आधीचे भाग
भाग १
https://www.maayboli.com/node/83441
भाग २
https://www.maayboli.com/node/83453
निघायच्या दिवशी सकाळी कॉफी इस्टेटमध्ये एक चक्कर मारली. कॉफीव्यतिरिक्त त्या बागेत फणस, आंबे, सुपारी, त्यावर चढवलेले मिरीचे वेल होते. मला आमच्या गावाला (कॉफी वगळता) हे सगळं बघण्याची सवय आहे. मात्र एक फरक म्हणजे इथे ही निव्वळ एक ’इस्टेट’, उत्पन्नाचं साधन आहे असं वाटतं. चूक-बरोबर असा मुद्दा नाही, पण फरक जाणवतो, एवढं खरं. असो!
आज नाश्त्याला चविष्ट नीर दोसे आणि चटणी होती. कॉफी पिऊन कापी काडुचा निरोप घेतला. इथून अप्पे मिडि लोणच्याची बाटली आणि राणी झरी कॉफी शॉपमधून इथल्या स्थानिक कॉफी आणि चहाची एकेक पाकिटं विकत घेतली होती. हा शांत, निवांत परिसर खूपच आवडला होता. खूप पक्षीही दिसले होते. परत अशीच एक ट्रिप काढून तेव्हा कुद्रेमुखला ट्रेकिंग करण्याचा बेत मनात आखत आम्ही हळेबिडूला जाण्यासाठी निघालो. बेलूरपर्यंतचा रस्ता आता ओळखीचा होता. दुपारी बारा-साडेबाराला हळेबिडूला पोचलो.
हळेबिडू किंवा हळेबीड ही होयसळांच्या काळातली राजधानी. तिथल्या होयसळेश्वर मंदिरापाशी आम्ही पोचलो. याला ’द्वारसमुद्र’ असंही म्हटलं जात असे. मंदिराच्या बाहेर एक मोठा तलाव आहे, त्यावरून हे नाव पडलं आहे. बाराव्या शतकात बांधलेलं हे शंकराचं मंदिर आहे. अशी एक कथा सांगितली जाते की सळा नावाचा एक मुलगा गुरुकुलात शिकत होता. त्या गुरूंच्या आश्रमात एका वाघाने हल्ला केला. वाघाला पाहताच बाकी सगळी मुलं पळून गेली, पण सळा मात्र शूर होता. वाघ आपल्या गुरूंना मारून टाकणार हे पाहताच त्याने वाघावर हल्ला केला आणि वाघाला मारलं. तो वाघाशी लढत असताना त्याचे गुरू ’होय सळा’ असं ओरडून त्याला प्रोत्साहन देत होते. याच मुलाने पुढे साम्राज्य स्थापन केलं, त्याचं नाव होयसळा. वाघाशी लढाई करणारा लहान मुलगा हे होयसळांचं राजचिन्ह बनलं. हे राजचिन्ह आणि इतरही कित्येक सुंदर शिल्पांनी नटलेलं हे मंदिर आहे. मुसलमानी आक्रमणांमुळे अनेक शिल्पं भंगलेली आहेत, पण अनेक शिल्पं टिकूनही आहेत.
तिथे आम्ही एका गाईडला सोबत घेतलं. त्यांनी चांगली माहिती सांगितली. पण अशा ठिकाणची शिल्पं नीट समजून घेऊन बघायची म्हटली तर दोन-तीन दिवस तरी हाताशी हवेत. यावरून आठवलं, काही दिवसांपूर्वी पुण्यात एका कार्यक्रमात श्री. प्र. के. घाणेकरांनी प्रसिद्ध मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्याबरोबर वेरुळचं कैलास लेणं पाहिल्याची आठवण सांगितली. जवळजवळ सातआठ तास डॉ. देगलूरकर कैलास लेणं दाखवत होते. शेवटी जेवणाची वेळ उलटून चालली म्हणून थांबावं लागलं, तोपर्यंत कैलास लेणं फक्त एक तृतीयांशच बघून झालेलं होतं! कोणार्कचं सूर्यमंदिर, हंपी अशा ठिकाणची विपुल शिल्पं बघताना जसं वाटलं होतं, तसंच इथेही वाटलं, की इथे वेळ काढून परत परत आलं पाहिजे.
या मंदिराचे दोन भाग आहेत. इथे दोन शिवलिंगं आहेत, होयसळेश्वर आणि शांतलेश्वर अशी. होयसळेश्वर हे राजासाठी आणि शांतलेश्वर हे राणीसाठी. या दोन शिवलिंगांसमोर मंदिराबाहेर दोन मोठे मोठे स्वतंत्र नंदीही आहेत. भारतात जे सर्वात मोठे नंदी आहेत, त्यात हे दोन्ही नंदी सातव्या-आठव्या क्रमांकांवर आहेत. म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवरचा नंदी आणि बंगळूरच्या बसवनगुडीच्या मंदिरातला नंदी हे दोन महाकाय नंदी यापूर्वी बघितले होतेच. हळेबिडूचे हे दोन्ही नंदीही सुंदर, सौष्ठवपूर्ण आहेत.
नंदी
दोन्ही नंदींवर असलेलं कोरीव काम वेगवेगळं आहे.
’सोपस्टोन’ प्रकारच्या दगडाचा वापर करून हे मंदिर आणि त्यातली सगळी शिल्पं कोरलेली आहेत. हा दगड आधी जरा मऊसर असतो, ज्यामुळे त्यावर कोरीव काम करणं सोपं जातं. जसजसा हवेशी संपर्क येतो, तसतसा तो कडक होत जातो.
ब्रह्मा-महेश- विष्णू. ( हे शिवमंदिर असल्यामुळे महेश मध्यभागी )
द्रोणाचार्यांनी रचलेला चक्रव्यूह.
मंदिरातली आणि बाहेरची शिल्पं बघता बघता कसा वेळ गेला ते समजलंच नाही. कोरीव कामातलं ’डिटेलिंग’ खूपच सुंदर आहे. विविध देवता, प्राणी, रामायण-महाभारतातल्या कथा अशी कित्येक शिल्पं इथे आहेत.
( अशा ठिकाणी स्वतःची नावं कोरून ठेवून भारतीय शिल्पकलेबद्दलचा आणि इतिहासाबद्दलचा आपला जाज्ज्वल्य अभिमान सिद्ध करण्याच्या अखिल भारतीय परंपरेचं पालन इथेही केलेलं दिसतं!)
ऊन खूप तापलं होतं, भूकही लागली होती. शिवाय संध्याकाळपर्यंत बंगळूरला पोचायचं होतं. त्यामुळे तिथलं संग्रहालय बघण्याचा बेत रद्द केला आणि जेवणासाठी चांगलं ठिकाण शोधू लागलो. हळेबिडूच्या बाहेर ’इतिहाकला’ नावाचं रेस्टॉरंट गूगलने सुचवलं, तिथे जेवायला गेलो. जेवण खरोखरच छान होतं. जेवून जे निघालो, ते थेट बंगळूरला गेल्यावरच गाडीतून उतरलो! तीन दिवसांची छोटीशी पण मस्त ट्रिप संपली!
छान लिहिलं आहेस वावे , मस्त
छान लिहिलं आहेस वावे , मस्त झालीय मालिका .
छान लिहिले आहे थोडक्यात गोडी?
छान लिहिले आहे
थोडक्यात गोडी?
उत्तम. या ठिकाणी २-३ वेळा
उत्तम. या ठिकाणी २-३ वेळा गेलो आहे. दर वेळी काहीनाकाही नवीन माहिती कळते. इथे इतकी जास्त शिल्पं आणि त्यांचं डीटेलिंग आहे की एक भेट पुरत नाही. विष्णू मंदिरात बाहेर हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याची पूर्ण अन्ननलिका काढून हातात धरलेला उग्र नरसिंह, त्याची नखं हिरण्यकश्यपूच्या मांडीत रुतून आरपार जाऊन पलीकडून बाहेर आली आहेत - ह्या लेव्हलचं डीटेलिंग. किंवा कृष्णाने जो गोवर्धन उचलला आहे, त्यावर वरती झाडं, त्यावर माकड, आजूबाजूला साप, हरण, इतर प्राणी - काहीच्या काही कोरलं आहे. शिव मंदिरात एका शंकराच्या शिल्पाच्या डोक्यावर साखळीला लोंबकळत असलेली घंटा आहे - सगळं दगडी. साखळी पण एका दगडातून कोरली आहे आणि तिची एक एक लिंक एकात एक अडकली आहे आणि ती हलते. पायाने ताल धरणाऱ्या एका नर्तकीच्या पायाचा अंगठा इतक्या नजाकतीने वरती उचलला गेलेला दाखवला आहे की असं वाटतं की पुढच्या ठेक्याला ही हलेल. ह्या मंदिरांवर आक्रमणं झाली तेव्हा ही शिल्पं फोडणारे लोक फोडून फोडून दमले असं म्हणतात.
हरचंद पालव, हो, नरसिंहाची नखं
हरचंद पालव, हो, नरसिंहाची नखं याच मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या शिल्पात आहेत. गोवर्धनही बघितला. नर्तकीचा उचललेला अंगठाही! खूप खूप बारकावे असलेली शिल्पं आहेत सगळी. वर मी दिलेल्या फोटोतल्या शंकराच्या एका हातात मक्याच्या कणसासारखं कणीस आहे. त्याबद्दल काही तरी कुठे तरी वाचलं होतं. काय, कुठे ते अजिबात आठवत नाही मका भारतात कधी आला याबद्दल ते होतं.
हर्पेन हो. मनीमोहोर, धन्यवाद
मस्त... आठवणी ताज्या झाल्या..
मस्त... आठवणी ताज्या झाल्या...दगडाचे वैशिष्ट्य माहित नव्हते..मका मलाही आठवत नाही...
हपा तुमचा प्रतिसाद ही खूप रोचक..
चक्रव्यु। काय सुंदर आहे आणि
चक्रव्युह काय सुंदर आहे आणि जी व्यक्ती तिमध्ये सापडेल तिला किती भयाण असेल. कारण नव्या ताज्या दमाचे योद्धे सतत पुढे येत रहाणार. थकून जाईल ना आत सापडलेला. परत बाहेर पळायला वाटच नाही.
छान झाली भटकंती. हा भाग थोडा
छान झाली भटकंती. हा भाग थोडा घाईत आटोपलात
... शंकराच्या एका हातात मक्याच्या कणसासारखं कणीस आहे....
ते बहुदा 'बीजापूरक' असावे - म्हाळुंग. अनेक बिया असलेले एक देशज फळ. कोल्हापूरला अंबाबाईच्या मूर्तीच्या एका हातात आहे.
मका / डाळिंब ही भारतात उशिरा आली. सीताफळ, रामफळ मात्र आद्य, देशज. असो. अवांतर झाले
इकडे रेंगाळायचं तर सात दिवस
इकडे रेंगाळायचं तर सात दिवस हवेत इतक्या जागा आहेत. देवळं, शिल्पं, तलाव, बाजार, कापी मळे,बुधनगिरीवरची शिखरे, ट्रेकिंग,धबधबे.
चिकमगळुरवरून जावागल रोडने 'बेलवडी ' देऊळ - जावागल मार्गावर हळेबिडू फाटा्याने हळेबिडू आणि तिथूनच पुढे बेंगळुरू.
चांगली झटपट छोटी भटकंती झाली. मालिका आवडली.
तीनही भाग वाचले आवडले.
तीनही भाग वाचले आवडले.
तुम्ही काढलेले पक्ष्याचे फोटो पाहणे आनंददायी असते.
त्यामुळे दुसरा भाग विशेष आवडला
बहुतेक तुम्ही आम्ही एकाच
बहुतेक तुम्ही आम्ही एकाच वेळेस मंदिरात असणार.. दोन्ही मंदिरं बेहद्द आवडली. नाचणार्या नर्तकी चे हावभाव, वस्तु हातात पकडताना वळलेली बोट. आणी एकंदरच कोरीवकाम फार ऊत्तम आहे.
ईतिकला च्या जेवणाविषयी पण तंतोतंत.. साध सोप रुचकर जेवण जेऊन अगदीच मजा आली. मुलीने पुलिओगराय पुन्हा पुन्हा मागून घेतला
नंतर तिथे एक वासरू होत त्याच्याजवळ मुलगी बराच वेळ रेंगाळली.
फोटो साईझ काय असायला हवा. मी
फोटो साईझ काय असायला हवा. मी पण एक दोन फोटो अपलोड करेन.
बाकी नाव कोरण्याबाबत सहमत. नंदीच्या चेहेऱ्यावर खालच्या बाजुला पण ऊर्दू अक्षर कोरलेली आहेत.. गाईड ने दाखवली.
प्राजक्ता, आम्ही सात तारखेला
प्राजक्ता, आम्ही सात तारखेला गेलो होतो हळेबीडला. तुम्ही कधी?
हो ते वासरू आवडलं आम्हाला पण
प्रतिसादांसाठी सगळ्यांना धन्यवाद
छोटा झालाय खरा हा भाग. पण सध्या जेवढा वेळ मिळाला तेवढ्यात लिहिला.
अनिंद्य, आधी हा मका नाही असंच मत होतं. पण नंतर ते खोडलं गेलं बहुतेक.
अरे आम्ही बरोब्बर एक
अरे आम्ही बरोब्बर एक आठवड्यानंतर तिथे होतो 14 मे...
प्राजक्ता, फोटो २ एमबीपेक्षा
प्राजक्ता, फोटो २ एमबीपेक्षा कमी असायला हवा. साईज जास्त असेल तर कुणाला तरी (किंवा स्वतःला) व्हॉट्सapp वर पाठवायचा. साईज कमी होते
सफर वर्णन आवडले. जून - जुलै
सफर वर्णन आवडले. जून - जुलै मध्ये ह्या आणि किनारी कर्नाटक भागात पाऊस खूप असतो का?
निर्देश, धन्यवाद. हो, जून
निर्देश, धन्यवाद. हो, जून-जुलैमध्ये पाऊस असणारच भरपूर.
इथे जायला चांगला काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्च. आमच्या सुदैवाने आम्ही गेलो तेव्हा ढगाळ वातावरण होतं. नाही तर राणी झरीला वगैरे खूप ऊन लागलं असतं भर दुपारचं.
म्हाळुंग म्हणजे मातुर्लिंग.
म्हाळुंग म्हणजे मातुर्लिंग. मातेच्या ovary चे प्रतीक
हा ही भाग सुंदर. छान झाली
हा ही भाग सुंदर. छान झाली ट्रिप.
छान लिहिले आहे . पुढच्या
छान लिहिले आहे . पुढच्या ट्रीप साठी वाचनखूण साठवते आहे .
हा ही भाग मस्त. शिल्पे, नंदी
हा ही भाग मस्त. शिल्पे, नंदी किती गोड आहेत. चक्रव्युह पण जबरदस्त. मी आंकोर वट पूर्ण परिसर असाच एका ज्ञानी गाइड बरोबर बघित ले आहे. शिल्पे समजतात. आंकोरची पहिली चार भिंतीच फार लांब आहेत. व शिल्पे पण function at() { [native code] }इ बारकाईने कोरलेली आहेत. ते झाले की ब्रेक मग चढाई व मंदिराचे मजले.
गंगाधर गाडगीळ ह्यांचे गोपुरांच्या प्रदेशात नावाचे पुस्तक आहे. त्यात कर्नाटक च्या अनेक ठिकाणांचा उल्लेख आहे. अगदी कोलार गोल्ड फील्ड चा देखील. जुने पण छान पुस्तक आहे. साउथ इंडिआ रिअली रॉक्स.