12/P पॉन्स- ब्रूक्स धुमकेतू बघण्याची व त्याचा फोटो घेण्याची संधी!

Submitted by मार्गी on 15 March, 2024 - 09:41

✪ सूर्यास्तानंतर थोड्या वेळानंतर हा धुमकेतू बायनॅक्युलरने बघता येऊ शकतो
✪ प्रकाश प्रदूषण नसलेल्या व अंधारं आकाश असलेल्या जागेवरून बघता येईल
✪ स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफ घेता येईल.
✪ धुमकेतू बघण्यातला रोमांच!
✪ धुमकेतू 30 मार्चला अश्विनी ता-याच्या अगदी जवळ असेल

सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की, सध्या 12/P पॉन्स- ब्रूक्स नावाचा धुमकेतू दिसत आहे. 12/P म्हणजे ज्याचा अवधी शोधला गेला होता, असा हा 12 वा धुमकेतू होता. हा धुमकेतू 71 वर्षांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. गेले अनेक शतकं त्याचं निरीक्षण केलं जात आहे. पॉन्स व ब्रूक्स हे त्याला एकाच वेळी शोधणा-या शास्त्रज्ञांच्या नावावरून आले आहे. 15 मार्च रोजी त्याची तेजस्वीता +5.5 आहे. म्हणजे गडद अंधारं आकाश असलेल्या शहरापासून दूर अशा ठिकाणी तो बायनॅक्युलरने सहजपणे बघता येईल व कदाचित नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकेल. परंतु त्याची जागा थोडी अडचणीची आहे. तो सूर्याच्या दिशेने जात असल्यामुळे सूर्यापासून आकाशात फार लांब अंतरावर नाही आहे. अगदी अंधार पडता पडता तो दिसू शकतो. 15 मार्च रोजी तो मिराख- बीटा एंड्रोमिडा ह्या ठळक ता-यालगत आहे व तिथून हळु हळु अश्विनी नक्षत्राच्या दिशेने जात आहे.


This photo was taken on 5 March. The comet, Andromeda galaxy and Mirach star are visible in the photo. Astronomy photo of the day: Image Credit & Copyright: Petr Horálek / Institute of Physics in Opava

(माझा ब्लॉग: गेल्या वर्षी एक धुमकेतू शोधतानाचा अनुभव इथे वाचता येईल- http://niranjan-vichar.blogspot.com/2023/01/spotting-wonderful-comet-c20... इथे माझे आकाश दर्शनावरचे इतर लेख आणि माझ्या टेलिस्कोपने घेतलेले फोटोजसुद्धा आहेत.)

शहरांमधून हा धुमकेतू बघणं प्रकाश प्रदूषणामुळे अतिशय कठीण आहे. जर शहरामधून देवयानी आकाशगंगा (एंड्रोमिडा गॅलक्सी) दिसली असेल, तर प्रयत्न करता येऊ शकेल. धुमकेतू एंड्रोमिडाहून (3.3 प्रत) अधिक अंधुक आहे, परंतु फार जास्त अंधुक नाही आहे. अंधारं आकाश असेल अशा दूरच्या ठिकाणावरून त्याचा सहजपणे फोटोसुद्धा घेता येऊ शकेल. SkySafari सारखं आकाश दर्शनाचं app वापरून त्याची प्रत्येक दिवसाची आकाशातली स्थिती सहजपणे शोधता येऊ शकते. 30 मार्च रोजी तो ठळक अशा अश्विनीच्या अगदी जवळ असेल. परंतु त्याला बघण्यातली मुख्य अडचण प्रकाश प्रदूषण नसलेलं आकाश ही आहे.

फोटोग्राफ घेण्यासाठी Pro mode सेटींग्ज

जर असं अंधारं आकाश असेल तर स्मार्टफोनने सहज फोटो घेता येऊ शकेल. मोबाईल कॅमेराच्या प्रो सेटींग्जमध्ये जाऊन आधी 3 ते 5 सेकंद टायमर लावता येईल. म्हणजे हाताचं कंपन निघून जाईल असा वेळ. नंतर फोकस इनफिनिटी किंवा 1 (जास्तीत जास्त असेल तो) ठेवायचा. मग ISO हे 800 किंवा 1600 ठेवायचं. जर अगदीच वस्तीपासून लांबचं अंधारं आकाश असेल तर 3200 सुद्धा ठेवता येईल. पण प्रकाश प्रदूषण असेल तर 800 किंवा 1600. मग शटर स्पीड 8 सेकंद करायची. म्हणजे कॅमेरा सलग 8 सेकंद फोटो घेत राहील व त्यावेळी आपल्याला मोबाईल अजिबात हलवायचा नाही. एकदा हे सेटींग्ज करून झाल्यावर पश्चिम क्षितिजाकडे कॅमेरा बघेल अशा प्रकारे कशाच्या आधाराने त्याला स्थिर ठेवता येईल. पश्चिमेच्या आकाशात तेजस्वी गुरू सहज दिसेल. धुमकेतू गुरूच्या बराच खाली असेल. सर्व सेटींग्ज झाल्यावर मोबाईल खाली ठेवून क्लिक करून 10 सेकंद थांबायचं. जर इमेज खूप जास्त पांढरी आली नसेल तर 16 सेकंद शटर स्पीड वापरता येऊ शकेल ज्यामुळे अजून जास्त प्रकाश गोळा केला जाईल (मोबाईल 20 सेकंदांहून जास्त वेळ स्थिर ठेवावा लागेल). पण अधिक प्रकाश असताना प्रकाश प्रदूषणही त्यात येऊ शकेल.

पुरेशा चांगल्या ठिकाणावरून सहजपणे धुमकेतूची अंधुकशी प्रतिमा घेता येऊ शकेल. प्रत्यक्ष निरीक्षणासाठी 10X50 असा चांगला बायनॅक्युलर किंवा छोटा टेलिस्कोप लागेल. त्याबरोबर आकाशात कुठे बघायचं हे अचूक माहिती असावं लागेल. त्यासाठी SkySafari app वापरता येईल. धुमकेतूची रोजची स्थिती व तपशील इथे उपलब्ध असतात. https://theskylive.com/ तसेच इतरही बरेच खगोलीय अपडेटस मिळतात.

धुमकेतू शोधणं व बघणं एक थ्रिल आहे! अनेक वेळेस प्रयत्न करावा लागतो. पण जेव्हा तो सापडतो, तेव्हा रोमांचकारी अनुभव असतो! आकाशातला पांढुरका धुळीसारखा ठिपका! पुढचे काही आठवडे हा धुमकेतू बघता येईल व फोटोही घेता येऊ शकेल. 21 एप्रिल रोजी तो सर्वाधिक तेजस्वी व सूर्याच्या जवळ असेल, पण आकाशात अगदी क्षितिजालगतसुद्धा असेल. त्यामुळे ह्या धुमकेतूसाठी बोटे गुंफलेली अर्थात् fingers crossed असतील!

(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
८ एप्रिलला अमेरिकेतून दिसणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणादरम्यान हा धुमकेतू दिवसा दिसू शकेल.

मस्तच. मी खूप लहान असताना एकदा धूमकेतू बघितला होता. त्यावेळी धूमकेतू हा शब्द पहिल्यांदा ऐकला. आधी कळलंच नव्हतं काय आहे ते. पण झाडूसारखं काहीतरी आकाशात फिरतंय एवढंच दिसलं.

मस्तच. मी खूप लहान असताना एकदा धूमकेतू बघितला होता. त्यावेळी धूमकेतू हा शब्द पहिल्यांदा ऐकला. आधी कळलंच नव्हतं काय आहे ते. पण झाडूसारखं काहीतरी आकाशात फिरतंय एवढंच दिसलं. >> हेल बॉप धूमकेतू आलेला १९९७ मध्ये. चांगला २ महिने दिसत होता आकाशात नुसत्या डोळ्यांनी संध्याकाळचा पश्चिमेला थोडासा उत्तरेकडे, तोच पाहिलेला का?

नक्की माहिती नाही. असू शकेल. पण तोच मी बघितलेला पहिला आणि शेवटचा धूमकेतू आहे. आणि बराच वेळ दिसत होता. त्यामुळे लक्षात राहीला.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! Happy

हो, तो हेल बॉप धुमकेतू फार विशेष होता! शिवाय ह्याकुताकेसुद्धा.

मी काल तुंग किल्ल्याजवळच्या आतल्या भागात मुलांचं आकाश दर्शन शिबिर घेतलं. तिथे सध्याचा धुमकेतू बघायचा खूप प्रयत्न केला. पण प्रकाश प्रदूषण (कृत्रिम प्रकाशाचा थर), चंद्र प्रकाश आणि धुमकेतूची क्षितिजापासूनची कमी उंची ह्यामुळे तो दिसू शकला नाही. मोठ्या टेलिस्कोपमध्येही तो आकाशात योग्य जागी जाऊनही सापडत नव्हता व अश्विनीसारखा ताराही निस्तेज दिसत होता. हा धुमकेतू बघणं बरंच कठीण आहे.

पण गंमत म्हणजे पहाटे आकाश चांगलं होतं (नेहमीच पहाटे आकाश थोडं चांगलं असतं), त्यावेळी श्रवणच्या वर एक खूप अंधुक धुमकेतू बघण्याचा प्रयत्न केला. आणि तिथल्या ताऱ्यांची तेजस्विता, उपलब्ध मोठ्या ८ इंची टेलिस्कोपची क्षमता, जवळच्या तारे जुळणे व धुमकेतू अंधुक (7.7 प्रतीचा) असल्यामुळे तो ताऱ्यासारखा दिसणे ह्या मापदंडानुसार C/2021 S3 Panstrass हा धुमकेतू 95% खात्रीसह दिसला.

तिथे घेतलेला वृश्चिक राशीचा फोटो-

कोणी हा धुमकेतू बघितला/ फोटो घेतला असेल तर कळवाल. @ विशाखा ताई, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत!