फ्लावर बटाटा मटार रस्सा

Submitted by अश्विनीमामी on 3 September, 2023 - 10:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लावरचे तुरे, एक मध्यम आकाराचा बटाटा, मटार प्रत्येकी एक एक वाटी, एक मध्यम कांदा दोन तिखट डार्क हिरव्या मिरच्या. असल्यास दोन चमचे खवलेले ताजे खोबरे, एक छोटा टोमाटो. ताजी कोथिंबीर बारीक कापून, आले लसूण पेस्ट एक चमचा.
धणे- जिरे भाजून केलेली पावड र एक मोठा चमचा, फोडणीचे साहि त्य, मीठ चवीनुसार.

तेल किंवा तूप फोडणी पुरते.

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम कांदा कापून घ्यावा, हिरवी मिरची अर्धी अर्धी करुन घ्यावी. कांदा हिरवी मिरची थोडी कोथिंबीर, असल्यास ओले खोबरे हे सर्व मिक्सर मधून वाटून घ्यावे. फ्लावर व बटाटा मध्यम आकाराचे तुकडे करुन पाण्यात ठेवावेत. मी बटाट्याची साले काढली नाहीत. फ्रोझन मटार घेतलेले ते अर्धा तास आधी फ्रिज मधूनकाढून डिफ्रॉस्ट केले.

कढईत तेल गरम करून त्यात कांद्याचे वाटण घालावे व परतून घ्यावे, मग आले लसूण पेस्ट, थोडीशी हळद व धणे-जिरे पावडर घालून परतावे. लगेच बटाटे फ्लावर मटार घालून परतावे. दोन मिनिटानी टोमाटो चिरलेला घालावा. आता वाटण सर्व भाजीला लागे परेन्त मंद आचेवर परतावे.

कांदा वाटण केलेले मिक्सरचे भांडे असते त्यात पाणी घालून रश्श्यात घालावे व शिजे परेन्त मंद आचेवर ठेवुन द्यावे. चवी पुरते मीठ घालावे.

गरम पोळी किंवा पावाबरोबर मस्त लागतो रस्सा. बरोबर जिरा राइस सुद्धा छान लागतो.

वाढणी/प्रमाण: 
दोन लोकांना व्यवस्थित पोरेसे होईल.
अधिक टिपा: 

फ्लावर मटार बटाटा रस्सा, गरम आयत्या वेळी तळलेली पुरी, टोमाटो सार, जिरा राइस, मटकी उसळ खोबर्‍याची चटणी, केळ्याची किंवा डाळिंबाची कोशिंबीर, गोडाला आम्रखंड, गुलाब जामुन हा छान बेत होतो.
रस्सा व पाव आणि तवा पुलाव पण मस्त मेन्यु शॉर्ट कट मध्ये. बरोबर कोथिंबीर वडी.

माहितीचा स्रोत: 
मी हा मनानेच केला, नेहमी केलेला आहे. पण अनेक व्हर्जन्स उपलब्ध आहेत यु ट्युब वर. घरगुती साधा प्रकार आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाककृती आहे. मला आवडते ही भाजी.
एकदा कच्चा कांदा वाटून फोडणीत टाकल्यावर जाम कडवट चव आली होती. तेव्हापासून बा.चिरलेला कांदा तेलात परतते मग बाकिचे जिन्नस घालते. उकडलेला बटाटा असेल तर फ्लॅावर शिजत आल्यावर वरून त्यात घातला तरी छान भाजी होते.

खोबरे नको शक्यतो...त्याची चव ओव्हर पॉवर होता कामा नये.
मंगल कार्यालयातील भाजी छान लागते..मोठ्या टोमॅटो च्या फोडी असलेली

मस्तच आहे रेसिपी. एकदम टिपीकल ‘ब्याड वर्ड‘ टाईप.
माझ्याकडे पण एक मस्त फ्लॉवर बटाट्याची आवडती रेसिपी आहे. टाकतेच थांबा.

छान. हिंदुस्तान बेकरीच्या स्लाइस ब्रेड बरोबर रविवार सकाळचा ब्रेफा म्हणून करता येईल. ह्याचे पुणेरी व्हर्जन म्हणजे भाज्या आणि गोडा मसाला, दोन मोठे चमचे ओले खोबरे आणि चिंच गूळ कोळ Happy

सुंदर!!!
लंपन गोड्या मसाल्याने तर बहारच येते.

माझ्याकडे आहे गोडा मसाला, खामकर. पण तो जरा हाय झाला आहे. वेग ळा वास लागला तर सगळे टाकूनच द्यायला लागेल. म्हणून नाही घातला. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला पण आहे. त्याने झणझणीत होईल.

मस्त - माझी रेसिपी साधारण अशीच, पण वाटण करत नाही - सगळं क्रमाने फोडणीत परतून घेते.
गोडा मसाला, दाण्याचं कूट आणि मुख्य म्हणजे काहीतरी आंबट (सहसा आगळ) आणि गुळाचा खडा मला आवडतो यात. गोग्गोड नाही करायचा रस्सा, पण चवीला एक... गोलाई येते त्याने. Happy

मला पाण्यात शिजवलेला फ्लावर आवडत नाही * त्यामुळे मी सगळे घटक साधारण हेच पण कोरडी भाजी करते. वाटण करत नाही, बारीक चिरून घालते सगळे जिन्नस. माझी एक चुलतबहीण बडि इलायची आणि आपल्याकडे मिळते ती तिखट दालचिनी घालते, फार मस्त स्वाद येतो.

* माझ्या आईची एक रस्सा रेसिपी आहे, ती मात्र अपवाद.

काही टिप्स
१फ्लॉवर वास नसलेला हवा.
२.तसेच छोटा कांदा फोर्क टोचून गॅस वर थोडा भाजून घ्यावा, नंतर चिरून वापरावा .मस्त खरपूस टेस्ट येते.

काल या पद्धतीने केली भाजी. कच्चा कांदा वाटणात घालायची हिम्मत झाली नाही , म्हणून कांदा बारीक चिरुन परतून घेतला. घरचे मटार फ्रीझ केलेले होते. ते वापरले .घटक पदार्थात फोडणीचे साहित्य लिहिले आहे पण कृती मधे मोहरी, हिंग , कढीपत्ता इ दिसले नाही त्यामुळे तेलात कांदा परतला आणि मग वाटण घालून परतले. मस्त झालेली भाजी. नाकार्ड्या मंडळींनी बटाटे आणि रस्सा घेतला पण त्यांना देखील चव आवडली