नारळी भात (सीकेपी पद्धत)

Submitted by अवल on 27 August, 2023 - 22:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक पूर्ण खोवलेला नारळ.
दोन वाट्या तांदूळ, शक्यतो बासमती तुकडा किंवा सुरती कोलम.
तूप 4 चमचे
किसलेला गूळ दोन वाट्या ( फार गोड हवा असेल तर प्रमाण वाढवा).
लवंगा 2-4.
जायफळ किसून अर्धा चमचा.
सात आठ भिजवून सोलून तुकडे केलेले बदाम.

क्रमवार पाककृती: 

आधीच सांगते, हा जरा कष्ट घेऊन करायचा पदार्थ आहे, पण चव इतकी अफलातून लागते की कष्ट कारणी लागतात Happy
ज्यांना स्वयंपाकाची खरच आवड आहे त्यांनी जरूर करून पहा.

तांदुळ धुवून निथळत ठेवायचे.

नारळ खवणून मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून वाटून घ्यायचा. मग त्यातलं दूध पिळून काढायचं. हे जाड दूध.
मग पुन्हा चोथ्यात एक वाटी पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं. मग पिळून दूध काढायचं. हे दुसरं दूध पांतळ दूध. दोन्ही दुधं स्वतंत्र ठेवा. अन चोथा बाजुला ठेवायचा. हा चोथा भातासाठी वापरणार नाही आहोत. त्याचा उपयोग शेवटी सांगते.

आता तुपावर 2-4 लवंगा टाकायच्या. गॅस बारीक ठेवा. त्यात बदामाचे काप घाला. बदामाचा खमंग वास आला की त्यात तांदूळ टाकायचे. छान लालसर परतून घ्यायचे. मंदाग्निवर.

आता त्यात नारळाचे पांतळ दूध टाकायचे. आणि गॅस मोठा करून छान रटरटू द्यायचं. आता गॅस बारीक करून जाड दूध टाकायचं, वर दोन वाट्या पाणी घालायचं. छान उकळी आली की, झाकण ठेऊन भात बोटमोड्या शिजवून घ्यायचा. (पाण्याचे प्रमाण तांदुळ कोणता आणि तुम्हाला कसा भात आवडतो त्यानुरुप कमी जास्त करा. पण भात अगदी नीट शिजल्याशिवाय पुढे जाऊ नका)

भात पूर्ण शिजला की,भांड्या खाली तवा ठेवा, गॅस बारीकच असू द्या. तांदळाच्या समप्रमाणात किसलेला गूळ टाकायचा, जायफळ किसून घालायचं. आणि उलथण्याच्या उलट्या बाजुने हलकेच हलवायचा. जसजसा गूळ वितळत जाईल तसतसे हे हलवणं सोपं जाईल. गूळ सगळीकडे मिसळला की पुन्हा झाकण घालून एक वाफ येऊ देत.

तयार आहे नारळी भात. यात नारळाचा चोथा नसल्याने हा भात अतिशय सुरमट होतो. दुसऱ्या दिवशी तर हा नारळीभात अफलातून लागतो Happy

नारळाचा जो चोथा उरेल तो चेहरा धुताना स्क्रबर म्हणून वापरायचा. किंवा थोड्या पाण्यात वाटून केसांना लावायचा, 15 मिनिटांनी केस धुवायचे. चेहरा नितळ, केस चमकदार होतात.

या, ताट वाढलय Happy
IMG_20230830_132429.jpg

मूद फोडल्या नंतर
IMG_20230830_133644.jpg

वाढणी/प्रमाण: 
सहा ते आठ सर्व्हिंगज
अधिक टिपा: 

नारळाचे दूधच वापरायचे, ओलं खोबरं नाही.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतेय कृती .

सुरमट शब्दाचा अर्थ काय होतो? सूरमई सारखी चव का ? (श्रावणाचेसाईड इफेक्ट्स Lol )

मस्त आहे रेसिपी.

आता त्यात नारळाचे पांतळ दूध टाकायचे. आणि गॅस मोठा करून छान रटरटू द्यायचं.
>>>> २ किलो तांदुळ एवढ्याशा पातळ दुधात रटरटू देता येतील का?

अवल, पाकृ वाचाताना तो आठवणीतला स्वाद जीभेवर आला.
अवल सांगेलच पण माझ्यासाठी सुरमट म्हणजे एक प्रकारचा खमंग असा दरवळ! त्यात नारळाच्या दूधामुळे थोडी गोडसर छटा असते.

अवल जी मस्त रेसिपी.. तो मसूर भात तर फारच आवडतो माझ्या घरी आणि मित्र परिवारात. हा मी करतो आणि फोटो टाकतो Proud

अवल,माझ्याही घरी ना दू वापरूनच नारळीभात केला जातो.मात्र खोबरे जरा कमी घेते.भाताचा पोत मस्त येतो. खोबरं जास्त घ्यायला जीवावर येते.कारण आमचा स्वयंपाक ओले खोबरे वापरूनच होतो.

सुरमट म्हणजे काय हे कळायला हा नाभा करा अन खा Biggrin
जोक्स अपार्ट नारळी दुधाचा जो एक मधुर, बटरी, क्रिमी स्वाद - टेक्श्चर असते ते.
स्वाती, यस बरोबर सांगितलस : )

ठिके हो Happy
पण दोन किलोचा केला तर खरच माबोकरांना बोलवावं लागेल Wink

रेसिपी मस्त आणि सीकेपी स्पेशल, कष्टाची आहे पण मला नारळाचा क्रंच आवडतो नुसत्या दुधापेक्षा. असो. प्रत्येकाची आवड.

माझ्या पूर्वीच्या मदतनीस ताईने,दुसरीकडे ना भा करताना नारळाचे वाटण करून कुकरमध्ये घातले होते.म्हणजे चोथा बाजूला काढला नाही.मस्त झाले म्हणाली.

अवलताई, भारी एकदम.

सिकेपी लोकं कष्टाळू, निगुतीने करणारे. लहानपण जिथे गेलं तिथे दोन सीकेपी शेजारी असल्याने आणि नंतर माझ्या एका चुलत बहीणीने सीकेपीत लग्न केल्याने जवळून बघितलं आहे. विशेषतः मला मुगाचं बिरडं व्हायचं शेजारी ते सबनीस काकू सोलताना बघायला आवडायचं, थोडी मदतही करायचे त्यांना पण किती मेहनत हेही वाटायचं. अजून एक निनावं भारी असायचं आणि कानवले, त्यासाठी चाळीतले आम्ही मदतही करायचो, एक दोनदा आईनेही थोडे कानवले केलेले. बाकी शाकाहारी असल्याने फक्त तेवढंच माहीतेय, इतर स्पेशल ऐकून माहीतेय.

आई कोकणस्थ ब्राह्मण आणि सासूबाई सोनार असल्याने, सीकेपी असूनही त्या पदार्थांची विशेष ओळख नाही. सासूबाई वालाचं व मुगाचं बिरडं छान करत मात्र.

धन्यवाद सर्वांना
अंजू, सामो, देवकी छान आठवणी
शेवळं आहा, ती मुख्यत: ठाण्यातच मिळतात. माझी मावशी फार छान करत असे ती भाजी Happy कधी खिमा, कधी कोळंबी घालून, आहाहा

मुगाचं बिरडं व्हायचं शेजारी ते सबनीस काकू सोलताना बघायला आवडायचं, >>>>माझी आई सोलायची एकन एक दाना मान मोडेपर्यंत..... कधी मी बनवते किंवा उल्लेख जरी आला तर तिची ती वाल / मूग सोलतानाची मूर्ती डोळ्यासमोर तरळते. तिच्या हातच्या बिरड्याची मग वाल असो कि मूग अजूनही आठवते . उगीच नाही आई / सासू , मावशी / काकवा यांच्या हाताला चव असते कारण त्या जे काही करत त्या मन लावून व मान मोडून करत म्हणून .

मस्त रेसिपी! Happy
बरं झालं लिहिलीस. पारंपरिक सीकेपी रेसिपीचं डॉक्युमेन्टेशन झालं त्यानिमित्ताने. Happy

वेगळं काय आहे असं मनात आलं होतं पण नारळाचं दूध वाचल्यावर काय वेगळं ते आलं लक्षात. मस्त आहे रेसिपी. कधी करायची हे बघावं लागेल.

>>>> बरं झालं लिहिलीत. पारंपरिक सीकेपी रेसिपीचं डॉक्युमेन्टेशन झालं त्यानिमित्ताने. Happy

+१ Happy

धन्यवाद.
याला थोडं सोपं करता येईल, बाजारात मिळणारं नारळदूध वापरून. पण त्याची चव कशी आहे पहावं लागेल.

Pages