आख्ख्या कांद्याची आमटी

Submitted by मेधावि on 19 September, 2022 - 22:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नेहमीचंच घरातलं

क्रमवार पाककृती: 

आमच्या पणजीबाईंचा हा अजून एक खास पदार्थ.

बाजारातून नेहमीच्या आणलेल्या कांद्यातलेच लहान लहान कांदे वेगळे काढायचे. ते सोलून मग भरल्या वांग्याला देतो तशा "अधिक" चिन्हाप्रमाणे दोन चिरा द्यायच्या आणि जरास्सं मीठ चोळायचं.

फोडणीत गोडं तेल घालायचं. रिफाईंड नाही. ( शेंगदाण्याचं असतं ते फिल्टर्ड तेल) तेल तापलं की त्यात मोहोरी, थोड्या मेथ्या, घरी कुटलेला हिंग, हळद, कढीपत्ता, आणि मग त्यात आठदहा लहान लहान कांदे घालायचे आणि झाकण घालून फोडणीतच कांदे शिजवून घ्यायचे. पाचएक मिनिटात कांदे शिजले की त्यात घरचा गोडा मसाला, लाल तिखट, चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा आणि परत एकदा झाकण घालून थोडं शिजवून घ्यायचं. डावानं, उलथन्यानं उगीचच परतायचं नाही. कांदे आख्खेच रहायला हवेत. मग छान शिजलेलं तुरीचं वरण चांगलं घोटून त्यात थोडं पाणी घालून सारखं करून ते फोडणीत घालायचं. चांगली उकळी आली की खडेमीठ, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं. मस्त आमटी तयार होते. सौम्य चवीची, जराशी गोडसरच असते ही आमटी. आंबेमोहोर किंवा इंद्रायणीच्या वाफाळत्या भाताबरोबर खाताना मानवजन्माचं सार्थक होतं. बरोबर लोणचं, पापड, कोशिंबीर काहीही लागत नाही.

मला हे असले पदार्थ खाताना सरोगेट eater मिळावा असं कायम वाटतं. Happy म्हणजे खाणार मी पण वजनाची किंवा आजारांची काळजी मला नाही.

(गोडं तेल, घरचं तिखट, हळद, मसाला, हिंग ह्यानं "चव" चांगली येते. नक्की फरक पडतो. खडेमिठ बेतानं घालायचं कारण ते जास्त खारट असतं. )

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त वाटतेय पाकृ.
आमच्याकडे अगदी छोटे कांदे मिळतात.
कधी आणले नाहीत. ते वेगळ्या जातीचे कांदे असावेत असे वाटते, कारण आकार छोटे असतानाच काढले असा वाटत नाही.
आधी वरच्या प्रमाणेच नेहमीच्या कांद्यातून छोटे कांदे निवडून करून पहातो.

कांद्याचे कालवण मला आवडते, त्यात अंडी फोडूनही आवडते तर गाठीफरसाण घालूनही. ते ही भातासोबतच छान लागते.
हे अख्या कांद्याचेही आवडेलच असे वाटतेय. फोटो हवा होता वाफाळत्या भातासोबत.

छान रेसीपी. आता सांबार कांदे आणणे भाग आहे. . सुप्रसिद्ध लेखक ना. सी. फडके ह्यांना ही भाजी/ आमटी फार आव् डायची. त्यांच्या द्वितीय पत्नी
ही भाजी फार छान बनवत. व अगदी जेवावयास बसल्यावर चुलीवरची गरम उकळती भाजी त्यांना वाढत. भाता बरोबर तर पॉश लागेल.

मस्त पाककृती.
माझी आई अशी आमटी करायची पूर्वी. काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही आमटी व्हायची.

मस्त रेसिपी! माझी आज्जी पण साधारण अशी करायची. ती आमटी भात तूप म्हणजे स्वर्ग! तिच्यासारखी चव आपली का येत नाही याचे उत्तर बहुतेक गोडे तेल, हिंग हेच असावे.

सुरेख रेसीपी. करुन बघते.
आई करते त्यात तुरीच्या डाळी ऐवजी दाण्याचे कुट घालते. बाकी कॄती अशीच. फार छान लागते.

आई करते त्यात तुरीच्या डाळी ऐवजी दाण्याचे कुट घालते. बाकी कॄती अशीच. फार छान लागते.>> सेम आमच्याकडे पण आइ दाण्याच कुट घालुनच करते, कोथिबिर मस्ट आहे.

भारी रेसिपी, कधी खाल्ली नाही अशी आमटी. चिरलेल्या कांद्याच कांदवणी करायची आई बऱ्याच वेळा.

मानव, तुम्ही तर केलीच पाहिजे ही आमटी. कारण लेखिकेने लिहून ठेवलेच आहे - "मानव"जन्माचं सार्थक होतं >>> Lol

केली आणि खाल्ली पण पाहिजे Light 1