सिलबीर उर्फ टर्किश एग्स : तुर्की तडका

Submitted by जेम्स वांड on 23 July, 2022 - 05:07
टर्किश कुझिन, सिलबीर, एग्स, अंडी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य खालीलप्रमाणे

पोच एग्स/ हाफ फ्राय एग्स करता अंडी -
१ किंवा २

योगर्ट :-
१. चार चमचे मध्यम आंबट किंवा गोडसर दही, मी वारणा कप मधले वापरले (अर्धे दही पाणी काढून घट्टसर त्यात अर्धे दही नॉर्मल दोन्ही फेटून तयार ठेवावे)
२. मिरी पावडर १/४ छोटा चमचा
३. काश्मिरी मिर्ची पावडर १/२ चमचा
४. मोठी असल्यास १ लहान असल्यास २ लसूण कळ्या ग्रेटर मधून बारीक किसून.

अलेप्पो बटर :-
१. अमूल बटर - १ चमचा
२. चिली फ्लेक्स - एक पुडी (डोमिनोजवाली वापरली)
३. तिखट पूड किंवा स्मोक पापरीका - १/२ चमचा
४. जिरेपूड - १/४ चमचा

चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल :-
१. तिखट हिरवी मिर्ची - १ बारीक तुकडे करून
२. कोथिंबीर पाने ४-५ काड्यांची धुवून
३. ऑलिव्ह ऑइल किंवा ते नसल्यास कुठलेही स्वीट ऑइल (मी शेंगदाणा तेल वापरले घाण्यावरचे) - १ चमचा.
४. अगदी चवीपुरते मीठ.

क्रमवार पाककृती: 

आज एकंदरीतच Brunch प्रकारातील काहीतरी करण्याची ईच्छा होती पण फार साग्रसंगीत घाट घालण्याची तयारी नव्हती कारण पावसाळी आळस अन आठवडाभर कामानं पडलेला पिट्ट्या.

अश्यात दमदमीत काहीतरी पण लवकरात लवकर होईल असे करायचे डोक्यात आल्याने आज सिलबीर उर्फ टर्किश एग्स करून बघितली, अन महाराजा फर्स्ट अटेम्प्ट जीआरई क्लिअर होऊन मनाजोगती युनिव्हर्सिटी फुल स्कॉलरशिपवर मिळावी इतकी जबरदस्त जमली.

ही रेसिपी तीन भागांत असते, योगर्ट बेस, ऑईल्स आणि कम्पोजिशन ऑफ द डिश.

कृती :-

१. योगर्ट -
फेटलेल्या दह्यात मिरी पावडर, मिर्ची पावडर आणि बारीक किसलेली लसूण कळी घालून ते एकजीव करावे. हे दही बाजूला ठेवावे , ह्यात आपल्याला मीठ घालायचे आहे पण प्लेटिंग करेपर्यंत घालू नये, ऐन वेळेवर घालायचे असते.

२. अलेप्पो बटर -
तडका करण्याच्या भांड्यात चमचाभर किंवा आवडत असल्यास २ चमचे अमूल बटर गरम करावे, बटर वितळून त्याचा "crackling" आवाज होत बुडबुडे फुटू लागले की ह्या स्टेजला त्यात चिली फ्लेक्स, तिखटपूड/ पापरीका पूड व जिरेपूड घालून लगेच गॅस वरून उतरवून ढवळून घ्यावे, हे बटर असलेला तडका पॅन तसाच बाजूला ठेवावा.

३. चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल -
लाकडी खलबत्यात किंवा असेल त्या खलबत्यात किंवा मिक्सर मध्ये मिर्चीचे तुकडे आणि कोथिंबीर पाने फिरवून घ्यावीत गंध पेस्ट करायची नाही ओबडधोबड सरबरीत करायची असते, आता एका वाटीत ही पेस्ट काढून त्यावर कच्चे शेंगतेल/ ऑलिव्ह ऑइल अन चवीनुसार मीठ घालून मिक्स करून बाजूला ठेवावे

प्लेटिंग -
वरती सांगितल्या प्रमाणे दह्यात चिमूटभर मीठ घालून फेटून घ्यावे. एका प्लेटमध्ये वरती तयार केलेले योगर्ट/ दही घालून चमच्याने नीट एकसमान पसरून घ्यावे, पसरताना त्यात चिली ऑइल व अलेप्पो बटर टाकायला कंगोरे करून घ्यावेत

त्या दह्यावर आता वरती बनवलेले चमचाभर चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल पसरून घालावे,

इतके झाले की अंडे वाटल्यास पोच (poach) किंवा हाफ फ्राय करून त्या योगर्ट बेड वर ठेवावे, मी हाफ फ्राय केले कारण मला पोचिंगचे परत नवीन भांडी करून कुटाने करणे मनापासून नको वाटत होते,

हे झाले की त्यावरून गार झालेले अलेप्पो बटर ड्रीझल करावे, सोबतीला पिटा ब्रेड खातात जनरली, पण मी घरी होती तीच ब्राऊन ब्रेड कडा कापून कडक भाजून घेतले होते, चालत असल्यास अगदी चपाती घेतली सोबत तरी चालेल.

20220723_131143-01.jpeg20220723_131116.jpg

वाढणी/प्रमाण: 
एका माणसासाठी
माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते तो आय.डी. "माझे मन" आहे. चू.भू.दे.घे.

अर्रर्रर्रर्र असंय होय ते, मला आपलं स्पेलिंग प्रामाणिक वाचून काहीबाही बोलल्यासारखं फीलिंग आलं.

ऋन्मेष , ट्राय करून पाहा आवडेल घरी पण, पोरे कितपत खातील कल्पना नाही कारण त्यात कच्चा लसूण, चिली फ्लेक्स अन हिरवी मिर्ची पण आहे !

चौकातल्या आम्लेटवाल्याकडे हाफ फ्राय मागितल्यावर त्याने झकासपैकी कुरकुरीत तरीही पिवळा बलक runny ठेवून त्यावर एक चमचा प्रत्येकी कच्चा कांदा, टमाटा, कोथिंबीर (खूपच बारीक चिरून) थोड मीठ मिरची आणि ठेचा घालून दिलेला.. नंतर एकदा मसाला हाफ फ्राय try केलं... यात आधी त्या मोठ्या तव्यावर त्याने कांदा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा टमाटा, थोडा दीपक गरम मसाला हळद परतून mash केलं, हे सगळ एका बाजूला ढकलून मग तेलावर अंडे हाफ फ्राय करून त्यावर तो मसाला घातला... त्या दिवसापासून मी आम्लेट खाणे ऑफिशियली सोडले आहे. आता फक्त हाफ फ्राय..

बाकी ही वरची पाकृ try करायला हवी. पण कुटाना खूप आहे Wink

एकदा इंग्लिश ब्रेकफास्ट पण केलेला पॉश पुण्यातल्या पॉश रेस्तरॉला. ते scrambled egg, चीली टोस्ट, बटाट्याचे चिप्स आणि काप, चिकन सॉसेज आणि काळी कॉफी.
मग घरी सुध्दा मी scrambled egg करून बघितले, पण काय जमंचना.

अजिंक्यराव पाटील,

अंड्याच्या गाड्यावरचे व्हेरिएशन हा तर एक स्वतंत्र धागा होईल, पुण्याला फर्ग्युसन कॉलेज गेट नं.३ समोरच एक रेश्मा भुर्जी सेन्टर म्हणून स्ट्रीट फूड जॉईंट होता.

अंडा भुर्जी, ऑम्लेट, हाफ फ्राय हे बेसिक प्रकार सोडून अंडा घोटाळा, अंडा खांडोळी, अंडा चिंगारी, अंडा मुघलाई, ग्रीन ग्रेव्ही (कच्चा पातीचा लसूण बेस्ड) , रेड ग्रेव्ही असे कैक प्रकार करत असे, अंडा राईसचे तर जवळपास ३० प्रकार होते त्याच्याकडे. नंतर ते दुकान कर्वेरोडला शिफ्ट झाले होते. तुफान बनवत असे कुठलेही दोन आयटम लुक ते चव सेम नसणार ही हमी !.

सिलबीर बनवण्यात कुटाना वाटतो पण तुलनेने झटपट होते पाककृती त्याशिवाय जितकी मेहनत जास्त तितकी चव अन फायनल प्रॉडक्ट बेष्ट हे तर मूळ तत्व होय.

Scrambled egg अतिशय सोपी वाटणारी पण कठीण रेसिपी होय, पॅनचे तापमान, वापरलेले फॅट, पळी, कितीवेळ भुजायचे इत्यादी तंत्र जमले तर बेस्ट बनते. आदर्श Scrambled egg हे अर्धवट कच्च्या भुर्जीच्या स्वरूपात असावे एकंदरीत, वरतून फक्त मीठ अन मिरपूड एक एक चिमूट, जन्नत लागते.

अंडी फॅन क्लब जमा होतोय.

Scrambled egg मधे थोडं टोमॅटो केचप + ग्रीन चिली सॉस घालून त्याचं सँडविच केलं असता जबरदस्त लागतं.

ऑम्लेट तुपात नाहीतर अमूल बटरमधे करायची सवय. पण एकदा तेल वापरून केलं तर तेही फार चविष्ट लागलं..

अंडा गाडीवरचे सर्व पदार्थ एक एक करून चाखायचे आहेत. गृप करून गेलं तर एकाचवेळेस बरेच पदार्थ चाखता येतील. तशी समानधर्मी अंडळी मंडळी हवीत.

क्लास जमलीय रेसिपी!! लगेच खावं वाटतंय.
फक्त एक करेक्शन, टर्किश मध्ये याचा उच्चार 'चिलबिर' असा आहे. टर्किश वर्णमालेत पाय मोडलेला सी म्हणजे च.

वा! मस्त!
मला एकदा ही डिश ट्राय करायची आहे.

मी सुद्धा अंडी फॅ क्ल मध्ये

थँक्स मॅगी आणि ललिता प्रीती ,

मॅगी, मला काही माहिती नव्हतं ते, मला कुठलं टर्किश यायला आम्ही आपले इंग्रजीप्रामाण्य पाळणार.

दही आणि अंड हे एकत्र कसं लागेल याबाबत शंका आहे. पण नक्कीच ट्राय करणार.

यात आधी त्या मोठ्या तव्यावर त्याने कांदा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा टमाटा, थोडा दीपक गरम मसाला हळद परतून mash केलं, हे सगळ एका बाजूला ढकलून मग तेलावर अंडे हाफ फ्राय करून त्यावर तो मसाला घातला >>> अजिंक्यराव, माझी फेवरेट डीश. फक्त मी तो मसाला खाली ठेवतो आणि वर अंड असतं. हळद मस्ट! हे व्हायच्या आधी २ मिनिटे अंड्याच्या वर एक चिज स्लाइस घालायची. पोटभर जेवण होते. थंडीच्या दिवसात मसाल्यात लसणाची पात - अहाहा!

परवानंतत आ त्ता वेळ झाला...
हा घ्या फोटो...Screenshot_20220724-223148_Instagram.jpg

मी पण अंडा फॅन...
ऑलमोस्ट दर रविवारचा ब्रेकफास्ट हा माझ्याकडे असतो त्यात ट्राय केलेले प्रकार (नॉर्मल ऑम्लेट्स, स्क्रँबल्स, हाफ फ्राय, बॉईल्ड एग्ज वगैरे सोडून) :

फ्रेंच ऑम्लेट, टॉर्नेडो ऑम्लेट, तॉर्तिआ द पाताता (स्पॅनिश ऑम्लेट), टर्किश पोच्ड एग्ज, चायनीज स्टीम्ड एग्ज, विविध पॅनकेक्स, एग स्प्रेड, अंडा घोटाला, स्वीट स्क्रॅम्बल्ड मॅक अँड चीज आणि साग्रसंगीत इंग्लिश ब्रे.फा. (सगळे फोटो नाहीत)

मला ऑम्लेटला ब्राऊनिंग झालेलं खपत नाही. त्यामुळे बाहेर साध्या ठिकाणी शक्यतो ऑम्लेट ऐवजी भुर्जी ऑर्डर करतो...

जॅपनीज ओमू राईस खायचाय एकदा (मागे एकदा चायना मधे चान्स आला होता, पण घालवला)

हाफ फ्राय लव्हर्सनी एकदा 'केजरीवाल' ट्राय करा.

भरपूर बटर लाऊन तव्यावर भाजलेल्या जाड स्वीटब्रेडच्या स्लाईसवर हाफफ्राय घालून वरून कांदा-टोमॅटो-कोथिंबीरीनी गार्निश केलेला प्रकार.

अँकी, एक नंबर फोटो ! वरतून लाल मिरच्या घातल्या चिरून का टोमॅटो आहे ?

बाकी फ्रेंच फोल्डओव्हर ऑम्लेट विथ विलटेड पालक अँड फेटा चीज हा आमचा आवडता प्रकार, पोच एग्स विथ होलेंडेज सॉस अन सोबत बॉईल्ड शतावरी, अफगाणी/ पठाणी ऑम्लेट, स्पॅनिश ऑम्लेट हे पण करून खाल्लेले आवडते प्रकार, वैयक्तिक मतानुसार अंडी शिजवून खावी ती फक्त कॉंटिनेंटल कुझिन मधलीच, चायनीज टी एग्सची रेसिपी इथेच बघितली आहे पण अजून केली नाहीयेत. अन एकदा हिम्मत करून मला सेंच्युरी एग्स ट्राय करायची आहेत, अर्थात ती घरी करता येणार नाहीत पण भारतात विकत कुठं मिळतील कल्पना नाही मला. बालूत (फर्टिलाईज्ड क्युअर्ड एग्स) मात्र कधीच खायची हिम्मत होणार नाही.

एग्स केजरीवाल मला ओव्हरहाईप वाटली, हाफ फ्राय एग्सवर परतलेली रंगीत सिमला मिर्ची अन इतर मसाले असतात ते, एकच्युअली क्रिकेट क्लब ऑफ इंडिया का बीसीसीआय, मुंबईमध्ये केजरीवाल नावाचे एक सद्गृहस्थ मेंबर होते, ते रोज क्लब कॅफे मध्ये अंडी अन टोस्ट ब्रेकफास्ट करत, एकदिवस त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं कूकला की काहीतरी वेगळं बनव, त्याने वर सांगितली तशी अंडी बनवली, केजरीवालांनी ती खात असताना इतर लोकांनी पाहुन तीच ऑर्डर दिली, अन डिशचे नाव विचारले असता, त्या वेटरने त्याचे नाव एग्स केजरीवाल सांगितले अन तिथून ही डिश प्रसिद्ध झाली

वरतून लाल मिरच्या घातल्या चिरून का टोमॅटो आहे ?
>>

मी बटर मधे चिपोतले चिली चिरून (बिया काढून) टाकतो.
त्याचेच तुकडे आहेत...

केजरीवाल ची स्टोरी सोडाबॉटलओपनरवाला च्या मेनू कार्ड वर वाचली होती
मला त्यातला भरपूर बटर प्यायलेला स्वीट ब्रेड आणि वरच्या हाफ फ्राय चा कॉम्बो इफेक्ट आवडतो

@देवकी,

मला वाटते त्यांनी अलेप्पो बटर विना चिली फ्लेक्स फक्त स्मोक पापरीका घालून बनवले असावे, म्हणून ते मधाच्या रंगाचे दिसत असावे.

मस्त दिसतेय डिश.
कसल्याही प्रकारचे अंडे खाउ शकतो, हे तर मिटक्या मारत खाईन. नक्की करून बघेन, व बघुन झाले की अर्थात खाईन.

अँकी, फोटो बेस्ट आहे.

फ्रेंच ऑम्लेट, टॉर्नेडो ऑम्लेट, तॉर्तिआ द पाताता (स्पॅनिश ऑम्लेट), टर्किश पोच्ड एग्ज, चायनीज स्टीम्ड एग्ज, विविध पॅनकेक्स, एग स्प्रेड, अंडा घोटाला, स्वीट स्क्रॅम्बल्ड मॅक अँड चीज आणि साग्रसंगीत इंग्लिश ब्रे.फा.

>>> असा व्यासंग करायची माझी इच्छा आहे Proud

Pages