सिंधी कोकी

Submitted by लंपन on 27 August, 2023 - 12:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन वाटी गव्हाचे पिठ
मिरची आणि जिरे पेस्ट चवीनुसार
तूप ५ ते ६ (पोहा) चमचे
भरड केलेली धणे पूड
कोथींबीर बारीक चिरून
एक कांदा बारीक चिरून
कांदा पात बारीक चिरलेली
गाजर किसून - १ बारीक
मीठ चवीनुसार
पाणी आणि तेल कणीक मळायला.

क्रमवार पाककृती: 

प्रथम गव्हाच्या पीठात चवीनुसार मीठ घालायचं. त्यात तूप घालून ते पिठाला चांगलं दहा मिनिट लावून घ्यायचं. आता त्यात उर्वरित जिन्नस घालून आणि पाणी घालून कणीक मळून घ्यायची. पंधरा वीस मिनिटं कणीक मुरू द्यायची.

IMG20230826175649~2.jpg

आता ह्या कणकेचे जाडसर पराठे लाटायचे. आणि मंद आचेवर तेल लावून शेकून घ्यायचे. हे मंद आचेवरच करायचे आहे. मस्त खुसखुशीत लागतात. दोन तीन दिवस तरी आरामात टिकतात.

अधिक टिपा: 

मूळ पाकृ सिंधी आहे ज्यात फक्त कांदा घालतात. इतर भाज्या घालत नाहीत. पण भाज्या घालून पण मस्त खुसखुशीत झाली आहे. तूप व्यवस्थित घालायचं आहे खुसखुशीत होण्याकरता.

माहितीचा स्रोत: 
सिंधी कलिग् आणि विष्णू मनोहर चॅनेल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

My fav !

छान दिसतेय कोकी

मी एकदा कुठे तरी अशीच बघून केली होती, मी फक्त कांदाच घातला होता. कोकीची लाटी थोडी लाटून तव्यावर जरा शेकून घेतली आणि मग पुन्हा पोळपाटावर नॉर्मल लाटून तव्यावर शेकली. मला आवडला होता कोकी हा प्रकार.

मस्तच.

मला अतिपूर्वी (25 वर्ष झाली असतील) कोणीतरी कोकी म्हणजे कांदा घालून केलेलं कणकेचे थालीपीठ असं सांगितलं, त्यामुळे मी थापून करते.

हे भलतंच आवडलं आहे, करून बघणार. कृती धपाट्याच्या जवळ जाते आहे, फक्त ज्वारीचं पीठ नाही यात. थोडा ओवा व तीळ घालून करून बघेन. तुपाऐवजी दही घातलं तरी ठिसूळ होतील असं वाटतंय. मी पराठे बरेचदा दह्यात तिंबते.

सुरेख!
पीठ भिजवतांना फॅट घातलं की पदार्थ खुसखुशीत होतो आणि वरून फॅट असेल तर कुरकुरीत...

अनिंद्य , सायो, ममोजी, अंजू ताई, मंजूताई, भरतजी, मनिम्याऊ, सामो, झकोबा , योकू, अस्मिता धन्यवाद.

अस्मिता दही घातलं तर मऊ होणार पदार्थ. खस्ता हवं असेल तर तूप आवश्यक आहे. भरतजी ही ट्राय करा, खूपच सोपी आहे आणि नक्कीच जमेल. योकु +११..अंजूताई थाप्णार म्हणजे पाणी लागत असेल आणि जास्त व्यापपण. जाडसर लाटायच म्हणजे पुरी पेक्षा अगदीच किंचित जाड आणि मंद शेकायच. नक्कीच खस्ता होणार.

पीठ भिजवतांना फॅट घातलं की पदार्थ खुसखुशीत होतो आणि वरून फॅट असेल तर कुरकुरीत.......

रणवीर ब्रार बरेचदा हे बोलतो.

धन्यवाद mru, देवकी, सोनाली, जाई आणि सुनिधी. नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे आणि चविष्ट. रविवारी संध्याकाळी केली तर सोमवारी डब्यात नेता येईल. सकाळी वेळखाऊ आहे जरा.

सिंधी कोकी २ दा केली. एका वेळी कांदाच घालायला, विसरले. त्यामुळे कणकेला, पाणी सुटले नाही. व थेपल्यासारखी पातळ लाटता आली.
दुसर्‍या वेळेला कांदा घातला. त्यामुळे पाणी सुटले व जाडसरच लाटावी लागली.

कांद्यामुळे खमंग होते पण कणकेला, पाणी सुटणे हा ड्रॉबॅक व खमंग होणे हा प्लस पॉइन्ट - यात आपल्याला काय हवे ते आपण ठरवायचे.
बाकी खूपशी थालिपीठासारखीच आहे. भाजणीऐवजी गव्हाचे पीठ. भाज्या पोटात जातात हा फायदा. चव झकास.

काल करून पाहिली, सुरेख जमली. नेहेमीचे जिन्नस असूनही हा प्रकार कधी केल्या जात नाही. पटकन भाजणीचं पीठ घेउन थालीपीठंच घडतात. यापुढे ठरवून हा प्रकार अ‍ॅडायला हवा...

पुकट सल्ला - थालीपीठं नेहेमीची आणि उपवासाची, घावनं, आंबोळ्या, धीरडी प्रकारांत (रादर असे प्रकार जे तव्यावरून सोडवायला आयमाय काढायची वेळ येते) पीठ भिजवतांना कधीही दही वापरू नये. मी दोन्ही प्रकारे करून पहिलेत अन दही न घातलेले लवकर होतांत, चटकन सुटतात तव्यावरून हे समजलं तेव्हापासून पीठात मी कधीही दही घालत नाही.

रच्याकने, मूळ सिंधी कृतीत कणकेचे लहान उंडे वड्यासारखे जरा चपटे करून ते अर्धवट शेकतात आणि मग पूर्ण लाटून तेल/तूप घालून पूर्ण शेकतात ना?

मी ही रेसिपी यायच्या आधी माझ्याकडच्या पुस्तकातील कृतीने कोकी करून पाहिली होती. तेव्हा छान झाली होती.
आता ही कृती समोर ठेवून केली, तेव्हा फक्त कांदा घातला. पण माझ्या कोकी जाड झाल्या नाहीत. पराठेच झाले. पुन्हा करताना कांदा + गाजर किसून घालेन.

मूळ सिंधी कृतीत कणकेचे लहान उंडे वड्यासारखे जरा चपटे करून ते अर्धवट शेकतात आणि मग पूर्ण लाटून तेल/तूप घालून पूर्ण शेकतात ना?>> हो योकू , मी दोन्ही प्रकारे करून बघितल आहे, चवीत ट्रीमेंड्स फरक पडतो , थोडा जास्त व्याप होतो तरी, कोकि आवडणाऱ्यानी एकदा अशी डबल शेकून करून बघा वेळ असेल तेव्हा.

हाय रे कर्मा... भरतजी पुणे मुंबै गटग झालं आणि आपण दोघेही जाणार असू तर एक मोठा डबा खाऊ खास तुम्हाला देईन Proud योकु, ममोजी धन्यवाद. मी पण करून बघेन ह्या पद्धतीने. ते लोक शेक्तना लाकडी masher वापरतात ह्यासाठी असे ऐकले कलिगकडून.