यामुळे कुठ आईला कोर्ट काचेर्याच्या फेऱ्या आणि वकिलाची फी नको म्हणून देऊनही टाकेल.

<< तुम्हाला किती रक्कम खर्च करावी लागेल आणि मिळेल किती हे ही पहा. >>

----- हा महत्वाचा मुद्दा आहे. १०० पैकी ५० हजार रु मिळाले आहेत, आता उरलेल्या ५० हजार रु. दोन लाख रु. खर्च व्हायला नको.

दोन कोटी रुपये असते तर वकिल, फि हे मार्ग सुचविले असते. पैसे विसरुन जाणे हा उपाय असेल आणि सहज शक्य असेल तर तो पण पडताळा. मनस्तापाची किंमत मोजता येत नाही.

<< स्थानिक 'दमदार' व्यक्ती गाठणे. दोन तीन दिवसांत काम होईल >>
------- दमदार व्यक्ती हे काम कशासाठी करणार आहे? पैशासाठी तो एखाद्याला दम देऊ शकत असेल तर त्याच पैशासाठी तो दम न देण्याचे कामही करु शकतो. हे शस्त्र दुधारी आहे.

तुम्हाला न्याय मिळवून देणे हा त्या गुंडाचा उद्देश नसणार आहे. आर्थिक व्यावहार अगदी किरकोळ आहे, पण त्या दमदार व्यक्तीचे धमकी तंत्राचे गणित चुकले तर गोष्टी कुठल्या थराला जातील याचा अंदाज कुणालाही नसेल.

कायद्याच्या चौकटीत रहा, जे योग्य आहे तेव्हढेच करा. या चौकटीच्या बाहेर गेलात तर बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती राहिल.

माझ्या उदाहरणातील दमदार व्यक्ती ही एका मोठ्या पक्षाचे स्थानिक प्रस्थ होतं. आता त्याचा फोन त्या घरमालकाला गेल्यावर काय होणार? "तुम्ही अमक्याचे पैसे देणे बाकी आहे ना? ते जरा लवकर द्या " एवढंच तो नम्रपणे प्रेमाने सांगणार. दम वगैरे नसणार. परंतू घरमालक काय समजायचे ते समजणार.
-----
आता कायदेशीर बाबी म्हणाल तर डिपोझीटची रक्कम 'लगेच' परत न करणे हा फसवणूकीचा गुन्हा आहे का यावर कायद्याचा कीस पडेल. (फसवणूकीच्या केसमध्ये पोलीस डायरेक्ट हस्तक्षेप करू शकतात, दिरंगाई करणे वेगळे)त्यानंतर मी ते परत करणारच आहे पण अडचणीमुळे वेळ लागत आहे तरी वेळ द्यावा हा बचाव होईल. आता नवीन भाडेकरू घेतला आहे तर त्यांच्याकडून नवीन डिपोझिट मिळालेच असणार हे आपण मांडणार . त्यात परत तपासणी. त्यांच्याकडून किती रक्कम घेतली वगैरे. तर या सर्वांच्या तारखा पडून बाजू मांडणे यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही. (खर्च?)
( प्रतिसादांत न्यायव्यवस्थेचा अपमान करण्याचा हेतू नाही. वेळ आणि पैसे याबाबतचे मत आहे.)

चर्चा चांगली आहे.
उदय, स्वकष्टाचे ५० हजार असेच सोडून देऊ म्हणता? वकील नोटीस पाठवते म्हणाली. माझे ५० हजार आडवले म्हणून केस केली तर त्याचे पण लाखो रुपये जातीलच की. मग आपले ही extra पैसे जाऊ नयेत म्हणून तो परत करणार नाही का? मनस्ताप मला होणार तसाच त्याला पण होणार पण काहीच प्रयत्न ना करता पैसे सोडून दिल्याने मला फार त्रास होईल. कायद्याची मदत घेते. बहुतेक नोटीस गेल्यावर किमान रिप्लाय तरी करेल.

srd, मेसेजला रिप्लाय न देणं, आता कॉल न घेणं ही दिरंगाई कशी? शिवाय किती दिवसात पैसे परत करावे हा नियम असेलच की.

नोटीस गेल्यानंतर सुद्धा काहीच कम्युनिकेशन नाही झालं तर मात्र नक्की पोलीस किंवा नगरसेवकांकडे जाईन मी.

उगाच व्याप झालाय या माणसाचा.

<< उदय, स्वकष्टाचे ५० हजार असेच सोडून देऊ म्हणता? वकील नोटीस पाठवते म्हणाली. माझे ५० हजार आडवले म्हणून केस केली तर त्याचे पण लाखो रुपये जातीलच की. मग आपले ही extra पैसे जाऊ नयेत म्हणून तो परत करणार नाही का? मनस्ताप मला होणार तसाच त्याला पण होणार पण काहीच प्रयत्न ना करता पैसे सोडून दिल्याने मला फार त्रास होईल. >>

------ तुमचे कष्टाचे पैसे आहेत आणि ते मिळविण्याचा तुम्हाला हक्क आहे, याबाबत दुमत नाही. पण पाठपुरावा करत रहाण्याचा मनस्ताप होतो. त्यालाही त्रास/ मनस्ताप तुमच्या एव्हढाच होईल असे नाही, लोक कोडगे / निर्लज्ज पण असतात.

कमी मनस्तापांत पैसे मिळो एव्हढेच म्हणेन.

नोटीस गेल्यानंतर सुद्धा काहीच कम्युनिकेशन नाही झालं तर मात्र नक्की पोलीस किंवा नगरसेवकांकडे जाईन मी.>>
हो, आता ज्या काही स्टेप्स घ्यायच्या असतात त्या आपण अगदी सिरियसली, योग्य वेळेवर एका मागून एक घेणार आहोत, पूर्ण पाठपुरावा करत आहोत असा मेसेज गेला पाहिजे.
मध्येच आठवण आली की काहीतरी करतो आहोत असे वाटायला नको.

कमी मनस्तापांत पैसे मिळो एव्हढेच म्हणेन.
>>>
__/\__

खरंय!

मध्येच आठवण आली की काहीतरी करतो आहोत असे वाटायला नको.
>>>
माझ्याकडुन मी याचा पुर्ण प्रयत्न करते आहे.

नोटीस गेल्यानंतर सुद्धा काहीच कम्युनिकेशन नाही झालं तर मात्र नक्की पोलीस किंवा नगरसेवकांकडे जाईन मी.>>..... रिया,उत्तम.बेस्ट लक.

या प्रकरणावरून आठवलेला व माझ्या मनात बरेच दिवस असलेला एक प्रश्न विचारतो. अश्या फसवणुकीच्या प्रकरणात (आर्थिक किंवा इतर) आपण वकिलावर होणारा खर्च, मूळ रकमेचे व्याज व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई मागू शकतो का? कायद्याने ती मिळते का?
गेल्या महिन्यात घरात AC बसवून घेतला. विक्रेत्याने २ दिवसात इंस्टॉलेशन होईल असे सांगितले होते त्याला २ आठवडे लागले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागला.

तुमच्या घरातील नातेवाईक लोकांपैकी कुणी खमक माणूस तुम्ही रहात असलेल्या फ्लॅट वर जाऊ शकत असेल तर बघा. त्या फ्लॅट च्या आत्ताच्या भाडेकरूला मालक फोन उचलत नाहीयेत, म्हणून आलो असं सुरु करत बोलता बोलता तुमचे पैसे अडकल्याचे त्याच्या कानावर घालायला सांगा. बिल्डिंग सेक्रेटरी, किंवा असे कुणी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्यांच्या कानावर सुद्धा हे घाला. म्हणजे त्यांच्या आणि आत्ताच्या भाडेकरू कडून मालकाच्या कानावर जाईल. लाजे काजेस्तव बरा असेल माणूस तर लगेच लागू होईल उपाय

बिल्वा, बिल्डिंग सेक्रेटरी त्याची मैत्रिण आहे त्यामुळे काही होईल उपयोग असं वाटत नाही. मी आई ला म्हणाले आत्ताच्या भाडेकरुच्या कानावर घाल म्हणजे काही उपयोग होतो का बघु. सरळ पोलीस घेऊन पण जाता येईल पण आईला हे सगळं जमेल असं वाटत नाही. त्याच्या मूळ घराचा पत्ता पण आहे . तिथे जाऊन ठिय्या देऊन बसवु शकते माणुस पण हे सगळं करणं पालकांना शक्य नाही आणि मी इथे अडकले आहे.
आता लिगल मार्गाने जातोच आहोत तर बघुया काही उपयोग होतोय का. मी अपडेट देत राहीन.

पोलीस अशा केस मधे लक्ष घालू शकतील का याबद्दल शंका आहे. त्यासाठी कोर्टाचे आदेश हवेत असे वाटते. पुन्हा एकदा हे पण वकील सांगू शकेल..

आपण दमदार इसमाला मध्यस्थी करायला लावली आणि उलट आपल्या वरच केस केली तर? पैसे का दिले नाहीत याची कारणे तो देईल.

स्थानिक दमदार व्यक्तीकडे जाण्याचा पर्याय सुचवलेला दिसतोय.
इथे आपण अन्यायग्रस्त आहोत म्हणून तो योग्य वाटू शकेल. पण अशा व्यक्तीला अन्यायखोर माणसेही बोलवत असतील. एखाद्या केसमध्ये आपली काही चूक नसताना आपल्यालाच दमदाटी केली तर कसे वाटेल?

रक्कम परत मिळण्यासाठी शुभेच्छा! न्यायालयात जायची वेळ आली तर मूळ रक्कम + ती परत मिळवण्यासाठी आलेला खर्च + झालेल्या मनस्तापाची भरपाई मागता यावी. अशा प्रकरणांच्या बातम्या आणि ग्राहक न्यायालयात केलेल्या तक्रारी वाचून तरी असेच वाटते.

शिवाय हे दमदार लोक भलत्याच मोबदल्यांची (उदा. तुम्ही. तुमच्या नात्यातले जिथे नोकरीला असेल तिथे आमच्या कुणाला अमुक कंत्राट मिळवायला मदत करा. तेथील अमक्याची भेट तर घालुन द्या आमची तारीफ करुन पुढे आम्ही बघु. अमक्याच्या मुला/मुलीला चिटकवून घ्या इत्यादि.) अपेक्षा ठेवतात. एकमेका साह्य करु अवघे धरु कुपंथ प्रकार असु शकतो.

त्याने उरलेले 50000 न देण्याचं कारण काय सांगितलं?(मला आर्थिक अडचण आहे वगैरे, की तो काही डॅमेज झालं असं क्लेम करतोय? तसं करत असेल तर त्याच्याकडे किंवा तुमच्याकडे बिफोर आफ्टर चे फोटो पुरावे आहेत का?)
स्थानिक दमदार व्यक्ती फ्लॅट ज्या एरियात आहे त्यातल्या चांगल्या आहेत, कार्यालयात जाऊन सांगितल्यास मदत करतील पण.पण इथे डिपॉझिट बुडवणाऱ्याच्या ओळखी, आडनाव, स्थानिक कनेक्ट आणि हे मुद्दे महत्वाचे.
माणसाला आईबाबांनी अजून एखादा नातेवाईक घेऊन त्याच्या घरी गाठून/अनोळखी नंबरवर फोन करून नीट समोरासमोर बसून बोलणे हा सध्या योग्य उपाय वाटतो.किंवा मग सोसायटीच्या तर्फे ग्रुपवर म्हणणे मांडून दबाव.

त्याने उरलेले 50000 न देण्याचं कारण काय सांगितलं?
>>
काहीच नाही. पहिले ५० दिले तेंव्हा उद्या उरलेले देतो म्हणाला आणि मग एकदम फोन न उचलणे, मेसेजेस ला रिप्लाय न देणे सुरू केले. Damage राहिलं बाजूला, आम्हीच घरात २५ हजार देऊन दुरुस्त्या करुन घेतल्या होत्या पण आम्ही त्याचे पैसे नाही मागत आहोत. अर्थात त्याला विचारूनच सगळं केलं होतं आणि त्याचे लिखित पुरावे आहेत मेसेज मधे.
अनोळखी नंबर वरुन केलेले फोन तो उचलतो आहे आणि आज देतो पैसे म्हणतो प्रत्येक वेळेला आणि मग पुन्हा तो नंबर ब्लॉक करुन टाकतो आणि पैसे काही देत नाहीये.

सगळे व्यवहार ऑनलाइन बँकिंग मार्फत झाले आहेत.

रिया लिगल नोटिस देत आहेस हे योग्य आहे, खरतर प्रत्यक्ष जावुन काम झाल असत पण तुझ्या केसमधे ते शक्य नाही...कष्टाचे पैसे अजिबात सोडु नकोस..

एकदा प्रत्यक्ष जाऊन बोलून नेमका काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घेणे हा उत्तम उपाय ठरतो. मध्यस्थ सोबत असावेत. जे काही बोलणे होईल त्याच्या मिनटस वर सही घ्यावी.

अनेकदा पैसे वापरलेले असतात. ते वेळेत आले नाहीत कि टोलवाटोलवी सुरू होते. नंतर संबंध बिघडत जातात. एखाद दोन महिने थांबून पैसे देत असेल तर गोडीने काढून घेणे हे उत्तम.

नाहीतर एकदा समोरचा कानकोंडा झाला कि आऊटपुट काहीच नाही असे होऊन जाते.

र आ, त्याला भेटायला तो यायला तर हवा. काल आईला फोन वर म्हणाला की मला अजून रंग द्यायचा आहे घराला, घर साफ करुन घ्यायचं आहे. आई म्हणाली खोटं कशाला बोलतोस ? तुझे भाडेकरू राहिला आलेले मला माहीत आहेत मग म्हणाला देतो पैसे उद्या.
आज आईचा पण नंबर ब्लॉक करुन टाकला. त्याने नीट इज्जतीत मला सांगितलं की पैसे ६ महिन्याने देतो तरी मला चालणार आहे पण त्याची लक्षणं पैसे बुडवण्याची आहेत हे नीटच कळतंय. आज आमचे वकील म्हणाले उद्या मी त्याला फोन करुन सांगतो की मी लीगल नोटीस पाठवतो आहे. जर कसलेला चोर असेल तर हे ऐकून पण पैसे पाठवणार नाही. सामान्य माणसं कोर्ट कचेरीच्या फंदात न पडण्याचं ठरवतात आणि पटकन पैसे परत करतात.
खरंच कसलेला चोर असेल तर खासदार साहेबांच्या ऑफिसात जाऊन फोन करण्याची विनंती करणार आहे. त्यानंतरही काही फरक पडला नाही तर मग बघू काय करायचं ते.
माझ्याकडे त्या केस मधे पैसे सोडून देणं हाच पर्याय राहिल कारण इथून बसून मी काय केस लढणार Sad

त्याने खूप शहाणपणा केला. त्याला माहीत होतं मी अमेरिकेला जाणार आहे म्हणून मी निघेपर्यंत रोज फोन अटेंड केले, नीट कम्युनिकेशन ठेवलं आणि तू तिकडे गेलीस तरी काळजी करू नकोस , मी फोनवर असेनच वगैरे म्हणाला.

तरीही एकदा त्याच्या घरी मीटिंग करावी. साक्षीदार असू द्यावेत. घरी कुणी नसेल, घरी बोलायला टाळाटाळ केली तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. कामी येईल.

तो साधा फोन उचलत नाहीये तर भेटायला काय येणार. त्याला मागे म्हणलं होतं मी भेटून बोलुया तर म्हणाला मला वेळ नाही. तेंव्हा मी भारतात होते.
साक्षीदार हवेत हे खरं आहे. मी तिथे असते तर वकिलाला घेऊन त्याच्या घरी गेले असते पण आता ते शक्य नाही.

जमल्यास सोसायटीच्या व्हॉटसप ग्रुप वर हे सर्व पुराव्यासहित एक्स्पोज करा.अर्थात बेरड असेल तर यानेही फरक पडणार नाही.पैसे नीट ठरवून 'हे फॉरिन रिटर्न लोक, यांच्याकडे बरेच असणार, फार पाठपुरावा करणार नाहीत, सोडून देतील' असं समजून बुडवले असू शकतील.

लीगल केस मधे पुरावे गोळा करणे गरजेचे. त्यामुळे सोसायटी असेल तर त्या ग्रुप वर सांगायला हरकत नसावी. भाडेकरू कधीपासून आहे हे पण सांगितले तर त्याचा उद्देश स्पष्ट होईल.

काय माणूस आहे.
प्रीमियम एरिया मध्ये चांगले भाडे मिळणारे ग्राहक असतात, नवीन ग्राहक deposit देउन पटकन मिळत असणाऱ्या एरिया मध्ये असे करणारे व्यक्ती म्हणजे विचित्रच.
नोटीस पाठवून बघा

रिया बिल्डिंग सेक्रेटरी जरी त्या माणसाची मैत्रीण असेल तरी तिला, त्या मालकाची आई जी ओरिजिनल फ्लॅट होल्डर आहे तिचा नंबर मिळवून तिला आणि सध्याच्या भाडेकरूना असे सगळ्यांना msg करून हे कळवा की तुमचे अडकलेले पैसे मिळाले नाहीयेत आणि फोन पण उचलणे टाळतो आहे तो माणूस, त्यामुळे आता मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. असा msg वरच्या तिन्ही पार्ट्या ना द्या आणि त्याचे प्रूफ ठेवा. हा निरोप त्या माणसाकडे नक्की पोचेल मग तो पैसे देतोय का बघा. कारण तुम्ही कायदेशीर मार्गे गेलात तरी वकील/कोर्ट तुम्हाला पहिल्यांदा हेच विचारणार की तुम्ही त्यांच्या पर्यंत अन्य कुठल्या मार्गे पोचायचा प्रयत्न केलात का. त्यावेळी हे प्रूफ कामी येतील. Believe me आपल्या कडे व्हिक्टिम लाच जास्त पुरावे गोळा करावे लागतात आणि mutually सोडवायचा पर्याय का नाही वापरला हे विचारलं जात.

अपडेट असा की वकिलाची नोटीस गेली आहे. त्याला २४ तास उलटून गेले पण तरीही मेसेजेस इग्नोर करतो आहे म्हणून रात्री वकिलाच्या माणसाने फोन केला त्याला की नेमकं काय सुरू आहे? कायदेशीर कारवाई का करू नये? त्यावर आता तो म्हणतो आहे की घरात ५० हजाराचं Damage आहे. ते मी कापून घेतले आहेत. त्याच्या घरात संपूर्ण लिकेज होतं आधी पासूनच पण आम्ही राहिला गेलो तेंव्हा घर वापरात नसल्याने ते लिकेज दिसलं नाही. हळू हळू आम्ही वापरू लागलो तसं सगळीकडे ओल आली. तेंव्हा त्याला फोन केलेला तेंव्हा तो म्हणाला होता की मला माहीत आहे लिकेज आहे ते. त्याचे पैसे मी कापणार नाही. माझं चुकलं हे की मी हे मेसेज मधे टाकायला हवं होतं की आपलं आत्ता असं असं बोलणं झालं. ते मी तेंव्हा केलं नाही. एकतर कोणी असं फसवेल असं आयुष्यात वाटलं नाही आणि हा पहिलाच अनुभव आहे अशा माणसाचा. या आधी जिथे राहिले होते त्या दोन्ही घरमालकांनी हे असलं काही केलं नाही. हिशोब नीट ठेवले.
आता तो बिफोर आफ्टरचे फोटो दाखवतो आहे ज्यात पूर्वी लिकेज दिसत नसल्याने भिंती नीट दिसत होत्या आणि आता लिकेज दिसत असल्याने त्या ओल आलेल्या आणि फोफडे निघालेल्या वगैरे दिसतायेत. आता माझ्याकडे हे damage आम्ही केलं नाही याचा काही पुरावा नसल्याने पैसे सोडून द्यावे लागणार. वकिलांना विचारलं तेंव्हा ते म्हणाले साक्षीदार असतील कोणी तर कोर्टात केस नेऊ शकतो. साक्षीदार आहेत पण वकिलच म्हणाले यात तुमचे जास्त पैसे जातील शिवाय आपण लिखित पुरावे नाही दाखवू शकलो तर वेळ वाया जाईल आणि आऊटपुट मनासारखं मिळेल याची शक्यता नाही.

या सगळ्यातून एक शिकले की कोण्याच अनोळखी व्यक्तीवर व्यवहाराबाबत विश्वास ठेवू नये. चांगल्याची दुनिया राहिली नाहीये आणि प्रत्येक गोष्ट जिथे जिथे पैसा इन्वॉल्व आहे तिथे तिथे सगळे लिखित पुरावे असलेच पाहिजे.
कष्टाचे पैसे गेले म्हणून फार हळहळ होते आहे. जीव तळतळतो आहे. मानसिक शांतता मिळावी यासाठी आता प्रयत्न करावे लागतील Sad
असो!
ज्यांनी ज्यांनी सल्ले दिले त्यांचे खूप आभार. तुमच्यामुळे दिशा तरी मिळाली नाही तर गेले कित्येक आठवडे नुसतेच काय करू काय करू होत होतं.

सगळ्यांनाच एक अनुभव कळावा म्हणून लिहून ठेवलं.

एक लाख डिपॉझिट ? जनरली दोन भाड्याचे पैसे ईतकच डिपॉझिट असत. अन लिकेज पुर्ण घरात आहे ? जर ठराविक एरिया जसे संडास बाथरूम मध्ये लिकेज असेल तर ते दोन दिवसात नीट दुरुस्त होते.अन तुमच्याकडे लिकेज झाले आहे ते मालकाला कळवले तेव्हाचे काही फोटो वगैरे आहेत का ते बघा. मी तरी पैसे सोडून दिले नसते. कंझ्युमर कोर्टात केस केली असती. जर तिथे केस जिंकली तर तक्रारीच्या खर्चासह भरपाई मिळते.
आत्ताचे जे भाडेकरू आहेत ते पण तसेच ओल आलेल्या घरात राहतात का ? जमले तर ते फोटो काढून आणा

Pages

Back to top