आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी (सचित्र) http://www.maayboli.com/node/11999
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: २ http://www.maayboli.com/node/12433
दिवस - आठवणीतला
गेल्या ३-४ दिवसांपासून कुणीच मदतनीस नव्हता. त्यात दोन दिवस मीही घसा दुखणं, कणकण यांनी बेजार झाले होते (माझ्या तब्बेतीचे हे हातखंडा खेळ!). बरोबर कुणी नसलं की कामाचा वेग मंदावतो. एकटीने काम करणं थोडंसं कंटाळवाणंही होतं. शिवाय गावकर्यांच्या त्याचत्याच प्रश्नांना परतपरत उत्तरं द्यायची आणि एकीकडे कामही करायचं याचा ताण येतो. शारिरीक आणि मानसिक, दोन्हीही. त्यातही ठराविक काम ठराविक दिवसांत झालंच पाहिजे अशी माझी मीच आखून घेतलेली डेडलाईन असते. त्यामुळे काल रात्री नाही म्हटलं तरी थोडं डिप्रेस्ड वाटत होतं. फोनवरून नवर्यापाशी थोडी भुणभुणही केली होती की तू मदतीला ये म्हणून.. त्याला अशी अचानक रजा घेऊन, ऑफिसचं काम, त्याचं फील्डवर्क बाजूला ठेवून इतक्या दूर येणं शक्य नाही हे माहित असतानाही. जेव्हा अगदी कुठल्या महत्त्वाच्या ठिकाणी मी चाचणी उत्खनन करणार असेन किंवा पांढरीच्या एखाद्या उभ्या कडेची तासणी (section scraping) करणार असेन तेव्हा तो मला मदत करायला येणार आहे असं आमचं ठरलंच आहे. (skilled labour, परत फुकट! नाहीतर याच क्षेत्रातला नवरा केल्याचा काय उपयोग? :P) आधी नवरा जरा समजुतीच्या स्वरात, आंजारून गोंजारून बोलत होता पण माझी कटकट थांबत नाहीये हे पाहून "फक्त हिंडून सर्वेक्षण करणं ही साधी गोष्टही जमणार नसेल तर सगळं सोडून घरी बस" असा उपदेश त्याने केला. "शेकडो जण असा एकट्याने सर्व्हे करतात तेव्हा उगीचच सबबी सांगू नकोस" या त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे हे माहित असल्याने गप्प बसले. पण तरीही मनाची उभारी कुठेतरी गेलीच होती.
या पार्श्वभूमीवर सकाळी ८ ची बस पकडली. गाव तालुक्याच्या ठिकाणापासून २०-२५ किमी वर. एकदम आतल्या बाजूला. दिवसातून दोनदाच बस जाते. गाडीत फारशी गर्दी नव्हती. माझ्या अवताराकडे आणि जडच्याजड पाठपिशवीकडे बघून कंडक्टरने 'काय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह का?' असा प्रश्न टाकलाच! हे छोट्या गावांना जाणार्या एस्ट्यांचे ड्रायव्हर आणि कंडक्टर नेहेमी त्याच त्याच गाड्यांवर असल्याने त्यांना रोजची लोकं पाठ असतात. आणि नवा माणूस काय कामासाठी चालला असेल याचाही ढोबळ अंदाज असतो. माझं 'इतिहाससंशोधक आहे' हे उत्तर ऐकून अंदाज चुकल्याचं आश्चर्य त्याचा चेहेर्यावर उमटलं. पण मी त्या गावाचा इतिहास शोधायला चाललेय म्हणून आनंद पण प्रकट केला. "वा! गावात एक हेमाडपंती देऊळ आहे बरं का! नक्की बघा." असंही तिकिट देता देता सांगायला विसरला नाही. आमच्या या संवादाकडे माझ्या शेजारची म्हातारी मोठ्या कुतुहलाने पहात होती. तिने पण "पोरी, तू आपली आधी साळंत जा. तुला लागंल ती माहिती आन मदत भेटंल थितं!" असा सल्ला दिला.
जवळजवळ पाऊण तासाने गावात पोचले. ८००च्या आसपास लोकसंख्या असलेलं हे गाव नदीकाठापासून १००-२०० फूट आत. चढावर. पुराचं पाणी येऊ नये म्हणून बहुदा. १९६० च्या सुमारास एक इतिहाससंशोधक/ पुरातत्त्वज्ञ या गावाला भेट देऊन गेलेत. त्यांनी इथल्या देवळांची, मूर्तींची तपशीलवार खानेसुमारी केलीये. पण गावात पांढर आहे का? कुठल्या कालखंडातला पुरावा इथे मिळतो? या गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला नाही. या गावाचा उल्लेखही पलिकडच्या गावातल्या एका शिलालेखात मिळतो. तेव्हा याच्या पुरातत्त्वीय आणि शिलालेखीय पुराव्याची सांगड घालायला मी इथे पोचलेय.
गावात उतरले. समोरच शाळा दिसली. ७वी पर्यंत. आसपासच्या गावांतनंही इथे पोरं शिकायला येतात. शाळा सकाळची. मी आत शिरले तेव्हा पाणी प्यायची सुट्टी चालू होती. पोरांचे खेळ तुफान रंगले होते. मला पाहून एकदम सगळं थांबलं. मी शिक्षकांची खोली कुठंय ते विचारलं. पोरी लाजून पळाल्या तर पोरं आ वासून बघत होती. त्यातल्याच एकाने जरा धिटाईने लांबूनच खोली दाखवली. मी तिथे गेले. आत ३-४ शिक्षक बसले होते. त्यांच्याशी नमस्कार-चमत्कार झाले. सगळेच जण बाहेरगावचे, तरुण. ते म्हणाले "इथले मुख्याध्यापक गेली बावीस वर्षं याच शाळेत आहेत, शिवाय शेजारच्याच गावचे. तेव्हा ते येईपर्यंत थांबा थोडंसं. ते तुमच्यासंगत बरोब्बर माणूस लावून देतील बघा."
चहा पीत पीत शिक्षकांशी गप्पा झाल्या. त्यातल्या काही जणांना M.Phil करायचं होतं. मग मी M.Phil कुठनं केलं, वेगवेगळ्या विद्यापीठांचे वेगवेगळे नियम, अर्हतेच्या अटी, फिया, गाईड, इतर खर्चाची कलमं यावर एक परिसंवादच झाला म्हणा ना! तेवढ्यात मुख्याध्यापक आले. ५०-५५ चे. बुटके, सडसडीत, काळसर वर्णाचे. चेहेर्यावरून तरी बरे वाटले. मी काही बोलायच्या आतच इतरांनी उत्साहाने माझी ओळख करून दिली. मुख्याध्यापकांनीही अगदी अगत्यानं मदत करायचं आश्वासन दिलं. म्हणले "७वीतल्या ३-४ पोरी लावून देतो तुमच्यासंगत, त्या दाखवतील तुम्हाला गाव." आणि नको नको म्हणत असतानाही परत एकदा चहा मागवला.
मी मुख्याध्यापकांच्या ऑफिसमधे एका कोपर्यात बसले होते. पाहिलं तर सगळे शिक्षक त्यांच्याभोवती कोंडाळं करून, मधूनच माझ्याकडे तिरके कटाक्ष टाकत, त्यांच्याशी कुजबुजत्या सुरात काहीतरी खलबत करू लागले. माझ्याबद्द्ल बोलत होते का? काही कळेना. २-४ मिनिटं अशी बोलणी झाल्यावर एकदम पांगापांग झाली आणि मुख्याध्यापकांनी फायलीत डोकं खुपसलं. थोड्या वेळाने मी त्यांना मुली देताय ना? अशी आठवण करून दिली. ते आपले हो हो म्हणून दुसरीच कामं करत होते. बरं, सरळ नाहीही म्हणत नव्हते. मला काही कळेना, आता नक्की काय करायचं? तेवढ्यात एक शिक्षक आत आले आणि त्यांना म्हणाले, "झालं सगळं! आता विचारा त्यांना". मी आपली बावळटसारखी पहात होते दोघांकडे. मग मुख्याध्यापक शांतपणे बोलते झाले, "आज सावित्रीबाई फुले जयंती आहे. आम्ही दरवर्षी समारंभ करतो. तुम्ही आलाच आहात तर तेवढ्या अध्यक्ष व्हा. नाही म्हणू नका." मी गारच पडले! भाषणं, वक्तृत्त्व या गोष्टींपासून मी चार पावलं लांबच रहाणं पसंत करते. शिवाय वयोवृद्ध व्हायला अजून अनेsक वर्षं बाकी असल्यानं (आणि ख्यातनाम व्हायचा कधीही संभव नसल्यानं) अध्यक्षपद घ्यायचं म्हणजे काय याचीही पटकन कल्पना करवेना. बरं, मी माझ्या इंटरनॅशनल वेषात. धुवून धुवून काळ्याची करडी झालेली सलवार, त्यावर तेवढाच जुनाट शेवाळी कुर्ता आणि फ्लुरोसंट पोपटी रंगाची ओढणी. पायात चॉकलेटी बूट आणि गळ्यात केशरी स्कार्फ. अगदी पंचरंगी पोपट! हे सगळं किती विनोदी आणि एक्झॉटिक दिसत असेल असा एक अत्यंत अस्थानी (आणि खास बायकी) विचारही मनाला चाटून गेला.
मला अगदी व्यवस्थित कोंडीत पकडलं होतं त्या सरांनी. मी अध्यक्षपद स्वीकारल्याशिवाय मला मदत मिळणार नाही हे उघडच होतं. शेवटी हो म्हणायलाच लागलं. "दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमासाठी नवा अध्यक्ष कुठून आणणार? तुम्ही आयत्या आल्याच आहात तर... " असं मला स्वच्छपणे सांगण्यातही आलं! मला आपलं पोपटाच्या डोळ्याप्रमाणे माझं काम खुणावत होतं. तेव्हा "जे काय भाषण-बिषण करायचं असेल ते तुम्ही थोडक्यात आटपा, माझ्याकडे फारसा वेळ नाही." असं काहीसं अनिच्छेनंच मी त्यांना सांगितलं आणि त्या समारंभाकडं गेलो. शाळेच्या एका व्हरांड्यात टेबल, ३-४ खुर्च्या, एकीवर सावित्रीबाईंचा फोटो, आणी समोर पटांगणात बसलेली मुलंमुली. सुमारे १००. गुणिले दोन नजरा माझ्यावर खिळलेल्या. माझ्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झालं, सावित्रीबाईंच्या फोटोला हार घालण्यात आला. मुख्याध्यापकांनी थोडक्यात माझी ओळख करून दिली आणि म्हणले, "आता माननीय अध्यक्षा त्यांचं मनोगत ऐकवतील". इतका वेळ मी हसू दाबत तिथे बसले होते. 'मी - अध्यक्षा' या विनोदावर आणि घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होतील या कल्पनेने मला वारंवार हसण्याची उबळ येत होती. त्यावर एकदम बर्फाच्या पाण्याचा शिपकारा बसावा तसं झालं. मनोगत? माझं? च्याXX हे काय आणखी आता? असा विचार करतच मी उभी राहिले.
आणि खाडकन सगळ्या परिस्थितीचं भान आलं. सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीसाठी एका आडगावात का होईना, लायकी नसतानाही मला अध्यक्षा केलंय; आणि याचं मला काहीच मोल वाटत नाहीये? इतकी करंटी मी कशी झाले?
काय बोलावं याची मनात जुळवाजुळव करू लागले आणि विचारांची साखळी मनात तयार होत असतानाच इकडे माझ्याच नकळत बोलायला लागले. "मी काही अशी कुणी महान नाहीये की आज इथे या खुर्चीत बसायचा मान मला मिळावा. पण आज तुम्ही ज्या कुतुहलाने माझ्याकडे पहाताय, मी अशी गावं हिंडत हिंडत संशोधन करत तुमच्याकडे आलेय त्याचं एकमेव कारण म्हणजे सावित्रीबाई! त्या होत्या म्हणून मी आज ही अशी आत्मविश्वासाने तुमच्यापुढं उभी आहे." अचानक गळा भरून आला, छातीत दुखल्यासारखं व्हायला लागलं. पुढे काही बोलवेचना. मग स्वतःला थोडं सावरलं. पुढेही आणखी काहीतरी बोलले, पण ते विचार करून बोलल्यामुळे यांत्रिक होतं आणी कदाचित म्हणूनच आता आठवतसुद्धा नाहीये. पोरांनी आदेशानुसार टाळ्या-बिळ्या वाजवल्या. पण त्या क्षणी मी सगळ्यापासून दूर गेले होते. मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं "त्या होत्या म्हणून आज मी इथे आहे".
शहरात वाढलेली, क्वचितप्रसंगी झगडा करून पण अट्टाहासाने हवं तेच शिक्षण घेतलेली, हवा तोच पेशा आणि हवा तो आणि हवा तेव्हाच आयुष्याचा जोडीदार निवडलेली मी मुलगी - हे सगळं जगायचं स्वातंत्र्य कुठेतरी गृहीतच धरत गेलेले! इतर बायका-मुलींना नेहेमीच इतकं स्वातंत्र्य मिळत नाही हे आजूबाजूला दिसत असतानाही त्याची आतपर्यंत जाणीव गेले कित्येक वर्षांत झाली नाहीये. शिवाय माझ्या पेशातही स्त्री-पुरुष भेद सुदैवाने आत्तापर्यंत मला कुणी जाणवू दिला नाहीये. स्वतःकडे आणि इतरांकडेही एक 'व्यक्ती' म्हणून बघायची सवय अंगात मुरलीये. इतकी की बाहेरच्या जगात वावरताना स्वतःचं बाईपण मधनंमधनं विसरायलाच होतं.
पण आज हे सगळं सगळं तळापासून ढवळून निघालं.
मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे पण तेवढीच एक बाई आहे - आणि माझा हा 'व्यक्ती'पणा कडचा प्रवास इतका सुकर झाला त्यात माझ्यावर सावित्रीबाई आणि त्यांच्या उत्तरसूरींचं फार फार मोठं ऋण आहे हे कधी नव्हे ते प्रकर्षाने जाणवलं. आतमधे कसलीतरी लखलखीत जाणीव झाली!
परत एकदा शिक्षकांचा गराडा. त्यांचं काम झाल्याने सगळेच खुशीत होते. मग त्यातल्यात्यात चुणचुणीत अशा ५ पोरींना बोलावून माझ्याबरोबर गाव हिंडायला सांगितलं. पोरी तशा लाजर्याबुजर्याच होत्या, पण शाळेतून बाहेर पडल्यावर कळ्या खुलल्या. ताई ताई म्हणून हात धरून गप्पा मारायला सुरवात केली.
इथेही गावाखाली पांढर दबली गेलीये. त्यामुळे पांढरीची माती वापरून बांधलेल्या पण आता पडलेल्या जुन्या दगडी इमारतींच्या बखळींमधे जाऊन खापरं शोधली. मध्ययुगीन खापरंच फक्त मिळाली. जरी १२-१३ व्या शतकातलं देऊळ आणि मूर्ती तिथे होतं तरी आणखी काहीच महत्त्वाचं मिळालं नाही. याच्याही आधीचा पुरावा नक्कीच जमिनीच्या पोटात असणार पण माझ्या नशिबात नव्हता. एकीकडे पोरींना किती प्रश्न विचारू आणि किती नको असं झालं होतं! मी या खापरांचं काय करते, इतिहास कसा लिहितात, तो शाळेच्या पुस्तकात कसा येतो इथपासून सुरू करून ते मी घरी काय घालते साडी की ड्रेस, काय खाते, कायकाय स्वैपाक येतो, 'वशाट' खाते का, नवर्याशी भांडते का, नवे सिनेमे पाहिले का, शाहरुख आवडतो का असे सगळे प्रश्न विचारून झाले. त्यांच्या खळखळून हसण्याला आणि एकमेकींना चिडवण्याला तर काही सुमारच नव्हता!
पंचकन्यका
सगळं गाव फिरून झालं. आता १० मिनिटांत एस्टी येणार होती. पोरींचा निरोप घ्यायला लागले. तेव्हा माझा हात धरून म्हणाल्या - " ताई, आम्हीपण तुमच्यासारख्या शिकणार, आणि संसार केला तरी स्वतःच्या पायावर उभं रहाणार.' आत्ता लिहिताना मलाही ही प्रतिक्रिया साचेबंद वाटतेय, पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यातले आशेचे भाव मात्र अगदी खरेखरे होते!
बस आली! सगळ्यांनी मला टाटा करून हाताला हात लावून निरोप दिला. मन इतकं भरलं होतं की पुढच्या गावाला जायचा बेत रद्द करून मी घरी परतले.
आज या गोष्टीला दोन वर्षं उलटून गेलीत. परत कधी त्या गावात जायचा योग आला नाही. माहीत नाही या मुलींची आयुष्यं काय वळणं घेणारेत! काही काळाने मला विसरूनही जातील. पण माझ्या मनाच्या/ आठवणीच्या खास कप्प्यात हा दिवस कायमचाच जाऊन बसलाय. आत्तापर्यंत बरेच जणांना मिळतात तशी मलाही काही बक्षिसं मिळालीयेत, थोडंफार शैक्षणिक यश मिळालंय, पण त्या दिवशी अनाहूतपणे लाभलेलं सावित्रीबाईंच्या नावाचं ते अध्यक्षपद माझ्यासाठी त्या सगळ्यासगळ्यापेक्षा कितीतरी अप्रुपाचं आहे. खरंचच!!!
वाचून खरच भरून आल....खरच
वाचून खरच भरून आल....खरच आठ्वणीत राहणारा दिवस्...एक्दम प्रामाणिक लिहलय तुम्ही..आवडल..भिडल अगदी.
खरं आहे, तो समारंभ (ते
खरं आहे, तो समारंभ (ते अध्यक्षपद असणे हा बोनस) जास्त मोलाचा होता.
पंचरंगी पोपट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच लिहिलय. आठवणीत राहणारा
छानच लिहिलय. आठवणीत राहणारा दिवस....त्या मदतनीस मुलींची शिकण्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईच्छा वाचुन आनंद झाला.
सुरेख!!
सुरेख!!
मस्त लिहीलयसं
मस्त लिहीलयसं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बन्दा रुपया. खणखणित लिहिता ओ.
बन्दा रुपया. खणखणित लिहिता ओ.
तुमची लेखनशैली खूपच मस्त आहे,
तुमची लेखनशैली खूपच मस्त आहे, अगदी नैसर्गिक, समोरासमोर बसुन गप्पा मारत गोष्ट सांगितल्यासारखी.
वा!
वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिलंयस (पुन्हा
छान लिहिलंयस (पुन्हा एकदा!)
खरंच कर्वे, फुले आदी प्रभुतींचे आपल्यावर खूप उपकार आहेत!
खूप सुंदर, वरदा. खरच. तुझ्या
खूप सुंदर, वरदा. खरच. तुझ्या ह्या रोजनीशीत कुठेतरी डोळे पुढलं वाचत जातात... पण मन कशालातरी अडून बसतं किंवा काहीतरी बरोबर घेऊन कुठेतरीच निघालेलं असतं.
आज मी अडकले इथे -
<<...आणि खाडकन सगळ्या परिस्थितीचं भान आलं. सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीसाठी एका आडगावात का होईना, लायकी नसतानाही मला अध्यक्षा केलंय; आणि याचं मला काहीच मोल वाटत नाहीये? इतकी करंटी मी कशी झाले?
>>
आपल्या करंटेपणाची झगझगीत जाणीव हा जितका क्लेशदायक अनुभव आहे तितकाच...
तितकाच, ठरवलं तर आयुष्य उजळणाराही.
पुन्हा एकदा परत येऊन (उरलेला) लेख (मन लावून) वाचेन, म्हणते.
लिही बाई...
फार फार आवडला हा लेख
फार फार आवडला हा लेख सुध्दा!
ही लेखमाला अजून पुढे चालावी अशी मनापासून इच्छा!
फार फार मस्त लिहिताय....खूप
फार फार मस्त लिहिताय....खूप छान वाटतंय वाचतांना...
असं अतिशय थकवणारं काम करतांनाही मनाचा तुमच्या तजेला जपून आहे हे खूपच जाणवतंय.
लिहित रहा...
हा ही भाग मस्तच. >>>"दरवर्षी
हा ही भाग मस्तच.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>"दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमासाठी नवा अध्यक्ष कुठून आणणार? तुम्ही आयत्या आल्याच आहात तर... " असं मला स्वच्छपणे सांगण्यातही आलं! >>>>>
आत्तापर्यंतचे सगळेच भाग खूप
आत्तापर्यंतचे सगळेच भाग खूप सुरेख!
"त्या होत्या म्हणून आज मी इथे आहे". >>>> सावित्रीबाई फुले याच्याविषयीचं इतकंच वाक्य जे खरंच महत्वाचं ते बोलल्यावर बाकी जे काही बोलली असशील त्या मुलामुलींसमोर ते महत्वाचं नव्हतं पण मला खात्री आहे त्यातूनच त्या शंभर मुलांपैकी (आणि त्या तरुण शिक्षकांपैकीही) कुणालातरी काहीतरी आयुष्यभराची प्रेरणा, काहीतरी वेगळं, चाकोरीबाहेरचं करुन पहाण्याची स्फुर्ती नक्कीच मिळाली असणार.
सूर सापडलाय तुला वरदा! लिहिण्याचा आणि जगण्याचाही.
पुढचं वाचायची उत्सुकता आहे. लिहित रहा.
पंचरंगी पोपट प्रामाणिक आणि
पंचरंगी पोपट![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रामाणिक आणि ओघवती शैली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिलंय पुढे वाचायची
छान लिहिलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढे वाचायची उत्सुकता आहे.
आवडलं. सहजसुंदर आणि प्रामाणिक
आवडलं. सहजसुंदर आणि प्रामाणिक लेखन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरदा.. काय सुरेख लिहितेस
वरदा.. काय सुरेख लिहितेस गं..वाचताना हे इथे भिडतं.. तुझ्याबरोबर चाललेला आमचा व्हर्चुअल प्रवास असाच चालू दे..तुझ्या प्रवाहात आम्हाला सामिल करुन घेतल्याबद्दल धन्स्..अधून मधून पेरलेले खुसखुशीत विनोद तर ओठावर तर्हेतर्हेच्या स्मायलीज उमटवून जातात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा!!क्या बात है
मस्तच एकदम !!! आवडल
मस्तच एकदम !!! आवडल
सुंदर, मनाला भिड्लं एकदम.
सुंदर, मनाला भिड्लं एकदम.
>>>>>सावित्रीबाई! त्या होत्या
>>>>>सावित्रीबाई! त्या होत्या म्हणून मी आज ही अशी आत्मविश्वासाने तुमच्यापुढं उभी आहे." अचानक गळा भरून आला, छातीत दुखल्यासारखं व्हायला लागलं. >>>> असच कहितरी होतंय असे वाटले.... आज कॉम्पुटर समोर बसून हे वाचताना !
खुप छान लिहित आहात.
खूपच छान!
खूपच छान!
''आतमधे कसलीतरी लखलखीत जाणीव
''आतमधे कसलीतरी लखलखीत जाणीव झाली .''हे खास .छान लिहील आहे .पंचकन्यांचा फोटो पण
आवडला .
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्त लिहीत आहात....पुढील
मस्त लिहीत आहात....पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच सुंदर...एकदम मनात
फारच सुंदर...एकदम मनात काहितरी हलवुन जाणारे...
त्या होत्या म्हणून.. कित्ती
त्या होत्या म्हणून.. कित्ती खरं! मस्त वाटलं वाचून.
दिवसातल्या ठळक प्रसंगाचे
दिवसातल्या ठळक प्रसंगाचे नुसते वर्णन आणि फ्रेम टु फ्रेम सिन ह्यात फरक असतो.तुमचे लिखाण हे फ्रेम टु फ्रेम आहे.छानच .
नेहमी प्रमाणेच सुरेख! त्या
नेहमी प्रमाणेच सुरेख! त्या होत्या म्हणून.. वाचतानाच भरुन आलं.
कसदार!
कसदार!
Pages