पुडाची वडी साहित्य -
कणीक -
दीड वाटी बेसन पीठ
पावणे दोन वाटी मैदा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
अर्धी वाटी तेलाचे मोहन
पाणी
वरील जिन्नस एकत्र करुन पुरीला मळतो इतपत घट्ट पीठ मळून घ्यावे.
सारण -
दोन वाट्या किसलेले सुके खोबरे (जरासे शेक देऊन)
दोन चमचे प्रत्येकी- तीळ आणि खसखस भाजलेली,
१/२ मुठ बारीक चिरलेली कोथिंबीर,
लसूण आले पेस्ट तीन चमचे (ह्यात लसूण जास्त घ्यायचा आहे),
मीठ, पिठीसाखर, कोल्हापुरी तिखट, लाल तिखट, धणे पूड, हिंग आणि हळद चवीनुसार, किंचीत गरम मसाला.
वरील सगळे जिन्नस एकत्र करून हातानेच कुस्करून घ्यावे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाटवडी साहित्य -
दोन वाटी बेसन पीठ,
साडे तीन वाटी पाणी,
कोल्हापुरी तिखट , मीठ आवडीप्रमाणे
लसूण ८/१० पाकळ्या
मोहरी , हिंग, हळद आणि तेल फोडणीसाठी
सुकं खोबरं किसलेले आणि खसखस वरून पेरण्यासाठी.
रसपाट साहित्य -
अर्धी वाटी सुके खोबरे किसलेले, पाच सहा लसूण पाकळ्या, कोथिंबीर, एक मोठा कांदा उभा चिरून, खसखस, मीठ, हळद, हिंग, कोल्हापुरी तिखट.
आजी (वडिलांची आई) जाऊन एक वर्ष झालं. एकदम गरीब गाय आणि मायाळू.. याउलट आजोबा एकदम कडक शिस्तीचे. आजी माझ्या आईला, काकूला, बायकोला अन् माझ्या वहिनी ह्यांना अहो जाहो करत असे आणि गंमत म्हणजे तिची मुलं / मुली तिला अहो आई म्हणत, एकेरी बोलवत नसत ह्या दोन तिच्या एकदम हातखंडा रेसिपी. ही पुडाची वडी विदर्भात बनते तशी नाही. इकडे सुके खोबरे हा मुख्य घटक आहे.. हे दोन्ही पदार्थ सर्वांना माहीत असतीलच, फक्त स्मरणरंजन म्हणून रेसिपी देत आहे.
पुडाची वडी कृती -
कणकेची पोळी लाटून त्याला तेल लावावे. त्यावर वरील सारण नीट पसरावे (थोड्या कडा सोडून). आता ह्यावर लाटणे फिरवा , ह्यामुळे सारण नीट चिकटेल आणि तळताना बाहेर येणार नाही. कडाना तेल लावून ह्या पोळीचा घट्ट रोल बनवा आणि रोलची दोन्ही टोके बंद करा. आता ह्याच्या बाकरवडी सारख्या वड्या कापा. एका कढईत तेल तापवून झाले की ह्या वड्या मध्यम आचेवर तळून घ्या. सांगली कोल्हापूर साईड पुडाची वडी तयार.
पाटवडी कृती -
एका जाड बुडाच्या कढईत फोडणीसाठी तेल घ्या. तेल जरा जास्त घ्यावे. तेल तापले की त्यात हिंग, मोहरी, ठेचलेला लसूण, हळद आणि कोल्हापुरी तिखट घालावे. आता त्यात पाणी आणि मीठ घालावे. चांगली उकळी आली की बेसन पीठ घालावे आणि हे सर्व नीट हाटून घ्यावे. पीठ खालून सुटले / गोळा कढईत फिरू लागला की गॅस बंद करावा. आता एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यावा. त्यात हे गरम मिश्रण घाला आणि उलथ्ण्यानेच मिश्रण ताटात समान पसरवून घ्यावे. आता ह्यावर खसखस, सुके खोबरे आणि कोथींबीर पेरावी. पंधरा मिनिटांनी ह्याच्या वड्या पाडाव्यात.
रसपाट कृती:
ज्या कढईत वडीचे मिश्रण केले होते त्यातच तीन वाटी गरम पाणी घालावे. वरील साहित्य आधी किंचित तेलावर परतून घ्यावे आणि मग मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. आता गरम पाण्यात हा बारीक केलेला मसाला घालावा आणि एक / दोन चांगली उकळी काढावी. ह्याला वेगळ्या फोडणीची गरज नाही. रस्सा पातळ वाटत असेल तर दाटपणासाठी दोन वड्या कुस्करून घालाव्यात. वाढताना आधी पाटवड्या ठेऊन त्यावर गरम रस्सा घालावा. रस पाट तयार.
दोन्ही पाकृ मध्ये लसूण हा घटक महत्त्वाचा आहे आणि तो वगळू नये. पुडाच्या वडीला बेसन आणि गहू पीठ समप्रमाणात घेतले तरी चालेल पण बेसन आणि मैदा आवरण जास्त खुसखुशीत होते.
मस्त.. करून बघणार
मस्त.. करून बघणार
छान पाककृती ..
छान पाककृती ..
भारी !
भारी !
वाह छान पुडाची वडी प्रिय
वाह छान
पुडाची वडी प्रिय
पुडाची वडी खाल्ली आहे. तीत
पुडाची वडी खाल्ली आहे. तीत कोथिंबिरीचं प्रमाण बरंच जास्त होतं. कोथिंबीर वडी म्हणूनच दिली होती. त्या तिकडची असेल. ही मस्त दिसते आणि वाटते आहे.
पाटवड्या तेलावर परतत नाही का?
मस्तच रेसीपी. मी वरील पहिली
मस्तच रेसीपी. मी वरील पहिली वडी एकदा केलेली आहे. ही खरेतर चितळे बाकर वडीची ओरिजिनल मम्मी आहे. ( वै म.)
पाटवडी व रस्सा एकदा करुन बघायचा होता. मला शक्तिवर्धक व पोट भरी चे पण लहान सर्विन्ग असे काहीतरी हवे होते म्हणून पाट वड्या रेसीपी शोधत होते. दोन तीन पाट वड्या खाल्ल्या की पोटाला आधार. आधी सर्व सामान आणले पाहिजे.
पाककृती आवडली
पाककृती आवडली
छानच. निगुतीने, सावकाशीने
छानच. निगुतीने, सावकाशीने करण्याचे पदार्थ. आज्यांनी करावेत आणि आपण खावेत असे! नंतर त्यांची आठवण काढून खावेत.
थापीव वडी फार आवडते.
थापीव वडी फार आवडते.
कोपुत बऱ्याच देव आणि देवी किंवा वास्तुशांती वै वेळी आंबील ( कढी ) , थापीव वडी, पुरणपोळी हे नैवेद्यातील मुख्य घटक असतातच.
मनीम्याऊ, अमूपरी, जाई,
मनीम्याऊ, अमूपरी, जाई, sparkle, भरतजी, वावे, अमा, मंजूताई, zakoba धन्यवाद . भरतजी पाट वडी तळायची नाही. तुम्ही म्हणता ती पुडाची वडी/ सांभर वडी विदर्भ वाली. ती पण मस्त लागते पण ती बहुदा एक एक लाटून करावी लागते. अमा हो तिकडे बाकरवडी पण म्हणतात ह्याला. ह्याचा नुसता बाकर पण मस्त लागतो चवीला. पाट वडी करून कशी झाली ते सांगा.
व्वा, पुडाची वडी एकदम आवडता
व्वा, पुडाची वडी एकदम आवडता प्रकार! मस्त आहे फोटो आणि कृती. पाटवडीपण फार आवडते. आणखी एक भाजी असते, खांडोळीची भाजी! तीही सॉलिड असते.
व्वा! दोन्ही पदार्थ फार
व्वा! दोन्ही पदार्थ फार आवडतात.
मस्त...
मस्त...
पाटवडी कोल्हापूर साईडला गौरीला नैवेद्य म्हणून दाखवतात का? एका वर्षी गणपतीच्या दिवसांत मावशीकडे होते तर सगळ्या शेजाऱ्यांकडून प्रसाद म्हणून भाकरी, पालेभाजी व ही अशीच वडी आली होती. यम्मी चव आणि कोकणात वेगळा प्रसाद असतो म्हणून लक्षात राहिली.
मस्त पाककृती.
मस्त पाककृती.
मला थापी वडी आणि रस्सा खूप आवडतो.
माझी आई थापी वडी करताना बेसन न वापरता हरभऱ्याची डाळ जाडसर वाटून घेते.
महाळाला लागतेच.
मस्तच रेसिपी. आई करायची मी
मस्तच रेसिपी. आई करायची मी कधी केले नाही. करून बघेन. लिहिलेय पण छान.
यमी रेसिपीज आहेत. पहिली तर
यमी रेसिपीज आहेत. पहिली तर बाकरवडी वाटते आहे.
पण दुसरी फारच tempting आहे. ही आणि खान्देशी मासवडी (नावात मास, पण प्रत्यक्षात शुद्ध शाकाहारी) सारख्याच वाटतात. पुण्यात एका सावजी फेमस restaurant ( वाह मराठी) मधे खाल्ली होती.
बेफिजी, स्वाती, अस्मिता,
बेफिजी, स्वाती, अस्मिता, mazeman, ऋतुराज आणि मीरा खूप धन्यवाद. बेफीजी नाही खाल्ली कधी ही भाजी. Mazeman भाकरी आणि शेपू असतोच पण पाट वडी बद्दल माहीत नाही. अस्मिता करून बघणे आणि सांगणे. ऋतुराज ओके करून बघेन पण त्याला binding ला काय घालावे लागते? मीरा मासवडी मला पाटवडी हून जास्त आवडते, पण घरी येत नाही कोणालाच. त्याचा बाकर जरासा ओलसर असतो बहुदा कांद्यामुळे पण बरीचशी पाटवडी टाईपच.