|| नैवेद्यम् समर्पयामि ||

Submitted by स्वाती_आंबोळे on 2 September, 2022 - 11:47

प्रामाणिकपणे सांगायचं तर सणवार साजरे करण्यातला माझा रस हा मुख्यतः त्या त्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ करण्या/खाण्याशी निगडीत असतो.

त्यांतल्या संस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक, कलात्मक संदर्भांचं अप्रूप नक्कीच वाटतं, पण त्यांची सांगड देवधर्म, पूजाअर्चा, कर्मकांड यांच्याशी घालण्याची सक्ती माझ्या प्रकृतीला झेपत नाही. तसा प्रयत्न केला तर 'डेअरी फार्मिंगवली अडॉप्टेड फॅमिली' म्हणून कृष्णाला दहीदूध आवडेल हे ठीक, पण 'बॉर्न अ‍ॅन्ड ब्रॉट अप इन हिमालयाज्' गणपतीला उकडीच्या मोदकांसारखा कोस्टल पदार्थ कशाला आवडायला, नागांना दूध पाजणं हीतर अ‍ॅनिमल क्रूएल्टीच नाही का, असले प्रश्न मला पडतात.

असो. झालं तितकं विषयांतर पुरे झालं. नैवेद्याकडे वळू.

उकडीचे मोदक हा (मी मूळची कोस्टल एरियातली असल्यामुळे) माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणच्या आठवणी घरगुती आणि सार्वजनिक यांतली रेषा पुसट होती त्या काळातल्या आहेत. घरातल्या लहानमोठ्या, स्त्रीपुरुष सर्वांचा हातभार लागत असे मोदक करतांना.

मोदक म्हणजे नुसती उकडलेली पिठी आणि गूळखोबर्‍याचं सारण ही रेसिपी नव्हे. त्यात यंदाचा तांदूळ किती नवा/जुना, किती चिकट निघाला याची चर्चा, घरातल्या सर्वात मोठ्या कर्त्या बाईने उकडीवर शेवटचा हात फिरवून ती कशी न्याहार झाली आहे असा समाधानाने दिलेला निर्वाळा, हाफ तिकिट कंपनीची लुडबूड, कोण किती मुखर्‍या पाडतंय यांतली कॉम्पिटिशन, एखाद्याला किंवा एखादीला त्यांच्या हातखंड्याचा डब्बलडेकर मोदक करायची शिफारस, 'अरे आणखी चार पानं आण जा कर्दळीची' म्हणून हाकाटी, निवग्र्यांना उरेल ना उकड अशी धाकधूक, मध्येच एखादा 'अगदी अर्धाच कप हं!' चहाचा राउंड हे सगळं आवश्यक असायचं. हे असले मॉन्ताजेस अजूनही कधीतरी उगाच तरळतात डोळ्यांसमोर.

आता इथे अमेरिकेत आल्यावर सणवार 'राउंडेड टू द निअरेस्ट वीकेन्ड' अशा पद्धतीने साजरे केले जातात - कारण तेच, तिथीपेक्षा घरातल्या सर्वांचा निवांत आणि संपूर्ण सहभाग महत्त्वाचा! माझा लेक शिक्षणाने आणि पेशाने फूड सायंटिस्ट आहे, आणि स्वभावाने फूडी! त्यामुळे तो हौशीने सगळे प्रकार करतोच, गेली काही वर्षं धाकटी पातीही ओट्याशी लुडबूड करायला लागली आहे. मोदकांच्या फोटोत उजवीकडच्या ताटलीत आहेत ते तिने केलेले चॉकलेट चिप्सचे मोदक.
गेल्या वर्षी कंटाळून नुसत्या मोटल्या वळल्या होत्या - यंदा मुखर्‍या आल्याच पाहिजेत असा तिचा तिनेच पण केला होता. तिला मी इन्स्टावरच्या फोर्क किंवा मुदाळं वापरायच्या आयडियाज द्यायचा प्रयत्न केला, पण तिला हातानेच मोदक करायचे होते.
त्या चारांतला प्रत्येक मोदक तिने चारचार वेळा मोडून नीट जमेतो पुन:पुन्हा हट्टाने केला आहे.
बाप्पा नक्की प्रसन्न झाला असेल तिच्यावर!
.
ukad_modak.jpg
.
आणि हा संपूर्ण नैवेद्य.
.
naivedya1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
धाकल्या पात्याचे तर एकदम बेस्ट!
वर्णन अगदी तंतोंतंत! घरी गणपती असल्याने पहिल्या दिवशी जेवायला ३५-४० जणं तरी असायचीच. मग एकाला सोलाण्याने काकडी सोलायचं काम, एक काकडी चोचवतोय. आजोबा जेवायला घ्यायला केळीची पानं छाटून पर्सनलाईझ आकाराचे तुकडे करताहेत. त्यात सुरीने ती मागशी शीर पान कापलं न जाता कमी करायची म्हणजे पान उटंटळं होत नाही याचे आम्हाला दिलेले धडे, एकीकडे आई उकड काढत्येय. बटाट्याची भाजी आणि अळूची पातळभाजी आधीच झालेली आहे. म्हणजे मग दोन्ही गॅस मोदक करायला मोकळे ही एक चर्चा. एकेक लोक येत आहेत, त्यांना चकली चिवडा चहा याची गडबड चालूच आहे.
तू वर म्हटलं आहेस तशीच उकड चिकट झाली आहे का? वर चर्चा. का कधी एकदा झालेली तशी तांदुळ गिरणीवाल्याने भेसळ दळल्याने झालेली बोंब आणि मग सगळ्या ताकदवान मंडळींना उकड मळायचं दिलेलं काम याची दरवर्षी निघणारी आठवण. एका चुलत आत्याला बिलकुल सुबक मोदक जमायचे नाहीत. मग आम्ही पोरं करायला बसलो की ती म्हणायची, "थांबा मी शिकवते तुम्हाला. चांगले मोदक काय कुणीही शिकवेल. नेट वर्क, पॅच वर्क करण्यात माझ्यासारखी कुणाची मास्टरी आहे का!" Proud मग तिने केलेला तिच्याच भाषेत म्हणजे 'स्वयंभू' Wink मोदक तिने परातीत ठेवला तर कसा आत्याबाईंनी तो उकडच समजुन कसा मळून टाकला याचा तिनेच दरवर्षी सांगितलेला किस्सा. आमचे लहान मोदक, आजीचा भला मोठ्ठा एकवीस कळ्यांचा मोदक. मग तू म्हणालीस तशी डबलडेकर मोदक करण्याच्या फर्माईशी. करंजी केलीत की नाही कुणी? चे हाकारे. उकड संपत आहे वाटलं की अरे निवग्रांना आहे ना? हा कोणाचा तरी प्रश्न. एखादा मोदक कमी चालेल पण भरपूर निवग्र्या आणि कच्चं तेल इज नॉन निगोशिएबल!
एकवीस मोदक झाले की तुळशीचं पान ठेवून त्यांची गणपती समोर रवानगी. मग चला आता हा मोदक झाला की उठा, आवर्तनांना सुरुवात करायची आहे ना... आय मिस इट! Happy

वा! परातभर मोदक आणि ते चार चॅाको चिप्स मोदक फारच सुंदर दिसत आहेत.
कच्चं तेल इज नॉन निगोशिएबल>> कच्चं तेल कशासाठी? हे नाही कळालं

निवग्र्या कच्च्या तेलात बुडवुन मस्त लागतात. निवग्र्या म्हणजे मोदकाचं सारण संपलं की उरलेल्या उकडीत भरपूर तिखट, मीठ आणि भरपूर चिंचेचा कोळ घालून ती उकड लहान पणतीचा आकार असतो त्या आकारात उकडायची. गोड मोदक खाल्ल्यावर ह्या निवग्र्या फार्फार भारी लागतात.

ओह, तुम्ही तिखट आणि कोळ घालता का? आम्ही मीठ, लिंबू, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची देठं बारीक चिरून - असं घालतो. आणि तुपाशी किंवा दह्याशी खातो. Happy

नैवैद्य किती छान दिसतोय.
सुंदर सुबक मोदक. ते चाॅकलेटचे स्पेशल चार तर बाप्पाला खुप आवडले असणार.

ओह, तुम्ही तिखट आणि कोळ घालता का? आम्ही मीठ, लिंबू, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची देठं बारीक चिरून - असं घालतो. आणि तुपाशी किंवा दह्याशी खातो. >>+1 सायीचं दही फार आवडत.
नैवेद्याचे ताट मस्त दिसतंय, चॉकलेट चिप्स मोदक सुबक वळलेत. यासाठी धाकटीला स्पेशल शाबासकी!

सुरेख मोदक आणि आठवणी!
निवग्र्या मला फारशा कधी आवडल्या नाहीत मात्र लहानपणी तरी. आता परत एकदा खाऊन बघायला हव्यात.
अवांतर- फूड सायंटिस्ट म्हणजे नेमकं काय काम असतं?

मस्तच दिसतंय नेवैद्याचं ताट आणि मोदक ...मुलीने केलेले तर फारच छान दिसतायत. आठवणी लिहिल्या ही छान आहेत. अमितवने ही मस्त लिहिलं आहे.

आम्ही मीठ, लिंबू, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची देठं बारीक चिरून >> हेच घालतो पण अगदी थोडी हळद आणि जिरं ही घालतो. मोदक पांढरेशुभ्र आणि निवगऱ्या हलक्या पिवळसर दिसतात.

फार मस्त! सगळं किती निगुतीने केलेलं दिसतेय! चॉकलेट मोदक पण Happy

अमित कित्ती वर्षांनी उटंटळं हा शब्द ऐकला. असे शब्द मला वाटलं आता बाद झाले. कोणाला अर्थ कळेल की नाही वाटतं. त्यामुळे बोललाही जात नाही. मोदकांच्या आठवणीसारखेच नॉस्टॅल्जिक व्हायला झाले.

>>> फूड सायंटिस्ट म्हणजे नेमकं काय काम असतं?
मोठमोठ्या अन्नपदार्थ, औषधं, कॉस्मॅटिक्स इत्यादी तयार करणर्‍या क्लायन्ट कंपन्यांसाठी नैसर्गिक घटकपदार्थांपासून रंग तयार करते त्याची कंपनी.
घटकपदार्थ नैसर्गिक असल्यामुळे कच्च्या मालाच्या प्रत्येक बॅचपासून नेमका तोच रंग तयार करायचा तर फॉर्म्यूला त्याप्रमाणे ट्वीक करावा लागतो. मॉलेक्युलर लेव्हलवर त्याचा ॲनालिसिस आणि क्वालिटी कन्ट्रोल, फूड रेग्युलेशन चेक्स त्याच्या लॅबमध्ये होतात.

_/\_ मस्त मोदक/नैवेद्य. अमितव पोस्टही छान.
कित्ती वर्षांनी उटंटळं हा शब्द ऐकला. असे शब्द मला वाटलं आता बाद झाले. कोणाला अर्थ कळेल की नाही वाटतं. >> Happy

फोटो मस्त.
स्वाती आणि अमित दोघांच्याही आठवणी वाचून ध्वनीगंधरसयुक्त चित्र उभं राहिलं

मस्त लिखाण.उकडीचे मोदक आयुष्यात लग्नानंतर आले.त्यामुळे या सर्व आठवणी नव्या आहेत.सध्या उकडीच्या मोदकांशी नातं 'वर्षातून एक दिवस 21 एका आकाराचे, कळ्यावाले व्हा रे बाबांनो' हे साकडं घालण्यापुरतं आहे.

सुरेख मोदक आणि आठवणी! >>> अगदी अगदी.

अमितव यांचा प्रतिसाद पण सुरेख.

आहाहा, सुंदर दिसतंय ताट! चॉको चिप्स मोदक पण किती सुबक झालेत !! >>> अगदी अगदी.

निवग्र्या प्रचंड आवडतात, मोदक एकच खाऊन निवग्र्या जास्त कशा मिळतायेत ह्याकडे लक्ष असायचं माझं. त्या नुसतं लाल तिखट, मीठ, जिरं वाल्याही आवडतात किंवा मिरची, कोथिंबीर (आलं, कढीलिंब ऑप्शनल) ठेचा घातलेल्याही आवडतात.

Chhan लिहिलंय!

चारचार वेळा मोडून नीट जमेतो पुन:पुन्हा ....
हे भारीच.

तंतोतंत वर्णन! अमितच्या आठवणीपण अगदी डिट्टो!
निवग्र्या प्रचंड आवडतात, मोदक एकच खाऊन निवग्र्या जास्त कशा मिळतायेत ह्याकडे लक्ष असायचं माझं. >+१०० आमच्याकडे मीठ, हि.मिरची, कोथिंबीरवाल्या असतात.

Submitted by स्वाती_आंबोळे on 3 September, 2022 - 00:22 >> ओह.. गुंतागुंतीचं पण इंटरेस्टिंग काम असणारे. मस्त.

माझा लेक शिक्षणाने आणि पेशाने फूड सायंटिस्ट आहे >>>> अरे वा इंटरेस्टींग
धाकटी पातीने केलेलेही मोदक क्युट

लेख आणि त्यावरील पोस्ट्स फारच छान. उकडीचे मोदक , निवग्र्या ह्या अश्या कोकणातील गणपती रिलेटेड आठवणी वाचायला फार आवडतात. आम्ही घाटावरचे त्यामुळे असे कधी अनुभवले नाही.

नैवद्याचं ताट छान, धाकट्या पातीचे विशेष कौतुक, खूप सुंदर मोदक केले आहेत!
अमितवच्या आठवणी पण मस्त Happy