फॉर्म नंबर १७

Submitted by चैतन्य रासकर on 23 May, 2024 - 03:08

बारावीचा निकाल लागला, आता दहावीचा सुद्धा लागेल. "बारावी नंतर काय?" या प्रश्नावर चर्चा, मंथन, डीबेट, धाक, विनंत्या, विनवण्या आपल्या घरात कधी ना कधी झालंच असेल. दहावीचा निकाल लागल्यावर शाळा सोडताना थोडं का होईना वाईट वाटलं असेल, मी तर पार ढसाढसा रडलो होतो, तेव्हा लै ट्रोमे झाले होते...

पण असे बरेच जण आहेत, ज्यांची काही कारणाने शाळा सुटली. त्यांना दहावी पूर्ण करता आली नाही, शाळा सुटल्याचं दुःख करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आता एखाद्या नोकरीसाठी किमान दहावी किंवा बारावी शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे, आपण जरा चौकस का काय ती नजर असते ना, त्या नजरेने बघितलं, तर दहावी पूर्ण न झालेले खूप जणं आपल्याला आजूबाजूला दिसतील.

तर अशा सर्व लोकांसाठी, पुण्यातल्या लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन (LCF) आणि ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN) यांनी एकत्र येऊन मासूम या एनजीओ मार्फत "सायंकालीन अध्ययन केंद्र" सुरु केले आहे. जे पुण्यामध्ये भोसरी, हडपसर, जनता वसाहत, पिंपरी, काशेवाडी, येरवडा, वारजे या ठिकाणी संध्याकाळी 6:00 ते 8:30 पर्यंत सुरु आहेत. इथे वह्या पुस्तकं मोफत मिळतात.

मी या उपक्रमासाठी काम करत आहेत, माझा स्वतःचा अनुभव आहे की, अशा बऱ्याच जणांना वय झाल्यामुळे लाज वाटते, ते पुढे येत नाहीत, "आता शिकून काय उपयोग?" असं म्हणतात. पण त्यांना या गोष्टी अतिशय प्रेमाने समजून सांगितल्या तर फॉर्म नंबर १७ भरायला आणि दहावी पूर्ण करायला तयार होतात, तर अशा लोकांशी नक्की बोला, त्यांना दहावी पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करा जर काहीजणं तयार झाले, तर या नंबरवर संपर्क करायला सांगा, रणजित: 8928777644

बाकी बोअर झालं असेल तर हा उपक्रम अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहचवता येईल, याबद्दल गप्पा मारूया..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला उपक्रम....
तुम्हाला आणि संस्थेला अनेकानेक शुभेच्छा...
कोणी असे असेल तर आवश्य सांगेल....

शुभेच्छा.
मला title वाचून रहस्यकथा असेल असे वाटले होते.

मुंबईत आहे का असा उपक्रम? आमच्या ऑफिस मधल्या एका मुलासाठी हवी होती माहिती.आमचं ऑफिस नरिमन पॉइंट ला आहे.
हो आणि तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा!! खूपच चांगलं काम आहे.

शीर्षकावरून वाटलं की धागा निवडणूक आयोगाबद्दल आहे की काय! सध्या फॉर्म १७ अ गाजतोय.

तर हा फॉर्म १७ म्हणजे प्रायव्हेट एसेसी का?
नववीत नापास झालेली अनेक मुले आणखी एक वर्ष त्या वर्गात बसण्यापेक्षा प्रायव्हेट एसेसी करतात. शाळेच्या वार्षिका निकालाच्या दिवशी
शाळेबाहेर असे प्रायव्हेट एसेसीचे शिकवणी वर्ग चालवणार्‍या क्लासेसची पँफ्लेट्स वाटणारे लोक दिसतात.

इतक्या ठिकाणी उपक्रम चालतोय? छान आहे. कौतुक आणि शुभेच्छा!

परीक्षार्थी स्वतःच अध्ययन करतात की त्यांच्या अध्यापनाचीही सोय आहे? मला कधीतरी अशा ( तुम्ही म्हणताय तशा उशिरा दहावी देणार्‍या) परीक्षार्थींना शिकवायला आवडेल.