मर्मबंधातील नातं.
"बसा गं, शाळेत बाई असले तरी घरात मी आई आहे",
त्यांच्या - माझ्यातील हा पहिला संवाद. संवाद तरी कसा म्हणू! कारण तेव्हापासूनच माझी त्यांच्यासमोर जी बोलती बंद झाली (म्हणजे लाक्षणिक अर्थाने कमी झाली हो ) ती अद्यापही फार फरक नाही.
माझ्या - त्यांच्या नात्याचं जे व्यावहारिक जगात नाव आहे ते म्हणजे त्या माझ्या सासूबाई आणि मी त्यांची सून.
इथल्या भरल्या गोकुळात पाऊल ठेवताक्षणापासून माझी त्यांच्या हाताखाली 'प्रशिक्षणासाठी' निवड झाली. :फिदी : मुळात धोपटमार्ग न सोडणं हा माझा बाणा असल्याने, उगीचच आव्हानात्मक भूमिका घेणं किंवा किरकोळ गोष्टींत बंडखोरी करणं हे मला झेपणारं नव्हतंच. शिवाय मी तेव्हा बऱ्यापैकी 'पाक चॅलेंजड्' असल्याने- 'आमच्याकडे - तुमच्याकडे' वगैरे प्रकार फारसा झाला नाही. नवीन गोष्टी जर पटत असतील किंवा फार नुकसानकारक नसतील तर एखाद्या टीपकागदासारखी मी टिपत गेले. आज माग काढत गेले की याची गंमतच वाटते. अगदी हातपुसणी रोज धुण्यापासून ते पुरणावरणाच्या स्वयंपाकापर्यंत (सगळ्या गोष्टींचा समावेश इथे करणं म्हणजे जरा 'आत्मघातकी' ठरेल :फिदी अनेक गोष्टी शिकवण्याची त्यांची जबरदस्त हातोटी आणि पेशन्स. आम्हाला सगळ्यांनाच कुणी त्यांचं एका शब्दात वर्णन करायला सांगितले तर ते बहुतेक सारखंच येईल ="दरारा".
शाळेत मुख्याध्यापिका असल्याने की काय, पण सर्व प्रकारच्या 'नमुन्यांना' हाताळणं, हा त्यांच्या डाव्या हातचा मळ. नमुने म्हणजे आम्ही घरचे असोत की दारचे. कुणाला कधी आणि किती सैल सोडायचं, वाट सोडून गेलेल्या गाडीला वळणावर कसं आणायचं, याचं कौशल्य वादातीत. उदाहरणार्थ - घरी रुद्र पठण व नंतर फराळ झाल्यावर उगीच गॉसिप करायला महिलावर्ग रेंगाळत आहे, हे लक्षात येताच खुबीने त्यांना वेळेचं महत्त्व सांगणं.इ.
त्यांच्या विशिष्ट सवयी आणि लकबी हा आमचा बरेचदा चेष्टेचा विषय. कपड्यांमध्ये जराही ओलं झालं, तरी ताबडतोब सर्व कपडे बदलणार. स्वतःचा स्वच्छतेच्या कारणास्तव नॅपकीन स्वतंत्र ठेवणार. कुणी त्यांच्या सुपुत्रांचा जरा विषय काढला की अभिमानाने वाक्गंगा वाहू लागणार.. पुढे तिच्यात नातवंडं अलगदपणे सामावली जाणार.. मग आम्ही सुना आठवण करून देणार की "अहो, एक्सक्यूज.. आमच्यावरही थोडे कौतुकशिंपण होऊ दे की"..
शिस्त, वक्तशीरपणा आणि नीटनेटकेपणा यांना प्रिय. खाण्याच्या विशेष आवडीनिवडी स्वतःला नसल्या, तरी आमच्या बाबतीत मात्र सारं लक्षात ठेवून जपणार. पण माजोरडेपणाचा, आळसाचा, अस्वच्छतेचा तिटकारा. घर - कपडे कसं "स्वच्छ" पाहिजे यातील " "स्व... च्छ" असे ठासून सांगणे. त्यावेळी (मनात) माझं म्हणणं "घर हे घर वाटायला हवं. हॉस्पिटल नव्हे". हे बहुतेक त्यांना मनातच ऐकू येत असावं. मग त्यांचं नापसंतीचं काहीतरी उद्गारवाचक चिन्ह आणि स्वतःच्या आधीच शुभ्र असलेल्या साडीवरील अगदी बारकं काहीतरी हाताने निपटून टाकणार.
आदरातिथ्य इतकं आवडीने करणार की इथलीच नव्हे तर आम्हां सुनांच्या माहेरची मंडळी असोत, की मित्रपरिवार, सगळे भारावून जाणं नित्याचंच. शुचिर्भूत होऊन त्यांच्यासमोर गेलं, की कळी खुलणार. विशेषतः घरी गणपतीचं आगमन - वास्तव्य, नवरात्रात होणारी देवीची उपासना, पारंपरिक धर्म, कुळाचार यांनी सुखावणार.
वागण्यात किंवा कपड्यात दैन्य यांची त्यांना अगदी चीड. पैशाची मस्ती नको, हे भान ठेवून तरीही ऐपतीप्रमाणे नीटस राहण्याची आमच्याकडून अपेक्षा.
'वजनदार' होण्याची माझी वाटचाल थांबवण्यासाठी मी जरा हात राखून खाल्लं (ते डायेट वगैरे हमारे बसकी बातच नै), की हमखास डायलॉग - " माणसानं खाऊन माजावं टाकून माजू नये."
खरंच- तब्येतीकरिता अशी सेंटिमीटर - इंच वगैरे मोजमापं कधीच त्यांच्या वापरात नसणार. पण वागण्यात काही विसंगती आढळली की समोरच्याची मापं काढण्यात कोकणस्थी हुशारी. तेही इतकं सहज, की त्या माणसाला स्वतःलाही ते समजणार नाही. आम्हाला याचा अंदाज असल्याने आम्ही आपले हसू आवरत साळसूद चेहऱ्याने बसणार.
अशाने मग काही वेळा खरोखरच त्या निरागसपणे बोलल्या तरी आम्ही विश्वास कसा ठेवावा.. मोबाईल फोन नवीन आलेले, तेव्हाची ही गोष्ट. आमच्याकडे एक तिशीचा मनुष्य काही कामानिमित्त आलेला. कानांत इयरफोन तसाच. तेव्हा श्टाईल म्हणूनही असे काही लोक करत असावेत. तर सासूबाईंना वाटलं की ते श्रवणयंत्र आहे. तो गेल्यावर हळहळत म्हणाल्या, की "इतक्या लहान वयात कसं असं बिचाऱ्याच्या नशिबी.."
अर्थात यावरून आम्ही पुढे बरेच दिवस चेष्टा केली त्यांची.
घरातून बाहेर पडताना पोटात काहीतरी भर घालून निघणं सगळ्यांना मस्ट.
"आता एवढ्या मोठ्या 'मुलांसाठी' (पक्षी आमच्या नवऱ्याची) कशाला काळजी करावी खाण्याची, मुंबईत तर खिशात पैसे असल्यावर माणूस उपाशी राहतच नाही", असा माझा यावर हळूच आक्षेप.
आमचे दोघींचे असे काही ना काही 'आक्षेप' असले, तरी त्यामुळे आमच्या नात्यात गंभीर 'विक्षेप' मात्र नाही आला. कदाचित.. दोघींचीही कौतुक व प्रेमाची निधानं सारखीच असल्याने असेल... किंवा सरत्या काळाने आम्हाला- आमचे काही कंगोरे परस्परांना
कमी त्रासदायक होतील, इतपत वळसा घालून घ्यायची युक्ती साधून दिली असेल (फर्निचर चे कोपरे जसे आपण सौंदर्य टिकवूनही गुळगुळीत करवून घेतो तसे)... किंवा आणखी काही असेल..
मग गरमगरम पदार्थ घरच्यांना खाऊ घालण्यासाठी त्यांचा आटापिटा, आपली व दुसऱ्यांची अतिशय घाई करून कामं आटपून घेणं, इ. गोष्टी जरी मला काही वेळा पटत नसल्या, तरी आपसूकच माझ्याही नकळत काही बाबतींत त्याच वाटेने माझीही पावलं चालू लागली आहेत.. कारण हेच असेल.. एकमेकींना काही नावडत्या गोष्टींसकट स्वीकारणं.. सहवासाने त्याची तीव्रता कमी होणं... उदाहरणार्थ - मला उपास करण्यात फार उरका नसल्याचं त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता स्वीकारलं, मनोमन त्यांना उपास प्रकरण आवडूनही.. आणखीही काही गोष्टी आहेत.. सगळं इथे सांगणं कदाचित अप्रस्तुत होईल.
म्हणजे काय की बराच काळ आपण तोल सांभाळत एकमेकांना असे जोडलेले राहतो, तो परिपक्वतेचा भाग तर असतोच आणि असं एकमेकांचं कौटुंबिक सांध्यात असणं किती सवयीचं झालेलं असतं ना..
परवा घरी सकाळी साडे सात वाजता गुरुजी येणार होते. तर पहाटे उठल्यावर सासूबाईंचा हाकारा कानांवर आला, "चला आटपा. गुरुजी येण्याआधी आंघोळी, पूजा हे व्हायला हवं. मी बाहेरचं झाडून घेतेय."
पण.. मी हॉलच्या दरवाजाजवळ आल्यावर एकदम माझं मन थबकलं. त्या नव्हत्याच... ना त्या काही बोलल्या होत्या. कारण आज गुरुजी येणार होते खरे, पण ते सासूबाईंच्याच कार्यासाठी.. त्या गेल्या आहेत. हा आहे, तो त्यांचा फोटो आहे. हे कसं विसरले होते मी.
त्यांचा तो खास दरारायुक्त आवाज अशा प्रसंगी किती आवश्यक होता, हे आता जाणवतंय. आता आम्हाला कुणी कामं आटपण्याची घाई करणार नाहीये. आपणच जबाबदारीने वावरायचंय.
खरंच... घरी काही कार्य/समारंभ असता कुणीतरी आपल्याला असं ओरडणारं, लक्ष ठेवून योग्य ते करवून घेणारं हवंच ना, असं वाटतंय.
त्या असत्या तर असं म्हणाल्या असत्या, तसंं केलं असतं, असं आठवून आठवून कामं पार पाडतोय... "
गणपतीपूर्वी काही दिवस सासूबाई देवाघरी गेल्या. तत्पूर्वी काही दिवस त्यांची क्रमाक्रमाने मृत्यूकडे वाटचाल सुरू झाली होती.. गेल्या काही महिन्यांपासून वयापरत्वे निर्माण झालेल्या व्याधींनी त्यांचं करारीपण सौम्यपणाकडे झुकत चाललेलं जाणवत होतं.. पण आता मलाच त्यांचं ते सबमिसिव्ह होणं हे स्वीकारणं अवघड वाटत होतं. एखादं मस्तीखोर मूल अचानक शांतपणे वागलं की कसं वाटतं, तसं..
अर्थात त्या बाप्पाच्या भेटीस गेल्याने यावर्षी बाप्पा आमच्याकडे आले नाहीत. आधीच दुःखी असलेल्या घराची आणखीनच तगमग झाली. आजवर गणपती नाही, असे कधीही झाले नव्हते ना.
(मनातलं थोडंसं - मला मात्र माबोवरील गणेशोत्सवाने फार आधार मिळाला. अर्थात इथे लिहायला अवसान एकवटावं लागलं. अशा परिस्थितीत इथे लिहिणं योग्य की अयोग्य, हेही सुरुवातीला समजेना. हे भावनांचं प्रदर्शन नसून प्रकटीकरण आहे. त्यामुळे इथल्या गणेशोत्सवात सहभागी होणं, व्यक्त होणं गरजेचं होतं.. एका दृष्टीने, ही मर्मबंधातली ठेव म्हणजे त्यांना मी वाहिलेली शब्दांजली आहे व ती येथे मोकळी करून माझ्या मनातली गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली आंदोलनं मला थोडी शांत करता आली.. याबद्दल माबो व गणेशोत्सव संयोजक यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक नमस्कार.)
प्राची, किती छान लिहीलंसं!
प्राची, किती छान लिहीलंसं! सासुबाईंना विनम्र श्रद्धांजली!
फार फार फार रिलेट झालं
फार फार फार रिलेट झालं त्यामुळे आवडलं.. साबांना श्रद्धांजली!!
मी जरा प्रेशरमधे आले का माझी सासू नेहमी एक डायलॅाग आहे - ‘टेंशन लेनेका नही, देने का’
हिंदी तसं तोडकं मोडकंच आहे तीचं पण जेव्ह हा डायलॅाग मारते तेव्हा मला ती एखाद्या मोहोल्ल्यातल्या भाई सारखीच वाटते
फार सुरेख लिहिले आहेस प्राचीन
फार सुरेख लिहिले आहेस प्राचीन. मलाही खूप रिलेट झाले.
तुमच्या सासुबाईंना श्रद्धांजली _/\_
फार सुरेख उतरवलयस.
फार सुरेख उतरवलयस.
वाह! खुप सुंदर लिहीलंय!
वाह! खुप सुंदर लिहीलंय!
तुम्ही तुमच्या मनातल्या त्यांच्या बद्दलच्या भावना त्यांना कधी सांगीतल्या की नाही ती माहीत नाही, पण हे वाचून त्यांना नक्कीच तुमचा अभिमान वाटला असता, तुम्ही त्यांची सून आहात म्हणून.
तुमच्या सासुबाईंना श्रद्धांजली
छानच लिहिलंय!
छानच लिहिलंय!
साबाना श्रद्धांजली _/\_
फारच हृद्य लिहिले आहे.
फारच हृद्य लिहिले आहे.
फारच रेलेट झालं.
फारच रेलेट झालं.
हे एक नातं असं आहे की बदनाम ही आहे पण गोडवा ही आहे. काळानुसार खूप दॄढ होत जाणारं नातं.
मला माझ्या सासू बाईंची आठवण आली.प्रेमळ समजुतदार आहेत पण अगदीच अबोल, त्यामुळे बसलेली अढी बरीच उशिरा ने मिटली.
मस्त लिहिले आहे, शेवटाला आवंढा ही आला.
फार सुरेख लिहिले आहेस प्राचीन
फार सुरेख लिहिले आहेस प्राचीन.
तुमच्या सासुबाईंना श्रद्धांजली _/\_
फार सुंदर उलगडली आहे तुमची
फार सुंदर उलगडली आहे तुमची ठेव! काळानुसार पक्व होणारं नातं!
साबांना विनम्र श्रद्धांजली!
हृद्य आठवणी, सुरेख लिहीलं आहे
हृद्य आठवणी, सुरेख लिहीलं आहे प्राचीन. मलाही रिलेट झालं. माझ्या सासूबाईंना जाऊन दोन वर्षे झाली ह्या 5 सप्टेंबरला.
तुमच्या सासुबाईंना श्रद्धांजली _/\_
किती सुंदर लिहिलं आहेस. शेवट
किती सुंदर लिहिलं आहेस. शेवट डोळे ही पाणावले.
साबां ना श्रद्धांजली !
छान लिहिल्या आहेत आठवणी.
छान लिहिल्या आहेत आठवणी. आपल्या हेडबाईच सासूबाई हे फीलिंग ड्यान्जरच असेल सुरुवातीला
तुझ्या साबांना श्रद्धांजली!
खूप सुंदर लेख..!!
खूप सुंदर लेख..!!
लेखाची सुरुवातच किती छान केलीयं ..
तुमच्या सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली..!
छान लिहीलं!
छान लिहीलं!
खूप सुंदर ! शेवट हळवं करून
खूप सुंदर ! शेवट हळवं करून गेला
आईंना श्रद्धांजली
आईंना श्रद्धांजली
आवडले.. मनापासून लिहिलेय हे जाणवते.. तुम्ही ईतरही कथा लिहील्यात या गणेशोत्सवात हे त्याहून छान. पुढच्या वर्षी तुमच्या घरचा बाप्पा असेलच पुन्हा
खूप छान आहे मर्म बंधातील हे
खूप छान आहे मर्म बंधातील हे नाते.
शेवट मात्र चटका लावून गेला.
खूप सुन्दर ओघवते
खूप सुन्दर ओघवते व्यक्तिचित्रण.
सा बांना श्रद्धांजली.
छान लिहिल्या आहेत आठवणी..बर्
छान लिहिल्या आहेत आठवणी..बर्याच ठिकाणी रिलेट करू शकले.
सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली..!
खूप हृदय लेख. श्रद्धांजली.
खूप हृदय लेख. श्रद्धांजली.
ओहह प्राचीन, टचिंग एकदम.
ओहह प्राचीन, टचिंग एकदम. सासुबाईंना श्रद्धांजली.
मलाही काही ठीकाणी फार रीलेट झाला, तुझ्या सा बां च्या जागी माझी आई हा फरक . ही पोकळी कधीच भरुन निघणारी नसते.
खूपच छान लिहीले आहेत तुम्ही.
खूपच छान लिहीले आहेत तुम्ही. टचींग आहे. अगदी आतून आलेल्या भावना कागदावर उतरवलेल्या कळतायत. तुमच्या सासूबाईंना विनम्र श्रद्धांजली.
सुरेख लिहिलेय.
सुरेख लिहिलेय.
सासुबाईंना श्रद्धांजली.
श्रद्धांजली. मनापासून लिहिले
श्रद्धांजली. मनापासून लिहिले आहे, ते जाणवले.
वरच्या सगळ्यांना मम म्हणते.
वरच्या सगळ्यांना मम म्हणते.
Chan lihilay, bhavpurna
Chan lihilay, bhavpurna shradhanjali
फार सुरेख लिहिलं आहे.
फार सुरेख लिहिलं आहे.
बरेचवेळा शिस्तप्रिय लोकांची आपल्याला कटकट वाटते. पण त्यांच्या शिस्तीमुळं घर व्यवस्थित चालतं. पैसे वाचतात. वस्तु जागच्याजागी मिळतात. वेळ वाचतो. वेळेवर पोहोचतो.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
प्रांजळ आणि सहृदय लिखाण.
प्रांजळ आणि सहृदय लिखाण. आवडलं.
Pages