बचत आजची, स्माईल उद्याची..

Submitted by सोनपर्ण रेखाटताना on 10 March, 2023 - 22:21

'बचत' एखाद्या व्यक्तीस किंवा कुटुंबास आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यास मदत करते. लोकांमध्ये बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. यात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वाटा उचललाय भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिस ने. वर्षानुवर्षे शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहात आणण्याची आणि पुढेे नेण्याची कास पोस्ट ऑफिस ने कधीही सोडली नाही. पोस्ट ऑफिस म्हणजे तळागाळातल्या लोकांना आपल्याा हक्काचं दळणवळणाचं आणि बचत करण्याचे साधन. याच बचत करण्याच्या हेतूने पोस्ट ऑफिस नेहमी बचत योजना चालवत असतात. अशाच डाकघर बचत योजनांचा थोडक्याात तपशील खाली दिला आहे.

1) बचत खाते (SB - Savings Account) : रु. 500/- डिपॉझिट ठेवून आपण पोस्ट ऑफिसचे सेविंग अकाउंट उघडू शकतो. यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन -
i) a) सेविंग अकाउंट चा फॉर्म भरून देणे
b) KYC फाॅर्म भरून देणे
ii) आधार कार्ड चे झेरॉक्स
iii) पॅन कार्ड चे झेरॉक्स
iv) दोन पासपोर्ट साईज फोटो आणि
v) रु. 500/- डिपॉझिट ठेवून आपण पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडू शकतो. याचा व्याजदर 4% प्रतिवार्षिक आहे. आपण सिंगल अकाउंट किंवा दोन जणांचे जॉइंट अकाउंट उघडू शकतो.

2) RD (Recurring Deposit) : ज्यांना प्रति महिना काही ठराविक रक्कम खात्यात जमा करायची असेल, ते RD अकाउंट उघडू शकतात. यात 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला खात्यात पैसे भरावे लागतात. कमीत कमी रु. 100/- ते जास्तीत जास्त रु. 10/- च्या पटीत कितीही रक्कम आपल्याला या खात्यात प्रत्येक महिन्याला जमा करावी लागते आणि पाच वर्षांनी व्याजदरासह संपूर्ण रक्कम आपल्याला परत मिळते. सध्या RD चा व्याजदर 5.8% प्रति वार्षिक आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला RD हा बचतीचा उत्तम पर्याय आहे. RD सुरू केल्यापासून एक वर्षानंतर आपण मुद्दल रकमेवर 50% लोन घेऊ शकतो. ज्यांना पाच वर्षापर्यंत पैसे भरणे शक्य नसेल ते तीन वर्षानंतर खाते बंद करू शकतात. याला प्रिमॅच्युअर क्लोजर म्हणतात. परंतु यात मिळणारे व्याजदर SB अकाउंट प्रमाणे 4% ने मिळते. RD सिंगल किंवा जॉइंट अकाउंट मध्ये शक्य आहे.

3) TD (Time Deposit) : ज्याप्रमाणे बँकेत FD(Fixed Deposit) ची सुविधा असते, त्याप्रमाणे पोस्टाची TD ही बचत योजना आहे. यात फिक्स 1 वर्ष, 2 वर्षे, 3वर्षे किंवा 5 वर्षांसाठी आपण पैसे गुंतवू शकतो. कमीत कमी रु. 1000/- ते जास्तीत जास्त रु. 100/- च्या पटीत कितीही पैसे आपण यात गुंतवू शकतो. सध्याचा व्याजदर : 1 वर्षासाठी - 6.6%, 2 वर्षांसाठी - 6.8%, 3 वर्षांसाठी - 6.9% आणि 5 वर्षांसाठी - 7.0% आहे. प्री मॅच्युअर क्लोजर केले असता व्याजदर कमी असते. सिंगल किंवा जॉइंट अकाउंट आपण उघडू शकतो.

4) MIS (Monthly Income Scheme) : योजनेच्या नावातूनच कळतंय की ज्यांना मासिक उत्पन्न हवं असेल ते या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकतात. एका दृष्टीने बघायचं झालं तर याला आपण एक प्रकारे पेन्शनही म्हणू शकतो. त्यासाठी 5 वर्षांसाठी कमाल मर्यादेपर्यंतची एकरकमी गुंतवणूक यात करून महिन्याला व्याजदराप्रमाणे पैसे भेटतात. यात कमीत कमी रु. 1000/- तर जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये आपण गुंतवू शकतो. याचा सध्याचा व्याजदर 7.1% प्रति वार्षिक आहे. दर महिन्याला मिळणारे व्याज आपोआप SB अकाउंट मध्ये जमा होते आणि आपण ते पैसे वापरू शकतो. जर जॉइंट अकाउंट असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये आपण यात गुंतवू शकतो. MIS मध्ये ग्राहकांसाठी आणखी एक छान सोय केली आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांचे SB अकाउंट मध्ये जमा झालेले व्याजाचे पैसे आपोआप RD अकाउंट मध्ये गुंतवले जाऊ शकतात. त्यामुळे MIS+RD दोघांचेही व्याज मिळून आपला दुप्पट फायदा होतो. जर 5 वर्षांच्या आत खाते बंद केले तर नियमांप्रमाणे मूळ रकमेत कपात होते.

5) SCSS (Senior Citizens Savings Scheme) : 60 वर्षांवरील वयस्कर लोकांसाठी SCSS ही उत्तम बचत योजना आहे. 5 वर्षांसाठी कमीत कमी रु.1000/- ते जास्तीत जास्त 15 लाख रुपये यात गुंतवून ठरलेल्या व्याजदराप्रमाणे आपल्याला दर तीन महिन्यांनी व्याज भेटते. याचा व्याजदर 8.0% प्रतिवार्षिक आहे. ज्यांचे वय 55 ते 60 वर्षांमध्ये आहे आणि ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे त्यांना SCSS हे अकाउंट रिटायरमेंट नंतर एका महिन्याच्या आत उघडता येते. डिफेन्स सर्विस मधून जे रिटायर्ड झाले आहेत त्यांना अकाउंट उघडण्यासाठी वयोमर्यादा नाही. एकंदर, पेन्शनर्स साठी SCSS आणि MIS या उत्तम बचत योजना आहेत.

6) PPF (Public Provident Fund) : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना दीर्घकालीन आहे. नोकरदार वर्गासाठी बचतीचा हा उत्तम पर्याय आहे. यात 15 वर्षांसाठी कमीत कमी रु. 500/- ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये प्रतिवर्षाला गुंतवून ठरलेल्या व्याजदराप्रमाणे अकाउंटला प्रतिवर्षी व्याज जमा होते. याचा सध्याचा व्याजदर 7.1% आहे. प्रत्येक वर्षी किमान 500 रुपये ते कमाल 1.5 लाख रुपये एकरकमी किंवा 12 इंस्टॉलमेंट मध्ये भरू शकतो. यात जॉइंट अकाउट उघडता येत नाही. संपूर्ण भारतामध्ये पोस्टात किंवा बँकेत PPF चे केवळ एकच खाते उघडता येते. 15 वर्षांच्या आत सामान्य परिस्थितीत प्रीमॅच्युअर क्लोजर करता येत नाही. केवळ विशिष्ट अटींमध्येच प्रिमॅच्युअर क्लोजर होऊ शकते. व्याज हे संपूर्णपणे करमुक्त असते. अकाउंट उघडल्यापासून 5 वर्षानंतर प्रत्येक वर्षी withdrawal म्हणजेच पैसे काढू शकतो. अकाउंट उघडल्यानंतरच्या 1 वर्षानंतर प्रत्येक वर्षी लोन घेऊ शकतो. एका वर्षात एकदाच लोन घेता येते. दुसऱ्या वर्षी लोन घेण्यासाठी पहिले लोन क्लिअर असणे गरजेचे आहे. जर एखाद्या वर्षी कमीत कमी 500/- रुपये भरले गेले नाहीत तर ते अकाउंट बंद (discontinued) होते. अकाउंट पुन्हा चालू (active) करण्यासाठी किमान 500/- रुपये + प्रत्येक चुकलेल्या वर्षाचा 50/- रुपये दंड याप्रमाणे पैसे भरावे लागतात.

7) सुकन्या समृद्धी योजना (SSA) : मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पोस्टाने आणलेली सगळ्यात दमदार स्कीम म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत सर्वात जास्त व्याजदर 7.6% दिला जातो. मुलीच्या जन्मापासून ते ती 10 वर्षांची होईपर्यंत हे अकाउंट उघडू शकतो. म्हणजेच वयोमर्यादा - 0 ते 10 वर्षे. 250/- रुपये डिपॉझिट भरून हे अकाउंट उघडता येते. किमान 250/- रुपये ते कमाल 1.5 लाखापर्यंत दरवर्षी यात पैसे गुंतवू शकतो. प्रत्येक वर्षी एकरकमी किंवा कितीही इन्स्टॉलमेंट मध्ये आपण पैसे भरू शकतो. अकाउंट उघडल्यापासून 15 वर्षांपर्यंत प्रतिवर्षी हे पैसे भरावे लागतात. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून त्या खात्याला 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीला दिली जाते. जर एखाद्या वर्षी पैसे भरण्यात खंड पडला तर किमान 250/- रुपये + प्रत्येक खंड पडलेल्या वर्षाचा 50/- रुपये दंड याप्रमाणे पैसे भरून खाते पुन्हा चालू करता येते. एका घरामध्ये जास्तीत जास्त 2 मुलींचे सुकन्या खाते उघडू शकतो. जुळ्या मुली असतील तर अशा परिस्थितीत कमाल 3 सुकन्या खाते उघडता येतात. व्याज प्रत्येक वर्षी अकाउंट मध्ये जमा होते. शैक्षणिक कामासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 50% रक्कम मिळू शकते. खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
i) पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असलेला सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म
ii) मुलीच्या जन्माचा दाखला
iii) मुलीचे 2 पासपोर्ट साईज फोटो
iv) मुलीच्या आई किंवा वडिलांचे आधार कार्ड चे झेरॉक्स
v) पॅन कार्ड चे झेरॉक्स
vi) 2 पासपोर्ट साईज फोटो.
चला तर मग, 'मुलींचे शिक्षण आणि लग्न याचे टेन्शन सोडून देऊया, मुलीच्या जन्मानंतर लगेचच सुकन्या समृद्धी खाते उघडूया'.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) : आजकाल सगळे व्यवहार ऑनलाइन होत असताना पोस्ट ऑफिस यात मागे कसे राहणार? म्हणून IPPB शी संंलग्न होऊन पोस्ट ऑफिस ने आपले ऑनलाइन व्यवहार सुरू केले. त्यामुळे पोस्टाच्या कोणत्याही बचत योजनांचा लाभ घेताना IPPB चे ऑनलाइन अकाऊंट उघडणे फायदेशीर ठरते. यात SB अकाउंट IPPB शी लिंक करता येते. फंड ट्रान्सफर सुलभरीत्या करता येते. UPI सर्विसेस पुरवल्या जातात. ऑनलाइन बिल पेमेंट्स करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे RD, PPF, सुकन्या यांचे एकदा खाते उघडले की पुढचे पैसे भरण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही. IPPB हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून ऑनलाईन पैसे जमा करता येतात. त्यासाठी IPPB चे ऑनलाईन अकाऊंट नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमन उघडून देतात. त्यासाठी केवळ आधार कार्ड आणि 200/- रुपये डिपॉझिट ची गरज असते.

संपूर्ण योजनांची अधिक माहिती मिळवण्यासाठी www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला नक्की भेट द्यावी.

थोडक्यात काय तर विविध डाकघर बचत योजनांचा लाभ घेऊन आपण उद्याच्या आनंदाचे दरवाजे खुले करू शकतो.

- प्रतिक्षा जोशी-शेटे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
दर तीन महिन्यांनी व्याज भेटते. ........ व्याज मिळते असे कराल का?

काई फरक नाई पडत, कोनाले याज भेटते, कोनाले मिळते, आखरी हाय पैसाच !.

- बोली ले मान द्या, नाई तर मराठी डूबते रे बा.

वरील स्कीम मधले म्या

१. पी पी एफ
२. पोस्टल लाईफ इन्शुरन्स
३. Senior citizens Savings Scheme

हे प्लॅन घेल हायत, पर पोस्टातून नाई बाप्पा, पोस्ट लैच ढिले काम होय, साधं बुड्याच पासबुक भराले घंटाक भर लावते ते लोकं.

छान उपयुक्त माहिती...
पोस्ट ऑफिस चा एकंदर अनुभव घेऊन मी आता पोस्टाचे व्यवहार ऑनलाईन सुरू केले आहेत...खूप बरं पडतं...दर महिन्याला रांगेत उभं राहणं नको...

प्रधानमंत्री वयवंदन योजनेची माहितीदेखील द्यावी ही विनंती, जरी ही योजना मर्यादित कालावधीसाठी असली तरी सरकार तिची अंतिम मुदत वाढवून देत आहे...

उपयुक्त माहिती. माझ्या वडिलांनी विश्वासाने पोस्ट खात्यात थोडी बचत टाकली आहे. आजवर अनुभव चांगलाच आला आहे.