भारत का दिल देखो : (पाककृती ) मकई के खोऊंद

Submitted by मनिम्याऊ on 12 August, 2022 - 07:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मक्याचे पीठ : दीड वाटी (साधारण १५० ग्राम) (मक्याच्या भाकरीसाठी वापरतो ते घ्यावे. Corn flour नको)
ताक : १/२ लिटर (आंबट असावे)
तेल : २ चमचे
हिंग : १ छोटा चमचा
मोहरी : १ छोटा चमचा
हळद : १ छोटा चमचा

वाटणासाठी
आले : १ इंच
लसूण : ७-८ पाकळ्या
हिरव्या मिरच्या : २
कढीपत्त्याची पाने : मूठभर
जिरे : १ छोटा चमचा
मीठ : चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतातील लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत घेऊन आले आहे एक झटपट चविष्ट प्रकार 'मकई के खोऊंद'.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात प्रामुख्याने का प्रकार केला जातो. करायला सोपा आणि हमखास जमणारा हा नाश्त्याचा पदार्थ

पाककृती
एका खोलगट पातेल्यात तेल गरम करावे .

कडकडीत तापले की हिंग मोहरीची खमंग फोडणी दयावी.
त्यात आलं - मिरचीचे वाटण घालावे. एक दोन मिनिट जरासे परतून घेऊन त्यात ताक घालावे.
हळद व मीठ घालून ताकाला उकळी येऊ दयावी. उकळी आल्यानंतर आच कमी करून मक्याचे पीठ थोडे थोडे करत घालावे. एकीकडे मिश्रण सतत ढवळत राहावे लागते नाहीतर पिठाच्या गुठळ्या होतात.
३-४ मिनिटातच मिश्रण घट्ट व्हायला लागते.
साधारण तांदळाच्या उकडीइतके घट्ट झाले की झाकण ठेऊन २ मिनिटे वाफ काढावी.

तोवर एका ताटाला तेलाचा हात फिरवून घ्यावा.
मिश्रण गरम असतानाच उतारावून वाटीच्या साहाय्याने ताटावर पसरवून घ्यावे. नीट थापून वड्या कापाव्या.

५ मिनिटात थंड होते. लगेच खाऊ शकता किंवा वरून आणखी एक फोडणी पसरवून (ढोकळ्याप्रमाणे) पण छान लागते.
ओले खोबरे/ कोथिंबीर पेरून पण सजवता येईल.

WhatsApp Image 2022-08-12 at 1.43.35 PM.jpeg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात १५-२० खोउंद होतात
अधिक टिपा: 

आयत्या वेळी झटपट होणार पदार्थ

(प्रादेशिक प्रकारात ऑपशन्स मध्ये मध्यप्रदेश/ छत्तीसगढ/ मध्यभारत का नाही? नाईलाजाने प्रत्येक वेळी वैदर्भीय किंवा मराठी निवडावे लागते)

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आपल्याकडे असेच मका खिसून फोडणीवर परतून करतात ,

मस्त पाकृ आणि फोटो. नावही मजेशीर आहे.

इंदुरच्या सराफा बाजारात खाल्लेला भुट्टे का खिस फार आवडला होता.

छान व सोपी पाककृती. ते नाव खरेच मजेशीर आहे. मी हैद्रा बादेत राहिल्याने ते सारखे मकईके खाविंद असे वाचत आहे.

मक्याचे पीठ म्हणजे अगदी कणके सारखे मिळते ते ना. मी एकदा पोलेंटा पण आणलेला. पण तो शिजवायचे टेक्निक काही जमलेले नाही. माझ्याकडे फ्रोझन कॉर्न नेहमी असते. मी कधी कधी तो कीस बन्वते. ते ही मिक्सर मधून वाटून हा पदार्थ होईल. पुण्याक डे त्याला मक्याची उसळ म्हणत. गर्म गरम फार भारी लागते. मक्यावर प्रेम आहे हो माझे.

हा ग्लुटेन फ्री पण आहे ना. व मधुमेहींना एकदम सुटेबल आहे. तुम्ही ह्या पारंपारिक पाककृतींची लेख माला करा. इतर ही माहिती द्या. अनेक शुभेच्छा.

Thank you all..

मकैका खाविंद>>> Lol Lol

>>>तुम्ही ह्या पारंपारिक पाककृतींची लेख माला करा. इतर ही माहिती द्या. अनेक शुभेच्छा>>>
धन्यवाद अमा ..
लेखमाला कशी करतात? Admin ला विनंती करावी लागेल का?

लेखमाला कशी करतात?>> जे आता परेन्त चे लेखन आहे ते मला वाट्ते लेखांना एक दोन तीन असे नंबर द्यायचे असतात. व दोन नंबर लेखात एक ची व तीन ची लिंक द्यायची असे असते. त्या अनुषंगाने येणारी छत्तिस गड व इतर भागांची साधी माहिती, लोक, आचार विहार, पारंपारिक स्थळे, लोकांचे ड्रेसिन्ग असे टॉपिक घेउन एक एक लेख व फोटो देता येइल.

मायबोलि विशेष मध्ये बघा अनेक चांगल्या लेख मालिका आहेत. मनी मोहोर पण लिहिईत असतात त्यांना विचारून घ्या. पुढे पुस्तकही करता येइल. त्यांनी कसे कोकणचे केले आहे तसे.

घरात असलेले कॉर्न मिल वापरून आज खोऊंद बनवले. It's been a long day, आणि प्रचंड भूकही लागली होती त्यामुळे वड्या थापल्या नाहीत, तसेच उकडीसारखे खाल्ले. पोटभरीचा संध्याकाळचा नाश्ता झाला, आवडला. Happy
मस्त आहे रेसिपी... धन्यवाद !

अरे वा राधिका. तुम्हाला आवडलं यातच सगळं आलं.
@हीरा, corn flour नको. मक्याची रोटी (सरसों का साग फेमस) साठी के पीठ वापरतो ते घ्यावे. पिवळसर असते ते

@हीरा, मी medium grind कॉर्न मिल वापरले. त्यामुळे खोऊंदचे texture एकदम lighter, fluffier झाले होते.
@मनिम्याऊ, अजून येऊ दे अशा हट के पाकृ. Happy

मस्त पदार्थ. आज करून पाहिला. झटपट झाला. मी सकसचं मका पीठ वापरलं. पुढच्या वेळी वरून फोडणी घालून पाहीन.

IMG_20220819_183200~2.jpg

मनीम्याऊ,
प्रादेशिक मध्ये आता मध्यभारत हा पर्याय दिला आहे.

अरे वा छान दिसतेय..
आवडेल हे असे वाटतेय..

बाकी ॲडमिनला एक विशेष पर्याय द्यायला भाग पाडलेत तुम्ही Happy

#कौतुक - गरिमा तिवारी हिंदीत करते पण मराठीत मध्य भारतीय जेवणाबद्दल लिहीणारी तूच एक आहेस बहुतेक.
#पाकीटढकलू (काँप्लिमेंट आहे! Pushing the envelope मराठीत काय म्हणतात. दिलेल्या चौकटीला मोठे करणे.)

<<<#पाकीटढकलू>>>>>
Lol Happy
Thanks u so much. Happy
एकदम हटके compliment आहे.
अग खरं सांगू का, मध्य भारताविषयी खूप कमी माहिती आहे मराठी लोकांना. खाद्य पदार्थांची तर फारच कमी. कधी वाटतं काही दिवसांतच हे पदार्थ लॉस्ट रेसिपीज मध्ये जमा होतील की काय. म्हणून म्हटलं इथे लिहावं. (आणि माझ्यासाठी पण documentation होऊन जातं Proud )

मनिम्याऊ , खूप छान पाककृती लिहीत आहात. प्रत्येक पाककृती वाचल्यावर करून बघायचा मोह होतो.
(तो कितपत टिकतो हा प्रश्न विचारू नका :-))
तुम्ही प्रत्येक पाककृतीला क्रमांक द्या . म्हणजे एक काउंट राहील
E.g.
भारत का दिल देखो : पाककृती १ - चविष्ट शिंगाडा फ्राईज
भारत का दिल देखो : पाककृती २ - मोईआ बोडी सार ( अंबाडीच्या बोंडांचे सार)

Pages