भाग १ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82537
भाग २ सुरु
करोना काळातल्या त्या दोन वर्षांच्या बऱ्या(च)वाईट आठवणी मागे टाकून पुनःश्च हरिओम करून स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली.
ट्रेनिंग सर्वसाधारणपणे आठवड्यातले दोन दिवस पोहोणे, दोन दिवस सायकलींग आणि दोन दिवस धावणे असे असायचे. ज्यात विकांताला करायचे ट्रेनिंग जरा जास्त आणि त्यातही शेवट शेवट ज्याला ब्रिक वर्कआऊट प्रकारचे करायचे असते. म्हणजे एकाच दिवशी दोन ऍक्टिव्हिटी करायच्या जसे की पोहून झाल्यावर किंवा सायकलिंग करून झाल्यावर लगेचच रनिंग करायचे असते. त्यातही सायकलिंग नंतर धावणे जरा अवघड जाते आणि म्हणूनच त्याचा सराव खूप महत्वाचा असतो. मला दर शनिवारी सुट्टी नसते फक्त दुसऱ्या शनिवारी असते. त्यामुळे माझ्या ट्रेनिंग प्लॅन मध्ये फेरफार करून असे ब्रीक दुसऱ्या शनिवारी ऍडजस्ट करून घ्यायचे आणि एकंदरीत ट्रेनिंग सुयोग्य प्रकारे होईल हे बघायचे ह्याकरता बरेच मानसिक कष्ट घ्यावे लागले आणि तारांबळ उडाली.
तसेही रनिंग करत असताना दररोज सकाळी उठायचे आणि धावत सुटायचे इतकेच करायचे असते फारात फार म्हणजे स्पीड वर्क आऊट आहे की हिल रिपीटस की एस एल डी इतकेच बघून लक्षात ठेवायचे. पण ट्रायथलॉन ट्रेनिंग म्हणजे आधी उद्या काय करायचे आहे ते बघणे, समजा उद्या सायकल असेल तर हेल्मेट, ग्लोव्हस, प्यायच्या पाण्याच्या सायकलीला अडकावयाच्या बाटल्या, रिफ्लेक्टर्स नीट पुसायचे, अंधारात लवकर निघायचे असेल तेव्हा ब्लिंकर चार्ज केलेला आहे ई. ; पोहोणे असेल त्यावेळी पोहायचा पोशाख, टॉवेल, पास , तिकडेच शॉवर घ्यायचा असेल तर साबण असे सगळे सामान घेतले आहे ना हे तपासणे अशी अनेक व्यवधाने असतात. पाऊस पडत असला की त्याची अजून वेगळीच व्यवस्था बघायची. अशा सतराशे साठ भानगडी. नाही म्हटले तरी ह्या सगळ्याचा जरा ताण येतोच. विसरा विसरीही होते. मग अजून वेगळ्या गमती जमती. असो.
ह्याशिवाय हे इतके मुख्य ट्रेनिंग नीटपणे करता यावे म्हणून आठवड्यातून दोनदा तरी स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करणे गरजेचे होते. ते कधी आणि कसे जमवावे हा एक मोठा प्रश्नच होता. सकाळचा वेळ हे तीन प्रकार करण्यातच खर्ची पडत असे. अजून लवकर उठून करायचे म्हणजे झोप कमी होणार त्यामुळे स्ट्रेंग्थ ट्रेनिंग संध्याकाळी करणे हाच त्यावर उपाय. पण संध्याकाळी घरी गेल्यावर घरच्या घरी ते काही होईना. घरातून परत बाहेर पडणे देखील कंटाळवाणे होत होते. त्यामुळे ऑफिसातून परस्पर एका जिम मध्ये जावे आणि व्यायाम करून मगच घरी परत जायचे असे ठरवले. आणि त्यानुसार मग जिम मधे ऑफिसचे कपडे बदलायचे आणि व्यायम करून झाल्यावर घरी जायचे अशी पद्धत अवलंबली. अनेकदा ऑफिसच्या कामामुळे उशीर झाला म्हणून म्हणा किंवा अन्य काही कारणांनी आठवड्यातून नाही झाले तरी एकदाच का होईना पण स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करत राहिलो.
इतका सारा व्यायाम करत राहिल्यामुळे खाणे ह्या प्रकाराकडे लक्ष द्यायला हवे असे जाणवले आणि ट्रेनिंगच्या अखेरीस रोज एक चमचा प्रोटीन पावडर खायला सुरु केली. शिवाय स्पर्धेच्या वेळी एनर्जी जेल मिळतात म्हणून शेवटचे दीड दोन महिने मोठी सेशन्स करताना एनर्जी जेल खायलाही सुरु केले.
सगळ्यात जास्त ज्या बाबीचा त्रास झाला (पण ज्यामुळे मी अत्यंत कणखर बनलो असे मागे वळून पाहता जाणवते आहे) ती म्हणजे सर्व ट्रेनिंग /तयारी बहुतांशी एकट्याने करावी लागली.
नाही म्हणायला ट्रेनिंगच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे एप्रिल मे महिन्यात बाळकृष्ण सप्रे सोबत पानशेतला केलेली एक छोटी ट्रायथलॉन आणि नंतर तिकडेच स्विमेथॉन मधे ५ किमी पोहोणे सोबत केले. बाळकृष्णचीही ऑस्ट्रिया इथे होणाऱ्या आयर्नमॅन करता केलेली नाव नोंदणी २०२० सालची. माझ्याप्रमाणेच त्यालाही दोन वर्षे वाट पाहावी लागली. बाळकृष्णमुळे आपला दूरस्थ का होईना एक साथीदार आहे ही भावना जरा आश्वस्त करणारी होती.
अर्थात असेही झाले की लोणावळ्याला एकटा सायकलिंग करत निघालो असताना वाटेत कोणीतरी असेच एकेकटे सायकल चालवत जाणारे भेटले आणि त्यांच्यासोबतही ओळख मैत्री झाली.
नंतर टिळक तलावावर कौस्तुभ नाडगीर भेटला तोही कोणाचे कोचिंग न घेता स्वतःच ट्रेनिंग करत होता. त्याने एस्टोनिया इथे होणाऱ्या आयर्न मॅन करता नाव नोंदवले होते. त्याच्यासोबत संजय राव ही असा स्वतःच्या प्लॅन नुसार ट्रेनिंग करत होता. ते दोघे ओपन वॉटरच्या सरावाकरता कासारसाई इथे जात होते. मी देखील त्यांना जॉईन केलं. सुंदर परिसर आहे तो. त्याआधी माझ्या माहितीतली मंडळी वेगळीकडेच जात असत. कासारसाईला गेलो असता तिथेच चैतन्य वेल्हाळशी ओळख झाली. आणि नंतर त्याने वीर धरणापाशी आयोजलेल्या हाफ आयर्न अंतराची ट्रायथलॉन सराव म्हणून पूर्ण केली. कौस्तुभ, संजय राव ई. मंडळी पोहून झाल्यावर वडापाव वगैरे खायची त्यामुळे जास्तच जवळची झाली एकदा कासारसाई च्या काठावर आशुतोषने स्वतः अत्यन्त निगुतीने आणि प्रेमाने बनवून खिलवलेला जगात भारी ब्रेकफास्ट ही एक खूप सुंदर आठवण आहे. तसेच एकदा भर पावसात आम्ही काही जण उरवडे इथे पोहलो त्याचीही आठवण अशीच मनात घर करून राहिलेली आहे. अंधारून आलेले आभाळ, संततधार पडणारा मुसळधार पाऊस आणि त्या निर्मनुष्य जागी पोहणारे आम्ही अवघे पाच सहा जण. अत्यंत विलक्षण अनुभव.
ह्या अशा काही, विकांताला होणाऱ्या घटनांमुळे मीच काय तो एकटा ट्रेन करतोय ही भावना देखील नाहीशी झाली आणि आपण अत्यंत कूर्मगतीने का होईना वाटचाल सुरु ठेवली की आपली काहींना काही प्रगती होतेच / अडचणीतून मार्ग निघतोच हे ही जाणवले.
कोव्हीडोत्तर काळात युरोपचा व्हिसा मिळवू पाहणाऱ्यांच्या संख्येत अचानक प्रचंड वाढ झाल्याने व्हिसा काढण्याकरता पुण्यात अपॉइंटमेंट मिळाली नाही. अगदी मुंबईत देखील ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यातली वेळ मिळत होती. मग मुद्दाम त्याकरता म्हणून रजा काढून वाढीव पैसे घालवून बंगलोरला जाऊन व्हिसा interview देऊन आलो. ऑगस्ट मध्ये एस्टोनिया येथील टॅलीन आणि कझाकिस्तान अशा अजून दोन ठिकाणी आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेणाऱ्या पुण्यातल्या बऱ्याच जणांना व्हिसा मिळवण्याकरता असेच मुंबई बंगलोर दिल्लीला जावे लागले. बंगलोरात अभिनव कडेच उतरलो होतो त्याच्या सोबत भरपूर गप्पा झाल्या. त्याने अनेक टीप्स सांगीतल्या. हा खरेतर माझ्या पेक्षा वयाने खूप लहान. पण तो हुषार आहे आणि त्याने एक फुल आणि दोन हाफ अंतराच्या आयर्नमॅन स्पर्धा पुर्ण केलेल्या आहेत. त्याने मला माझ्या प्लस मायनस बाजू सांगून अनेक प्रकारे प्रोत्साहीत केले. त्याने दाखवून दिलेल्या माझ्या प्लसपॉईंट्स मुळे माझ्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली.
मध्यंतरीच्या काळात अजून काही जण इटलीच्या स्पर्धेत करता नाव नोंदते झाल्याचे बेवसाइट वरच्या स्टार्ट लिस्ट वरून कळले होते. मग त्यातली मराठी नावे पाहून त्यांना फेसबुक वरून शोधून काढले तर चार जण पुण्यातले निघाले त्यांच्यापैकी दोघांसोबत अधून मधून संपर्कात राहू लागलो. मनाला मोठा दिलासा मिळाला.
माझे विमान प्रवासाचे तिकीट लुफ्तान्सा कंपनीचे होते. मुंबई ते इटलीतल्या बोलोन्याचा प्रवास फ्रॅंकफर्ट मार्गे होणार होता. विमानातून मला माझी सायकल न्यायची असल्याने नेहेमीच्या पेक्षा जास्त आकाराचे सामान न्यायचे असल्यास तसे आधीच कळवणे भाग असते मग उपलब्ध जागेनुसार त्यांच्याकडून त्याचे कन्फर्मेशन मिळते तेव्हाच तुम्हाला बरोबर ते सामान सोबत नेता येणार. नाहीतर कार्गोमधून ते कधी येईल आणि आपल्याला मिळेल ते सांगता येत नाही. टॅलीनला जाणाऱ्या एका मित्राला असाच दोन टप्प्यात प्रवास करावा लागणार होता तर त्यातल्या दुसऱ्या टप्प्याकरता असलेले विमान छोटे असल्याने त्यात सायकलला जागा न मिळाल्यामुळे त्याला तिकीट बदलावे लागले. त्याचा व्हिसा अगदी प्रवासाच्या दिवसापासूनचाच मिळाल्या असल्याने दुसऱ्या दिवशीचे महागातले तिकीट आणि शिवाय पोचायला एक दिवस उशीर अशा प्रकारे जावे लागले.
मला लुफ्तान्साकडून दोन्हीवेळच्या प्रवासासाठी कन्फर्मेशन मेल आल्यानंतर जीव जरा भांड्यात पडला.
सामानाची बांधाबांध हा एक मोठा ग्रंथ असेल तर सायकलच्या बॅगेची निवड आणि त्यात सायकल खोलून बसवणे हा एक मोठा अध्यायच होता. जायच्या महिनाभर आधीपासूनच मी ह्या दोन्हीची तयारी करू लागलो होतो. कारण नंतर गणपती आणि त्या करता म्हणून घरी नातेवाईक येणार होते.
मी ठरवले होते की होता होईल तोवर, विमान प्रवासात जास्त वजनामुळे वाढीव पैसे द्यायला लागता कामा नये हे साधायचे. त्यामुळे ठरवले की चेक इन सामान म्हणजे फक्त सायकलची बॅग असेल आणि केबिनमध्ये एक पाठपिशवी इतकेच सामान न्यायचे. सामानाची बांधाबांध लवकर सुरु केल्यामुळे असेल पण समाधान वाटते आहे की योजल्याप्रमाणे सर्व यथास्थित पार पडले. सायकलच्या बॅगेत सायकल सोबत हेल्मेट, वेटसूट, बूट काही खाद्यपदार्थ ज्यासगळ्याचे वजन २० किलो भरले. आणि पाठपिशवीत आवश्यक तेवढे कपडे, औषधे आणि लागणारे इतर सगळे सामान जे ७ किलोच्या आत बसले. तिकडे काहीही कमी पडले नाही.
मी निघायच्या साधारण आठ-दहा दिवस आधी लुफ्तान्सा कंपनीची दिल्ली वरून होणारी तीन उड्डाणे जर्मनीत होत असलेल्या संपामुळे रद्द करण्यात आल्यामुळे सातशे प्रवासी लटकले आणि कंपनीने पर्यायी व्यवस्था न केल्याने त्यातल्या काहींनी ठिय्या आंदोलन केले अशी बातमी वाचनात आली आणि माझे अज्ञानातले सुख हिरावले गेले.
https://economictimes.indiatimes.com/industry/transportation/airlines-/-...
https://www.outlookindia.com/national/hundreds-of-passengers-stranded-at...
होता होता इटलीला प्रयाण करण्याचा दिवस उजाडला. आणि पुण्यातून निघताना चांदणी चौकापाशी असतानाच कळले की माझे फ्रॅंकफुर्ट ते बोलोन्या विमान रद्द झाले आहे. त्याच वेळी जो काही मुसळधार पाऊस सुरु झाला लागला की ज्याचे नाव ते. बाहेर चमकत असलेल्या वीजा म्हणजे त्या बातमीचे मनावर झालेले आघातच जणू. फुल्ल टू फिल्मी. मग लुफ्तान्सा च्या कस्टमर केअरला फोन लावला तर रविवार असल्याने त्यांना सुट्टी होती. शिवाय एरवीही त्यांचा तो नंबर चोवीस तास सुरु नसतो. एक मन जरी सांगत असले की तिकडे गेल्यावर दुसऱ्या विमानाची व्यवस्था होईलच तरीपण (ती वरची बातमी आठवून) नाहीच झाली तर असा विचार करून (घाबरून जाऊन) मी जी काय फोनाफोनी केली त्याचे आता हसू येते आहे पण थोडक्यात सांगायचे म्हणजे जे कोणी जर्मनीत आहेत / होते त्या किंवा ज्या कोणाला जर्मन आणि मराठी / इंग्रजी / हिंदी बोलता येते आहे ( जेणेकरून जर्मनीत विमानतळाबाहेर पडून बस किंवा रेल्वे घ्यावी लागली असता उपयोगी पडतील) अशी माणसे आठवून त्या सगळ्यांना त्रास देऊन झाला. पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वे किंवा बस ची काय सोय आहे त्याला किती पैसे पडतील. सायकल नेता येईल का? ई. ई. करता रितू (अभिनवची बहीण), आनंद काळे आणि अभिजित रबडे ह्यांचे भरपूर डोके खाल्ले आणि त्या सगळ्यांनी भरपूर मदत आणि हौसलाअफझाई केली. त्याबद्दल त्या सर्वांचेच मानावे तितके आभार कमीच. तिकडे फ्रँकफर्टात पोचल्यावर मग झाले असे की लुफ्तांसाच्या सर्व्हीस काउंटरवर जाऊन त्यांचे टोकन घेतले माझा नंबर आल्यावर खिडकीवर त्यांच्या प्रतिनिधीला भेटून सगळी कथा सांगितली. त्यांचे सर्व सोपस्कार पुर्ण केले आणि मग दुसर्या दिवशी सकाळची फ्लाईट मिळाली. एअरपोर्ट जवळच एका हॉटेलात मुक्कामाची सोयही केली गेली. मग काय ती रात्र मुक्काम फ्रँकफर्ट. सकाळी नऊ वाजताच विमानातून उतरलेला मी सगळे सोपस्कार पूर्ण करून दुपारी बारानंतर हॉटेलात प्रवेश करता झालो. ऑफीशियल चेक-इन ला बराच वेळ होता त्यामुळे लॉबीत बसावे लागले. अर्थात त्यादरम्यान 'पोचला का' अशी चौकशी करणाऱ्या सगळ्यांना हे सर्व रामायण कळवण्यात छान वेळ गेला. तिकडे पहिल्यांदाच फूड डिस्पेन्सर मधून खाणे विकत घेतले. मेन्यू निवडायचा, दाखवलेले पैसे कार्ड ने भरायचे खालच्या ट्रे मधून पॅक बाहेर. त्या हॉटेलातले रेस्टॉरंट फक्त ब्रेकफास्ट आणि डिनर करता उघडत असल्याने हेच माझे लंच होते.
दोनच्या सुमारास खोली मिळाल्यावर मात्र मस्तपैकी आंघोळ करून एक छान झोप काढली. रात्रीच्या जेवणाकरता अभिजित न्यायला आला होता त्याच्याकडे जाऊन आलो. रुचकर घरगुती जेवणाचा योग होता. बऱ्याच वर्षांनी भेट होत असल्याने भरपूर गप्पा रंगल्या. रात्री परतायला जरा उशिरच झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुढच्या प्रवासाकरता सज्ज झालो. देवदयेने अजून काहीही घडामोडी न घडता बोलोन्या येथे सुखरूप पोचलो. सायकलची बॅग oversize असल्याने बाकी सगळ्या oversized luggage सोबत बाहेर येतेवेळी तिला जरा वेळ लागला. त्यानंतर मग विमानतळावरून मार्कोनी एक्सप्रेस नावाची एक किंवा दोन डब्याची मोनोरेल घेऊन बोलोन्याचे रेल्वे स्थानक आणि तिकडून पुढे दोन तासाचा प्रवास करून चर्व्हिया येथे पोचायचे होते. चर्व्हियाला जाण्याकरता दर तासाला आगगाड्या होत्या. तिथले तिकीट मशिन एटीएम सारखे असते. त्या मशीनवरून मानवी हस्तक्षेपाशिवाय तिकीट काढता येते. त्या मशीनवर युरोपातील चार पाच भाषा वापरून ते हाताळता येऊ शकण्याची सोय होती. ते मुळी नादुरुस्त होते. त्यावर आधी भाषा, मग कुठे जायचे ते ठिकाण, किती जण जाणार आहेत, कोणती / किती वाजताची गाडी ई. सगळे तपशील भरून झाले की नंतर पैसे द्यायच्या जस्ट आधी एरर दाखवे. दोन तीन वेळा असे करण्यात एक गाडी निघून गेली. तिथली दोन्ही तिन्ही मशिन्स अशीच एरर दाखवत होती. त्यावेळी सोबत असलेल्या सायकलच्या बॅग मुळे चटचट दुसऱ्या मजल्यावरही जाता येईना सायकल सोडूनही जाता येईना त्यावेळी एका काका-काकूंशी ओळख झाली ते ही चर्व्हियालाच जात होते. एकदाचे काय झाले देव जाणे पण त्यातलेच एक मशीन ठीक होऊन तिकीट मिळायला लागले हे मला त्या काकूंनीच सांगितले. योग्य ते तिकीट काढून त्या स्थानकावरच्या १६ फलाटांपैकी योग्य त्या फलाटावर पोचणे हा पण एक मोठाच प्रवास होता. तिकडे पोचल्यावर आम्ही गमतीत म्हटलेही की आजचे ट्रेनिंग सेशन बुडाले अशी हळहळ नको वाटायला. त्या दिवसाचे ट्रेनिंगच पूर्ण केल्यासारखे वाटतंय.
फलाटावर पोचल्यावर एक महिला दिसली. तिच्याकडे असलेल्या सायकल बॅगमुळे ती पण आयर्नमॅन करताच आली आहे हे कळतच होते. ती इजिप्तहून फुल आयर्नमॅन करण्याकरता आली होती. पहिल्यांदा तिकीट काढण्यात वेळ गेल्याने फलाटावर पोचता पोचता डोळ्यासमोर आणि नंतर त्या फलाटावर असूनही उद्घोषणा न कळल्याने अशा एकूण दोन वेळा तिच्या गाड्या हुकल्या होत्या. ती पण आम्हाला येऊन मिळाली. जे काका काकू जोडपे होते त्यातील काका त्यांच्या मुली आणि जावयासोबत हाफ आयर्न करणार होते. आम्ही अशा गप्पा मारण्याच्या नादात असताना मला फोन आला आणि त्यावर बोलत बोलत बराच पुढे गेलो असताना विरुद्ध दिशेला जाणारी एक गाडी फलाटावर आली. आमची गाडी सुटायला अजून दहा मिनिटे असल्याने मी निवांत होतो पण दोन-चार मिनिटे झाली तरी ती गाडी जाईचं ना. मग मी फोन आवरता घेऊन घाईघाईने गाडीपाशी आलो आणि चौकशी केली तेर ती आमचीच हा गाडी होती. जिकडून आली तिकडेच परत जाणार होती. मग आमच्या मंडळींना शोधले तर ते निवांत गप्पा मारत बसलेले. एकीकडे त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत देत सगळेच भरभर गाडीत शिरलो आणि सायकल ची बॅग नीट चढवून बसायला जागा शोधून बसल्यावर दोन चार मिनिटातच गाडी एकदम वेळेवर सुटली. मी नसतो तर ही पण गाडी चुकली असती असे म्हणत त्या ईजिप्शियन बाईने माझे इतके वेळा आभार मानले की मला कानकोंडेच झाले. ती असेही म्हणाली की दोन वेळा ट्रेन चुकल्यानंतर चक्क इजिप्तला परत निघून जावे असा क्षणिक चुकार विचारही तिच्या मनात तरळून गेला होता.
रेल्वे प्रवास मात्र सुखकर झाला. सायकली ठेवायला एका डब्यात स्वतंत्र जागा होती. तिकडे रॅक सारखी सोय होती ज्यावर आपण विनाबॅगेच्या सायकली लावू शकतो. त्या गाडीला ती सोय वापरणारे, बरोबर सायकल घेउन चढउतार करणारे भरपूर आबालवृद्ध होते. बाहेर हवामान आल्हाददायक होते. स्वच्छ आकाश, अधून मधून चुकार ढग, टुमदार घरे, शेतं, फळबागायती, स्वच्छ स्थानके मी तर लहान मुलांसारखा काचेला नाक लावून कौतुकाने बघत बसलो होतो.
तो प्रवास संपला आणि एक दिवस उशीरा का होईना एकदाचा चर्व्हिया येथे पोचलो. रेल्वे स्टेशन वरून टॅक्सी करून हॉटेल वर आलो. माझे हॉटेल स्पर्धा सुरु होण्याच्या ठिकाणा / ट्रान्सिशन एरिया पासून अगदीच जवळ होते. माझ्या हॉटेलात आलेले आणि माझ्या नंतर येत असणाऱ्या इतर सहभागी स्पर्धकांच्यामुळे माहौलच तयार झाला. त्यामुळे आणि वाटेत दिसणारे बॅनर वगैरे मुळे स्पर्धेच्या वातावरणाची जरा जाणीव होऊ लागली आणि मुख्यतः आपण इथे कशासाठी आलो आहोत त्याची जाणीव झाली.
क्रमशः
सलग चौदा तास पोहणं, सायकल
सलग चौदा तास पोहणं, सायकल चालवणं, धावणं हे भयंकर कठीण असं मनात किती वेळा म्हटलं असेल.
आधीची तयारीही तितकीच खडतर होती.
छान लिहिताय.
यातले बरेचसे तपशील माहिती
यातले बरेचसे तपशील माहिती नव्हते
पण हे सगळे अनुभव प्रत्यक्ष त्याच्याकडून ऐकण्यात जास्त भारी वाटतात
बरेचसे मायबोलीकर भेटले आहेतच त्याला बाकीच्यांनीही भेटा शक्य असल्यास
मस्त हाही भाग!
मस्त हाही भाग!
छान चालू आहे लिखाण !
छान चालू आहे लिखाण !
सलग चौदा तास पोहणं, सायकल चालवणं, धावणं हे भयंकर कठीण असं मनात किती वेळा म्हटलं असेल. >> +११
तुम्ही जे के काही केले आहे ते केवळ क मा ल आहे _/\_
वाचतेय. मस्त सुरू आहे.
वाचतेय. मस्त सुरू आहे.
मस्तच....
मस्तच....
सलग चौदा तास पोहणं, सायकल चालवणं, धावणं हे भयंकर कठीण असं मनात किती वेळा म्हटलं असेल. >>> +१
आधीची तयारीही तितकीच खडतर होती. >>> +१
हा भाग पण मस्त. आधीच्या भागात
हा भाग पण मस्त. आधीच्या भागात बर्याच जणांनी सांगितल्या प्रमाणे फोटो सुद्धा टाकायचं मनावर घेणे
हे किती कठीण आणि म्हणूनच
हे किती कठीण आणि म्हणूनच कौतुकास्पद आहे ह्याची कल्पना हे भाग वाचून येत आहे. तेव्हा पुन्हा तेच सांगते असच सविस्तर लिहा.
घरात तुमचं यश कौतुकाने सगळ्याना सांगितलं तर आहेच पण मुलांना लिंक ही fwd केलीय ह्याची म्हणजे बघा.
हा भाग मस्त झालाय! सगळं
हा भाग मस्त झालाय! सगळं प्रत्यक्ष घडताना बघतोय फील आला.
पासपोर्ट मिळवणं आणि इतर तद्वत
पासपोर्ट मिळवणं आणि इतर तद्वत प्रसंग तुमची समयसुचकता, अचूक निर्णय क्षमता दाखवतं... तुमच्याकडे शारीरिक क्षमता तर आहेच पण जोडीला बुध्दीचातुर्यही आहे याचेच हे निदर्शक . या दोन्ही गोष्टी ज्याच्या जवळ तो कशातही यशस्वीच होणार.
खरच आव्हानांचे अत्तरच लावले छाताडावर...
कथनाची ओघवती शैली मस्तच....
छान झालाय हा भाग सुद्धा.
छान झालाय हा भाग सुद्धा. ऑफिस सांभाळत सगळे सराव करणे म्हणजे केवढा निर्धार आणि चिकाटी लागली असेल याची कल्पना येते.
मस्त!! छान चालू आहे मालिका.
मस्त!! छान चालू आहे मालिका.
वाचूनच धाप लागतेय
वाचूनच धाप लागतेय
मस्त अनुभव येतोय नुसते
मस्त अनुभव येतोय नुसते वाचूनसुद्धा . छान
छान! पु भा प्र.
छान! पु भा प्र.
मस्त. चित्रपटच पाहतोय असेच
मस्त. चित्रपटच पाहतोय असेच वाटतंय वाचताना.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
लेखात काही फोटो वाढवले आहेत.
वाचूनच धाप लागतेय >>> खरयं
वाचूनच धाप लागतेय >>> खरयं अगदी.
वर म्हटल्याप्रमाणे ऑफिस सांभाळून इतका सराव, इतकं सगळ नियोजन... हॅट्स ऑफ टू यू हर्पेनजी _/\_
वाचताना काटा आला अंगावर.
वाचताना काटा आला अंगावर. बाकी व्यवधानं सांभाळून एवढं सगळं जमवलत , सलाम तुम्हाला.
वरील सगळ्या प्रतिसादांना मम.
वरील सगळ्या प्रतिसादांना मम. अडथळ्यांची शर्यत पार करून आयर्नमॅन झालात तुम्ही. हॅट्स ऑफ. परत एकदा अभिनंदन. खुप छान लिहीलयत.
वाचतानाच इतकं धडधडत होतं,
वाचतानाच इतकं धडधडत होतं, तुझ्या पेशन्सला नमस्कार. खरं तर नेहमी आधी फोटो बघितले जातात मग लेख वाचला जातो पम या वेळी उलटं झालं. खरोखर कमाल आहेस तू ___/\___लिहितोयसही मस्तच
धन्यवाद आबा. ,धनश्री, धनुडी
धन्यवाद आबा. ,धनश्री, धनुडी आणि अवल.